सुधागड ट्रेक, २४ जुलै २०१६ (फक्त मुलींसाठी)


खास मुलींकरता, “हिरकणी अॅडव्हेंचर क्लब” एस.जी ट्रेकर्स ने सुरु केला. मुलींनी ट्रेकिंग, रॅपलिंग, राफ्टिंग इ सारख्या अॅटीव्हीटीज मध्ये सक्रियतेने भाग घ्यावा ह्या उद्देश ह्यामागे होता. हिरकणीचा पहिला ट्रेक लोहगडला होता आणि त्यात जवळ जवळ ३२ मुलींनी भाग घेतला. सुधागड, हिरकणीचा दुसरा ट्रेक होता.

माझा हिरकणी बरोबर हा पहिलाच ट्रेक होता. “फक्त मुलींचा ट्रेक” हा अनुभव मला घ्यायचा होता. 

साधारण सकाळी ७ च्या सुमारास स्वारगेट वरून खाजगी वाहनाने निघालो. नेहाली, वैष्णवी आणि सायली ह्या हिरकणीच्या कोऑर्डीनेटर आमच्या सोबत होत्या. पाच जणीं आयत्या वेळी न आल्याने आम्ही आठ जणींचं सहभागी होतो!

सुधागडसाठी, ठाकूरवाडी, पाली हे बेस व्हिलेज होते. पुण्यातून ताम्हिणी घाटातून तिथे पोहोचायला साधारण दोन ते अडिच तास लागणार होते. गाडीत अंताक्षरी रंगली, झिंगाट गाण्यावर डान्स झाला. मिलिंद आणि भगवानही मुलींना जॉइन झाले. मिलिंदच्या आवाजातील गाणी ऐकण्याची माझी इच्छा पूर्ण झाली!

ताम्हिणी घाटातून पावसाळ्यात प्रवास करणं हा एक नेत्रसुखद अनुभव आहे! वेडीवाकडी वळणे, हिरवाईने नटलेले ऊंच ऊंच डोंगर, मंत्रमुग्ध करणाऱ्या हिरव्या-पोपटी रंगाच्या अगणित छटा, धरणाचे अथांग पाणी, पाण्यात पडलेली डोंगर छाया, रस्त्याच्या दुतर्फा ओसंडून वाहणारे छोटे मोठे धबधबे, क्लासिक वेदर, आल्हाददायक गारठा, मधो-मध जाणार सुंदरसा डांबरी रस्ता......असं वाटतं होतं गाडीतून खाली उतरावं आणि पायी चालावं.....चालतचं रहाव....आपल्याच धुंदीत..आपल्याच मस्तीत..... स्वत:ला शांत निसर्गाच्या स्वाधीन करून... विसरून जावं... आपण कोण आहोत, कुठे चाललो आहोत.... चालतं रहाव....फक्त आपल्या श्वासासोबत!

ताम्हिणी घाट संपताच सुरु होतो तो कोकणपट्टा! कोकण प्रदेश त्याच्या भौगोलिक रचनेवरून! एक विशीष्ट प्रकारची घरे, थोडी बसकी, खासकरून चौकोनी, झावळ्यांनी आच्छादलेली, मातीने लिंपलेली, एकदरवाजी, घराभोवती पाना-फुलांची आहट, ब्लाऊज आणि साडी गुडघ्यापर्यंत गुंडाळलेल्या स्त्रिया, त्याची चेह-याची रेखीव ठेवण, काळसर आकर्षक आणि तकाकीदार रंग! हा कोकणपट्टा अति घनदाट रानझाडीने व्यापलेला. झाडे बघितलीच की कोणाच्याही लक्षात यावं की ही साधी-सुधी झाडे नाहीत. वनौषधींनी ग्रासलेला अनमोल ठेवा!

ठाकूरवाडी कधी आलं समजूनच आलं नाही! ठाकूर आदिवासींची वस्ती! हिरव्यागार डोंगरांनी, भातखेचरांनी वेढलेल्या भागातील एक छोटी वस्ती! अंगणवाडीच्या आवारात चार छोटी मुलं-मुली “टीपरीपाणी” खेळत होते!
लहानपणी मी पण हा खेळ खेळले, पण हा खेळ खेळतात कसा हे आज आठवेचना....तरीही त्या मुलांबरोबर तो खेळ खेळण्यासाठी मी स्वत:ला आवरू शकले नाही! 
   
आम्हाला जेवण गडावर मिळणार होत. इथले लोक स्वयंपाक गावात करून जेवण वर गडावर घेऊन जातात! गड चढल्यावर लक्षात येतं की हे किती कष्टाचं काम आहे. काहीजण तर अनवाणी झपाझप जाताना दिसतात. गडावरून खेकडे पिशवीत गोळा करून आणतात....खेकड्याच कालवण! आदिवासीं लोकांच खास मिष्टान्न!

नेहाली, वैष्णवी आणि सायलीने ओळख परेड घेतली आणि गडाची माहिती सांगितली. सुधागड अर्थात भोरपगड, पुण्यापासून साधारण १२० किमी अंतरावर, उंची ६२० मीटर (२०३० फुट)..बेस व्हिलेज ठाकूरवाडी, पाली, जिल्हा, रायगड! शिवाजी महाराजांनी ह्या गडाचा विचार मराठी साम्राज्याची राजधानी म्हणून केला होता. ह्या त्यांच्या विचारावरूनच गडाची भव्यता लक्षात येते!

खरंतर गड चढायला तसा खूप छोटा...गड आणि त्याचा बुरुज वाडीतुनच दिसत होता....ट्रेकचं प्रवेशद्वार भन्नाटच! अंगणवाडीला लागुनच एक आणि काही पावलांवर दुसरे प्रवेशद्वार! लाकडी उभे-आडवे ओंडके रोवलेले..ते पार करून जायचे...दोन प्रवेशद्वारांमध्ये एक माणूस जाईल इतकी छोटी पायवाट आणि दोन्ही बाजूला भात खेचरे! वाव......गडाच्या सौदर्याची झलक इथेच दिसून येते! इथून पुढची वाट आदिवासींच्या पाडयांतूनच जाते आणि मग सुरु होतो जंगलातून ट्रेकचा रस्ता!

कोकणभाग असल्याने आणि पाऊस थांबला असल्याने ह्युमीडीटी जास्त होती. त्यात वारा नाही..भयानक ऊकाडा वाटत होता आणि घामामुळे थकायला होतं होतं. काही मुलींचा पहिला-दुसराच ट्रेक होता. त्यांच्या पोट-या आणि मांड्या भरून येत होत्या...काही क्षण विश्रांती घेतली की ट्रेक सुरु होत होता. मला दम लागत होता पण चालण्याची गती बरी होती. मुली म्हणत होत्या, “मॅडम तुमचा स्टॅमीना जबरदस्त आहे.”! मिलिंद म्हणे, “ह्या हवामानातही तुम्ही आज लीड करताय”! २-३ ठिकाणी रॉक पॅचेस होते पण चढायला तितकेसे कठीण नव्हते. फक्त दगडावरील शेवाळाचा अंदाज घेत चढाव लागत होतं. ट्रेक परिसर सर्वांगसुंदर होता. मला सर्वात भावले ते इथले अवाजवी, अवाढव्य मोठे पत्थर! वेगवेगळ्या आकाराचे.....ओबडधोबड...काही वरून पसरट तर काही अणकुचीदार....काही शेवाळाने माखलेले तर काही पाणी साचलेले! हे पत्थर पावसाच्या पाण्याने ओले झाल्याने त्यांना तकाकी आली होती. गर्द झाडीत ते पत्थर शोभा वाढवत होते. शेवाळामुळे ते नक्षीदार दिसत होते!

सुधागडला दोन-तीन ठिकाणी शिड्या आहेत. एका ठिकाणी जुनी शिडी बघायला मिळते. ती शिडी ज्या कातळकड्याला भिडते त्यावरून तो पॅच चढायला किती रिस्की असेल याची कल्पना येते. म्हणूनच नव्या शिड्या बनवल्या असाव्यात.

नव्या शिड्या भक्कम आणि चढायला सेफ आहेत. ट्रेकच्या आणि गडाच्या सौदर्यात त्या भरच घालतात!

पहिल्या प्लॅटू वर आम्ही पोहोचलो. तिथून दिसणार निसर्ग सौदर्य अवर्णातीत होत! फोटो घेण्याचा मोह आवरला नाही तर नवलचं!

आता थोडाच टप्पा पार करायचा होता आणि जोराचा पाऊस आला. मी तर भिजायचं ठरवलच होतं. ह्या काही ट्रेक दरम्यानच पावसात भिजायला आणि पावसाच्या सरीवर सरी अंगावर झेलायला मी शिकले होते. ही अनुभूती जितकी आल्हाददायक तितकीच अंगावर शहारा आणणारी!

शेवटच्या दगडी पाय-या पार करून गडावर पोहोचलो. आता होता तो नजर जाईल तिथपर्यत दिसणारा विस्तीर्ण प्लॅटू! सखल, सपाट भाग! पावसामुळे त्यावर छोटे छोटे गवत उगवले होते आणि तो पूर्ण भाग हिरवागार झाला होता. त्यावरून चालणं ..असं वाटतं होतं जसं मऊ मऊ गालिच्यावरून चाललोय! पायात बूट असले  तरी ओल्या गवतांचा तो लुसलुशीत स्पर्श जाणवत होता. त्यावरचे दवबिंदू गारव्याची एक लहर पायांना देत होते. काही ठिकाणी पसरट दगडी चौथ-यावरच्या खाचांमध्ये पाणी साचले होते. त्या डबक्यात उडी मारून पाणी उधळायचा मोह मिलिंदलाही आवरला नाही!

हा भाग म्हणजे एक उत्तम बायोडायव्हरसिटी! अगणित प्रकारची पाने, फुले, फुलपाखरे, झाडे....वेळ असता तर त्या प्रत्येक पाना-फुलाचे फोटो घेणे मला नक्कीच आवडलं असतं! काही पानांवरच्या रेषां इतक्या आखीव-रेखीव होत्या की निसर्ग चित्रकाराची कमालचं!

रायगडापेक्षाही कितीतरी पट्टीने विस्तीर्ण सखल भूभाग इथे आहे. जवळजवळ ५५-६० एकराचा भूगाव हा असावा. काही ठिकाणी पाण्याचे तलाव आहेत. शिवमंदिर, भोराईमाता मंदिर, वीरगळ, महादरवाजा, चोरदरवाजा, पंतसचिव वाडा, टकमक टोक, स्मृतीशिल्प/स्मृतीस्मारक, काही शिलालेखांचे अवशेष...

दुसऱ्या एका ट्रेकिंग ग्रुपमधला मुलगा अशाच एका स्मृतीशिल्पावर बसला होता. मिलिंदच्या ते लगेच लक्षात आले आणि त्याने जाऊन त्या मुलाला त्याची जाणीव करून दिली! वाटलं मिलिंद हा खरा ट्रेकर! जो इतिहासाच्या संवेदना जपतोय! मी तर फक्त चालते. ट्रेकर म्हणून घेण्यासाठी मला अजून तर बरचं काही शिकायचं आहे!

भाकरी, भाजी, पापड, भात असा जेवणाचा फक्कड बेत होता.

उतरताना माझी स्टिक दगडावर ठेवली तर तिचा सर्र---चर्र...खर्र..घासल्याचा आवाज येत होता. ती थोडी निसटली तर तोल गेलाच! शिवची शिकवण आठवली....दगड असतील तर स्टिक ऐवजी शरीराचा तोल सांभाळावा. ...तेच केलं...आणि ते जास्त सोपं गेलं! स्टिकच्या आधाराविना ट्रेक करता येऊ शकेल ही भावना कमी सुखद नाही!

पायथा जसं-जसा जवळ येतो तसं-तसा ट्रेक पूर्तीचा आनंद अनुभवण्यासारखा असतो. गड कसा चढलो...चढताना काय काय त्रास होत होता हे आठवून हसायला येतं!

मिलिंद आणि भगवान यांची साथ बहुमोल होती. इतर मुलांचा ग्रुप आल्यावर दोघेजण जातीने थांबून राह्यचे. मुलींच्या ट्रेक मध्ये अशा प्रकारचं भान ठेवण ही केवढी मोठी जबाबदारी आहे हे त्यावेळी मला जाणवलं!


खरंतर हा “लेडीज स्पेशल ट्रेक”! अर्पण आहे मिलिंद आणि भगवानला!


गड उतरताना काही मुलींच्या गप्पा ऐकायला मिळाल्या. 
“आई- वडील ट्रेकला पाठवत नाहीत, त्यांना वाटते ह्या फिरायला जातात, दिवस वाया घालवतात, तो एक व्यायाम आहे, स्पोर्ट आहे असं त्यांना वाटत नाही. जाण्याचा निर्णय घेतला तर पटत नाही.. वगैरे”...मी माझाच विचार करत होते. कदाचित सारखं सारखं ट्रेकला जाण माझ्याही आई-वडिलांना रुचलं नसतं! मुलांनाही आई-वडील ट्रेकला जाऊ देत नाहीत हे मी खुद्द मुलांकडूनच ऐकलेलं आहे. विवाहितांची कहाणी ह्यापेक्षा वेगळी नाही. आज चित्र थोड बदलत जरी असेल तरी, ह्याच कारण बहुधा “ट्रेक” हे आपल्या जीवनशैलीचा भाग मानला जात नाही हे असावं. “घरी नसणं” म्हणजे काही चांगल असूही शकत ही विचार भावना रुजू व्ह्यायला जरा अवघड जातं..ट्रेकबद्दलचे समज-गैरसमज, त्याबद्दलचा दृष्टीकोन, विचारधारणा....बदलेलं हळूहळू! आज जे आई-वडील, नवरा-बायको, सासू-सासरे इ ट्रेक साठी प्रोत्साहन देतात त्यांना सलामच! दुसरी बाजू विनोदाची आहे....थोडी मिश्कील आहे... ट्रेकचं “व्यसन” लागायला एक ट्रेक बास असतो! कोणाच्या घरच्यांना आपले आप्तगण ह्या व्यसनाच्या आहारी जावं असं वाटेल?

कारण काहीही असो आणि असं नेहमीच होत नाही हे मी जाणते तरीही,  ज्या मुलीं ट्रेकला आयत्यावेळी आल्या नाहीत, फोन उचलतं नव्हत्या किंवा ज्या तासभर उशीरा आल्या, ते पाहून मन दुखावलं. मुली-स्त्रीची ही प्रतिमा आपण बदलू शकतो ना? आपल्या हातात आहे, सहज शक्य आहे........

ह्या ट्रेक दरम्यान ह्या तिशीच्या आतल्या मुलींना मी जवळून बघत होते आणि त्यांना बघताना मी स्वत:ला उमगत होते. जे माझ्या बाबतीत घडलं ते ह्यांच्याबाबतीत घडू नये असं मनापासून वाटतं होतं. म्हणूनचं काही मनातलं सांगाव असं वाटतयं...मुलींनो, जितकं शक्य आहे तितकं पायी चाला....लिफ्ट ऐवजी पाय-यांचा वापर करा, लोह, कॅल्शीअम, प्रोटीन युक्त आहार घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शीअमच्या गोळ्या सुरु करा, हिमोग्लीबीन १०-११एमजी पेक्षा जास्त राहील असा आहार घ्या....स्वत:ला तपासून पाह्ण्याची, स्वत:चे परीक्षण करण्याची सवय लावून घ्या....

मला कल्पना आहे की ह्या सर्व गोष्टींना खूप सारे कंगोरे आहेत, काही मर्यादा आहेत, पैसा, शिक्षण, नोकरीसाठी घरापासून दूर राहणं, मुलींबाबत आपली संस्कृती इ इ.

मुलींनो, जेव्हा ट्रेकिंग आवडतयं, जमतयं तेव्हा पहिली गोष्ट मी केली ती ही की पैशाचं व्यवस्थापन! वायफळ खर्च जाणीवपूर्वक टाळला, तो पैसा पोषक आहाराकडे वळवला, उदा. फळे इ. कपड्यांवरचा खर्च जबरदस्त कमी केला.....ट्रेकिंग दरम्यान मला एक उमगल, मी इतके महागडे, सुंदर ड्रेसेस खरेदी करायची, घालायची...ऑफिसातल्या मुला-मुलिंकडून ड्रेसच कौतुकही व्हायचं..पण मला मी सुंदर तेव्हा वाटले जेव्हा केटूएस नाईट ट्रेक पूर्ण करून माझा ड्रेस मातीने बरबटलेला होता!

वय आणि अनाहूत भीती मुळे असेल कदाचित, पण ट्रेकच्या आदल्या दिवशी कधी कधी मला शांत झोप लागत नव्हती....ती शांत आणि पुरेशी झोप मिळाली नाही की काय होतं ह्याचा अनुभव मी माथेरान ट्रेकला घेतला होता. डोळे जड झाले होते, पोटात गलबलत होतं, गरगरल्यासारखं वाटतं होतं... ह्या सर्वाचा परिणाम ट्रेक करण्यावर झाला होता....मी माझी जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न केला...ट्रेकच्या आदल्यादिवशी संध्याकाळी सात वाजता भरपूर जेवायचं.. झोप येत आहे असं वाटलं की टीव्ही वाचन इ बंद....

मला कल्पना आहे ह्या पिढीच्या मुलींच्या जाणीवा खूप सजग आहेत....हा ट्रेक खास मुलींसाठी होता आणि एक मुलगी म्हणून मी जे अनुभवलं ते मांडण्याचा हा एक प्रयत्न!

मुलींसाठी “हिरकणी क्लब” किती महत्वाच पाऊल आहे हे मला मनोमन पटलं! मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमतेसाठी हा एक अतुलनीय मार्ग आहे!


मुलींनो, चला तर मग ह्या किंवा अशा प्रकारच्या मार्गावर चालण्याचा ध्यास धरुयात.......त्या मार्गावर काय मिळतयं हे स्वत: शोधूयात......स्वत:ला शोधूयात.......Post a Comment