ट्रेक टू विसापूर फोर्ट, ईबीसी प्रक्टिस ट्रेक विथ गिरीप्रेमी टीम, ५ फेब्रुवारी २०१७

“लाईफ स्टाईल मेंटेन करा, एक्स्ट्रा ऑर्डीनरी काही करू नका, लक्षात असु द्या तुमचे टार्गेट आहे १७६०० फिट, हाय अल्टीट्युड ट्रेक!” श्री. उमेश झिरपे सरांच्या यांच्या ह्या शब्दसूचना आणि अनुभवाचे बोल अजूनही कानात घुमत आहेत. त्यांचे प्रभावी पडसाद कानापर्यंतच न थांबता सरळ मेंदूवर पडून थेट हृदयाला भिडले आहेत!

फ्रेंड्स, “एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक” साठी नुकतचं मी स्वत:ला रजिस्टर केलयं. “गार्डियन गिरीप्रेमी इंन्स्टीटयूट ऑफ माउंटनिअरिंग” ह्या संस्थेकडे! २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७ हा ट्रेक कालावधी आहे. ह्या १७००० फुट, हाय अल्टीट्युड ट्रेकच्या प्रक्टिससाठी, “विसापूर ट्रेक” संस्थेने निवडला होता!. “एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक” (ईबीसी) आणि “अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक” (एबीसी) चे आम्ही पार्टीसिपंट आज रविवार, ५ फेब्रुवारी रोजी विसापुरला भेटलो होतो. ह्या ट्रेक निमित्ताने श्री. उमेश झिरपे सर आमच्याशी वरील शब्दात संवाद साधत होते! 

खरं सांगू का, सरांना गाडीत बघितलं, चेहरा ओळखीचा वाटला पण विश्वास बसत नव्हता. सरांनी लिहिलेलं “गोष्ट एका ध्यासाची-एव्हरेस्ट” हे एव्हरेस्ट एक्सपीडीशन वरचं पुस्तक मी अलीकडेचं वाचलं होतं, नुकत्याच लिहिलेल्या एका ट्रेक ब्लॉग मध्ये मी त्यांच्या नावाचा उल्लेखही केला होता आणि विशाल आणि आरके बरोबर काही दिवसांपूर्वीचं त्यांच्याविषयी बोलणं देखील झालं होतं. ती व्यक्ती आज माझ्यासमोर, माझ्यासोबत आहे ह्यावर विश्वास ठेवणं मला कठीण जात होतं!.

आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरचं अनमोल होता! उमेश सरांसोबत, आशिष माने आणि गणेश मोरे ह्या दोघांचीही साथ आज लाभली होती! हा क्षण माझ्या आयुष्यात इतक्या लवकर येईल असं मला वाटलं नव्हतं. म्हणूनचं की काय अचानक, अनपेक्षितपणे समोर आलेल्या या क्षणाला सामोरं जाणही मला तितकचं कठीण जात होतं!विसापूर ट्रेकची सुरुवात एकमेकांच्या ओळखीने झाली. उमेश सरांनी एव्हरेस्ट एक्सपीडीशनचे काही अनुभव शेअर केले. त्याचा फोकसं होता “हाय अल्टीट्युड ट्रेक साठी तयारी”!

विसापूर ट्रेक मी दुसऱ्यांदा करत होते. जून महिन्यात पहिला ट्रेक केला होता. आतापर्यंत विसापूर ट्रेक माझ्यासाठी एक खास ट्रेक होता. कारण एक वर्ष सातत्याने ट्रेक करत राहिल्यानंतर जून मध्ये केलेल्या ह्या ट्रेकवर मी ब्लॉग लिहिला. तो होता मी लिहिलेला पहिला ब्लॉग! आज, विसापूर ट्रेक दुसऱ्यांदा माझ्यासाठी खास झाला तो सर, आशिष आणि गणेशच्या उपस्थितीमुळे!

गिरीप्रेमी या संस्थेने १९८५/८७ मधे पहिल्यांदा विसापूर वर चढाई केली होती. गणेशने विसापूर किल्ल्याबद्दल माहिती दिली आणि ट्रेकला सुरुवात झाली.

मी खूप द्विधा मनस्थितीत होते. गेल्या ट्रेकला राहून गेलेले फोटो मला काढायचे होते पण त्याचवेळी एक विचार मनात होता की हा प्रक्टिस ट्रेक आहे, त्यातही उमेश सर सोबत....मग फोटो काढणार कसे? प्रक्टिस ट्रेकला प्रक्टिसचं व्हायला हवी असं एक साध सरळ गणित! पण राहून गेलेले फोटो काढण्याची इच्छा तितकीच मनात घर करून राहिलेली! चांगलीच कात्रीत सापडले होते!

भावनिक आंदोलने सुरु होती. त्यात भर म्हणून की काय सर, आशिष आणि गणेश साथीला! हा क्षण परत येईल की नाही म्हणून त्यांच्यासोबत एक फोटो हवा ह्या दुसऱ्या विचाराचं थैमान! एका क्षणाला स्वत:चीच लाज वाटली. किती ही मनाची अस्थिरता, चंचलता आणि अधीरता!

तिसरा पण विचार साथीला होता बरं का. “आज आपली परीक्षा आहे”. सर येण्याचा उद्देश आम्हाला मोटीव्हेट करणं एवढाचं नसावा तर ईबीसी/एबीसी ट्रेकसाठी आम्ही फिजिकली आणि मेंटली किती फिट आहोत ह्याचं निरीक्षण करून त्यानुसार आम्हाला मार्गदर्शन करण हा सुद्धा असावा, हा तो विचार!

शाळेचे दिवस आठवत होते. पेपर सोडवत असताना किंवा प्रयोगशाळेत एखादा प्रयोग करत असताना सर जर बाजूला किंवा मागे येऊन उभे राहिलं तर  जे व्हायचं ना...ते होत होतं आज.....

तुमच्या लक्षात आलं असेल ना... काय मनाची अवस्था होती माझ्या! आता तुम्ही दुजोरा द्याल की “ट्रेक” ही गोष्ट मी किती सिरीअसली घेतली आहे ह्यासाठी! हो..ना?

असो. शेवटी मन शांत केलं. एक निश्चय केला. ट्रेक, ट्रेक सहकारी, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा (आणि अर्थात फोटोचा) आनंद घ्यायचा! बस्स!

विसापूरची विशालता ह्यावेळी मी न्याहाळत होते. किती विस्तीर्ण पसरलेला किल्ला आहे हा! किल्ल्यावर फडकणारा भगवा झेंडा खालुनचं किती मोहक आणि स्फूर्तीदायक वाटतं होता. गेल्या ट्रेकला सुरुवातीचा पायवाटेचा हा रस्ता करवंद लगडलेल्या झाडांनी बहरलेला होता! आज त्याची जागा सुंदर आणि वेधक फुलांनी घेतली होती!

आता जंगलातून मार्गक्रमण सुरु झालं. झाडांची दाट सावली, मधूनचं येणारी सूर्यप्रकाशाची तिरिप आणि हलकीशी चढाई! वाव...स्वत:लाचं शोधत होते मी! गेल्यावेळी तीन महिन्याच्या कालखंडाने ट्रेक करताना किती ताण आला होता...आज  ताणरहित आनंद घेत होते मी! गेल्यावेळी शंकर आणि अनिकेत मला धीर आणि प्रोत्साहन देत होते. आज मीच माझी प्रोत्साहनकर्ता बनले होते! परत-परत एकाचं ठिकाणी होणारा ट्रेक, सकारात्मक बदलाची सुखावणारी हीच अनुभूती तर देतो!

गंमत बघा हं...सरांबरोबर फोटो घेण्याची मनात कुठेतरी असलेली इच्छा उफाळून येत होती. शेवटी धाडस केल आणि सरांना आर्जवाने म्हटलं, “सर ट्रेक संपल्यावर तुमच्यासोबत एक फोटो हवा आहे”..सर म्हणे, “हो, घेऊयात ना”....काय हुश्श झालं म्हणून सांगू! शब्द पण जाणीवपूर्वक जपून वापरले... “ट्रेक संपल्यावर” ह्याचा उल्लेख मुद्दामच केला...त्यांच्याविषयी जे ऐकलं होतं त्यावरून असं वाटतं होतं की ट्रेक करताना आणि तो ही प्रक्टिस ट्रेक करताना फोटो काढणं कदाचित त्यांना पटणार नाही.

विचार करताना लक्षात आलं हे दडपण “उमेश सर” ह्या व्यक्तीचं कमी होतं. दडपण जास्त होतं ते त्यांनी केलेल्या कार्याचं!

असो. आता ट्रेकचा पुढचा टप्पा सुरु झाला. छोट्या-मोठ्या दगडांनी खचाखचं भरलेला हा टप्पा! तार्कीकदृष्ट्या कारण माहित असतानाही हे दगड का टाकले आहेत? साधी सरळ पायवाट असायला नको का? असं चढताना सारखं वाटतं होतं. ट्रेकिंग जगतात आणि ट्रेकर्समध्ये हा सगळ्यात सोपा ट्रेक! चढायला सोपा आणि वेळ पण कमी लागतो! पण जेव्हा गुडघा, कंबर, तोल याचा विचार येतो तेव्हा हा सोपा सांगितला जाणारा ट्रेक कर्मकठीण वाटतो!

गेल्यावेळी २०-२५ वर्षाच्या मुला-मुलींसोबत हा ट्रेक केला होता आणि आज वयाला मर्यादाचं नव्हती! नववीतल्या मुलापासून ते सत्तरी ओलांडलेले! “वय हा फक्त एक आकडा आहे” ह्या उक्तीवरचा विश्वास ह्यावेळी नकळत ठाम झाला!

किल्ल्यावर पोहोचले आणि किल्ल्याची व्याप्ती लक्षात आली! अनाहूतपणे गेल्यावेळच्या ट्रेकची रादर स्वत:मधल्या बदलाशी तुलना झाली. गेल्यावेळी इतकी थकले होते की “थकवा” ह्या जाणीवेपलीकडे गेलेचं नाही. आणि ह्यावेळी? जाणीव झाली ती “बदललेल्या नजरेची”! किल्ला/गड बघण्याची एक “नजर”!..ही नजर यावेळी शोधक होती, अभ्यासू होती, संशोधक होती.......

असं वाटलं, ट्रेक म्हणजे “उत्खनन” आहे! इतिहासाचे, पुराणकथांचे, शिवरायकालीन युगाचे ....आणि अर्थात स्वत:चे!

खालून दिसणाऱ्या भगवा झेंड्याच्या दिशेने आम्ही किल्ल्यावर फरफटका मारला. लक्ष वेधून घेत होती ती लांबचलांब पसरलेली भिंत अर्थात किल्ल्याची तटबंदी!

वाटेत ग्राईडिंग व्हील, पाण्याचे टाके पण दिसले. 
किल्ल्यावर विस्तीर्ण पसरलेले पठार (प्लॅटू) आहे. 
झेंडाच्या ठिकाणी उभे राहिलात तर समोर लोहगड दिसतो आणि नजरेच्या टप्प्यात तुंग आणि तिकोना! खुललेले लोणावळा शहरही इथून दिसते.

उमेश सरांनी किल्ल्याची सर्व माहिती इथे दिली. सरांना बोलताना ऐकण्यामधे काय आनंद आहे ह्याचा अनुभव आला. आपल्या बोलण्याने लोकांना खेचून घेण्याची, नि:स्तब्ध करण्याची कला त्यांच्याकडे आहे हे जाणवलं. ते वेळेचे पक्के आणि कुशल संघटक आहेत हे प्रत्येक क्षणी लक्षात येत होतं!.  

सरांसोबत फोटो किल्ल्यावरचं हवा असं वाटतं असतानाचं आशिष दिसला. त्याला म्हटलं, “तुमच्या सोबत एक फोटो हवा आहे. खरंतर तुम्हा तिघांसोबत”.आशिषने गणेश आणि सरांना आवाज दिला. दोघेही लगेचच आले. नेहाने आमचा हा फोटो काढला! त्याक्षणी मला मा. एव्हरेस्टचं दर्शन झालं होतं आणि माझं मा. एव्हरेस्ट शिखर सर देखील झालं होतं!वीणा वल्ड च्या सुनीला पाटील, २२ एप्रिल ईबीसी बॅचच्या माझ्या ट्रेक सहकारी तन्मय आणि प्रीती आणि एबीसी ट्रेकसाठी नावनोंदणी केलेली सुवर्णा, परतीच्या वाटेवर साथ केलेले किरण सर आणि अन्य ट्रेक सहभागीना भेटून वाटलेला आनंद आणि आलेला जोश नक्कीच मोलाचा वाटला.   


किल्ल्यावरच्या दगडात कोरलेल्या हनुमानाच्या दर्शनाने विसापूर ट्रेकचा परतीचा तर ईबीसी ट्रेकचा आरंभीचा प्रवास सुरु केला!
उमेश सरांनी पुन्हा एकदा दिलेल्या टिप्स ने विसापूर ट्रेकची सांगता झाली. सरांनी सांगितलं “तुमचे टार्गेट आहे १७६०० फिट एक हाय अल्टीट्युड ट्रेक. त्याची तयारी म्हणून लाईफ स्टाईल मेंटेन करा, एक्स्ट्रा ऑर्डीनरी काही करू नका, प्राणायाम, मेडिटेशन करा त्याचा फायदा तुम्हाला तिथे जाणवेल, स्वत:ला फिजिकली आणि मेंटली फिट ठेवा, उन्हाळा आहे ते आरोग्य सांभाळा, आजारी पडू नका, जंक फूड आणि कोल्ड्रिंक पिणे टाळा, ट्रेकच्या वेळी भरपूर पाणी पीत रहा, स्पायसी खाणे टाळा, डाळ-भात सारखे पचायला हलके अन्न खा, ग्रीन टी प्या म्हणजे अॅसीडीटी होणार नाही, हाय अल्टीट्युडला गेल्यावर डोमोक्स घेणे टाळा, हाय अल्टीट्युडला गेल्यावर श्वास कमी पडतोय असं वाटतं तेव्हा सराव केलेल्या प्राणायाम, मेडिटेशनचा फायदा होतो, हळू हळू चाला, खूप लांब विश्रांती घेऊ नका, खूप मोठी गॅप देखील ठेऊ नका, ठिकठिकाणी मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध आहे, रेस्क्यू हेलिकॉप्टर उपलब्ध आहे, काळजी करू नका, आमच्या पैकी कोणीतरी आणि पिक प्रमोशन संस्थेचे शेर्पा तुमच्यासोबत असतील. कोणत्याही प्रसंगाने खचून जाऊ नका, मनाची शक्ती अर्थात विल पॉवर असू द्या, गुड लक.”!

२६ तारखेला होणाऱ्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.

सरांच्या बोलण्याने स्फूर्ती मिळाली, प्रोत्साहन मिळाले, एक बुस्ट मिळाला. राहून राहून मनात येतं होतं की इथून पुढे प्रत्येक क्षणाला आपला निर्णय तपासण्याची इच्छा निर्माण होऊ शकते आणि त्यावेळी सरांचे हे अनुभवाचे बोल आणि सर, आशिष, गणेश आणि दिनेशची आजची उपस्थिती नक्कीच कामी येईल ह्याची खात्री आहे!


थॅन्क यु......उमेश सर, आशिष, गणेश आणि दिनेश!

आता एकचं ध्यास आहे........... ईबीसी ट्रेकचा!

1 comment:

UB said...

Awesome madam, felt as if I was travelling with you invisibly😉
All the very best for your EBC trek👍