जेजुरगड अर्थात नवा
मल्हारगड, कडेपठार अर्थात जुनागड आणि जुना मल्हारगड अर्थात सोनोरीचा किल्ला या तीन ठिकाणी
भेट देण्याचा योग रविवार १५ एप्रिल २०१८ रोजी आला. रविवार आणि दुसऱ्या दिवशी सोमवती
आमावस्या असल्याने भक्तगणांचा ओघ जेजूरगडावर ओसंडून वाहिला. मल्हारीमार्तंड मंदिर
परिसर तळी-भंडाऱ्याने सुवर्णरंगी झाला!
कडेपठार, शिवलिंगरुपी
श्रीखंडोबाचे स्थान. शब्दश: अर्थाने पठार कमी. जुनागड हे यथार्थ नाव.
दोन महिन्याच्या विश्रांतीनंतरची चढाई. "स्टीकसखी" सोबतीला नव्हती. सोबतीला होते ओंकार, विकी आणि ललाटीला विराजमान भंडारा लेपित भक्तगण. सकाळचा शीतल गारवा, सुर्व्यादेवाचे प्रखर किरणही आज जरासे विसावलेलेच. सुंदरशी चढण, पाठीला जेजुरीगडाचे सोनेरी सौदर्य आणि भवताली असंख्य डोंगररांगा.
९.३० ला सासवडकडे आगेकूच. वाटेत नाश्ता करून सोनोरीचा रस्ता धरला. साडे अकराच्या सुमारास मल्हारगड चढाई. गडाला जाणारी पायवाट दिसेना. डोंगर चढून गेलो. गडावर सांगली गावचे शिवकार्यकर्ते भेटले. गडस्वच्छता करत होते. त्यांनी उतरणीचा रस्ता दाखवला.
मल्हारगड, तसा छोटासा. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यात सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वात शेवटी बांधलेला किल्ला. भक्कम तटबंदी असलेला, महादरवाजा, चोर दरवाजा, बालेकिल्ला......
महादेव आणि खंडोबा मंदिर आणि असंख्य प्रतिमांनी व्यापलेला......
सोनोरी गावात एक आजीबाई
भेटल्या. त्या तरूण असताना लाकडे गोळा करायला गडावर स्थानिक जात असतं. आता शालेय मुले
सोडली तर स्थानिकांचे गडावर जाणे दुर्मिळच.
इथे राहणारे सरदार पानसे, पुण्यातल्या
वाडिया कॉलेजला प्राध्यापक होते. ते कॉलेजमधील मुलांना किल्ला पाहण्यासाठी गावी बोलवायचे.
महाशिवरात्र, खंडोबाचे
नवरात्र या दिवशी स्थानिक लोकांची गर्दी गडावर होते असे स्थानिक म्हणतात.
मल्हारगड ट्रेकच्या
निमित्ताने सोनोरी गावातील कुटुंबाची झालेली भेट आणि प्रेमरुपी भोजन ही सुवर्णभेटच!
ट्रेक प्रवासातील काही सुंदर क्षण.....