कात्रज टू सिंहगड नाईट ट्रेक (k2s night trek), २१ नोव्हेंबर २०१५


आता मी ट्रेक बद्दल थोडं वाचायला सुरुवात केली होती. जेव्हा केटूएस पोस्ट झाला तेव्हा तो ट्रेक करण्याचा विचार देखील मनात आला नाही. एकतर पहिलाच नाईट ट्रेक आणि दुसर ऐकल/ वाचलं होत की ट्रेकर्स मधील सर्वात लोकप्रिय ट्रेक,चांदण्या रात्रीतला हा ट्रेक तर ट्रेकर्सच स्वप्नच, अतिशय कठीण ट्रेक आहे, १५-२० किमी चालावं लागत, लहान-मोठ्या अशा १३-१५ टेकड्या पार कराव्या लागतात, पहिल्या २-३ आणि शेवटच्या २-३ टेकड्या भयानक चढाईच्या आहेत, टेकडी चढा, उतरा--चढा उतरा, सपाट भाग नाहीच, उतरण्याचे पॅचेस महाकठीण आहेत, हा ट्रेक तुमची शारीरिक क्षमता, स्टॅमीना, पेशन्स, आंतरिक प्रबळ इच्छा, पायातली ताकद, फुफुसाची क्षमता आजमावतो इ. इ.

२५ आक्टोबर २०१५ रोजी माथेरान ट्रेक मधे आलेखने मा. एव्हरेस्ट बद्दल सांगून एव्हरेस्ट बघण्याची उत्सुकता वाढवली होती. ते आठवलं आणि स्वत:शीच संवाद केला की,” सविता, एव्हरेस्टच स्वप्न बघतेस आणि केटूएस ला घाबरतेस?”. दुसऱ्याच क्षणी दृढनिश्चय केला की ट्रेक करायचा. शनिवारी रात्री ट्रेक होणार होता आणि सकाळी विशालला फोन करून मी येत असल्याच सांगितलं.

स्वारगेट वरून निघून ८-८.३० ला कात्रज ओल्ड टनेल जवळ पोहोचलो. ओळख परेड झाली. विशाल पुढे, शिव आणि डॅनी मध्ये तर राहुल मागे असणार होता. रात्री ९ ला ट्रेकला सुरुवात झाली. वाघजाई मंदिराजवळ थोडी विश्रांती घेतली.शिव म्हणे, “हेड टॉर्च घ्यायची रात्रीच्या ट्रेकला म्हणजे हात मोकळे राहतात”.

दम लागला की थोडं थांबत ट्रेक सुरु होता. ह्दयाची धडधड इतकी वाढत होती की ती स्थिर होईपर्यंत काही सेकंद थांबव लागत होत. पराकोटीचा पेशंस ठेऊन राहुल मला सोबत करत होता. त्या मुलाचं मला कौतुक वाटत होत.

पहिल्या तीन टेकड्या भयानक चढाईच्या होत्या. त्याच पार करायला एक-दीड तास लागला. माझ्याकडे गळ्यात अडकवता येईल असा टॉर्च होता आणि त्याला समोर आणि साईडला प्रकाशझोत होता. त्यामुळे हात मोकळे राहत होते आणि गळ्यातला टॉर्च हलला की दोन्ही साईडला पडणाऱ्या प्रकाशझोतामुळे दिसायला त्रास होत नव्हता.

उतरणीचे पॅचेस खरोखरच महाकठीण होते. खोल दरीत उतरल्याचा भास होत होता. खूप भाग खाली बसून, घसरत पार करावा लागत होता. थोडा पाउस झाला आणि माझा पांढरा शर्ट मातीमय झाला. माझे तळाहात, कपडे सर्व मातीमय! धुळीने माखलेले!

रात्र असल्याने लक्ष फक्त जमिनीकडे होत आणि खाली पाहून चालण्याकडे होत. मी किती टेकड्या चढलेय, किती चढाईच्या, आजुबाजूला काय आहे ह्या कशाकडे लक्ष नव्हत. फोकस होता तो फक्त चालण्याकडे! इतक काळजीपूर्वक की कुठे खरचटणार नाही, पडणार नाही, झोकांडी जाणार नाही...समोरच काही दिसतही नव्हत. दिसत होता तो फक्त पुढे चालणाऱ्या ट्रेक सहभागीच्या टॉर्चचा प्रकाश!  खबरदारी घेत ट्रेक केल्याने ट्रेक करतानाचा आनंद असा मिळालाच नाही!

आता लांबून सिंहगडावरची लालबत्ती दिसू लागली. ज्ञानेश्वर उर्फ डॅनी उर्फ माऊली ला मी प्रथमच भेटत होते. त्याला म्हटल, “ माऊली, ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली, तुम्ही निदान ती लालबत्ती तरी जवळ आणा”. डॅनी म्हणायचा, “ अर्धा तास मॅडम”. धीर सुटत चालला होता पण तो अर्धा तास काही केल्या येत नव्हता. पण त्या लालबत्तीच्या आशेवर ट्रेक मात्र सुरु होता.

आता पहाटेची चाहूल जाणवायला लागली. डॅनी आणि माझ्या गप्पा सूरु होत्या. ह्या ट्रेक मुळे  डॅनी आणि माझ्यात एक बाँड तयार झाला आणि ट्रेक संपता संपता तो जास्त घटट झाला!

राहूल बरोबरचा बाँड हा सहसंवेदनांचा होता. तो कमालीचा एम्पथँटीक वाटला. दुस-याच्या ठिकाणी स्वत:ला ठेऊन बघणारा! दुस-याच्या अंतरंगाचा चटकन वेध घेणारा! कमी लोकांकडे असणारं हे कसब राहुल कडे आहे! मी म्हटलं, "राहुल, दोन मिनिट थांबुयात?" की तो माझ्यासाठी थांबून राह्यचा, तोपर्यंत जोपर्यंत मी चला म्हणत नाही. "तुमची बॅॅग घेऊ का?" असं अति गोड आवाजात आणि भावना समजून घेत विचारायचा. आमच्यात ह्या वाक्यापलीकडे बोलणं झालं नाही. पण त्याची अशाब्दिक साथ मला नेहमीच आठवणीत राहील!

शेवटच्या २-३ टेकड्या पार करताना तर नाकी- नऊ आले. कधी एकदा ट्रेक संपतोय असं वाटू लागल होत. 

आता पहाटेचा प्रकाश पसरू लागला. टॉर्चचा प्रकाश विझला. लांबून डांबरी रस्ता दिसू लागला. सुटलेला धीर स्थिर झाला! पहाटेचा प्रकाश पाहताना जीवनात प्रकाशाच महत्व काय आहे हे लक्षात आलं. अंधार पार केल्यानंतरच प्रकाशाचं महत्व समजतं असं म्हणतात ते काही खोट नाही असं वाटलं. अस्पष्ट गोष्टी स्पष्ट होतात, कुठली धूळ नक्की साफ करायला हवी हे उमगतं! कोणती धूळ अभिमानाने मिरवावी हे ही लक्षात येत!

पहाट समोर दिसायला लागण्यावर मनात साठवून ठेवलेली भीती ओठावर आली. डॅनीला म्हटल, “राजा, ट्रेकला येण्याच धाडस तर खरं केलं होत पण सारख वाटत होत की आपण दुसऱ्या दिवसाची पहाट बघू की नाही. रविवारचा सूर्य बघू की नाही. थक्यू तू आणि राहुल मुळे तो सूर्य मी बघितला. तो प्रकाश अनुभवायला मिळाला”!

पहाटेचा प्रकाश पाहून असं वाटलं “ हा नाईट ट्रेक एक अध्यात्मिक जाणीव आहे! तिमिराकडून तेजाकडे नेणारा प्रवास आहे. तिमिर म्हणजे मनातील संभ्रम, दबलेला आत्मविश्वास, अज्ञान, स्वत:तील क्षमतांचा अपरिचय, क्षमतांना संधीच न देणारी प्रवृत्ती! तेज म्हणजे दृढनिश्चय, जाणीव, उभारलेला आत्मविश्वास, क्षमतांची सिद्धता आणि आगेकूच!”

हा ट्रेक सहीसलामत पूर्ण करण्याचा अनुभव नक्कीच आत्मानुभूती आणि आत्मानंद आहे. आपण फिजिकली फिट आणि सक्षम आहोत ह्या पहिल्या जाणिवेनेच आत्मसंतुष्टता मिळते. जीवन जगण्याची एक अनामिक उर्जा मिळते!

ट्रेक संपला तेव्हा सकाळचे ६ वाजत आलेले होते. ९ तासात ट्रेक पूर्ण झाला होता. असं वाटत होत हा ट्रेक दिवसाचा करावा. फुफुसाची क्षमता आजमावणारा ट्रेक रात्रीचाच कशाला हवा?

एस.जी. ट्रेकर्स बरोबरच हा माझा पहिलाच नाईट ट्रेक होता. ह्या ट्रेकने ह्या ट्रेकिंग ग्रुपच्या नवीन पैलुची ओळख झाली. तो पैलु होता रात्रीच्या ट्रेकचे व्यवस्थापन! चालण्याच्या गतीमुळे ट्रेक सहभागीचे दोन तर कधी तीन गट होतात. ह्या गटात खूप मोठी गॅप पडू ण देण हे सूरक्षा आणि सुखरूपतेच्या दृष्टीने महत्वाच असतं. विशाल, शिव, राहुल, डॅनी हे एकमेकांना आवाज देत होते, “आहेस ना, ऑल ओके ना? जास्त गॅप पडू देऊ नका.” सहभागीच्या सूरक्षिततेबरोबर आपल्या सहकाऱ्याला काही मदत हवी आहे का? काही बदल अपेक्षित आहे का?” ह्याची दखल हे लोक घेत होते. लीडर्समधील कोऑर्डीनेशन, सह-अनुभूतीचा संवाद, त्यामागील सूरक्षिचे भावना, ट्रेक समीट करायला उशीर होतोय ह्याचा प्रसंगी विचार न करता सहभागीची सूरक्षेला महत्व देण्याची लवचिकता इ. मी ह्या ग्रुपमध्ये अनुभवलं.

ह्या ट्रेकर्स च्या ह्या व्यवस्थापनामुळे आणि लीडर्स मधील आत्मीयता, तन्मयता, केअरिंग बघून मी खूप प्रभावित झाले!

ह्या ट्रेक मध्ये “वय” या गोष्टीची खूप गम्मत वाटली. मी वयाने ह्या मुलांपेक्षा दुपटीने मोठी पण त्यांचाच आधार मला किती मोठा वाटत होता! किती खरं आहे की वाढलेलं वय तुम्हाला प्रगल्भ बनवत नाही तर तुमचं शिक्षण, वर्तन आणि तुम्ही स्वीकारलेले मार्ग/पद्धती तुम्हाला प्रगल्भ बनवतात!

ट्रेक संपला तेव्हा सकाळच्या प्रकाशात लक्षात आलं की मी मातीने किती बरबटलेली आहे. एरवी मला नक्कीच ऑकवर्ड वाटलं असत पण का कुणास ठाऊक मातीने बरबटलेल्या माझा मला अभिमान वाटत होता. पीएमटी बसमध्ये लोक माझ्याकडे निरखून बघत होते पण मी कुल होते. माझी एक नवी ओळख ह्या ट्रेकमुळे मला झाली होती. मी आणि माझ्या त्या ओळखीमध्ये अन्य कोणालाही जागा नव्हती!

या वर्षी, ९ जुलै २०१६ ला विशालने हाच ट्रेक दिवसाचा ठेवलाय. माझी प्रबळ इच्छा आहे दिवसाचा ट्रेक अनुभवण्याची. तो ट्रेक पूर्ण केल्यावर अनुभव शेअर करेनच पण तो ट्रेक पूर्ण होण्यासाठी तुमच्या ढीगभर शुभेच्छा जरुरीच्या आहेत!
    No comments: