कलावंतीण दुर्ग ट्रेक, १२ फेब्रुवारी २०१७




खतरनाक किल्ला, दगडात कोरलेल्या ५०-५२ खड्या-नागमोडी पायऱ्या, दोन पायऱ्यातलं अंतर दोन ते अडीचं फूट, २० फुटाचा रॉक पॅच, खिंडीतून असेंडिंग, डिहायड्रेशन (निर्जलीकरण), ह्युमिडीटी”.......कलावंतीण दुर्ग ट्रेक बद्दल मी हे नुसतचं ऐकलेलं नव्हतं तर त्याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला होता. ५ आक्टोबर २०१६ रोजी हा ट्रेक केला . ह्युमिडीटीचा अत्यंत त्रास झाला. घामाने पूर्णत: निथळून निघाले होते. पायाला क्रम्प आला. दुसरा पाय पुढे टाकण्याचे त्राण गेले. पुढचा ट्रेक न करण्याचा निर्णय घेऊन मी प्रबळमाचीला थांबले.

ट्रेक पूर्ण करण्याची इच्छा मात्र प्रबळ होती. एसजी ट्रेकर्सने हा ट्रेक १२ फेब्रुवारीला २०१७ ठेवला आणि विशालकडून “ग्रीन सिग्नल” ही मिळाला.

ट्रेक करण्याआधी इंटरनेटवर ह्या किल्ल्याची माहिती वाचली. माथेरान आणि पनवेल जवळील प्रबळगडाला श्री. शिवाजी महाराजांनी गड काबीज करण्यापूर्वी नाव होतं “मुरंजन”! ह्या गडाच्याच बाजूला एक किल्ला आहे तो म्हणजे “कलावंतीणीचा सुळका”! प्रबळगड हा मुख्य किल्ला आणि कलावंतीण हा “सिस्टर फोर्ट”! किल्ल्याची उंची २३०० फुट! मुख्यत: आजूबाजूच्या किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी हा “वॉच टॉवर”! असो. हा किल्ला “प्रिझनर्स जेल” होता आणि “राणी कलावंतीण” ला इथे ठेवलं होतं असे म्हणतात. असो.  

काळी साधारण ११ वाजता ट्रेक सुरु केला. प्रबळगडाचा पायथा म्हणजे प्रबळमाचीला साधारण १२-१२.१५ ला पोहोचलो. हा रस्ता बऱ्यापैकी रुंद आणि खडे-मातीने व्याप्त होता. दोनचाकी वाहन अगदी आरामात जाऊ शकेल असा हा रस्ता. पण मधेचं एक भली मोठी पाईप लाईन आडवी आल्याने पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. थोडसा नागमोडी आणि चढाईचा रस्ता. असं वाटलं की ट्रेकचं हे अंतर विनाकारण वाढलं आहे

अन्यथा बोअर होईल असा हा रस्ता आरके (राजकुमार डोंगरे) त्याचा मित्र अंकुश तोडकर आणि अमित डोंगरे ह्यांच्यामुळे खूपइंटरेस्टिंग झाला”!. आरके आजूबाजूच्या वनस्पती, पाने, फळे, फुले यांची माहिती देत होता आणि आम्ही त्या माहितीचा आनंद घेत होतो!

कलावंतीण दुर्ग ट्रेक खरा सुरु होतो तो प्रबळमाची पासून! खिंडीपर्यंत (प्रबळगड आणि कलावंतीण मधली व्ही आकाराची दरी)असेंड ,मग पायऱ्या आणि शेवटी २० फुटाचा रॉक पॅच!

खिंडीपर्यंतचा हा रस्ता खड्या चढाईचा आणि किंचितसा अरुंद आहे. आजूबाजूला झाडी आणि मधली पायवाट खिंडीत घेऊन जाते.

साधारण अर्ध्या तासात आम्ही खिंडीत पोहोचलो. इथून पायऱ्या सुरु होतात! आज खूप सारे ट्रेकर्स आले होते. काहीजण पायऱ्या उतरत होते त्यामुळे आम्हाला वाट पहावी लागली. इथे लिंबू-पाणीची छोटी टपरी उभारलेली आहे. हे ट्रेकर्स खाली येईपर्यंत लिंबू-पाणीचा आस्वाद घेतला.

विशालने अत्यंत कडक शब्दात सूचना केल्या “आता पायऱ्या सुरु होतात, आपल्याला एकावेळी एकानेच चढायचं आहे, दोघांमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे, सावकाश चढायचं आहे, घाई बिलकुल नाही आणि सर्वात महत्वाचं की कोणीही फोटो काढायचे नाहीत. फोटो काढताना कोणी दिसलं तर त्याचा मोबाईल जप्त केला जाईल”! विशाल, ज्या अनेक कारणांसाठी मला प्रभावित करतो त्यातलं हे एक कारण! आवश्यक तिथे तो इतका कडक होतो, आवाजाला इतकी धार येते की त्याच्या कडक वाणीने आणि धारदार शब्दाने समोरचा माणूस उभा-आडवा चिरत जातो! असो.

विशालकडून सिग्नल मिळाल्यावर ह्या पायऱ्या पार करायला सुरुवात झाली. एक खडा-आडवा दगडी पॅच पार केल्यानंतर दगडात कोरलेल्या पायऱ्या सुरु होतात.

मी अतिशय संथपणे, लक्ष पूर्ण चढण्यावर केंद्रित करून चढायला सुरुवात केली. बेडकासारखी पोझ घेऊन पायऱ्या चढत होते. एक हात, प्रसंगी दोन्ही हाताने वरच्या पायरीचा आधार घेत, उजवा पायाला हिसका बसू न देता अत्यंत सावकाश पायऱ्या चढत होते. एक पायरी चढायला कठीण वाटली. एका हाताने वरच्या पायरीचा आधार घेतला तरी माझा उजवा पाय वरच्या पायरीवर ठेवण्यासाठी ते अंतर खूप जास्त होतं. अमित ने हाताचा आधार दिला आणि मला शरीराला थोडा जर्क द्यावा लागला! कातळ खडकात कोरलेल्या ह्या पायऱ्या नागमोडी होत्या. इथे पायऱ्या वळण घेत होत्या त्या वळणावर पायऱ्या अरुंद होत जात होत्या आणि त्यामुळे पाय सावधानतेने ठेवावा लागत होता. एका बाजूला खडकाचा आधार तर दुसऱ्या बाजूला खोल दरी! हा ट्रेक खतरनाक होतो तो ह्या एका कारणासाठी! पायऱ्या चढताना पाय दरीच्या दिशेने न ठेवता खडकाच्या दिशेने ठेवत चढण, एक कसब आहे. गरगरलं, भोवळ आली, लक्ष विचलित झालं, पाय दरीच्या दिशेने पडला तर खाली दरीतचं! असं वाटलं, एका दमात ह्या पायऱ्या चढण्याचं धाडस कोणी करू नये. नागमोडी जाताना घेरी येऊ नये म्हणून काही पायऱ्या चढल्यावर काही क्षण स्थिर होणं जास्त संयुक्तिक! जीवनाला आव्हान देणारा वाटला हा पायऱ्याचा पॅच!

प्रबळगडावरून काढलेला ह्या किल्ल्याचा फोटो इंटरनेटवर बघितला तर काळजात “धस्स” होतं! काळजाचा “ठोका” चुकतो. असं असलं तरीही फोटो पाहताक्षणीचं हा किल्ला भूरळ पडतो, लक्ष वेधून घेतो, मन आकर्षित करून घेतो, मन खेचून घेतो. प्रत्यक्ष जाऊन किल्ला बघावा, ते साहस, धाडस, थ्रील अनुभवावं असं वाटलं नाही तर नवलचं!

कशा बनल्या असतील ह्या पायऱ्या, कोणी बनवल्या असतील, का बनवल्या असतील असे असंख्य प्रश्न स्पर्शून जातात! विनांआधार ताठपणे पूर्वीचे लोक ह्या पायऱ्या चढत/उतरत (प्रसंगी पळतही) असतील तर त्यांची शरीरयष्टी कशी असेल हा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. किती कणखर असतील, ताकदवान असतील, किती उंच असतील आणि मनाने किती बलवान असतील ! आजुबाजूच्या किल्ल्यावर नजर ठेवताना लागणारी एकाग्रता, मनाची कमालीची स्थिर, अचंचल अवस्था, शारीरिक ताकद...बापरे किती अवघड काम हे!

“शत्रूचं आक्रमण महाकठीण करून ठेवण” हिचं असे किल्ले बनवण्यामागची धूर्त भूमिका असावी! आक्रमणाला आणि विजयाला आव्हान देणारे असे किल्ले आपल्या अधिपत्याखाली असावेत, आपण काबीज करावेत अशी मनीषा बाळगण “थोर” चं म्हणावं लागेलं!

हा किल्ला “प्रिझनर्स जेल” (नजरकैद म्हणावं का?) म्हणून असेल तर “मृत्युच्या सापळ्याचीचं” शिक्षा की! असो.

पायऱ्या चढून गेले आणि हुश्श झालं! माझ्या तोंडी पहिले शब्द होते “गेल्यावेळी ट्रेक न करून मी काय गमावलं होतं”! अमितला माझ्या भावना समजल्या .त्याच्या डोळ्यात त्या दिसून आल्या! विशाल, ओंकार, स्मिता आणि तो माझ्या इथपर्यंत येण्यावर खूप खुष झाले होते!

२० फुटी रॉक पॅच पार करणं! आता खरी परीक्षा होती! लांबून तो कणखर, गोलकार, विस्तीर्ण, खडा पहाड पाहून.......खरं सांगू ..अंतरंग शांत होतं....एक गोष्ट प्रत्कर्षाने जाणवतं होती की “अंतरंगातून नकारात्मक आवाज येत नव्हता...आणि हीच गोष्ट सकारात्मक होती!” कौल मिळाला होता!




पुन्हा एकदा विशालकडून सिग्नल मिळाला आणि आम्ही रॉक पॅचच्या पायथ्याशी जाऊन थांबलो. २-३ जण चढून गेल्यावर विशालचा आवाज आला, “सविता मॅडम ना पाठवा. मॅडम या”.... आमच्या डाव्या बाजूने गिरीप्रेमी तर्फे आलेली मुले रॉक पॅच उतरत होती म्हणून आम्ही उजव्या बाजूने रॉक पॅच चढत होतो.
लांबून बघत असताना डाव्या बाजू पेक्षा ही उजवी बाजू सोपी वाटतं होती आणि तशी ती होती देखील. डाव्या बाजूला आधाराला, ग्रीप यायला, हात-पाय स्थिरावण्यास कमी जागा होत्या. एक भाग तर पूर्णत: गुळगुळीत, स्लीपरी होता, खाचा रहित होता! उजवी बाजू त्या मानाने खाचांचा आधार देणारी होती. दोन दगडांच्या कपारीत पाय ठेवण्यास जागा होती.
         
चढण्याआधी, डोळे बंद केले, एक दीर्घ श्वास घेतला, मनाशी संवाद साधला आणि सुरुवात केली! विशाल, स्मिता आणि ओंकार ने सूचना दिल्या. कुठे पाय ठेवायचा, पाय कसा ठेवायचा, हाताला ग्रीप कुठे आहे, शरीर किती अंशात वळवायचं आहे वगैरे...माझ्या कमी उंचीमुळे काही ठिकाणी शरीर थोडं पुश करावं लागलं. ओंकार, विशाल यांनी प्रसंगी हाताचा आधार दिला. रॉक पॅच संपणार तर माझ्याकडून झालं काय की तळपाय ठेवून उभं राह्यचं तर मी उजवा गुडघा खाली जमिनीवर टेकवला आणि माझ्याकडून काय झालंय ते माझ्या लक्षात आलं! माझ्याचं काय विशालच्याही ते लक्षात आलं! सुदैवाने एकही वेदना गुडघ्याने दिली नाही आणि तोल न जाता सहीसलामत उभं राहून तो रॉक पॅच पार झाला! हे सगळं साहस करताना मला दिसत होते ते फक्त मी  आणि आवाज ऐकू येत होते ते फक्त विशाल आणि ओंकारचे! बस्स. मनाच्या त्या अवस्थेतून मी भानावर आले ते टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने! माझा रॉक पॅच सर झाल्यावर खाली असलेल्या माझ्या प्रत्येक ट्रेक सहकाऱ्याने टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला होता! त्याक्षणी आसमंतात फक्त एक आवाज होता आणि तो होता टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाचा! त्या आवाजाने आणि ट्रेक सहकाऱ्यांच्या भावनेने माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या! कंठ दाटून आला! आवंढा आला!

माझ्या पाठोपाठ अमृता वर आली आणि मला कडामिठी मारून म्हणाली, “मॅम, तुम्ही सॉलीड आहात, सिंपली ग्रेट. तुम्हाला पाहून प्रेरणा मिळते”!

विशालने आधी मुलींना वर चढू दिल्याने आम्ही मुलींनी वर पोहोचल्यावर मनसोक्त आनंद घेतला. 






भरपूर फोटो काढले. केळकर सरांनी आमचे प्रत्येकीचे “विनिंग पोझ” मधले फोटो काढले!

वर पोहोचल्यावर ह्या “मृत्युच्या सापळ्याची भयानकता” जाणवली! आजूबाजूला आहे फक्त मोठे मोठे डोंगर, खोलवर दरी आणि मध्ये हा खडा “वॉच टॉवर”!
“फक्त वाऱ्यावर जगायचं(?) ठिकाण”!

आधीच्या टप्प्यावर फडकणारा तिरंगा आणि इथला भगवा झेंडा...त्या मृत्युच्या सापळ्यातही जीवनआशेचा किरण फैलावत आहेत असं वाटलं!

माझ्या सर्व ट्रेक सहकाऱ्यांचा ट्रेक समीट झाला! समीटचा जल्लोष......हे फोटोचं सांगताहेत! 


आता डीसेंडिंग....विशालने आता मुलांना आधी खाली उतरायला सांगितलं! माझी वेळ आली..एक क्षण थरथरले! कारण मी उलटी/पाठ करून उतरू शकत नाही. मी तसे उतरण्यात कम्फरटेबल नाही...विशाल म्हणे, “इथे हात ठेऊन तुम्हाला पाठी वळायचं आहे”..म्हटलं “ राजा, मला ते नाही जमणारं”....मग काय, काय काय कार्यपद्धती अमलात आल्या ते वाचाचं! वर ओंकार, दगडाच्या बाजूने स्मिता आणि दरीच्या बाजूने विशाल उभे! जिथे ग्रीप आहे तिथे माझा पाय पुरत नव्हता म्हणून स्मिताने आणि विशालने त्यांच्या मांडीवर आणि पायावर पाय ठेवायला मला सांगितलं. ओंकार खाली वाकलेला, त्याचा एक हात माझ्या हातात! विशाल सारखा म्हणत होता “मॅडमला आपल्याला दगडाच्या बाजूने झुकू द्यायचं आहे, माझ्या बाजूने नाही”...मला हे सगळं थोडं कठीण जातयं असं लक्षात आल्यावर अमितही मदतीला आला! स्मिताच्या भाषेत “ मी चारही बाजूंनी कव्हर  झाले होते”! शेवटच्या  टप्प्यावर पाय खाली पुरावा म्हणून मी स्वत:ला जरा जोरात पुढे ढकललं आणि माझावरची पकड घट्ट ठेवण्याच्या प्रयत्नात विशालची स्वत:वरची पकड किंचित ढासळली आणि तो जरासा हलला! काही क्षण तो डिस्टर्ब झाला पण मी सही सलामत खाली आले. मनात आलं, “सविता, इतरांनाही अशा प्रकारच्या मनाच्या अवस्थेत टाकणारी ही कुठली ट्रेकची आवड? का? कशासाठी?”...विशाल मला ग्रीन सिग्नल देतो तेव्हा तो आणि त्याची टीम किती मोठ साहस, आव्हान स्वत:वर घेत असते ह्याचा पुन:प्रत्यय मला आला!

प्रत्येक सहभागीकडे जातीने लक्ष देणे, त्यांची सूरक्षितता जपणे हे खूप मोठं आव्हान विशाल, ओंकार, स्मिता यांनी समर्थ ताकदीने पेललं. काही सहभागीची मोलाची साथ पण होती. असं टीम वर्क हेचं समीट साठी अनमोल असतं! असो.

पायऱ्या उतरताना परत तशीच एकाग्रतेचा वापरली. अत्यंत काळजीपूर्वक अजिबात घाई न करता पायऱ्या उतरले. आता काय प्रबळमाची पर्यंत सरळ सरळ पायवाटेने खाली उतरायचं होतं. मी स्टीक न वापरता खाली उतरले. खूप सावधानतेने, उतरण्यावर पूर्ण लक्ष एकाग्र करून. स्टीक न वापरायची ही दुसरी वेळ होती! 


डोंबारी दोरीवर ज्या पद्धतीने चालतात त्याची आठवण येत होती. स्टीक नसेल तर मी ही तसचं काहीसं करते. दोन हात दोन्ही बाजूने पसरवले की मला तोल राखता येतो!




उतरताना विशाल आणि अमितशी गप्पा मारत कधी प्रबळमाची आली समजून आलचं नाही. भरपेट जेवण केलं आणि पुढचा परतीचा प्रवास सुरु केला. ही उतरण अगदीच सोपी होती. भला मोठ्या रस्त्याने उतरायचे बस्स! आम्ही पाच वाजता खाली पोहोचलो आणि पुण्यात रात्री ९.१५ वाजता!



कार्तिकेय बरोबर मी २-३ ट्रेक्स केले. त्याचा पहिला ट्रेक एस. जी. सोबत होता आणि आता तो जेव्हा पुणे सोडून कायमस्वरूपी चेन्नईला जातोय त्याचा शेवटचा ट्रेक पण एस. जी. सोबतचं होता! 

कार्तिकेय, तुला मी आणि एस. जी. ट्रेकर्सकडून खूप खूप शुभेच्छा! 

आम्हाला तुझी आठवण नेहमीच येत राहील! 

माझ्यासाठी हा संस्मरणीय ट्रेक होता. ढाक बहिरी ट्रेक नंतर एक नवीन साहस, धाडस मी केलं होतं! ह्या ट्रेकला आरके चा सहवास आणि त्याच्या वनस्पती संदर्भातील ज्ञानाचा लाभ घेता आला आणि अमितची ओळख झाली. गमतीने आमचं बोलणं देखील झालं की “डोंगरे ब्रदर्स” मला ट्रेक समीटसाठी लकी ठरले! 

अमितने तर खूप सुंदर साथ केली. ट्रेकच्या इति पासून अंता पर्यंत तो माझ्या सोबत होता! आरके साई, प्रसाद, अंकुश आणि प्रीतम यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे मला बळ मिळालं! अमृता आणि ह्या सर्वांसोबत खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्या गप्पातून स्वत:चीच नव्याने ओळख अनुभवली!


जेव्हा जेव्हा “कलावंतीण दुर्ग ट्रेक” ची आठवण येईल तेव्हा तेव्हा डोळ्यासमोर येतील त्या दगडात कोरलेल्या विलोभनीय पायऱ्या, फडकणारा तिरंगा आणि भगवा झेंडा, विशालच्या कडक शब्दातील सूचना, माझ्या ट्रेक समीट साठी विशाल आणि टीमने वापरलेल्या कार्यपद्धती, आरके, अमित, प्रसाद, साई, प्रीतम, अमृता इ. सोबतच्या गप्पा आणि रॉक पॅच पार केल्यानंतर झालेला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट! 

आसमंत दुमदुमून टाकणारा टाळ्यांचा हा कडकडाट मला नेहमीच स्फूर्ती आणि प्रोत्साहन देत राहील! थॅॅॅन्क यु फ्रेड्स!




फोटो आभार ; प्रीतम बगाडे आणि ट्रेक टीम

ट्रेक टू विसापूर फोर्ट, ईबीसी प्रक्टिस ट्रेक विथ गिरीप्रेमी टीम, ५ फेब्रुवारी २०१७

“लाईफ स्टाईल मेंटेन करा, एक्स्ट्रा ऑर्डीनरी काही करू नका, लक्षात असु द्या तुमचे टार्गेट आहे १७६०० फिट, हाय अल्टीट्युड ट्रेक!” श्री. उमेश झिरपे सरांच्या यांच्या ह्या शब्दसूचना आणि अनुभवाचे बोल अजूनही कानात घुमत आहेत. त्यांचे प्रभावी पडसाद कानापर्यंतच न थांबता सरळ मेंदूवर पडून थेट हृदयाला भिडले आहेत!

फ्रेंड्स, “एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक” साठी नुकतचं मी स्वत:ला रजिस्टर केलयं. “गार्डियन गिरीप्रेमी इंन्स्टीटयूट ऑफ माउंटनिअरिंग” ह्या संस्थेकडे! २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७ हा ट्रेक कालावधी आहे. ह्या १७००० फुट, हाय अल्टीट्युड ट्रेकच्या प्रक्टिससाठी, “विसापूर ट्रेक” संस्थेने निवडला होता!. “एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक” (ईबीसी) आणि “अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक” (एबीसी) चे आम्ही पार्टीसिपंट आज रविवार, ५ फेब्रुवारी रोजी विसापुरला भेटलो होतो. ह्या ट्रेक निमित्ताने श्री. उमेश झिरपे सर आमच्याशी वरील शब्दात संवाद साधत होते! 

खरं सांगू का, सरांना गाडीत बघितलं, चेहरा ओळखीचा वाटला पण विश्वास बसत नव्हता. सरांनी लिहिलेलं “गोष्ट एका ध्यासाची-एव्हरेस्ट” हे एव्हरेस्ट एक्सपीडीशन वरचं पुस्तक मी अलीकडेचं वाचलं होतं, नुकत्याच लिहिलेल्या एका ट्रेक ब्लॉग मध्ये मी त्यांच्या नावाचा उल्लेखही केला होता आणि विशाल आणि आरके बरोबर काही दिवसांपूर्वीचं त्यांच्याविषयी बोलणं देखील झालं होतं. ती व्यक्ती आज माझ्यासमोर, माझ्यासोबत आहे ह्यावर विश्वास ठेवणं मला कठीण जात होतं!.

आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरचं अनमोल होता! उमेश सरांसोबत, आशिष माने आणि गणेश मोरे ह्या दोघांचीही साथ आज लाभली होती! हा क्षण माझ्या आयुष्यात इतक्या लवकर येईल असं मला वाटलं नव्हतं. म्हणूनचं की काय अचानक, अनपेक्षितपणे समोर आलेल्या या क्षणाला सामोरं जाणही मला तितकचं कठीण जात होतं!



विसापूर ट्रेकची सुरुवात एकमेकांच्या ओळखीने झाली. उमेश सरांनी एव्हरेस्ट एक्सपीडीशनचे काही अनुभव शेअर केले. त्याचा फोकसं होता “हाय अल्टीट्युड ट्रेक साठी तयारी”!

विसापूर ट्रेक मी दुसऱ्यांदा करत होते. जून महिन्यात पहिला ट्रेक केला होता. आतापर्यंत विसापूर ट्रेक माझ्यासाठी एक खास ट्रेक होता. कारण एक वर्ष सातत्याने ट्रेक करत राहिल्यानंतर जून मध्ये केलेल्या ह्या ट्रेकवर मी ब्लॉग लिहिला. तो होता मी लिहिलेला पहिला ब्लॉग! आज, विसापूर ट्रेक दुसऱ्यांदा माझ्यासाठी खास झाला तो सर, आशिष आणि गणेशच्या उपस्थितीमुळे!

गिरीप्रेमी या संस्थेने १९८५/८७ मधे पहिल्यांदा विसापूर वर चढाई केली होती. गणेशने विसापूर किल्ल्याबद्दल माहिती दिली आणि ट्रेकला सुरुवात झाली.

मी खूप द्विधा मनस्थितीत होते. गेल्या ट्रेकला राहून गेलेले फोटो मला काढायचे होते पण त्याचवेळी एक विचार मनात होता की हा प्रक्टिस ट्रेक आहे, त्यातही उमेश सर सोबत....मग फोटो काढणार कसे? प्रक्टिस ट्रेकला प्रक्टिसचं व्हायला हवी असं एक साध सरळ गणित! पण राहून गेलेले फोटो काढण्याची इच्छा तितकीच मनात घर करून राहिलेली! चांगलीच कात्रीत सापडले होते!

भावनिक आंदोलने सुरु होती. त्यात भर म्हणून की काय सर, आशिष आणि गणेश साथीला! हा क्षण परत येईल की नाही म्हणून त्यांच्यासोबत एक फोटो हवा ह्या दुसऱ्या विचाराचं थैमान! एका क्षणाला स्वत:चीच लाज वाटली. किती ही मनाची अस्थिरता, चंचलता आणि अधीरता!

तिसरा पण विचार साथीला होता बरं का. “आज आपली परीक्षा आहे”. सर येण्याचा उद्देश आम्हाला मोटीव्हेट करणं एवढाचं नसावा तर ईबीसी/एबीसी ट्रेकसाठी आम्ही फिजिकली आणि मेंटली किती फिट आहोत ह्याचं निरीक्षण करून त्यानुसार आम्हाला मार्गदर्शन करण हा सुद्धा असावा, हा तो विचार!

शाळेचे दिवस आठवत होते. पेपर सोडवत असताना किंवा प्रयोगशाळेत एखादा प्रयोग करत असताना सर जर बाजूला किंवा मागे येऊन उभे राहिलं तर  जे व्हायचं ना...ते होत होतं आज.....

तुमच्या लक्षात आलं असेल ना... काय मनाची अवस्था होती माझ्या! आता तुम्ही दुजोरा द्याल की “ट्रेक” ही गोष्ट मी किती सिरीअसली घेतली आहे ह्यासाठी! हो..ना?

असो. शेवटी मन शांत केलं. एक निश्चय केला. ट्रेक, ट्रेक सहकारी, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा (आणि अर्थात फोटोचा) आनंद घ्यायचा! बस्स!

विसापूरची विशालता ह्यावेळी मी न्याहाळत होते. किती विस्तीर्ण पसरलेला किल्ला आहे हा! किल्ल्यावर फडकणारा भगवा झेंडा खालुनचं किती मोहक आणि स्फूर्तीदायक वाटतं होता. गेल्या ट्रेकला सुरुवातीचा पायवाटेचा हा रस्ता करवंद लगडलेल्या झाडांनी बहरलेला होता! आज त्याची जागा सुंदर आणि वेधक फुलांनी घेतली होती!

आता जंगलातून मार्गक्रमण सुरु झालं. झाडांची दाट सावली, मधूनचं येणारी सूर्यप्रकाशाची तिरिप आणि हलकीशी चढाई! वाव...स्वत:लाचं शोधत होते मी! गेल्यावेळी तीन महिन्याच्या कालखंडाने ट्रेक करताना किती ताण आला होता...आज  ताणरहित आनंद घेत होते मी! गेल्यावेळी शंकर आणि अनिकेत मला धीर आणि प्रोत्साहन देत होते. आज मीच माझी प्रोत्साहनकर्ता बनले होते! परत-परत एकाचं ठिकाणी होणारा ट्रेक, सकारात्मक बदलाची सुखावणारी हीच अनुभूती तर देतो!

गंमत बघा हं...सरांबरोबर फोटो घेण्याची मनात कुठेतरी असलेली इच्छा उफाळून येत होती. शेवटी धाडस केल आणि सरांना आर्जवाने म्हटलं, “सर ट्रेक संपल्यावर तुमच्यासोबत एक फोटो हवा आहे”..सर म्हणे, “हो, घेऊयात ना”....काय हुश्श झालं म्हणून सांगू! शब्द पण जाणीवपूर्वक जपून वापरले... “ट्रेक संपल्यावर” ह्याचा उल्लेख मुद्दामच केला...त्यांच्याविषयी जे ऐकलं होतं त्यावरून असं वाटतं होतं की ट्रेक करताना आणि तो ही प्रक्टिस ट्रेक करताना फोटो काढणं कदाचित त्यांना पटणार नाही.

विचार करताना लक्षात आलं हे दडपण “उमेश सर” ह्या व्यक्तीचं कमी होतं. दडपण जास्त होतं ते त्यांनी केलेल्या कार्याचं!

असो. आता ट्रेकचा पुढचा टप्पा सुरु झाला. छोट्या-मोठ्या दगडांनी खचाखचं भरलेला हा टप्पा! तार्कीकदृष्ट्या कारण माहित असतानाही हे दगड का टाकले आहेत? साधी सरळ पायवाट असायला नको का? असं चढताना सारखं वाटतं होतं. ट्रेकिंग जगतात आणि ट्रेकर्समध्ये हा सगळ्यात सोपा ट्रेक! चढायला सोपा आणि वेळ पण कमी लागतो! पण जेव्हा गुडघा, कंबर, तोल याचा विचार येतो तेव्हा हा सोपा सांगितला जाणारा ट्रेक कर्मकठीण वाटतो!

गेल्यावेळी २०-२५ वर्षाच्या मुला-मुलींसोबत हा ट्रेक केला होता आणि आज वयाला मर्यादाचं नव्हती! नववीतल्या मुलापासून ते सत्तरी ओलांडलेले! “वय हा फक्त एक आकडा आहे” ह्या उक्तीवरचा विश्वास ह्यावेळी नकळत ठाम झाला!

किल्ल्यावर पोहोचले आणि किल्ल्याची व्याप्ती लक्षात आली! अनाहूतपणे गेल्यावेळच्या ट्रेकची रादर स्वत:मधल्या बदलाशी तुलना झाली. गेल्यावेळी इतकी थकले होते की “थकवा” ह्या जाणीवेपलीकडे गेलेचं नाही. आणि ह्यावेळी? जाणीव झाली ती “बदललेल्या नजरेची”! किल्ला/गड बघण्याची एक “नजर”!..ही नजर यावेळी शोधक होती, अभ्यासू होती, संशोधक होती.......

असं वाटलं, ट्रेक म्हणजे “उत्खनन” आहे! इतिहासाचे, पुराणकथांचे, शिवरायकालीन युगाचे ....आणि अर्थात स्वत:चे!

खालून दिसणाऱ्या भगवा झेंड्याच्या दिशेने आम्ही किल्ल्यावर फरफटका मारला. लक्ष वेधून घेत होती ती लांबचलांब पसरलेली भिंत अर्थात किल्ल्याची तटबंदी!









वाटेत ग्राईडिंग व्हील, पाण्याचे टाके पण दिसले. 








किल्ल्यावर विस्तीर्ण पसरलेले पठार (प्लॅटू) आहे. 








झेंडाच्या ठिकाणी उभे राहिलात तर समोर लोहगड दिसतो आणि नजरेच्या टप्प्यात तुंग आणि तिकोना! खुललेले लोणावळा शहरही इथून दिसते.

उमेश सरांनी किल्ल्याची सर्व माहिती इथे दिली. सरांना बोलताना ऐकण्यामधे काय आनंद आहे ह्याचा अनुभव आला. आपल्या बोलण्याने लोकांना खेचून घेण्याची, नि:स्तब्ध करण्याची कला त्यांच्याकडे आहे हे जाणवलं. ते वेळेचे पक्के आणि कुशल संघटक आहेत हे प्रत्येक क्षणी लक्षात येत होतं!.  

सरांसोबत फोटो किल्ल्यावरचं हवा असं वाटतं असतानाचं आशिष दिसला. त्याला म्हटलं, “तुमच्या सोबत एक फोटो हवा आहे. खरंतर तुम्हा तिघांसोबत”.आशिषने गणेश आणि सरांना आवाज दिला. दोघेही लगेचच आले. नेहाने आमचा हा फोटो काढला! त्याक्षणी मला मा. एव्हरेस्टचं दर्शन झालं होतं आणि माझं मा. एव्हरेस्ट शिखर सर देखील झालं होतं!



वीणा वल्ड च्या सुनीला पाटील, २२ एप्रिल ईबीसी बॅचच्या माझ्या ट्रेक सहकारी तन्मय आणि प्रीती आणि एबीसी ट्रेकसाठी नावनोंदणी केलेली सुवर्णा, परतीच्या वाटेवर साथ केलेले किरण सर आणि अन्य ट्रेक सहभागीना भेटून वाटलेला आनंद आणि आलेला जोश नक्कीच मोलाचा वाटला.   


किल्ल्यावरच्या दगडात कोरलेल्या हनुमानाच्या दर्शनाने विसापूर ट्रेकचा परतीचा तर ईबीसी ट्रेकचा आरंभीचा प्रवास सुरु केला!




उमेश सरांनी पुन्हा एकदा दिलेल्या टिप्स ने विसापूर ट्रेकची सांगता झाली. सरांनी सांगितलं “तुमचे टार्गेट आहे १७६०० फिट एक हाय अल्टीट्युड ट्रेक. त्याची तयारी म्हणून लाईफ स्टाईल मेंटेन करा, एक्स्ट्रा ऑर्डीनरी काही करू नका, प्राणायाम, मेडिटेशन करा त्याचा फायदा तुम्हाला तिथे जाणवेल, स्वत:ला फिजिकली आणि मेंटली फिट ठेवा, उन्हाळा आहे ते आरोग्य सांभाळा, आजारी पडू नका, जंक फूड आणि कोल्ड्रिंक पिणे टाळा, ट्रेकच्या वेळी भरपूर पाणी पीत रहा, स्पायसी खाणे टाळा, डाळ-भात सारखे पचायला हलके अन्न खा, ग्रीन टी प्या म्हणजे अॅसीडीटी होणार नाही, हाय अल्टीट्युडला गेल्यावर डोमोक्स घेणे टाळा, हाय अल्टीट्युडला गेल्यावर श्वास कमी पडतोय असं वाटतं तेव्हा सराव केलेल्या प्राणायाम, मेडिटेशनचा फायदा होतो, हळू हळू चाला, खूप लांब विश्रांती घेऊ नका, खूप मोठी गॅप देखील ठेऊ नका, ठिकठिकाणी मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध आहे, रेस्क्यू हेलिकॉप्टर उपलब्ध आहे, काळजी करू नका, आमच्या पैकी कोणीतरी आणि पिक प्रमोशन संस्थेचे शेर्पा तुमच्यासोबत असतील. कोणत्याही प्रसंगाने खचून जाऊ नका, मनाची शक्ती अर्थात विल पॉवर असू द्या, गुड लक.”!

२६ तारखेला होणाऱ्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.

सरांच्या बोलण्याने स्फूर्ती मिळाली, प्रोत्साहन मिळाले, एक बुस्ट मिळाला. राहून राहून मनात येतं होतं की इथून पुढे प्रत्येक क्षणाला आपला निर्णय तपासण्याची इच्छा निर्माण होऊ शकते आणि त्यावेळी सरांचे हे अनुभवाचे बोल आणि सर, आशिष, गणेश आणि दिनेशची आजची उपस्थिती नक्कीच कामी येईल ह्याची खात्री आहे!


थॅन्क यु......उमेश सर, आशिष, गणेश आणि दिनेश!

आता एकचं ध्यास आहे........... ईबीसी ट्रेकचा!