मढेघाट ते शिवथरघळ ट्रेक, २१ ऑगस्ट २०१६


एस. जी. ट्रेकर्स: मढेघाट ते शिवथरघळ ट्रेक: २१ ऑगस्ट २०१६


मढेघाट आणि शिवथरघळ! इतिहासातील दोन अजरामर ठिकाणे! एक अजरामर झाले शूरवीर तानाजी मालुसरे यांच्यामुळे तर दुसरे अजरामर झाले समर्थ रामदास स्वामींमुळे!


नरवीर तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील एक आघाडीचा योद्धा! “आधी लगीन कोंढाण्याचे (सिंहगड), मगच रायबाचे” हे घोषवाक्य शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातून वाचत आलेले. “तलवारिशी लगीन लागलं” हे ब्रीद सार्थ ठरावं असा निष्ठावान शूरवीर! कोंढांणा लढाईत तानाजी मालुसरे कामी आले.शिवाजी महाराज अतीव दु:खाने उद्गारले, “गड आला पण सिंह गेला”! अंतिम विधीसाठी तानाजींचे “मढे” त्यांच्या मूळ गावी म्हणजेच पोलादपूर जवळील उमरठ गावी ज्या घाटमार्गाने नेण्यात आले त्या मार्गाला खुद्द शिवाजी महाराजांनी “मढेघाट” नाव दिले! पहिल्यांदा जेव्हा ही कथा मी ऐकली तेव्हा “मढे” हा शब्द ऐकून खूप विचित्र वाटले. फेरविचार करताना लक्षात आले आजचा प्रचलित शब्द आहे “शव, प्रेत, पार्थिव, मृत शरीर, मृत देह इ.” कदाचित त्यावेळचा बोलीभाषेतील प्रचलित शब्द “मढे” हा असावा! किती ही अभिमानाची गोष्ट की शिवाजी महाराजांचे निष्ठावान लढवय्ये तानाजींची “अंतिमयात्रा’ ह्या घाटमार्गाने नेण्यात आली!

समर्थ रामदास स्वामी, यांनी “दासबोध” हा ग्रंथ कल्याणस्वामींकरवी शिवथरघळ अर्थात सुंदरमठ इथे लिहिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट इथेच झाली असे म्हणतात!

भोर-महाड मार्गावरील अशी ही अत्यंत पवित्र दोन ठिकाणे! त्यांची पवित्रता अधिकच उजळून निघते ती पावसाळ्यातील अतिसुंदर लँडस्केप्स, भातखेचरे, रान पाने-फुले आणि जवळच्या कुंडलिका आणि सावित्री नदीच्या धबधब्यामुळे!

शिवभूमी मढेघाट परिसरात दोन प्रचंड मोठे धबधबे आहेत, लक्ष्मी आणि केळेश्वर! एस. जी ट्रेकर्स तर्फे आम्ही १४ जण वेल्हे मार्गे जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा प्रचंड प्रमाणात धुके होते. धबधबा वरून तर अजिबातचं दिसत नव्हता. खाली बघितलं तर फक्त धुक्याचा पांढरा रंग! त्या रंगातून आरपार काहीही दिसत नव्हतं. आम्ही धबधबा खाली जाऊन पाह्यचा ठरवलं. ओळख परेड झाल्यानंतर आम्ही चालायला सुरुवात केली. खाली जाण्याचा हा मार्ग छोट्या-मोठ्या दगड-गोट्यांचा आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याचा होता. दगडांवर शेवाळं साचलेलं होतं. अतिशय खबरदारी घेऊन जावं लागत होतं. माझ्या मदतीला राहुल, स्मिता आणि प्रशांत होते. धबधबा आला आणि मी निश्वास टाकला!

“धबधब्याखाली भिजायचं” मी तसं ठरवूनचं आले होते. माझा निर्णय इतका पक्का होता की स्मिता नसती तर विशाल, राहुल आणि प्रशांत यांच्या मदतीने का होईना मी धाडस केलचं असतं. स्मिता असल्याने माझ्या धाडस सुकर झालं! हे धाडस अशासाठी की “धबधब्याखाली भिजण्यासाठीचं हे पहिलं पाऊल होतं”! सगळी इन्हीबिश्न्स सोडून भिजण्याचा आनंद अनुभवण हा प्रयोग मला करायचाचं होता आणि मी तो केला. पाण्याखाली उभे राहिल्याने सुरुवातीला थोडी थंडी वाजली, शहारा जाणवत होता. स्मिताचा आधार मिळाल्याने थोडावेळ तग धरू शकले. मजा आली. सुदैवाने तेव्हा पाऊस नव्हता नाहीतर काय वाटलं असतं कुणास ठावूक! धबधबा आणि पाऊस ह्यातला फरक कसा अनुभवला असता नाही सांगता येतं. एक छान वाटलं. श्रावण महिना होता. ऊन आणि सावलीचा खेळ! कधी पाऊस तर कधी ऊन! बालकवींची कविता आठवतचं होती “श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे! क्षणात येते सर सर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे!” अशा ह्या श्रावणात पाण्याखाली भिजण्याची मजा काही औरचं! “क्षणात ओलेचिंब तर क्षणात कोरडे!”. ओलेचिंब झाल्यानंतर आणि थोडा शहारा अंगात असताना जेव्हा उन्हाची तिरिप अंगावर पडते..अनुभवलयं कधी? वाव....उन्हाचा तडाखाही उबदार वाटतो. हवाहवासा वाटतो. कपडे जास्तवेळ ओलेचिंब राहतचं नाहीत! क्षणात ते कोरडे होतात. नाहीतर साधारणत: ओले कपडे कधी एकदा बदलतो असं होऊन जातं. श्रावण महिन्याची ही कमाल मला तेव्हा जाणवली! यामुळे हे भिजण तसं बाधतही नाही. श्रावण महिना आहेचं तसा खास! चहुकडे हिरवळ घेऊन येतो, सणामुळे एक पावित्र्य घेऊन येतो! हा ट्रेक म्हणूनच खास होता. तीन पवित्र गोष्टींचा संगम ..मढेघाट, शिवथरघळ आणि श्रावण महिना!

धबधब्याचा मनसोक्त आनंद घेऊन शिवथरघळ कडे निघालो. हा उतरणीचा एक पॅचं महाकठीण होता. दगड कसेही विखुरलेले...त्यावरून मार्गक्रमण करणं एक कठीण परीक्षाचं! थोडा तोल जात होता. त्या पॅचचं इतकं दडपण आलं की विशालला शेवटी विचारलचं “बाबारे, शिवथरघळ पर्यंतचा मार्ग असाचं आहे की काय?”....खबरदारी घेत तो पॅच कापत असताना आजूबाजूला फारसं लक्ष जात नव्हतं, हा मार्ग घन्या जंगलातून जातो. 

दुतर्फा हिरवीगार झाडी..फुललेली रानफुले...
अगदी छोटयातलं छोटं फुलं निसर्गसौदर्य खुलवतं होतं. काळ्याशार पाषाणावर आणि हिरव्यागार पार्श्वभूमीवर ही पांढरी, गुलाबी, नारंगी रंगाची फुले उठावदार दिसत होती...नजर खेचून घेत होती...ह्या संपूर्ण ट्रेक मार्गावरचं अतिशय सुंदर रंगफुले बघायला मिळाली! पावसामुळे त्यावर विसावलेले जलबिंदू डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा मोह आवरतं नव्हता!


दगडांचा पॅच संपला आणि समोर जिकडे जिकडे हिरवळ! हिरव्या विविध रंगछटा! “हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे....” ही कविता आठवत होती. मागे वळून पाहवं तो “नभं उतरू आलेले”! ....“जरा विसावू या वळणावर”...अशी ही भावुकता....निसर्गाचा आनंद घेण्याच्या छान मूडमध्ये विशाल देखील होता...त्याच्या नवीन मोबाईलची जादू की अजून काही..माहित नाही...निसर्गाचे फोटो काढत होता... 

आमचा वॉक आणि राहुल, अविनाश आणि सुरेश यांचा डान्स “स्लो मोशन” मध्ये त्याने आपल्या मोबाईल कॅमे-याने शूट केला! 
पाहताना अदभूतरम्य वाटतो तो! आणि मग लक्षात येतं “हे फक्त विशालचं करू शकतो”! डान्सच्या वेळी राहुलने मला विचारले, “मॅडम येताय?”...म्हटलं, “राजा, आज मी पहिल्यांदा धबधब्याखाली भिजलेय... आता डान्स?..नको”....असं वाटलं की त्याक्षणी मी डान्स केला असताचं तर राहुलने तिथेही मला साथ-सोबत केली असती! मलाही वाटलं, “एक दिवस तो ही प्रायोगिक आनंद मी घेईन”....कारण डान्सचा संबध फक्त आणि फक्त आनंदाशी आहे! स्वत:ला खूष करण्याशी आहे!

आता पुढचा टप्पा सुरु झाला. इथे गवताळ कुरणात पाणी साचलं होत आणि चिखलाने माखलेलं होतं. त्यावरून चालत असताना माझा पाय घसरला आणि जोरात खाली आपटले..कळूनचं आलं नाही....राहुल, स्मिता आणि प्रशांत मदतीसाठी सरसावले... “बॅग घेऊ का” विचारलं....ही परीक्षा इथेचं संपली नाही तर आता एक ब-यापैकी एक मोठा झरा ओलांडायचा होता...अवतीभवती असलेल्या दगडांवरच्या शेवाळामुळे ओलांडायला कठीण वाटतं होता. विशाल पुढे होता आणि मला हाताचा आधार दिला आणि झरा ओलांडून दिला. मला त्याक्षणी “ढाक बहिरी” चा ट्रेक आठवला. तो अवघड रॉक पॅच पार करण्यासाठी, विशाल असाचं पुढे सरसावला होता! 

खासकरून उषा आणि मी रानफुलांचा आनंद घेत, फोटो काढत चाललो होतो. नवीन नवीन फुले पुढे जाऊन मी उषाला दाखवत होते आणि ती फोटो काढत होती. उषा एक उत्तम फोटोग्राफर आहे. माझं ट्रेकिंग बघून ट्रेकिंगसाठी प्रेरित झालेली आमच्या ऑफिसमधील ही पहिली मुलगी! तिने आणि मी भरपूर ट्रेक्स एकत्र केले. ट्रेकिंगचा आनंद घेताना आणि फोटो काढताना उषाला पाहणं हा माझ्यासाठी काही कमी आनंदाचा क्षण नसतो! उषा असली की कॅमेरा सोबत घेणं किंवा फोटो काढण्याचे कष्ट देखील मी घेत नाही. तिने काढलेल्या फोटोंच कौतुक शब्दात करताचं येत नाही...त्या फोटोंचा आनंद घ्यायचा बस्स!

असो. आता रानवडी खुर्द गाव आलं. निसर्गरम्य परिसरात हे गाव वसलेलं आहे. गावाला पाहून, स्मिताला तिच्या कोकणगावची  आठवण झाली.....जवळच्याचं नदीवर एक पूल आहे..अशा प्रकारचे पूल देखील निसर्गसौदर्यात भर घालतात! आणि सांगतात “विशाल, एक सेल्फी तो बनती है यार”!

शिवथरघळ जवळ येऊ लागलं होतं. आता ब-यापैकी सपाट रस्ता होता. माझा उजवा गुडघा किंचितसा दुखत होता. तो स्प्रेन झाल्यापासून पहिल्यांदाच दुखत होता. स्मिता काळजीने विचारत होती, “स्प्रे मारू का? आयोडेक्स लावू का?”. ..तिने आयोडेक्स लावले आणि शिवथरघळला पोहोचल्यावर जरज पडल्यास परत एकदा आयोडेक्स लावायचे आम्ही ठरवले!

शिवथरघळ अर्थात शिवथरघळईला पोहोचल्यावर “श्री सुंदर मठ, शिवथरघळ” असं लिहिलेली कमान आपलं स्वागत करते. 


काही पायऱ्या चढून गेल्यावर गुहेमध्ये, “दासबोध” सांगताना समर्थ रामदासस्वामी आणि ते लिहिताना श्री कल्याणस्वामी असा सुंदरसा मुर्तीरूप देखावा आहे ! शेजारीच राम, सीता, लक्ष्मण आणि ह्ननुमानची सुबकशी मूर्ती आहे. 
ह्या पावन परिसरात आकर्षून घेतो तो प्रचंड मोठा पाण्याचा धबधबा! त्याचा आवाज इतका जोरात येतो की काही वेळा बोललेलं ऐकायला देखील येत नाही! 


यावेळी इथे भाजी विक्रेता देखील बघायला मिळाले. अळू, तांदूळजा अर्थात माठ, टाकळी ह्या हिरव्यागार आणि ताज्या भाज्या विकायला होत्या! पल्लवीने भाज्या खरेदी काय केल्या त्यावरून बरेच हास्य फवारे उडाले! भाजी गाडीत निवडण्यापासून, भाजी बनवेपर्यंतचं नव्हे तर भाजी छातीशी कुरवाळून फोटो काढेपर्यंत!

गरमा-गरम पिठलं, तांदळाची भाकरी, पापड, लोणचं, बटाटा आणि मटकीची भाजी, भात-वरण आणि वरून परत चहा....वाव..असं पूर्णान्न मिळालं की पोटोबाचं काय आपणही खूषचं!

पूर्ण ट्रेकभर मला विशाल आणि टीमचं कौतुक वाटतं होतं. कोणता ट्रेक कधी काढावा ह्याचं उत्तम ज्ञान ह्या मुलांना आहे! विशाल तर मला वाटतं ट्रेकचं “जगतो”!......ह्या ट्रेकचा मार्ग लक्षात ठेवणं किती अवघड गोष्ट आहे हे आपण ट्रेक केल्यावर लक्षात येतं!


अविनाशने मला विचारले, “मॅडम, तुम्ही या वयात ट्रेकिंग कसं काय सुरु केलं?”....मी नेहमी जे उत्तर देते तेच त्यालाही दिलं, “एकदा गेले, जमलं, आवडलं, सुरु ठेवलं”.....पण खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर मलाही माहित नाही....एकदा गेले...जमलं, आवडलं हे तर आहेच पण एका ट्रेक नंतर दुसरा करावासा वाटला.....दुसऱ्या नंतर तीसरा.....आणि असे कित्येक.....पण “का” ह्याचा शोध खरंतर अजूनही सुरूचं आहे!

प्रशांत बरोबरचा हा माझा दुसराचं ट्रेक! ह्या ही मुलाने मला खूप सुंदर साथ केली! ह्यावेळी देखील मदतीला तो तत्पर होता! मी ट्रेक करत जाण्याचं महत्वाचं कारण हे ही आहे की एस.जी. आणि हिरकणी टीम सोबतचं मला प्रशांत सारखे काही सहकारी मिळाले ज्यांच्यामुळे माझं ट्रेक करणं सुरु राहिलं!

हा ट्रेक माझ्यासाठी एक निर्मळ आनंद होता! स्मिता सोबतच्या गप्पा पासून ते गाडीतल्या गाण्यांपर्यंत! हो...यावेळी चक्क मी गाणी म्हटली...मलाच काय सर्वांना माहित आहे मला गाण्याचा आवाज नाही! तरीही गाणी म्हटली.... “मी गाते” म्हणायचा अवकाश की विशाल सर्वांना शांत करायचा... “झिलमिल सितारोंका आंगन होगा, वो चांद खिला वो तारे हसे, धीरे से आजा रे अखियन में निंदिया आजा रे आजा, ये समा, समा है ये प्यार का”....बापरे... आयत्यावेळी आठवलेली ही गाणी....हे माझं रूप बघूनचं बहुधा राहुलने मला डान्स करण्याबद्दलही विचारलं असावं!

विशालने यावेळी “गाडी में छन न न, छन न न होय रे..” हे गाण म्हटलं आणि याच्या मागोमाग आम्ही.....त्या गाण्याने तर मजा आलीच पण अगदी बालगीतापासून, देशभक्ती गीत, शौर्यगीते, लावणी, गाने-नये-पुराने पर्यंत! राहुल, अविनाश, स्मिता, पल्लवी, प्रशांत हे सर्वजण गाणी गात होते..उषा गाणी सुचवत देखीलं होती! आलेख, मिलिंद आठवत होते......

येताना वरंधा घाट मार्गे आलो. घाटाचं सौदर्य अनुभवण्यासाठी थोडावेळ थांबलो.

मढेघाट ते शिवथरघळ एक अदभूत पावन ट्रेक आहे! तो करावाही श्रावण महिन्यातचं! आलेख म्हणालाचं होता “ हा ट्रेक कराचं.” पावसाच्या काही सरी पडून गेल्यावर जून-जुलै महिन्यात हा ट्रेक मध्ये साप आणि अन्य पशू-पक्षी देखील दिसतात. असा हा निसर्गाने नटलेला ट्रेक आहे! सह्याद्री रांगेतील रानफुले, पशु-पक्षी वैभव अभ्यासण्यात हा ट्रेक मोलाची भर घालतो!

ह्या निसर्गसंपन्न आणि पावन ट्रेकची सांगता मग समर्थ रामदास स्वामींच्या “मनाचे श्लोक” मधील एका श्लोकपंक्तीनेचं करूयात,

“जनी सर्वसुखी असा कोण आहे| विचारें मना तुचिं शोधूनी पाहे||
जय जय रघुवीर समर्थ!!

(फोटो आभार: उषा बालसुब्रमण्यम, विशाल काकडे आणि प्रशांत शिंदे)     

No comments: