महाराष्ट्रातील एकमेव दुरगावातील आगळेवेगळे दुर्योधनाचे मंदिर


आश्चर्याने विस्फारलेले त्यांचे डोळे अजूनही माझ्या नजरेसमोर आहेत. किती बोलके होते ते भाव! खेळातल्या स्टॅच्यु प्रमाणे पूर्णत: स्तब्ध!

आपल्या दूरगावातील एक मंदिर पहायला एवढे लोकं आले आहेत ह्या कल्पनेने, कडेवर विसावलेल्या बाळापासून, सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष आमच्याकडे अचंबित नजरेने पाहत होते.

"दूरगाव"! अहमदनगर जिल्यात, कर्जत तालुक्यातील एक छोटेसे गाव! दूरगावला पुण्यावरून दौंड-श्रीगोंदा-हिरडगाव-दूरगाव असे जाता येते. दौड पासून साधारण ४० किमी अंतरावर आहे दूरगाव. या छोट्याशा गावात वसले आहे महाराष्ट्रातील एकमेव "दुर्योधनाचे मंदिर"! त्याच बरोबर इथे आहे साधारण पंधराव्या शतकातील शंकराचे मंदिर!

दुर्योधन म्हटल की आठवते महाभारत आणि दुर्योधनाच्या सांगण्यावरून दु:शासनाने केलेले द्रौपदी वस्त्रहरण!

महाभारतातील "खलप्रवृत्ती" दर्शवणाऱ्या दुर्योधनाचे मंदिर? कोणी बांधले? कधी? का? दूरगावीच का?

आमच्या ग्रुपमध्ये कोणीतरी म्हणाल, दुर्योधनाच खर नाव सुयोधन होत. त्याच्या वाईट कर्माने त्याच नाव पडल दुर्योधन.

मंदिर पाहण्याची उत्सुकता वाढली होती. "दुर्योधनाचे मंदिर कुठे आहे?" असं विचारल्यावर गावकऱ्यांनी रस्ता दाखवला. काही सेकंदांत जवळजवळ पूर्ण गावात बातमी पसरली. लोकं घराबाहेर येऊन उभे राहिले. रस्त्याच्या दुतर्फा जमलेले गावकरी विस्मयकारक नजरेने आमच्याकडे पाहत होते.

गाववस्तीकडे पाठ करून असलेले हे मंदिर. आधी झाले ते कळसाचे दर्शन. बऱ्यापैकी उंची असलेल्या आणि आतून पोकळ असलेल्या रंगीत कळसाने उत्सुकता अधिकच वाढली. काही पायऱ्या चढून गेल्यावर मंदिर दिसले.मंदिराचे प्रवेशद्वार विटांनी बंद केलेले. आम्ही आलोय म्हटल्यावर १-२ गावकऱ्यांनी पटापट त्या विटा बाजूला करायला सुरुवात केली. बघता बघता विटांचा ढीग बाहेर काढल्या गेला.


 
आता मंदिराचे दार उघडले गेले. एक छोट्याश्या खोलीत दुर्योधनाचा पुतळा ठेवलेला. अत्यंत सुस्थितीतील आणि आकर्षक!'महाराष्ट्राची शोधयात्रा' या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार आणि गावातील लोकांनी सांगितलेल्या आख्यायिकानुसार, महाभारतातील भीषण युद्धानंतर भीमाच्या भीतीने दुर्योधन एका सरोवरामध्ये जाऊन लपला. भीमाने दुर्योधनाला युद्धासाठी आव्हान केले तेव्हा सरोवरातील जलदेवतेने दुर्योधनाला सरोवराबाहेर जायला सांगितले. भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये घनघोर युध्द होऊन दुर्योधन मारला गेला. तेव्हापासून असे समजले जाते की पाण्याचे थेंब, पाण्याचे ढग, विस्तृत जलसाठे इ. वर दुर्योधन राग धरून आहे. रागीट आणि तापसी वृत्तीच्या दुर्योधनाची जर ढगांवर दृष्टी पडली तर पाऊस पडणार नाही. पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल ह्या समजाने दूरगावचे ग्रामस्थ मंदिराचे दार विटांनी बंद करून ठेवतात.

हीच माहिती विटा दूर करत असलेल्या गावकऱ्यांनीही आम्हाला दिली. दुर्योधनाची मूर्ती कोणी आणली, कधी वसवली गेली इ. बद्दलची माहिती गावकऱ्यांना तितकीशी सांगता आली नाही. परंतु अतिशय सुंदर, सुबक आणि लक्षवेधक दुर्योधनाची मंदिरस्थित मूर्ती पाहून मनात आल की "खलप्रवृत्ती" असणाऱ्या दुर्योधनाचे ही मंदिर असावे ही गोष्टच किती विलक्षण आहे!

भीमाशी झालेल्या युद्धानंतर दुर्योधनाने अंत्यसमयी महेश्वराची म्हणजे शंकराची प्रार्थना केली म्हणून येथे महेश्वर अर्थात शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या शिखरामधे दुर्योधनाचे वैशिष्टपूर्ण मंदिर आहे.

शंकराचे मंदिर दगडी चौथऱ्यावर उभारलेले आहे. मंदिराच्या खांबावर जास्त कलाकुसर नसली तरी त्याच्या रचनेवरून ते पंधराव्या शतकातील असू शकतात असे अनुमान आहे. 
सभामंडपात नंदी 
आणि गाभाऱ्यात दोन शिवपिंडी आहेत. हे या मंदिराचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.महाशिवरात्र आणि अधिक महिन्यात इथे उत्सव भरतो.

महाराष्ट्रातील एक छोट्याशा गावात वसलेला आणि गावकऱ्यांनी जपलेला हा वारसा!श्रद्धा-अंधश्रद्धा या पलीकडे जाऊन विचार करून महाराष्ट्रात असलेल्या एकमेव अशा दुर्योधन मंदिराला एकदा अवश्य भेट देऊन गावकऱ्यांनी जतन केलेला वारसा तुमच्या आमच्या सारख्या लोकांसमोर यावा हाच ह्या मंदिराबद्दल लिहिण्यामागील एक उद्देश!

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

संदर्भ: महाराष्ट्राची शोधयात्रा संकेतस्थळ (www.maharashtrachishodhyatra.com)

फोटो आभार: टीम-फिरस्ती महाराष्ट्राची आणि Deepinder Kapany sir
खास आभार: फिरस्ती महाराष्ट्राची, पुणे

1 comment:

2u58lrtb40 said...

Transactions are fully freed from charges and even better, they have an exceptionally quick payout average of around 8 minutes. They have a really high banking security and security score so you'll be able to|you possibly can} relaxation assured that your money is in secure arms. There are charges connected to each transaction except you're be} banking with Bitcoin and Bitcoin Cash, which are both freed from all 1xbet charges. Additionally, you'll be able to|you possibly can} expect to obtain your withdrawal funds inside three days which is pretty good from an industry-standard perspective.