शिलालेख आणि डोलणाऱ्या दीपमाळांंनी समृध्द देवी यमाई-तुकाईचे श्री. क्षेत्र राशीनराशीन गाव अहमदनगर जिल्यातील कर्जत तालुक्यातील. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमारेषेवर वसलेले. भिगवण पासून साधारण २५-३० किमी. 

कुमारगावच्या पेशवाईतील मुत्सद्दी अंताजी माणकेश्वर यांची कुलदेवता ही राशीन ची यमाई🙏

नवव्या -दहाव्या शतकातील हे मूलस्थान. साधारण सतराव्या शतकाच्या सुमारास  उभारलेल आताच हे यमाई-तुकाईचं देवीचं मंदिर. या देवीचा उल्लेख रेणुका, जगदंबा, भवानी असा केलेला देखील आढळतो. मंदिराचे प्रवेशद्वार अत्यंत आकर्षक आणि गगनला भिडणारे!
आत प्रवेश केल्यावर भला मोठा सभामंडप! सभामंडपात मंडपाकृती चौथऱ्यावर स्थानापन्न सिंहप्रतिमा! समोर अजून एक प्रवेशद्वार!


मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर मध्यभागी खालील शिलालेख आहे.  


सुप्रसिध्द लेखक श्री. महेश तेंडूलकर यांनी मंदिराच्या प्रांगणात असणाऱ्या शिलालेखांचे वाचन केले आहे. त्यानुसार वरील शिलालेख असा आहे, श्री. तेंडूलकर सरांनी त्यांच्या "मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात" पुस्तकात पान नं ३४५ वर त्याचा अर्थ सांगितला आहे तो पुढीलप्रमाणे: शालिवाहन शकाच्या १७०४ व्या वर्षी शुभकृतनाम संवत्सरातील श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी कसबे राशीन येथील भुजंगअया यांचा मुलगा महादाप्पा शेटे यांनी मंदिराचे बांधकाम किंवा बांधकामाला सुरुवात केली. 


मंदिरद्वारातून प्रवेश केल्यावर उजवीकडे एक भला मोठा नगाराखाना आहे. 
मंदिराच्या प्रांगणात आहेत ह्या सुरेख, सुबक, भव्यदिव्य, गगनचुंबी, विविध रंगात नक्षीकाम असलेल्या "डोलणाऱ्या दीपमाळा". दक्षिण बाजूच्या दीपमाळेवर जाण्यासाठी बाहेरून पायऱ्या आहेत. उजवीकडील दीपमाळेस आतून जिन्याप्रमाणे पायऱ्या आहेत. बांधकाम खाली दगड आणि वर विटांचे आहे. जिन्याने वर गेले की अगदी वर एक आडवा लाकडी दांडा आहे. तो धरून हलवला की दीपमाळ हलते. ही आश्चर्यजनक रचना इथे बघायला मिळते. एरवी बंद असलेले जिने फक्त दसऱ्याच्या दिवशी खुले होतात. 
दीपमाळे समोरील गाभाऱ्याच्या डाव्या बाजूच्या दुसऱ्या कमानीवर अजून एक शिलालेख दिसला. तो शिलालेख असा, 


सरांच्या वाचनानुसार वरील शिलालेख हे दर्शवतो,शिलालेखाचा सरांनी सांगितलेला अर्थ आहे (पान नं ३४६): शालिवाहन शकाच्या १७०६ व्या वर्षी कोर्धीनाम संवत्सरातील पौष शुद्ध एकादशी या दिवशी (बुधवारी) कसबे राशीन येथील भुजंगअप्पाचा मुलगा महादाप्पा शेटे यांनी दरवाजाचे' बांधकाम केले किंवा बांधायला सुरुवात केली. 

गाभाऱ्याच्या मागील बाजूस ओवऱ्या असून काही मूर्ती चौथऱ्यामधे स्थापित आहेत.इथे ओवरीच्या दर्शनी भागावर खालील शिलालेख आहेसरांच्या वचनानुसार शिलालेख असा आहे,शिलालेखाचा सरांनी सांगितलेला अर्थ आहे (पान नं ३४७): शालिवाहन शकाच्या १७१० व्या वर्षी किलकनाम संवत्सरातील चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी सोमवारी कसबे राशीन येथील महादाप्पाचा मुलगा सदाशिव शेटे यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले किंवा बांधायला सुरुवात केली. 

मंदिराच्या आवारात गणपतीची शेंदूर अर्चित, दुर्वाफुलांच्या हाराने नटलेली प्रतिमा एकटक पाहत रहावे अशी.मंदिराच्या गाभाऱ्यात उजवीकडील राशीनची यमाई आणि डावीकडील तुळजापूरची 

तुकाई अशा दोन सुरेख-सुबक मूर्ती आहेत. मूर्तींच्या चेहऱ्यावर तेज पाहत पाय तिथून निघत नाही.
मंदिराचा कळस विविध रंगातील आकर्षक देवदेवतांनी फुललेला आहे.मंदिराच्या बाहेरील सभामंडपात वीरगळ, सतीशिळा आहेत. तसेच खरूजाई देवीची प्रतिमा आहे.शिलालेख, यमाई-तुकाई देवी, डोलणाऱ्या दीपमाळा अशी संपन्नता लाभलेले राशीनचे हे वैभवशाली मंदिर. त्याची सुंदरता खालील फोटोतून तर दिसतेच परंतु प्रत्यक्ष पाहून ते सौंदर्य नजरेत साठवणे ही अनुभूती अलौकिकच!संदर्भ: श्री. महेश तेंडुलकर लिखित, "मराठी- संस्कृत शिलालेखांच्या विश्वात". पान नं ३४५ ते ३४७ 

फोटो आभार: टीम-फिरस्ती महाराष्ट्राची आणि Deepinder Kapany sir
खास आभार: अनुराग वैद्य आणि शंतनू परांजपे. ब्लॉग साठी आवश्यक संदर्भ या दोघांनी पुरवले. 

राशीन चे वैभव बघण्यासाठी उत्सुक फिरस्ती-टीम 😇😇😇आपल्या प्रतिक्रिया ब्लॉग खाली नक्की पोस्ट करा. 

धन्यवाद!

पुढील ब्लॉग मधे वाचू एका अनोख्या मंदिराची कहाणी..............

श्री. कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर येथील मंदिरात कोरलेली बडबडे कासव आणि बगळ्याची बोधकथा


प्रगती, माझ्या वहिनीच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जवळील खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर बघायचे ठरले. रस्ता विचारत आणि मंदिराची माहिती वाचत खिद्रापूर गाठलं.

शिल्पवैभवाचा अद्भुत कलाविष्कार असलेले शिवमंदिर पाहून थक्क झालो. स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळगृह आणि गाभारा अशी सुरेख मंदिर रचना.

अंतराळगृहातील खांबांवर पंचतंत्रातील काही गोष्टी कलात्मकतेने कोरलेल्या दिसल्या. त्यातील अशाच एका बोधकथात्मक कलाकृतीने लक्ष वेधून घेतले. उडणारे बगळे आणि बडबड्या कासवाची पंचतंत्रातील गोष्ट एका खांबावर कोरलेली दिसली.

लहानपणापासून ऐकत आलेली हो गोष्ट. तळ्याकाठी पाणी पिणाऱ्या येणाऱ्या बगळ्यांना उडताना पाहून कासवालाही एकदा उडण्याची इच्छा झाली. त्याने आपली इच्छा बगळ्यांना बोलून दाखवली. आपल्या बडबड्या मित्राची इच्छा पूर्ण करण्याचे बगळ्यांनी ठरवले. कासवाच्या युक्तीनुसार बगळे एक काठी घेऊन आले. उडाल्यानंतर बोलण्यासाठी तोंड न उघडण्याची पूर्वसूचना बगळ्यांनी कासवाला दिली. तसे केलेस तर  खाली पडून तुझा मृत्यू संभवतो ह्याची कल्पना देखील दिली. कासव न बोलण्याच्या अटीवर उडण्यास तयार झाले. ठरल्यानुसार काठीची दोन्ही टोके दोन बगळ्यांनी आपल्या चोचीत पकडली. कासवानेही दोन्ही बगळ्यांच्या मधोमध उभे राहून काठी आपल्या आपल्या तोंडात पकडली. बगळे कासवाला घेऊन उंच उडाले. उंच उडल्यावर खाली दिसणारे नयनमनोहर निसर्गदृश्य पाहून कासव खूष झाले. प्रसंगावधान न राखता कासवाने निसर्गाविष्काराचे कौतुक करण्यासाठी तोंड उघडले आणि काठीवरची पकड सुटल्याने ते उंचावरून खाली पडून मृत्यू पावले. 

कासवाला उडण्याची इच्छा होणे, गावात दुष्काळ पडल्याने बगळ्यांनी दूरदेशी जाण्याचे ठरवणे इ. विविध प्रकारात गुंफलेली ही गोष्ट, तसेच गोष्टीचे तात्पर्यः अर्थात बोध देखील विविध! मित्रांचे न ऐकल्याने काय होते, प्रसंगावधान किती महत्वाचे इ. असो.

मंदिरावरील ही गोष्टीरूप कलाकृती पाहताना मन मात्र हरखून गेले. कलाकृतीवरून नजर हटेना. खांबावरील इतकाश्या छोट्या चौकोनात अत्यंत सुबक रित्या ही बोधकथा कोरलेली!

कोणाला ही बोधकथा कोरावी वाटली? कोणी ती इतकी सुबक कोरली? का कोरली ही बोधकथा? प्रश्नाचं काहूर माजलं.

हे मंदिर म्हणजे फक्त शिवाच दर्शन नाही तर तो एक इतिहास आहे, एक समाजशिक्षण आहे, एक संस्कृती आहे, एक समाजदर्शन आहे! अध्यात्म, पौराणिक कथा, समाजदर्पण यांचा अनोखा संगम आहे! 

एकेक शिल्प आणि त्यामागील आशय समजून घेताना एक भेट पुरेशी नाही हा बोध झाला. पुर्नभेटीची मनीषा ठेवत आणि पाहिलेले शिल्पवैभव मनात साठवत खिद्रापुर सोडलं.

हो, सर्वात महत्वाचे! प्रगतीला, वाढदिवसाची यापेक्षा इतकी सुंदर भेट ती काय असू शकणार होती?|| पायोजी मैंने प्रेम "रतन" धन पायो || (रतनगड ट्रेक, २ जून २०१९)ब्लॉगच शीर्षक वाचून चमकलात का? एखादे रत्न चमकावे तसे?

"Jewel of Sahyadri " उक्तीने नावारूपास आलेला आपला "रतनगड"! (शीर्षकात म्हणून तर त्याला अवतरण चिन्ह लाभले!)

एखादे रत्न "लाभावे" लागते अस. म्हणतात. रतनगड मला "लाभला"! तो दिवस होता २ जून २०१९.

अहमदनगर जिल्हा, भंडारदरा धरण जलाशय, रतनवाडी बेस गाव, साधारण ४२५५ फुट उंची असा हा रतनगड! 


रतनवाडी गावातून गडाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आदल्या रात्री असंख्य काजवे पाहिले. डोळे अगदी दिपून गेले. "जुगनू" नाव यावेळी अधिक भावस्पर्शी वाटले!

रतनगडाच्या छायेत विसावलेल्या सुप्रसिद्ध अमृतेश्वर मंदिराचा घंटानाद पहाटेच्या समयाला मनात रुंजी घालत होता.


श्री. अमृतेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवर रतनगड आणि खुट्टापुष्करिणी
६.३० ची वेळ! रतनवाडी जागी होत होती. उदयास आसुसलेला भास्कर, त्याच्या कोवळ्या किरणांनी परिसर जणू सुवर्णजडित झळाळी लाभलेला, प्रवरा नदी अर्थात अमृतवाहिनी भास्कराच रूपड "पाण्यात पाहत होती", 


प्रवरा नदी अर्थात अमृतवाहिनी 

असंख्य पक्षी चिवचिवाट करून झुंजूमुंजू झाल्याची जणू वर्दी देत होते, अर्जुन सारखे वृक्ष आज दर्शन देण्यास  अधीर झालेले....


अर्जुन वृक्ष

वाटेवर काही मुली जांदा नावाच्या झाडाची पाने तोडून त्याचे द्रोण बनवत होती. 


जान्द्याची पाने

ह्या द्रोण मधे करवंद, जांभळे भरून विकत होती. अवीट गोडीचा रानमेवा मनसोक्त चाखत ट्रेक सुरु होता.


करवंद

जांभूळ

दूरवर रतनगड आणि खुंटा (खुट्टा) खुणावत होते. 


रतनवाडीतून दिसणारा रतनगड आणि खुट्टा


ट्रेक

मधल्या घळीत ढगांची रेलचेल सुरु होती. 
आमच्या प्रशांत ने गडावर आधीच हजेरी लावून ढगांची रेलचेल कॅमेऱ्यात टिपून घेतलेली.


रतनगडावरून दिसणारे नेत्रदीपक दृश्य

घनदाट जंगल, आजूबाजूला बहरलेली करवंद-जांभळ, कच्ची-पिकलेली कैरी, झाडावर लगडलेली उंबर...

झाडांची शीतलछाया, हलकासा गार वार, प्रखर होत जाणारी भास्कराची किरणे....  
निशब्दपणे मार्गक्रमण करण्याचा हा अनुभव हृद्यस्पर्शीच!हातात ट्रेकिंग स्टीक, डोक्यावर हॅट घालून माझा ट्रेकप्रवास सुरु होता.
जंगलातून जाणारी ही ट्रेक वाट अत्यंत खडी अशी जाणवली नाही. त्यामुळे दमछाक फारशी झाली नाही.

कात्राबाई आणि रतनगड कडे जाणाऱ्या थांब्यावर नाश्ता झाला.


रतनगड आणि कात्राबाई संयोगबिंदू


मी सोडले तर सर्व सहभागी या ग्रुपला नवखे. काहींचा तर पहिलाच ट्रेक! परंतु सर्वजणांनी खूप छान ट्रेक केला. साधारण दहाच्या सुमारास लोखंडी शिड्या गाठल्या.सर्वात वरची लोखंडी शिडी 

गडाचा पहिला अर्थात गणेश दरवाजा. दरवाज्यातून गडाचा खुंटा (खुट्टा), रत्नादेवीचे मंदिर आणि गुहे कडे जाणारी पाऊलवाट मोहक दिसत होती. 


गणेश दरवाजागणेश दरवाजावरील कोरीव मूर्ती आणि नक्षीकाम

गडाचा हा दरवाजा अत्यंत देखणा आणि सुबक. गणेश, हनुमान, विष्णू यांच्या कोरलेल्या प्रतिमा, आकर्षक नक्षीकाम सारख्या गोष्टी दरवाजाच्या देखणेपणात भर घालणाऱ्या.

दरवाज्यातून आत आल्यावर समोर दिसतात ते अतिभव्य असे कात्राबाई, करंधा आणि आजोबा डोंगर!


गडावरून दिसणारे कात्राबाई, करंधा आणि आजोबा डोंगररांग

डावीकडे एक गोलाकार बुरुज, नाव आहे राणीचा हुडा.


राणीचा हुडा

इथून आम्ही गडफेरी सुरु केली. पाण्याच्या सात टाक्या, 


सप्तटाके

अति भव्य कोकण दरवाजा, पिण्याचे थंड पाण्याचे टाके, सांदण दरी पाहत पाहत आलो ते आकर्षक नेढ्याकडे! खडी चढाई. बरीचशी निसरडी. नेढे! एक अफलातून नैसर्गिक अविष्कार! इथून दिसणारा नजरा आणि अखंडित वाहणारा थंड हवेचा झोत अनुभवण्यासारखा! थकावट घालवून शरीर आणि मन फ्रेश करणारे हे ठिकाण!

सर्वांग सुंदर निसर्गाविष्कार-नेढे

नेढ्याकडून निघालो ते त्र्यंबक दरवाजाकडे. अत्यंत छोटी पायवाट. एका बाजूला दरी. एका बाजूच्या खडकांचा घट्ट आधार घेत त्र्यंबक दरवाजाजवळ आलो. मला तर जीवधन किल्ल्यावरील दरवाजाचीच आठवण झाली. किती भव्य तो दरवाजा आणि साम्रद आणि रतनवाडी कडे गावाकडे जाणारी आत्यंतिक खोल घळ! 


त्र्यंबक दरवाजा-साम्रद गावाकडील घळ


त्र्यंबक दरवाजा

ह्या दरवाज्याकडून आम्ही आलो ते रत्नादेवी मंदिर आणि गुहेकडे.


गुहा 


मी तर अचंबित झाले. कशी रचना आहे ह्या गडाची? जितकी आकर्षक आणि मोहक  तितकीच काळजाचा ठोका चुकवणारी! मग कातळ कडेलोट पॉइंट असो, गडाचे अद्वितीय दरवाजे असो, गडफेरीची अरुंद पाऊलवाट असो, विशाल गुहा असो की आजुबाजूच्या अजस्त्र डोंगररांगा!

अधिक विचार करताना हे ही जाणवल की उगाच गडाच नाव रतनगड नाही, ह्या गड परिसरात असंख्य रत्न दडलेली आहेत. खुंटा (खुट्टा) एक अजब आकर्षक रचना, प्रवरा अर्थात अमृतवाहिनी नदीचे उगमस्थान, मोहक कात्राबाई आणि आजोबा डोंगररांग, सृष्टीविष्कार सांदण दरी, सर्वोच्च कळसुबाई शिखर, १२०० वर्षापूर्वीचे हेमाडपंथी शैलीतील अमृतेश्वर मंदिर, अतिभव्य त्र्यंबक दरवाजा! सह्याद्रीतील हे सर्व कोहिनूरच!

कोहिनूर तत्सम रतनगड मला असा लाभला! आत्यंतिक समाधान ह्या ट्रेक ने दिले.

दुपारच्या दोन वाजता गड उतराई सुरु करून संध्याकाळी पाच वाजता रतनवाडीला आलो.

आलेल्या सर्व ट्रेक सहभागींचे प्रेम लाभले. आनंद ने तर माझ्या प्रत्येक पावलावर मला साथ केली. त्याचे सहभावनेने ओतप्रोत जेस्चर माझ्यासाठी आठवणीचा कायमस्वरूपी ठेवा आहे. 
आहे ना एकदम सार्थ शीर्षक " पायोजी मैंने प्रेम रतन धन पायो"! सहभागींचे प्रेम, ओंजळीत भरभरून आलेली निसर्ग रतने आणि आत्मविश्वासाचे धन!

और क्या चाहिए?फोटो आभार: ट्रेक टीम

खास आभार: माची इको अॅॅन्ड रुरल टुरिझम (राजकुमार डोंगरे, प्रशांत शिंदे, अमित कुतवळ, अंकुश तोडकर आणि ललिता डोंगरे)