ड्युक्स नोज, ३०० फुट रॅप्लिंग आणि ६० फुट व्हॅली क्रॉसिंग: ३ जून २०१७


एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक करून आल्यानंतर पर्वती एन्ड्युरन्स सराव सुरु केला. आता ट्रेक देखील सुरु करण्याचा विचार होता. एका छोट्या ट्रेक पासून सुरुवात करायची असा मांस होता. तब्येत अजून तितकीशी रिकव्हर झाली नव्हती. ट्रेकची सुरुवात आलेख प्रजापती ह्या माझ्या फ्रेंड पासून करायचा विचार होता. तो असोसियेटेड असलेल्या “आउटडोअर व्हेंचर्स” ह्या ट्रेकिंग ग्रुप ने “ड्युक्स नोज, ३०० फुट रॅप्लिंग आणि ६० फुट व्हॅली क्रॉसिंग” हा ट्रेक ठेवला होता. २८ तारखेला आलेखचा मेसेज आला. आलेख आणि माझ्यात हे ठरलं की मी फक्त सिम्पल ट्रेक करणार, नो रॅप्लिंग आणि नो व्हॅली क्रॉसिंग! त्या गोष्टी इतर करत असताना मी त्यांना फक्त ऑबझर्व्ह करणार! हा ट्रेक माझ्यासाठी पोस्ट ईबीसी वॉर्म-अप ट्रेक असणार होता!




३ तारखेला, सकाळी ७ वाजताच्या कोल्हापुर-पुणे एक्स्प्रेस ने आम्ही लोणावळ्यासाठी निघालो. अति संथ गतीने जाणारी एक्स्प्रेस मी प्रथम अनुभवली! पुणे स्टेशन वर कोकणे ब्रदर्स (जयवंत आणि मुकेश) आणि एक्सप्रेस मधे शिवाली सोबतच्या गप्पा छान रंगल्या.


लोणावळ्यात आम्ही जवळ जवळ ९ वाजता पोहोचलो. स्टेशनवर मावळ मेवा बघायला मिळाला. आलू, कमसर, गावठी आंबे आणि करवंद! 



लोणावळया वरून जीप ने कुरवंडे गाव गाठलं. तिथेच एका हॉटेल मध्ये नाश्ता करून ट्रेकला सुरुवात केली. हा ट्रेक मी आधी दोनवेळा केला होता. ते दोन्ही मार्ग वेगळे होते. आज आम्ही गेलो तो ट्रेकमार्ग वेगळा वाटला. चढाई तर होतीच पण पायऱ्या देखील होत्या. गेल्यावेळी गेलो तिथेच म्हणजे शंकराच्या मंदिराच्या इथे पोहचलो. 

ट्रेक करताना सह्याद्रीच्या मातीचा सुंगंध घेत होते! हिमालयातील धरतीला स्पर्श करून



ईबीसी ट्रेक नंतर आपल्या जन्म-कर्म भूमी सह्याद्रीच्या मातीला स्पर्श करण्यामागे काही औरचं आनंद जाणवला!

ट्रेकच्या पायथ्यापासून रॅप्लिंग आणि व्हॅली अत्यंत मनोहारी दिसत होते. “अपेक्स” नामक पुण्यातील ट्रेकिंग ग्रुपची मुले रॅप्लिंग करत होती! बापरे.....काय खतरनाक दृश्य दिसत होतं ते! अति प्रचंड उंचीचा पहाड. त्यावर उभी आणि रॅप्लिंग करणारी मुले-मुली, मुंगी इतकी छोटी वाटतं होती! तिथे उभे असणाऱ्या दोन मुलांनी मला विचारले, “ तुम्ही करणार आहात?” मी ठामपणे सांगितले “नाही, फक्त ऑबझर्व करणार”!.

गडावर गेल्यावर ह्याच ट्रेकिंग ग्रुपची मुले रॅप्लिंगसाठी तयार होत असताना मी बघत राहिले. रॅप्लिंगचा दोर कुठे बांधला आहे, रॅप्लिंगसाठी काय सूचना ते देत होते ते मी ऐकत होते.



इकडे निखील ने आमच्या ग्रुपला व्हॅली क्रॉसिंगबद्दल सूचना द्यायला सुरुवात केली. मी त्याचा हिस्सा उशिरा झाले. त्यामुळे त्या सूचना मला कळल्या नाहीत. आम्ही आधी व्हॅली क्रॉसिंग करणार होतो त्यानंतर रॅप्लिंग! निखील ने विचारलं, “ कोण प्रथमच  ह्या दोन्ही गोष्टी करणार आहे?” मी हात वर केला. त्याला क्लीअर केलं की “मी हे ह्यावेळी करणार नाहीये”. तो म्हणे, “करु शकाल मॅम तुम्ही”. आलेख ने ही दुजोरा दिला!" मी नाही करायचं ह्या गोष्टीवर ठाम होते.

तीन ग्रुप आले होते, आउटडोअर व्हेंचर्स, अपेक्स आणि एक्सप्लोरर! आमच्या ग्रुप मधे राहून त्यांनी व्हॅली क्रॉसिंग सुरु केलं. माझं सगळ चित्त ह्याकडे की हा दोर कुठे आणि कसा फिट केला आहे. मंदिराच्या जवळच्या एका दगडावर हूक्स ठोकून त्याला दोर बांधला होता, तिथून तो एका झाडाला आणि तिथून तो थेट व्हॅली क्रॉस करून असलेल्या डच प्लॅटयू वरील एका झाडाला! बापरे, ते बघून असं वाटतं होत, “काय आहे हे टेक्निक”!

आमच्या ग्रुप मधील मुला-मुलींना व्हॅली क्रॉसिंग करताना निरीक्षण करायला मी सुरुवात केली. हर्नेस (कंबर आणि मांड्यात घालायचा पट्टा) कसं कंबरेला फिट करतात, हूक्स कुठे अडकवतात आणि अॅॅक्च्युल व्हॅली क्रॉसिंग करताना काय टेक्निक वापरतात इ. निखील हर्नेस लावायला, हेल्मेट घालायला मुला-मुलींना मदत करत होता, व्हॅली क्रॉसिंग घडवून आणायचं काम सिद्धार्थ करत होता. 




निखील आणि सिद्धार्थला मी प्रश्न विचारत होते. ते दोघं मला टेक्निक एक्सप्लेन करत होते. एकदा का हर्नेस आणि हेल्मेट घालून व्हॅली क्रॉसिंग कोणी सज्ज झालं की सिद्धार्थ एक हुक त्याच्या-तिच्या हर्नेसमधे फिट करत होता. आता उतारावरून जिथे व्हॅली सुरु होते तिथपर्यंत घसरत जायचं आणि सिद्धार्थ “ओके” म्हणाला की व्हॅलीमध्ये स्वत:ला सोडून द्यायचं. मग सिद्धार्थ दोरी सोडत राहणार. जितक्या वेगाने तो दोरी/रोपं सोडणार तितक्या वेगाने व्हॅली क्रॉस केली जाणार! हे करताना एकचं गोष्ट करायची होती की हूक्स जे तुम्हाला व्हॅली क्रॉस करून देणार होते त्याच्या मधील पट्ट्याला पकडायचं होतं! व्हॅली क्रॉसिंगसाठी बांधलेल्या दोन्ही दोरखंडांना बिलकुल हात लावायचा नव्हता! 

मुला-मुलींचे फोटो-व्हिडीओ काढण्याचं काम मी करत होते. साधारण ५० ते ६० फुट अंतराचं व्हॅली क्रॉसिंग होतं. ते करायला साधारण एक मिनिटापेक्षाही कमी वेळ लागत होता! मनात कुठेतरी येतं होतं की एका क्षणाला हे सगळ करायला मला विचारलं जाणार आहे. एका पाठोपाठ एकाचं व्हॅली क्रॉसिंग मी न्ह्याहाळत होते. माझ्या लक्षात आलं होतं की व्हॅली क्रॉसिंग करून देण्यासाठी पूर्णत: सगळा कंट्रोल सिद्धार्थच्या हातात आहे आणि ते पूर्णत: सुरक्षित आहे!

आमचा जवळ जवळ २० जणांचा ग्रुप होता. एक एक जण व्हॅली क्रॉस करत होते. कोकणे ब्रदर्स मला मोटीव्हेट करत होते! वेळ जसा जात होता तसं तसा ते करून पाहण्याकडे माझा निर्णय झुकत होता. कारण माझी बुद्धी आणि माझं मन हे ग्वाही द्यायला लागलं होतं. शेवटचे दोन व्यक्ती बाकी राहिल्या आणि निखील ने प्रथम मला विचारलं. तोपर्यंत तो माझ्याकडे वळला देखील नव्हता. एका क्षणात मी म्हटलं, 
करते. "! 

हे म्हणताना मी माझ्या मनाचा -भाव-भावनांचा वेध घेत होते. मन शांत होतं, हृदय धडधडतं नव्हतं, कुठल्याही प्रकारची घबराहट नव्हती, हात थरथरत नव्हते, पाय लटपटत नव्हते. ही भावना मला पुढे एक पाऊल टाकायला मदत करणारी होती!

निखील आणि शिवालीने हर्नेस फिट करायला मदत केली. हेल्मेट चढवलं. सिद्धार्थने हुक मी चढवलेल्या हर्नेस मधे अडकवलं. निखीलला म्हटलं, “माझा व्हिडीओ काढा”. मला सूचना मिळाल्या. हुक मधला जो पट्टा मला पकडायचा होता त्याचे दोन्ही पट्टे दोन्ही हाताने न पकडता एक पट्टा एका हाताने आणि दुसरा दुसऱ्या हाताने पकडता येईल का हा मला प्रश्न पडला. सिद्धार्थ म्हणे, "तुम्ही पट्टा कसाही पकडा त्यावर काही नाही. फक्त ते फिट केलेले दोर पकडू नका”. आता मी घसरत व्हॅलीच्या तोंडाजवळ आले. आलेखला तिकडून खुणावलं. "फोटोसाठी रेडी हो". तो तर हवाच होता ना.....माझा पहिला प्रयत्न होता! त्याने रेडीचा इशारा केला. 

व्हॅलीच्या तोंडाजवळ आल्यावर मी पट्टा कसा पकडायचा त्याचा १-२ वेळा सराव केला. एकच विचार मनात होता कि तो पट्टा सेकंदभर धरून ठेवण्याची ताकद माझ्या हातात आहे का? मी अंदाज घेत होते. मागून मला सगळे मला सूचना देत होते, मोटिव्हेट करत होते. ‘खाली बघू नका, समोर बघा. खाली बघू नका. लटकायचयं तुम्हाला. सोडून दया व्हॅलीत स्वत:ला एकदम बिनधास्त”. मी ऐकत होते, पण मला थोडी शांतता हवी होती, माझा असा थोडा वेळ हवा होता. शेवटी मी क्षणभर डोळे बंद केले. दीर्घ श्वास घेतला. स्वत:चा मनाचा ठाव घेतला. याक्षणी देखील ते शांत होते, भीती नव्हती, हात-पाय लटपटतं नव्हते. बुद्धी-मन स्थिर होते! मला खात्री झाली आणि मी स्वत:ला व्हॅलीत सोडलं. ही एकचं गोष्ट होती जी माझ्या हातात होती! दरीत स्वत:ला अधांतरी सोडणं ही कल्पना भयावह नक्कीच होती. पण एकदा का स्वत:ला सोडून दिलं की आपण पूर्णत: सुरक्षित आहोत ह्याची कल्पना आली!




मी व्हॅलीच्या मध्यावर गेल्यावर दुसऱ्या बाजूने आवाज आले, “दोन्ही हात पसरवा”..पण मला ते जमलं नाही. पट्ट्यावरची माझी पकड मला सैल आणि सोडून देता आली नाही. हे मला जमलं नाही पण व्हॅली क्रॉस झाली होती! दुसऱ्या बाजूला उभे असेलेले आलेख आणि विभा एकदम खूष झाले! विशेषत: आलेखला झालेला आनंद आणि समाधानाची मी कल्पना करू शकले. त्याची खूप इच्छा होती “मी कराव” आणि “मी ते करू शकेन” ह्यावर त्याचा विश्वास होता!

माझ्या सारखं मनात येतं होतं की, एक मिनिटापेक्षा कमी वेळ घेऊन क्रॉस होणारी ही व्हॅली पण त्यासाठी मला जवळ जवळ २५-३० मिनिट स्वत:ला द्यावे लागले!

सर्वांच व्हॅली क्रॉसिंग यशस्वीरित्या पार पडलं होतं. आता रॅप्लिंग सुरु झालं होतं. कृष्णा आणि विकी रॅप्लिंग मॅनेज करत होते. आधी निखिलने एक डेमो दाखवला. सूचना दिल्या, “पायात खांद्या एवढे अंतर ठेवायचे आहे. गुडघे/पाय ताठ हवेत, पाठीला मागे रेलून जोर जायचा आहे. डाव्या हाताने एक दोर पकडायचा आहे आणि उजव्या  हाताने फीड करायचं आहे. फीड करायचं म्हणजे तो दोर हळूहळू सोडत जायचं त्यामुळे तुम्ही हळूहळू खाली जाता”. दोरीला फीड दिलेला कृष्णा आणि विकिला कळतं होता आणि त्यानुसार वेगाचा अंदाज घेऊन ते दोरी ढिली करत होते. समस्या अशी होती की रॅप्लिंग मला ऑबझर्व करता येत नव्हतं कारण दरीत खाली काय आहे हे दिसतचं नव्हतं! मी निखिलला विचारलं “किती फुट आहे अंतर आणि किती वेळ लागेल खाली उतरायला?” म्हणे, " साधारण ३०० फुट. वेळ व्यक्तीनुसार बदलेल पण साधारण ५-१० मिनिट”. त्यामुळे माझा निर्णय होत नव्हता. निम्म्यापेक्षा जास्त मुला-मुलींचं रॅप्लिंग करून झालं होतं. मी आणि कोकणे ब्रदर्स एका ठिकाणी बसून होतो. एका दुसऱ्या ग्रुपचे एक मुलगा-एक मुलगी तिथे होते. त्या मुलीने मला विचारलं, “तुम्ही करणार आहात?” म्हटलं, “नक्की नाही”. म्हणे, “ का विचारतेय कारण रॅप्लिंग तुम्ही कराल. जमलं नाही तर ते वरून तुम्हाला खाली सोडतील पण पुढे एक रॉक क्लायबिंग करायचा आहे. त्याला रोपं बांधला आहे पण तुम्हाला पुश कराव लागत. तुम्ही स्वत:ला पुश करू शकाल का ह्याचा विचार करा”..बापरे ही मला “न्यूजचं होती”! हे माहितचं नव्हतं. अचानक एक कल्पना सुचली. सकाळी मी पायथ्यावरून घेतलेला फोटो निखिलला दाखवला. म्हटलं, “ जिथे आत गुहेसारख आहे तिथे पाय ठेवायचे कुठे?” तो म्हणे, “लटका तिथे, काही प्रोब्लेम नाही”. त्यानंतर त्या रॉक क्लायबिंग बद्दल विचारलं. तो म्हणे, “ हा ते कराव लागणार आहे. दरीतून रस्ता नाही. पण तिथे सपोर्ट साठी दोर आहे.”. माझ्यासाठी ही दुसरी समस्या होती! “कराव की नाही” हे द्वंद्व मनात सुरु होतं. त्यात खोल दरी मुळे त्या टेक्निकचं मी निरीक्षण करू शकत नव्हते. मनातलं द्वंद्व मिटवण्यासाठी मी ट्रेकिंग मधले रॅॅप्लिंग केलेले सहकारी, राहुल आणि मिलिंदला डोळ्यासमोर आणलं. त्यांनी सांदण दरी रॅप्लिंग चा त्यांचा अनुभव मला सांगितला होता. ते म्हणाले होते, "जमेल मॅॅडम तुम्हाला, अवघड नाही, पुरी सेफ्टी असते. तुम्हाला नाहीचं जमलं तर ते तुम्हाला रोपं ने खाली सोडू शकतात". तेव्हा ते काय म्हणत होते ते मी डोळ्यासमोर आणू शकत नव्हते पण आज हे टेक्निक पाहिल्यावर मला त्यांच्या म्हणण्याचा अर्थ लागला. दुसरे प्रोत्साहन माझ्या डोळ्यासमोर होतं, खुद्द निखील, विकी आणि भूषण! ज्यांनी नुकतचं कोकणकडा क्लायबिंग केलं होतं. ह्या दोन गोष्टींनी हे साहस करण्याचा निर्णय घेण्यास मला मदत केली. 

माझ्या बरोबर समांतर अंतरावर जयवंत कोकणे रॅप्लिंग करणार होता. जयवंत म्हणे, “मी आहे, चला”. मी हर्नेस परत चढवलं. हेल्मेट घातलं, ग्लोव्हज चढवले. कृष्णाने सूचना दिल्या, “डाव्या हाताने दोर फक्त पकडायचा आहे आणि उजव्या हाताने फीड करायचं आहे.” त्याने पायात अंतर घ्यायला सांगितले. ती पण पोझ घेतली. पण त्या ग्लोव्हज ने मला ग्रीप मिळत नाही असं मला वाटतं होतं. मी खूप वेळा ते बोलून दाखवलं. निखील म्हणे, “ग्लोव्हज दिलेत तुमच्या हाताच्या सुरक्षीततेसाठी. रोपं हाताला घासू नये म्हणून. ग्रीपचा आणि तुम्ही खाली जाण्याचा तसा संबंध काही नाही”. मग त्याला आणि कृष्णाला काय वाटलं कुणास ठाऊक त्यांनी माझ्या हर्नेसला अजून एक हुक अडकवला. बहुधा माझे वय लक्षात घेऊन त्यांनी मला डबल प्रोटेक्शन दिले जेणेकरून गरज पडलीचं तर ते मला विनासायास खाली सोडू शकतील.  




माझी पोझ एकदम ओके होती. निखील आणि कृष्णा म्हणे, “एकदम परफेक्ट”. पायातलं अंतर, रोपं पकडण्याची पोझिशन आणि मागे झुकणे. एकदम जमलं होतं मला. मी हळूहळू खाली उतरले. कसं कुणास ठाऊक मला ते जमतं होतं. रॉकवर पाय रोवणे, उजव्या हाताने फीड देणे इ. मी एकदम एकाग्रतेने करत होते. मला प्रोत्साहन देण्याचे खूप आवाज येत होते, “वेल डन, यु आर डुइंग व्हेरी वेल”. आवाज खालून येत होते की वरून हे मला कळत नव्हतं. जवळ जवळ २३० फुटापर्यंत मी बऱ्यापैकी व्यवस्थित गेले होते. अचानक काय झालं कुणास ठाऊक फीड जरा वेगाने होऊ लागलं त्यामुळे दोन वेळा मी स्वत:भोवती फिरले, खुपदा माझ्या उजव्या बाजूला झुकत होते आणि नंतर रॉक वर पाय ठेवणं अवघड होऊ लागलं. मला आवाज आला, “मॅडम थोडा वेळ स्टेबल व्हा”. मी वेगावर कंट्रोल प्रयत्न करून देखील जमेना. मी आपली झुलत होते. हा अजस्त्र पाषाण असा ओबडधोबड आहे. कुठे फुगीर तर कुठे खोलवर आत गेलेल्या खाचा! त्यामुळे त्या पाषाणावर पाय रोवून  रॅप्लिंग करण, स्वत:ला आणि वेगळा नियंत्रित ठेवणं जिकिरीच होतं. बहुधा हे तंत्रज्ञान शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकायला हवं! कदाचित फीड करणं आणि वरचा रोप सुटणं ह्याचं कोऑर्डीनेशन जमायला हवं! मी हे देखील शिकले कि रॅप्लिंग करताना तुम्ही जितकं एकाग्र असायला हवं तितकचं सतर्क देखील. पाषाणाला झाडाच्या फांद्या नाहीत ना इ. सारख्या गोष्टी नोटीस करायला हव्यात, तसेच हायपर न होता एकदम शांत चित्ताने, न घाबरता, एक वेग पकडून, हर्नेसवर पूर्ण पकड देऊन, पायांची हालचाल करून पाय दगडावर रोवायला हवेत. असो. 

आता भूषण मला स्पष्ट आणि अगदी जवळ दिसून आला. मी जवळ जवळ दरी उतरायला आले होते. शेवटी शेवटी फक्त लटकले आणि खाली आले. विश्वासचं बसत नव्हता की मी असलं काहीतरी साहस केलयं. मी पहिल्यांदा रॅप्लिंग केलं होतं. माझ्या कडून कौशल्यपूर्ण रॅप्लिंग अपेक्षित नव्हतचं. पण मला मी इतका वेळ म्हणजे साधारण ३०० फिट खाली येईपर्यंत स्वत:ला आव्हान देऊ शकले हेचं मला नवल वाटतं होतं. ते करताना मी हे विसरले होते की मी काही केलं नाही तरी मी खाली येऊ शकते. कृष्णा मला खाली सोडू शकतो. पण मी खूप चांगला प्रयत्न केला होता. स्वत:ला घेतलेलं आव्हान पेललं होतं. हे सगळं करत असताना, मी गोल फिरले, उजवीकडे हेलकावे खात होते आणि तरीही मला जाणवत होतं की मी सुरक्षित आहे. मी खाली पडणार नाही किंवा मला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही! सुरक्षा अजून एका गोष्टीने वाढली होती ती म्हणजे, वॉकी-टॉकी फोन! एक फोन वर निखील कडे होता तर दुसरा व्हॅलीत खाली असणाऱ्या भूषण कडे! त्यामुळे कम्युनिकेशन सहज होत होतं आणि परिस्थितीचा अंदाज /आढावा सुलभतेने एकमेकांना मिळत होता!

भूषणने मला थोडावेळ एका जागी बसून स्थिर व्हायला सांगितले. आता वेळ होती रॉक क्लायबिंगची. मी तो  रॉक बघितला आणि हादरलेच. जेवढे अंतर मी रॅप्लिंग करून आले होते जवळ जवळ तेवढचं अंतराचा (फुट वाईज) तो रॉक क्लायबिंग होता! भयानक अजस्त्र, ओबडधोबड आणि कमालीचा ऊंच! सुरुवातीलाचं एक पसरट रॉक पॅच होता. त्याला ग्रीप बसणं केवळ अशक्य होतं. कोणाच्या तरी मदतीनेचं ते शक्य होतं. आता जयवंत आणि मुकेश वरून खाली माझ्या मदतीला आले. समस्या अशी झाली होती की रोपं काढून घेतला गेला होता. शिडी पण होती वाटतं ती पण काढल्या गेली होती. त्यामुळे आधाराला काहीचं नव्हतं. भूषण, आणि कोकणे ब्रदर्स ने गाईड केलं. कुठे पाय ठेवायचा, कुठे स्वत:चे शरीर वर उचलायचे ह्याबद्दल ते सूचना देत होते. कोकणे ब्रदर्स ने वरून हाताचा आधार दिला, मी स्वत:ला थोड पुश केलं आणि पहिला पॅच पार झाला.

आता दुसरा एक अवघड पॅच होता. एकीकडे इतका प्रचंड मोठा पसरट खडक की त्यावरून चढण केवळ अशक्य होतं. दुसरीकडे खडकांमधील खोल अंतर. थोडा पाय घसरला की थेट खाली दरीतचं. बापरे! व्हॅली क्रॉसिंग आणि रॅप्लिंग पेंक्षा कितीतरी पटीने हे रॉक क्लायबिंग प्राणघातक वाटतं होतं मला. कोकणे ब्रदर्स मला धीर देत होते. त्यांनी परत मला गाईड केलं. एका ठिकाणी तर दोन खडकांच्या फटीतून (भुयारचं ते )घसरत वर जावं लागलं. 



कोकणे ब्रदर्सच्या मदतीने माझा दुसरा पॅच देखील पार झाला. ते दोघेही खूष झाले. “संपल” म्हणाल्यावर आम्ही तिघांनी तो क्षण एन्जाॅय केला. त्यानंतर काही क्षण स्वस्थ होऊन पुढचा टप्पा पार केला.




वर पोहोचल्यावर आलेख, निखील दोघांनीही कौतुक केलं. सर्वांना म्हटलं, “एकाचं ट्रेक मध्ये काय काय झालं आज, ट्रेक, व्हॅली क्रॉसिंग, रॅप्लिंग आणि रॉक क्लायबिंग! ते ही साध सुधं नाही! ६० फुटाचं व्हॅली क्रॉसिंग, ३०० फुटाचं रॅप्लिंग आणि जवळ जवळ तेवढीच फुट उंची असणाऱ्या रॉकचं क्लायबिंग! बापरे ....आणि हे सर्व एका काकूंकडून! (ह्या ट्रेकमध्ये बरेच जण मला काकू म्हणत होते).

एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक केला म्हणून मी हे करू शकले असा कृपया गैरसमज करून घेऊ नका. दोन्हीचा काहीही संबंध नाही! रादर ईबीसी करण्यामागे तो टेक्निकल नाही हे एक मुख्य कारण होतं!

खरंतर रॅप्लिंग चा हा सिलसिला गेली सहा महिन्यापासून चालू आहे. याआधी दोनवेळा सांदण व्हॅली बद्दल आलेख ने मला विचारलं होतं. पण रॅप्लिंग आहे म्हणून मी तयार होत नव्हते, "मी अजून रेडी नाही" असं माझं उत्तर असायचं. एका ग्रुपला मी विचारलं होतं, " मी फक्त  ऑबझर्व्ह करेन चालेल का?" त्यांनी मला फिरून फोन केला नाही. मागच्या वेळी आलेख ने तेलबैला रॅप्लिंगबद्दल विचारलं. माझं उत्तर तेच, " मी रेडी नाही" पण मी त्याला ते विचारल की "मी फक्त ऑबझर्व्ह करू शकते का?" त्यांने होकारार्थी उत्तर दिलं पण काही कारणाने तो ट्रेक झाला नाही. ह्यावेळी देखील मी फक्त ऑबझर्व्ह करणार ह्या बोलीवरचं मी ट्रेकला गेले होते. ह्या ग्रुपने माझ्या ऑबझर्व्ह करण्याला संमती दिली ही माझ्यासाठी खूप मोठी बाब होती. कदाचित बारकाईने निरीक्षण केल्याने निर्णयासाठी आणि हे साहस करण्याची हिमंत दिली! 

३०० फुट रॅप्लिंग, ५०-६० फुट व्हॅली क्रॉसिंग करून झाल्यावर माझ्या नक्की भावना काय आहेत ह्याचा विचार अजूनही मी करत आहे. सहा महिने मी वेळ घेतला, तेव्हा आतला आवाज "नाही" सांगत होता, "मी रेडी नाही" यावर मी ठाम होते. आज? ह्याच "नाही" चं रुपांतर "हो" मध्ये झालं होतं. पण अर्थात त्यासाठी सहा महिने वेळ लागला होता! 

हे सर्व नक्की कसं झालं माहित नाही पण ट्रेकिंग तंत्रज्ञानात एक पाऊल पुढे नक्कीचं पडलं! हे पाऊल कौशल्यपूर्ण नव्हतं पण त्याने जो आत्मविश्वास दिला, नवीन तंत्रज्ञानाची जी ओळख करून दिली त्याने पुढचं पाऊल घट्ट रोवण्यासाठी नक्कीच मदत होईल!

ट्रेकिंग क्षेत्रातील हे पुढचं पाऊल पडू शकलं ते आलेख, निखील, सिद्धार्थ, कृष्णा, भूषण ह्या मुलांमुळे आणि ट्रेक समीट झाला तो मात्र कोकणे ब्रदर्स मुळे! कोकणे ब्रदर्स ने ट्रेकच्या सुरुवातीपासून ते तो यशस्वीरीत्या पूर्ण होईपर्यंत मला साथ केली!  

एक नवीन ट्रेकिंग ग्रुप, नवीन ट्रेक लीडर्स, नवीन ट्रेक सहकारी, नवीन तंत्रज्ञान, नवीन कौशल्य....

कोकणकडा क्लायबिंग केलेले निखील, विकी आणि भूषण ह्याची ओळख ही जास्त अभिमानास्पद होती! हे सगळेजण टेक्निकली किती साऊंड आहेत ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला!

ट्रेक संपला, कुरवंडे गावातील हॉटेलमध्ये जेवलो आणि लोणावळावरून लोकलने साधारण रात्री ८ वाजता पुण्यात आलो.

आलेखने विचारल, “कसं वाटतयं मॅम? तुम्ही फक्त ट्रेक करणार म्हणून आला होता पण तुम्ही सर्व काही केलंत”. काय उत्तर द्यावं तेच कळेना. 

हा ट्रेक म्हणजे एक खडतर निर्णय प्रक्रिया होती, बुद्धी आणि मन-भावना ह्याची जुगलबंदी होती आणि स्वत:वरच्या आणि तंत्रज्ञानावरच्या विश्वासाची परीक्षा होती! 










No comments: