नाणे घाट-भोरांडयाचं दार ट्रेक, १७ सप्टेंबर २०१७

नाणेघाट, श्री. आनंद पाळंदे सरांनी लिहिलेल्या, “डोंगरयात्रा" या पुस्तकात नाणेघाट परिसराचा खालील नकाशा दिलेला आहे,



सातवाहन काळातील प्रतिष्ठान अर्थात पैठण ते कल्याण व्यापारी घाटमार्ग! ह्या मार्गावर व्यापाराची ने-आण करण्यासाठी नाण्यांच्या स्वरुपात जकात घेतली जात असे म्हणून ह्याला नाव पडले आहे “नाणे घाट”!

पूर्वीच्या काळी व्यापाराचे मार्ग कोणते होते, कसे होते, दोन देशामधील व्यापारी संबंध बळकट करणारा मार्ग कसा दिसतो हे सर्व डोळ्यांनी पहाण्याची शिगेला पोहोचलेली उत्सुकता हा ट्रेक करण्यामागचे एक कारण होते.

१६ तारखेला रात्री १२ वाजता आम्ही अकरा जण पुण्यातून निघालो आणि नारायणगाव-माळशेज घाटमार्गाने पहाटे ४ वाजता ट्रेकच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. १५ मिनिटात तयार झालो, टॉर्च बाहेर निघाल्या, एकमेकांची ओळख करून घेतली आणि ट्रेकला सुरुवात केली.

काही पावलांवरचं “नाणेघाट गुंफा मार्ग” नाव लिहिलेल्या वन खात्याच्या कमानीने आम्हाला दर्शन दिले. 



मळलेल्या पायवाट अंधारात घनदाट झाडीमुळे भयान वाटली. पाण्याचे ३-४ झरे ओलांडले, इवलुश्या बेडकाच्या तळपायावर झालेल्या उडीने शहारले, एका हातात ट्रेकिंग स्टीक आणि दुसऱ्या हातात टॉर्च पकडून तोल अंधारात सांभाळत चालण्याची कसरत केली आणि ट्रेक सुरु ठेवला.

नाणेघाट ह्या मार्गे समुद्रसपाटीपासून साधारण २१०० फुट उंचावर आहे. कमानीतून आत गेल्यावर १५-२० मिनिट सपाटीचा असणारा रस्ता नंतर चढाईचा होत गेला. पावसाने माती भुसभुशीत झाली होती आणि झाडाची मुळे पायवाटेवर आडवी पसरली होती. पायवाटेला पुढे कुठे फाटा तर फुटतं नाही ना ह्याचा शोध घेत ट्रेक सुरु होता.

पहाटे साधारण ५ वाजता, “नानाचा अंगठा” ह्या नाणेघाटावरील अंगठ्याच्या आकाराच्या सर्वोच्च (साधारण ३००० फुट) पर्वताच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो.


पहाटेची चाहूल लागत असली तरी अंधार असल्याने ह्या पर्वताचे दर्शन घेण्यासाठी उजाडण्याची वाट पाहयची आम्ही ठरवले. तोपर्यंत झालेल्या खाऊगप्पा आणि हळूहळू उजाडत असताना ह्या पर्वताचे आणि पठार आणि पर्वत यांच्यामधील घळईचे दिसणारे विलोभनीय दर्शन ट्रेकमधील पहिला विलक्षण क्षण होता!



“नानाचा अंगठा” हे नाव कसे पडले असावे हा विचार करत असताना असे वाटले की "नाना" नावाच्या व्यक्तीला आपलेसे करून घेतले असले आणि अंगठ्याचा आकार असलेल्या पिनॅकलचा संबंध जोडला असला तरी अधिक विचार करता असे वाटले कदाचित ते “नाण्याचा अंगठा (ठसा)” असे असावे. हा व्यापारी मार्ग होता आणि जकात कर घेतली जायची, असे असेल तर “नाणे” दिलेल्याची पोचपावती म्हणून त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेत असतील का? त्यात भर म्हणून तो पिनॅकल अंगठ्याच्या आकाराचा दिसतोय म्हणून एकत्र संबंध जोडून त्याचे नाव “नाण्याचा अंगठा” असे पडले? आणि त्याचा अपभ्रंश होता होता ते “नाण्याऐवजी” “नाना” असे होत गेले. तार्कीकदृष्ट्या दृष्ट्या अधिक विचार केल्यावर हे ही लक्षात आले की इथे ब्राम्ही लिपीत काही लिहिलेले आहे तर “नाण्याचा किंवा हाताच्या अंगठ्याचा ठसा देणे/घेणे" संयुक्तिक होईल का? थोडक्यात काय तर "आज "नानाचा अंगठा"ह्या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या ह्या घाटमार्गाच्या नावामागील इतिहासाचा शोध जरा चालूच ठेवावा असं वाटतयं.......असो.    

इथून पुढचा ट्रेकमार्ग तासभर दगडी पायऱ्या चढत जाण्याचा! ते चढत जाताना दमछाक होत असली तर अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचल्याने आम्ही हा मार्ग आरामात चढलो!

काही पायऱ्या चढून गेल्यावर एक पाण्याचे कुंड दिसले. 



कुंडच्या वरील दगडी कपारीवर ब्राम्ही लिपीत काही लिहिले आहे जे आज अस्पष्ट झाले आहे!


काही पायऱ्या अजून चढून गेल्यावर आम्ही गुंफे जवळ पोहोचलो. 




एका मोठ्या गुंफेमध्ये ब्राम्ही लिपी मध्ये गुंफेच्या तीन भिंतीवर काही लिहिले आहे.



ती लिपी बघत असताना पहिला तर विचार हाच आला की इसवी सन २५० पूर्व काळातील ह्या गुंफा आणि त्याच काळी जर  हे लिहिले असेल तर इतक्या साऱ्या वर्षात ब्राम्ही लिपीत नक्की काय लिहिले आहे त्याचा शोध लावून त्याचा अर्थ देवनागरी लिपीत त्याठिकाणी का लिहिलेला नाही? हे प्रयत्न व्हायला हवे होते का? हे कोणी घ्यायला हवे होते?

श्री. आनंद पाळंदे सरांनी लिहिलेल्या, “सहलीतून उमजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा” ह्या पुस्तकात ह्या ब्राम्ही लिपीतील लिखाणाबद्दल पुढील उल्लेख आहे,



ही संशोधन परिपूर्ण माहिती आहे असे आपण समजून चाललो तर तीच माहिती लिहिलेला एक फलक इथे असायला हवा होता का? असा एक विचार मनात येऊन गेला. थोडा अधिक विचार करूयात का ह्यागोष्टीवर?

"चला ट्रेकिंगला".  पांडुरंग पाटणकर सर लिखित हे पुस्तक हाती आले. 


ह्या पुस्तकात ह्या गुंफा बद्दल खालील उल्लेख आहे,



प्र. के घाणेकर सर यांच्या "लेणी महाराष्ट्राची" ता पुस्तकात खालील उल्लेख आढळला, 




व्याप्याऱ्यांच्या विश्रांतीसाठी गुंफा आणि पाण्याच्या सोयीसाठी बाहेरील कुंड असावेत!




इथे गुंफे बाहेर हनुमानाचे दगडात कोरलेले शिल्प आहे. हे शिल्प किती जुने आहे ह्याचा  लिखित उल्लेख इथे नाही.




हनुमानाचे दर्शन घेऊन पुढचा ट्रेक सुरु केला. हा रस्ता दगडांनी खचाखचं भरलेला. वर बघितलं तर समोर “व्ही” आकारासारखी घळई दिसते. त्याघळईतून सूर्य प्रकाश दगडीवाटेवर पडून वाट सोनेरी दिसत होती! काही दगडांचा वरील पृष्ठभाग एकदम गुळगुळीत तर काही एकदम खडबडीत! सुदैवाने ह्या दगडांवर शेवाळं नव्हतं त्यामुळे चढताना इतकी खबरदारी घ्यावी लागली नाही.




ही दगडी पायवाट पार करून गेल्यानंतर समोर सपाट माळरान दिसले. घळईच्या तोंडाला डावीकडे जकातीचा रांजण ठेवला आहे. व्यापाऱ्याकडून घेतलेली जकात ह्या रांजणात गोळा केली जात असे. ह्या दगडी मोठ्या रांजणावर सुबक नक्षी आहे. 

ह्याच बाजूला मागे निवासी इमारती असाव्यात ज्यांचे काही अवशेष तिथे आहेत. इथूनचं धुक्याने वेढलेला नवरा-नवरीचा डोंगर दिसतं होता. धुके थोडे विरळ झाले आणि हरीश्चंद्रगडाने देखील दर्शन दिले.

घळईच्या उजवीकडे गणपतीचे छोटेसे मंदिर दिसले. शेंदूर लेपित गणेशाची मूर्ती आहे. ह्या श्री. गणेशाचे दर्शन घेतले.

पुणे/जुन्नरच्या बाजूने चढल्यावर आधी हनुमानाची दगडात कोरलेले शिल्प आहे आणि कल्याणच्या बाजूने आल्यावर आधी गणपतीचे मंदिर लागते. ह्यामागे काही विचार होता का? आज जिथे जकातीचा रांजण आहे त्याच्या बरोबर समोर गणपतीचे मंदिर आहे ह्याही मागे काही विचार असावा का? हा विचारही मनात येऊन गेला. असो.

मंदिराच्या जवळून काही पायऱ्या चढून एका पठारावर आलो. सोनकीच्या फुलांनी हे पठार फुललेले होते. 



एका बाजूला जीवधन, वानरलिंगी आणि मानवलिंगी सुळका, ढाकोबा, आहुपे घाट आणि गोरखगड आणि मच्छिंद्रगड दिसत होते. ह्या डोंगराच्या मधील दरी, त्यावर झाकाळलेले पांढरेशुभ्र ढग, सोनकीच्या फुलांचे ताटव्यांचे पठार, दरीचा नजरा, सकाळचे कोवळे ऊन आणि हलकीशी थंडगार हवा...हे निसर्गरम्य दृष्य फक्त अनुभवण्यासाठीचं!




इथून पुढचा प्रवास होता तो अंगठ्याच्या नखावर विराजमान होण्याचा! थोडासा चढ चढून गेलो आणि दिसणाऱ्या नजाऱ्याने मोहित केलं! निसर्गातील आणि आपल्या मनातील शांतता, स्तब्धता आणि प्रसन्नता अनुभवावी ती इथेच असे वाटले!

अंगठ्याच्या नखावर विराजमान होऊन सुरेश सरांनी आणलेली ज्वारीची भाकरी, ठेचा आणि शेंगदाण्याची कुरकुरीत चटणी ही स्वादिष्ट शिदोरी हा ट्रेक मधला दुसरा विलक्षण क्षण!




इथून पुढे जेवणासाठी सुभाषचं घर गाठलं! त्यांचे पोहे हे एकदम झकास असं ऐकून होते आणि खाल्ल्यावर त्याची प्रचीती आली!

इथून पुढचा ट्रेक हा सुप्रसिद्ध “भोरांडयाचे दार” उतरण्याचा होता. भोरांडे हे मूरबाड तालुका, जि. ठाणे येथील एक गाव! ह्याला जवळचे शहर (साधारण ७०-८० किमी) आहे कल्याण! “भोरांडयाचे दार” उतरून कल्याण बंदर गाठण्याचा हा व्यापारी घाटमार्ग!

“भोरांडयाचे दार” २१०० फुटाची उतराई आहे! नावात “दार” असा उल्लेख असला तरी दाराची प्रतिकृती इथे नाही तर एक एका घळईचे तोंड/मुख/प्रवेशद्वार ह्या अर्थाने हे “दार” आहे!



दोन्ही बाजूला उंचच्या उंच खडे कातळखडक आणि मधून जाणारी दगडांनी भरलेली पायवाट! २१०० फुटांच्या उतराईमधे ९५% उतराई ह्या दगडांनी भरलेली आहे! अगदी छोट्या दगडांपासून ते भल्या मोठ्या दगडांपर्यंत विविध आकाराचे, वजनाचे, गुळगुळीत, खडबडीत, खाच आणि शेवाळ सहित आणि विरहीत, निसरडे-घसरडे असे हे दगड! बापरे हे उतरणे कर्मकठीण काम झालं मला! स्टीकचा आधार घ्यावा तरी पंचायत आणि नाही घ्यावा तरी पंचायत! तोल जाऊ नये, पुढे तोंडावर पडू नये, घसरू नये, पाय वेडावाकडा पडू नये ही सगळी खबरदारी घेता घेता नाकीनऊ आले. चित्त एकाग्र करून उतरताना घामाघूम झाले! 

“कसा असा हा रस्ता?” हा प्रश्न मनात रुंजी घालत होता. हे दगड आले कुठून, हा रस्ता तयार कसा झाला, ह्याला पर्यायी मार्ग नाही का? असे कितीतरी प्रश्न मनात येऊन गेले. गावकरी म्हणे, “एका तासात उतरलं तुम्ही” आणि आम्हाला उतरायला लागले साधारण तीन तास! असो. सर्व सुखरूप उतरले हे महत्वाचं!

चहा आणि जेवणाचा विसावा घेऊन रात्री ११ वाजता पुण्यात दाखल झालो!

गाडीत हा ट्रेकमार्ग बघण्याच्या उत्सुकतेचा विचार करत होते. पूर्वीच्या लोकांनी किती खस्ता खाऊन, मजल-दरमजल करत व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते ह्याचा अंदाज आला! अर्थात त्यावेळी दळणवळणाचे मार्ग असायचे ते असेचं.....तरिही......असो.

काही प्रश्न उत्तराच्या प्रतिक्षेत असले तरी पुन्हा एकदा एका ऐतिहासिकदृष्या महत्वपूर्ण स्थळाला भेट देण्याचे समाधान मिळाले!

मित्रांनो, मला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर किंवा उत्तराचा मार्ग तुमच्याकडे असेल तर नक्की सांगा! एक ट्रेक परिपूर्ण झाल्याचे समाधान तेव्हाचं मला मिळेल!      

भेटूयात लवकरचं!
स्वच्छंद गिर्यारोहक: उभे-डावीकडून: स्वप्नील, खोत, रुपेश गौल, दिलीप गाडे, मी, मुग्धा कोल्हटकर, सागर मोहिते, उदय मोहिते, भाग्येश मोहिते, सुरेश भाग्यवंत
बसलेले-डावीकडून:  विशाल काकडे, योगेश सावंत

रानफुलांची जैवभूमी, अंधारबन, ९ सप्टेंबर २०१७

अंधारबन!

------ताम्हिणी घाटातून कोकणात उतरणारा एक घाटमार्ग!

------पिंपरी डॅम ते भिरा डॅम ह्यांना सांधणारा, साधारण १३ किमी. चा एक ट्रेकमार्ग!

-----पिंपरी, ता. मुळशी, जि. पुणे पासून सुरु होणारा आणि पाटनुस, ता. माणगाव, जि. रायगड इथे संपणारा रेंजमार्ग!

-----कुंडलिका व्हॅली, कोसळणारे धबधबे, पाण्याचे झरे ह्यांची सोबत करणारा एक जलमार्ग!

-----१३ किमी च्या पट्ट्यात पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या कडेवर वसलेल्या "हिरडी" गावाला जोडणारा जंगलमार्ग!

-----साधारण २८०० फुट (८५० ते ९०० मी) उंचावरील पठारावर विविध रानफुलांनी गजबजलेला जैवमार्ग!

-----तैलबैला, घनगड, सरसगड इ. गडांच्या कुशीतून जाणारा पर्वतमार्ग!

असं हे वैविध्यपूर्ण अंधारबन!

आउटडोअर व्हेंचर्स ह्या ट्रेकिंग ग्रुप सोबत मी हा ट्रेक करणार होते! 

पिंपरी ह्या बेस गावात साधारण ११ वाजता उतरलो तेव्हा गावाला धुक्याच्या चादरीने वेढलेलं होतं. पिंपरी धरणाचा जलाशय अफलातून दिसत होता!


ट्रेकच्या सुरुवातीलाचं बेडूकरावांनी दर्शन दिले. गवताच्या पांघरूणात मस्त सुस्तावला होता! १-२ मिनिटाने हालचाल केली, डोकं वर काढलं आणि परत निपचित पडून राहिला! त्याच्या ह्या हरकतीचे आश्चर्य वाटले जरी असले तरी त्याच्या ह्या अवस्थेचा फोटो काढण्याची यथेच्छ संधी मिळाल्याने मी आणि विभा (ट्रेक कोऑर्डीनेटर) खुश झालो!


थोडीशी पुढे गेले तर काय एक छोटूसं फुलपाखरू पाना-फुलाला गोंजारत होतं. फुलपाखराची ती हालचाल मी निरखून पाहत होते आणि चक्क त्याला काहीही फरक पडत नव्हता! माझ्या चाहुलीने ते दूरवर उडून गेलं नाही की जवळच्या इतर फुलांवर घोंघावतही राहिलं नाही!



ह्या आनंदातचं पुढचा ट्रेक सुरु केला. कुंडलिका व्हॅलीचे निसर्गरम्य चित्र हा या ट्रेकचा एक नयनमनोहारी व्ह्यू पॉइन्ट आहे.



ट्रेकमार्गावरील धबधबे आणि झऱ्याच्या पाण्याची पातळी विलक्षण घटली होती.



आता समोर मनमोहक रानफुलांची सलग रेलचेल पाहून अत्यानंद झाला! एकेका फुलाचा किमान एक तरी फोटो काढण्यासाठी मोबाईल बाहेर आला, फोकस अॅडजेष्ट झाला आणि डोळ्यांवरचा चष्मादेखील हनुवटीवर विसावला! ट्रेकच्या सत्तर टक्के भागापर्यंत, म्हणजे हिरडी गावापर्यंत फुलेचं फुले! काही फुले एकटीचं डोलत होती, काही आपल्या भावंडासोबत बागडत होती. काहींनी स्वत:ला झाडाच्या पानात लपवलं होतं. काहींनी पाणझरा तर काहींनी खळाळत्या पाण्याला बांध घातलेल्या दगडगोटयांना आपलसं केलं होतं!

निळकंठ

तेरडा आणि सोनकी


गालगोंडा आणि रानहळद


चाहोळा आणि रानआलं

गेंद आणि जांभळी चिरायत

वरून डावीकडे: रानवांगी आणि कारवीकळी
खालून डावीकडे: रानअबोली आणि युट्रीक्यूलॅरिया 
ढाल तेरडा
चाहोळाच्या फुलांनी तर संपूर्ण माळरानावर आपलं अधिराज्य बळकट केलं होतं! 



अंधारबन, साधारण दोन मोठे धबधबे सोडले की हे वन अधिकचं दाट होतं जातं. मग ऊन-सावलीचा खेळ! 



दुतर्फा घनदाट झाडी आणि मधून जाणारी पायवाट!



हे वन दाट होत गेलं आणि बागडणारी फुले कुठल्या कुठे गायब झाली! इथे दिसत होती फक्त उंच उंच झाडी आणि  विविध आकाराची पाने. काही झाडांची पाने दुमडल्या गेली होती आणि पानाखालची चंदेरी बाजू वर आल्याने उन्हाच्या प्रकाशात ती झळाळत होती. ठिकठिकाणी चकाकणारी ही पाने जंगलाचे सौदर्य खुलवत होती!

  
पावसाने ओले आणि थोडेसे कुजलेले खोड आणि त्यावर उगवलेली विविध आकाराची, रंगाची मशरुम्स! काही ठिकाणी ह्या मशरुम्स मुळे चक्क नक्षीकाम झालेले पहायला मिळतं होते!






रानफुले, मशरुम्स, अंधारलेलं वन इ. आनंद घेत ट्रेक सुरु होता. सुरुवातीला लागलेली धुक्याची चादर कुठल्या कुठे उडून गेली होती आणि तळपते सूर्यकिरण चटका लावत होते! प्रत्येक झऱ्यावर पाणीग्रहण होतं होतं आणि शरीरावर घेतलेल्या पाण्याच्या तुषारांनी आलेली शीतलता पुढील ट्रेकसाठी उभारी देत होती!

दुपारी साधारण तीनच्या दरम्यान आम्ही हिरडी (ता. रायगड) गावात पोहोचलो. ट्रेकच्या मध्यमार्गावर हे एकचं गाव आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असणारे २०-२५ घराचं गाव. गावात घरगुती एक हॉटेल आहे जे ट्रेकर्स साठी चहा-नाश्ता, जेवणाची व्यवस्था करतात. गावात ताडा-माडाची झाडे बघायला मिळाली. दिवाळीनंतर ह्या झाडांपासून, इथले आदिवासी लोक ताडी गोळा करतात जी ३-४ महिने टिकते आणि पंचवीस रुपये ग्लास अशी विकली जाते.


ह्या गावाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते इथलं पेशवेकालीन शिवमंदिर! गावातून ५-७ मिनिटाच्या अंतरावर भात शेतीच्या बांधावरून जात तलावाकाठी हे मंदिर आहे! 


मंदिराच्या आवारात पाण्याचे कुंड आणि नंदी शिल्प आहे. 


भिकाजी मेंगडे ह्या ७०-८० वर्षाच्या बाबांच्या माहितीनुसार, कुंडातील ह्या पाण्याचे उगमस्थान गुप्त असून पाण्याचा मार्ग मंदिरातील गोमुखातून बाहेर येऊन शिवलिंगावर त्याचा अभिषेक होतो! महाशिवरात्रीला इथे शिवोत्सव भरतो! 


मंदिरावर मोडी लिपीत काही लिहिले आहे, ते अस्पष्ट झाले आहे आणि ते नक्की काय लिहिलेले आहे ह्याचा शोध लागला तर ह्या पवित्र स्थळाच्या माहितीत भर पडेल. 

मंदिराचा कळस गोपूरसमान असून त्यावर ॐ चित्रित केला आहे! गावातील घरांपासून थोडे दूर असलेल्या ह्या मंदिर भागात नीरव शांतता आणि प्रसन्नता अनुभवास येते! 


हा ट्रेक केला तर ह्या मंदिराला भेट द्यायला विसरू नका!

हिरडी गावातून आम्ही उतरायला सुरुवात केली आणि पावसाने अचानक हजेरी लावली! जो बेमालूम कोसळला तो पायथ्यापर्यंत! उतारावरील दगडमार्गावर गढूळ पाण्याचे लोट वाहू लागले. उतरायचा वेग कमी झाला.

ट्रेकमधला हा टप्पा अगदीचं कंटाळवाणा! दगडधोंड्यांची वाट संपता संपत नाही! सपाट जमीन पायाखाली येण्यासाठी मन तरसलं!

शेवटचा मोठा झरा लागला आणि पायथा जवळ आल्याच्या जाणीवेने हुश्श झालं! तरीपण पायथ्याशी, पाटनुस गावात यायला पंधरा-वीस मिनिट लागले! थोडक्यात काय पावसामुळे उतरणीला जवळजवळ अडीच तास लागले!

ह्या ट्रेक प्रवासात विवाननावाच्या साधारण १० वर्षाच्या मुलाच्या कुटुंबाशी ओळख झाली. विवानला निसर्गाची आवड आहे म्हणून हे सर्वजण ट्रेकला आले होते. मला कौतक वाटलं ह्या गोष्टीचं! मुलाची आवड जपणारे, त्याला पाठींबा म्हणून त्याच्यासोबत कष्टप्रद ट्रेक करणारे पालक, ट्रेक दरम्यान खूप कमी पाहायला मिळतात! माझी ट्रेकची सुरुवात ऐकून ते म्हणे, “हा चांगलाच छंद लावून घेतलाय तुम्ही स्वत:ला....रिटायर्ड होण्याच्या वयात तुम्ही ट्रेक सुरु केला, कमाल आहे”. असो.

संध्याकाळी ७.३० वाजता आम्ही पाटनुस सोडलं आणि रात्री ११ वाजता पुण्यात पोहोचलो!

ह्या वर्षीच्या मोसमात सततच्या जोरदार पावसाने जाण्यास धोकादायकअसा शिक्कामोर्तब झालेला, नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने परतीला पाठवलेला, नदीप्रवाहात काहींना सामावून घेतलेला... असा हा ट्रेक, पासचा जोर थोडा कमी झाल्यावर ह्या महिन्याच्या सुरुवातीला ठेवल्याने आम्हाला मात्र आनंद आणि सुखद आठवणी देऊन गेला!

अंधारबन, विचार करताना, हे ठिकाण इतर कशापेक्षाही रानफुलांची जैवभूमी म्हणून नावारूपास यावे असे मला मनापासून वाटले!

फ्रेंड्स, खारीच्या वाटयाने का होईना, करूयात का ह्यासाठी प्रयत्न?



रानफुलांची ओळख: श्री. राजकुमार डोंगरे
मन:पूर्वक धन्यवाद !

पुढील  ट्रेक ब्लॉगमध्ये ह्या "वना" विषयी सविस्तर लिहायला मला जास्त आवडेल..वनाचा प्रकार, झाडे, पानांचे प्रकार इ.  .बघू शक्य होतयं का ते.......

४ सप्टेंबर २०१६ रोजी केलेल्या ट्रेकचे वर्णन वाचण्यासाठी खालील लिंक फॉलो करा:


ट्रेक टू गणपती गडद केव्ह्ज, गणेशोत्सव स्पेशल, ३ सप्टेंबर २०१७

ॐ गं गणपतये नम:

भाद्रपद शु. १२, प्रदोष आणि उत्तराषाढा नक्षत्रावर “मिस्टेरीअस रेंजर्स” ह्या ट्रेकिंग ग्रुपचे आम्ही १५ जण “गणपती गडद केव्ह्ज” ला भेट देण्यासाठी निघालो. डोंगर, जंगल आणि खडकात खोदलेल्या लेण्यात विसावलेल्या, श्री. गणेशाचं दर्शन गणेशोत्सवात घेण्यासाठी एक सुंदर मुहूर्त जुळून आला होता.


माझ्या असं वाचनात आलं की गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री. गणेश आपल्या भक्तांसाठी पृथ्वीतलावर अवतरतो थोडक्यात गणेशोत्सव म्हणजे निराकार गणेशाची साकार रुपात अनुभूती! ट्रेकच्या माध्यमातून ही अनुभूती घेण्यासाठी खालील गणेश आराधना करून आम्ही निघालो,

||वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभं
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा||

सकाळी सहा वाजता पुण्यावरून प्रस्थान केलं. आळेफाटा-कल्याण रोड मार्गे माळशेज घाटातून मार्गक्रमण करत सोनावळे, ता. मुरबाड, जि. ठाणे हे पायथ्याचं गाव गाठलं! पुण्यापासूनचा साधारण १५० किमी चा हा प्रवास करून सकाळी ११.४५ च्या दरम्यान आम्ही सोनावळे गावात पोहोचलो. गावाच्या मुखाशीच असलेल्या ह्या बोर्डने लक्ष वेधून घेतलं! “श्री. गणेश लेणी चॅरिटेबल ट्रस्ट, सोनावळे” आमच्या गाईड कडून ह्या ट्रस्ट ची अधिक माहिती कळाली जी खाली ओघाने वाचायला मिळेलचं


ट्रस्टचे दोन कार्यकर्ते आणि आमचे गाईड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही १२ वाजता ट्रेक सुरु केला. ट्रेक मार्गावर गाईडशी बोलताना हे समजलं की ह्या “गणेश लेण्या” अर्थात खडकात खोदलेल्या गुहा (स्थानिक लोक गुहांना “गडद” म्हणतात), साधारण ५०० मी. उंचावर असून जंगलातून पायवाट तिथपर्यंत जाते. जैवविविधतेने नटलेल्या ह्या जंगलात विविध प्रकारची फुले, फुलपाखरे, महुआची झाडे (ज्यापासून औषधी गुणधर्म असलेली दारू बनवतात) तर आहेतच पण पट्ट्याचा वाघ, बिबट्या ही हिंस्त्र श्वापदे देखील आहेत.

ट्रेकचा रस्ता सुरु झाला तो मुळी चढाईनेचं! आजूबाजूला घनदाट जंगल, लहान-मोठे आकार असलेली झाडे आणि पाने, रंगीबेरंगी रानफुले, खळाळणारे झरे आणि आजूबाजूला दिसणारे असंख्य धबधबे हे चढाईने आलेला थकवा घालवत असले तरी पडत असलेल्या पावसाने निसरड झालेलं होतं आणि ह्या मार्गावर चढण्या-उतरण्यासाठी अवघड असलेल्या ३-४ पॅचेसमुळे ट्रेकमध्ये थोडं थ्रिलिंग पण आलं! हे पॅचेस पावसामुळे दगडावर साचलेल्या शेवाळामुळे, निसरत्या चिखलामुळे, दोन दगडातील उंच अंतराने आणि अरुंद पायवाटे मुळे थोडे आवाहनात्मक वाटले. एकमेकांना मदत करत साधारण दुपारी दोनच्या दरम्यान आम्ही लेण्यांजवळ पोहोचलो.



लेण्यांकडे जाणारी पायवाट खूपचं अरुंद वाटली आणि एका बाजूला दरी असल्याने तिथून काळजीपूर्वक जावे लागले. लेण्यांकडे जाता जाता तो अखंड खडक पाहत असताना जाणवले की साधारण १८०-२०० मी. लांबीच्या दगडात ह्या लेण्या कोरलेल्या आहेत. एका बाजूला लेण्या, दुसऱ्या बाजूला धसाई धरणाचे पाणी, लेण्यांवरून कोसळणारा प्रचंड मोठा धबधबा आणि पाण्याच्या धबधब्याच्या आवाजा व्यतिरिक्त असणारी असीम शांतता...  



जंगलमार्गातून दूरवरून आकर्षक दिसणाऱ्या ह्या लेण्या प्रत्यक्ष पाहताना खुपचं साध्या पण विलोभनीय वाटल्या आणि दगडात कोरलेल्या ह्या लेण्यांच्या उत्पत्तीबद्दल आणि श्री. गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल1 असंख्य प्रश्न मनात निर्माण झाले.

गाईडच्या माहितीनुसार, प्राचीन काळात पुणे-कल्याण/ कल्याण-मुरबाड-नाणेघाट ह्या व्यापारी मार्गावरील व्यापाऱ्यांच्या विसाव्याचे हे एक ठिकाण होते. ह्या लेण्यांमध्ये विसाव्यासाठी १०-१२ खोल्या आहेत, पाण्याचे कुंड आहेत आणि ते झाकण्यासाठी लाकडी फळी जोडण्याची व्यवस्थाही केलेली आहे. सोनावळे गावाजवळील डोंगरात कोरलेल्या ह्या हिंदू लेण्या दोन मजली असून खालच्या मजल्यावर विसाव्याच्या खोल्या तर वरच्या मजल्यावर गणेश मंदिर आहे.


गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. गणेश मंदिर बंद करण्यासाठी दरवाज्याची व्यवस्था ही आहे. गणेश मंदिरात प्रवेश करण्यासाठी दगडात कोरलेल्या ६-७ पायऱ्या (खोबण्या) आहेत. 


मंदिरात प्रवेश करताच समोर प्रचंड मोठे ध्यानधारणा/प्रार्थनास्थळ/ सभामंडप असून आणि समोर शेंदूर लेपित गणेशमूर्तींचे दर्शन घडते. ह्या उजव्या सोंडेच्या गणेशमूर्ती आहेत. उजव्या सोंडेच्या मूर्ती खूप शक्तिशाली आणि जागृत असतात आणि त्यामुळेचं ह्या स्थळाचे धार्मिक महत्व अनन्यसाधारण आहे अशी माहिती गाईडने दिली. 


ह्या मूर्तींच्या मागेच एक भुयारी मार्ग आहे (सध्या तो बंद आहे) जो शिवनेरी गडावर निघतो असे गाईडने सांगितले.

बाजूलाचं राम-लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची मूर्ती आहे.


 गणेशाचे हे मंदिर चार खांबावर उभे आहे. 
  


खांबावर विविध शिल्प कोरलेली आहेत परंतु रंगरंगोटी केल्याने ह्या शिल्पांची स्पष्ट ओळख होत नाही.


वरच्या बाजूने लेण्यांवर कोसळणारा प्रचंड मोठा धबधबा, गणेश मंदिरावर अभिषेक करण्यावत भासला मला!



गणेश मंदिराच्या बाहेरील निसर्ग नजरा हा अप्रतिम आहे. घनदाट जंगल, धसाई धरणाचा जलाशय आणि कोसळणारा धबधबा!



जैवविविधतेने नटलेल्या ह्या जंगलात ट्रेक मार्गावर बरीच फुले नजरेत आली जसे, शिंदोळी (जंगली हळद/रानहळद), कळलावी (अग्निशिखा), विविध आर्किड्स इ.  



अफाट जंगलात, नाणेघाट, जीवधन, दुर्ग-ढाकोबा, सिद्धगड, गोरखगड किल्ल्याच्या वेढलेल्या खडकात वसलेल्या ह्या लेण्या अप्रतिम कलाकृतीचा नमुना आहे.

काही वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ह्या लेण्यावरील धबधब्यावर रॅप्लिंग होतं, लेण्यांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही जमेची बाजू असली तरी भेट देणाऱ्यांनी लेण्यांमध्ये लिहिलेली नावे पाहून जनजागृतीची किंवा ट्रस्ट कडून अशा गोष्टींवर बंधन आणण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी मनीषा निर्माण झाली!

आमचा परतीचा प्रवास साधारण ३.३० वाजता सुरु केला. मध्यमार्गावर असलेल्या धबधब्यात भिजण्याचा आनंद ट्रेक सहभागींनी घेतला.


सुरस भोजनाचा आस्वाद घेऊन संध्याकाळी ७ वाजता निघून पुण्यात ११.३० ला पोहोचलो.
     
परतताना एका ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठिकाणाला भेट देण्याचे समाधान होते आणि गणेशोत्सवात साकार रूपातील दर्शन घडलेल्या ह्या “गणेश लेण्यां” मुळे मन तृप्त होते!

ट्रेकच्या निमित्ताने दर्शन झालेल्या ह्या अनुभूतीचा शेवट श्री. गणेशाच्या एका श्लोकाने करते,

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे|
माथा शेंदूर झरे वरी बरे, दुर्वांकुराचे तुरे|
माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे|
गोसावसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला स्मरे||

गणपती बाप्पा मोरया||

मित्रहो, डोंगराच्या कुशीत वसलेल्या आणि खडकात खोदलेल्या लेण्यासहित ह्या शांततामय रम्य ठिकाणाला एकदा तरी अवश्य भेट द्या!


फोटो आभार: ट्रेक टीम
ट्रस्ट बद्दल थोडेसे: साधारण दोन-तीन वर्षापूर्वी हे ट्रस्ट स्थापन झालं. “गणपती गडद” ट्रेक मार्गावर काही सुधारणा त्यांच्याकडून करण्यात येत आहेत, जसे, रस्ता बांधणी, प्रशिक्षित गाईड नेमणूक, आपत्कालीन व्यवस्थेत सोय, भेट देणाऱ्यांची नोंद, गाईड सक्तीचा, दर महिन्याच्या चतुर्थीला गणेशापूढे दिवाबत्ती आणि लेण्याची स्वच्छता, ट्रेकर्स, पर्यटक, भाविकांची राहणे-खाण्याची व्यवस्था, वाहनाची व्यवस्था, मोठ्या झऱ्यांचा पाण्याचा जोर दगड टाकून आणि त्याला लोखंडी तारेने आवळून ताब्यात आणला आहे जेणे करून झरे पार करणे सोपे जावे आणि अनहोनी होण्यास अटकाव व्हावा, ट्रेक मार्गावर ट्रेकर्सच्या विसाव्यासाठी गार्डन बांधण्याचा ट्रस्टचा विचार आहे आणि त्यासाठी मुरूम येऊन पडला आहे आणि पावसाळा संपला की त्याचे काम सुरु होईल, रस्त्यालगत वृक्षारोपणाचेही काम सुरु आहे, वरच्या पठारावर पाण्याची टाकी बांधून झऱ्याचे पाणी पाईप लाईनने टाकीत साठवले जाणार आहे जेणे करून “गणेश दर्शनाला” येणाऱ्या लोकांची पाण्याची गरज भागली जावी, ट्रस्ट गुहेची स्वच्छता राखण्यासाठीही प्रयत्नशील आहे, ह्या “गणेश लेण्या” ट्रेकर्स आणि भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे, आलेल्या ट्रेकर्स, भाविकांसाठी सुरस अन्नाची व्यवस्थादेखील हे ट्रस्ट करत आहे! लेण्यांचे आणि जैवविविधतेने नटलेल्या जंगलाचे जतन करण्यासाठी हे ट्रस्ट सतत कार्यरत आहे!