अंधारबन जंगल ट्रेक, ३ जुलै २०१६

मला आठवतयं गेल्यावर्षी ट्रेकडीचा मार्च-एप्रिल मधे हा ट्रेक होता. मला जाण्याची इच्छा होती. मी विशालला फोन करुन ट्रेक बद्दल विचारले. तो म्हणाला, छान ट्रेक आहे, पण तो मान्सून ट्रेक आहे. पावसाळ्यात निसर्ग सौदर्य अलातून दिसतं हया मान्सून मधे आपण हा ट्रेक ठेवतोय”. म्हटलं, मग तेव्हाच करेन मी तो ट्रेक.

जूलैला ट्रेक घोषित झाल्यावर लगेचच मी रजिस्ट्रेशन करुन टाकलं. जूलैला पुणे ते सासवड ही  पंढरपूरची वारी करुन आले होते. डाव्या पायाची टाच त्यावर भार पडला की किंचितशी दूखत होती. एकदा वाटलं खूप दूखायला लागलीच तर चालता येणार नाही. पण ट्रेक करायचाच होता.

खाजगी वाहनाने जाणार होतो त्यामूळे एका सॅक मधे एक पाण्याची बाटली, नॅपकीन, पान्चो ठेवला आणि खाऊ म्हणून साठोरी आणि वारीत मिळालेली राजगिरा वडी ठेवली. एक वेगळी पिशवी घेतली जी मी गाडीतच ठेवणार होते आणि त्यात सामान ठेवलं, एक नॅपकीन, एक्सट्रॉ ड्रेस, पाण्याची बाटली, एक स्लीपर जोड, छत्री आणि बिस्किटचा पूडा!. कमरेला प्रवासी पाऊच बांधला ज्यामधे प्लास्टीक पाऊच मधे मोबाईल, पैसे, वेट टीशू, साधे ड्राय टिशू , पिना, बॅन्ड-ऐड इ. ड्राय टीशू चष्म्याच्या काचा पूसण्यासाठी. बरेचदा माझं असं होतं की ट्रेकच्या आधी, ट्रेक दरम्यान जास्त काही खावं वाटतं नाही पण एकदा का ट्रेक झाला की काही तरी आणि त्यातूनही गोड खावसं वाटतं. खाजगी गाडी असेल तर हे नियोजन करता येतं. अन्यथा मोजकचं सामान घ्यावं लागतं. रात्रीपासून पावसाची संततधार सूरुच होती त्यामुळे ही सगळी तयारी केली होती. कधी काय उपयोगी पडेल सांगता येत नाही आणि गाडीतचं तर ठेवायचीय पिशवी असा विचार करुन एवढं सगळं सामान घेतलं होतं.

जूलैला सकाळी वाजता शिवाजीनगर, लोकमंगल इथे भेटलो. मी उभी होते आणि एक मुलगा तिथे आला. मला म्हणे, एस.जी ट्रेकर्स ना? तुम्हाला बघितल्यावर मी ओळखलं की एस. जी ट्रेकर्सच असणारं. याआधीपण १-२ वेळा असं झालं होतं. मला खूप छान वाटली ही माझी ओळख!. मी आणि एस.जी. ट्रेकर्स हे समीकरण मनाला स्पर्शून गेलं!

ट्रेकला विशाल, शिव आणि आलेख हे लीडर्स होते आणि बरीचशी नेहमीची मुले-मुली!. गाडी पौड मार्गाने ताम्हिणी घाटातून जाणार होती. ताम्हीणी घाटात आम्हाला सोडून गाडी भिरा गावात जाऊन थांबणार होती. हा ट्रेक असाच होता. 30% खाली उतरायच आणि मग 70% जंगल ट्रेक़. ट्रेकची सुरुवात एका जागेवरुन आणि शेवट भीरा धरणाच्या जवळ!. रस्त्यात मधे हॉटेल शिवसागर येथे मिसळ-पाव आणि चहा असा नाश्ता केला. पुर्ण रस्ताभर पाऊस होता. हयाभागात तर तो जोरातच कोसळत होता. आजूबाजूला शेतीची वावरं पावसाच्या पाण्याने तुडूंब भरली होती. डोंगरावर ढगांचं पाघंरुण. ढगांचं धुक इतक की लांबवरचं काही दिसतं नव्हतं, गाडयांचे हेटलाईट्स चालू होते. ठिकठिकाणी डोंगरावरुन कोसळणारे छोटे-मोठे धबधबे दिसत होते. मीनू माझ्या शेजारी बसली होती आणि आम्ही दोघी त्या निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेत होतो. माझ्या मनात पुन्हा धाकधूक! निसरडं झालं असेल, पाणी साठलं असेल..ट्रेक जमेल का? शेवटी ठरवलं की विशालला विचारायचं!

ट्रेकच्या आरंभाला पोहोचलो. ठरवलं की विशालला विचारायचं नाही. ट्रेक करायचा! सॅकचं ओझं घेऊन, पान्चो अंगावर चढवलेला आणि कोसळता पाऊस..मला ट्रेक मॅनेज होणार नाही असं वाटून ठरवलं की क्त पान्चो अंगावर चढवायचा, कॅप डोक्यावर आणि हातात स्टीक, बस्सं! पावसाळयामूळे तहान पण इतकी लागणार नाही आणि पाणी प्यावसं वाटलंच तर ग्रुपमधे कुणाकडे तरी मागायचं! नाश्ता तर झालाचं होता आणि पराठे आणि लोणचं असा मस्त बेत लंचला होताचं!

पाऊस इतका जबरदस्त कोसळतं होता की अंगाला त्याचे तडाखे बसतं होते. कॅप घातली आणि पान्चोचे हूड कॅपवरुन डोक्याला घट्ट बांधले. चष्मा असल्याने आणि पाऊस चष्माच्या काचावर पडून काचा ओल्या झाल्यावर अस्पष्ट दिसते म्हणून ही तयारी.

विशालने ट्रेकची माहिती दिली. ६-७ तासात हा साधारण १५ किमी. चा जंगल ट्रेक पुर्ण करायचा आहे असं त्याने सांगितलं. पाऊस होता, काळजीपुर्वक चालाव लागणार होतं, पावसामूळे चालण्याची गतीपण धीमी होणार होती आणि जंगलात लवकर अंधार पडतो म्हणून ६-७ तासात ट्रेक समीट करायचा असं त्यांच गणित असावं. ओळख परेड नंतर घ्यायची असं ठरलं. ट्रेक विशाल लीड करणार होता, मागे आलेख आणि मध्यभागी शिव हा मुख्य लीडर आणि त्याला साथ देणार होते प्रतिक, रवी आणि भगवान!

ट्रेक सुरु झाला. मी मनाशी ठरवलं होतं की विशाल सोबत राहण्याचा प्रयत्न करायचा. हयाची काही कारणे अशी होती की पावसाळी हवामानामूळे मला दम कमी लागण्याची शक्यता होती त्यामूळे मी पटापट चालण्याचा प्रयत्न करु शकणार होते आणि मागे राहून आलेख, शिव हया मुलांना मला त्रास दयायचा नव्हता. त्रास अशा अर्थाने की मला सोबत करावी लागते, माझ्या चालीने चालावे लागते, माझ्याकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागते, मला कुठे मदत लागेल हयाचा अंदाज घ्यावा लागतो इ. एक मोठीच जबाबदारी मागच्या लीडर्स वर येऊन पडते. ते गुतुंन राहतात मग ट्रेकचा, निसर्गाचा आनंद ते तितिकासा घेऊ शकत नाही असं मला कायम वाटतं राहतं. त्यामूळे त्यांचा तो त्रास, जिथे शक्य आहे आणि जितका शक्य आहे तेवढा तो कमी करण्याचा माझा कटाक्ष असतो. अर्थात जिथे मला मदत लागते तिथे लागतेच आणि त्याला पर्याय नसतो. 
 
विशालने पुढे चालायला सुरुवात केली आणि मी त्याच्या मागे धावले. काही पावलेच पुढे गेलो तर परीक्षेचा क्षण आला. धरणाच्या आधी एक तारेच कूंपण होतं, ते मधे मधे सिमेंटच्या पट्टयांनी जोडलेले होतं आणि त्याखालून पाणी वाहत होतं. हातभर लांबीचे, जेमतेम पाय बसेल एवढया रुंदीचे आणि लोखंडी तारांनी जोडलेले हे सिमेंटचे पट्टे पार करुन पुढे जायचे होते. कसरत ही की पाऊस कोसळतोय, त्याचा मारा अंगावर सोसायचाय, पान्चो पायात अडकायला नाही पाहिजे, स्टीक सांभाळणे, पाय शिताफीने ठेवायचाय, लोखंडी खिळयांनी ओरखडता कामा नये इ. हातभर लांबीची ती पट्टी पार करायची तर क्षणात एवढे सार विचार मनात तरळून गेले. विशाल आणि काही मुलांनी एक पाय पट्टीवर ठेवला, एक उंच उडी मारली आणि पट्टी पार. मनात आले ही शरीराची अवस्था आहे की मनाची? शरीराची उंची, तरुण वय, शरीराची लवचिकता की अजून काही? विवेक बुद्धि जागृत मी असा प्रयोग ठेऊन करुन पाहू शकते का? मग कळेल की मी वय मनात पकडून बसलेय म्हणून थोडे काचरते की वय विसरुन शरीर मोकळं, ढिलं ठेवलं तर मलाही हया मुलांप्रमाणे असं करणं शक्य आहे? हया मुलांकडूनच एकदा जाणून घ्यायला हवे असे वाटले. मी पट्टीवर एक पाय ठेवला, शरीराचा तोल सांभाळत दूसरा पाय ठेवणार तोच आधारासाठी हात पूढे आला. विशाल होता तो! मी आश्‍चर्यचकित! हा मुलगा पट्टी पार करुन पुढे गेला होता पण हयाचं लक्ष माझ्याकडे होतं की काय? मला मदत लागू शकते हे लक्षात येऊन तो लगेच धावून आला होता. एक ट्रेक लीडर कसा असावा हयाच मूर्तिंमंत उदाहरण म्हणजे हा विशाल! बापरे..मी इतकी भावनिक झाले की बस्स! त्याक्षणी मिळणारा हाताचा तो आधार......सुरक्षा, सुखरुपता, सोबत, साथ, दिलासा,समाधान चा!

ट्रेकच्या निमित्ताने जीवनाचा एक महान अर्थ गवसत होता. ..आधार....
.
कसरतीचा एक पडाव पार करत नाही तोच कसोटीचा दूसरा पडाव समोर आला. अत्यंत रुंदीचे धरण पार करण्याचा! शिवने हयुमन चेन तयार करायला सांगितली. माझ्या मागे मीनू होती. ती माझ्या हाताचा आधार मागत होती आणि माझा एक हात पुढच्या व्यक्तिच्या हातात आणि दूसर्‍या हातात स्टीक! मी तिला हाताचा आधार देणार कुठून? लगेच विशाल पूढे आला, त्याने माझी साखळी तोडली. माझा स्टीकचा हात हातात घेतला आणि मी माझा दूसरा हात मीनूच्या हातात दिला! हीच ती विशालची लीडरशीप!

पाण्याच्या प्रवाहाला बर्‍यापैकी वेग होता त्यामुळे हातांची साखळी आणि इतरही काही मुलांच्या हाताच्या आधाराने धरणाचा हा भाग पार केला. आता पुढचा ट्रेक सुरु झाला. जंगलाचा भाग सुरु झाला. बर्‍यापेकी सपाट भाग होता दम लागत नव्हता त्यामुळे मी पटापट, झराझर चालण्याचा प्रयत्न करत होते. पण हे करताना गूडघा एकदा दूखावलेला आहे आणि वयोमानानूसार कंबरेची काळजीही घ्यायला हवी हा विवेक ध्यानात घेऊन ट्रेक करत होते. रवी म्हणाला देखील, मॅडम आजदेखील एकदम फॉर्म मधे आहेत त्यावर विशाल म्हणे, पुणे ते सासवड ही वारी केलीय त्यांनी मी म्हणल, विशालबरोबरची लीडरशीप सोडायची नाही असं आज ठरवलयं. जोपर्यंत ती पाळता येईल तोपर्यंत पाळायची”.

डोंगरावरच्या धबधब्याचं पाणी जंगलाच्या वाटेवरुन वाहत खाली दरीत कोसळत होतं. असे काही छोटे धबधबे लागले जे मी स्वत: विनाआधार पार करु शकले. पण ते पार करताना पाणी किती खोल आहे हयाचा अंदाज घ्यावा लागत होता आणि स्टीक ने तो अंदाज करायला मदत होतं होती. काही ठिकाणी पाणी नीतळ असल्याने खोलीचा अंदाज लगेचच येत होता त्यामुळे पाय नीट ठेवणं सहजच शक्य होतं होतं. पाण्यात छोटे-मोठे दगट-गोटे असल्याने त्यांचा अंदाज घेऊन पाय ठेवावा लागत होता. दगडावरील शेवाळाचा अंदाज देखील घ्यावा लागत होता. नाहीतर थोडा अंदाज चुकला आणि पाय दूमडण्याची, निसटण्याची, मुरगळण्याची शक्यता होती. पाण्याची खोली काही ठिकाणी तळपायापर्यंत ते मांडीपर्यंत अशी होती. एक धबधबा थोडा जास्त रुंद, जास्त खोल आणि पाण्याचा प्रवाह देखील जोराचा होता. विशालचा आवाज ऐकाला,सुयोग”.. पाठोपाठ सुयोगचा आवाज, हो”. हयानंतर सुयोग पुढे आला त्याने मला हाताना आधार दिला. मला हसून म्हणाला, तुमची जबाबदारी माझ्यावर आहे”. ऐकून क्षणात माझ्या मनात असंख्य विचार तरळून गेले. मी आलेखला टाळलं होतं पण ...काय रिअ‍ॅक्ट करावं तेच कळेना. सुयोगला एवढच म्हटलं, मी कोऑपरेट करेन”. मला मदत लागणारचं होती पण जिथ शक्य आहे आणि जितकं शक्य आहे तेवढा दम न लागण्याचा ङ्गायदा मी आज ऊचलायचं ठरवलं होतं. त्यामूळे अत्यंत अवघड ठिकाणी धबधब्याचं पाणी पार करताना सुयोगची मदत घेतली. सुयोग पण भारी अगदी गुरुदास आणि मयूर सारखा....त्याने माझी सोबत काही सोडली नाही. त्याच्या हेही लक्षात आलं होतं की मी काही पाणी सोबत घेतलेलं नाही. त्याने लगेच मला सांगितलं की हवं तेव्हा पिण्यास पाणी मागून घ्या. जिथं अवघड जागा होत्या तिथं तो आणि प्रतिक माझ्या पुढे जायचे आणि आधार दयायचे.

जंगलाच्या सपाट भागात काही ठिकाणे झाडे पावसाने कोलमडून रस्त्यात पडली होती. त्यात झाडे, झाडांच्या मुळांमधे पाय अडकून पडू नये म्हणून पावले जपून टाकावी लागत होती.

जिथे धबधब्याचं पाणी पार करायचं होतं तिथे विशाल थांबायचा, तो पॅच पार करायला मदत करायचा आणि सर्वांचा तो पॅच पार होईपर्यंत वाट पहयचा. पण जिथे सपाट ट्रेक होता तिथे विशाल सुसाट सुटला होता. दोन-तीन गट झाले होते. गॅप पडत होती. विशालला हाक मारुन थांबवाव लागत होतं बहुतेक त्याच्या डोक्यात एकच असाव की ६-७ तासात ट्रेक पुर्ण करायचाय आणि म्हणूनच जिथे सपाट भाग आहे, चालायला सुलभ आहे तिथे चालण्याची गती वाढवून तो टाईम गॅप भरुन काढण्याचा विचार तो करत असावा.

शिवने यावेळी शिकवले की नी-कॅप जरी वापरत असलो तरही गूडघ्यावर भार येऊ नये म्हणून स्टीकचा अ‍ॅगल कसा असावा. तसेच जमीनीच्या कोणत्या प्रकारच्या पृष्ठभागार स्टीक वापरायची आणि कोणत्या  पृष्ठभागार स्टीक न वापरता शरीराचा तोल सांभाळत ट्रेक करता येऊ शकतो. आहे ना कमालीचा तंत्रज्ञान!
काही धबधब्याचं पाणी पार करणं सर्वांसाठीच कठीण होतं. अशा ठिकाणी थोडया थोडया अंतरावर विशाल, शिव, रवी, भगवान, आलेख, प्रतिक थांबत होते आणि हाताचा आधार देऊन तो पॅच पार करुन देत होते. पाण्याच्या गतीशील प्रवाहाने आपण ढकलले जातोय हे जाणवतं होतं.

हया ट्रेकमधील निसर्ग सौदर्य अलातून होतं. विशाल म्हणला होता ते प्रत्ययास होतं की हा ट्रेक पावसाळयातचं करावा. पहावे तिकडे ऊंच डोंगरावरुन ङ्गेसाळत कोसळणारे अगणित धबधबे, मुलांच्या भाषेत दूधसागर, ढगांचे पांघरुण, धुके, तडातड अंगावर कोसळणार्‍या पावसाच्या धारा, मधूनच दृष्टीस पडणारी हिरवीगार वनराई, हयामधून जाणारी वेडीवाकडी पायवाट...माणसांना ओढ लावणारी, त्यांचे पाय घट्ट रोवुन ठेवणारी, त्यांना आर्कषून घेणारी, डोळे तृप्त करणारी, गायला-नाचायला लावणारी, आत्मा संतुष्ट करणारी निसर्गामधील केवढी प्रचंड मोठी ही ताकद!

साधारणत: एक ते दीड तास चालून आम्ही अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचलो जिथे समोर अतिप्रचंड मोठे-रुंद धबधबे अति वेगाने मोठया मोठया दगडावरुन कोसळत होते. एका मागून एक...खाली खोल दरीत ते स्वत:ला झोकुन देत होते. धुक्यामुळे आणि घनदाट झाडी मुळे दरी किती खोल आहे हयाचा अंदाज ही लागत नव्हता. २-३ दिवस सलग झालेल्या पावसाने त्याने भयानक अति रौद्र स्वरुप धारण केले होते. निसर्गाचा अजून एक चमत्कार. सौदर्य आणि रौद्रता यांना अनोखा मिलाप!  पायवाट दिसतचं नव्हती.  रस्ता जणू इथे संपलाच होता. विशालने सर्वांना थांबण्याच्या सूचना दिल्या. तो, रवी आणि भगवान रस्ता शोधायला गेले. पायलट ट्रेकच्या वेळी पाऊस नसल्याने त्यांना काही समस्या आली नव्हती आणि आता..पावसामुळे पायवाटच अदृश्य झाली होती. विशाल धबधब्याच्या अति गतीशील पाणीप्रवाहातून झपाझप पावलं टाकत पुढे जात होता. त्याला तसं जाताना पाहून काळजाचा ठोका चुकला क्षणभर! हा मुलगा नक्की आहे तरी काय असा प्रश्‍न परत एकदा पडला. प्रचंड कोसळणार्‍या पावसात, प्रचंड गतीशील पाण्याच्या प्रवाहात हा मुलगा असा चालला होता जसा सपाट जमीनीवरुन चाललाय. प्रचंड सहजता, सराव, धाडस, आत्मविश्‍वास, आत्मबल..... त्याचं हे रुप मी प्रथमच पाहत होते. ही मुलं वर कुठपर्यंत रस्त्याचा शोध घेऊन आली कुणास ठाऊक़ विशालला म्हंणल, रिस्क नको घ्यायला. आपण परत जाऊ. आम्ही निसर्गाचा आनंद घेतलाय”. विशाल म्हणे, सेफ्टी र्स्ट आपण बॅक आऊट करु वेळ पडली तर.त्यानंतर शिव, रवी आणि भगवान गेले. त्यांनी तर ते प्रचंड रौद्र धबधबे पार केले आणि सर्वजण तो पार करु शकतील की नाही, पार करणं सुरक्षीत आहे का हयाचा अंदाज घेतला. हातवारे करुन विशाल आणि हया मुलांमधे संवाद सुरु होता. विशाल परत ङ्गिरा म्हणून इशारे करत होता. विशाल आणि शिव सहित हया सर्व मुलांचे हे प्रयत्न जवळ जवळ दीड-दोन तास चालले होते. हया सर्वांनी १५-२० मिनिट एकमेकात चर्चा केली आणि सुरक्षेचा विचार करुन बॅक आऊट घोषित केलं. मग तिथेच थांबुन लंच केलं आणि साधारण दोन-अडीचच्या सुमारास परतीला निघालो. नंतर शिवने सांगितले की पाण्याला खूप प्रवाह होता, हातांचा आधार घ्यायला जागा नव्हती, थोडा पाय घसरला तर थेट दरीत!

परतीच्या ट्रेक मधे पावसामुळे निसरडं झालं होतं. विशालच्या हाताच्या आधाराने काही निसरडे पॅचेस पार केले. आता सकाळपेक्षा धबधब्याच्या पाण्याचा वेग आणि पातळी वाढली होती.  धबधब्याचे पाणी पार करताना ते जाणवत होते. बॅक आऊट करण्याचा निर्णय किती ऊचित होता ते लक्षात आलं. एक धबधबा धोकादायक पातळीला आला होता. शिवने माझा हात धरला आणि दोघांनी एकाच वेळी तो धबधबा पार केला. त्याने पाणी माझ्या मांडयांपर्यंत आले होते. शिव म्हणे, ज्याला रोप ची गरज होती तो पॅच आपण चालत पार केला. खरंतरं लोक पाण्याच्या वेगाला घाबरतात”. त्याचं मला पटलं होतं कारण एका ट्रेकर्स ने तिथे कपडे वाळत टाकण्याची दोरी दोन्ही बाजूने झाडाला बांधली होती. त्या दोरीचा आधार घेत ते पॅच पार करत होते. ती नायलॉन ची दोरी, ओेल्या हाताने दोरीवरचा हात निसटू शकतो, पावसात झाडे पण मऊ आणि ठिसूळ होतात. अशा परिस्थितीत त्या दोरीवर अवलंबून राहणे कितपत योग्य. एनीवेज ..मी त्यातली अभ्यासक नाही..पण शिव ने मला तो पॅच पार करुन दिला. आता तो लीडवर होता आणि मी त्याच्या सोबत परतीचा ट्रेक पार केला. एका धबधब्याखाली मुला-मुलींनी भिजण्याचा आनंद लुटला.

आता पुष्कळसे लोक पावसात भिजण्यास आलेले दिसत होते. काही जण तर बहुधा ट्रेकलाच आलेले. आमच्या ट्रेकमधील लोक त्यांना पुढील परिस्थितीची कल्पना देत होते. हे तर नक्की होते की पावसाळ्यात ट्रेकचा , निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण लोकप्रिय वाटत होते.

परतीच्या प्रवासात एका ठिकाणी आम्हाला थांबायला सांगुन विशाल आणि रवी धावला. विशालला अजून एक वाट लक्षात आली होती. तो अर्धा तासाने परत आला. आम्ही आधीच्याच वाटने परत निघालो. विशालला मिळालेल्या वाटने भीरा धरण जवळ होते पण तिथे लोखंडी तार बांधली होती. ती तितकीशी घट्ट नव्हती आणि त्यामुळे धरणाचा पॅच पार करणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होते.
ट्रेक पुर्ण होऊ शकला नाही पण निसर्गाचा, पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद मात्र अविस्मरणिय आणि संस्मरणिय ठरला.
विशाल खूप शांत-शांत होता. चेहरा हिरमुसलेला, केविलवाणा,उदास झालेला. त्याच्याकडे पाहवत नव्हते. ट्रेक पुर्ण न होणं, पावसाळयात हा ट्रेक ठेवायला नको होता, काही गरजेचे साहित्य बरोबर असायला हवे होते का हयासारखे विचार त्याच्या मनात कदाचित सुरु असावेत. खूपदा वाटलं त्याच्याशी बोलावं पण वाटलं राहू दे त्याला थोडा वेळ देऊ यात, थोडावेळ त्याला स्वत:शी संवाद करु देत!

आता अजून एक प्रसंग आमच्या समोर आलां. गाडी भीरा गावात थांबणार होती आणि आम्ही तर परत ताम्हिणी घाटात आलेलो. कोणत्याच कंपनीच्या मोबाईलला नेटवर्क नाही. ड्रायव्हरला ङ्गोन लागेना. गाडी बोलवणार कशी? असं ठरलं की ५-६ किमी वर ताम्हीणी घाटातील वांगी फाटयावर जाऊन थांबायचं. आम्ही चालायला सुरुवात केली. शिव एका गाडीत बसून पुढे गेला. तो त्याची गाडी घेऊन भीरा गावात जाऊन गाडीला घेऊन येणार होता. पाऊस तर थांबायचं नावचं घेत नव्हता. सर्वजण दिवसभरच्या पावसाने त्रासलेले, थकलेले असावेत. पण पर्याय नव्हता. वांगी फाटयावर कसबसं आयडीयाला नेटवर्क मिळालं पण ड्रायव्हर चा फोन स्वीचड ऑ येत होता. शिवचा फोन पण कधी लागायचा तर कधी नाही. अर्धा तास असाच गेला. विशालचे प्रयत्न चालूच. हा मुलगा एक क्षणदेखील स्वस्थ बसला नाही. फोनचे प्रयत्न चालूच. पुर्णवेळ उभाच. त्याने कुणाकुणाला फोन लावले. निरोप दिले. शेवटी एकदाचा ड्रायव्हरला फोन लागला आणि ड्रायव्हर आमच्याकडे यायला निघाला. मधल्या काळात एक मुलगी चिडली होती. तिचे म्हणणे की अशा परिस्थितीत ट्रेकर्स ने २-३ प्लॅन्स रेडी ठेवावेत. विशाल तिच्याशी बोलला. थोडा वाद-विवाद झाला. विशाल म्हणताना ऐकलं की ट्रेकर्सचं काही चुकलं. पण मला तर काही चुकलं असं वाटलं नाही. पायलट ट्रेक करुनही रस्ता चुकू शकतो, फोनला नेटवर्क नसणं असं देखील होऊ शकतं, निसर्गाच्या प्रकोपापुढे सुरक्षेला महत्व देऊन माघार घ्यावी लागते इ. विशालने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. त्याची तगमग, अस्वस्थता, शर्थीचे प्रयत्न दिसत होते. बिचारा आधीच ट्रेक पुर्ण न झाल्याने उदास झाला होता त्यात भर हया वादाची!. एक लीडर अशा वेळी काय मनस्थितीतून जात असेल हयाची मलाच काय सर्वांनाच कल्पना आली असेल. मला एक खात्री होती की हा मुलगा एखाद दिवस थोडा अपसेट/उदास राहिल, पण नंतर लगेचच तेवढयाच ताकदीने परत उभा राहिलं!

एक विचार करता ट्रेक पुर्ण न होणं माझ्यासाठी देखील उदास करणारी गोष्ट होती. हा पहिला ट्रेक होता जिथे हवामानामुळे आणि ट्रेकला चढाई नसल्याने मला अजिबातच दम लागत नव्हता. मी बर्‍यापैकी विशाल सोबत लीडला राहू शकले होते. त्यामुळे एक उत्साह होता. पण ट्रेक पुर्ण होण्यासाठी यावेळी निसर्गाचा वरदहस्त नव्हता!

ट्रेक दरम्यान मला चष्मा शेवटी काढूनच ठेवावा लागला कारण पावसाचे पाणी चष्माच्या काचावर ओघळून पुढचे दिसेनासे झाले होते. शिव ने विचारलं, व्हीजन आहे ना व्यवस्थित?.

धबधब्याच्या पार्श्‍वभूमीवर, चष्मा न घातलेला माझा योगेशने काढलेला माझा फोटो एकदम सही आलाय!

गाडीची वाट पाहत वांगी फाटयावर थांबलेलो असताना भगवान त्याचे दोन्ही हात जोडून मला म्हणाला, तुम्हाला वंदन आहे मॅडम..पुणे ते सासवड वारी परवा करुन आज तुम्ही ट्रेकला आलात”.

संध्याकाळी जवळ जवळ सव्वा सात वाजता वांगी फाटयावर गाडी आली. हॉटेल शिवसागर मधे जेवण आणि चहा घेऊन साधारण ८.३० ते च्या सुमारास पुण्याकडे निघालो.

परतीच्या प्रवासात किरण आणि नेहाली माझ्याशी बोलण्यासाठी जवळ येऊन बसली. हरिश्‍चंद्रगड हा किरणंचा एस. जी. ट्रेकर्स बरोबरचा पहिला ट्रेक होता आणि त्यावेळी आम्ही दोघी एकत्र होतो. ट्रेक दरम्यान छान गप्पा झाल्या आणि नंतर केलेल्या ट्रेक्स मुळे सुंदर नातं दोघीत निर्माण झालं!

नेहाली आणि मी बरेचसे ट्रेक एकत्र केले होते. आता तर एस.जी.ट्रेकर्सच्या हिरकणी अ‍ॅडव्हेंचर क्लब ची ती एक कोऑर्डीनेटर आहे!

स्मिता, नेहाली, किरण, अनुप्रिता, मीनू , सुयोग, प्रतिक, रवि, भगवान, योगेश इ. सोबत झालेल्या गप्पा म्हणजे माझ्यासाठी आठवणींचा ठेवा आहे. कुठेतरी वाचलं होतं की, पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री जीवनभराची! 
रात्री दहा वाजता पुण्यात पोहोचलो. घरी पोहोचायला १०.१५ मि. वाजून गेले होते.

हा ट्रेक खूप काही शिकवून गेला, ट्रेक लीडर्सना आणि सहभागींना. प्रत्येकाने त्याच्या परीने ती शिकवण घेतली असेल. माझ्यासाठी तर हीच शिकवण होती की निसर्गासारखा दूसरा शिक्षक नाही, निसर्गाच्या वरदहस्ताशिवाय माणसाचे जीवन सुलभ आणि सुखकारक नाही आणि निसर्गापुढे माघार घेणे हा निसर्गाचा सन्मान आहे आपली हार नाही!.


No comments: