चावंड किल्ला -कुकडेश्वर मंदिर-अंबा,अंबिका केव्ह्ज विथ "माची" इको अॅन्ड रुरल टुरिझम !१८ नोव्हेंबर २०१७


श्री. राजकुमार डोंगरे ,वनस्पती अभ्यासक, माझे स्नेही आणि परममित्र यांच्या विचारातून साकारलेली एक संकल्पना म्हणजे "माची"!

"माची " विषयी वाचूयात त्यांच्याच शब्दातून......



आजच्या पिढीला ग्रामीण जीवन आणि सह्याद्री रांगेतील विविध पैलूंची ओळख करून देण्याच्या ध्यासातून पुढे आलेली एक संकल्पना! आहे ना भन्नाट!  ह्या संकल्पनेबद्दल ऐंकल आणि उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यांच्या पहिल्या इव्हेंटचा अनुभव घेण्यासाठी मन आतुर झालं होतं.

"माची" अंतर्गत पहिला इव्हेंट होता....



जवळ जवळ तीन महिन्यापासून आकार घेत असलेला हा इव्हेंट एकदाचा समीप येऊन ठेपला. १८ तारीख उजाडली आणि १७ उत्साही पार्टीसिपंन्टस ना घेऊन "माची" निघाली.

टीम लीडर्स तेवढेच भन्नाट! राजकुमार डोंगरे स्वत:. वनस्पती, फुले, पाने, पक्षी इ. चा दांडगा अभ्यास असणारं एक अफलातून व्यक्तिमत्व! "वनधन सह्याद्रीचे" (http://sahyadrivandhan.blogspot.in)  या मथळ्याखाली सह्याद्री रांगेत सापडणाऱ्या विविध फुलांविषयी ब्लॉग लेखन ते करतात.

ओंकार ढाके! जुन्नर तालुक्यातील पर्यटनात तीन वर्षापासून कार्यरत असलेला गाईड! स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना जुन्नर आणि आजूबाजूच्या ठिकाणे, गड-किल्ले, लेण्या इ. ची माहिती देऊन समृद्ध करणारे आणि हा वारसा आपल्या ज्ञानसागराने जिवंत करणारे एक अभ्यासू आणि तडफदार व्यक्तिमत्व!

विशाल काकडे!  "स्वच्छंद गिर्यारोहक" (www.sgtrekkers.in) नामक पुण्यातील ट्रेक संस्थेचा एक उमदा लीडर आणि सह्याद्री रांगेतील ट्रेकिंग क्षेत्रातील गड-किल्ले, घाटवाटा यांच अचाट ज्ञान असणारं  एक अफाट व्यक्तिमत्व!


जुन्नर गाव सोडलं आणि जुन्नर तालुका, त्यातील गड-किल्ले, लेण्या, अभयारण्य, धरणे इ. ची  थोडक्यात माहिती ओंकार ने दिली. सात किल्ले, पाच धरणे आणि ३५०-३७५ लेण्या एकट्या जुन्नर मधे आहेत. चैत्य, विहार आणि आह्क लेण्यांपैकी चैत्य आणि आह्क लेण्यांचा समूह फक्त जुन्नर मधे बघायला मिळतो.

चावंड किल्ल्याच्या बेस व्हिलेज मधेच "कासवनंदी" या शिल्पाची ओळख झाली. कासव आणि नंदी एकत्रित  कोरलेलं एक हटके शिल्प! या प्रकारचे शिल्प उत्तरप्रदेशात जास्त बघायला मिळतात अशी माहिती ओंकार ने दिली.



गावातून पुढे किल्ल्याकडे पायवाटेने थोडं चालून गेल्यावर चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. पायथ्यालाचं किल्ल्याची माहिती देणारा फलक दिसला!

ह्या गडाला प्रसन्नगड, चामुंडगड असेही म्हणतात.  इ.स. १६७२-१६७३ च्या सुमारास छत्रपती शिवाजीमहाराजांनी चावंडचा किल्ला निकराने लढून काबीज केला आणि त्याचे नाव बदलून "प्रसन्नगड" असे ठेवले"!


"चावंड" हा "चामुंडा" चा अपभ्रंश असावा  असा अंदाज वर्तवला जातो किंवा किंवा "चामुंडा चा अपभ्रंश "चावंड" झाला असावा कि काय ही देखील शक्यता नाकारता येत नाही.

किल्ल्यावर घेऊन जाणाऱ्या दगडी पायऱ्या अलीकडेच बांधलेल्या आहेत.



पायऱ्या चढताना दिसणारी विविध फुले आणि माणिकडोह धरणाचा परिसर नजरसुख देणारा!



रेलिंगच्या सुरुवातीला कातळ कड्याचा भाग तोडलेला  दिसत होता. ज्यावेळी इंग्रज १८१८ मधे महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी "फोडा आणि राज्य करा" ही नीति अवलंबली होती. सुरुंग लावून त्यांनी किल्याचे मार्ग बंद केले. सुरुंग लावून हे मार्ग उध्वस्त केल्याच्या  काही खुणा म्हणजे का तोडलेला  भाग!

दगडात कोरलेल्या खोबण्या/पायऱ्यांनी चढाईचा शेवटचा टप्पा थोडा धोकादायक वाटला. एकावेळी एकचं व्यक्ती इथून जाऊ शकते.



असुरक्षित झालेल्या पूर्वीच्या शिड्या काढून त्याठिकाणी आता रेलिंग लावून चढाईचा हा टप्पा ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी सुरक्षित केला आहे. "शिवाजी ट्रेल" नावाच्या दुर्गसंवर्धनासाठी काम करणाऱ्या पुण्यातील संस्थेने हे रेलिंग लावून घेतलेले आहे.



ह्या खोबण्याच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर अतिशय उंचच्या उंच पायऱ्या चढून जाव्या लागल्या. ह्या पायऱ्यांमुळे त्यावेळी लोक किती उंच आणि धिप्पाड असावेत ह्याची कल्पना येते.



पायऱ्या चढत असताना एका तोफेने लक्ष वेधून घेतलं आणि  ती पायऱ्यांच्या मधोमध का आहे ह्याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता दाटून आली. स्थानिक लोकांनी किल्ल्यावरील तोफ सपोर्ट साठी इथे आणून लावली. ह्या तोफेला साडी बांधून हे स्थानिक लोक त्याचा आता दोर लावून क्लायंबिंग किंवा रॅपलिंग करतात तसा वापर करत असतं.

आता किल्ल्याच्या प्रवेश मंडपावर येऊन ठेपलो. मंडप प्रचंड मोठा! जोर लावून माण्यातून तलवार काढून प्रचंड ताकदीने वर करण्यासाठी उंच आणि धिप्पाड सैनिकांना जेवढी जागा लागेल या हिशोबाने ह्या मंडपाची रचना केलेली आहे.

इथल्या गोमुख प्रवेशद्वारावर, गणेशपट्टी, पन्हाळी,इंटर लॉकिंग (मेटल रॉड), गणेशाची दगडात कोरलेली मूर्ती दिसली. तशीच अजून एक मूर्ती बाजूच्या एका भिंतीवरही दिसली. ओंकार ने दिलेल्या माहितीनुसार प्रथम ह्या बाजूचे प्रवेशद्वार बनवले असावे आणि मग वास्तूशास्त्रानुसार किंवा अन्य कोणत्या कारणाने ते  दार बंद करून नवीन प्रवेशद्वार तयार केले असावे.



आता प्रवेशद्वारातून आत गेल्यावर किल्ल्यावर मुबलक गवत उगवलेलं होतं. गवतातून जाणारी पायवाट कापून गेल्यानंतर पाण्याचा एक मोठा कुंड आणि नंदीची जागा, शिवमंदिराचे अवशेष दिसून आले.




इंटर लॉकिंग कसं केलं जात होतं, मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी असणाऱ्या राक्षसी प्रतिमेचं महत्व (गाभाऱ्यात प्रवेश करून जाताना पायरी ओलांडून न जाता , तिच्यावर पाय ठेवून म्हणजेच आपल्यातील राक्षसी प्रवृत्तीला चिरडून टाकून गाभार्यात प्रवेश करणे)  इ. ह्याची माहिती इथे ओंकार ने दिली.


किल्ल्यावर थोडे पुढे गेल्यावर "७ टाके" ची दिशा दर्शवणाऱ्या एका पाटीने लक्ष वेधून घेतले. सात टाक्यात पाणी होते आणि प्रत्येक टाक्यातील पाण्याचा रंग सूर्यप्रकाशाच्या दिशेनुसार वेगळा भासत होता. ह्याठिकाणी भू-अंतर्गत वाडा असावा असा अंदाज बांधला जातो.



किल्ल्यावर पुढे भटकत गेलो तो लेण्यांच्या समूहाकडे. दारुगोळा साठा करून ठेवण्यासाठी, प्रसंगी कैद्यांना ठेवण्यासाठी, धान्यकोठार म्हणून  बांधलेल्या ह्या लेण्या!



किल्ल्यावरील कामकाजाचे सदर, निवासाची जागा , टॉयलेट, जोती, पाण्याच्या टाक्या इ. ह्या गोष्टी दिसल्या. किल्ल्यावरून समोर दुर्ग ढाकोबा, नवरा-नवरीचा डोंगर, दौन्ड्या डोंगर, निमगिरी -हनुमंत गड हा जोड-किल्ला इ. गड सुस्पष्ट दिसत होते.

गडावरील समोरील बाजूस थोडे उंचावर चामुंडेश्वरीचे मंदिर आहे. चावंड गावची ही ग्रामदेवता! ह्या मंदिराचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले आहे.

किल्ल्यावरील भाग पाहून आता आम्ही किल्ला उतरायला लागलो. पोटात कावळे ओरडायला लागले होते. गावातील शाळेच्या व्हरांड्यात चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. तांदळाची भाकरी, पिठलं, भात-वरण, ठेचा इ.


आता कुकडेश्वर मंदिराकडे आमची वाटचाल सुरु झाली. माणिकडोह धरणाला पाणी देणाऱ्या कुकडी नदीचा उगम दाखवणारे मुख आणि मागे कुकडेश्वराचे हेमाडपंथी धाटणीतील मंदिर! इ. सन. नवव्या शतकात बांधलेले हे मंदिर. शिलाहार जमातीतील झंझ नावाच्या राजाने हे मंदिर बांधले. गाईला संस्कृत मधे "ककुड" म्हणतात. सातवाहन राजा आणि त्याची राणी नागनिका हिने याठिकाणी जनतेला गायींचे दान केले म्हणून याठीकाणाला "कुकडेश्वर" म्हणतात. स्थापत्यशैलीचा एक उत्तम नमुना म्हणजे हे मंदिर! दगड आणि चुना मिश्रणातून बांधलेले !



मंदिराच्या आंत पृथ्वी तोलून धरणाऱ्या यक्षाच्या , शिवाच्या असंख्य शिल्प प्रतिमा आहेत!


मंदिराच्या बाहेरील बाजूस हेमाडपंथी बांधकामांत सुंदर कोरीवकाम आणि शिल्पकला कोरलेल्या आहेत.


जुन्नर मधे असणाऱ्या ३५०-३७५ लेण्यांपैकी अंबा-अंबिका लेणी हा एक ५० लेण्यांचा समूह! जैन धर्मात अंबा-अंबिका नावाच्या देवता आहेत त्यांच्या नावावरून हे नाव दिले गेले असावे असा उल्लेख इतिहासात आढळतो. लेण्यांकडे नेणारा रस्ता ही दाट झाडीतला आणि निलगिरीच्या उंच झाडातून मिळणाऱ्या सुखद सावलीतला! बौद्धस्तूप असणारी चैत्य लेणी इथे पहायला मिळाली. जमिनीच्या आत बांधलेल्या पाण्याच्या टाक्या हे ही एक वेगळेपण!






चावंड किल्ला -कुकडेश्वर मंदिर-अंबा-अंबिका केव्ह्ज पाहून झाल्यानंतर एका "सरप्राईझ" ची घोषणा राजकुमार ने केली. ते सरप्राईझ होते "लगोरी अर्थात निन्गोरचा" चा काळानुसार मागे पडलेला एक खेळ! ह्या इव्हेंटमधे ह्या खेळाचा समावेश करून तो काळ पुढे आणण्याचा हा प्रयत्न खूपचं सुखद वाटला!


दुसऱ्या दिवशी हा खेळ जेव्हा घराच्या पटांगणात रंगतो तेव्हा खेळ इथून पुढेही जिवंत राहील ह्याची अबोल आणि सक्रीय ग्वाहीच नाही का?



"चित्रांग नायकूळ" नामक सापाने आमच्यापैकी काहीजणांना दिले विलोभनीय दर्शन ! सापाची माहिती नंतर "माची" च्या ग्रुपवर पोस्ट झाली.



निळ्या रंगाचे फुलं येणारे व्हायरल डिसीज झाल्यामुळे पानावर हिरव्या-पोपटी रंगाचे फोड आलेले "अर्जेरीया"
मोरवेल अर्थात रानजाई, दिपमाळ इ. वनस्पती इथे बघयला मिळाल्या आणि राजकुमार कडून त्याबद्दल अधिक माहिती मिळाली.

अर्जेरीया

सुवासिक मोरवेल अर्थात रानजाई

दीपमाळ



इव्हेंट दरम्यान श्री. विवेक मराठे सरांशी झालेली भेट हा शुभार्शीवादचं!



तर असा किल्ला, लेणी, मंदिर, रानफुले इ. नी भरभरून व्यापलेला "माची" चा हा पहिला इव्हेंट! ह्याच वेगळेपण हेच होतं कि ह्या सर्वांची माहिती देणारे तज्ञ आमच्यासोबत होते आणि त्यांच्या माहितीमुळे हे "पाहण्याला" एक "जिवंतपणा" आला!

"माची" चं वेगळेपण हे पण कि, ट्रेकला लेणी आणि मंदिराची जोड दिली, कुटुंबातील व्यक्तीं एकत्र येऊन भाग  घेऊ शकतील अशी त्याची मांडणी केली, विविधता जपली आणि समोर आणली, तज्ञ व्यक्तींचा समावेश करून घेतला, वेळेचे उत्तम नियोजन केले, प्रत्येक पैलू मधून एक संदेश दिला आणि पर्यटन "जबाबदार" होऊ शकतं हा विश्वास निर्माण केला!

ट्रेकिंग क्षेत्र व्यापक होत असताना ओंकार सारखे गाईड तयार व्ह्यायला हवेत का? असा विचार मनात तरळून गेला. गाईड असल्याने गड-किल्ले, लेण्या, मंदिरे यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रगल्भ तर होईलचं परंतु तो वारसा जतन करण्याचा, त्याचे संवर्धन करण्याचा  संदेश, जबाबदारी,  आणि नवीन गाईड तयार होण्यामध्ये मदत होईल असे वाटले! परत जाताना विचारांनी, दृष्टीकोनाने, बुद्धीने, वर्तनाने समृद्ध झाल्याचे समाधान देऊन जाईल!


ह्या यशस्वी इव्हेंट मुळे "माची" कडून जास्त अपेक्षा निर्माण झाल्याची जाणीव झाली आणि राजकुमार, विशाल आणि ओंकार सारखे लीडर असतील तर त्या अपेक्षा नक्की पूर्ण होतील अशी खात्री पण मिळाली!

"माची" चा पहिला इव्हेंट यशस्वी झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! लवकरच एक नवीन संकल्पना आमच्यासमोर आणि आमच्यासाठी तुम्ही घेऊन याल असा विश्वास आहे!


फोटो आभार: ट्रेक टीम