आज दुसऱ्यांदा मी किल्ले रायरेश्वर ला जाणार होते. २७ ऑगस्ट २०१७ मध्ये भर पावसाळ्यात ट्रेक केला होता. थोडंसं आठवतं होतं, बरचं काही विसरले होते.
पुणे -भोर मार्गे , कोर्ले गावाच्या पुढे एक वाट केंजळगडा कडे जाणारी आणि एक किल्ले रायरेश्वरला. रायरेश्वर ते केंजळगड हा रेंज ट्रेक अजूनही वाट पाहून आहे . असो. कोर्ले गावापासून रायरेश्वर किल्ल्याकडे जाणारा रस्ता भलताच सुंदर आहे. डाव्या बाजूने केंजळगड साथ करत असतोच.
रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला २-३ गाड्या उभ्या होत्या . तेवढीच काय ती गर्दी! पहाटे ५.३० वाजता पुयातून तेरा जणी मुलींचा Woods to Coast Outdoors च्या आमच्या ग्रुप ने सकाळी ९ च्या सुमारास किल्ला चढायला सुरुवात केली. एका तासात किल्ल्यावर जाऊ असे वेत्रा ने आधीच सांगितले होते.
"रायरेश्वर पठार" किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या फलकावर किल्ल्यावर जाण्याचे /ट्रेकचे मार्ग वाचताना मागच्यावेळी वाघदरा -पन्हेरे मार्गे रयेरेश्वर ट्रेक केल्याचे आठवले.
पायथ्यावरून एक नजर गडाच्या दिशेने फिरवताना मार्गावर असणाऱ्या दगडी पायऱ्या आणि लोखंडी शिड्या नजरेत भरल्या.
रायरेश्वर किल्ल्याची माहिती आणि किल्ल्यावर सुविधा यांची माहिती देणारा जंगम कुटुंबियांचा फलक किल्ल्याच्या चढणीच्या सुरुवातीलाच वाचता आला.
पायथ्यावरून किल्ला आणि बाजूबाजूचा परिसर पाहत चढायला सुरुवात केली.
रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी पायवाट, दगडी पायऱ्या आणि लोखंडी पायऱ्या यांची छान आखणी अनुभवली .
हा अनुभव माझ्यासाठी एकदम भारी . नो ट्रेकिंग स्टीक आणि पाठपिशवी मध्ये फक्त पाण्याची एक बॉटल !
ह्या छान भावनेने आम्हा सर्वांचा चेहरा खुलला !
रायरेश्वर पठार आणि किल्ला आता हे सर्व पार केल्यावर पाहण्याची उत्सुकता लागली. इथून केंजळगड पाहताना "किती वाट पाह्यला लावणार " असं सारखं मन त्याला सांगत होतं.
इथेच वन विभागातर्फे रायरेश्वर किल्ल्यावरील ठिकाणांची माहिती देणारा फलक वाचला.
बापरे .. किती हे पॉइंट ! ह्या किल्ल्याची ही एक खासियतच ! इथे लिहिलेल्या वाघदरा मार्गे मी ट्रेक केलाय हे समाधान मस्तच, नाही का ? असो. इथून पुढे पठारावर भ्रमंती सुरू .
अशी फरशांची पायवाट पार करत एका पाणवठया जवळ आलो ..
पुढे जाताना अजून एक फलक वाचला ..
पहिल्या फलकावर लिहिलेले सर्व मार्ग इथे नकाशाच्या दृश्य रूपात अधिक स्पष्ट झाले. हा नकाशा पाहताना रायरेश्वर हे ठिकाण छत्रपती शिवरायांनी स्वराज्यनिर्मितीची शपथ घेण्यासाठी का निवडलं असावं ह्याची एक झलक, एक विचार मनात चमकला. किती समृद्ध आहे हा परिसर ! "मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश , माझ्याकडे देव माझ्या पाहतो आहे " हे ठिकाण, असं वाटलं ह्या गीताचे सार आहे !
पुढे पाण्याची एक टाकी दिसली. संपूर्ण गडासाठी बारा महीने पाण्याचा मुख्य स्त्रोत !
रायरेश्वर मंदिराकडे जाताना एक मावशी त्यांच्या जवळच पिण्याच ताक संपल म्हणून निघालेल्या
मला म्हणे "माझ्या फोटो का काढतेस ?" म्हटल, " किल्ल्यावर आल्यावर जसे तिथल्या अवशेषांचे फोटो आम्ही घेतो तसेच किल्ल्यावर राहणाऱ्या राहिवाशां सोबतही फोटो हवा. त्यांच्यासोबत संवाद हवा ." छान हसल्या.
किल्ल्यावरील समृद्ध जैवविविधतेची झलक दाखवणारे फलक किल्ल्याची अजून एक खासियत !
रायरेश्वर शिव मंदिर परिसर ! हीच टी पवित्र भूमी जिथे श्री . छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगडी मावळ्यांच्या सोबतीने स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली.
मंदिराच्या आतील खांबांची रचना, मंदिराचे छत, गणेशपट्टी , गणेशप्रतिमा हे सर्व अभ्यासले तर मंदिर किती पुरातन आहे ह्याची कल्पना येईल.
ह्या मंदिराच्या बाजूला जननी मातेचे मंदिर आहे.
चौथऱ्यावर शिवप्रतिमा
हे सर्वच वंदनीय !
मंडपामध्ये बसलेल्या आजींनी ताक [पिण्याचा आग्रह केला. त्यांच्याशी थोड्याश्या गप्पाने दोघींचे मन प्रसन्न झाले.
इयत्ता चौथीत बालभारती च्या पुस्तकात असणाऱ्या धड्यापासून प्रत्यक्ष किल्ले रायरेश्वरच्या पवित्र भूमीला चरणस्पर्श हा प्रवास काही खासचं ! भावनांनी अनुभवण्याचा ! त्याची ऊंची गाठू शकेल अशी शब्द किमयागार मी नाही !
चिंतन अवस्थेत काही काळ इथे थांबून पुढे दोन गोष्टी करायच्या होत्या. किल्ल्याची अजून एक खासियत म्हणजे इथे आढळणारी रंगीत माती ! ते ठिकाण पाहणे आणि पोटपूजा !
साधारण अर्धा तास किल्ल्याच्या पठारावर चालून गेल्यावर "रंगीत माती " चे ठिकाण येते .
एक भौगोलीक आश्चर्य आहे ही पाच ते सात रंगाची माती.
ह्या मातीचे कोडे अभ्यासणारे "भवताल" संस्थेचे एक कात्रण मिळाले.
रायरेश्वर पठारावरील ही एक खासियत पाहून माघारी येऊन नाचणीच्या भाकरीचा आस्वाद घेतला.
ह्या पवित्र भूमीला वंदन करून परतीचा प्रवास केला. किल्ल्याच्या पायथ्याशी आलो.
पुण्याच्या परतीच्या प्रवासात दोन ठिकाणे पाहिली . आंबवडेचा झुलता पूल आणि नागेश्वर मंदिर !
नागेश्वर मंदिर:
मंदिर परिसरातील वीरगळ आणि काही प्रतिमा
हे झालं परतीच्या प्रवासात. आम्ही आरंभाच्या प्रवासात नेकलेस पॉइंट ला पण थांबलो बरं का.
किल्ले रायरेश्वर सफर मधील हे काही सुंदर क्षण कसे बरं विसरून चालतील.
ह्या सफर मधील अत्यंत महत्वाचे ते ज्यांच्यामुळे ही सफर "सुहानी " झाली . अर्थात Woods to Coast Outdoors आणि त्यांची आयोजक वेत्रा!
कशी वाटली ही सफर सुहानी ? नक्की सांगा .
ही सफर अशीच सुरू राहणार . भेटूयात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अशाच एका सफरमध्ये!
अरे हो, मी आधी केलेल्या रायरेश्वर पावसाळी सफर ची ब्लॉग लिंक देत आहे, पावसाळ्यातील नयनमनोहर रायरेश्वर नक्की अनुभवा !
https://www.savitakanade.com/2017/08/blog-post.html
खूप धन्यवाद
फोटो आभार : ट्रेक टीम
तुम्हां सर्वांना नाताळ सणाच्या आणि २०२३ नवीन वर्षाच्या आगाऊ शुभेच्छा !