वासोटा जंगल ट्रेक, १४ फेब्रुवारी २०१६

वासोटा किल्ला जंगल ट्रेक: १४ फेब्रुवारी २०१६

वासोटा ट्रेक मी तिस-यांदा करत होते. हा ट्रेक त्याच्या निसर्गसौंदर्या मुळे ट्रेकर्स मधे खूप लोकप्रिय आहे. ह्या ठिकाणाला ट्रेकर्स “महाराष्ट्राचं स्वित्झर्लंड” देखील म्हणतात!

हे ट्रेक ठिकाण सातारा जिल्ह्यात येते आणि बामणोली हे ट्रेक पायथ्याचे गाव आहे. ४२६७  फुटावर असलेल्या ह्या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी नाव दिले आहे “व्याघ्रगड” (व्याघ्र म्हणजे वाघ)! आक्रमण करण्यास अतिशय कठीण म्हणून हे नामकरण! वासोट्याचा ज्ञानेश्वरीत अर्थ आहे “ आश्रयस्थान”! असं सांगतात कि अगस्ती ऋषी इथे वास्तव्यास होते आणि त्यांनी आपल्या गुरूंचे अर्थात “वशिष्ठ” (काही ठिकाणी वरिष्ठ असा उल्लेख देखील आहे) ऋषींचे नाव किल्ल्याला दिले. वशिष्ठ नावाचा अपभ्रंश होता होता लोक त्याला “वासोटा” म्हणू लागले!

हा किल्ला कोयना अभयारण्य अर्थात व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येतो त्यामुळे वनखात्याची परवानगी काढणे अनिवार्य आहे. ट्रेकच्या दिवशी देखील परवानगी मिळू शकते. 

किल्ला वन खात्याच्या अंतर्गत येत असल्याने प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या किंवा अन्य कचरा जंगलात टाकण्यास मनाई आहे. ह्या कडक नियमामुळे आणि वनखात्याच्या कडक तपासणीमुळे हा किल्ला आणि जंगल अत्यंत स्वछ आहे! 


ठिकठिकाणी जंगलात दिसणाऱ्या प्राणी , वृक्ष आणि पक्षांची माहिती देणारे फलक लावलेले आहेत. 
हा ट्रेक पावसाळ्यात आणि रात्रीचा करता येत नाही.

ट्रेक पायथा आणि वनखात्याच्या कार्यालयापाशी पोहोचण्यास “शिवसागर लेक” बोटीने पार करावा लागतो. हा लेक पार करण्यास साधारण एक ते दीड तास लागतो. 

कोयना धरणाच्या बॅक वॉटर ने बनलेला हा लेक सौदर्याचा अप्रतिम अविष्कार आहे! निळशार आणि हिरवीछटा असलेले अथांग पाणी बोटीने कापत असताना सकाळची बोचरी थंडगार हवा अंगावर शहारा आणते आणि उन्हाची एक तिरीप मन प्रफुल्लीत करते! 

बोट पाणी कापत असताना उठणारे आणि लांबवर पसरत जाणारे जलतरंग पाहणे 
यासारखा आनंदी अनुभूती दुसरी नाही! चारही बाजूला घनदाट झाडी आणि त्यांमधून येणारे रविकिरण जेव्हा
पाण्याच्या लाटांवर पडतात तेव्हा असं वाटतं कि जणू हिरे चमकताहेत! लखलखणारे जलबिंदू बोटीच्या वेगाने जेव्हा उडतात आणि रविकिरणांनी जेव्हा अधिकचं तेजस्वी होतात तेव्हा डोळे दिपून जातात! एक ते दीड तासाचा हा बोटीचा प्रवास स्वप्नवत वाटतो आणि स्वर्गसुखाचा अनुभव देतो. बोटीचा हा प्रवास संपूचं नये असं वाटलं तर नवल नाही!मन उल्हासित होत असताना मला तर बोटीवर चित्रित झालेली हिंदी सिनेमातली कितीतरी गाणी आठवत होती.... “माझी नैया ढून्ढे किनारा..”....... “ ओ रे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में..”.... ओ माझी रे, अपना किनारा, नदिया की धारा है...”...............

संपू नये असा वाटणारा हा बोटीचा प्रवास संपतो ते ट्रेक पायथ्याशी! वनखात्याची परवानगी मिळाल्यावर ट्रेक सुरु होतो! घनदाट जंगलातून  किल्ल्यावर पोहोचायला साधारण तीन तास तरी लागतात. अत्यंत चढाईचा ट्रेक आहे. खूप ठिकाणी झाडांची मुळे जमिनीवर पसरलेली आहेत त्यामुळे त्यात पाय अडकणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते. जंगलातली झाडे इतकी प्रचंड उंच आहेत कि उन्हाची तिरीप जमिनीवर पडत नाही. उंच उंच झाडांच्या सावलीत क्षणभर विसावण्याचा अनुभव आणि तिथल्या शांततेचा अनुभव हा समाधीवतचं!

मी हा ट्रेक तीन वेळा केला. पहिला ट्रेकडी सोबत आणि नंतरचे दोन एस. जी ट्रेकर्स सोबत! तिन्हीच्या आठवणी अनन्यसाधारण आहेत. ट्रेकडी सोबत गेले तेव्हा ट्रेकसाठी माझं शरीर तयार झालेलं नव्हतं. अनुभव नव्हता. त्यात रोजच्या व्यायामाचा अभाव. इतका दम लागत होता कि बस्स! कुठून आले ट्रेकला असं झालं होतं! लिंबू सरबताचा एक एक घोट पीत मी हा ट्रेक पूर्ण केला. ट्रेकडीच्या लीडरने खूप छान साथ केली! ह्याच ट्रेकला माझी आणि शिवची ओळख झाली आणि नंतर सतत ट्रेकिंग टीप्स देऊन त्याने माझी ती बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला! दुसऱ्यांदा मी ट्रेक केला तेव्हा मी ट्रेकचा आनंद घेतला आणि तिसरा ट्रेक मी चक्क ट्रेकिंग पोल/स्टीक न वापरता केला! आजही मला ती आठवण आली की विश्वास बसत नाही. ट्रेकिंग पोल/स्टीक शिवाय तोल सावरण आणि खास करून गुडघा जपणं माझ्यासाठी खूप जिकिरीचं होत असतं. पण शांतपणे, एकाग्रतेने, शरीराचा तोल सांभाळत केलेला हा तिसरा ट्रेक माझ्या आयुष्यातला एक सर्वोत्तम ट्रेक आहे. ह्या ट्रेकच्या वेळी प्रमिला, राहुल, विशाल आणि शिव ने दिलेली साथ आणि प्रोत्साहन आजही मनात कायमचं स्थान टिकवून आहे!


जंगल पार करून वर पोहोचल्यावर हनुमान आणि गणेशाची दगडात कोरलेली मूर्ती तुमचं स्वागत करते. एका बाजूला चालत गेल्यावर पाण्याचे तळे आहे, सिमेंट बनवण्यासाठी वापरला जाणारा चुन्याचा घाणा आहे आणि थोडे पुढे गेल्यावर बाबुकडा!
बाबुकडयाचा परिसर नितांत सुंदर आहे. नवीन आणि जुन्या वासोट्याचा हा सुंदर मिलाप! हरीश्चंद्रगडावरील कोकणकड्या पाठोपाठ दुसरा मोठा कडा! दरीतून येणारा थंडगार वारा, त्याचा वेग, आवाज आणि गंभीरता अवर्णनीय आहे. कड्याजवळ उभं राहून जो निसर्ग देखावा दिसतो त्याने डोळ्यांचं पारण फिटतं! चारही बाजूला डोंगर, घनदाट झाडी, खोलवर दरी आणि मधे साधारण “यु” आकारात उभा बाबुकडा! 


दुसऱ्या बाजूला एक बुरुज आहे आणि माची. जाताना महादेवाचे मंदिर लागते आणि पुढे गेल्यावर नागेश्वराचे शिखर दिसते!


वासोटा हा विखुरलेला आणि पसरलेला किल्ला आहे. वरचा भाग एक-दीड तासात पाहून होतो. घनदाट जंगलामुळे हा ट्रेक संध्याकाळच्या आत पूर्ण करावा लागतो.

परतीचा बोटीतला प्रवास ट्रेकचा शीण नाहीसा करतो! अस्ताला जाणारा सूर्य, मंद सूर्यकिरण, हलकासा थंडगार वारा आणि सायंप्रकाश! हेच दृष्य मनात साठवत ट्रेक पूर्ण झाल्यामुळे आनंद द्विगुणित होतो!
वासोटा हा एक विलोभनीय निसर्गसुंदर ट्रेक आहे. लेकच्या रम्य काठावर बसून सुंदरशी कविता लिहावी, सुबकसं चित्र रेखाटावं, सुरेखसं पुस्तक वाचावं किंवा स्वत:मधेचं रममाण व्हावं असं हे ठिकाण!


“मिशन कश्मीर” या चित्रपटात गीतकार समीरने लिहिलेलं एक सुंदर गीत आहे, ह्या ट्रेकमध्ये तेच गुणगुणावं वाटतं,

“चुपकेसे सून, इस पल की धून,
इस पल में जीवन सारा,
सपनोंकी है दुनिया यही,
मेरी आंखोन्से देखो जरा|
उज्ली जमिन, नीला गगन,
पानी पें बेह्ता शिकारा,
सपनोंकी है दुनिया यही,
तेरी आंखोन्से मैने देखा||”No comments: