प्रगती, माझ्या
वहिनीच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जवळील खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर बघायचे
ठरले. रस्ता विचारत आणि मंदिराची माहिती वाचत खिद्रापूर गाठलं.
शिल्पवैभवाचा अद्भुत
कलाविष्कार असलेले शिवमंदिर पाहून थक्क झालो. स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळगृह आणि
गाभारा अशी सुरेख मंदिर रचना.
अंतराळगृहातील खांबांवर
पंचतंत्रातील काही गोष्टी कलात्मकतेने कोरलेल्या दिसल्या. त्यातील अशाच एका बोधकथात्मक
कलाकृतीने लक्ष वेधून घेतले. उडणारे बगळे आणि बडबड्या कासवाची पंचतंत्रातील गोष्ट एका
खांबावर कोरलेली दिसली.
लहानपणापासून ऐकत
आलेली हो गोष्ट. तळ्याकाठी पाणी पिणाऱ्या येणाऱ्या बगळ्यांना उडताना पाहून
कासवालाही एकदा उडण्याची इच्छा झाली. त्याने आपली इच्छा बगळ्यांना बोलून दाखवली.
आपल्या बडबड्या मित्राची इच्छा पूर्ण करण्याचे बगळ्यांनी ठरवले. कासवाच्या
युक्तीनुसार बगळे एक काठी घेऊन आले. उडाल्यानंतर बोलण्यासाठी तोंड न उघडण्याची पूर्वसूचना
बगळ्यांनी कासवाला दिली. तसे केलेस तर
खाली पडून तुझा मृत्यू संभवतो ह्याची कल्पना देखील दिली. कासव न
बोलण्याच्या अटीवर उडण्यास तयार झाले. ठरल्यानुसार काठीची दोन्ही टोके दोन
बगळ्यांनी आपल्या चोचीत पकडली. कासवानेही दोन्ही बगळ्यांच्या मधोमध उभे राहून काठी
आपल्या आपल्या तोंडात पकडली. बगळे कासवाला घेऊन उंच उडाले. उंच उडल्यावर खाली
दिसणारे नयनमनोहर निसर्गदृश्य पाहून कासव खूष झाले. प्रसंगावधान न राखता कासवाने
निसर्गाविष्काराचे कौतुक करण्यासाठी तोंड उघडले आणि काठीवरची पकड सुटल्याने ते उंचावरून
खाली पडून मृत्यू पावले.
कासवाला उडण्याची
इच्छा होणे, गावात दुष्काळ पडल्याने बगळ्यांनी दूरदेशी जाण्याचे ठरवणे इ. विविध प्रकारात
गुंफलेली ही गोष्ट, तसेच गोष्टीचे तात्पर्यः अर्थात बोध देखील विविध! मित्रांचे न
ऐकल्याने काय होते, प्रसंगावधान किती महत्वाचे इ. असो.
मंदिरावरील ही
गोष्टीरूप कलाकृती पाहताना मन मात्र हरखून गेले. कलाकृतीवरून नजर हटेना. खांबावरील
इतकाश्या छोट्या चौकोनात अत्यंत सुबक रित्या ही बोधकथा कोरलेली!
कोणाला ही बोधकथा कोरावी वाटली? कोणी ती इतकी सुबक कोरली? का कोरली ही बोधकथा? प्रश्नाचं काहूर माजलं.
हे मंदिर म्हणजे फक्त शिवाच दर्शन नाही तर तो एक इतिहास आहे, एक समाजशिक्षण आहे, एक संस्कृती आहे, एक समाजदर्शन आहे! अध्यात्म, पौराणिक कथा, समाजदर्पण यांचा अनोखा संगम आहे!
एकेक शिल्प आणि
त्यामागील आशय समजून घेताना एक भेट पुरेशी नाही हा बोध झाला. पुर्नभेटीची मनीषा ठेवत
आणि पाहिलेले शिल्पवैभव मनात साठवत खिद्रापुर सोडलं.
हो, सर्वात महत्वाचे!
प्रगतीला, वाढदिवसाची यापेक्षा इतकी सुंदर भेट ती काय असू शकणार होती?
No comments:
Post a Comment