निसर्गरम्य कोराईगड विथ झेनिथ ओडिसी, ३ नोव्हेंबर २०१८


कोराईगड अर्थात कोरीगड, बघायचा राहून गेलेला एक असाच किल्ला! मनात एक आशा होती कि कधीही ना कधी गड बघायला मिळेल. गड बघण्याचा योग आला तो झेनिथ ओडिसी द्वारे!

श्रद्धा मेहता चे खूप सुंदर प्लांनिंग. ३ तारखेला दुपारी पुण्यातून निघून संध्याकाळी कोराईगड ट्रेक, रात्री सालतर लेक काठी कॅॅम्पिंग. दुसऱ्या दिवशी सकाळी मोरगिरी ट्रेक. दुपारी पुणे प्रस्थान.

३ तारखेला साधारण दुपारी दीड च्या सुमारास पुण्यातून निघालो. पेठ शहापूर या गडाच्या पायथ्याच्या गावाशी साधारण ४ वाजता पोहोचलो. दुपारपासून काळे नभ दाटून आलेले. पावसाची रिमझिम सुरु झालेली. ट्रेक मार्गावर पाऊस रिमझिम बरसलेला.

पेठ शहापूर गावातून कोराईगडाचे हे दर्शन...




ट्रेक मार्ग भन्नाट होता. दोन्ही बाजूला हिरवीगार घनदाट झाडी. निबिड अरण्यातून गडाकडे जाणारी पायवाट. झाडे इतकी वाढलेली कि पायवाट दिसत नव्हती. दोन्ही हाताने झाडांच्या फांद्या बाजूला करत खाली बघत वाट शोधावी लागत होती. पावसाच्या शिडकाव्यामुळे झाडांची पाने ओली झालेली. हात, कपडे त्यामुळे ओले. हवेतील दमटपणा वाढल्याने अंग घामाघूम झाले.



जंगलातून जाणारा गडाकडे जाणारा रस्ता म्हणजे एक सुखद अनुभव, प्रसन्न भावना आणि आल्हाददायकता. आजूबाजूला रानफुले फुललेली. फुलपाखरे विहंग करताहेत. जंगलातील रस्ता कापत अर्ध्या तासात पायऱ्यांच्या आरंभाला आलो.

गडाला नेणाऱ्या जवळ जवळ सातशे पायऱ्या आहेत म्हणे.




पायऱ्या चढाव्या तसा लोणावळा नजीकचा आंबी व्हॅॅली चा परिसर नितांत सुंदर दिसत होता.


काही पायऱ्या चढून आल्यावर एक पठार लागले. इथे एक गुप्त गुहा आणि गणेश मंदिर आहे. गुहे ची एक बाजू कोरडी तर आतल्या खाचेत पाणी.



अजून थोड्या पायऱ्या चढलो. पुन्हा दोन  गुहा. उजवीकडे.


डावीकडच्या गुहेत पाण्याचे कुंड.


पायऱ्या संपल्या नव्हत्या. गडाची तटबंदी दिसत होती. अर्धगोलाकार चढत वर गेल्यावर गडाचा गणेश दरवाजा.



अवाढव्य आणू मजबूत. दोन्ही बाजूला तटबंदी, गडाचे प्रवेशद्वारआणि फडकणारा भगवा ध्वज!



प्रवेशद्वारातून गडात प्रवेश केल्यावर तटबंदी खुलून दिसली. उजवीकडे शंकर मंदिर. मंदिराच्या आवारात तोफा.



शेजारी दोन पाणतळे. सूर्य मावळतीला झुकलेला. पाण्यात त्याचे प्रतिबिंब. गडाची शोभा वाढली.



तटबंदी वर थोडा वेळ बसून कोराईमाता मंदिराकडे निघालो. वाटेत चौथऱ्यावर  लक्ष्मी तोफ .


मंदिराच्या समोरील टेकडावरून मावळते सूर्यबिंब अप्रतिम नजरा. पावसाळी वातावरणाने आभाळात रंगसंगती बरसली. काही काळे नभ. नभातून वर येऊ पाहणारे मावळतीचे सूर्यबिंब, आकाशाकडे झुकणारे रवीकिरण, नभाला आलेली सोनेरी किनार. वाव!



तिथून दिसणारी गडाची तटबंदी आणि बुरुज म्हणजे गडाचे निखालस सौदर्य.



अस्ताला जाणारे सूर्यबिंब.....


कोराईमातेचे दर्शन घेतले. मंदिराच्या आवारातील तुळशीवृंदावन, दीपमाळ आणि देवदेवता प्रतिमा न्याहाळल्या.



गड उतराई सुरु केली. जाताना गडावरील वाड्यांचे अवशेष बघायला मिळाले.

परतताना जंगलाचा रस्ता न घेता गावाकडील पायवाटेने उतरलो.

कोराईगड सुरेख वाटला. जंगलातील रस्ता, गडाकडे जाणाऱ्या पायऱ्या, गडावरून दिसणारा सूर्यास्त आणि गडावरील संपन्न गडावशेष!

सालतर लेक काठी टेंट लावले. पाऊस सुरूच. टेंट ओले तर झालेच. पावभाजीचा बेत होता. भाजी बनवली. टेंट मध्ये जेवलो. सततच्या रिमझिम पावसामुळे पुण्याकडे परतीचा निर्णय घेतला.

पुण्यात आलो मध्यरात्री १२ वाजता.

मोरगिरी अजून खुणावतोय! त्याला भेटण्याची आस आहेच...........



ट्रेक मेट्स: मी, राजेश सर, रोझी, श्रद्धा आणि टोबी


No comments: