भोमाळे:
खेड तालुक्यातील साधारण तीस उंबऱ्यांच हे गाव! इथपर्यंत पोहोचण्यासाठी खेड अर्थात राजगुरुनगर गावातून चास, कमान, वाडा, डेहणे मार्गक्रमण करत भोमाळे गावात येतो. चासकमान धरणाच्या जवळजवळ २५ किमी लांब जलाशयाच्या साथीचा हा मार्ग अत्यंत नयनरम्य आणि रमणीय! सुंदर नजारा पाहत छानपैकी पायपीट करावी, नजारा डोळ्यात साठवावा, मन तृप्त कराव, स्वच्छ, प्रदूषणरहित हवेने फुफुसे फुगून घावी असा हा मार्ग! त्यात भर म्हणून वातावरण जर किंचित ढगाळ, धुंद असेल तर मुक्कामापेक्षा प्रवासच संस्मरणीय!
धावत्या गाडीच्या खिडकीतून काही नजारे कॅमेऱ्यात टिपत भोमाळे आलं! भोमाळे गावाचं लोकेशन, खेड तालुक्याच्या नकाशावर आधी पाहून घेतलं.
भोमाळे गावात गाडी थांबली ते प्राथमिक शाळेच्या पटांगणाजवळच!
शाळा:
इयत्ता चौथीपर्यंत! खार्पुड ला इयत्ता चौथीच्या पुढील इयत्ता!
इमारतीच्या भिंती सुशोभित केलेली शाळा पहिली आणि माझी शाळा मला आठवली!
शाळा पाहत पाहत गावाचा एक फेरफटका मारला.
घरे:
घराचं सौदर्य म्हणजे घरात राहणाऱ्या व्यक्ती!
व्यक्ती :
फेरफटका मारताना एक आजी समोर आल्या. "फोटो काढू का?" विचारलं तर साडी -पदर ठीक करत म्हणे " काढा की"!
एक बाबा भेटले.
गावातील लहान-थोर व्यक्तींशी संवाद साधला की त्यांच्यात सामावले गेल्याची भावना सुख देते, हो ना....
लोकजीवन, त्यांचा पेहराव, भाषा, राहणीमान., आपुलकी दर्शवणारी देहबोली....त्रिवार नमन!
व्यवसाय:
मुख्यत: भातशेती
भोमाळे देवराई:
वनराई च्या रक्षणार्थ देवांचा निवास ! मंदिरासमोर वीरगळ देखील पहायला मिळाल्या. पक्षांचा मुक्त संचार, किलबिलाट , फुलपाखराचे बागडणे.. काय सुंदर नजारा ..
ह्या देवराईपासून भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातून मार्गक्रमण करत भोरगिरीपर्यंतचा जंगल ट्रेक हा गाभा!
भोमाळे तर भोरगिरी : भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य ट्रेक:
ट्रेकच्या आधी सहजच गुगुल वर बातम्या वाचल्या. भोमाळे घाटात दरड कोसळली, पौष्टिक रानभाज्या उत्सव आणि नुकताच ह्या परिसरात रानगवा दिसला. असो.
जंगलातून मार्गक्रमण सुरु झालं. मुख्यत: कारवी ने फोफावलेलं हे जंगल. अक्षरशः वाकून जाव लागत होत कारण फांद्या आडव्या-तिडव्या विखुरलेल्या. खाली पावसाने भिजलेला पाळापाचोळा! जंगल मग पठार, जंगल मग पठार अशी काहीशी रचना! हवामान कधी ढगाळ तर कधी उन्हाची तिरीप! सूर्याचे किरण जंगलात पसरले तर सुंदर ऊन-सावलीचे पोस्टर!
जंगल संपत्ती:
विविध फुले, फळे, कीटक, पाण्याचे झरे, वृक्ष, विविध आकाराची पाने, औषधी वनस्पती..हीच तर जंगल संपत्ती! जंगलात गांडूळ खाण्यासाठी रानडुकरांनी कित्येक ठिकाणी माती उकरलेली पाहायला मिळाली. सांबराचे पायाचे ठसे पाहायला मिळाले.
मुसळी |
शतावरीची वेल |
हो, तीच ही वेल, ज्यापासून शतावरी कल्प बनवतात. अत्यंत औषधी!
जंगला संपत्ती पाहत जात असताना काही किडे खूप घोंघावत होते. अगदी चावत सुद्धा होते. जंगलातून जाताना काय काळजी घ्यायची हा धडा ह्या अनुभवातून मिळाला. फुलं स्लीव्हज चे कपडे, टोपी..किडे कानाभोवती घोंघावत होते म्हणून स्कार्फ पण कानाभोवती गुंडाळला.
जंगलातून जाताना पायवाटेच्या आसपासचाच भाग निरीक्षणाखाली येतो म्हणूनच जंगल मार्गक्रमण कदाचित प्रत्येक ऋतूमध्ये करायला हवे. तेव्हा इथली जैवविविधता अधिक ठळकपणे अनुभवता येईल.
हा जंगल मार्गक्रमण सुकर झाला तो आमच्या स्थानिक चंदू भोमाळे गाईड मुळे! गावात आरोग्य केंद्र आहे. आशा वर्कर आहे. वाडा हे जवळचे मोठे गाव. जिथे भाजीपाला बाजार, धान्य इ. साठी जाव लागतं आमच्या गाईड चा मुलगा पुण्यात बी. फार्मसी करतोय. आहे ना कौतुकाची गोष्ट!
जंगलातील तीन तासाचे मार्गक्रमण भन्नाटच!
ट्रेक ची सांगता:
ते संपवून आली येळवली. येथे श्री सुभाष डोळस यांच्याकडचे सुग्रास भोजन.
फोटो आभार: सर्व ट्रेक टीम
विशेष आभार: राजकुमार डोंगरे, प्रशांत शिंदे, पल्लवी वडस्कर-शिंदे, रोहिणी कित्तुरे (माची ग्रुप)