ओढ....आकर्षण.....
कधी, कसे निर्माण झाले कुणास ठाऊक. त्याच्या वरचे लेख,
ब्लॉग, वर्णन, अनुभव वाचत होते. फोटो आणि व्हिडीओ पाहत होते. तितकीच गुंतत गेले.
ओढ तितकीच तीव्र झाली...
ओढ! भेट झाली नाही तोपर्यंत जीवाची नुसती घालमेल..अस्वस्थता!
त्या अस्वस्थतेशी सामना करणं महाकठीण! प्रतीक्षा हेच उत्तर जणू!
एखाद्या निर्जीव गोष्टीची इतकी तीव्र ओढ असू शकते का? का
आहे ही ओढ? भेटीचे फलित असे काय असणार आहे? विचारांचा नुसता कल्लोळ....
चार वर्ष सरली..
संयम. योग्य वेळेची प्रतीक्षा! आकर्षणात नसतं बहुतेक.
उतावीळपणा नव्हताच! जे वाटत होते ते वरंवरचं नव्हतं. बाह्यस्पर्शी नव्हतं.
ओढ च ती! संयम, अंत:स्पर्शी, खोल, गहन आणि मनसुखद!
नेत्रसुखद म्हणावं तर दूर झाली असती ओझल होण्याची शक्यता!
१६ फेब्रुवारी २०२०. सह्याद्रीमधील भटकंतीने त्याची भेट घडवलीच!
प्रथम दर्शन! थोडं दुरूनच! आत्यंतिक प्रबळ, भावना उत्कट
करणारी प्रथम भेट! आजूबाजूच्या असंख्य डोंगररांगांना चिरत तो डोळ्यात सामावला.
सह्याद्रीतील एक अजब-गजब निसर्गाविष्कार! भौगोलिक आश्चर्यच
म्हणा ना.....
तैलबैला! किल्ला नव्हे बरं का. "बैलतळ" नावाने
इतिहासात उल्लेख आढळतो. प्राचीन व्यापारी घाटवाटांवर टेहळणी करण्याचे ठिकाण! अफाट,
अजस्त्र कातळभिंती. एका भेगेमुळे दुभागलेल्या तरीही जोडलेल्या!
घनगडावरून दिसलेले त्याचे विहंगम दृश्य! बघतच रहावे असे
राजबिंडे, बलदंड, आधारवट रूप.....
ओढ.....तैलबैलाच्या पायथ्याशी जाण्याची! पदस्पर्श करण्याची!
गाडी घनगडावरून निघाली. तैलबैला गाव जवळ येऊ लागले. कातळभिंतीची
अजस्त्रता, भव्यता अधिकच गडद झाली.
तैलबैलाच्या पायथ्याशी गाडी लावली. चढण चढायला सुरु केली.
अवघड नव्हती चढण. धीम्या पावलांनी चढायला घेतलं तरी फारतर अर्धा तास! युवापिढी तर
दहा मिनिटात माथ्यावर जाईल.
धापा टाकत टाकत मी माथ्यावर आले. भिंतीचे प्रथम दर्शनी अवाढव्य
रूप पाहून स्तब्ध झाले. पाय थबकले. डोळे विस्फारले. नजर फोफावली. नव्वद अंशात मान
मागे झुकली. भुवया उंचावल्या. तोंडाचा "आ" रग लागेपर्यंत फाकला. छातीत
धडधडले....
ओढ....हेच ते सगुण-निर्गुण रूप पाहण्याची!
ती अवाढव्य, अजस्त्र, काळीकभिन्न, कातळ भिंत....निव्वळ ओबडधोबड!
सौंदर्य! मात्र अफलातून! विस्मयकारक!
माझी उंची पाच फुट! दोन भिंतीची उंची २०० ते २५० फुट!
मानेला प्रचंड रग लागली. मान खाली झुकली....
किती दिलखेचक हा अविष्कार! हा अविष्कार अनुभवण्याची ओढ....
सह्याद्री मुळात उगम पावला तो ज्वालामुखीतून. ज्वालामुखीच्या
उद्रेकातून जो लाव्हारस बाहेर आला तो थंड होताना विस्मयकारक रचना तयार झाली.
तैलबैला हे त्याचे एक उदाहरण. हा भाग डेक्कन ट्रॅप म्हणून प्रसिध्द आहे. कठीण
खडकांची हि रचना. कुठे सुळके तर कुठे कातळभिंती! भू-शास्त्रीयदृष्ट्या अशा
सुळक्यांना "व्होल्क्कॅनिक प्लग" तर कातळभिंतींना "डाइक" असे
म्हणतात. तैलबैलाच्या अवाढव्य भिंती "डाइक" ची अप्रतिम रचना आहे.
तैलबैला अर्थात कावडीचा डोंगर! घनगड, केवणीचे पठार, खडसांबळे
लेणी, सुधागड, सरसगड, कोरीगड इ. सारख्या सह्याद्रीतील दुर्ग-सुळक्यांनी मोहित हा
परिसर. कोकणातून येणाऱ्या वाघजाई, सवाष्णी
घाटवाटा.. ज्यांच्यावर टेहळणी करण्यासाठी खास हा तैलबैला!
भिंतीच्या बाजूबाजूने चालत आलो जिथे व्ही आकाराची भेग, दरी,
खिंड आहे. उजव्या भिंतीला अंकर लावलेले दिसले. ह्या भिंतीची चढाई हा थरार मी
वाचलेला...
सूर्य अस्तास आलेला. तैलबैलाच्या कातळभिंतीच्या पाशात विसावा
घेत समोर अस्ताला जाणारा सूर्योदय पाहताना वाटलं..ती ओढ जणू ह्याक्षणासाठीच
होती...
सूर्यदेव अस्त झाले. आमची पावले परतीला निघाली.
ओढीची आस, घालमेल, अस्वस्थता कुठल्या कुठे लुप्त झालेली.....
मन शांत शांत भासले.....
ओढपूर्तीचा भाव होताच पुरा खास....
No comments:
Post a Comment