नाणे घाट-भोरांडयाचं दार ट्रेक, १७ सप्टेंबर २०१७

नाणेघाट, श्री. आनंद पाळंदे सरांनी लिहिलेल्या, “डोंगरयात्रा" या पुस्तकात नाणेघाट परिसराचा खालील नकाशा दिलेला आहे,



सातवाहन काळातील प्रतिष्ठान अर्थात पैठण ते कल्याण व्यापारी घाटमार्ग! ह्या मार्गावर व्यापाराची ने-आण करण्यासाठी नाण्यांच्या स्वरुपात जकात घेतली जात असे म्हणून ह्याला नाव पडले आहे “नाणे घाट”!

पूर्वीच्या काळी व्यापाराचे मार्ग कोणते होते, कसे होते, दोन देशामधील व्यापारी संबंध बळकट करणारा मार्ग कसा दिसतो हे सर्व डोळ्यांनी पहाण्याची शिगेला पोहोचलेली उत्सुकता हा ट्रेक करण्यामागचे एक कारण होते.

१६ तारखेला रात्री १२ वाजता आम्ही अकरा जण पुण्यातून निघालो आणि नारायणगाव-माळशेज घाटमार्गाने पहाटे ४ वाजता ट्रेकच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. १५ मिनिटात तयार झालो, टॉर्च बाहेर निघाल्या, एकमेकांची ओळख करून घेतली आणि ट्रेकला सुरुवात केली.

काही पावलांवरचं “नाणेघाट गुंफा मार्ग” नाव लिहिलेल्या वन खात्याच्या कमानीने आम्हाला दर्शन दिले. 



मळलेल्या पायवाट अंधारात घनदाट झाडीमुळे भयान वाटली. पाण्याचे ३-४ झरे ओलांडले, इवलुश्या बेडकाच्या तळपायावर झालेल्या उडीने शहारले, एका हातात ट्रेकिंग स्टीक आणि दुसऱ्या हातात टॉर्च पकडून तोल अंधारात सांभाळत चालण्याची कसरत केली आणि ट्रेक सुरु ठेवला.

नाणेघाट ह्या मार्गे समुद्रसपाटीपासून साधारण २१०० फुट उंचावर आहे. कमानीतून आत गेल्यावर १५-२० मिनिट सपाटीचा असणारा रस्ता नंतर चढाईचा होत गेला. पावसाने माती भुसभुशीत झाली होती आणि झाडाची मुळे पायवाटेवर आडवी पसरली होती. पायवाटेला पुढे कुठे फाटा तर फुटतं नाही ना ह्याचा शोध घेत ट्रेक सुरु होता.

पहाटे साधारण ५ वाजता, “नानाचा अंगठा” ह्या नाणेघाटावरील अंगठ्याच्या आकाराच्या सर्वोच्च (साधारण ३००० फुट) पर्वताच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो.


पहाटेची चाहूल लागत असली तरी अंधार असल्याने ह्या पर्वताचे दर्शन घेण्यासाठी उजाडण्याची वाट पाहयची आम्ही ठरवले. तोपर्यंत झालेल्या खाऊगप्पा आणि हळूहळू उजाडत असताना ह्या पर्वताचे आणि पठार आणि पर्वत यांच्यामधील घळईचे दिसणारे विलोभनीय दर्शन ट्रेकमधील पहिला विलक्षण क्षण होता!



“नानाचा अंगठा” हे नाव कसे पडले असावे हा विचार करत असताना असे वाटले की "नाना" नावाच्या व्यक्तीला आपलेसे करून घेतले असले आणि अंगठ्याचा आकार असलेल्या पिनॅकलचा संबंध जोडला असला तरी अधिक विचार करता असे वाटले कदाचित ते “नाण्याचा अंगठा (ठसा)” असे असावे. हा व्यापारी मार्ग होता आणि जकात कर घेतली जायची, असे असेल तर “नाणे” दिलेल्याची पोचपावती म्हणून त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेत असतील का? त्यात भर म्हणून तो पिनॅकल अंगठ्याच्या आकाराचा दिसतोय म्हणून एकत्र संबंध जोडून त्याचे नाव “नाण्याचा अंगठा” असे पडले? आणि त्याचा अपभ्रंश होता होता ते “नाण्याऐवजी” “नाना” असे होत गेले. तार्कीकदृष्ट्या दृष्ट्या अधिक विचार केल्यावर हे ही लक्षात आले की इथे ब्राम्ही लिपीत काही लिहिलेले आहे तर “नाण्याचा किंवा हाताच्या अंगठ्याचा ठसा देणे/घेणे" संयुक्तिक होईल का? थोडक्यात काय तर "आज "नानाचा अंगठा"ह्या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या ह्या घाटमार्गाच्या नावामागील इतिहासाचा शोध जरा चालूच ठेवावा असं वाटतयं.......असो.    

इथून पुढचा ट्रेकमार्ग तासभर दगडी पायऱ्या चढत जाण्याचा! ते चढत जाताना दमछाक होत असली तर अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचल्याने आम्ही हा मार्ग आरामात चढलो!

काही पायऱ्या चढून गेल्यावर एक पाण्याचे कुंड दिसले. 



कुंडच्या वरील दगडी कपारीवर ब्राम्ही लिपीत काही लिहिले आहे जे आज अस्पष्ट झाले आहे!


काही पायऱ्या अजून चढून गेल्यावर आम्ही गुंफे जवळ पोहोचलो. 




एका मोठ्या गुंफेमध्ये ब्राम्ही लिपी मध्ये गुंफेच्या तीन भिंतीवर काही लिहिले आहे.



ती लिपी बघत असताना पहिला तर विचार हाच आला की इसवी सन २५० पूर्व काळातील ह्या गुंफा आणि त्याच काळी जर  हे लिहिले असेल तर इतक्या साऱ्या वर्षात ब्राम्ही लिपीत नक्की काय लिहिले आहे त्याचा शोध लावून त्याचा अर्थ देवनागरी लिपीत त्याठिकाणी का लिहिलेला नाही? हे प्रयत्न व्हायला हवे होते का? हे कोणी घ्यायला हवे होते?

श्री. आनंद पाळंदे सरांनी लिहिलेल्या, “सहलीतून उमजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा” ह्या पुस्तकात ह्या ब्राम्ही लिपीतील लिखाणाबद्दल पुढील उल्लेख आहे,



ही संशोधन परिपूर्ण माहिती आहे असे आपण समजून चाललो तर तीच माहिती लिहिलेला एक फलक इथे असायला हवा होता का? असा एक विचार मनात येऊन गेला. थोडा अधिक विचार करूयात का ह्यागोष्टीवर?

"चला ट्रेकिंगला".  पांडुरंग पाटणकर सर लिखित हे पुस्तक हाती आले. 


ह्या पुस्तकात ह्या गुंफा बद्दल खालील उल्लेख आहे,



प्र. के घाणेकर सर यांच्या "लेणी महाराष्ट्राची" ता पुस्तकात खालील उल्लेख आढळला, 




व्याप्याऱ्यांच्या विश्रांतीसाठी गुंफा आणि पाण्याच्या सोयीसाठी बाहेरील कुंड असावेत!




इथे गुंफे बाहेर हनुमानाचे दगडात कोरलेले शिल्प आहे. हे शिल्प किती जुने आहे ह्याचा  लिखित उल्लेख इथे नाही.




हनुमानाचे दर्शन घेऊन पुढचा ट्रेक सुरु केला. हा रस्ता दगडांनी खचाखचं भरलेला. वर बघितलं तर समोर “व्ही” आकारासारखी घळई दिसते. त्याघळईतून सूर्य प्रकाश दगडीवाटेवर पडून वाट सोनेरी दिसत होती! काही दगडांचा वरील पृष्ठभाग एकदम गुळगुळीत तर काही एकदम खडबडीत! सुदैवाने ह्या दगडांवर शेवाळं नव्हतं त्यामुळे चढताना इतकी खबरदारी घ्यावी लागली नाही.




ही दगडी पायवाट पार करून गेल्यानंतर समोर सपाट माळरान दिसले. घळईच्या तोंडाला डावीकडे जकातीचा रांजण ठेवला आहे. व्यापाऱ्याकडून घेतलेली जकात ह्या रांजणात गोळा केली जात असे. ह्या दगडी मोठ्या रांजणावर सुबक नक्षी आहे. 

ह्याच बाजूला मागे निवासी इमारती असाव्यात ज्यांचे काही अवशेष तिथे आहेत. इथूनचं धुक्याने वेढलेला नवरा-नवरीचा डोंगर दिसतं होता. धुके थोडे विरळ झाले आणि हरीश्चंद्रगडाने देखील दर्शन दिले.

घळईच्या उजवीकडे गणपतीचे छोटेसे मंदिर दिसले. शेंदूर लेपित गणेशाची मूर्ती आहे. ह्या श्री. गणेशाचे दर्शन घेतले.

पुणे/जुन्नरच्या बाजूने चढल्यावर आधी हनुमानाची दगडात कोरलेले शिल्प आहे आणि कल्याणच्या बाजूने आल्यावर आधी गणपतीचे मंदिर लागते. ह्यामागे काही विचार होता का? आज जिथे जकातीचा रांजण आहे त्याच्या बरोबर समोर गणपतीचे मंदिर आहे ह्याही मागे काही विचार असावा का? हा विचारही मनात येऊन गेला. असो.

मंदिराच्या जवळून काही पायऱ्या चढून एका पठारावर आलो. सोनकीच्या फुलांनी हे पठार फुललेले होते. 



एका बाजूला जीवधन, वानरलिंगी आणि मानवलिंगी सुळका, ढाकोबा, आहुपे घाट आणि गोरखगड आणि मच्छिंद्रगड दिसत होते. ह्या डोंगराच्या मधील दरी, त्यावर झाकाळलेले पांढरेशुभ्र ढग, सोनकीच्या फुलांचे ताटव्यांचे पठार, दरीचा नजरा, सकाळचे कोवळे ऊन आणि हलकीशी थंडगार हवा...हे निसर्गरम्य दृष्य फक्त अनुभवण्यासाठीचं!




इथून पुढचा प्रवास होता तो अंगठ्याच्या नखावर विराजमान होण्याचा! थोडासा चढ चढून गेलो आणि दिसणाऱ्या नजाऱ्याने मोहित केलं! निसर्गातील आणि आपल्या मनातील शांतता, स्तब्धता आणि प्रसन्नता अनुभवावी ती इथेच असे वाटले!

अंगठ्याच्या नखावर विराजमान होऊन सुरेश सरांनी आणलेली ज्वारीची भाकरी, ठेचा आणि शेंगदाण्याची कुरकुरीत चटणी ही स्वादिष्ट शिदोरी हा ट्रेक मधला दुसरा विलक्षण क्षण!




इथून पुढे जेवणासाठी सुभाषचं घर गाठलं! त्यांचे पोहे हे एकदम झकास असं ऐकून होते आणि खाल्ल्यावर त्याची प्रचीती आली!

इथून पुढचा ट्रेक हा सुप्रसिद्ध “भोरांडयाचे दार” उतरण्याचा होता. भोरांडे हे मूरबाड तालुका, जि. ठाणे येथील एक गाव! ह्याला जवळचे शहर (साधारण ७०-८० किमी) आहे कल्याण! “भोरांडयाचे दार” उतरून कल्याण बंदर गाठण्याचा हा व्यापारी घाटमार्ग!

“भोरांडयाचे दार” २१०० फुटाची उतराई आहे! नावात “दार” असा उल्लेख असला तरी दाराची प्रतिकृती इथे नाही तर एक एका घळईचे तोंड/मुख/प्रवेशद्वार ह्या अर्थाने हे “दार” आहे!



दोन्ही बाजूला उंचच्या उंच खडे कातळखडक आणि मधून जाणारी दगडांनी भरलेली पायवाट! २१०० फुटांच्या उतराईमधे ९५% उतराई ह्या दगडांनी भरलेली आहे! अगदी छोट्या दगडांपासून ते भल्या मोठ्या दगडांपर्यंत विविध आकाराचे, वजनाचे, गुळगुळीत, खडबडीत, खाच आणि शेवाळ सहित आणि विरहीत, निसरडे-घसरडे असे हे दगड! बापरे हे उतरणे कर्मकठीण काम झालं मला! स्टीकचा आधार घ्यावा तरी पंचायत आणि नाही घ्यावा तरी पंचायत! तोल जाऊ नये, पुढे तोंडावर पडू नये, घसरू नये, पाय वेडावाकडा पडू नये ही सगळी खबरदारी घेता घेता नाकीनऊ आले. चित्त एकाग्र करून उतरताना घामाघूम झाले! 

“कसा असा हा रस्ता?” हा प्रश्न मनात रुंजी घालत होता. हे दगड आले कुठून, हा रस्ता तयार कसा झाला, ह्याला पर्यायी मार्ग नाही का? असे कितीतरी प्रश्न मनात येऊन गेले. गावकरी म्हणे, “एका तासात उतरलं तुम्ही” आणि आम्हाला उतरायला लागले साधारण तीन तास! असो. सर्व सुखरूप उतरले हे महत्वाचं!

चहा आणि जेवणाचा विसावा घेऊन रात्री ११ वाजता पुण्यात दाखल झालो!

गाडीत हा ट्रेकमार्ग बघण्याच्या उत्सुकतेचा विचार करत होते. पूर्वीच्या लोकांनी किती खस्ता खाऊन, मजल-दरमजल करत व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते ह्याचा अंदाज आला! अर्थात त्यावेळी दळणवळणाचे मार्ग असायचे ते असेचं.....तरिही......असो.

काही प्रश्न उत्तराच्या प्रतिक्षेत असले तरी पुन्हा एकदा एका ऐतिहासिकदृष्या महत्वपूर्ण स्थळाला भेट देण्याचे समाधान मिळाले!

मित्रांनो, मला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर किंवा उत्तराचा मार्ग तुमच्याकडे असेल तर नक्की सांगा! एक ट्रेक परिपूर्ण झाल्याचे समाधान तेव्हाचं मला मिळेल!      

भेटूयात लवकरचं!
स्वच्छंद गिर्यारोहक: उभे-डावीकडून: स्वप्नील, खोत, रुपेश गौल, दिलीप गाडे, मी, मुग्धा कोल्हटकर, सागर मोहिते, उदय मोहिते, भाग्येश मोहिते, सुरेश भाग्यवंत
बसलेले-डावीकडून:  विशाल काकडे, योगेश सावंत

No comments: