...आणि मा. एव्हरेस्ट प्रदक्षिणा पूर्ण झाली!

कळसुबाई ट्रेक विथ मिस्टेरिअस रेंजर्स, २४-२५ जून २०१७


कळसुबाई शिखर! दीड वर्षानंतर (१९ डिसेंबर २०१५) पुन्हा एकदा खुणावत होतं! एक वेगळा उद्देश साथीला घेऊन!हिवाळा ऋतू, नाईट ट्रेक, महाराष्ट्राचे “मा. एव्हरेस्ट” बघण्याची उत्सुकता, गुरुदासची साथ, टॉर्चच्या प्रकाशात चढलेल्या शिड्या, शेवटीशेवटी संपलेला स्टॅमीना, शिखरावरून दिसणारा सूर्योदय, आलेखची साथ, पहाटेच्या थंड वाऱ्याची हुडहुडी, कळसुबाई मातेचे दर्शन, रवींद्र इनामदार ने काढलेला माझा सुंदरसा फोटो, “वेल डन मॅडम” म्हणतं विशालने केलेले हस्तांदोलन, साहस आणि भक्तीचा अनोखा संगम आणि जगाच्या “मा. एव्हरेस्ट” दर्शनाची अभिलाषा! आठवणींची ही शिदोरी घेऊन पुन्हा एकदा ह्या ट्रेकला आले होते!

पावसाळा ऋतू, दिवसाचा ट्रेक, टीपटीप बरसणारा पाऊस आणि स्वत:मधील क्षमतांना तपासून पाहण्याची मनीषा!

सकाळी सहा वाजता ट्रेक सुरु केला. पावसाने नुकतीच उघडीप दिली होती. सकाळचा मंद गार वारा, सूर्यावर काळ्या नभांचे अधिराज्य, हिरवाईने नटलेली धरती, पाण्याने भरलेली भात खेचरे, डोंगरावर अलगद सावरलेले मेघ, पक्षांचा किलबिलाट, डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि दूर उंचावर दिसणारे कळसुबाई शिखर! दिवसा ट्रेकचे डोळासुख काही औरच नाही!
दोन्ही बाजूला भात शेते आणि चिखलाने माखलेल्या गवताने ग्रासलेल्या शेताच्या अरुंद बांध्यावरून जाताना खूप हळूवार पाऊले टाकत होते. 
खळाळणारा ओढा पार केला आणि चढण सुरु झाली. चढाईवर चिखलाने निसरडं झालं होतं. चिखल मिश्रित गढूळ पाण्याचे ओहोळ वाहत होते. चढाईवर काही ठिकाणी दगडी पायऱ्यांवरूनही पाणी वाहत होते.

पाऊस, चिखल, घसरडं, चिकचिक, पाण्याने वाहणारे ओढे, झरे, हलकासा गारठा इ. गोष्टी पावसाळा म्हटल्या की आल्याचं. स्लीप होण्यापासून स्वत:ला बचावण्यासाठी नेहमीचे अॅक्शनचे शूज न घालता केचुआचे FORCLAZ 500 शूज घातले होते. त्याची चांगली ग्रीप मिळत होती आणि ट्रेकिंग स्टीकचा आधार होताचं!

पहिली चढण चढून गेल्यावर शिखराच्या पायथ्याशी कळसूबाई मातेचं मंदिर आणि मातेला अर्पण निधीतून उभारलेले प्रवेशद्वार लागले!

नांगरलेल्या शेतातून चालत आल्याने शूजवर चिखलाचा थर साठला होता. शूज जाम जड झाले होते. डबक्यातील गढूळ पाण्यात शूज बुचकाळून घेतला आणि चिखल कमी होऊन शूजचा जडपणा किंचित कमी झाला.

आता रिमझिम पाऊस सुरु झाला होता. एक एक चढाई पार करत चालले होते. काही ठिकाणी हाताच्या आधाराने चढावे लागल्याने हात चिखलाने भरले होते. आतापर्यंत पॅन्ट, जॅकेट, हात चिखलाने माखले होते. पाण्याने भरलेला डबका किंवा ओहोळ दिसला की हात स्वच्छ करत ट्रेक करण्याचा उपक्रम चालू होता.

एक चढण पूर्ण झाली की छोटे पठार लागत होते आणि पठारावरून आजूबाजूचा निसर्ग अफलातून दिसत होता. डोंगरात पहुडलेले गाव, कौलारू घरे, पाण्याने भरलेली हिरवीगार भात खेचरे, भंडारदरा धरणाचा जलाशय...हळूहळू टीपक्याएवढे दिसू लागले होते.

काही दगडी पायऱ्या पार केल्या आणि पहिली लोखंडी शिडी आली. अलीकडेचं ती रंगवलेली असावी. एका वेळी ४-५ ट्रेकर्सचं शिडी चढून जात होते. ट्रेकर्सचे लोंढेच्या लोंढे आल्याने आणि सूरक्षेच्या दृष्टीने वाट पहावी लागत होती. शिडीवरून एकतर चढावे लागत होते नाहीतर उतरावे लागत होते. दोन्ही करणे धोक्यादायक होते. शूज घसरड्या चिखलाने भरलेले होते त्यामुळे शिडी चढताना काळजी घ्यावी लागत होती. ५०-६० लोखंडी गजयुक्त ही शिडी चढताना खालची दगडी कपार आणि त्यावरून वाहणारे पाणी थोडी भीती निर्माण करत होते. शिडीच्या कडा वरच्या बाजूला असल्याने पाय त्या कडेवर ठेवावा लागत होता आणि तो सपाट लोखंडी बार नसल्याने दोन्ही बाजूच्या गजांचा हाताने आधार घेत एक एक लोखंडी बार एकाग्रतेने चढावा लागत होता. त्यात पावसाने हे लोखंडीबार ओले झाले होते आणि त्यावरून चिखलाने भरलेल्या शूज ची ग्रीप बसली नाही तर पाय सटकण्याची शक्यता जास्त होती! दोन्ही बाजूचे लोखंडी गज देखील पाण्याने ओले झाले होते, पाऊस सुरु असल्याने त्यावरून पाणी वाहत होते. आधाराचा हात घसरत होता आणि हाताची घट्ट पकड मिळत नव्हती! एकाच वेळी पाय घट्ट रोवण्यासाठी आणि हाताची पकड घट्ट बसण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. कौशल्यपूर्णतेने मी शिडी पार केली. शिडी पार करून करून गेल्यावर लक्षात आले मी खूप सराईतपणे, विनाघबराट शिडी पार केली होती!

थोडं चढून गेल्यावर दुसरी शिडी लागली. ही चांगलीच मोठी आणि वळणदार शिडी होती. हिला शंभराहून जास्त आडवे लोखंडी गज असतील. ट्रेकर्स ची प्रचंड गर्दी, चढण्या-उतरण्यासाठी रांगेत खडे असलेले ट्रेकर्स, गज आणि दगडी कपारीवरून उडया मारणारी माकडे, पाऊस, कपारीतून वाहणारे पाणी यामुळे ही शिडी चढणे आव्हान होते. संपूर्ण एकाग्रतेचा कसं लागला. लक्ष एकवटून शिडी चढावी लागल्याने मानसिक थकवा आल्यासारखं वाटलं. शिडी पार झाली, “हुश्श” झालं आणि लक्षात आलं वरून पावसाने शरीर ओलं झालं असलं तरी आतून घामाने भिजलेलं होतं!  इथून पुढे जवळ जवळ दीड तासाचा ट्रेक राहिला होता. साधारण १३०० मीटर उंचावर आलेलो. पाऊस बरसत होता, ढगांनी गाव आच्छादले गेले होते, काही ठिकाणी ढगांचे छोटे छोटे पुंजके तर काही ठिकाणी एकाच पसरट ढगाची चादर तर काही ठिकाणी वाऱ्यासोबत हळूवार मार्गक्रमण करणाऱ्या ढगांची रांग! नजर खिळवून ठेवणारा आसमंत आणि निसर्ग!

वाटेत भेटणाऱ्या ट्रेकर्स सोबत निसर्गाची स्तुती, एक स्मितहास्य, एक कुतूहल, एक कौतुक सोबतीला घेऊन पुढचा ट्रेक सुरु होता. हळूहळू शिखर नजरेच्या टप्प्यात येऊ लागले. आता शेवटची शिडी लागली. इथे शिखरावरून येणाऱ्या ट्रेकर्सची इतकी प्रचंड गर्दी झाली होती की तासनतास वाट पहावी लागणार होती. पर्याय नव्हता. दोन रांगा झाल्या, शिडी चढणारे आणि उतरणारे! मला तर स्टीक कोणाला लागणार नाही ह्याची सतत काळजी घ्यावी लागत होती. आता दोन्ही हात एकाच लोखंडी गजावर ठेऊन एक एक पायरी चढावी लागत होती. खरंतर लोखंडी आडव्या गजाच्या मधोमध पाय ठेऊन चढणं हे समतोलपणाच्या दृष्टीने योग्य पाऊल. पण नाविलाज होता. ट्रेकर्सचा प्रचंड लोंढा. उतरणारा गजाच्या एका कडेला आणि चढणारा एका कडेला! मी पुन्हा त्याच एकाग्रतेने एका दमात शिडी चढले आणि वर उभा असलेला प्रवीण म्हणे, “मॅडम, एकदम नॉन स्टॉप हा”! त्याच्या कौतुकाच्या शब्दाने मी पण खूष झाले!

ह्या टप्प्यावर आधीच्या ट्रेकला माझा स्टॅमीना संपला होता, शरीराचा तोल जात होता. विशाल पुढे, मागे आलेख आणि मधे मी असा हा टप्पा पूर्ण केला होता आणि शिखर समीट झालं तेव्हा मी म्हटल होतं , राजा, इथे माझा एक फोटो काढ. हा क्षण मला कायमचा स्मरणात राहयला हवा आहे. मी परत कळसूबाई ट्रेक करेन असं मला वाटतं नाही..

आज मी पुन्हा एकदा शिखर समीट केलं होतं! शिखरपूर्ती आणि उद्देशपूर्तीचा द्विगुणीत आनंद मी अनुभवतं होते!शिखरावरून नजारा अलौलिक आणि विलोभनीय दिसत होता! सर्वत्र हिरवेगार वस्त्र नेसलेली निसर्ग देवता आणि ह्या हिरव्यागार वस्त्रावर पांढऱ्या ढगांचे बुट्टेदार नक्षीकाम! पर्जन्यऋतू हाच त्याचा कारागीर आणि तोच त्याचा चित्रकार!
शिखरावर गार वारा सुटला होता. ओल्याचिंब शरीराला त्या गार वाऱ्याने हुडहुडी भरली होती. हात गार पडले होते. शूजमधे पाणी साठल्याने पायाची बोटे बधीर होऊन त्यांना वाम आला होता. थंडीमुळे शूजमधलं पाणी काढायला मन धजावत नव्हतं. कुडकुडत होतो पण तिथून पाऊल उचलतं नव्हतं! कळसुबाई माता आणि पर्जन्य देवता यांची गाठभेट कृतार्थ करणारी होती!

आईची आठवण म्हणून याहीवेळी मी ओटीचं सामान सोबत घेतलं होतं! कळसुबाई देवीचं दर्शन घेतलं आणि देवीसमोर ओटी ठेवली!
ट्रेक परतीचा प्रवास सुरु झाला. येणाऱ्यांची गर्दी सुरूचं होती! पहिली शिडी उतरताना अत्यंत हळूहळू उतरले कारण थंडीमुळे शरीर कुडकुडत होते आणि शूजमधल्या पाण्याने बोटे बधीर झालेली होती. ही शिडी उतरल्यावर थंडी थोडी कमी झाली. पाऊसानेही थोडी उघडीप दिली होती.

उतराई जिकिरीची झाली होती. चिखल, घसरण वाचवत कुठे दगडावर पाय स्थिरावत जाता येईल अशी कसरत सुरु होती. अजिबात घाई न करता, शांत चित्ताने, संपूर्ण एकाग्रतेने शिड्या उतरल्या आणि संपूर्ण उतरण पार केली. हे करताना मी घातलेल्या शूज मुळे मिळालेल्या ग्रीपचा फारचं उपयोग झाला असे वाटले!

मला पाहिल्या पाहिल्या शिव म्हणे, “लवकर आलात की मॅडम तुम्ही”! माझा उद्देश सफल झाल्याची पावती मला मिळाली होती!

बेस व्हिलेजच्या मंदिरापाशी आल्यावर उद्दिष्टपूर्तीसाठी देवीचे मनोमन आभार मानले. हो, पहिला ट्रेकच्या वेळी जगातील “मा. एव्हरेस्ट” दर्शनाची इच्छा निर्माण झाली होती. ती इच्छा बाळगून महाराष्ट्राचे “मा. एव्हरेस्ट” बघावे ह्या उद्देशाने मी पहिला कळसुबाई ट्रेक केला होता!. २ मे २०१७ रोजी हिमालयातील “मा. एव्हरेस्ट” शिखराचे दर्शन झाले! आज ट्रेक समीट झाल्यावर “मा. एव्हरेस्ट” प्रदक्षिणा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असे वाटले! त्या ट्रेकसाठी केलेल्या एन्ड्युरन्स सरावाचा काय परिणाम झालाय ते पडताळून पाहण्याचा एक वेगळा उद्देश मनात धरून आजचा हा ट्रेक केला होता!

पहिल्या ट्रेकच्या तुलनेत बराच फरक मी अनुभवला,

·  --  ------समीट पर्यंत स्टॅमीना कायम होता. रादर यावेळी थकायला, दमायला झाले नाही.
  एनर्जी बरकरार होती! खूप सहजतेने ट्रेक समीट करू शकले.

       ---------यावेळी शरीराचा तोल छान पैकी सांभाळता आला. शिड्या चढताना-उतरतानाच नव्हे तर शिखराच्या उतराईवर पण देखील माझे माझ्याचं हे लक्षात आले.

·     ------------ यावेळी विनाआधार, स्वतंत्रपणे पूर्ण ट्रेक करू शकले.

· ------------ चालण्याच्या आणि उतरण्याच्या गतीत ही वाढ झाल्यासारखी वाटली. थोडक्यात दम लागणे आणि त्यामुळे थांबण्याचे प्रमाण कमी झाल्याचे लक्षात आले.

    -------------गुडघा, कंबर इ. इजा तर होणार नाही ना हा विचार सतत मनात असायचा यावेळी त्याची तीव्रता कमी झाली आहे असं वाटलं.

हे सर्व बदल खूप समाधान देणारे आणि एन्ड्युरन्स सराव चालू ठेवण्यास पुष्टी देणारे होते!

पहिल्या आणि दुसऱ्या ट्रेकच्या आठवणीत असतानाचं जेव्हा अनपेक्षितरित्या विशालची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा आनंदाला पारावार राहिला नाही! असो.

“मिस्टेरिअस रेंजर्स” या ट्रेकिंग ग्रुप बरोबरचा हा ट्रेक माझ्यासाठी एका दृष्टीने खास होता! माझ्या पन्नास वर्षाची सुरुवात महाराष्ट्राच्या कळसुबाई शिखरट्रेक ने झाली होती आणि ज्याने मला ट्रेकिंगचे टेक्निकल धडे दिले त्या शिव सोबत वर्षाची सुरुवात झाली होती!

सुरेंद्र आणि प्रवीण ह्यांच्याशी ट्रेकमधे अधिक संवाद करता आला. ५० पार्टीसिपंट्स, कितीतरी फर्स्ट टाईम ट्रेकर, त्यात पाऊस, घसरडं, तीन मोठ्या शिड्या, ट्रेकर्सची प्रचंड गर्दी हे सगळं ह्यांनी खूप छान आणि स्मूथली मॅनेज केलं. थोड्या थोड्या अंतरावर थांबणे, पार्टीसिपंट काउंट घेणे, वॉकी-टॉकी मार्फत एकमेकांच्या संपर्कात राहणे ह्या सगळ्या गोष्टी खूप छान जुळून आल्या होत्या!

अनुजा, व्यंकटेश, रवी ह्यांची ह्या ट्रेकमधे ओळख झाली. मला सुखद धक्का होता जेव्हा एक मुलाने माझे ब्लॉग वाचत असल्याचा उल्लेख केला आणि अनुजाने “रजोनिवृत्तीचा काळ ट्रेकिंगचा” या ब्लॉगची स्तुती केली!

एका मुलीने (नाव विसरले) मी काय व्यायाम करते, ट्रेकिंग कधीपासून करते, ट्रेकिंगची आवड कशी निर्माण झाली, कुटुंबाचा सपोर्ट इ. बद्दल विचारले. 

प्रियांका, तन्मोय आणि प्रिती, त्यांच्या फ्रेंड्स नताशा आणि लावण्यासोबत मला ट्रेकला जॉइन झाल्या होत्या त्यामुळे धमाल आली!एन्ड्युरन्स सरावामुळे स्वत:मध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलाचा अनुभव आल्याने ट्रेक वरून परतताना मी खुपचं समाधानी होते!

मागील काही वर्षात न केलेले काही ट्रेक्स करण्याचा आत्मविश्वास आता आलाय आणि मनाची “नाही” ही हाक “हो” मधे बदलत आहे!

ह्या रुपांतरीत “हो” मुळे कोणते ट्रेक्स माझ्या ओंजळीत येतात ते बघुयात!


फोटो आभार: सागर, नरेंद्र, प्रियांका, प्रीती आणि ट्रेक टीम

कळसुबाई ट्रेक: १९ डिसेंबर २०१५
ब्लॉग लिंक:
https://savitakanade.blogspot.com/2016/07/blog-post_29.html

No comments: