“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात
“फुलों की घाटी” विथ बियाँड
वाईल्ड:
७ ते १५ ऑगस्ट २०१६
“देवभूमी उत्तराखण्ड में
आपका स्वागत हैं” देहरादून एअरपोर्ट ला उतरल्यावर गोविंदघाटच्या वाटेवरच्या स्वागत बोर्ड मधला शब्द मनात ठासून राहतो तो शब्द म्हणजे “देवभूमी”! प्राचीनकाळी ॠषीमुनींनी दिलेले
हे नाव! ॠषीकेश इथे जिकडे तिकडे लिहिले पहायला मिळते “मूनी की रेति”!
छोटा चार धाम, (अर्थात यमनोत्री,गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) विष्णू (बद्री) आणि शंकर (केदार) देवतांचे तीर्थस्थान, योग, ध्यानधारणा, तपस्या इ. चे तपोस्थान! पंचप्रयाग (विष्णूप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग) अर्थात पाच नदयांचे संगमस्थान! उत्तराखण्ड राज्यातील गढवाल आणि कुमाऊ ह्या हिमालय रांगेतील पर्वतरांगा, वन, ग्लेशीअर्स, लेक्स, फ्लोरा आणि फौना इ. चे निसर्ग सौदर्य स्थान! पर्वतारोहण, ट्रेकिंग, स्कीईग, रिव्हर राफ्टिंग, रॉक क्लायबिंग, रॅपलिंग, वॉटर क्नोईग, कयाकिंग, पॅराग्लाईडिंग, बायकिंग, कॅम्पिंग, वाइल्ड सफारी इ. चे साहसी स्थान! राष्ट्रीय वृक्ष, बुरांस अर्थात ऱ्होडोडेंडरॉन आणि राष्ट्रीय फुल, ब्रम्हकमळ अर्थात सॉसुरिया ऑब्वहॅलाटा इ. सारख्या पुष्पसागराचे प्राकृतिक स्थान!
अशा या उत्तराखण्ड मधील, चमोली
जिल्यातील “बियॉन्ड चार धाम” पैकी एक अशा “व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय पार्क” ट्रेक साठी “बियॉन्ड
वाइल्ड” संस्थेतर्फे आम्ही २४ जणांचा ग्रुप निघालो!
खरं तर मी “लदाख” चं बकिंग करायला ““बियॉन्ड वाइल्ड” च्या ऑफिस मधे गेले होते. शांभवी आणि तृप्ती सोबत बोलून जवळ जवळ सगळं फायनल होत आलं.तेवढ्यात पराग सर तिथे आले. “वर्षातून एकदाचं “व्हॅली” असते” असं त्यांनी सांगितलं. सगळा प्रोग्रॅॅम स्पष्ट केला. ते ऐकून मी “व्हॅली” ला जायला तयार झाले. विचार करत होते की मी का चाललेय? खरं तर मी ह्या टप्प्यावर होते की फुलांच्या विविध भागांची नावं सांगा असं कोणी विचारलं तर मला काहीही सांगता आलं नसतं! ही अवस्था असताना मी “व्हॅली ऑफ फ्लावर्स” ला जायचा निर्णय घेतला होता आणि ते ही प्रख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. पराग महाजन सरांसोबत! किती हे धाडस....हे समजतं होत तरी चालले होते! का?.........खूप विचार करता काही कारणाशी येऊन थांबले... रजा साठलेल्या होत्या, पैसे जमवलेले होते हे तर आहेच पण पहिलं कारण होतं की हा ट्रेक होता दुसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण होतं ते म्हणजे पराग सर सोबत होते! सरांना नुसतं ऐकण आणि ऑबझर्व्ह करणं ही अत्यंत भावस्पर्शी आणि संस्मरणीय अनुभूती असते. तो अनुभव मी भूतान ट्रीपच्या वेळी घेतला होता!

असो. पराग सरांसोबत
जातोय ही आठवण ठेऊन थोडफार वाचन केलं. इंटरनेट आणि वनस्पती अभ्यासक आणि पर्यटनप्रेमी, प्र. के. घाणेकर यांचे “व्हॅली ऑफ फ्लावर्स” हे पुस्तक वाचलं!
“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी”
अर्थात पुष्पदरी! हिंदू पौराणीक कथानुसार नाव आहे "नंदनकानन" अर्थात "इंद्राची बाग"! एक दैवी अनुभूती!
“विश्व कि धरोहर” असणारे आणि वर्षातून एकदाच फुलांनी बहरणारे एक प्राकृतिक स्थान!! ऋषिकेश ते बद्रीनारायण ह्या मार्गावरील आणि हिमालयाच्या शिवालिक पर्वतरांगा मधील, ८७.५ वर्ग किमी क्षेत्रात पसरलेले एक राष्ट्रीय उद्यान!
फुलों की घाटी |

फ्रँक स्माईद सहित सहा ब्रिटीश गिर्यारोहक १९३१ साली गढवाल हिमालयीन रांगेतील २५४४७ फुट उंचीचे कामेट शिखर सर करण्यासाठी आले होते. परतताना पाऊस आणि फॉग मध्ये ते मार्ग चुकले. चुकून एका दरीत पोहोचले आणि उघडीप होऊन फॉग विरळ झालं तेव्हा ते “फुलों की घाटी” पाहून अवाक झाले.
१९३७ साली फ्रँक स्माईदने परत ह्या घाटीला भेट दिली. तीन महिने राहून वनस्पती आणि फुलांचा अभ्यास केला. त्याने “दि व्हॅली ऑफ फ्लावर्स” पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकाने “व्हॅली ऑफ फ्लावर्स” ला जगप्रसिद्धी मिळून दिली!
वनस्पतीशास्त्रज्ञ जोन मार्गारेट लेग्गी ही
फ्रँक स्माईद ने लिहिलेलं “दि व्हॅली ऑफ फ्लावर्स” वाचून वनस्पतींचे काही नमुने
गोळा करण्यासाठी इथे आली होती. एका चढावरून दुर्दैवाने तिचा पाय घसरला आणि तिचा
मृत्यू झाला. तिच्या स्मरणार्थ उभारलेला स्मारकचौथरा इथे आहे!
विचार करता छान वाटलं की ह्या “फुलों की घाटी”
ला जगप्रसिदधि मिळवून देणारा एक “गिर्यारोहक” होता!
ह्याचा अर्थ असा नाही की “फुलों की घाटी”
स्थानिक लोकांना माहित नव्हती. इथल्या काही फुलांचा सुगंध मंत्रमुग्ध करणारा होता.
काही वनस्पतीची पाने खाल्ली तर नशा येत होती. “तिथे भूत,पिशाच्चं आहे” असा फितवा
पसरून लोकांनी ही घाटी आणि तिचे सौदर्य जतन गेले होते. कोणी बाहेरचं येऊन फुलांची
नासाडी करू नये आणि तिथले पुष्पसौदर्य खराब होऊ नये एवढाच त्यामागे उद्देश असावा!
असो.
पुणे-दिल्ली, दिल्ली-डेहराडून हा विमान प्रवास आणि
जोशीमठ-औली- गोविंदघाट-पुलना हा खाजगी वाहनाचा प्रवास! पुलना-भ्युयंदर-घांगरिया हा
१४ किमी चा पायी किंवा घोड्याने प्रवास केला. घांगरिया
गावातून “फुलों की घाटी” आहे ३ किमी आणि “हेमकुंड साहिब” आहे ५ किमी अंतरावर!
पोटेन्टीला |
“फुले”! निसर्ग आणि माणसाच्या ह्दयाशी संबंधित एक नाजूक सुगंध! शिक्षकदिनाच्या दिवशी शिक्षकांबद्दलचा आदर व्यक्त करण्यापासून, सदीच्छा, प्रेम, अर्चना, दवा अशा कितीतरी भाव-भावनांशी जोडले गेलेले एक प्रतिक! स्त्री, लहान मुले आणि कवी-कवितांचे हे मोरपीस तर वनस्पतीशास्त्रज्ञ-अभ्यासक आणि फोटोग्राफरचे हे मर्मबंध!
“फुलांसारखे सर्व फुलारे.....ह्या फुलांच्या
गंधकोषी.....पान जागे फुलं जागे.....बगळ्यांची माळ फुले....जब जब बहार आये और फुलं
मुस्कुराये..ये कौन चित्रकार है......” कितीतरी गाणी देखील आठवतात!
घांगरीया चेकपोस्ट ते “फुलों की घाटी”...हा मार्ग तसा अरुंद, पायऱ्यानी बनलेला, ठीकठीकाणी पुष्पावती नदीच्या पाण्याचे झरे वाहताहेत, ठिकठिकाणी पुलं बांधलेले आहेत आजूबाजूला अवाढव्य पहाड आहेत.....
हे मार्गक्रमण करताना असं वाटतं होतं की निसर्गाची किती ही मुक्तहस्त उधळण! इथला निसर्ग पाहताना भावफुलोरे उचंबळून येत होते! इथला निसर्ग म्हणजे जणू........एक दैवी अनुभव! पावसाची एक सर! चित्रकाराची एक अप्रतिम कलाकृती! कवीची एक सुंदर रचना! आईच्या कुशीतलं तान्ह बाळ! कृष्णाची बासरी! संगीताचे सूर! गाईच्या गळ्यातला घंटानाद! नृत्यातली लय! गंगा की लहरे! गाभा-यातील शांतता! ध्यानातला ओंकार!
चारही बाजूंनी अतिभव्य पहाड, कधी ते “धुंद’ (अर्थात धुके/फॉग) ने झाकळून जाऊन आकाशातील ढगांच्या पांढ-या रंगात इतके मिसळून जातात की जणू ढगचं धरतीवर अवतरलेत! समोर एकचं रंग दिसतो “पांढरा”!
मनमोहक औली |
हिरवा, नीळा, पांढरा, सोनेरी, नारंगी, जांभळा.....नजर न हटणारे...डोळासुख देणारे....मधूनच होणारा पक्षांचा किलबिलाट...वाऱ्यावर डोलणारी जांभळी, सोनेरी रंगफुले आणि हलकेच, आल्हाददायक, अलगदतेने दवबिंदुंना झुलवणारी गवती पाती, चावरी/बोचरी थंड हवा आणि नदीतून वाफाळणारे गरम/थंड बाष्प....माणसाला समाधीस्त करणारी, प्रबोधित करणारी, भावरंगासोबत डोलायला लावणारी ही जादूमय निसर्गदुनिया!
झाडाच्या कुशीत विसावलेली एक ढोली......जणू
माझ्याचं साठी बनलेली.......
जीरॅनियम |
नीलम अर्थात ब्ल्यू पॉपी |
सेलीनम |
कित्येक फुलांना औषधी गुणधर्म आहेत. उदा. पोटेन्टीला ह्या वनस्पतीचा उपयोग शक्तिवर्धक म्हणून केला जातो, जीरॅनियनची पाने-मुळे डोकेदुखीवर वापरली जातात.
कॅनाबीस अर्थात भांगेचे झाड |
कॅनाबीसची पाने हाताच्या पंजासारखी दिसतात. हशीश, गांजा, चरस सारख्या काही नशिल्या पदार्थांची निर्मिती ह्या वनस्पतीपासून करतात. हे झाड गिर्यारोहक लावतात म्हणे. आलेला थकवा नाहीसा करण्यासाठी ह्याची पाने खाल्ली जातात.
ह्या फुलांविषयी पराग सरांना बोलताना ऐकताना ऐकतचं रहावसं वाटतं. प्रत्येक फुलाची इतकी सविस्तर माहिती त्यांनी दिली कि आता वाटतयं शहाण्या मुलीसारखी ती लिहून घेतली असती तर लक्षात तरी राहिली असती. असो.
घाटी तुम्ही जितकी पिंजून काढाल तेवढ्या जास्त जाती/प्रजातीची फुले मिळत जातात. फुले पाहताना हरपून, हरखून जायला होतं! ह्या फुलांच्या ताटव्यात उभं राहून फोटो काढण्याचा मोह मग आवरतचं नाही! बालसम अर्थात तेरडयाचे ताटवेचं ताटवे बघायला मिळतात. प्रत्येक फुलं वेगवेळ्या कोनातून बघितलं की त्याचं सौदर्य वेगळ दिसतं!
ह्या फुलांविषयी पराग सरांना बोलताना ऐकताना ऐकतचं रहावसं वाटतं. प्रत्येक फुलाची इतकी सविस्तर माहिती त्यांनी दिली कि आता वाटतयं शहाण्या मुलीसारखी ती लिहून घेतली असती तर लक्षात तरी राहिली असती. असो.
रोहित |
घाटी तुम्ही जितकी पिंजून काढाल तेवढ्या जास्त जाती/प्रजातीची फुले मिळत जातात. फुले पाहताना हरपून, हरखून जायला होतं! ह्या फुलांच्या ताटव्यात उभं राहून फोटो काढण्याचा मोह मग आवरतचं नाही! बालसम अर्थात तेरडयाचे ताटवेचं ताटवे बघायला मिळतात. प्रत्येक फुलं वेगवेळ्या कोनातून बघितलं की त्याचं सौदर्य वेगळ दिसतं!
नवीन फुलं शोधायला एक शोधक नजर लागते! अगदी शांतपणे, वेळ घेऊन, आत आत मार्गक्रमण करून, मान चहुदिशेला फिरवून, ह्या फुलांचा शोध घ्यावा लागतो....फुलं पायदळी तुडवली जात नाहीत ना ह्याचं भान ठेवावं लागतं! गंमत ही पण आहे की फुलांमध्ये गुरफटून जाऊन आजुबाजूचं भान विसरायला देखील होत! निसर्गाचा हा चमत्कार! हा परिसर पिंजून काढायला काही तास पुरेसे नाहीत..काही दिवस हवेत! दर दिवशी फिरून येण्याचा स्टॅमीना हवा! आलेल्या दिवशी तासनतास फिरून फुले शोधणारी नजर हवी! एकाचं फुलाचे विविधढंगी फोटो काढण्यासाठी वेळ देण्याची तयारी हवी! काही फुले शोधायची राहून जाणार ही खंत स्वीकारची तयारी हवी!....
ब्रम्हकमळ |
“ब्रम्हकमळ” हिमालयातील फुलांचा राजा! हे फुलं
बघायला मिळालं ते “हेमकुंड साहिब” या ठिकाणी! “ज्यासाठी केला सारा
अट्टाहास”! असं झालं अगदी!
इथे बघायला मिळणारी ब्रम्हकमळे ही असली! "फुलोंकी घाटी" मध्ये ब्रम्हकमळ बघायला मिळत नाही. ब्रम्हकमळाच्या ताटव्या शेजारी जे गुलाबी तुरे दिसतात ते आहे बिस्टोरटा! इथे जाऊन ब्रम्हकमळ पाह्यला न मिळण म्हणजे "देणाऱ्याचे हात हजार..पण तुझी झोळी मात्र रिकामी" असं आहे!

“हेमकुंड साहिब”! धर्मगुरु गुरु गोबिंद सिंगजी यांना अर्पित केलेले आणि ग्लेशिअर लेक आणि पर्वतांनी आच्छादलेले, समुद्र सपाटीपासून जवळ जवळ १५००० फुटावर असलेले शीख बांधवांचे हे तीर्थस्थान!
“हेमकुंड साहिब” गुरुद्वाराचं
दर्शन आणि लक्ष्मण मंदिर बघून घेऊन पायी परत येताना भरपूर फुले बघायला मिळाली!
ह्या जागेला पूर्वी "लोकपाल" म्हणत आणि श्रीरामाचा भाऊ लक्ष्मण इथे ध्यानधारणा करत असे, असे सांगितले जाते. ब्रम्हकमळ लक्ष्मणाला अर्पण करून आणि कुंडात आंघोळ करून आरोग्यसंपन्न आयुष्यची कामना केली जात असे.
ब्ल्यू पॉपी जिकडे तिकडे बहरली होती. पावसाने काही फुले खराब झाली होती. मी आणि आरोहीला वेद होते ब्रम्हकमळाचे!

रमेश सोबत...ब्रम्हकमळामध्ये |
रमेश, आमचा घोडाचालक म्हणाला, “मी घेऊन जातो”..त्याने घोडे ऐके ठिकाणी सोडले आणि
आम्ही तिघं निघालो! ब्रम्हकमळासाठी एका छोट्या टेकडीवर मिनी ट्रेकचं केला आम्ही!
पाहतो तो काय जिकडे तिकडे ब्रम्हकमळे! ब्रम्हकमळाची बागचं फुलली होती! शेकडोंच्या
संख्येने ब्रम्हकमळे होती! कोणकोणत्या ब्रम्हकमळाचा फोटो काढायचा असं झालं.
ब्रम्हकमळाला वंदन करून आणि रमेशचे आभार मानून खाली उतरलो. घोड्याने खाली घांगरीया
गावात यायला जवळजवळ दोन तास लागले!
घांगरीया गावात आम्ही हॉटेल देवलोक मध्ये राहिलो
होतो. “फुलों की घाटी” चं प्रवेशद्वार अर्थात चेकपोस्ट तिथून
अगदीच जवळ होतं. हवामानाचा अंदाज घेऊन व्हॅली सर्वांसाठी खुली करतात. सकाळी सात वाजता चेक
पोस्ट उघडते आणि संध्याकाळी ५ च्या आत परत यावे लागते. चेक पोस्ट च्या इथुनचं एक
रस्ता व्हॅलीला तर एक हेमकुंड साहिब ला जातो. चेक पोस्टला तुमचे बायोमेट्रिक पास
तपासला आणि प्रवेश फी भरली की तुम्हाला एन्ट्री मिळते. चालायला सुरुवात केली की चं
आजूबाजूची वेगवेगळी फुले तुमचं स्वागत करतात. पाय थबकतात, कॅमेरे बाहेर
येतात...साधारण ११ हजार फुटावर असणारे हे ठिकाण आहे. जाण्याचा रस्ता वळणावळणाचा,
फरशांचा आणि अत्यंत चढाईचा आहे.
पायी चढायचं नसेल तर “कंडी” मिळते.. तुम्ही विराजमान झालेली ही “कंडी” एक माणूस पाठीवर बांधून घेऊन जातो. कंडीने जाण्याचा खर्च आहे एक हजारापासून ३-४ हजारापर्यंत!
कंडी |
पायी चढायचं नसेल तर “कंडी” मिळते.. तुम्ही विराजमान झालेली ही “कंडी” एक माणूस पाठीवर बांधून घेऊन जातो. कंडीने जाण्याचा खर्च आहे एक हजारापासून ३-४ हजारापर्यंत!
औली ते गोविंदघाट हे
अंतर साधारण १५ किमी आहे. औली ला गढवाल निगमच्या हॉटेल मधे तर गोविंदघाटला आम्ही हॉटेल भगत येथे राहिलो होतो. गोविंदघाट ते पुलना हे अंतर ३ किमी आहे. हा ३ किमी
रस्ता आता डांबरी झाला आहे. पण काही वर्षापूर्वी हा कच्चा रस्ता होता आणि पायी
जावे लागत होते.
पुलना ते घांगरिया आणि भ्युंडर हे अंतर ११ किमी आहे. हे अंतर पक्क्या दगडी पाय-यांनी जोडलेले आहे. काठ लोखंडी गजांनी सावरून सुरक्षित केले आहे. साधारण १००० च्या वर पायऱ्या असतील. हे पायऱ्या पायी चढता येतात किंवा पोनी (घोडा) करता येतो.
ठिकठिकाणी बसायला लोखंडी, सिमेंटची बाकडी आहेत, रेन शेल्टर आहेत, भरपूर संख्येत हॉटेल्स आहेत, पिण्याच्या पाण्याचे नळ आहेत, कुडादानी आहे, शौचालये आहेत, घोड्यासाठी सिमेंटच्या टाकीत पाणी साठवलेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी माणसे कचरा आणि घोड्याची लीद साफ करताना दिसतात आणि त्यांच्यामुळे हा परिसर एकदम निर्मल राहतो!

घोडा माझा फार हुशार |
यात्रेकरू-ट्रेकर्स
साठी कामधंदा सुरु राहतो तो साधारण जूनपासून-सप्टेंबरपर्यंतचं! एरवी बर्फवृष्टीने
कामधंदा मंदावतो. बर्फामधील प्राणी पाहण्यासाठी आणि घांगरीया पर्यंतचे निसर्ग
सौदर्य पाहण्यासाठी खासकरून ट्रेकर्स एरवी इथे येतात!
ह्या १००० च्या
आसपासच्या पायऱ्या चढण्याचा अनुभव अजबचं! वळणावळणाच्या अति चढाईच्या (स्टिफ)
पायऱ्या. पायी चढून जायला साधारणत: ४ तासापासून ते ८ तासापर्यंत वेळ लागतो.
व्यक्तीच्या क्षमतेवर आणि किती थांबत जाता त्यावर हे अवलंबून! घोड्याला देखील
अंदाजे चार तास लागतात.
पायऱ्या पायी चढल्या तर
त्या अंगावर येतात, छातीवर प्रेशर आणतात, कंबर ताठरते की दोन्ही हात कंबरेवर ठेऊन
पायऱ्या चढायची वेळ येते, गुडघे मोडून जातात, धाप लागते, थकायला होतं, श्वास
फुलतो, कधी एकदा बसतो असं होतं, कधी एकदा पायऱ्या संपतात आणि ठिकाणी पोहोचतो असं
होतं हे वेगळचं! त्यात हवामान कसं आहे त्यावर अवलंबून त्रास होतात ते ही वेगळेचं!
ह्या प्रवासात एकच आधार महत्वाचा असतो, कधी काठीचा, कधी सहकाऱ्याचा तर कधी
स्वत:चाचं!
घोड्यावर बसून जाण्याचा
अनुभव यावेळी घेतला. राहून राहून बालपणातली कवियत्री शांता शेळके यांची कविता आठवत होती, “ टप टप टप टप टाकीत
टापा काळे माझा घोडा...घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार, नुसता त्याला
पुरे इशारा, कशास चाबूक ओठा!”. घोडा जेव्हा पायऱ्या चढतो तेव्हा त्यावर बसलेल्या
माणसाने पुढे झुकायचे आणि घोडा जेव्हा पायऱ्या उतरतो तेव्हा त्यावर बसलेल्या
माणसाने पाय पुढे करून स्वत:ला मागे रेटायचे ही पद्धत! पाय-यांवरून जाताना घोडा
झिक-झॅक चालतो. एका काठापासून होऊन दुसऱ्या काठापर्यंत! दरीकाठाला घोडा इतका कडेला
येतो की वाटतं की बस्स आता आपण खाली आपटणार....नकळतच तोंडातून हुंकार बाहेर
पडतात... “ अरे भैया इसको संभालो..ये घोडा किधर जा रहा है”....पहाडाच्या कडेला
जाताना घोडा इतका खेटून जातो की आपला पाय पहाडाला घासला जातो..वाटतं आता पाय
मुरगळणार, खरचटणार, कातडी सोलवटून निघणार....फुलझाडे जर वाटेत आली तर आपल्याला
झुकावचं लागतं. घोड्याच्या दांडीला धरून हात लाल-लाल होतात..सोलवटून निघतात...अंग
खिळखिळ होत...कंबर, पाठ हादरून जाते...बैठकीचा भाग घासून निघतो.... आपटतोय की काय,
पाय दगडाला घासून कातड सोलवटतयं की काय, पावसाच्या ओलेपणाने घोड्याच्या लीदमुळे
झालेल्या निसरड्यावरून घोड्याचा पाय निसटतो की काय ही भीती वाटते ती वेगळीच! कधी
एकदा घोड्यावरून खाली उतरतो असं होतं, आता घोडा नको त्यापेक्षा पायी चाललेलं
परवडलं असही वाटतं....घोड्यावर चढवलेलं सामान आणि माणसे वाहून नेणारे घोडे बघीतले
की मन कळवळतं ते ही वेगळचं! त्याचं वेळी घोड्याबद्दल सहानुभूतीपूर्ण जी आपुलकी
वाटते ती अजुनचं वेगळी! प्राण्याची पराकोटीची परीक्षाचं! प्राण्याचा अधिकार, आपली
हतबलता की कामधंद्याचा एक मार्ग ह्या दुखऱ्या मन द्वंद्वात आपण अडकतो. घोडा चालवतो
त्या माणसासाठी किती कष्टाचं काम हे! ही माणसे १५-१६ वर्षा पासून ते वयाच्या
सत्तरीपर्यंतची! एकावेळी दोन घोड्यांना मॅनेज करणे, ठरलेला थांबा येईपर्यंत
कितीतरी तास पायऱ्या पायी चढणे, पावसाची चाहूल असेल तर झपाझप चढ चढणे....घोड्यावर
आपण बसलो की फक्त आपल्या सुरक्षीततेचाच विचार असतो...आपल्या घोडयासोबत चालणारा
माणूस थकला असेल का? त्याला दम लागला असेल का? हा विचारही मनात येत नाही...जीवन
जगण्यासाठीचे हे कष्ट बघितले की मन हळहळतं...१००० + पाय-यांसाठी ७०० रु कमी
वाटतात....
ही वाट दूर जाते |
एफआरaay |
देहरादूनचं “फॉरेस्ट
रिसर्च इन्स्टिट्यूट” (एफआरआय) बघताना आणि समजून घेताना वाटलं “क्लिनिकल रिसर्च
सोडून फॉरेस्ट रिसर्च जॉईन कराव” रिसर्च हा शब्द कॉमन आहे ना बास झालं मग!
“फुलों की घाटी” ह्या निसर्गरम्य जादूमय
दुनियेच्या समाधी अवस्थेतून मी अजूनही बाहेर आलेली नाही. आजही विविधरंगी
डूलणा-या फुलांसोबत मन “झोका” घेतयं, धुंद पाहून “डोळे पांढरे” होतायेत, अवाढव्य
पहाड “मान उंचावताहेत”, हेमकुंड “विनम्र” करतोय आणि ब्रम्हकमळ “तृप्त” करतोय!
बुरांसचे सरबत |
गंगा-अलकनंदा आणि भागीरथी नद्यांचा देवप्रयाग येथील संगम |
ह्याक्षणी माझे वडील
मला राहून राहून आठवतायेत. एक कविता ते नेहमी आम्हाला म्हणून दाखवायचे. स्वर्गमय अशा इंद्राच्या बागेला अर्थात “फुलों
की घाटी” ला माझी ही कवितारुपी स्मृतीफुले अर्पण!
बालपणी
मजं फुलझाडांचा नाद असे फार
केली
होती मागील दारी बाग मजेदार||
गुलाब,
जाई, जुई, शेवंती, नाजूक निशीगंध
मदनबाण
मोतिया चमेली लावियला कंद||
ठायी
ठायी हरित तृणांचा जाहलिया कुंज
मधे
केला एक मनोहर मालतीचा पुंज||
नित्य
सकाळी प्रेम भरे मी जल सिंचन करोनी
वाढविली
ही झाडे गेली कुसुमाही भरोनी||
फुललेली
ती पुष्पवाटिका पाहुनी नयनाही
हर्ष
जाहला जो ह्दयला उपमा त्या नाही||
शाळा
सुटता सायंकाळी तेथे म्या जावे
सुखे
बसावे तसे हसावे गाणे ही गावे||
कोकीळ,
मैना, रावे, यावे पतंग वा भृंग
ऐकून
त्याची मंजुळ गाणी व्हावे म्या दंग||
अशा
रीतीने काल क्रमिता सहसा इक दिनी
प्रिय
बागेला सोडून गेलो मी मातुल सदनी||
नीट
काळजी ह्या बागेची माझ्या घे ताई
ऐसी
विनंती नीज भगिनीला करुनी मी जाई||
वर्ष
लोटले आलो फिरुनी आपुल्या सदनाला
मागे
जावूनी बाग पाहता खेद मना झाला||
गेली
होती सकलही झाडे हरहर ती सुकूनी
मग
त्यावरी फुल कोठुनी दिसणार ते चुकुनी||
अश्रुबिंदू मग बाग पाहुनी रडलो मी इतुका
सजीव
नाही फिरुनी झाली दुर्धर ती लतिका||
प्रिय
विषयाला नको विसंबू प्राण जरी गेला
बालपणीच्या
बागेने हा बोध मना केला||
फोटोसाठी खास आभार : “व्हॅली ऑफ फ्लावर्स” २०१६ टीम
ह्या स्वर्गमय आणि जादूमय निसर्ग दुनियेची सफर करून आणल्याबद्दल मन:पूर्वक आभार: डॉ. पराग आणि डॉ. संगीता महाजन आणि बियाँड वाईल्ड ग्रुप
हा स्वर्गमय अनुभव अधिक भावस्पर्शी करण्यासाठी खूप खूप आभार: “व्हॅली ऑफ फ्लावर्स” ऑगस्ट २०१६ टीम
ह्या सफर मधे साथ देणारी माझी रूपा : आरोही राणे हिचे ही अत्यंत आभार !
आरोही-माझी रूम पार्टनर (रूपा) |