ट्रेक पूर्ण करण्याची इच्छा मात्र प्रबळ होती. एसजी
ट्रेकर्सने हा ट्रेक १२ फेब्रुवारीला २०१७ ठेवला आणि विशालकडून “ग्रीन सिग्नल” ही
मिळाला.
ट्रेक करण्याआधी इंटरनेटवर ह्या किल्ल्याची माहिती वाचली. माथेरान
आणि पनवेल जवळील प्रबळगडाला श्री. शिवाजी महाराजांनी गड काबीज करण्यापूर्वी नाव
होतं “मुरंजन”! ह्या गडाच्याच बाजूला एक किल्ला आहे तो म्हणजे “कलावंतीणीचा सुळका”!
प्रबळगड हा मुख्य किल्ला आणि कलावंतीण हा “सिस्टर फोर्ट”! किल्ल्याची उंची २३००
फुट! मुख्यत: आजूबाजूच्या किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी हा “वॉच टॉवर”! असो. हा
किल्ला “प्रिझनर्स जेल” होता आणि “राणी कलावंतीण” ला इथे ठेवलं होतं असे म्हणतात.
असो.
सकाळी साधारण ११ वाजता ट्रेक सुरु केला. प्रबळगडाचा पायथा म्हणजे प्रबळमाचीला साधारण १२-१२.१५ ला पोहोचलो. हा रस्ता बऱ्यापैकी रुंद आणि खडे-मातीने व्याप्त होता. दोनचाकी वाहन अगदी आरामात जाऊ शकेल असा हा रस्ता. पण मधेचं एक भली मोठी पाईप लाईन आडवी आल्याने पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. थोडसा नागमोडी आणि चढाईचा रस्ता. असं वाटलं की ट्रेकचं हे अंतर विनाकारण वाढलं आहे!
अन्यथा बोअर होईल असा हा रस्ता आरके (राजकुमार डोंगरे) त्याचा मित्र अंकुश तोडकर आणि अमित डोंगरे ह्यांच्यामुळे खूप “इंटरेस्टिंग झाला”!. आरके आजूबाजूच्या वनस्पती, पाने, फळे, फुले यांची माहिती देत होता आणि आम्ही त्या माहितीचा आनंद घेत होतो!
अन्यथा बोअर होईल असा हा रस्ता आरके (राजकुमार डोंगरे) त्याचा मित्र अंकुश तोडकर आणि अमित डोंगरे ह्यांच्यामुळे खूप “इंटरेस्टिंग झाला”!. आरके आजूबाजूच्या वनस्पती, पाने, फळे, फुले यांची माहिती देत होता आणि आम्ही त्या माहितीचा आनंद घेत होतो!
कलावंतीण दुर्ग ट्रेक खरा सुरु होतो तो प्रबळमाची पासून! खिंडीपर्यंत (प्रबळगड आणि कलावंतीण मधली व्ही
आकाराची दरी)असेंड ,मग पायऱ्या आणि शेवटी २० फुटाचा रॉक पॅच!
खिंडीपर्यंतचा हा रस्ता खड्या चढाईचा आणि किंचितसा अरुंद
आहे. आजूबाजूला झाडी आणि मधली पायवाट खिंडीत घेऊन जाते.
साधारण अर्ध्या तासात आम्ही खिंडीत पोहोचलो. इथून पायऱ्या
सुरु होतात! आज खूप सारे ट्रेकर्स आले होते. काहीजण पायऱ्या उतरत होते त्यामुळे
आम्हाला वाट पहावी लागली. इथे लिंबू-पाणीची छोटी टपरी उभारलेली आहे. हे ट्रेकर्स
खाली येईपर्यंत लिंबू-पाणीचा आस्वाद घेतला.
विशालने अत्यंत कडक शब्दात सूचना केल्या “आता पायऱ्या सुरु
होतात, आपल्याला एकावेळी एकानेच चढायचं आहे, दोघांमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे,
सावकाश चढायचं आहे, घाई बिलकुल नाही आणि सर्वात महत्वाचं की कोणीही फोटो काढायचे
नाहीत. फोटो काढताना कोणी दिसलं तर त्याचा मोबाईल जप्त केला जाईल”! विशाल, ज्या
अनेक कारणांसाठी मला प्रभावित करतो त्यातलं हे एक कारण! आवश्यक तिथे तो इतका कडक
होतो, आवाजाला इतकी धार येते की त्याच्या कडक वाणीने आणि धारदार शब्दाने समोरचा
माणूस उभा-आडवा चिरत जातो! असो.
विशालकडून सिग्नल मिळाल्यावर ह्या पायऱ्या पार करायला
सुरुवात झाली. एक खडा-आडवा दगडी पॅच पार केल्यानंतर दगडात कोरलेल्या पायऱ्या सुरु
होतात.
मी अतिशय संथपणे, लक्ष पूर्ण चढण्यावर केंद्रित करून चढायला
सुरुवात केली. बेडकासारखी पोझ घेऊन पायऱ्या चढत होते. एक हात, प्रसंगी दोन्ही
हाताने वरच्या पायरीचा आधार घेत, उजवा पायाला हिसका बसू न देता अत्यंत सावकाश
पायऱ्या चढत होते. एक पायरी चढायला कठीण वाटली. एका हाताने वरच्या पायरीचा आधार
घेतला तरी माझा उजवा पाय वरच्या पायरीवर ठेवण्यासाठी ते अंतर खूप जास्त होतं. अमित
ने हाताचा आधार दिला आणि मला शरीराला थोडा जर्क द्यावा लागला! कातळ खडकात
कोरलेल्या ह्या पायऱ्या नागमोडी होत्या. इथे पायऱ्या वळण घेत होत्या त्या वळणावर
पायऱ्या अरुंद होत जात होत्या आणि त्यामुळे पाय सावधानतेने ठेवावा लागत होता. एका
बाजूला खडकाचा आधार तर दुसऱ्या बाजूला खोल दरी! हा ट्रेक खतरनाक होतो तो ह्या एका
कारणासाठी! पायऱ्या चढताना पाय दरीच्या दिशेने न ठेवता खडकाच्या दिशेने ठेवत चढण,
एक कसब आहे. गरगरलं, भोवळ आली, लक्ष विचलित झालं, पाय दरीच्या दिशेने पडला तर खाली
दरीतचं! असं वाटलं, एका दमात ह्या पायऱ्या चढण्याचं धाडस कोणी करू नये. नागमोडी
जाताना घेरी येऊ नये म्हणून काही पायऱ्या चढल्यावर काही क्षण स्थिर होणं जास्त
संयुक्तिक! जीवनाला आव्हान देणारा वाटला हा पायऱ्याचा पॅच!
प्रबळगडावरून काढलेला ह्या किल्ल्याचा फोटो इंटरनेटवर
बघितला तर काळजात “धस्स” होतं! काळजाचा “ठोका” चुकतो. असं असलं तरीही फोटो
पाहताक्षणीचं हा किल्ला भूरळ पडतो, लक्ष वेधून घेतो, मन आकर्षित करून घेतो, मन
खेचून घेतो. प्रत्यक्ष जाऊन किल्ला बघावा, ते साहस, धाडस, थ्रील अनुभवावं असं
वाटलं नाही तर नवलचं!
कशा बनल्या असतील ह्या पायऱ्या, कोणी बनवल्या असतील, का
बनवल्या असतील असे असंख्य प्रश्न स्पर्शून जातात! विनांआधार ताठपणे पूर्वीचे लोक ह्या
पायऱ्या चढत/उतरत (प्रसंगी पळतही) असतील तर त्यांची शरीरयष्टी कशी असेल हा विचार
मनात आल्याशिवाय रहात नाही. किती कणखर असतील, ताकदवान असतील, किती उंच असतील आणि मनाने
किती बलवान असतील ! आजुबाजूच्या किल्ल्यावर नजर ठेवताना लागणारी एकाग्रता, मनाची
कमालीची स्थिर, अचंचल अवस्था, शारीरिक ताकद...बापरे किती अवघड काम हे!
“शत्रूचं आक्रमण महाकठीण करून ठेवण” हिचं असे किल्ले
बनवण्यामागची धूर्त भूमिका असावी! आक्रमणाला आणि विजयाला आव्हान देणारे असे किल्ले
आपल्या अधिपत्याखाली असावेत, आपण काबीज करावेत अशी मनीषा बाळगण “थोर” चं म्हणावं
लागेलं!
हा किल्ला “प्रिझनर्स जेल” (नजरकैद म्हणावं का?) म्हणून
असेल तर “मृत्युच्या सापळ्याचीचं” शिक्षा की! असो.
पायऱ्या चढून गेले आणि हुश्श झालं! माझ्या तोंडी पहिले शब्द
होते “गेल्यावेळी ट्रेक न करून मी काय गमावलं होतं”! अमितला माझ्या भावना समजल्या .त्याच्या
डोळ्यात त्या दिसून आल्या! विशाल, ओंकार, स्मिता आणि तो माझ्या इथपर्यंत येण्यावर खूप
खुष झाले होते!
२० फुटी रॉक पॅच पार करणं! आता खरी परीक्षा होती! लांबून तो
कणखर, गोलकार, विस्तीर्ण, खडा पहाड पाहून.......खरं सांगू ..अंतरंग शांत
होतं....एक गोष्ट प्रत्कर्षाने जाणवतं होती की “अंतरंगातून नकारात्मक आवाज येत
नव्हता...आणि हीच गोष्ट सकारात्मक होती!” कौल मिळाला होता!
पुन्हा एकदा विशालकडून सिग्नल मिळाला आणि आम्ही रॉक पॅचच्या पायथ्याशी जाऊन थांबलो. २-३ जण चढून गेल्यावर विशालचा आवाज आला, “सविता मॅडम ना पाठवा. मॅडम या”.... आमच्या डाव्या बाजूने गिरीप्रेमी तर्फे आलेली मुले रॉक पॅच उतरत होती म्हणून आम्ही उजव्या बाजूने रॉक पॅच चढत होतो.
चढण्याआधी, डोळे बंद केले, एक दीर्घ श्वास घेतला, मनाशी
संवाद साधला आणि सुरुवात केली! विशाल, स्मिता आणि ओंकार ने सूचना दिल्या. कुठे पाय
ठेवायचा, पाय कसा ठेवायचा, हाताला ग्रीप कुठे आहे, शरीर किती अंशात वळवायचं आहे
वगैरे...माझ्या कमी उंचीमुळे काही ठिकाणी शरीर थोडं पुश करावं लागलं. ओंकार, विशाल
यांनी प्रसंगी हाताचा आधार दिला. रॉक पॅच संपणार तर माझ्याकडून झालं काय की तळपाय
ठेवून उभं राह्यचं तर मी उजवा गुडघा खाली जमिनीवर टेकवला आणि माझ्याकडून काय झालंय
ते माझ्या लक्षात आलं! माझ्याचं काय विशालच्याही ते लक्षात आलं! सुदैवाने एकही
वेदना गुडघ्याने दिली नाही आणि तोल न जाता सहीसलामत उभं राहून तो रॉक पॅच पार
झाला! हे सगळं साहस करताना मला दिसत होते ते फक्त मी आणि आवाज ऐकू येत होते ते फक्त विशाल आणि ओंकारचे!
बस्स. मनाच्या त्या अवस्थेतून मी भानावर आले ते टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने!
माझा रॉक पॅच सर झाल्यावर खाली असलेल्या माझ्या प्रत्येक ट्रेक सहकाऱ्याने टाळ्या
वाजवून आनंद व्यक्त केला होता! त्याक्षणी आसमंतात फक्त एक आवाज होता आणि तो होता
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाचा! त्या आवाजाने आणि ट्रेक सहकाऱ्यांच्या भावनेने
माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या! कंठ दाटून आला! आवंढा आला!
माझ्या पाठोपाठ अमृता वर आली आणि मला कडामिठी मारून
म्हणाली, “मॅम, तुम्ही सॉलीड आहात, सिंपली ग्रेट. तुम्हाला पाहून प्रेरणा मिळते”!
विशालने आधी मुलींना वर चढू दिल्याने आम्ही मुलींनी वर
पोहोचल्यावर मनसोक्त आनंद घेतला.
भरपूर फोटो काढले. केळकर सरांनी आमचे प्रत्येकीचे “विनिंग पोझ” मधले फोटो काढले!
भरपूर फोटो काढले. केळकर सरांनी आमचे प्रत्येकीचे “विनिंग पोझ” मधले फोटो काढले!
वर पोहोचल्यावर ह्या “मृत्युच्या सापळ्याची भयानकता”
जाणवली! आजूबाजूला आहे फक्त मोठे मोठे डोंगर, खोलवर दरी आणि मध्ये हा खडा “वॉच
टॉवर”!
“फक्त वाऱ्यावर जगायचं(?) ठिकाण”!
“फक्त वाऱ्यावर जगायचं(?) ठिकाण”!
आधीच्या टप्प्यावर फडकणारा तिरंगा आणि इथला भगवा झेंडा...त्या
मृत्युच्या सापळ्यातही जीवनआशेचा किरण फैलावत आहेत असं वाटलं!
आता डीसेंडिंग....विशालने आता मुलांना आधी खाली उतरायला
सांगितलं! माझी वेळ आली..एक क्षण थरथरले! कारण मी उलटी/पाठ करून उतरू शकत नाही. मी
तसे उतरण्यात कम्फरटेबल नाही...विशाल म्हणे, “इथे हात ठेऊन तुम्हाला पाठी वळायचं
आहे”..म्हटलं “ राजा, मला ते नाही जमणारं”....मग काय,
काय काय कार्यपद्धती अमलात आल्या ते वाचाचं! वर ओंकार, दगडाच्या बाजूने स्मिता आणि
दरीच्या बाजूने विशाल उभे! जिथे ग्रीप आहे तिथे माझा पाय पुरत नव्हता म्हणून
स्मिताने आणि विशालने त्यांच्या मांडीवर आणि पायावर पाय ठेवायला मला सांगितलं.
ओंकार खाली वाकलेला, त्याचा एक हात माझ्या हातात! विशाल सारखा म्हणत होता “मॅडमला
आपल्याला दगडाच्या बाजूने झुकू द्यायचं आहे, माझ्या बाजूने नाही”...मला हे सगळं
थोडं कठीण जातयं असं लक्षात आल्यावर अमितही मदतीला आला! स्मिताच्या भाषेत “ मी
चारही बाजूंनी कव्हर झाले होते”!
शेवटच्या टप्प्यावर पाय खाली पुरावा
म्हणून मी स्वत:ला जरा जोरात पुढे ढकललं आणि माझावरची पकड घट्ट ठेवण्याच्या प्रयत्नात
विशालची स्वत:वरची पकड किंचित ढासळली आणि तो जरासा हलला! काही क्षण तो डिस्टर्ब
झाला पण मी सही सलामत खाली आले. मनात आलं, “सविता, इतरांनाही अशा प्रकारच्या मनाच्या
अवस्थेत टाकणारी ही कुठली ट्रेकची आवड? का? कशासाठी?”...विशाल मला ग्रीन सिग्नल
देतो तेव्हा तो आणि त्याची टीम किती मोठ साहस, आव्हान स्वत:वर घेत असते ह्याचा
पुन:प्रत्यय मला आला!
प्रत्येक सहभागीकडे जातीने लक्ष देणे, त्यांची सूरक्षितता
जपणे हे खूप मोठं आव्हान विशाल, ओंकार, स्मिता यांनी समर्थ ताकदीने पेललं. काही
सहभागीची मोलाची साथ पण होती. असं टीम वर्क हेचं समीट साठी अनमोल असतं! असो.
पायऱ्या उतरताना परत तशीच एकाग्रतेचा वापरली. अत्यंत
काळजीपूर्वक अजिबात घाई न करता पायऱ्या उतरले. आता काय प्रबळमाची पर्यंत सरळ सरळ पायवाटेने
खाली उतरायचं होतं. मी स्टीक न वापरता खाली उतरले. खूप सावधानतेने, उतरण्यावर पूर्ण
लक्ष एकाग्र करून. स्टीक न वापरायची ही दुसरी वेळ होती!
डोंबारी दोरीवर ज्या पद्धतीने चालतात त्याची आठवण येत होती. स्टीक नसेल तर मी ही तसचं काहीसं करते. दोन हात दोन्ही बाजूने पसरवले की मला तोल राखता येतो!
डोंबारी दोरीवर ज्या पद्धतीने चालतात त्याची आठवण येत होती. स्टीक नसेल तर मी ही तसचं काहीसं करते. दोन हात दोन्ही बाजूने पसरवले की मला तोल राखता येतो!
उतरताना विशाल आणि अमितशी गप्पा मारत कधी प्रबळमाची आली समजून आलचं नाही. भरपेट जेवण केलं आणि पुढचा परतीचा प्रवास सुरु केला. ही उतरण अगदीच सोपी होती. भला मोठ्या रस्त्याने उतरायचे बस्स! आम्ही पाच वाजता खाली पोहोचलो आणि पुण्यात रात्री ९.१५ वाजता!
कार्तिकेय बरोबर मी २-३ ट्रेक्स केले. त्याचा पहिला ट्रेक एस. जी. सोबत होता आणि आता तो जेव्हा पुणे सोडून कायमस्वरूपी चेन्नईला जातोय त्याचा शेवटचा ट्रेक पण एस. जी. सोबतचं होता!
कार्तिकेय, तुला मी आणि एस. जी. ट्रेकर्सकडून खूप खूप शुभेच्छा!
आम्हाला तुझी आठवण नेहमीच येत राहील!
माझ्यासाठी हा संस्मरणीय ट्रेक होता. ढाक बहिरी ट्रेक नंतर एक
नवीन साहस, धाडस मी केलं होतं! ह्या ट्रेकला आरके चा सहवास आणि त्याच्या वनस्पती संदर्भातील
ज्ञानाचा लाभ घेता आला आणि अमितची ओळख झाली. गमतीने आमचं बोलणं देखील झालं की “डोंगरे
ब्रदर्स” मला ट्रेक समीटसाठी लकी ठरले!
अमितने तर खूप सुंदर साथ केली. ट्रेकच्या इति पासून अंता पर्यंत तो माझ्या सोबत होता! आरके साई, प्रसाद, अंकुश आणि प्रीतम यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे मला बळ मिळालं! अमृता आणि ह्या सर्वांसोबत खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्या गप्पातून स्वत:चीच नव्याने ओळख अनुभवली!
अमितने तर खूप सुंदर साथ केली. ट्रेकच्या इति पासून अंता पर्यंत तो माझ्या सोबत होता! आरके साई, प्रसाद, अंकुश आणि प्रीतम यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे मला बळ मिळालं! अमृता आणि ह्या सर्वांसोबत खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्या गप्पातून स्वत:चीच नव्याने ओळख अनुभवली!
जेव्हा जेव्हा “कलावंतीण दुर्ग ट्रेक” ची आठवण येईल तेव्हा
तेव्हा डोळ्यासमोर येतील त्या दगडात कोरलेल्या विलोभनीय पायऱ्या, फडकणारा तिरंगा
आणि भगवा झेंडा, विशालच्या कडक शब्दातील सूचना, माझ्या ट्रेक समीट साठी विशाल आणि
टीमने वापरलेल्या कार्यपद्धती, आरके, अमित, प्रसाद, साई, प्रीतम, अमृता इ.
सोबतच्या गप्पा आणि रॉक पॅच पार केल्यानंतर झालेला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट!
4 comments:
Wonderful madam....so proud to have known you....truly inspirational you are....
Awesome one
Well captured, nice read!
You are always been an inspiration...!
mast likhan
Post a Comment