मौजे आजिवलीची " राई" अर्थात "देवराई" भटकंती

बहिणाबाईंं सोबत भटकंती हा योग तसा विरळाच! ९ फेब्रुवारीला साधून आला. भटकंतीचे ठिकाण होते, मौजे आजिवलीची "राई" अर्थात "देवराई"!  

आमच्या कला मावशींचे हे गाव! "दोन्ही ताईंंना "राई" दाखवायची आणि माहेरघरचा पाहुणचार सुद्धा"  मावशींच्या अंगात उत्साह संचारलेला!

पायवाटेने "राई" कडे निघालो. वसंतपंचमीच्या चाहुलीने सुरेख रानफुले सोबतीला होती. रामेटा, दाईटी, कळक (बांबू), गोईरी, मारबीट, माडाची सारीक अशी विविध स्थानिक नावे मावशींंकडून समजली. ज्याची शास्त्रीय नावे माहित करून घ्यायला आवडेल.

जवळ जवळ दोन-अडीच किमी हलका चढ चढत गेल्यावर "राई" त पोहोचलो. सूर्यप्रकाशाशी स्पर्धा करणाऱ्या, विविध प्रकारच्या प्रचंड उंच  वृक्षांनी संमोहित केले.  

सूर्यप्रकाशाच्या हलक्याश्या उन्हात झाडांची जमिनीवर पसरलेली सावली जणू सुरेख रांगोळीच भासत होती.

आल्हाददायक गारवा, प्रसन्न शांतता, पक्षांची मधूनच कोल्हेकुई.....

ह्याच्या पार्श्वभूमीवर "राई" मध्ये किचिंत चढावर विसावलेले "वाघजाई माता मंदिर"!

विस्मयकारक गुहा! मंदिराच्या गाभाऱ्यातून खोल जाणारी अर्धवर्तुळाकार गुहा!

श्री. गणेश आणि देवी मातेची आरती गायून, "राई" तील प्रसन्न शांतता मनात साठवत "राई" तून बाहेर आलो. 

मावशींच्या घरी चिकन, तांदळाची भाकरी, तांदळाच घावन आणि भाताची मेजवानी !

आजिवली! डोंगराच्या कुशीत विसावलेले, पवना धरणाच्या जलाशयाने वेढलेले, तुंग-तिकोना किल्ल्याच्या भव्यतेने नटलेले एक सुरेख गाव!

यावेळी "देवराई"ला भेट दिली ती आनंदासाठी ! पुढच्या वेळी तो भेट  अभ्यासण्यासाठी असेल!परत भेटूच एका नव्या देवराई सोबत!

अद्भुत गोमाशी लेणी, महाराष्ट्र, १७ फेब्रुवारी २०१९


ज्या वृक्षाखाली ध्यान करताना सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तो "बोधिवृक्ष"! हे वाक्य पहिल्यांदा शाळेच्या पुस्तकात वाचलेले! शाळेच्या धड्यात पाहिलेले ते चित्र आजही डोळ्यासमोर आहे!

१७ तारखेच्या वारसा सहलीमध्ये "गोमाशी लेणी" ला भेट दिली. छोट्याश्या गुहेत स्थिरावलेली बुद्धप्रतिमा पाहिली आणि शाळेच्या धड्यात कागदावर रेखाटलेले चित्र "सचित्र" झाले! मी आपसूकच नतमस्तक झाले!

कोंडाणे लेणीला भेट देऊन पाली मार्गे आम्ही "गोमाशी लेणी" इथे आलो. "गोमाशी" रायगड जिल्हा आणि सुधागड तालुक्यातील हे गाव! गोमाशी गावापासून साधारण एक किमी लांब! कोलाडगाव देखील जवळच!

जवळच्या हमरस्त्यावरूनच काय परंतु रस्त्यापासून आत चालायला सुरुवात केली तरीही कल्पना आली नाही. "गोमाशी लेणी" इतकी एकांतात, जंगलात, डोंगराच्या खोबणीत कोरलेली लेणी आहे. लेणी कडे जायला थोड्या पायऱ्या आहेत.


पायऱ्या चढून गेल्यावर एकच गुहा दिसली. गुहेच्या प्रवेशद्वारातून गुहेत प्रवेश केला. 


स्तिमित झाले. समोर पद्मासनात ध्यानस्थ अवस्थेत, बोधिवृक्षाखाली विराजमान, गौतम बुद्धाची सुबक-सुरेख कोरीव शिल्प! जरा निरखून बघितले तर उजवा हात जमिनीला स्पर्श केलेला आणि डावा हात डाव्या पायाला!    


गुहेबाहेर, डोंगराच्या पल्याड होणारा सूर्यास्त, गुहेवर वर्षाव झालेले तांबूस सूर्यकिरण, आसमंतात भरून राहिलेली शांतता, संथ वाहणारी सरस्वती नदी आणि समोर ध्यानस्थ बुद्ध! "कपिलाषष्ठी योग"! एक अत्यंत "दुर्मिळ योग" अनुभवला!

उत्सुकतेपोटी नंतर थोड "गुगल सर्च" केल. दोन गोष्टींनी वेधून घेतलं. पहिलं विख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांनी लिहिलेले " बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष" नावाचे पुस्तक. त्यांनी लिहिले आहे, "पद्मासनातील बुद्धाने त्याचा हात जमिनीला टेकला, जणू तो सूचित करू इच्छित होता की भूमी साक्ष आहे, सिद्धार्थ अविचल होता. तो त्याच्या ध्यान धारणेपासून ढळला नाही. तो त्याची भूमिस्पर्श मुद्रा! (पुस्तकातील चित्र सोबत जोडत आहे) ह्या घटना ज्या वृक्षाखाली घडल्या, सिद्धार्थ ला जेथे शाश्वत सुख शांतीचा मार्ग सापडला व तो बुद्ध झाला, तो वृक्ष होता पिंपळ, अश्वत्थ! सिद्धार्थचा ज्ञानवृक्ष बोधिवृक्ष! Wisdom Tree! "

गुगल ने दाखवलेला दुसरा संदर्भ " Gomashi Monastery , near Kolasd, Maharashta". (सोबत जोडत आहे) त्यात नमूद केले आहे की गोमाशी लेण्यांचा प्रथम शोध Rev J. E. Abbott यांनी १८८९ मधे लावला. १९५४ साली या लेण्याला संरक्षित स्मारक असे घोषित करण्यात आले.

त्या लेखा खाली एक संदर्भ दिला आहे. तो पुढीलप्रमाणे: पुण्यातील डेक्कन कॉलेज चे प्राध्यापक, डॉ. श्रीकांत गणवीर यांचा " Buddhist Caves at Gomashi in Konkan"  हे शीर्षक असलेला रिसर्च पेपर IPRA, vol3, issue2, April-June, 2009, 55-57 ह्या जनरल मध्ये प्रकाशित झाला आहे.
अशी ही दुर्मिळ "गोमाशी लेणी"!


"फिरस्ती महाराष्ट्राची" तर्फे शंतनू परांजपे आणि अनुराग वैद्य यांनी ही लेणी भेट आयोजित केल्याने शाळेतील धडा आज साक्षात सचित्र समोर दिसला! लेणी परिसरातील मांगल्य, पावित्र्य मी अनुभवले.
नक्की भेट देऊन तुम्ही तुमच्या परीने तो अनुभव घ्या!