पहिल्या पावसातील दोन ऑफ बीट ट्रेक्स, १०-११ जून २०१७

कल्याण दरवाज्या मार्गे सिंहगड आणि केट्स पॉइंट मार्गे महाबळेश्वर! ट्रेकर्स ने तसे कमी पायधूळ झाडलेले हे दोन ट्रेक्स!

पहिल्या ट्रेकचं बेस व्हिलेज कल्याण तर दुसऱ्याचं वयगाव! डोंगराच्या मधोमध वसलेली
दोन टुमदार गावं! डोक्यावर गोणपाट पांघरून पोटापाण्यासाठी सिंहगड आणि महाबळेश्वरची पायवाट झपाझप कापणारे गावकरी!




मान्सूनची हलकीशी चाहूल.....रिमझिम बरसणाऱ्या पाऊसधारा....सुर्यावरही अधिराज्य गाजवणाऱ्या ढगांच्या बदलत्या कला... क्षणात काळेकभिन्न तर क्षणात  धवल.... दूरवर डोंगरांनीही ओढून घेतलेली द्विरंगाची चादर.....क्षणात दाट धुक्याच्या लहरी तर क्षणात नितळ नितांत सुंदर आकाश.....हिरवीगार वनराई आणि हलकाश्या पावसाने ओली झालेली काळी-तांबडी लख्ख हिरवीचिंब पायवाट...पावसाने धुवून उजळून निघालेले मोठं-मोठे पत्थर.....मधूनच येणारी गार वाऱ्याची मंद झुळूक.....

झाडाला फुटलेली कोवळी पानेफुले....


पक्षांचा किलबिलाट आणि चिवचिवाट....आनंदाने सुरेल स्वरात गुणगुणणारे असंख्य मोर आणि लांडोर---स्वच्छंदी उडणारी फुलपाखरे....पानांवर अलगद झुलणारे दवबिंदू....निसर्गाचं रूप बघायला बाहेर पडलेलेले अगणित “पैसे”......हिरव्यागार गवतांच्या पायघड्यावर तुरुतुरु धावणारा लालचुटूक रंगाचा “मृगाचा किडा” अर्थात “मखमल”....

धोम धरणाचा सुंदर परिसर.... 



धुके सामावून घेतलेला कल्याण दरवाजा आणि केट्सचा कातळकडा....कड्यावरून पाझरणाऱ्या संगीतमय जलधारा.... 

केट्स पॉइंट, एलिफंट हेड पॉइंट (नीडल पॉइंट)...



वक्राकार पायऱ्यावरून सरसर खाली झेपावणारे पाण्याचे ओहोळ..


सिंहगडावरून दिसणारा राजगड-तोरणा......केट्स पॉइंटवरून दिसणारा कमळगड –पांडवगड!


आम्हीच होतो इथे निसर्ग यात्री.....आसमंतात आणि धरतीवर फक्त “मी”.....




पहिल्या पावसातील दोन ट्रेक किती समान.....पहिला पाऊस आणि पहिला ट्रेक होता सर्वांसाठी खास....

कोणासाठी “बूमरॅंग”......कोणासाठी “स्नॅपचॅट”.....कोणासाठी “डीएसएलआर”....कोणासाठी “व्हिवा व्हिडीओ”..कोणासाठी “डील/निगोसीएशन”..... तर कोणासाठी “मातीचा गंध, आठवणीतील पाऊलवाट, मनाची धुंदी आणि अशब्द हुरहूर”......


ट्रेक फक्त एक माध्यम, निसर्गाला जोडणारं, स्वत:ला शोधणारं आणि मैत्री जपणारं!



फोटो आभार : ट्रेक टीम

No comments: