कुडपन घाट, भीवाची काठी, प्रतापगड आणि पार(सोंड) ट्रेक विथ सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन, २४ व २५ डिसेंबर २०१७"आपण आता वरंधा घाटातून चाललोय,  इथे "मोरझोत" चा सुंदर धबधबा आहे....

इथे शिरगावच्या जवळ एक -दीड किमी अंतरावर नीरा नदीच्या उगमस्थानाच्या ठिकाणी एक प्राचीन कुंड आहे. अतिशय दुर्लक्षित, माहित नसणारे आणि पडझड झालेले हे एक महत्वपूर्ण स्थान आहे.....

समोर दिसतो तो "कावळ्या गड"! गडाच्या नाकावरून कोकण विभाग अतिशय सुंदर दिसतो आणि समोरून "राजगड" आणि "तोरणा" किल्ल्याचे पण दर्शन होते.....

अलीकडेच शोध लागलेला "मोहनगड" (उर्फ दुर्गाडी) इथे जवळचं आहे. गडावरील दुर्गादेवीचे मंदिर खालूनही दिसते....

हा नीरादेवघर धरणाचा डोळे दिपवणारा जलाशय....

हा रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड...ही रेंज एका दिवसात पूर्ण करता येते पण त्याला पट्टीचा ट्रेकर हवा....

खेड जवळील "जगबुडी" नदीचे हे पात्र......"


आमची गाडी वरंधा घाट मार्गे ढालकाठी- महाड-पोलादपूर- खेड( रत्नागिरी) आणि खेडवरून भरणी नाक्यावरून डावीकडे आंबिवली गावाच्या  दिशेने वळाली. आंबिवली गावातून डावीकडे  वडगाव बुद्रुकच्या दिशेने  पल्ला गाठत होती. हा संपूर्ण रस्ता जगबुडी नदीच्या खोऱ्यातून जातो. प्रवास मार्गावरील सह्याद्रीच्या खाणाखूणांशी सुरेंद्र दुगड सर मला अवगत करत होते!  सरांच्या बाजूला बसण्याचे महत्व त्याक्षणी मला उमगले!

सह्याद्री पर्वतरांगांची खडानखडा माहिती असलेली व्यक्ती बाजूला बसलेली असेल तर गाडीच्या खिडकीतूनही सह्याद्रीच्या अथांगपणाची कल्पना येते  आणि ती हृदयाला थेट भिडते ह्याचा अनुभव ह्या गाडीच्या प्रवासात मी घेतला!

सुरेंद्र दुगड म्हणजे "सह्याद्री पर्वतरांगेची चालती- बोलती-फिरती डिक्शनरी"!

"सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन" (संस्थेविषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे) २४ ते २५ डिसेंबर रोजी "कुडपन घाट,  भीवाची काठी, प्रतापगड आणि पार(सोंड) गाव" हा ट्रेक आयोजित केला होता. २४ ला सकाळी ४ वाजता साधारणपणे ५५ जणांचा आमचा ग्रुप ह्या ट्रेकसाठी निघाला होता.


साधारण १२ वाजता वडगाव बुद्रुक मधून,  कुडपन गावच्या दिशेने आमचा ट्रेक सुरु झाला! "जगबुडी" नदीतून आणि नदीपात्राच्या काठा-काठाने घनदाट जंगलातून हा ट्रेक मार्ग होता. नितांत सुंदर, शांत, रम्य, हिरवळीने सुसज्ज, थंडगार गारवा आणि आल्हाददायक सावली देणारी !


ऊंच ऊंच झाडी, विविध रंगी रानफुले, लहान-मोठ्या आकारातील, पिवळ्या रंगापासून नीळसर, नारंगी, पांढऱ्या रंगात पंखावर नक्षीकाम असलेली मुक्त उडणारी असंख्य फुलपाखरे! मधूनचं दिसणारे पाणवठे ! अशा सुंदर मार्गावर  आपल्याचं धुंदीत चालण्याचा आंनद काही औरचं! असो.


साधारण एक ते दीड तास सपाटीने चालल्यावर चढाई सुरु झाली. हा चढ साधारणत: ६०० मी. उंचीचा होता. घनदाट जंगलातून जाणारी ही घाटवाट म्हणजेच कुडपन घाटवाट! घाटवाटेचा काही टप्पा तर लहान-मोठ्या, उभ्या-आडव्या, खडबडीत, गुळगुळीत खडकांनी खचाखच भरलेला! खडकातून मार्ग काढत चढ चढायचा! ही घाटवाट पाहून "हरिश्चंद्रगडाची नळीची वाट" आठवते. माणूस जातोय म्हणून "वाट" म्हणायची नाहीतर वाटेची निशाणीही नाही!


एक गावकरी कुटुंब कुडपन गावातून खाली येत होते. ते म्हणे, " आम्ही २० मिनिटात इथपर्यंत आलो". ते अंतर चढून जायला मला दीड तास तर लागलाचं पण कंबरेचा चांगलाच व्यायाम झाला! एका ठिकाणी झाडाच्या मुळीत पाय अडकून पडले आणि दहा मिनिट डोळ्यासमोर अंधार झाला. नी-कॅॅप होती म्हणून खोलवर जखम झाली नाही. असो.घाटवाटेच्या एका ठिकाणावरून "भीवाची काठी" दिसली. " भीवाची काठी" म्हणजे "साधारण ४०० मी. उंचीचा आकाशात झेपावलेला एक सुळका"! सुरेंद्र दुगड म्हणे, " त्याला स्थानिक नाव भीमाची काठी आहे  पण खरं नाव आहे भीवाची काठी!". ह्या सुळक्याला भीवाची काठी नाव कसे पडले? किंवा त्या सुळक्याचे महत्व सांगणारी फारशी माहिती उपलब्ध नाही. पावसाळ्यात इथे प्रचंड मोठा धबधबा बरसतो. हिरवीगार खोल दरी, आजूबाजूला ५-६ डोंगर आणि त्यात आपले वेगळेपण जपत उभी "भीवाची काठी"!


तर  वडगाव गावातून कुडपन किंवा महाबळेश्वरला  वाहनाशिवाय पायी जाण्याचा हा पर्याय! आमच्या ग्रुपमधील काहीजण खडूने दिशादर्शक खुणा करत होते म्हणून बरं नाहीतर नवखा माणूस हमखास चुकणारचं!

दुपारी १२ च्या दरम्यान वडगाव बुद्रुक पासून सुरु केलेल्या ट्रेकला कुडपनला यायला ४ वाजले! कुडपन जवळ येते तसे चारही बाजूने वेढलेली ही घाटवाट अतिशय मोहक वाटते! त्यात कुडपन गावात शिरलो की त्या गावाचं सौदर्य मन मोहविते. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आणि विसावलेलं कुडपन हे ३०-३५ घराचं घुमटाकार गाव!


गावाच्या मंदिरात आमचा चहा-पाण्याचा आणि जेवणाचा कार्यक्रम झाला! गावातील एका आजींनी घरात झोपण्यासाठी आश्रय दिला आणि घरात पेटलेल्या चुलीच्या जळक्या निखाऱ्यामुळे थंडीपासून बचाव झाला!

दुसऱ्या दिवशी सहा वाजता चहा आणि उपीट तयार होते. साधारण ७.३० वाजता प्रतापगड मार्गे कुडपन ते पार(सोंड) गाव असा ट्रेक सुरु झाला.  माझ्या दुखावलेल्या गुडघ्याला ६-७ तास ट्रेकच्या ताणातून विसावा देण्यासाठी मी ट्रेक न करण्याचा निर्णय घेतला!

आमची गाडी पार(सोंड) गावात आली आणि मी इथल्या प्रसिद्ध "श्रीरामवरदायिनी" मंदिराला भेट दिली. मंदिराच्या नावात " श्रीराम" असले तरी मंदिर देवीमातेचे आहे! रावणाचा वध करण्यासाठी प्रभूरामचंद्रांना ज्या तुळजा भवानी मातेने आशीर्वाद दिला ती तुळजा भवानी म्हणजेच श्री. क्षेत्र पार्वतीपूर अर्थात पार येथील श्रीरामवरदायिनी माता! शिव आणि शक्ती यांचे एक अलौकिक रूप!


मंदिराच्या आवारात मानाईमाता आणि झोलाईमाता मंदिर आहे.


मंदिराच्या आवारात केदारेश्वराचे प्राचीन शिवालय आहे.


शिवलिंग आणि नंदी यांची प्रतिमापार(सोंड) गावापासून साधारण दोन किमी अंतरावर शिवछत्रपतींनी  कोयना नदीवर बांधलेला एक दगडी पूल आहे. कोयना नदीला पूर आल्यावर प्रतापगडावर जाता येत नसे म्हणून शिवरायांनी हा पूल बांधला असे सांगितले जाते. तसेच छत्रपतींंच्या काळात पार्वतीपूर उर्फ पार(सोंड) हे गाव एक मोठी बाजार आणि व्यापारी पेठ होती.


पुलाखाली आणि कोयना नदीच्या काठावर गणपतीचे सुबक मंदिर आहे.


पार (सोंड) गावाच्या जवळचं कोळदुर्ग नावाचा किल्ला असल्याची माहिती एका गावकऱ्याने दिली. किल्ल्यावर जननींमातेचे मंदिर आहे आणि कोळी समाजाची ही आराध्य देवता आहे! असो.

माझा हा फेरफटका होईपर्यंत ट्रेक संपवून आमचा ग्रुप पार गावात दाखल झाला. कुडपन -प्रतापगड-पार(सोंड) गाव ह्या ट्रेकचे वर्णन काही जणांकडून विचारून घेतले, ते असे,

सुरेंद्र दुगड : "कुडपन गावातून ट्रेक सुरु केला की साधारण आपल्या सिंहगडापेंक्षा ऊंच (साधारण ४०० मी) चढाई आहे. कुडपन चढून आल्यावर आपल्याला ओळीने एका रेषेत महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड दिसतो. हा ट्रेक सह्याद्रीच्या धारेवरून प्रतापगडाच्या दिशेने जातो. इथे डावीकडे पडणारे पावसाचे पाणी सरळ १५० किमी चा प्रवास करून अरबी समुद्राला मिळते तर उजवीकडे पडणारे पावसाचे पाणी थेट १००० किमी प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते. अशी ही अदभूत घाटवाट!  प्रतापगडानंतर अफझलखानाच्या कबरी जवळून घनदाट जंगलातून ही वाट पार(सोंड) गावात पोहोचते. पार (सोंड) घाटाच्या देशावरील सुरुवातीला सह्यधारेवर प्रति श्रीरामवरदायिनी मंदिराच्या वरून हा ट्रेक मार्ग आहे. जवळ जवळ सहा तासांच्या ह्या ट्रेकची वाट अतिशय सुंदर आहे, थोडं जंगल आणि मध्यभागी असलेल्या एका  निमुळत्या कडयावरून हा ट्रेक जातो."
भगवान चवले: "कुडपन वरून कुमठे गावाच्या धनगरवाडी वरून हा ट्रेक मार्ग जातो. हा मार्ग पूर्णत: जंगलातून जातो आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. तिथून अर्ध्यातासात आपण पार(सोंड)गावात येतो. कुमठे गाव आणि त्याच्या वाड्यांवरून कामाच्या उद्देशाने लोक प्रतापगडावर येताना दिसतात".


मंदिराच्या आवारात भोजन तयार करून त्याचा आस्वाद घेतल्यानंतर साधारण ४ वाजता पुण्याकडे परतीचा प्रवास सुरु झाला. वरंधा घाटातून भोर मार्गे पुण्यात आलो तेव्हा ९.३० झाले होते!

एक अनोखा ट्रेक केल्याचा आनंद तर होताचं परंतु योगायोगाने राजपुरोहित काका आणि मा. एव्हरेस्ट एक्सपीडीशन साठी अथक प्रयत्न करणाऱ्या, भगवान चवले यांची ट्रेकला सोबत हा आत्मिक आनंद देणारा क्षण होता!सुरेंद्र सर, ईश्वर काका यांच्या तोंडून "सविता" हे एकवचनी संबोधन मनाला स्पर्शून गेले!


सुधाकर कुलकर्णी यांनी गुडघ्यावरील जखमेची काळजी खूप आपुलकीने घेतली.

विजय येनपुरे सरांसोबत छान गप्पा झाल्या आणि गणेश आगाशे सरांची उणीवही जाणवली!

जेन्सी ह्या माझ्या मैत्रिणीची ट्रेकला पुनर्भेट, प्रियांका, डॉ. अनुराधा , सुजाता कोंडे आणि  ट्रेकमधील अन्य सख्यांसोबत मौलिक वेळ घालवला.

सागर, सुमीत आणि खासकरून प्रशांतची मिळालेली साथ ट्रेक सुसह्य करून गेली!

शारीरिक आणि मानसिक बळाच्या जोरावर ट्रेक करताना   असे ट्रेक सहकारी मिळाले की मन किंचित दुर्बल, हळवं झालं तर काय हरकत आहे, हो ना?

काजू घातलेला चविष्ट उपमा, गरमागरम भजी, भाकरी आणि ठेचा, पावटयाची आमटी, राजपुरोहित काकांनी आणलेले कंदी पेढे-डिंक-बेसन-मोतीचूर लाडू, सुकामेवा, आलं घातलेला चहा  आणि असेच काही लज्जतदार पदार्थ ही तर खास मेजवानी (हो, आणि मी बनवलेले पालक पराठे कसे विसरून चालतील)!---..असो.

दोन दिवसाच्या ह्या ट्रेकची फी होती.... रु ७५० फक्त ! आहे ना भारी !!

अशाचं एखाद्या अनोख्या ट्रेकला पुन्हा भेटूचं! पुढच्या वर्षी!२०१८ मध्ये!

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

KEEP HIKING!


फोटो आभार: प्रशांत शिंदे, प्रदीप ढवळे, भगवान चवले आणि ट्रेक टीम

↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧↧

सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन संस्थेविषयी: ही संस्था २००० मधे स्थापन झाली. सुरुवातीला ६-७ जणांनी मिळून ट्रेक सुरु केला. त्यांचा पहिला ट्रेक होता, कात्रज ते सिंहगड! त्यावेळी ट्रेकचा तसा अनुभव नव्हता. ह्या ट्रेकमध्ये सर्व ट्रेक सहभागी पाणी, उन्हाचा तडाखा आणि ट्रेकमार्गावरील गवत-काट्या-कुट्यांनी त्रासून , थकून गेले. सुरुवातीला महिन्यातून एक ट्रेक असा ट्रेक प्रवास सुरु झाला आणि महिन्यातील तो एक ट्रेक कधीही चुकला नाही.

ट्रेक सहभागींकडून ट्रेकचा होईल तेवढाच (actual) खर्च संस्था आकारते, म्हणजेच "ना नफा- ना तोटा" ह्या तत्वावर हा खर्च घेतला जात्तो. ह्या तत्वावर काम करणारी बहुधा ही एकच संस्था पुण्यात आहे!

सुरुवातीला महाराष्ट्रातील किल्ले-गड यांच्या भेटी सुरु झाल्या आणि २०० पेक्षा जास्त किल्ले-गड त्यात समाविष्ट झाले.  जून २००८ मधे संस्थेने किल्ले-गड व्यतिरिक्त  नवीन ट्रेक मार्गांचा शोध सुरु केला आणि दर आठवड्याला ट्रेक करणे सुरु केले.

रॅप्लिंग सारखे साहसी कार्यक्रम देखील संस्थेने सुरु केले. त्यात समावेश आहे, काळू रिव्हर वॉटर फॉल रॅॅप्लिंग-दोन दिवस आणि प्लस व्हॅली रॅप्लिंग-एक दिवस! ह्या साह्सासाठी आवश्यक ते सर्व साहित्य जसे, रोप्स, हर्नेस, डीसेंडर, कॅराबीनर्सअर्स इ. संस्थेने मोठ्या प्रमाणात खरेदी केले.

संस्थेतर्फे चालविण्यात येणारे साहसी कार्यक्रम:
-साहसी खेळ: रॅप्लिंग आणि रॉक क्लायबिंग
-सह्याद्री तील विविध घाटवाटा ट्रेक्स...१०० हून अधिक घाटवाटा
-मूनलाईट ट्रेक्स
-विविध ठिकाणी मूनलाईट टेंट कॅम्पिंग
-२-४ दिवसांचे सह्याद्री ट्रेक्स
-डीप व्हॅली नाईट स्टे (कुंडलिका आणि सांदण व्हॅली)
- हिमालयीन ट्रेकसाठी लोकांना प्रोत्साहित करणे (ह्या वर्षी भगवान चावले यांना मा. एव्हरेस्ट एक्सपीडीशनसाठी प्रोत्साहित केले जात आहे)
-वर्षातून एकदा हिमालयीन ट्रेक करणे

२००८ सालापासून मागील सलग  ४७५ आठवडयामधे शनिवार-रविवारी होणारा एकही ट्रेक संस्थेने चुकवला नाही.

मागील ५२ आठवड्यामधे साधारणपणे ३००० लोकांनी ट्रेकमध्ये सहभाग घेतला. ह्या लोकांमधे विविध समाजातील, ७ ते ७८ वयोगटातील  स्त्री-पुरुषांचा आणि मुलांचा  समावेश आहे

ट्रेकसाठी संस्थेचे प्रयाण सकाळी ४ वाजता सुरु होते आणि हे ह्या संस्थेचे खास वैशिष्ट्य आहे!

ट्रेकसाठी अॉन-लाईन बुकिंग आणि त्या ट्रेकसाठी बनवलेल्या वॉट्स-अॅप ग्रुप मधे लिंकद्वारे अॅड होण्यासाठी सॉफ्टवेअरची सुविधा संस्थेने बनवली आहे.

ट्रेकमधे सहभागी झालेले लोकचं ट्रेकमध्ये नाश्ता-जेवण बनवतात. त्यासाठीची आवश्यक ती तयारीही ते स्वत:च करतात.

संस्थेच्या वॉट्स-अॅप ग्रुपमधे सध्या २००० लोकांचा समावेश आहे. (सर्व ग्रुपचा एकचं ब्रॉडकास्ट ग्रुप संस्थेने नुकताच बनवला आहे). डॉक्टर्स, चार्टर्ड अकाऊंटंट, कन्सल्टंट, सेवानिवृत्त लोक, बँक कर्मचारी, इन्शुरन्स कर्मचारी, पोलीस, सरकारी कर्मचारी, विद्यार्थी इ. ची ह्या २०००  मधे गणना होते. ह्तातील ३० -४० % लोक जेष्ठनागरिक आहेत!

दोन वर्षापूर्वी सह्याद्री ट्रेकर्स  चे एका चॅरिटेबल ट्रस्ट मधे रुपांतर झाले आहे आणि आता संस्थेचे नाव आहे,
" सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन"पुणे!

कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे आहे,
सुरेंद्र दुगड (फाऊंडर ट्रस्टी)
सुधाकर कुलकर्णी (ट्रस्टी)
विजय बुटाला (ट्रस्टी)

↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑

No comments: