तुंग आणि तिकोना ट्रेक, २८ ऑक्टोबर २०१८

१९ जून २०१६! कसा विसरणार हा दिवस? एका दिवशी दोन किल्ले/ट्रेक केलेले! सकाळी तिकोना किल्ला तर दुपारी तुंग किल्ला!

आणि हो, माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येचा केक तुंग किल्ल्यावर  कापलेला. वाढदिवसाच्या दिवशी गडावर असण्याची इच्छा पूर्ण झालेली!

आज दोन वर्षांनी पुन्हा तेच दोन किल्ले!...... थोडे स्मरणात राहिलेले ...थोडे विस्मरणात गेलेले....

तुंग किल्ला आठवला की आठवली ती केळीच्या पानासारखी दिसणारी  पाने/झाडे! आतापर्यंत केलेल्या ट्रेकमध्ये ह्या झाडांची लागवड कुठे दिसली नव्हती. असो.

तिकोनापेठ मार्गे  पवना धरणाच्या जलाशयाला वळसा घालत एका वळणावर तुंग किल्ल्याचा झालेले डोळा दर्शन अप्रतिम! किल्ल्याकडे पाहताना जी भावना निर्माण झाली ती (ऊ) तुंग!



पायथ्याच्या महाकाय वृक्षांच्या सावलीत प्रवासाचा शीण नाहीसा झाला. गर्द सावलीत उभे हनुमानाचे मंदिर.



ट्रेकच्या आरंभबिंदुला उभारलेल्या "किल्ले तुंग (कठीणगड)" या बोरघाट रक्षक  किल्ल्याच्या माहितीपर फलकाकडे नजर गेली. तुंग-कठीणगड-बंकीगड अशी नामकरण झालेला किल्ला.


 
किल्ल्याची सुरुवात झाली तीच मुळी दगडी पायऱ्यांनी. दोन्ही बाजूला झाडे लगडलेली आणि मधून जाणारी ही दगडांची वाट! थोडे वर गेलो तर कातळात कोरलेली हनुमानाची प्रतिमा.



चढाईच्या दगडी पायऱ्या पार करत वलयाकृती वळण घेत ....



गडाचा पहिला दरवाजा दिसला. दार नसलेला दरवाजा. मागच्या ट्रेक प्रमाणे आज देखील हा दरवाजा मला खूप देखणा भासला. नक्की कशामुळे सांगता येत नाही. कदाचित केळीच्या पानांचा गर्द हिरवेपणा, निळाशार आकाश आणि त्यामध्ये दिमाखात उभा हा दगडी दरवाजा! ती रंगसंगती मला आवडली असावी.



दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे बुरुज दिसला तर उजवीकडे पायऱ्या.



गडावर जाणाऱ्या.  कुसळाच्या झाडीतला समोरचा रस्ता थेट गेला तो पश्चिम बुरुजाकडे. हा बुरुज आजही चांगल्या अवस्थेत आहे.



बुरुजावरून दिसतो लोहगड-विसापूर, देवघरचा डोंगर , कोराईगड आणि मोरगीरीचे अथांग पठार.



बुरुजाकडे जाताना "दहाण" नामक असंख्य फुले फुललेली. (फुलाचे नाव वनस्पती अभ्यासक श्री. राजकुमार डोंगरे यांनी सांगितले आहे )प्रत्येक गडावर त्या त्या मोसमात काही विशिष्ट फुले फुलतात. दुसऱ्या गडावर ते फुलं बघायला मिळतेच असे नाही. दहाण फुल हे त्या गडाचे वैशिट्य! यावेळी तुंग किल्ल्याचे वैशिट्य होते हे फुल....



बुरुजाकडून माघारी येऊन उजवीकडच्या पायऱ्यांनी वर चढलो. आता दिसला तो लोखंडी दार असलेला गोमुखी दरवाजा.


ह्या दरवाज्यासमोर हनुमानाची तटबंदीत कोरलेली प्रतिमा.



दरवाजाच्या आत दोन्ही बाजूला भल्या मोठ्या देवड्या. थोड पुढे गेलो तर गडमाथ्यावर पाण्याचा खंदक . तुंग किल्ल्याचे पाण्यातील प्रतिबिंब तर बहुत सुंदर!


टाक्या शेजारी गणपतीचे मंदिर.



गणपती मंदिराला वळसा घालून पायवाट जाते ती थेट बाल्लेकिल्ल्याकडे. बालेकिल्ल्याला तशी खडी चढाई आहे. चढाई संपली की तुंगाई मातेच मंदिर आणि ध्वज असलेला बालेकिल्ला!


पवन मावळ आणि पवन जलाशयाचा विलोभनीय नजरा इथून बघायला मिळतो.

मंदिरा जवळील एका झाडावर सुंदर निळे फुलपाखरू विसावलेले. बराच वेळ स्तब्ध. रवीप्रकाशात स्वत:चा निळा रंग खुलवत बसलेले. प्लेन रॉयल ब्लू बटरफ्लाय हे त्याच नाव!



साधारण सव्वा नऊला वाजता सुरु केलेला ट्रेक संपवून खाली आलो ते दुपारी १२ वाजता. झाडांच्या घनदाट आणि थंडगार सावलीत भोजन करून तिकोनापेठ चा पल्ला सुरु केला.

तिकोनापेठकडून किल्ल्याकडे जाताना दूरवर किल्ल्याचे खूप सुंदर दर्शन झाले. तिकोना उर्फ वितंडगड उर्फ अमनगड.



साधारण २ च्या सुमारास तिकोना गड चढायला सुरुवात केली.



चढाईच्या सुरुवातीलाच श्री. शिवदुर्ग संवर्धन समितीने पायऱ्या बांधलेल्या आहेत. खडी चढाई पार केल्यानंतर



किल्लेदार सुजित मोहोळ चेक पोस्ट वर आपलं स्वागत करतात.


चेकपोस्ट सोडल की लागतो वेताळ दरवाजा..



गडचढाई करून गेल्यानंतर उजवी जडे आहे  तो वेताळ बुरुज आणि वेताळ देवाची प्रतिमा.



थोडे पुढे गेलो आणि स्वागतालाहजर होता चपटदान मारुती.


पाण्याचा खंदक, तळजाई देवीचे गुहेतील मंदिर.


गडावरील श्री. वितंडेश्वर मंदिराकडे आणि महादरवाज्याकडे जाणारा दिशादर्शक फलक इथे आहे.


जवळच चुण्याचा घाणा देखील.



खड्या दगडी पायऱ्या वरून गडाची अंतिम टप्प्यातील तटबंदी दिसून आली.



या पायऱ्या काळजीपूर्वक चढून गेल्यावर गडाच्या अंतिम टप्प्यातील पायऱ्या. इथे पाण्याचे टाके आहे. ह्या पायऱ्या चढायला अंगावर येणाऱ्या आहेत. काळजीपूर्वक आणि धीम्या गतीने एक एक पायरी चढली आणि तेवढ्याच सावधानतेने उतरली तर गडावर सुखरूप जाता येते.


पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा अंतिम दरवाजा, तटबंदी आणि बुरुज.


दरवाज्यातून डावीकडे गुहा आहे..


गडाला चौफेर तटबंदी आहे. सध्या तिचे मजबुतीकरण चालू आहे.

इथूनच गडाच्या बालेकिल्ल्याकडे पायऱ्या जातात.


वर श्री. वितंडेश्वराचे मंदिर आहे.


मंदिरा समोर शिवलिंग आणि नंदी.


मंदिराच्या तळाशी गुहा आणि पाण्याचे भले मोठे टाके आहे.


मंदिराच्या मागील बाजूस गडमाथा आहे.गडमाथ्यावरून दिसणारा तुंग विलोभनीय! पवना जलाशयाच्या विळख्यात उभा असलेला तुंगचा सुळका. भातशेती आणि मंदिराच्या मागील बाजूचे पाण्याचे टाके.


गडाची अभिमान आठवण म्हणजे श्री. आप्पा परब यांची भेट.


दुपारी दोन वाजता सुरु केलेली चढाई गड फेरी संपवून आणि गड उतराई करून साधारण ५ वाजता संपली. पुण्यात परतलो ते रात्री साडे आठ वाजता.

स्मरण-विस्मरणाच्या खेळात गडभेट पुन्हा झाली. विस्मरणात गेलेल्या गोष्टी दृश्यस्वरूप ठळक झाल्या. स्मरणात राहिलेल्या गोष्टी अधिक दृश्यमान झाल्या.


ट्रेकर्स: (डावीकडून) गिरीश सर, श्रद्धा, मी, टोबी आणि फिलीप


  

No comments: