खिद्रापूर येथील श्री. कोपेश्वर मंदिरावर कोरलेले वात्सल्यपूर्ती सुंदरीशिल्प

अलीकडेच कोल्हापूर जवळील खिद्रापूर येथील श्री. कोपेश्वर मंदिराला भेट दिली. मंदिराच्या आतील भागात जशा विविध शिल्पाकृती कोरलेल्या आहेत, तशाच असंख्य शिल्पाकृती मंदिराच्या बाहेरील भागातही कोरलेल्या आहेत. 


फोटोतील कोरीव शिल्प बघितल्यावर मी क्षणभर स्तिमित झाले. हे शिल्प पाहताना कोंढाणा लेणीवरील मैथुन शिल्प आणि लोणी भापकर येथील लज्जागौरी चे शिल्प डोळ्यासमोर आले. इथे हे कोरीव शिल्प, अलंकाराने मढलेल्या सौंदर्यवतीचे! ही सुंदरी स्तनातून दूध कपासारखे दिसणाऱ्या भांड्यात गोळा करताना दिसत आहे. आतापर्यंत मातेच्या छातीला बाळ असेच दृश्य बघितलेले. 

सातव्या शतकात बांधकाम उभारणीला सुरुवात होऊन साधारण अकराव्या-बाराव्या शतकात पूर्णत्वास आलेल्या ह्या मंदिरात हे शिल्प पाहून चक्रावले. 

ऐकलेलं आहे की पौराणिक काळात सौंदर्यवती महाराण्यांना आपल्या बाळासाठी दुधआई असे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांना प्रसुतीनंतर आजाराने जखडले. त्या आजारपणात सईबाईंच्या स्तनातील दुधगंगा आटली. लहानग्या शंभूराजांचे पोट भरण्यासाठी दुधआई आली. तिचे नाव धाराऊ!

असेच काही ह्या शिल्पामागे प्रयोजन असावे का?

मैथुन शिल्प, लज्जागौरी ही समाजाभिमुख शिल्प कोरण्यामागची भूमिका कदाचित समजल्या जाऊ शकते. परंतु स्तनातील दूध गोळा करण्यामागची त्याकाळची भूमिका काय असावी?

आजच्या काळात ब्रेस्ट मिल्क बँक असते. योग्य त्या तापमानाला हे दुध साठवले जाते. मातेचे आजारपण सारख्या काही प्रसंगात हे दुध बाळाला पाजले जाते. असो.

शिल्पातील सौंदर्यवती अलंकाराने मढलेली आहे, तिच्या चेहऱ्यावर तेज आहे, बांधा सदृढ आहे. छातीला बाळाला न दाखवता सुंदरी स्वत: आपले दुध कपात गोळा करताना का दाखवली असेल? काय विचार असेल त्यामागे?

वाचलेले असल्याने असेही वाटले की  वात्स्ल्यपुर्तीच्या आनंदाने तर ह्या स्त्री ला पान्हा फुटला नसेल? दुधधारा वाहू लागल्या म्हणून ती त्या गोळा करत आहे?

त्याकाळच्या समाजातील चालीरिती उघडपणे ह्या शिल्पामार्फत दाखवण्याचे कदाचित प्रयोजन असावे. सध्यातरी हाच कयास बांधला जाऊ शकतो. असो.

हे शिल्प अत्यंत बोलके आणि विचार करण्यास प्रयुक्त करणारे आहे हे मात्र नक्की!



No comments: