काजवा महोत्सव स्पेशल: भोरगिरी ते भीमाशंकर नाईट ट्रेक, ९-१० जून २०१८


वडीलांच्या नोकरीमुळे लहानपण अवसरी खुर्द या गावी गेले. माझे ११ पर्यंतचे शिक्षण तिथलेच. त्या काळात असंख्य काजवे बघण्यात आले. मला आठवत अंधार झाला की गाव वस्तीच्या बाहेर काजवे दिसायचे. त्यासाठी रात्री उशिरा वगैरे घराबाहेर पडून काजवे बघायला जाव लागत नसे. "काजवे" हा तेव्हा ग्रामीण जीवनाचाच एक भाग. "काजवे पाहणे" ह्यात काही अप्रूप नव्हत. त्यांच्याबद्दल  विशेष माहिती नव्हती आणि त्याचं महत्व सुद्धा माहित नव्हत. कोणी विशेषरूपाने काजव्यांबद्दल सांगतही नसे. मग "काजवा महोत्सव" अरेंज करणे ही तर फारच दूरची गोष्ट. लहानपणानंतर काजवे तसे विस्मरणात आणि डोळ्याआड गेले! "डोळ्यापुढे काजवे चमकले" ह्या  उक्तीइतपतच त्यांच्याशी संबंध राहिला.   

'माची इको अॅन्ड रुरल टुरिझम' या पुण्यातील संस्थेने 'भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक' खास "काजवेदर्शन" साठी ठेवला आणि तो आनंद प्रौढपणी घ्यावा ह्या इच्छ्ने सामील झाले. 

हातात एक काजवा आला. साधारण तपकिरी रंगाचा तो छोटुसा किडा पाहून आश्चर्य  वाटलं.


गूगल फोटो
इवलाश्या किड्याला "चमकण्याच्या" नैसर्गिक देणगीने किती महानता मिळाली.


काजवा तसा खासचं. वर्षभरात एकदाच प्री-मान्सून काळात  दिसतो, साधारण १५ दिवस आपली छाप पडतो, जंगलवाटा आणि काही खास वृक्ष आपल्या लुकलुकण्याने मोहरून टाकतो आणि समागमानंतर नर काजवा आपले जीवन  दान करतो. 

प्रौढ वयात काजवेदर्शन  झाले आणि त्याचे शास्त्रीय तर आहेच परंतु तार्किक आणि तत्वज्ञान दृष्ट्या आकलन झाले. जीवनात काहीतरी दैदिप्त्यमान करून दाखवण्याचा संदेशच काजवा देत नाही का? असा विचार "चमकून" गेला. असो. 

ट्रेकमध्ये पावसाचा हलकासा शिडकावा सुरूच राहिला. लहान-मोठे खेकडे, इंगळी ( निळसर-जांभळट रंगाचा मोठा विंचू), जीका पाल, पाणदिवड साप, ससा, हे भोरगीरीच्या जंगलात बघता आले.भीमाशंकरच्या अभयारण्यात प्रवेश केल्यानंतर शेकरूची हालचाल  आणि शिळकरी कस्तूराची शिटी यांच्या आवाजाने जंगल जागे झाले. 

पहाटेच्या आकाशाची निळाई आणि  धुक्यातून मार्गक्रमण करण्याचा आनंद असा की  "इकडे तिकडे चोहीकडे"!रात्रीच्या मिट्ट काळोखात टॉर्च बंद करून, नि:स्तब्ध आणि नि:शब्द शांततेत  "काजवे लुकलुकणे" अनुभवणे, काजव्यांची शास्त्रीय माहिती समजून घेणे..... "माची" सोबतचा हा ही आनंद हटकेच!भीमाशंकर येथील शिवशंकराचे हेमाडपंथी मंदिर...धुक्यात नाहून निघालेले....आणि भोरगिरी गावात सकाळी अनुभवलेली पर्जन्यऋतूची चाहूल ---डोंगरावर धुक्याचे बस्तर, पावसाच्या शिडकाव्याने चकाकणारे रस्ते आणि कौलारू घरे! वाह!

सुरश्री लता मंगेशकर यांनी गायलेले हे गाणे .....

घन ओथंबून येती, बनांत राघू ओगिरती
पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेतीभोरगिरी ते भीमाशंकर ट्रेल ला साजेसेच नाही का?


फोटो आभार: ट्रेक टीम


No comments: