प्रसन्नगडफेरी, २० जुलै २०१९

१८ नोव्हेंबर २०१७ नंतर २० जुलै २०१९ रोजी चावंड उर्फ प्रसन्नगड गेले. दुसऱ्या भेटीत किल्ला कसा भावतोय ते पाहण्याची उत्सुकता तर होतीच शिवाय अनुभव, माहिती, दृष्टीकोन आणि फोटोग्राफी कौशल्याने मी देखील किंचित का होईना पण समृद्ध झाले होते (समृध्द झाले आहे❤)


गेल्यावेळी आम्ही गावातून गडपायथ्याला आलो होतो. यावेळी पाहता आली ती प्रसन्नगड ची कमान❤


कमानीतून जाणारा तुकतुकीत डांबरी रस्ता..

वाटेत दिसली ही काही सुंदर झाडे..पाहत गेले फोटो मात्र काढले ते किल्ल्यावरून परतताना....

फायकस ट्री
अर्जुन वृक्ष

गडाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा फलक यावेळीच दिसला...


किंचित चढून गेल्यावर आल्या त्या गडाचा पायथा आणि किल्ल्याचे माहिती देणारे फलक..
इथून पाहताना किल्ला अधिकच भावला...किल्ल्यावर नेणाऱ्या दगडी पायऱ्या..पायऱ्या चढायला सुरुवात केल्यानंतर एका उंचीवरून दिसणारे मनोहर दृश्य..चावंडवाडीच्या पार्श्वभूमीवर दिसताहेत शंभू महादेव डोंगर आणि धुक्यात लाजणारा नवरा-नवरी डोंगर


अजून थोड्या उंचीवरून दिसला माणिकडोह धरणाचा शांत जलाशय..


रेलिंग आता दृष्टीपथात आलेले..


दगडात कोरलेल्या अति अरुंद खोबण्या..एका वेळी एकच जण जाऊ शकेल इतक्या अरुंद..


सावधानतेने ह्या पायऱ्या चढून गेल्यावर होत्या उंच दगडी पायऱ्या ...


बाजूच्या डोंगर कपारीवर विसावले होते गोगलगायीचे शंख...पर्जन्य ऋतूचे हे वैशिट्य .....


आला की मुख्य दरवाजा ...


किल्ले दरवाज्यावरील गणेश प्रतिमा..


इथून दिसणारा किल्ल्या खालील नजारा...


इथल्या एका भिंतीवर आहे अजून एक कोरीव गणेश प्रतिमा..


मुख्य दरवाजातून किल्ल्यावर नेणाऱ्या दगडी पायऱ्या..


पायऱ्या चढून गेलो की बाहेरचा सभामंडप भुलवणारा..


दरवाज्यात उभे राहून..


पायऱ्या पूर्ण चढून गेल्यावर उजवीकडून किल्ल्यावर जाणारी दगडवाट..


या पायऱ्या चढून गेल्यानंतर दिसणारा किल्ल्याचा भाग..पर्जन्य ऋतूचे अजून एक वैशिट्य....किल्ल्यावर सर्वत्र फुललेली रानआले..


पाण्याचे टाके आणि किल्ल्यावरील मंदिरावशेष..


महादेव मंदिराचे काही अवशेष...


मंदिराच्या खांबावरील सुरेख नक्षीकाम ..मधल्या फोटोत एक कोरीव मूर्ती दिसत आहे...


गर्भगृहाबाहेरील शिवलिंग..


कीर्तिमुख...


मंदिराच्या अंतराळ कक्षातून  दिसणारी सुंदर पुष्करिणी..


गर्भगृहातून दिसणारा विलोभनीय नजरा..


पुष्करिणी च्या कडेला असलेली देवकोष्ठ..समोरून पहिले तर देवकोष्ठामधे काही प्रतिमा ठेवलेल्या स्पष्ट दिसतात..पुष्करिणीच्या बाजूला वराह शिल्प...


मंदिराच्या विरुद्ध दिशेने पहिले तर मंदिर आणि त्याचे पुष्करिणीतील सुंदर प्रतिबिंब..


मंदिर परिसर आणि मंदिराचे शिल्पवैभवाची यावरून कल्पना करता येते.

गड फेरी करताना दिसलेला नक्षीदार तळखडा..


पर्जन्य ऋतुचे आणखी एक वैशिष्ट्य...पाण्याने तुडूंब भरलेली पाणटाकी..


किल्ल्यावरील सप्ततळे..


किल्ल्यावर गवत वाढलेले आणि पायवाट निसरडी..लेणी यावेळी पाहता आली नाहीत..हा आधीचा फोटो..


किल्ल्यावरील चामुंडा देवी मंदिराकडे जाणारी वाट..एका छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे..


किल्ल्यावरील चामुंडा देवी मंदिर...असं म्हणतात की "चामुंडा" नाव उच्चाराचा  अपभ्रंश होता होता नाव पडले "चावंड"!


गड उतराई करण्याआधी..


साधारण दीडवर्षापूर्वी आणि आता..आधी लिहिल्याप्रमाणे माझ्यातच बरेच बदल झाले आणि किल्ला पहिला त्यातही फरक होताच....

❤आताचा ट्रेक विना ट्रेकिंग स्टीक केला...
❤आधी गडफेरी केली नव्हती ती आता केली...
❤मंदिर आणि लेणी बद्दल थोडेफार ज्ञान तेव्हा नव्हते जे आता आहे...
❤फोटो काढताना फ्रेम कशी असावी आणि फोटो कलात्मक कसा काढता येईल ही कला आता जमू लागली...
❤माहितीमुळे समृद्ध झाल्याने लिखाणातही तसे बदल आता झाले..


खरच....तोच किल्ला/गड/ट्रेक परत परत करत रहावा ते याचसाठी....

एक वेगळ्या नजरेने तो पाहता येतो, अनुभवता येतो आणि लिहिताही येतो.❤

नाही का?

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

Special thanks to Zenith Odysseys and Shraddha Mehta❤


दिलखेचक सोंडाई किल्ला ! ट्रेक विथ गिरीप्रेमी, २१ जुलै २०१९

साधारण दोन वर्षापासून सोंडाई किल्ला पाहण्याची मनीषा बाळगून होते. किल्ला सोपा आहे , Off beat आहे, पावसाळ्यात किल्ल्यावरून मनमोहक निसर्गाविष्कार दिसतो असं बरच काही ऐकून होते!

गिरीप्रेमी तर्फे होणाऱ्या निसर्गानंद ट्रेक ग्रुप मधे सोंडाई किल्ल्याची पोस्ट वाचली. माझ्यासाठी जणू दुग्धशर्करा योग जुळून आला.

सोंडाई किल्ला पाहण्याची मनीषा पूर्ण होणार आणि तीही गिरीप्रेमी संस्थेबरोबर...और क्या चाहिये?
वेळ न दवडता ट्रेकच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या.

प्रसाद जोशी, मा. एव्हरेस्ट, मा. धौलागिरी, मा. कांचनजुंगा सारखे अतिउंच शिखर समीटर आमच्यासोबत ट्रेक ला आहे हे कळल्यावर तर दुग्धशर्करा योग प्रबळ झाला.

रविवार, २१ जुलैची वाट पाहू लागले....

बुधवार, १७ तारखेला एका मैत्रिणीचा फोन आला. ती एकखांबी उत्तम ट्रेक ऑर्गनायझर! साधारण बत्तीस जणांचा ग्रुप घेऊन चावंड, कुकडेश्वर मंदिर आणि नाणेघाट असा प्रोग्रॅम तिने ठरवलेला. सहकार्यासाठी तिने विनंती केली. मी होकार दिला खरा. पण मनात धाकधूक. शनिवारी चावंड इ. करून रविवारी ट्रेक माझ्याकडून होईल का? की यावेळी हातात आलेली संधी निसटणार?

शनिवारचा प्रोग्रॅम उत्तम पार पडला होता तरी घरी यायला जवळजवळ मध्यरात्र झाली. मैत्रिणीला हळहळ वाटली. तिच्यामुळे माझा रविवारचा ट्रेक बारगळतोय की काय. मी ही आशा जवळजवळ सोडलीच. घरी आल्यावर एक निश्चय केला. उद्याचा ट्रेक करायचाच. गाडीत झोपेन, हळूहळू ट्रेक क्रेन, सोमवारी सुट्टी घेईन.. काहीही करेन.पण आलेली ही संधी सोडणार नाही.

रात्री फक्त साडे-चार तासांची झोप मिळाली. सुदैवाने सलग शांत झोप लागली. ४.३० च्या गजराने उठून, आवरून रविवारी सकाळी ६ वाजता फर्ग्युसन कॉलेज गेट ला हजर झाले.

साधारण पावणेसात ला टीमचे ट्रेकसाठी प्रस्थान झाले. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने, खोपोली, खालापूर, बोरगाव, सोंडेवाडी असा प्रवास करून (नाश्त्याला मध्यांतर झाले ते कर्जत फाट्यावरील पूर्वा व्हेज मधे) पायथ्याशी, सोंडेवाडीत आलो.

प्रवासात झोपण्याचा प्रयत्न केला. झोप आली नाही पण डोळे मिटून शांत बसून राहिल्याने ताजीतवानी झाली. ट्रेक साठी सज्ज झाले म्हणा ना.....

पुणे आणि मुंबई वरून आलेली आमची ७२ जणांची सहभागी टीम होती.

सोंडेवाडी! एक टुमदार वाडी. खरं तर आदिवासी पाडा! ठाकर समाजाच्या आदिवासी लोकांची वसाहत! पाड्यातील नजरेच्या टप्प्यात आलेली घरे अतिशय आखीव-रेखीव! फरशा किंवा शेणाने सारवलेली भली मोठी ओसरी पाहून तर माझे मन हरखून गेले.   घरांंगण एकदम स्वच्छ, नीटनेटक आणि आटोपशीर!

वाडीतून दिसला दिलखेचक सोंडाई किल्ला !

गिरीप्रेमी टीमची ओळख परेड झाली. अभिजित बेल्हेकर सर, दिनेश कोतकर, अंकित सोहोनी, लोकेश शिंदे, अतुल मुरमुरे, विशाल कडुस्कर, रोहन देसाई, सुयश मोकाशी, धनंजय मदन, ऐश्वर्या घारे, अंजली केळकर......

प्रसाद जोशी यांच्या असण्याने दुग्धशर्करा योग प्रबळ झालेला. नुकत्याच झालेल्या मा. कांचनजुंगा इको एक्सपीडीशन मधील त्याच्या सोबतचा समीटर जितेंद्र गवारे देखील ह्या ट्रेक ला आम्हाला साथ देणार आहे हे कळल्यावर तर असे वाटले की "सबूरी का फल इतना भी मिठा हो सकता है?"

प्रसाद, जितेंद्र, अभिजित सर या सर्वांसोबत गप्पागोष्टी !

ट्रेक संस्मरणीय होणार हे नक्की होतं.

सोंडाई किल्ला! समुद्रसपाटीपासून साधारण १२०० फुट उंच.किल्ल्यावर देवीआई ची प्रतिमा आहे. किल्ल्याचा आकार सोंडेसारखा आहे. पायथ्याच गाव सोंडेवाडी. म्हणून किल्ल्याचे नाव सोंडाई!किल्ल्यावर जसे सोंडेवाडीतून जाता येते तसेच वर जाता येते वावर्ले गावातून.

सोंडाई किल्ला दिलखेचक! वावर्ले आणि मोरबे धरणाचा विस्तृत जलाशय, कर्जत परिसर, किल्ल्यावर जाईपर्यंत साथ देणारा इर्शाळगड आणि प्रबळगड, धुक्यातूनही आपले लाजवाब दर्शन देणारे माथेरानचे विस्तीर्ण पठार आणि हिरवाईने नटलेले असंख्य डोंगर-दऱ्या!

कोकण-मुंबई जवळ असल्याने ह्युमीड हवामान, रणरणतं ऊन! "पाणी प्या, चालण्यात रिदम ठेवा, सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण करा, कमी बोला" सफरचंद आणि चिक्की बार सोबतच अभिजित सरांच्या सूचना ऐकत सोंडाई किल्ल्या ट्रेक सकाळी दहा वाजता सुरु झाला.

सुरुवातीला दगडी खापऱ्यांंची  पायवाट. हलकासा चढ......हळूहळू चढाई वाढत गेली....

कालच्या ट्रेकमुळे अपुरी झोप, थकलेलं शरीर....त्यात ह्युमीड हवामान, रणरणतं ऊन...घामाच्या धारा हलकेच वाहू लागल्या....

ठरवलं की पायाकडे/जमिनीकडे पाहत चालायचं...किल्ल्याच्या माथ्याकडे नजर टाकायचीच नाही....

अभिजित सर आणि धनंजय सर पुढे होते. आलेल्या पठारावर पाणी पिण्यासाठी ब्रेक घेत होते.

मागच्या काही दिवसात पाऊस झालेला ...काही दगड ओलसर आणि शैवाल स्थिरावलेले..

चढ तसा अंगावर येणारा नव्हता.. अशातच एक कातळटप्पा समोर आला. पार करायला किंचित कठीण! उतरता पाषाण, किंचित ओलसर, शैवालाने माखलेला, उंचीला कमी त्यामुळे काळजी घेतली नाही तर डोके आपटण्याची जास्त शक्यता....

धनंजय सरांनी मला हाताचा आधार दिला . दगडमातीची खाच डोक्याला लागणार नाही याची काळजी घेत आणि दोन्ही हात दगडमातीच्या खाचेवर ठेऊन आधार घेत, चित्त एकाग्र करून टप्पा पार केला!

पुढे असेच दोन टप्पे आले. एका बाजूला दरी आणि हा निसटता पाषाण !

किल्ल्यावर जाताना दोन पठार लागले. शिड्या खालचे पठार जणू निसर्गठेवाच! सभोवतालचा परिसर मनमोहक!

ह्या पठारावरून सोंडाई किल्ल्याचा शिडीवरून जाणारा माथा बेमालूम "दिलखेचक"!
पहिली शिडी चढून गेला की डावीकडे दोन पाण्याची टाकी आहेत.पाणी वाहून जायला पन्हाळीदुसरी शिडी चढून गेल्यावर आहे उजवी कडे दिसले पाण्याचे जोड खांब टाके! पाण्याच्या टाक्याला दगडी खांबाचा आधार दिलेला!आता तिसरी शिडी लागली. जी जात होती थेट गडमाथ्यावर!गडमाथा अगदी छोटा!गडमाथा सूचक लोखंडी काठीवर फडकणारा भगवी पताका! माथ्यावर एका झाडावरअसंख्य घंटाचा जुडगा लटकलेला .झाडाखाली विसावलेली सोंडाई देवीची प्रतिमा!
सभोवताली नजर टाकली तर हिरवाई ओढलेले डोंगर आणि दऱ्या. दूरवर दिसणारा इर्शाळगड, प्रबळगड, माथेरान, मोरबे धरण  आणि वावर्ले जलाशय!
किल्ल्याला तटबंदी नाही की नाही काही दुर्गावशेष की प्रवेशद्वार!

सोंडाई हा टेहळणीचा किल्ला!

पायथ्याशी राहणाऱ्या ठाकर समाजाच्या सोंडाई देवीचे स्थान!

दुसऱ्या शिडीवरून एका डोंगराच्या बाजूला किंचित विलग एक ठेंगणा डोंगर सुळका दिसतो. गावकरी त्याला सोंडाई देवीचा भाऊ म्हणतात/मानतात.माथ्यावर विसावल्यावर अभिजित सरांनी किल्ल्याची पार्श्वभूमी सांगितली. सातवाहन काळात जो व्यापार चालत असे त्याच्या पार्श्वभूमीवर लेणी (शेल्टर), किल्ले (पोलीस स्टेशन) आणि व्यापारी मार्ग  त्यांची स्थापना कशी झाली याबद्दलचे सोप्या भाषेत विवेचन सरांनी दिले.

साधारण साडे-बारा च्या सुमारास किल्ले उतराईला सुरुवात केली. एकदम हळूहळू शरीराच्या गतीचा अंदाज घेत उतराई करून दीडच्या सुमारास सोंडेवाडीत परत आलो.

उन्हाने शरीराची लाही लाही झालेली. त्यामुळे शरीर अतिशय थकलेले. सोंडेवाडीत एका समाजमंदिरात विश्रांती घेतली. १५-२० मी डोळे मिटून स्वस्थ बसून राहिले. हळहळू हृदयाची धडधड कमी होत गेली, दम कमी होत गेला, स्फुरण पावलेल्या नसा शांत होत गेल्या, घामाच्या ओलसर धारा कोरड्या होत गेल्या, दारातून आलेल्या वाऱ्याच्या झुळुकीने शीण नाहीसा होत गेला!

चविष्ट जेवणाने उर्जा मिळाली.

प्रसाद आणि जितेंद्र च्या एक्सपीडीशन च्या अनुभव कथन आणि प्रश्न-उत्तराच्या सेशन मुळे स्फूर्ती मिळाली, प्रेरणा मिळाली, प्रोत्साहन मिळाले!जितेंद्र ने माझ्या ट्रेकच्या स्टाईलच कौतुक केल्याने "माझी उंची माझ्याच नजरेतून वाढली"!

क्षणभर विचार आला की ट्रेकला नसते आले तर मी काय गमावले असते?

गिरीप्रेमी टीम सोबत ट्रेक! एक पर्वणी! एक शिकवण!

ट्रेक त्यांनी ज्या पद्धतीने मॅॅनेज केला ते पाहणे /अनुभवणे एक शिक्षण!

प्रत्येक कठीण टप्प्यावर मार्गदर्शन करायला, सहकार्य करायला हजर आणि तत्पर! एकदम शोधक नजर! त्यांचा आजूबाजूला असणारा वावर, जेस्चर, प्रोत्साहन अनुभवून असं वाटलं "अरे हे लोकं आपल्यासोबत असतील तर जगातले कुठलेही शिखर चुटकीसरशी सर होईल"! ही जादू, हा आत्मविश्वास, हे मनोबल, ही प्रेरणा, हा पाठिंबा देण्याची कमाल ह्या सर्वजणांमधून मिळाली!

माझी उंची माझ्याच नजरेतून वाढली! लागोपाठ दोन दिवस ट्रेक मला वाटत मी प्रथमच केले.  माझीच क्षमता मला आजमावता आली! पुढचा ट्रेक करण्यासाठी मनोबल उंचावले!

सबूरीस भाग पडलेल्या सोंडाई किल्ल्याने संस्मरणीय असे आतोनात आत्मिक समाधान दिले!सोमवारी सुट्टी घेऊन विश्रांती घेतली. अनुभवकथनाची रूपरेषा मनात साकारली.

तेच अनुभवकथन खास तुमच्यासाठी!
आवडले का? वाचून नक्की सांगा.
पुन्हा भेटूच.....
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺