दूर गगन की छाँँव में: ढाकोबा गिरीशिखर ट्रेक, २२ सप्टेंबर 2019

काल रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी ढाकोबा ट्रेक केला. त्याचा थकवा अजूनही आहे. ब्लॉग लिहायला घेतला आणि पहिला भाव मनात दाटून आला तो हा की  "किती लांबलचक ट्रेक होता. ढाकोबा गिरीशिखर गाठायला जवळजवळ चार तास लागले. ढाकोबा शिखर दिसले ते जवळ जवळ तीन तास चालल्यावर.! बापरे. का कुणास ठाऊक पण कळसुबाई शिखरापेक्षाही विस्तृत वाटला हा ट्रेक /ट्रेल! शिखराची उंची आहे साधारण ४१०० फुट.ते पार करताना दमछाक झाली.डोळ्यासमोर येतय ते दोन छोटे पाण्याचे झरे, जंगलातून जाणारा मार्ग, तीन झोपड्या, दगडमाळ, ढाकोबा देव मंदिर आणि ढाकोबा शिखर! पण सविता तुला मानायला हवं की अजून तुझा स्टॅॅमीना शाबूत आहे. हा थोडी थकलीस कारण रोजचा व्यायाम नाही आणि पहिल्यासारखे आता दर आठवड्याला ट्रेक ही करत नाहीस".  असो.

ट्रेक सुरु झाला तो जुन्नर मार्गे भिवडी बू|| गावातून. सकाळी १०.३० ची वेळ. काळे मेघ आणि सोनेरी ऊन यांची' अफलातून निसर्गकिमया.



भिवडे धरणाच्या काठाकाठाने, शेताच्या बांधावरून आम्ही चालत होतो. धरणाचा नितळ, स्तब्ध आणि शांत जलाशय साथ करत होता. बांधावरची शेत पिके वाऱ्याच्या झुळुकीसरशी डोलत होती.  वाऱ्याची थंडगार झुळूक  अंगाला स्पर्शून गेली की एकदम स्फुर्तील वाटत होत.



झेंडूची लागवड, गुरांचा चारा, नाचणीची शेती, मधूनच डोलणारी फुले.....




धरण काठी कपडे धुवायला आणि भांडी घासायला जाणाऱ्या स्त्रिया आणि सोबत छोटी मुले....

"देवाला चालला का?" असं कौतुकाने विचारणारे स्त्री-पुरुष ग्रामस्थ. आमचं उत्तर "हो. वर शिखरावर पण जाणार आहोत"!

बांधावर आडवलेल्या थंडगार पाण्यातून जाताना माझ्या जीवाने काढलेले शब्दोदगार "अहाहा, काय छान वाटतयं....."! नुकत्याच केलेल्या शुक्रवारच्या जंगल वॉक मुळे अग्नीसम ठणकत असणाऱ्या माझ्या तळपायांना थंडगार  पाण्याची फुंकर जणू मिळाली!



अशातच झाडाला रबरी पाईपला लगडून कोब्रा विसावलेला. एकदम सुस्तावस्थेत!



रेड व्हेन्तेड बुलबुल, कधी लाईटच्या तारेवर तर कधी निळ्या आसमंतात भरारी घेताना....

हिरव्या-पोपटी गवत मखमली वर उडणारी असंख्य फुलपाखरे....

काही प्रकारचे मशरूम्स.....



बहरलेल्या फुलांचा आनंद घेत जंगलातून मार्गक्रमण करताना  विविधरंगी फुलांची ही जादुई दुनिया होती किती आल्हाददायक ! हळुंद, करटूले, सोनकी, छोटा-मोठा कावळा, गुलाबदाणी, चीरायत, कानपेट, काप्रू, रानतेरडा, पोपटी, कुर्डू, लाल मंजिरी, तुतारी, .....किती म्हणून फुलांची नावे घ्यावी

हलूंद


सोनकी


पोपटी



पंद


गुलाबदाणी

करटूलं पाहिलं.

करटूलं

भोपळ्याच्या वेलाला फुल येत अगदी तसच दिसायला. फक्त आकार लहान. राजकुमार ने सांगितल ते करटूलं आहे. त्याची भाजी करतात. ते सोनेरी रंगाच छोटसं फुल आणि त्याच नाव उच्चारून  एक गाणं आठवल ,

अडगुलं मडगुलं
सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा
तीट लावा

दुसरा छोटा झरा लागला. दगडा दगडा वर पाय ठेवत पार करण्यास किचिंत अवघड. सरळ पाण्यातून गेले. आता जंगलाचा भाग सुरु झाला. थोडी तीव्र चढाई. काही अंतरावर दोन झोपड्या दिसल्या. काही अंतर पार केल्यावर पुन्हा एक झोपडी. गुरांना चारा -पाण्यासाठी हे लोकं शेतात येऊन राहिलेले. एक बाबा झोपडीतून बाहेर आले. "देवाला चालले का? जा असंच सरळ वर" अस. सांगितलं.

आता एक पठार/माळरान लागल. पठारावर सोनकी, लाल मंजिरी, तुतारी इ. फुले दिसली.

तुतारी

तुतारी ओल्या माळरानावर हे फुलं फुलतं. गवताजवळ वाढतं. आपली मुळं गवताच्या मुळात खोचून गरजेपुरती अन्नद्रव्य शोषून घेत. राजकुमार ने सांगितलेली माहिती ऐकली पण तुतारी नाव एकूण माझ्या मनात एक कविता चमकून गेली. कवी केशवसुतांची कविता...

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी  ||


सकाळी जाताना ही फुले जमिनीकडे झुकलेली . सायंकाळी परतीच्या वेळी आकाशाकडे पाहत छान फुलेलेली!

निसर्गाची गंमत वाटली. एका हाकेच्या अंतरावर जिथे सुंदर, नाजूक, मनप्रसन्न करणारी फुले फुलतात, तिथेच हाकेच्या अंतरावर कोब्रा सारखा घातक, विषारी साप ही वास करताना दिसतो, तिथेच काही हाकेच्या अंतरावर लालबुड्या बुलबुल सारखा मधुर आवाजात गाणं गाणारा पक्षी देखील पाह्यला मिळतो. किती विभिन्न निसर्गयात्री इथे एकत्र प्रवास करतात.

या माळरानावर लाल मंजिरी सगळीकडे फुलली होती. जांभळी मंजिरी अजून शरमलेली!

लाल मंजिरी


माळरानावर समोर दिसत होता ढाकोबा



तर पलीकडे ढाकोबा देव मंदिर!



एक समाधान की दोन-अडीच तासांच्या चढाई नंतर ढाकोबाचं दर्शन झालं. शिखरावर जाण्यासाठी निघालो.
काही अंतरावर आला तो दगडाचा माळ! फुलांचा माळ ऐकल होतं पण दगडाचा माळ? ढाकोबा ट्रेकच हे एक वैशिष्टय!

राजकुमार म्हणे, "पाहून बसा. ह्या दगडामध्ये फटीत साप विसावून असतात".



दगडीमाळ ला वळसा घालत पुढे निघालो. ढाकोबाचे शिखर धुक्यात लपेटलेले. धुक्याच्या विहरण्याने कधी शिखर दिसेनासं व्हायचं तर कधी लख्ख दिसायचं!



ह्या माळरानावरील नजारा इतका प्यारा की तासनतास तिथेच बसावं. धुक्याची तरलता आणि सोनकीच्या फुलांची रेलचेल....



आता शिखर जवळ येऊ लागल...



किचिंत चढाई चढून गेल्यावर शिखराचा पायथा आला. शिखर विहरणाऱ्या ढगांमध्ये लपेटले. कधी शिखर स्पष्ट दिसत होते तर कधी धुक्यात गुडूप झालेले....



पठारावर सर्वत्र सोनकी फुललेली ...धुके दाटून आलेले....



या सुंदर धुंद वातावरणात फक्त आम्हीच! बेधुंद! वेडावलेले! निसर्गाच्या सौंदर्याने पुलकित झालेले......

धुक्याच्या चादरीने  कोकण, दारया घाट आणि दुर्ग दर्शनाने  सुखावलो नाही इतकचं काय ते!

सोबतीला चविष्ट मेथी पराठा, लोणचं आणि चटणी!



हा आस्वाद घ्यायला ३.३० वाजले!

ढाकोबा, गड/किल्ला प्रकारात येत नाही असं तज्ञांच म्हणण. कारण त्याला त्या प्रकारात बसणारे अवशेष नाहीत.
टेहळणी शिखर असावे. कारण कोकणात उतरणारे घाटवाट व्यापारी  मार्ग इथून नजरेच्या टप्प्यात!!

ढाकोबा शिखर! एकमार्गी जवळजवळ तीन ते चार तासांचा ट्रेक आहे (निसर्गातील पाना-फुलांचा मनमुराद आनंद घेत. नुसती तंगडतोड नाही ). पुढे साधारण दोन तासावर दुर्ग! दुर्ग -ढाकोबा ही जोडगोळी! आसमंतात एकमेकांच्या साथीला  सावलीसारखी उभी, दुर्ग-ढाकोबा जोडी!.

ढाकोबा शिखराचा निरोप घेऊन मंदिराच्या दिशेने निघालो. प्रशांतची बाईक रस्त्यावर घसरून नुकताच अपघात झालेला. गुडघे आणि हाताला मार लागलेला. अशा शारीरिक अवस्थेतही हा मुलगा ट्रेक ला आलेला.  त्या दुखापतीत ट्रेक करताना  पाहून मी त्याला हात जोडले.



ढाकोबा मंदिर आले. नंदी आणि शेंदूर चर्चित देव! नमस्कार करून परतीच्या वाटेला निघालो.




झोपडीजवळ यायला संध्याकाळचे साडेपाच वाजलेले. झोपडीतून बाबा बाहेर आले. म्हणे," लईच वेळ लागला. सकाळचान गेलेले सांज झाली". आमच उत्तर, "देवाला जाऊन वर शिखरावर पण जाऊन आलो".

बाबांचा निरोप घेऊन निघालो. मी तर आता जाम थकले होते. यावेळी कंबर दुखू लागली. पण उतरण्यासाठी कंबर खचावीच लागली.

झोपड्या गेल्या, एक झरा लागला, भिवडी धरण आले, झेंडूची फुलबाग आली, दुसरा झरा लागला, गाव जवळ आले...

गावात पोहोचता पोहोचता दिवाबत्तीची वेळ ही सरून गेली....

भिवडी गावाला निरोप दिला संध्याकाळी सात वाजता!



थकलेल्या शरीर गाडीत  पहुडले...

नारायणगावात प्रसिद्ध मसाला दुध पिऊन गाडीची चाके पुण्याकडे धावली...


ट्रेकचा मॅॅप पहिला तेव्हा मी हादरले...



१५.३ किमी अंतर, ८.१० तास आणि १२४२ मी. उंची😖 आहे न कमाल......असो.

सकाळी पाच वाजता निद्रेतून उठलेल्या घरात , रात्री अकरा वाजता निद्रिस्थ होण्यासाठी शरीर आसुसले!


फोटो आभार: ट्रेक टीम
खास आभार: माची इको ऍड रुरल टुरिझम, पुणे (राजकुमार आणि प्रशांत) आणि ट्रेक सहभागी



कुज़न्थई वेलप्पार मंदिर, पोंबराय, तमिळनाडू, डिसेंबर २०१८


डिसेंबर २०१८ मधे कोडाईकॅॅनल मधे असताना एका व्यक्तीकडून पोंबराय गावात असणाऱ्या ३००० वर्षाचा इतिहास असणाऱ्या  मंदिराबाबत समजल. इतकं वर्ष जुनं मंदिर! महाराष्ट्रातील काही जुनी मंदिर माहित होती पण तमिळनाडू राज्यातील एक जुनं मंदिर! कसं असेल मंदिर स्थापत्य, शिल्पकला, मूर्तीकला, काय असेल मंदिराचा प्राचीन इतिहास...उत्सुकतेपोटी मंदिर बघण्यास गेलो. तिथे असताना मंदिराची माहिती हिंदीतून मिळाली नाही. गुगल वर इंग्लिश/तमिळ भाषेत माहिती उपलब्ध आहे. ती वाचताना तमिळ भाषेचा, संस्कृतीचा मागोवा घेणे, तो माहित असणे गरजेचे आहे हे लक्षात आले. 

हिंदी गुगल मधे अनुवादित माहिती वाचायला मिळते. ह्या माहितीच्या आधारावर हा ब्लॉग लिहायचा ठरवला. याला मुख्य कारण गुगल वर मंदिराचे बाह्यभागाचे फोटो आहेत. परंतु मंदिराची खासियत शिल्पकला, कोरीवकाम आहे त्याचे फोटो इथे उपलब्ध नाहीत. माझ्याकडे जे फोटो आहेत ते ब्लॉग निमित्ताने पुढे यावेत म्हणून हा खटाटोप!

३००० वर्षापूर्वीचे मंदिर, त्यावरील कोरीवकाम अजूनही अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे ही खरच अचंबित करणारी गोष्ट! इतक्या सुंदर मंदिराला, तेथील कोरीव कलाकुसरीच्या कामाला आणि तिथल्या संस्कृतीला मानाचा मुजरा करत हा ब्लॉग समर्पित!

पोंबराय तमिळनाडू राज्यातील दिंडीगुल जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे. कोडाईकॅॅनल पासून साधारण १८ किमी अंतरावर. पोंबराय एकदम शांत. डोंगराच्या कुशीत पहुडलेले. फारसे कोणी पर्यटक , (त्यातून अन्य राज्यातील) इथे जात नसावेत. मंदिर परिसर एकदम शांत आणि प्रसन्न. बिलकुलच हलकल्लोळ नाही. 

मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर समोरच मंदिर समूह दिसतो.


मंदिराच्या कळसावर मूर्ती कोरलेल्या. त्यांना डोळ्यांना भडक वाटणार नाही असे रंग दिलेले. लांबून तर हे रंग लक्ष वेधून ही घेत नाहीत. जवळ गेल्यावर रंग लक्षात येतात. डोळ्यांना शांत भाव देणारी रंगसंगती. 










महाराष्ट्रातील काही प्राचीन पाषाणातील मंदिरे आता रंगवली आहेत. ते रंग खूप भडक वाटतात. डोळ्यात भरतात. दोन संस्कृती मधील कदाचित हा एक मोठा फरक असेल. असो. 

गुगलवरील उपलब्ध माहिती नुसार आणि मंदिरावर जो तमिळ भाषेतील शिलालेख आहे त्यावरून एकेकाळी तमिळनाडू राज्यावर राज्य करणाऱ्या  चेरा वंशाच्या राजद्वारा हे मंदिर बांधले.



Poombarai Murugan Temple ला  कुज़न्थई वेलप्पार मंदिर(  Kuzhanthai Velappar Temple) असे म्हणतात. Murugan अर्थात भगवान कार्तिकेय! तमिळ भाषेत भगवान कार्तिकेयन!  Kuzanthal  म्हणजे "अर्भक (Infant)  आणि Velappar म्हणजे " शस्त्राधारी" (Holding a Weapon). थोडक्यात अर्थ आहे पारंपारिक शस्त्र हातात धरलेला बाल कार्तिकेय! कार्तिकेयन चे पारंपारिक शस्त्र आहे "भाला"! इथल्या कार्तिकेयाच्या  मूर्ती विषयी वाचण्यात आले ते पुढील प्रमाणे,

It is 3000 years old and was consecrated by his holiness Bhogar. Bhogar built both Palani Murugan statue as well as the statue here in Poomparai. Whereas Palani Murugan status is made up of Navabhaasaanam (nine herbs/elements), the statue here is made up of Dashabhaasaanam (ten herbs/elements).




कार्तिकेय चे वाहन मोर आहे. मंदिरासमोर मोराची प्रतिमा देखील आहे. 



मंदिरावर सुरेख पाषाणात कोरलेल्या मूर्ती आहेत. शिल्पकला आहे. 
मंदिर पाहताना शांत, प्रसन्न, दैवी भाव अनुभवास येतो. 

कार्तिकेय:



गणपती:



दत्तात्रेय:


नंदिशिल्प:

नवग्रह:




 नागदेवता:


ध्वज आणि बालापीठ



शिल्पकला:




































खूप साऱ्या शिल्पांची ओळख करून घेणे क्रमप्राप्त असले तरी एक अनोखी संस्कृती या ब्लॉगच्या निमित्ताने डोळ्याखालून  गेली हे ही नसे थोडके!





महाराष्ट्राबाहेरील अशाच काही मंदिरांना पुढे भेट देता येईल अशी आशा करते.