रजोनिवृत्तीचा काळ ट्रेकिंगचा!वयाच्या ४७ व्या वर्षी ट्रेकिंग सातत्याने सुरु करताना मनात दोन विचार प्रत्कर्षाने होते, एक विचार होता, व्यायामाचा अभाव असलेल्या या शरीराला ट्रेकिंग जमेल का? आणि दुसरा विचार होता ज्या वयाला मी ट्रेकिंग सुरु करतेय त्या वयात ट्रेकिंग केल्याचे परिणाम काय होतील?

हे अनुभवकथन दुसऱ्या विचारावर केंद्रित आहे! ४७ वय हे स्त्रियांसाठी, रजोनिवृत्तीच्या  दृष्टीने अत्यंत महत्वाचे! रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रियांमध्ये मासिक पाळी कायमची बंद होणे! साधारणपणे, व्यक्तीपरत्वे ४९ ते ५२ वयात मासिक पाळी पूर्णत: बंद होत असली तरिही, काही स्त्रियांमध्ये पाळी बंद होण्याची लक्षणे वयाच्या ४० पासून (स्त्रीपरत्वे) दिसू लागतात. संप्रेरके निर्माण होण्याचे प्रमाण अंडाशय कमी करते त्यामुळे काही बदल होत असल्याने स्त्रियांमध्ये हा काळ विशेष महत्वाचा असतो. संप्रेरकांच्या (इस्ट्रोजेन) कमतरतेमुळे काही लक्षणे दिसू लागतात, मुख्य लक्षणामधे समावेश आहे, पाळी अनियमित होणे आणि रक्तस्त्रावाचे प्रमाण कमी- जास्त होणे! इतर लक्षणे आहेत, वजन वाढणे, झोप न लागणे, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, मूड बदलणे, चिडचिड, निरुत्साही वाटणे, मानसिक आणि भावनिक आंदोलने, कंबर आणि पाठदुखी, ओटीपोट दुखणे, चिंतातूर राहणे, एकाग्र राहण्यास त्रास, गोष्टी लक्षात न राहणे, हदयविकार इ.!

मासिक पाळी बंद होण्याच्या ह्या कालावधीमध्ये काही स्त्रियांना काहीच त्रास न होण्यापासून ते कित्येक वेळा दवाखान्यात भरती करावे लागेपर्यंत त्रास होतात. म्हणूनच रजोनिवृत्तीचा हा काळ शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्या सुलभ आणि अति त्रासरहित जाणे, स्त्रियांसाठी महत्वाचे असते!

पुरेसे कॅल्शियम घ्या, संतुलित आणि लो-फॅट आणि लो-कोलेस्टेरॉल असणारा आहार घ्या, व्यायाम करा, मूड आनंदी आणि प्रसन्न राहण्यासाठी एखादा आवडीचा छंद जोपासा इ. सारखे काही उपाय रजोनिवृत्ती सुलभ होण्यासाठी स्त्रीरोगतज्ञ सांगतात.

मी ट्रेकिंग सुरु केले तेव्हा माझी पाळी नियमित होती पण हा विचारही मनात असायचा कि “मी वयाच्या अशा उंबरठ्यावर उभी आहे कि संप्रेरकातील बदलांमुळे/कमतरतेमुळे आणि कॅल्शियम पुरेसे नसेल तर हाडे ठिसूळ होऊन हाडांशी निगडीत समस्या निर्माण होऊ शकतात.” त्यात उजवा गुडघा स्प्रेन झाल्याने आधीच दुखावलेला.....

जसे ४८ वर्ष सुरु झाले पाळी महिन्याच्या महिन्याला येईनाशी झाली आणि रक्तस्त्राव कमी होऊ लागला. उदास वाटणे, अपरात्री जाग येऊन पहाटे पर्येंत झोप न लागणे, दुसऱ्या दिवशी ट्रेक असेल तर चिंतातूर राहून झोप अपूर्ण होणे, उगाचचं थकल्यासारखे वाटणे, एखाद्या गोष्टीवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू न शकणे, शांत बसून रहावेसे वाटणे, उल्हासित उर्जा न जाणवणे इ. सारखी लक्षणे मी थोड्याप्रमाणात अनुभवत होते.

कॅल्शियम आणि आरोग्यसंपन्न आहार सातत्याने आणि काटेकोरपणे घेणे चालूच असले तरी या वयात आवश्यक ते शारीरिक, मानसिक, भावनिक संतुलन राखून रजोनिवृत्तीचा हा काळ सुलभ आणि सुखकारक जाण्यासाठी ट्रेकिंग चालू ठेवण्याचा लाभ मला झाला असे वाटते. हे अनुभव कदाचित शास्त्राशी थेट संबंध दर्शवणारे नाहीत पण त्याचा अनुभव हा शास्त्राइतकाच तोडीचा आहे!

·        शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी ट्रेकिंग दरम्यान घोट घोट पाणी सातत्याने पिणे जरुरी असल्याची सवय लागल्याने दररोज किमान ३ लिटर पाणी पाणीची सवय लावून घेणे तितकेसे कठीण गेले नाही. अन्यथा आवश्यक तितके पाणी पिणे होतचं नसल्याने युरीन रिटेनशन मुळे पायाला येणारी सूज कमी होण्यास मदत झाली. मासिक पाळी बंद होण्याच्या ह्या काळात, डीहायड्रेशन मुळे सांध्याना येणारी सूज किंवा वेदना पाणी पिण्याची सवय लागल्याने कमी झाली. शरीर हायड्रेटेड ठेवल्यामुळे कमी थकवा, अधिक उर्जा आणि  चयापचय क्रिया सुधारण्यास मदत झाली. ह्या काळात अतिरक्त चरबी वाढल्याने वजन वाढते. पुरेसे पाणी पिल्याने (त्यातही कोमट पाणी) अतिरक्त चरबी कमी होण्यास मदत होते. 

·        ट्रेकिंग दरम्यान घ्यायचा आहार ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. पाण्याला पूरक आणि उर्जा देणारा आहार जसे, सफरचंद, डाळिंब, पेरू, काकडी, बीट, गाजर, लिंबू सरबत, सुकामेवा इ. व्यायामाच्या तुलनेत आरोग्यसंपन्न असा हा आहार रजोनिवृत्तीच्या ह्या काळात मोलाचा ठरला असे वाटते. हिमोग्लोबिन १३-१४ च्या पुढे राहील असा आहार चालू ठेवण्यात मदत तर झालीच परंतु जितके उंचावर जाल तशी ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते आणि हिमोग्लोबिन जास्त असेल तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होऊन दम कमी लागण्यास मदत झाली.

·        “बोन मिनरल डेन्सिटी” अर्थात स्नायू/हाडांचा कठीणपणा किंवा त्यातील कॅल्शियमचे प्रमाण! माझी ही चाचणी जेव्हा नॉर्मल रेंज मधे आली तेव्हा डॉक्टर म्हणाले, “ह्या वयात खूप कमी स्त्रियांची ही चाचणी नॉर्मल येते. बहुतांश स्त्रियांची चाचणी रेंजच्या आत येते”. मला आनंदच झाला. वाटलं कॅल्शियम सेवन मी तसही सुरूचं ठेवलं असतं पण ट्रेकिंग सारखा व्यायाम केल्याने स्नायू, विशेषत: गुडघ्यांची हालचाल तर झालीच पण त्याला आवश्यक सूर्यप्रकाशची जोड देखील मिळाली.

·        दीड वर्ष सातत्याने ट्रेकिंग केल्याने “सविता, तू खूप बारीक झालीस” हे बऱ्याचं मैत्रिणींकडून ऐकायला मिळाले. वजन आकडेवारीनुसार कमी झाले नसले तरी अतिरिक्त चरबी कमी झाल्याचा हा परिणाम होता.

·        ट्रेकिंग हा “अॅन्टी ग्रॅव्हीटी” स्वरूपातील व्यायाम असल्याने ह्दय आणि फुफुसांची कार्यक्षमता वाढण्यास आणि पायांचे स्नायू कणखर होण्यास मदत झाली. सातत्याने ट्रेकिंग केलं तर रक्ताभिसरण सुरळीत होऊन, चढाई चढताना तसा दम कमी लागतो ह्याचा अनुभव मला आला.

·        ट्रेकिंग हा असा एक व्यायाम आहे कि जो गटाचे फायदेपण देतो. एखादा व्यायाम एकट्याने करणे आणि गटाने करणे ह्यामध्ये कदाचित दुसरा व्यायाम जास्त प्रभावी आणि परिणामकारक असावा. शरीरासोबत मनाला सदृढ बनवण्याची ताकद त्यात आहे. तीच मनाची सदृढ सकारात्मक अवस्था रजोनिवृत्ती दरम्यान महत्वाची असते. ट्रेक सहकारी वाढत गेले आणि शब्द मिळत गेले आणि मी बोलकी होतं गेले!

·        मला अवघड वाटणारे ट्रेक मी करू शकले, पाठीवर पाण्याचं ओझ, एका हातात ट्रेकिंग पोल,रात्रीचा ट्रेक असेल तर दुसऱ्या हातात टॉर्च इ. मॅनेज करून शरीराचा तोल सांभाळण, एकदा स्प्रेन झालेल्या गुडघ्याला आणि कंबरेला हिसका बसेल अशी काही कृती होणार नाही याची दक्षता घेणं इ. गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या होत्या. थोडक्यात काय तर, स्वत:तील क्षमतांची जाणीव झाल्याने स्व-प्रतिमा (self-esteem) प्रबळ होण्यासही मदत झाली. ह्या स्व-प्रतिमेपुढे, संप्रेरकांची काय बिशाद होती माझ्यावर हावी/वरचढ होण्याची!

·        एक मुख्य गोष्ट ही पण झाली कि “पाळी आली तर ट्रेक कॅन्सल करावा लागेल किंवा ट्रेक दरम्यान पाळी आली तर काय? त्यासाठी करावी लागणारी तयारी इ.” सारख्या गोष्टींच टेन्शन कमी झालं. त्यादृष्टीने मनाचे स्वातंत्र अनुभवता आले आणि मनमुराद ट्रेकिंगचा आनंदही घेता आला.

·        निसर्ग, शुद्ध आणि मोकळी हवा, मनमोकळे वातावरण आणि ट्रेकर्स मधील उत्साह यामुळे मन प्रसन्न, फ्रेश राहून ताण कमी होण्यास मदत झाली. उगाचच वाटणारा थकवा, निरुत्साह कमी झाला. काही प्रसंग आठवले तरिही मनाला उर्जा मिळत होती, मन प्रसन्न होत होतं. ट्रेकिंगचे फोटो पाहून देखील मूड बदलण्यास मदत होत होती. ट्रेक सहकाऱ्याशी गप्पा मारायचं काय ते ठरवलं आणि त्याची जादू अनुभवता आली! एखादे वेळी ट्रेक सहकाऱ्याच्या वाढदिवसाच्या किंवा अन्य कारणाने प्रत्यक्ष भेट झालीच तर दुधात साखरचं!

·        ट्रेक दरम्यान अतिशय थकवा जाणवत असला, नको तो ट्रेक असं वाटतं असलं तरिही दुसऱ्या दिवसाची सकाळ ही खूप आनंद देणारी, मन प्रसन्न करणारी, कालचा दिवस आठवून समाधान देणारी आणि स्वत:चा अभिमान वाटणारी वाटली. ह्या मनाच्या प्रसन्नवस्थाने मूड प्रफुल्लीत राहण्यास खुपचं मदत झाली.

·        माझ्याबाबतीत एक असंही झालं कि ट्रेक सहकाऱ्यामधे मी वयाने मोठी, जवळ जवळ दुप्पट वयाची! बरेचदा असं होत कि ट्रेक मधे ५० च्या पुढील वयाचे पुरुष असतात पण सातत्याने ट्रेक करणाऱ्या त्या वयाच्या स्त्रिया नसतात. त्यामुळे आदर, प्रेम तर मिळालचं पण प्रसंगी खास लक्ष (attention) मिळालं! कौतुक झालं! कित्येकांची प्रेरणास्थान मी बनू शकले. ह्यामुळे अनाहुतपणे ट्रेकमधे एक स्थान निर्माण झालं आणि ही भावना मनाला एक समाधान देणारी आणि समृद्ध करणारी ठरली.

·        एक गोष्ट ही देखील होती कि ट्रेकिंगचे लीडर्स ही मुलं होती. अर्थात मला मुलगी लीडर असावी असे कधी वाटलेही नाही आणि ती उणीव कधी भासलीही नाही. मला हे जाणवलं कि माझी चिंता, काळजी, विचार ह्या मुलांना सांगितले कि त्यांना ते समजतं होते आणि मला सहकार्य करत होते. कित्येक जण असेही होते कि मी काहीही न सांगता त्यांना काही गोष्टी समजत होत्या. बऱ्याचश्या ट्रेक मधे ट्रेक सहभागींनी देखील सहकार्य केले. खूप सारे ट्रेक करण्यात आणि ट्रेकिंग सुरु ठेवण्यात ही गोष्ट आणि असे पोषक वातावरण माझ्यासाठी खूप मोलाचे ठरले! हे पोषक वातावरण मला देणारे सर्व ट्रेकिंग ग्रुप्स, त्या ग्रुप्स चे प्रत्येक लीडर, ट्रेक सहकारी त्यांचे मनापासून आभार!

·        काही मुले-मुली असेही मिळाले कि त्यांच्यासोबत मानसीक/भावनिक देवाणघेवाण झाल्याने नैराश्येची जागा भरून निघाली.

·        ट्रेकिंगचे अनुभव लिहायला सुरुवात केली आणि ते व्यक्त होणं आवडतं गेलं, त्यात मन रमत गेलं. निरुत्साह, नैराश्य, खिन्नता इ. सारख्या नकारात्मक उर्जेसाठी जागाचं राहिली नाही. एकानंतर एक ट्रेकिंग संबंधीत सर्जनशील गोष्टी (उदा. पर्वती चढणे-उतरणे, ट्रेकिंग/गड-किल्ले आणि एव्हरेस्ट एक्सपीडीशन वरची पुस्तके वाचणे, यु-ट्युब वर व्हिडीओ पाहणे, ट्रेकिंग संबंधी ब्लोगज वाचणे, फुले, पक्षी, फुलपाखरांबद्दल वाचणे, ट्रेक सहका-यांचे अनुभव ऐकणे इ.) करण्यामधे मन गुंतत गेलं.

·        कदाचित “प्रोफेशनल” न वाटणारे हे अनुभवकथन, ह्या वयात ट्रेक करताना मी कोणत्या भावनेतून गेले त्या भावना समोर याव्यात म्हणून मी लिहिले. त्या भावनांनी मला आनंद दिला, समाधान दिले. मनाची ती अवस्था माझ्यासाठी नक्कीच ह्या काळात मानसिक आणि भावनिक स्तरावर आरोग्यसंपन्न ठेवणारी ठरली.

·        ह्या मधे एक ही पण भावना, विचार होता कि, सह्याद्रीतील बरीचसे ट्रेकवरचे ब्लोगज, पुस्तके हे पुरुषांनी लिहिलेले आहेत. गुगुलवर सर्च मारला तर मुलांनी लिहिलेले ब्लोगज समोर येतात. गड-किल्ले, ट्रेक, मा. एव्हरेस्ट एकस्पिडीशन इ. वरची पुस्तके देखील जास्त करून पुरुषांनी लिहिलेली आहेत. अगदी मा. गो. नी. दांडेकरांपासून, श्री. मिलिंद गुणाजी, श्री. उमेश झिरपे, श्री. आनंद पाळंदे  ते आत्ताच्या आमच्या रवींद्र इनामदारपर्यंत!  स्त्रियांनी लिहिलेली अनुभवकथने खुपचं कमी आहेत. मा. उष:प्रभा पागे ह्या त्यातील एक ! हा विचारही माझ्यासाठी, स्व:प्रतिमा उंचावणारा नक्कीच आहे!

·        मानसिक समाधान देणारी एक गोष्ट ही पण आहे कि रविवारी ट्रेक करून सोमवारी ऑफिसला जाते तेव्हा मी ट्रेक केल्याची/दमल्याची/थकल्याची एकही निशाणी नसते. लोकांच्या लक्षातही येत नाही कि मी ट्रेक/नाईट ट्रेक करून आली आहे. गरम दुध पिऊन एका शांत झोपेची ही कमाल! विचार करता ही गोष्ट खरोखरचं मोलाची वाटते.

माझ्यासाठी ट्रेकिंग हा व्यायाम प्रकार उपयुक्त ठरला. ट्रेकिंग हा सर्वांगीण फायदे देणारा व्यायाम प्रकार आहे असे मला वाटते. अगदी कॅलरिज बर्न होण्यापासून, स्टॅमीना, पेशन्स वाढणे ते मन आनंदी, प्रसन्न राहण्यापासून भावनिक शेअरिग/आधार मिळेपर्यंत!

विपरीत परिणाम काय झाले हा विचार करता एकही ठळक विपरीत परिणाम जाणवत नाही.

मी देखील विपरीत परिणाम होतील असाच विचार केला होता. पोट दुखेल, तारखेआधी पाळी येईल, रक्तस्त्राव जास्त होईल, स्पाॅटिंग होईल, थकवा जास्त जाणवेल, अंग दुखेल, चक्कर येईल, मळमळ होईल,  इ. इ. पण झाले पूर्णत: उलटेचं! अर्थात सकारात्मक परिणाम जाणवण्यासाठी ह्याच्या जोडीला सकस आणि संतुलित आहार, पुरेसा आराम आणि झोप आणि पूरक कॅल्शीयम आवश्यकचं आहे!

प्रत्येक ट्रेकला मी ह्यावर विचार करत होते, माझ्यात होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांची दखल घेत होते. हा अनुभव लिहीण थोडं धाडसाचं आहे असं ही वाटलं परंतु आज ट्रेकिंग मधे वाढणारी मुलींची संख्या लक्षात घेता माझा अनुभव लिहून मुला-मुलींपर्यंत पोहोचवावा असे वाटले.

मला जाणवलेले फायदे कदाचित कुठल्याही वयाच्या मुलीला जाणवू शकतील पण रजोनिवृत्तीच्या ह्या वयात हे फायदे अनुभवण्याचे सुख काही औरचं! मला झालेले फायदे लक्षात घेता एक जाणवते कि या वयातील स्त्रियांनी (साधारण ४५ च्या पुढे) ट्रेकिंग सुरु केले तर ट्रेकिंग ग्रुप्स त्यांना नक्कीचं सपोर्ट करतील!

मी मुलींना नेहमी म्हणते, “मला आता तुमच्यासारखं २४ वर्षाचं होता येत नाही आणि त्या वयाच्या दृष्टीकोनातून विचार/बदल करता येत नाही.” आजच्या २४ वर्षाच्या मुलींनी, त्यांच्या रजोनिवृत्तीसाठी स्वत:ला तयार करावे आणि मुख्यत: ट्रेक लीडर्स असणाऱ्या मुलांना, ह्यादृष्टीने मुलींना अधिक चांगले समजून घेता यावे ह्यासाठी हा अनुभव लिहिण्याचा खटाटोप!

ह्या सर्व भावनांचा विचार करता मला आनंदाने आणि अभिमानाने सांगावे वाटते कि, “ट्रेकिंग, रजोनिवृत्तीच्या ह्या वयात माझ्यासाठी “हॅपिनेस इंडेक्स” प्रज्वलित ठेवणारा मशाल ठरला!”

 

2 comments:

UB said...

Madam...this is kind of a guide to all ladies (be it teens or middle age or quadragenerian)...you have addressed a very important issue.....awesome blog once again...

Savita Kanade said...

Thanks Usha!