पोखरची विस्मयकारक लेणी

पोखर, सासवड जवळील नारायणपूर पासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेले हे गाव! गावात पोहोचलो तसे गावातील शाळेसमोरच्या एका छोट्या डोंगरावर ही लेणी वसली आहेत असे सांगण्यात आले. शाळेसमोरील रस्त्याने डोंगराकडे वाटचाल सुरु केली.  दूरवरून पाहताना इथे लेणी आहेत अशी कल्पना सुद्धा आली नाही.डोंगर चढायला अगदी सोपा.. ५-१० मिनिटात  आम्ही चढून लेण्यांजवळ आलो.
छोट्याशा डोंगरात पोखरलेली ही लेणी. दुमजली.
खालच्या गुहेचे दोन भाग. आतला भाग गाभाऱ्या सारखा.तिथेच दृष्टीस पडली ही मूर्ती! कोणीतरी कोरण्याचा प्रयत्न केला पण काही कारणाने ते पूर्णत्वास गेले नाही.


शेंदूर अर्चित आणि मूर्तीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने तिची ओळख पटणे  खरोखरच कठीण. फक्त कयास बांधला जाऊ शकतो.


मूर्ती कडे निरखून पाहिल्यास तीन मुख असणारी मूर्ती कोरण्याचा प्रयत्न केला आहे असे लक्षात येते.
घारापुरी येथील त्रिमूर्ती शिवरूप स्वरूप कोरण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते.

श्री. क्षेत्र नारायणपूर जवळच असल्याने ही मूर्ती दत्तात्रेयाची सुध्दा असू शकते असा विचार मनात येतो.

ह्या मूर्तीकडे तोंड केल्यास गाभाऱ्यातच उजवीकडे आणि डावीकडे काही प्रतिमा कोरलेल्या दिसतात. त्या नक्की काय आहेत ह्याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

उजवीकडील मूर्तीडावीकडील मूर्ती


ह्या मूर्ती रचना पाहता त्या आठव्या ते नवव्या शतकातील असाव्या असा अंदाज आहे.

वरच्या भागात चढायला किंचित कसरत करावी लागते. वरच्या भागात काही कोरीव कारागिरी नाही. शेंदूर अर्चित काही दगडी प्रतिमा आहेत.
लेणीस्थित डोंगरावरून पुरंदर आणि वज्रगडाचे दर्शन होते.

ह्या लेण्याचा मागोवा घेतल्यास काही माहिती मिळू शकते का हे पाहणे महत्वाचे आहे.

लेणी मात्र अचंबित करणारी आहेत. कोणी बांधली, का बांधली, कशाची मूर्ती कोरण्याचा हेतू होता, का अपूर्ण राहिला..इ. प्रश्न लेणी पाहल्यावर समोर येतात.

ह्या प्रश्नांना मनात घोळवतच डोंगर उतरलो.

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

दि. ७ जुलै २०१९ रोजी पुण्यातील "फिरस्ती महाराष्ट्राची" तर्फे या लेणीला भेट देता आली.

संदर्भ: पुस्तक "फिरस्ती महाराष्ट्राची": लेखक: शंतनू परांजपे आणि अनुराग वैद्य


No comments: