ताम्हिणी फॉरेस्ट ट्रेल विथ एव्हरेस्टर आनंद माळी, २६ मार्च २०१७


ताम्हिणी फॉरेस्ट ट्रेल-एक अन-एक्सप्लोअर्ड ट्रेल! आनंद माळी या एव्हरेस्टर आणि गिरीप्रेमी संस्थेच्या टीम मेंबर ने दोन आठवड्यापूर्वीच भेट देऊन मग आयोजित केलेला हा ट्रेल!

कित्येक वर्षात फारसा कोणी न केलेल्या ह्या ट्रेलला भेट द्यायला मी, विद्या चिकटे मॅडम, सुवर्णा आणि प्रिती अतिशय उत्सुक होतो! आमच्या सोबत होते विद्या व्हॅली स्कूलची बच्चे कंपनी आणि त्यांचे पालक!

सकाळी ६.३० वाजता मुळशी तालुक्याच्या वाटेने निघालो. 


थंडगार वारा, उगवण्यास उत्सुक सूर्य आणि मुळशीचा हिरवागार निसर्ग यांच्या साथीने दिशा्ज ढाबा मधे
पोहे, ईडली-सांबारचा चमचमीत नाश्ता केला, फक्कड क़ॉफी घेतली आणि ट्रेलच्या पायथ्याला आलो. 









गावातल्या विंझाई मातेचं दर्शन घेऊन साधारण ९.३० च्या सुमारास ट्रेलला सुरुवात केली. ट्रेलची माहिती देताना आनंदने सांगितले की मुळशी तालुक्यातील ह्या भागाचा आकार पूजेच्या ताम्हणासारखा असल्याने ह्या भागाला ताम्हिणी हे नाव पडलं!









ह्या ट्रेलची सुरुवात झाली ती एकासुंदरशा पुलावरून. आजुबाजुच्या गर्द झाडीत हा लोखंडी पूल मन आकर्षित करून घेत होता. ह्या पूल क्रॉस केला आणि फॉरेस्ट ट्रेलला सुरुवात झाली. दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि एकावेळी एकच जण जाऊ शकेल अशी पायवाट! 








ही पायवाट दगडधोंड्यांनी भरलेली आणि वरून झाडांच्या सुकलेल्या पालापाचोळ्याने आच्छादलेली! ह्या पालापाचोळ्यावरून जाताना त्याचा इतका आवाज होतं होता की जंगल आहे म्हणून शांतता राखणं केवळ अशक्य होतं. 







त्यात झाडे इतकी प्रचंड उंच होती की झाडावर विसावलेले किंवा उडणारे पक्षी दिसणं कालत्रयी शक्य नव्हतं. पर्याय एकच की पक्षांच्या आवजावरून त्यांना ओळखणे आणि त्यासाठी तेवढा अभ्यास असणं महत्वाचं. यावरून ह्या घनदाट जंगलाची कल्पना तुम्हाला येईल!
 
आनंदने एका ठिकाणी आम्हा सर्वांना एका ठिकाणी शांत (पिन ड्रॉप सायलेन्स) बसायला वेळ दिला आणि पक्षांच्या सुमधुर किलबिलाटाचा आनंद घेता आला!






जसं जसं जंगलात आत जाव तसं तसं जंगल अधिकाधिक गर्द होत गेलं होतं.काही ठिकाणी पायवाटेवर झाडांच्या वाळलेल्या आणि तोडलेल्या काटक्या अस्तावस्त्य विखुरलेल्या होत्या, एकमेकात अडकलेल्या होत्या. काही झाडांच्या मुळ्याही पायवाटेवर पसरलेल्या होत्या. त्या सहीसलामत पार करणे माझ्यासाठी जिकिरीच झालं. पाय पडकून पडला तर थेट तोंडावरचं पडणार!










काही ठिकाणी आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या वरून एकमेकात अडकल्या होत्याआणि त्यामुळे खाली वाकून जावं लागत होतं. माझ्या उंचीलाही वाकवं लागत होतं म्हणजे कल्पना करा!











ह्या  जंगलाचं एक वैशिष्ट म्हणजे त्याचं आगळंवेगळेपण! वासोटा, भीमाशंकर, अंधारबन ई. बघितलेल्या जंगलापेक्षा जरा हटकेचं! झाडाच्या खोडाचा इतका प्रचंड आकार असलेली, अतिशय अवजड पाळेमुळे असलेली आणि अति भव्य उंचीची झाडे मी प्रथमचं बघत होते. बांबूची असंख्य झाडे मी ह्याच जंगलात बघितली!

कित्येक ठिकाणी पाण्याचे झरे निर्माण झालेले. आता ते आटलेले असले तरी पावसाळ्यात त्यांचा वाहण्याचा ओघ किती प्रचंड वेगवान असेल ह्याची कल्पना सहज करता येत होती. पावसाळ्यात ह्या जंगलाचे सौदर्य अवर्णातीत नक्कीचं असेल!





ह्या जंगलाचे दुसरं वैशिष्ट हे जाणवले की इथे असणारी बेसुमार करवंदाची झाडे! थोडी हिरवी, थोडी लालसर! थोडी कच्ची, थोडी पिकलेली! थोडी तुरट, थोडी गोड! फळ तोडलं की चिक पाझरत होता आणि हात चिकट होत होते. करवंदाच्या झाडाला लागलेली पांढरी फुले मी प्रथमचं बघत होते. विसापूर ट्रेक मधे साधारण जुलै महिन्याच्या सुरुवातीस मी पूर्णत: पिकलेली करवंद बघितली होती पण तेव्हा मात्र ही पांढरी फुले झाडाला दिसली नव्हती. हे काय गुपित आहे असं वाटून ह्याविषयी तज्ञ व्यक्तीला विचारायला हवं असं लक्षात आलं!




तिसरं वैशिष्ट हे जाणवलं की इथे असणारी वैविध्यपूर्ण फळांची झाडे! तोंडाला पाणी सुटेल अशी! कच्ची-पिकलेली उंबर आणि छोटया कच्च्या कैऱ्या! इतक्या छोटूकल्या कैऱ्या मी पहिल्यांदा पाहत होते!

काही फळे अशी होती त्यांची ओळख मला करता आली नाही. 









तशातचं एक वेगळाचं प्रकार झाडाला लटकलेला बघायला मिळाला. तसं बघितलं तर जणू सुकलेलं गुलाबाचं फुलं! पण रोहन कडून समजलं त्याला “पॅगोडा अॅन्ट नेस्ट” म्हणतात.






चौथं वैशिष्ट हे की असंख्य प्रकारची फुले! आश्चर्य हे होतं की उन्हाळ्याचे दिवस, जंगलात पाणी नाही तरीही ही फुले फुललीत कशी? काय आहे ह्या जंगलाचं वैशिष्ट्य! कुठल्या जातीची ही फुले जी पाणी नाही, सूर्यप्रकाश उंच झाडांमुळे जमिनीवरचं काय कमी उंचीच्या झाडांवरही पडतं नाही तरीही फुलली आहेत? चैत्राची सुरुवात म्हणून तर नाही?

पायवाटेच्या हातभर अंतरावर असलेली ही वनधन संपत्ती..विचार करा आत खोलवर जंगलात गेला तर काय खजिना हाती लागेल?




ह्या ट्रेलमध्ये वनधन संपत्ती सोबत अजून एक संपन्नता होती ती म्हणजे १२ वर्षाच्या आतील अतिशय क्युट मुले-मुली! ह्या सर्वांशी गप्पा अशा झाल्या नाहीत पण त्यांच्या काही भावमुद्रा कॅमेऱ्यात टिपता मात्र जरूर आल्या!

कौतुक वाटतं होत ह्या मुलाचं आणि त्यांच्या पालकांचं! हा ट्रेल म्हणजे ह्या मुलांसाठी जीवनशिक्षणचं असावं! उन्हातान्हाला सामोर जायचं, दोन तास चढायचं, तोल सांभाळायचा, पेशन्स आणि स्टॅमीना वाढवायचा, चढताना-उतरतानाची तंत्र शिकायची, ट्रेकची-साहसाची आवड जोपासायची, भुकेवर नियंत्रण, भरपूर पाणी पिण्याची सवय, जे उपलब्ध असेल हे खाण्याची सवय, निसर्गाची ओळख इ. इ.

साहिल जोशी, हा असाच एक अतिशय स्मार्ट, हुशार आणि चुणचूणीत मुलगा! अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेकचे अनुभव तो सांगत होता. त्याच्या सांगण्यात त्याचे “अनुभव बोल” जाणवत होते. एकदम कॉन्फीडन्ट, क्रिस्टल क्लीअर आणि रिसर्च करून निर्णयावर पोहोचलेले त्याचे बोल! आमच्या ह्या छोट्या गाईडसोबत फोटो घेण्याचा मोह मग आवरलाचं नाही!

ह्या ट्रेलचं अजून एक खासपण होतं ते ट्रेल दरम्यान मिळालेला खाऊ! मुलांच्याचं काय आमच्या पण स्वागताची सुरुवात स्ट्रॉबेरी रोलने! त्यानंतर लिंबू सरबत, संत्र, शेंगदाण्याची चिक्की....बापरे....ट्रेल दरम्यान खाऊ असावा तर असा! एकदम हेल्दी, हवामानाला अनुसरून, उर्जा देणारा आणि चवदारही!

जेवणही एकदम चविष्ट! पोळी, मटकीची उसळ, बटाट्याची कोरडी भाजी, भात-वरण, ठेचा, पापड आणि दही! हे चविष्ट अन्न बनवलेली मंडळी ही गिरिप्रेमी संस्थेच्या क्लबचे जुने मेंबर!

ह्या ट्रेलचं अत्यंत महत्वपूर्ण वैशिष्ट होतं ते म्हणजे आनंद माळी, ची मिळालेली सोबत आणि त्याचे अनुभव ऐकण्याची संधी! मी आता ट्रेक करतेय म्हणून लक्षात येतयं की ह्या मुलांना आनंदकडून काय मिळतयं ते! एका आडवाटेवरच्या समृद्ध जीवनासाठी ही मुले तयार होत आहेत हे पाहून कृतार्थ वाटतं होतं! 





मी, विद्या चिकटे मॅडम, सुवर्णा आणि प्रितीने ह्या ट्रेलचा मनमुराद आनंद घेतला! राहून राहून वाटतं होतं की पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या शेवटावर हा ट्रेल करता आला तर काय बहार येईल! निसर्गाचं एक नितांत सुंदर रूप बघायला मिळेल!









ट्रेल/ट्रेकचा एक सुंदर अर्थ आज पुन्हा गवसला! अशा वनधन संपन्न जंगलातून रुक्षपणे मार्गक्रमण न करता निसर्गाने दिलेले हे धन ओंजळीत घेत आपण 
“धन संपन्न” होणे!


1 comment:

Vidya said...

किती सुंदर लिहिलं आहेस! नेमक्या शब्दात ट्रेल चं वर्णन आणि फारच सुरेख फोटो!!