काही महिन्यांपूर्वीच मी Woods to Coast Outdoors हा ट्रेक ग्रुप जॉइन केला. ग्रुप वरच्या ट्रेक नोटिफिकेशन्स वाचत होते पण सर्व जुळून येत नव्हते. अखेर 26 नोव्हेंबर रोजी रायगड ट्रेक करण्याचा योग आला. त्याच दरम्यान सांदण दरी ची पोस्ट ग्रुप वर आली होती . लगेचच रजिस्ट्रेशन करून टाकले. त्यानंतर मात्र विचारांमध्ये गुरफटले. कित्येक 6-7 वर्ष मी सांदण दरी विषयी ऐकत आलेले, फोटो पाहत आलेले, ब्लॉग वाचत आलेले , अनुभव ऐकत आलेले. मला कधी जाण्याची उर्मी जाणवलीच नाही. रादर सांदण दरी ट्रेक चा विचार आला की मनात किंचित भय आणि आतून नकार समोर येत असे. यावेळी कसं कुणास ठाऊक रेजिस्ट्रेशन केलं. शेवटच्या घटकेपर्यंत ट्रेक ला जाईल की नाही याचा विश्वास मलाही नव्हता. याच एक कारण भय आणि दुसरं रात्री 11 वाजता प्रस्थान ! भय होते त्या लहान -मोठ्या खडकांवरून चालण्याचे, दुसऱ्यांदा करायच्या रॅपलिंगचे आणि अगदी नको वाटणाऱ्या रात्री-अपरात्री असणाऱ्या ट्रेक प्रस्थानाचे. या सर्व गोष्टीं पुढे शेवटी आतून आलेला होकार भारी ठरला !
ट्रेकबद्दलची सर्व माहिती मनिषाला (WTC organizer) आधी विचारून घेतलीच होती. 3 डिसेंबरला रात्री 11 वाजता पुण्यातून प्रस्थान केले. पहाटे पहाटे हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई अभयरण्याच्या हद्दीत प्रवेश करून साधारण पहाटे सव्वा पाचच्या सुमारास सामरद गावात श्री. यतील यांच्या घरी पोहोचलो . मनीषाचं नियोजन जबरदस्त! श्री. यतील यांच्या घरी आमचा चहा नाश्ता (पोहे आणि मॅगी ) पहाटे पाच वाजता तयार होता. थोडी विश्रांती, चहा-नाश्ता केला. सांदण दरी मध्ये लहान -मोठे खडक पार करायचे असल्याने ट्रेकिंग स्टीक सोबत घ्यायची की नाही यावर मनीषा शी चर्चा केली. विना स्टीक ट्रेक करणे ह्या विचाराच्या भयाने त्यात भर घातली. असो. ट्रेक तर करायचा होताचं. सव्वा सहाच्या दरम्यान दरीकडे निघालो. पहाटेच्या धुक्यात समोरच्या "रतनगड" च्या कडा नी कडा ठळक दिसत होत्या . रतनगड ट्रेक च्या आठवणी ताज्या झाल्या . अशावेळी गडाच्या पार्श्वभूमीवर एक फोटो तर अनिवार्यच होता (Thanks to Crisanta!)
विलोभनीय रतनगडाचे दर्शन घेत घेत दरीकडे जाणाऱ्या पायवाटे ने मला ऊर्जा मिळाली, उत्साह मिळाला .
हा पायवाट संपल्यावर दरीकडचा उतार चालू झाला. लहान -मोठे खडकांची सुरुवात. दरीत उतरण्याची माझी सुरुवात पण झालीच की..
खडकांवरून चालण्याआधी खडकवरून बसून फोटो तर हवाचं....
इथून पुढे दोन फाटे फुटलेले .. एक दरीत जाण्याचा ट्रेकचा रस्ता आणि दूसरा रॅपलिंग करून दरीत उतरण्याचा!
रॅपलिंग चा सुरुवातीचा रस्ता चढाई चा ! बाय -द -वे . आमचा साधारण 25 जणी मुलींचा ग्रुप होता बरं का !थोडं पुढं गेल्यावर सांदण दरीची प्रवेश कमान दिसली . तर आम्ही ह्या स्पेशल लेडीज ! (विथ किड्स)
मी रॅपलिंग साठी निघाले. बऱ्यापैकी गर्दी होती . चार -पाच दोर लावले होते. आमच्यातील एक एक मुलगी रॅपलिंग करत दरीत उतरत होती .
रॅपलिंग ची माझी वेळ आली. 70-75 फुट खोल दरी ! यतील दादांनी सर्व तयारी करून घेतली . सूचना दिल्या .
मी रॅपलिंग करत दरीत उतरले . सुरुवातीला किंचित धडधडलं,,,,"डयूक्स नोज" ला जे रॅपलिंग केलं होतं ते अगदी तंतोतंत सूचनांनुसार ! यावेळी जरा फास्ट केलं. इकडे -तिकडे किंचित डुलले. हे करताना अर्थातच आधीचे रॅपलिंग आठवले.
अखेर दरीत उतरले. उत्सुकता रॅपलिंगची नव्हती पण रॅपलिंगच्या दोऱ्या खालून पाहण्याची उत्सुकता मात्र नक्कीच होती..
दरीचा दर्शन देणारे हे काही फोटो ..
सांदण दरीचा मला आलेला अनुभव म्हणजे चांदण्यांचा शीतल शिडकावा! आजूबाजूचे अजस्त्र अति उंच खडक, त्यावर हलकाशी पाण्याची संतत धार, निमुळती दरी, खडकमध्ये साचलेले पावसाचे पाणी, अधून मधून आपल्यापर्यंत पोहोचणारे रविकिरण, पाण्यावर त्या किरणांची तिरिप आली की ते चांदण्यासारखे चमकताना दिसायचे. हे सर्व वातावरणचं जणू सौम्य शीतल शिडकावा -शरीराला , मनाला आणि भावनांना ! आम्ही बावीस लखलखत्या चांदण्या आणि त्यात अचानक चमकलेली शुक्राची चांदणी! आहे ना चांदण्यांचा लखलखीत शीतल शिडकावा ! एकमेकींच्या सहवासात अनुभवलेला ! मन -कण -क्षण मोहरून टाकणारा !
हा सुंदर शीतल अनुभव देणाऱ्या, समृद्ध नियोजन करणाऱ्या Woods to Coast (WTC) Outdoors च्या दोन लखलखत्या चांदण्या : मनीषा आणि प्रियां का !
फोटो आभार: सांदण दरी ट्रेक टीम
खास आभार : श्री यतील आणि उर्मिला: रॅपलिंग आणि भोजन व्यवस्था , सामरद
पुन्हा भेटुच : असाचं एखादा शीतल शिडकावा अनुभवण्यासाठी .......
8 comments:
Very nice mam kupcha chan 👍👍👌👌
Nice
सुरेख 👌👌👌
Bharich 👌👌👍
👌🏻👌🏻
Masssst ☺️👏👏👍
Khup Chhan Anubhav Mandle aahet
Yamule mala hi tracking chi avad nirman zali aahe
So nice....wachtana kshanbhar bhatkanti anubhawalyasarkhech watle....thanks for such sharing
Post a Comment