|| पायोजी मैंने प्रेम "रतन" धन पायो || (रतनगड ट्रेक, २ जून २०१९)



ब्लॉगच शीर्षक वाचून चमकलात का? एखादे रत्न चमकावे तसे?

"Jewel of Sahyadri " उक्तीने नावारूपास आलेला आपला "रतनगड"! (शीर्षकात म्हणून तर त्याला अवतरण चिन्ह लाभले!)

एखादे रत्न "लाभावे" लागते अस. म्हणतात. रतनगड मला "लाभला"! तो दिवस होता २ जून २०१९.

अहमदनगर जिल्हा, भंडारदरा धरण जलाशय, रतनवाडी बेस गाव, साधारण ४२५५ फुट उंची असा हा रतनगड! 



रतनवाडी गावातून गडाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आदल्या रात्री असंख्य काजवे पाहिले. डोळे अगदी दिपून गेले. "जुगनू" नाव यावेळी अधिक भावस्पर्शी वाटले!

रतनगडाच्या छायेत विसावलेल्या सुप्रसिद्ध अमृतेश्वर मंदिराचा घंटानाद पहाटेच्या समयाला मनात रुंजी घालत होता.


श्री. अमृतेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवर रतनगड आणि खुट्टा




पुष्करिणी
६.३० ची वेळ! रतनवाडी जागी होत होती. उदयास आसुसलेला भास्कर, त्याच्या कोवळ्या किरणांनी परिसर जणू सुवर्णजडित झळाळी लाभलेला, प्रवरा नदी अर्थात अमृतवाहिनी भास्कराच रूपड "पाण्यात पाहत होती", 


प्रवरा नदी अर्थात अमृतवाहिनी 

असंख्य पक्षी चिवचिवाट करून झुंजूमुंजू झाल्याची जणू वर्दी देत होते, अर्जुन सारखे वृक्ष आज दर्शन देण्यास  अधीर झालेले....


अर्जुन वृक्ष

वाटेवर काही मुली जांदा नावाच्या झाडाची पाने तोडून त्याचे द्रोण बनवत होती. 


जान्द्याची पाने

ह्या द्रोण मधे करवंद, जांभळे भरून विकत होती. अवीट गोडीचा रानमेवा मनसोक्त चाखत ट्रेक सुरु होता.


करवंद

जांभूळ

दूरवर रतनगड आणि खुंटा (खुट्टा) खुणावत होते. काही पुस्तकात ह्याचा उल्लेख डूबा असाही आहे. 


रतनवाडीतून दिसणारा रतनगड आणि खुट्टा


ट्रेक

मधल्या घळीत ढगांची रेलचेल सुरु होती. 




आमच्या प्रशांत ने गडावर आधीच हजेरी लावून ढगांची रेलचेल कॅमेऱ्यात टिपून घेतलेली.


रतनगडावरून दिसणारे नेत्रदीपक दृश्य

घनदाट जंगल, आजूबाजूला बहरलेली करवंद-जांभळ, कच्ची-पिकलेली कैरी, झाडावर लगडलेली उंबर...

झाडांची शीतलछाया, हलकासा गार वार, प्रखर होत जाणारी भास्कराची किरणे....  
निशब्दपणे मार्गक्रमण करण्याचा हा अनुभव हृद्यस्पर्शीच!







हातात ट्रेकिंग स्टीक, डोक्यावर हॅट घालून माझा ट्रेकप्रवास सुरु होता.




जंगलातून जाणारी ही ट्रेक वाट अत्यंत खडी, अंगावर येणारी अशी जाणवली नाही. त्यामुळे दमछाक फारशी झाली नाही.

कात्राबाई आणि रतनगड कडे जाणाऱ्या थांब्यावर नाश्ता झाला.


रतनगड आणि कात्राबाई संयोगबिंदू


मी सोडले तर सर्व सहभागी या ग्रुपला नवखे. काहींचा तर पहिलाच ट्रेक! परंतु सर्वजणांनी खूप छान ट्रेक केला. साधारण दहाच्या सुमारास लोखंडी शिड्या गाठल्या.



सर्वात वरची लोखंडी शिडी 

गडाचा पहिला अर्थात गणेश दरवाजा. दरवाज्यातून गडाचा खुंटा (खुट्टा), रत्नादेवीचे मंदिर आणि गुहे कडे जाणारी पाऊलवाट मोहक दिसत होती. 


गणेश दरवाजा



गणेश दरवाजावरील कोरीव मूर्ती आणि नक्षीकाम

गडाचा हा दरवाजा अत्यंत देखणा आणि सुबक. गणेश, हनुमान, विष्णू यांच्या कोरलेल्या प्रतिमा, आकर्षक नक्षीकाम सारख्या गोष्टी दरवाजाच्या देखणेपणात भर घालणाऱ्या.

दरवाज्यातून आत आल्यावर समोर दिसतात ते अतिभव्य असे कात्राबाई, करंधा /एका पुस्तकात कथरा डोंगर असा उल्लेख आढळला) आणि आजोबा डोंगर!


गडावरून दिसणारे कात्राबाई, करंधा आणि आजोबा डोंगररांग

डावीकडे एक गोलाकार बुरुज, नाव आहे राणीचा हुडा.


राणीचा हुडा

इथून आम्ही गडफेरी सुरु केली. पाण्याच्या सात टाक्या, 


सप्तटाके

अति भव्य कोकण दरवाजा, पिण्याचे थंड पाण्याचे टाके, सांदण दरी पाहत पाहत आलो ते आकर्षक नेढ्याकडे! खडी चढाई. बरीचशी निसरडी. नेढे! एक अफलातून नैसर्गिक अविष्कार! इथून दिसणारा नजरा आणि अखंडित वाहणारा थंड हवेचा झोत अनुभवण्यासारखा! थकावट घालवून शरीर आणि मन फ्रेश करणारे हे ठिकाण!

सर्वांग सुंदर निसर्गाविष्कार-नेढे

नेढ्याकडून निघालो ते त्र्यंबक दरवाजाकडे. अत्यंत छोटी पायवाट. एका बाजूला दरी. एका बाजूच्या खडकांचा घट्ट आधार घेत त्र्यंबक दरवाजाजवळ आलो. मला तर जीवधन किल्ल्यावरील दरवाजाचीच आठवण झाली. किती भव्य तो दरवाजा आणि साम्रद आणि रतनवाडी कडे गावाकडे जाणारी आत्यंतिक खोल घळ! 


त्र्यंबक दरवाजा-साम्रद गावाकडील घळ


त्र्यंबक दरवाजा

ह्या दरवाज्याकडून आम्ही आलो ते रत्नादेवी मंदिर आणि गुहेकडे.


गुहा 


मी तर अचंबित झाले. कशी रचना आहे ह्या गडाची? जितकी आकर्षक आणि मोहक  तितकीच काळजाचा ठोका चुकवणारी! मग कातळ कडेलोट पॉइंट असो, गडाचे अद्वितीय दरवाजे असो, गडफेरीची अरुंद पाऊलवाट असो, विशाल गुहा असो की आजुबाजूच्या अजस्त्र डोंगररांगा!

अधिक विचार करताना हे ही जाणवल की उगाच गडाच नाव रतनगड नाही, ह्या गड परिसरात असंख्य रत्न दडलेली आहेत. खुंटा (खुट्टा) एक अजब आकर्षक रचना, प्रवरा अर्थात अमृतवाहिनी नदीचे उगमस्थान, मोहक कात्राबाई, कथरा आणि आजोबा डोंगररांग, सृष्टीविष्कार सांदण दरी, सर्वोच्च कळसुबाई शिखर, १२०० वर्षापूर्वीचे हेमाडपंथी शैलीतील अमृतेश्वर मंदिर, अतिभव्य त्र्यंबक दरवाजा! सह्याद्रीतील हे सर्व कोहिनूरच!

कोहिनूर तत्सम रतनगड मला असा लाभला! आत्यंतिक समाधान ह्या ट्रेक ने दिले.

दुपारच्या दोन वाजता गड उतराई सुरु करून संध्याकाळी पाच वाजता रतनवाडीला आलो.

आलेल्या सर्व ट्रेक सहभागींचे प्रेम लाभले. आनंद ने तर माझ्या प्रत्येक पावलावर मला साथ केली. त्याचे सहभावनेने ओतप्रोत जेस्चर माझ्यासाठी आठवणीचा कायमस्वरूपी ठेवा आहे. 




आहे ना एकदम सार्थ शीर्षक " पायोजी मैंने प्रेम रतन धन पायो"! सहभागींचे प्रेम, ओंजळीत भरभरून आलेली निसर्ग रतने आणि आत्मविश्वासाचे धन!

और क्या चाहिए?



फोटो आभार: ट्रेक टीम

खास आभार: माची इको अॅॅन्ड रुरल टुरिझम (राजकुमार डोंगरे, प्रशांत शिंदे, अमित कुतवळ, अंकुश तोडकर आणि ललिता डोंगरे)

3 comments:

Vishal Kakade said...

Good Comeback!!😊😊

shubhangiwalunj said...

Avismaraniy trek ...

Unknown said...

मस्तंच!!