माथेरान ट्रेक व्हाया वन ट्री हिल पॉइंट, २५ ऑक्टोबर २०१५
पुणे-कर्जत-आंबेवाडी मार्गे माथेरान ट्रेक हा लक्षात राहिलेला ट्रेक आहे तो दोन कारणांसाठी! 

एक कारण हे होते कि माझी मैत्रीण सबा हिचा हा पहिलाच ट्रेक होता आणि दुसरे कारण, आलेख प्रजापती ह्या ट्रेक लीडरची आम्ही अनुभवलेली लीडरशिप!


माथेरान हे मुंबई जवळील एक हिल स्टेशन आहे. साधारणतः ८०० मी. उंचावरच्या या ठिकाणी  २५ च्यावर पॉइंट आहेत आणि त्यातील एक आहे वन ट्री हिल पॉइंट! माथेरान हे इको सेन्सिटिव्ह रिजन असल्याने प्रदूषणरहित ठिकाण आहे. 

आम्ही सकाळी ६.३० च्या लोकलने निघालो आणि कर्जतला  साधारणत: ८.८०-९  ला पोहोचलो. तिथून जीपने आंबेवाडी! आंबेवाडी हे ह्या ट्रेक चे बेस व्हिलेज आहे. गावातूनच ट्रेकचा रस्ता जातो.इथे राहणारे आदिवासी लोक बाजारासाठी माथेरानला ह्याचं मार्गाने जातात. 

आम्ही ट्रेक १०-१०.३० च्या सुमारास सुरु केला. आंबेवाडीतून बाहेर निघाल्यावर सुरुवातीलाचं डोंगराची चढण आहे.  भयानक ऊन आणि ह्युमीडीटी यामुळे चढण चढताना नाकीनऊ येत होते. घामाच्या धारामुळे थकायला होत. खरंतर जवळचं मोरबे धरणाचं पाणी दिसत होतं तरिही हवेत थंडावा नव्हता. सबाला तर चालवतचं नव्हतं. परत फिरायची भाषा ती करत होती. बसली कि बसूनचं राहत होती.  ती टेकडी पार करून जंगलात शिरायलाचं आम्हाला एक ते दीड तास लागला. आलेख आमच्या सोबत होता. त्याच्या मदतीसाठी मयूर बोरोळे हा ट्रेक सहभागी थांबला होता. सबाची नकारात्मक भूमिका पाहून त्यावेळी आलेख ने तिचा ट्रेक पूर्ण करण्याचं आव्हानचं स्वीकारलं. त्याने सबाला इतकं समजावून सांगत, शांत आणि संयमाने मोटीव्हेट केलं कि ते पाहून मी चकित झाले. ट्रेक सुरु केला कि तो पूर्ण करण हाच एक पर्याय असतो विशेषत: तेव्हा कि परतीचा मार्ग दुसरा असतो. पहिला एक-दीड तास आलेखने सबाने ट्रेक करण्यासाठी इतके प्रयत्न केले कि एका क्षणी आलेख म्हणे,  "आता ती ट्रेक पूर्ण करेल." त्याच्या म्हणण्याप्रमाणे एक-दीड तासाने सबा स्वतंत्रपणे ट्रेक करू लागली! तिच्यातला बदल हा पाहण्यासारखा होता आणि तो परिणाम केवळ आलेखमुळे दिसून येत होता!

आलेख तेव्हा इंग्लिश भाषा बोलण्यास जास्त कम्फर्टेबल होता. त्याचं सगळं मोटीव्हेशन इंग्लिशमधून चाललेलं होत.  ट्रेकिंगवर तो वाचतं असणा-या पुस्तकातील काही उदाहरणे त्याने दिली. एव्हरेस्ट एक्सपीडीशन मधील ट्रेकर्सचे अनुभव सांगितले, प्रथमचं ट्रेक करत असणाऱ्या व्यक्तीने काय करावे, कोणते व्यायाम करावे, स्टॅमीना कसा वाढवावा ह्याबद्दल खूप सखोल मार्गदर्शन केलं. ह्या ट्रेक मधे उन्ह आणि घामामुळे दमछाक झाली होती. एका ठिकाणी पाण्याचा मोठा झरा होता. आलेखने आम्हाला तिथ थांबवलं आणि शरीराच्या कुठल्या भागावर पाणी मारलं कि शरीर थंड होतं, थंडावा मिळतो आणि ऊन बाधत नाही हे त्याने सांगितलं. उदा. कानाच्या मागे, कानाच्या पाळ्या, मान, माथा, डोळे, चेहरा इ. त्याचं स्पष्टीकरण लाॅजिकल वाटतं होतं, पटत होतं. त्याचं दांडग वाचन, ते इंग्लीश मधून सांगणं खूप जबरदस्त होत! 

आलेखपुढचं आव्हान इथेचं संपलं नाही. आता मला त्रास व्हायला लागला होता. थोडं चाललं कि दम लागत होता आणि थकवा जाणवतं होता. आता घनदाट जंगलाचा भाग संपून एक भला मोठा राॅक पॅच सुरु झाला होता. छोटे-मोठे, उभे-आडवे-तिरपे कसेही विखुरलेले दगड. दगड एकमेकात इतके घट्ट रोवलेले होते कि दगडावर पाय स्थिर होण्यासाठी खाचा नव्हत्या आणि दोन दगडांच्या कपारीत पाय बसत नव्हता. त्यात माझ्या पायाला क्रम्प आला . तो इतका जबरदस्त होता कि पोट-यांचा भाग टणक झाला होता आणि एक तीव्र कळ येत होती. काही क्षण मला काहीच सुधरले नाही. आलेख ने पायाला मसाज केला आणि पायाची एक विशीष्ट हालचाल केली, पायाचे काही सोपे व्यायाम करायला सांगितले. जवळजवळ १५-२० मिनिटाने मला बरं वाटायला लागलं. पाणी पिल्यानंतर परत ट्रेक सुरु केला.

आमचा साधारण १५ जणांचा ग्रुप होता. बाकीचे विशालसोबत पुढे गेलेले,
सबा पण पुढे गेलेली. मी आणि आलेखचं मागे राहिलेलो. पण ह्या मुलाने घाई केली नाही किंवा सगळे पुढे गेलेत आपल्यालाही जायला हवं अशाप्रकारे दडपण माझ्यावर आणलं नाही. मी जोपर्यंत चालण्यासाठी ठीक होत नाही तोपर्यंत हा मुलगा झटतं होता. गप्पा मारून काहीवेळा लक्ष विचलित करत होता. भला मोठा तो राॅक पॅच पार केला आणि हसून आलेखने माझं आणि सबाचं अभिनंदन केलं. आम्हाला थोडावेळ विश्रांतीचा सल्ला दिला.


वन ट्री हिल पॉइंट,ला पोहोचलो आणि मुसळधार पाऊस आला. त्या पावसाने थकवा तर क्षणांत गेलाचं पण शरीराला थंडावा मिळाला! वन ट्री हिल पॉइंट हा म्हणजे सभोवताली असणाऱ्या घनदाट जगंलात मधोमध एक भला मोठा वृक्ष आहे! त्याची मुळे आणि खोड अजस्त्र आहे. ह्या वृक्षामुळे जमिनीवर कितीतरी मोठ्या प्रमाणात सावली मिळते आणि बसणा-यांना शीतलता मिळते! 

ह्या ट्रेकमध्ये एक ट्रेक लीडर कसा असावा ह्याचं उदाहरण आलेखच्या रूपाने मी बघत होते. ट्रेक चा लीडर किती महत्वाची व्यक्ती असते आणि ती काय कायापालट करू शकते ह्याचं आलेख सारख दुसरं उदाहरण तोपर्यंत मी पाहिलेलं नव्हतं!
ह्या ट्रेक मुळे आलेख आणि माझ्यातला बाँड खूप बलवान झाला. आजही आम्ही भेटलो कि ह्या ट्रेकची आठवण काढतो! मला वाटतं आलेख हा एक कारण आहे ज्याची लीडरशिप आणि मोटिव्हेशन आठवून मी विशाल आणि एस. जी. बरोबरचे नंतरचे ट्रेक केले आणि एव्हरेस्टचं स्वप्न बघितलं! 

ह्या ट्रेक खूप काही धडे देऊन गेला. विशेषत: माझ्यासारख्या पन्नाशीला आलेल्या मुलीने काय करावे ह्याचं हा ट्रेक उदाहरण होता. उदा. रोज थोडा व्यायाम हवा, क्रम्प येऊ नये म्हणून ट्रेक दरम्यान सतत पाण्याचे घोट पीत राहणं, ट्रेकचा सकारात्मक विचार, ट्रेक लीडरला सहकार्य करणे इ. इ.

खरंतर हा एक-दीड तासाचा ट्रेक! अतिशय सोपा आणि फारशी चढण नसणारा! रेग्युलर ट्रेक करणाऱ्यांसाठी हा ट्रेक काहीच अवघड नाही.  पण ह्या सर्व गोष्टींमुळे आम्हाला जवळ जवळ तीन तास लागले!

वन ट्री हिल पॉइंट ते माथेरान बाजार हा साधारण ५ किमी चा ऊंच ऊंच झाडे असणाऱ्या जंगलातून जाणारा रस्ता अत्यंत विलोभनीय आहे. लाल रंगाची माती आणि सभोवताली अंजनी, वड, पिंपळ इ. सारखी झाडे माथेरानच्या सौदर्यात भर टाकतात. 

हा ट्रेक आहे अतिशय सुंदर! आजूबाजूला धरण, थोडी चढाई, घनदाट जंगल, खतरनाक  राॅक पॅच, वन ट्री हिल पॉइंट, माथेरानच्या सौदर्याची झलक आणि माथेरान बाजारआणि पर्यटकांना माथेरान मधील पॉइंट दाखवण्यासाठी उभे  असलेले घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर उभा पुतळा आणि आलेखची लीडरशिप  ....नि:संशय एक ह्दयस्पर्शी अनुभव!


  

1 comment:

UB said...

Enjoyed reading the blog....👌