ट्रेक टू ढाक बहिरी केव्ह्ज: ३ जानेवारी २०१६

एस. जी. ट्रेकर्स : ट्रेक टू ढाक बहिरी  केव्ह्ज: जानेवारी २०१६

ढाक बाहिरी गुहा हा एस.जी ट्रेकर्स बरोबरचा माझा सहावा ट्रेक होता. ह्या ट्रेकबद्दल मी खूप वाचलं होतं आणि फेसबुकवर फोटो पण बघितले होते. तो भला मोठा रॉक पॅच पाहून आणि दोरखंडाच्या सहाय्याने तो पार करतानाचे फोटो पाहूनचं माझी घाबरगुंडी उडाली होती. विशालकडून अगोदरच ट्रेकची माहिती घेतली होती. विशाल ने सांगितले होते की दोन रॉक पॅच आहेत, एक जरा अरुंद आहे आणि एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकते आणि दुसरा भला मोठा आडवा रॉक पॅच आहे आणि नंतर वर गुहेत जाण्यासाठी शिडया आहेत. त्याने हे ही सांगितलं होतं की स्त्रिया क्त पहिल्या गुहेपर्यंत जाऊ शकतात, शेवटची गुहा जिथे ढाक देवाची गुहा आहे तिथे स्त्रियांना जाण्यास मनाई आहे. ढाक देव तिथल्या ठाकूर आदिवासींचा देव आहे! विशालला आत्मविश्वास आणि खात्री होती की मी तो रॉक पॅच पार करू शकेल!

हया ट्रेकला जाण्याचे एक महत्वाचे कारण हे होते की तो एस.जी. ट्रेकर्सचा पहिला अ‍ॅनिव्हर्सरी ट्रेक होता! यानिमित्ताने जांभिवली गावातील शाळेतील मुलांना वहया, पुस्तके, स्टेशनरी, कपडे इ. ची मदत करुन हया ट्रेकर्सने आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला होता!




या ट्रेकला विशाल, राहूल, आलेख, अनिकेत, शंकर, डॅनी होते आणि शेवटी मिलींद पण आला होता.

खाजगी गाडी कामशेत मार्गे जांभिवली गावात जाणार होती आणि तिथून ट्रेक सुरु होणार होता. जांभिवली गावात पोहे आणि चहाचा नाश्ता झाला. 

एक वर्षाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आतापर्यंत समीट केलेले सर्व गड/किल्ल्यांच्या प्रतिमा असलेला केक कापला. 







गावातील शाळेत मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं.



हा आनंद शब्दापलीकडचा!ही अनुभूती शब्दपलीकडची!

मुलांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता शब्दापलीकडची!
मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य शब्दापलीकडचे!








हया ट्रेकर्सने माझ्यासाठी दिलेला सहयोग आणि पुढील वर्षाच्या ट्रेकसाठी शुभेच्छा म्हणून त्यांना मी एक ग्रीटींग कार्ड दिलं.










शाळेच्या बेंचवर बसलेली असताना आलेखने फोटो माझा काढला जो कायम स्मरणात राहिल. 


हया कार्यक्रमानंतर ट्रेकला सुरुवात झाली.




विशालने ज्या अरुंद रॉक पॅच बद्दल सांगितले होते तिथपर्यंत चढाई करायला फारसा त्रास झाला नाही. तिथपर्यंत साधारणत: एक ते दीड तासात पोहोचलो. आता दोन्ही बाजूला प्रचंड मोठी शिळा आणि त्यामधे खोलवर घळ असा तो पॅच होता. खोलवर घळीत उतरायचा मार्ग कठीण होता, दगडांनी भरलेला होता. काही ठिकाणी दगडांवर सहजपणे पाय पोहोचत होता पण काही ठिकाणी पाय पोहोचायला कसब लागत होते. आता सर्व लीडर्स त्या पॅच मधे ठराविक अंतर ठेऊन उभे राहिले आणि एकेकाला खाली उतरण्यास मदत करु लागले. उतरायला तो पॅच भयानक कठीण होता आणि ते पाहून मी मनाशी निश्‍चय करत होते की मी तो पॅच पार करणार नाही. बस्स इथपर्यंतचाच ट्रेक करणार. विशालचे शब्द  आठवत होते, “तुम्हाला जमेल”! एक मन विशालवर विश्वास ठेऊ पाहत होतं तर दुसरं रेझिस्ट करत होतं. पण सर्व लीडर्सने आत्मविश्‍वास दिला, घाबरु नका, आम्ही आहोत. आपण अगदी शिस्तीत, हळूवारपणे हा पॅच पार करु”. ता जे लोक हा पॅच उतरले होते त्यांना घेऊन विशाल आणि आलेख पुढे गेले होते. राहूल, अनिकेत, शंकर यांच्या मदतीने मी तो पॅच खाली उतरले. थोड्या थोड्या अंतरावर ही मुले उभी होती आणि एक अवघड उतरण पार केल्यावर थोडं रिलीव्ह व्हायला मला वेळ देत होती. ह्या मुलांनी इतक्या हळूवारपणे आणि संवेदनशीलतेने तो पॅच  पार करायला मला मदत केली की असं वाटलं मी उगाचचं घाबरले होते! त्यावेळी लक्षात आलं की ट्रेक लीडर हा अनुभवी तर असायलाचं हवा पण संवेदनशीलही तितकाच असायला हवा!

दुसरं हे ही आहे की लीडरच्या सूचना आपणही तंतोतंत पाळायला हव्यात! तुम्ही जरी तुमचं ९९% देत असाल तरी उरलेला १% लीडरचा असतो ज्यामुळेचं तुमचा ट्रेक समीट होतो!

पॅच पार झाल्यावर सर्वजण म्हणे, “ मॅडम थोडावेळ रीलॅक्स व्हा मग तुम्हाला पुढे जायला मदत करतो”.

थोड चालून गेल्यावर पहिली गुहा आली होती. सर्वांनी त्यांच्या बॅगा इथेच ठेवल्या होत्या कारण इथून पुढचा आडवा रॉक पॅच पार करणं हा खरा कसोटीचा प्रसंग होता. आता जवळ जवळ १२ वाजून गेले होते आणि उन्हाचा तडाखा चांगलाच बसत होता. खूप जणं त्यात काही मुलींसुद्धा स्वतंत्रपणे तो आडवा रॉक पॅच पार करुन गेल्या होत्या. मला कौतुकच वाटत होत त्या मुलींच. मला वाटतं वैष्णवी होती जी पहिल्यांदा आणि कोणाच्याही मदतीशिवाय शेवटची गुहा चढून गेली. तिला तसं चढताना पाहून विशाल लांबूनच तिला म्हणे, वैष्णवी हळू, गडबड करु नकोस, सावकाश जा. विशालच्या आवाजातील ती आर्तता आणि चिंता मला आजही भावनिक बनवते.

विशालने मला काही वेळ थांबायला सांगितलं होतं. काही मुलं-मुली रॉक पॅच पार करुन गेल्यानंतर विशाल माझ्या मदतीसाठी आला. माझा हात हातात घेतला आणि आम्ही तो आडवा दगड पार करायला सुरुवात केली. हया दगडांमधे पाय ठेवता येईल अशा खाचा होत्या पण त्या भयानक जिकीरीच्या होत्या. एक खाच वर तर एक पार खाली आणि मधे सपाट, गुळगुळीत दगड़ असा की त्याच्या पायाला घट्ट रोवुन ठेवता येणारचं नाही. खालची खाच इतकी धोकादायक की त्यात पाय नीट बसला नाही तर कोसळणार ते थेट दरीतच. रॉक पॅचच्या वरच्या भागाला एक लोखंडी सळई आधारासाठी फीट केली होती. मी एका हाताने लोखंडी सळई आधार घेत होते तर दूसरा हात विशालच्या हातात. उन्हामुळे लोखंडी सळई इतकी प्रचंड तापली होती की काही क्षण त्यावर हात टिकाव धरु शकत होता. हाताला चटका बसला की आपोआपच हात सळर्ई वरुन काढला जायचा. त्या  सळईला हात धरुन खालच्या दगडी खाचेत पाय फीट होईपर्यंत हाताला असा काही चटका बसायचा की त्याची झणझण पुढे काही सेकंद सहन करावी लागत होती.

यावेळी ट्रेक मधील विशालच रुप पाहून मी चकीत झाले होते. त्याच्यातला लीडर, त्याचा पराकोटीचा आत्मविश्‍वास, जिद्द, त्याची भक्कम, विश्‍वासू अशी बॉडी लॅग्वेज, त्याची अधिकार वाणी, सहभागींच्या सुरक्षेची जबाबदारी इतकी जबरदस्त होती की त्याच शब्दात वर्णन करणं कठीण आहे. मी ज्याम प्रभावित झाले हया मुलाकडे बघुन. तो रॉक पॅच मला पुर्ण करुन देण्याची सर्व जबाबदारी त्याने स्वत:वर घेतली होती. जोपर्यंत तो पॅच पार होत नव्हता हया मुलाचं लक्ष केवळ माझ्यावर केंद्रित होतं!

तो रॉक पॅच पार केल्यावर दगडांमधेच पायर्‍या असलेली शिडी होती. त्या पायर्‍या पण इतक्या अरुंद की एकावेळी एकच जण जाऊ शकेल आणि एकाचा पाय जेमतेम कसाबसा त्या दगदी खाचेत फीट होऊ शकेल. पाय पण आडवा करून ठेवावा लागतो, उभा पाय निम्माचं बसतो आणि त्याने ग्रीप येत नाही. उन्हाने त्या दगडी पायऱ्याही तापल्या होत्या. हा पॅच असा आहे की लीडरला तुमची सोबत करायला वावचं नाही. मला स्वत:लाचं ही परीक्षा द्यावी लागणार हे लक्षात आल्यावर, अत्यंत एकाग्र झाले, डोकं एकदम शांत आणि लक्ष फक्त चढण्याकडे! एक एक पायरी हळूवारपणे आणि हवा तेवढा वेळ घेत पार केली. विशाल आणि आलेख म्हणे, “वेल डन, मॅडम. आता थोड रिलॅक्स व्हा मग पुढचा पॅच पार करु.

आता वरच्या गुहेत जायला आधी एक दोरखंडाची शिडी होती आणि नंतर लोखंडाची. दोरखंडाची शिडी तर हालत होती आणि ती पार करण्यात दूसरं कोणी तुम्हाला मदत करू शकण्याची शक्यता खूप कमी होती. पुढे जाणार्‍या लोकांच मी निरिक्षण करत होते आणि माझ्या लक्षात आलं की मी हे करु शकणार नाही आणि मी निश्‍चय केला की मी पुढचा टप्पा पार करणार नाही. मी जेवढं केलं त्यात मी समाधानी आहे. मला हे वाटतं होतं की मी स्वत:कडून जरा जास्तच अपेक्षा करत आहे की काय?


आलेख आला म्हणे, मॅडम, चला . मी माझा निर्णय सांगितला. विशाल, आलेख आणि काही सहभागी म्हणे, मॅडम, या, तुम्ही करु शकाल. पण का कुणास ठाऊक माझा आतला आवाज नकार देत होता. सर्वांनी माझा निर्णय मान्य केला. विशाल म्हणे, थोडावेळ रिलॅक्स व्हा मग आलेख तुम्हाला खाली जायला मदत करेन. विशालने मला हा जो कालावधी रिलॅक्स व्हायला दिला तो किती महत्वाचा होता हे मला जाणवत होतं. त्यामुळे मी थोडी स्थिरस्थावर झाले आणि पुढचा पॅच पार करायला मनाने तयार झाले.

आता त्या दगडी पायर्‍यांची शिडी पार करायची होती, ती देखील उलटया दिशेने. त्या शिडीला दोन्ही बाजूला आधारच नव्हता. दोन्ही बाजूला सपाट दगड आणि मधे पाय जेमतेम बसेल अशा दगडता निर्माण झालेल्या खाचा. खालच्या पायरीवर पाय ठेवण्यासाठी मागे वळून पायरीचा अंदाज घ्यायचा आणि मग पाय ठेवायचा हे मोठं भयानक काम होतं. अशा १०-१२ पायर्‍या उतराव्या लागणार होत्या. मी परत एकदा एकाग्र चित्ताने, डोकं, मन शांत ठेऊन, गडबड न करता त्या शिडया उतरले. मग आलेखने मला तो आडवा रॉक पॅच पार करायला मदत केली. लोखंडी सळईला धरुन पार करत असताना हाताला चटके बसतचं होते. तेव्हा वाटलं हा पॅच सकाळी च्या आत पार करणं आवश्यक आहे. जानेवारी महिन्यातच तो रॉक आणि ती  सळई इतकी प्रचंड उन्हाने तापली होती की उन्हाळयात त्याची काय अवस्था होत असेल ही कल्पनाच न केलेली बरी. थोडक्यात काय उन्हाळा आणि पावसाळा हा ट्रेक करुच नये. कमालीचा रिस्की! बरं हातात ग्लोव्हज घालणे त्याहूनही धोकादायक़ हाताला पकड/ग्रिप येणारंच नाही. हाताची पडड ढीली पडली तर कोसळणार ते थेट दरीत! दरीत पडलेल्या माणसाचा शोध घेणं तर केवळ अशक्य. इतकी ती खोल दरी आणि घनदाट झाडी. वन्यश्‍वापदांना तर मग पर्वणीच! इतका भयानक साहसी, जीवावर बेतेल असा हा ट्रेक आहे. तो पार करायचा साहस तुमच्यात असेल तरिही अनुभवी ट्रेकर्स सोबत जाणं जास्त शहाणपणाचं!

हा रॉक पॅच पार करायला मदत करत असताना हया मुलांमधील क्षमतांची जाणीव मला झाली. मी सूखरुप, सुरक्षीत आहे ही भावनाचं खूप सुखद धक्का देऊन गेली. मिलींद जेव्हा संध्याकाळी मला भेटला तेव्हा मी त्याला म्हटल देखील, मनात एक विचार सारखा असतो की माझ्या छोटयाशा काही गोष्टीमुळे माझ्या घरच्यांना काही त्रास नको व्हायला. हया ग्रुपबरोबर ट्रेक करताना त्यांनी माझी इतकी काळजी घेतली आहे की अशा काही अवघड ट्रेक मधे मला कधी खरचटलेलं सुद्धा नाही!

आता हया गुहेत आल्यावर थोडी विश्रांती घेतली. सोबत आणलेला खाऊ खाल्ला. आता पुढचा पॅच चढून जायचा होता. आता राहूलने लीड केलं. काही लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं ठरलं. राहूल मदतीसाठी थांबला. एक जागा अशी होती की पाय खूप ऊंच करुन मगच वर पाय ठेवता येणार होता. माझा पाय काही केल्या वरपर्यंत पोहोचत नव्हता. राहूल म्हणे, माझ्या मांडीवर पाय ठेवा. पण मला ते खूप कसंतरी वाटायला लागलं. तो म्हणे, ठेवा, ठेवा काही होत नाही.”. नाईलाजास्तव मी माझा पाय त्याच्या मांडीवर ठेवला आणि वरुन एकानं हाताचा आधार दिला आणि मग मी वर चढून आले. आम्ही सर्व वर चढून आल्यावर राहूलने थोडावेळ रिलॅक्स व्हायला सांगितलं आणि मग पुढचा ट्रेक उतरायला सुरुवात केली. आता मात्र काही चढावर मला दम लागत होता आणि मी सांगितलं की राहूल क्षणभर थांबत होता. राहूलबरोबरचा हा परतीचा ट्रेक मला नेहमीच आठवणीत राहिल. कारण मला वाटतं प्रथमच मी तो लीड करत असलेल्या ग्रुपमधे होते आणि त्याची लीडरशीप न्याहाळत होते. मी कुठेतरी वाचलं होतं की लीडर्स चे काही प्रकार आहेत त्यातला एक आहे सर्व्हिस लिडर्स.! हे लीडर्स इतर लोकांची काळजी घेतात, इतरांच्या कामात येणारे अडथळे ते दूर करतात, ते असं काही पोषक वातावरण निर्माण करतात की लोक त्यांच सर्वोत्तम देऊ शकतील आणि ते लोकांच्या गरजां ओळखण्यावर भर देतात, त्यांना मान सन्मान, प्रसिद्धी नको असते. हयाच उत्तम उदाहरण आहे मदर तेरेसा!.
राहूल मला त्यात धर्तीवर चालणारा एक लीडर वाटत होता. अतिशय शांत आणि संयमी. परतीच्या ट्रेकमधे त्याने आमचा ग्रुप माझ्या संवेदना जाणत वेळेत पार केला.

राहूल सोबत असणारे भरपूर ट्रेक्स मी केले. खूप तन्मयतेने त्याने मला साथ दिली आहे/देत आहे. खूप आत्मियतेने विचारायचा,मॅडम तुमची सॅक घेऊ का?”.. त्याची ही साथ लाखमोलाची वाटायची पण हा मुलगा माझ्या ट्रेक करण्याबद्दल काहीच मत व्यक्त करायचा नाही आणि हयाचा विचार मी दरवेळी, दर ट्रेक ला करत असे. वाटायचं काही तरी हयाने बोलावं. खरतरं बोलायला हवंच असं काही नाही हे ही कळत होतं पण का कूणास ठाऊक, त्याचे काही शब्द ऐकायला मी उत्सूक होते. असं वाटायचा की हा मुलगा बारकाईने मी करत असलेल्या ट्रेक चं निरिक्षण करतोय, त्यावर विचार करतोय पण त्यावर काही टिपणी करत नाही. वाटायचं हा मुलगा ज्या दिवशी ज्या ट्रेक ला काही टिपणी करेल तो ट्रेक आणि तो दिवस माझ्या ट्रेकिंग आयुष्यातलां आत्मिय समाधान देणारा दिवस असेल. त्या दिवशी आत्तापर्यंत केलेले ट्रेक समीट केल्याचं समाधान मला मिळेल! फायनली तो दिवस आला आणि तो ट्रेक ही आला! तो ट्रेक कोणता हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा माझे ट्रेकचे अनुभव!

असो. पहिल्यांदाच असं झालं होतं की मी आणि राहूल सर्व टीमच्या आधी ट्रेक पुर्ण करुन आलो होतो. त्यामुळे सर्वात प्रथम आल्याचा आनंद आम्हाला दोघांनाही झाला होता. त्यामुळे आम्हाला भरपूर विश्रांती मिळणार होती. आम्ही फ्रेश झालो, चहा घेतला, सोबतचा खाऊ खाल्ला, गप्पा मारल्या.

बाकीच्या ग्रुपला यायला वेळ लागत होता. मिलिंद आला होता अंधार पडला होता. लोक येईनात. राहुल रेस्टलेस झाला होता. मिलींदच्या गाडीवर दोघे इतरांना पाहण्यासाठी गेले. बाकीचा ग्रुप यायला संध्याकाळचे सात वाजून गेले होते. विशाल आल्यावर लगेचच माझ्याकडे आला, हात हातात घेऊन म्हणे, वेल डन!. त्याची ही नेहमीची पद्धत. त्याचे हे शब्द ऐकले नी ट्रेकचा थकवा निघून गेला. माझ्यासाठी ट्रेक समीट करण्याचं एकच चिन्ह आहे आणि ते म्हणजे विशालचे वेल डन हे शब्द!. मला आजही स्पर्शातली भावना जाणवत नाही पण त्याच्या डोळयातली चमक मात्र माझ्या डोळयासमोर दिसते!

सतीश आणि त्याचे काही मित्र ट्रेकला होते. ते मला म्हणे, मॅडम, तुम्ही किरण बेदीं सारख्या दिसता!

सगळेजण आल्यावर त्यांनी जेवण केलं आणि जवळ जवळ ८.३०-८.४५ च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो. पुण्यात यायला जवळ जवळ ११ वाजले होते. 
 
ढाक बहिरी हा ट्रेक संस्मरणीय झाला तो तीन कारणांसाठी, ट्रेकच्या निमित्ताने सामाजिक कार्यात सहभाग देता आला, माझ्यासाठी हया ट्रेकच्या लीडर्सने जे योगदान दिले होतं त्याचं कौतुकही मला करता आलं आणि एक अवघड ट्रेक समिट केल्याचं समाधानही मिळालं!

ह्या ट्रेक ने माझा खासकरून विशालवरचा विश्वास पक्का झाला. मला हे जाणवलं की ह्या मुलाला जर माझ्यावर आत्मविश्वास असेल, मी ट्रेक करू शकेल ही खात्री जर त्याला असेल तर मी तो ट्रेक समीट करू शकते! विशालच्या आत्मविश्वामागे त्याच्या स्वत:च्या क्षमतांवर त्याचा विश्वास हे असेलचं पण मुख्य कारणं मला वाटतं ते हे ही आहे की त्याचा त्याच्या टीमवर/लीडर्स वर आणि त्यांच्या क्षमतांवर तेवढाचं दृढविश्वास आहे! त्यामुळेचं माझ्यासारखी मुलगी जिचं खरं वय कदाचित तिच्या मनात आहे ती पण ट्रेक सहज समीट करू शकते!

ट्रेक शेवटी आहे तरी काय, “शरीर आणि मन यांची ड्रॉ झालेली क्रिकेटची मॅच! दोघही समान पातळीवर जिंकायला हवेत”!


(फोटो आभार: ढाक बहिरी ट्रेक टीम)

No comments: