अंधारबन जंगल ट्रेक, ४ सप्टेंबर २०१६


“अंधारबन जंगल”! इतकं प्रचंड घनदाट, गर्द आणि गडद जंगल की सूर्यकिरण इथपर्यंत पोहोचणे दुर्लभ! ताम्हिणी घाट, कुंडलिका नदी आणि –पिंपरी-भिरा धरण परिसर आणि सह्याद्री रांगेतील, खासकरून पावसाळ्यातील अजून एक नितांत सुंदर ट्रेक! १३-१४ किमी चा जंगल पट्टा, त्यात ३०% उतरण आणि ७०% सपाट भूभाग!

एक्सट्रीम ट्रेकर्ससोबतचा हा माझा तिसरा ट्रेक होता. आम्ही साधारण २५ जणाचा ग्रुप होतो. 

पिंपरी धरणापासून ट्रेक सुरु झाला आणि निसर्गाचा अविष्कार पुन:प्रत्ययास आला. धरणबांधावरून जाणारी एक छोटीशी पायवाट, दुतर्फा, नजर जाईल तिथपर्यत हिरवट-पोपटी रंगातील लुसलुशीत गवतीपाती, आजूबाजूला ढगधुक्यांनी वेढलेल्या पर्वतरांगा, भातखेचरे, ठिकठिकाणी असणारे पाणझरे आणि घनदाट जंगल!

वनविहार करत असताना ठिकठिकाणची विविध रंगातील आकर्षक रानफुले मन वेधून घेत होती. पावला-पावलावर दिमाखात डोलणार एक नवीन रानफुलं! चैतन्य निर्माण करणारं, आशा पल्लवित करणारं.......







निसर्गाची ही किमया पाहताना, अनुभवताना राहून राहून वाटतं होतं ह्या जागेचं “अंधारबन” हे नाव बदलायला हवं...मला “अंधार” हा शब्दचं खटकत होता.....वाटलं “अंदरबन” नावही चालेल..

ह्या रानफुलांचा आनंद घेत असताना, “संत तुकाराम” चित्रपटातील, शांताराम आठवले यांच एक गीत आठवत होतं,

“आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोपं वाढले,
एका बीजापोटी, तरू कोटी कोटी
जन्म घेती सुमनेफळे, आधी बीज एकले”

एका ठिकाणी सोनकीच्या फुलांनी निसर्ग गालीचा सजला होता तर एका ठिकाणी जांभळ्या रंगाच्या नाजूक मोहक फुलांनी!

ह्या ट्रेकमध्ये असंख्य फुलपाखरे देखील बघायला मिळाली.

चालून चालून पाय थकले की पाणझ-याच्या थंडगार पाण्यात पाय विसावण्याची अनुभूती अदभूतचं!

एका विशीष्ट प्रकारच्या झाडाच्या पानावर शंख-शिंपला विसावला होता.
माझ्यासाठी हा कुतूहलाचा विषय झाला. काही अंतरावर ह्याच झाडाच्या पानावर असेच शंख-शिंपले विसावलेले! एक-दोन ठिकाणी तर शिंपल्यातून चक्क गोगलगाय बाहेर आलेली! आतापर्यंत चिखलात गोगलगाय बघितलेली...आज झाडाच्या पानावर विसावलेली गोगलगाय मी पाहत होते! वा-याची झुळूक आली की पानावर डोलणारी गोगलगाय! पानावर गोगलगाय काय करतेय? प्रश्न सतावत होता.....निरिक्षण करता लक्षात आलं की ह्या झाडाची पाने थोडी सडलेली, कुजलेली, नासलेली होती....गोगलगायीला अन्न तर पानातून मिळत नसेल?.....गोगलगायीला विसावून घेणा-या पानाचं कौतुक करावं की पानावर हिंदोळे घेणाऱ्या गोगलगायीचं?...निसर्गातील सहजीवनाचं किती सुरेख उदाहरण मी बघत होते!

ह्या ट्रेक मध्ये देखील मुला-मुलींना माझ्याबद्दल कुतूहल होतं, “मॅडम, तुमचा स्टॅमीना जबरदस्त आहे, तुमचं वय किती आहे? रेग्युलर ट्रेकिंग करता का?” .....त्यांना जेव्हा कळलं की माझं वय ४९ चालू आहे आणि दिड-दोन वर्षापासून ट्रेक करते तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्यात त्या दिवशी हरितालिकेचा उपवास होता आणि उपवास असतानाही ट्रेक करतेय ऐकून त्यांना अजूनच आश्चर्य वाटलं! उपवासाचा चिवडा, आंबाबर्फी मला मिळाली. “तुमच्याकडून आम्हाला खूप शिकायला मिळालं” ही पावती समाधान देऊन गेली!

अर्थात ह्या मुला-मुलींचा जोश, उत्साह मला देखील काही शिकवत असतो. त्यात प्रतीक बरोबर ट्रेक करणं पण मला आवडतं. तो स्वत: खूप आनंद घेतो. अगदी गाणी म्हणण्या पासून, ते डान्स पर्यंत! धबधब्याखाली भिजण्यापासून ते स्वीमींग पर्यंत! यावेळी तर हा मुलगा चक्क चिखल पण खेळला! ट्रेकला आलेल्याचा ट्रेक संस्मरणीय करण्याचं कसब त्याच्याकडे आहे. त्याचं त्या त्या ट्रेकबद्दलचं ज्ञान पण खूप जबरदस्त असतं! ह्या ट्रेकमध्ये पण त्याने ट्रेकमध्ये दिसणारी विविध जातीची फुलपाखरे, वन्यश्वापदे याची माहिती दिली.

रोहन पवार या मुलाची ओळख झाली. एक्सट्रीम ट्रेकर्सची वेबसाईट तो बनवतोय. ह्या ट्रेकचे व्हिडीओ डॉक्युमेन्टेशन त्यानेच केले!

ह्या ट्रेक दरम्यान तेजस मधाळे या “ट्रेकफिट” ग्रुपच्या लीडरची ओळख झाली. त्याचा ग्रुप ज्या समर्थपणे तो लीड करत होता ते पाहून ठरवलं की पुढचा ट्रेक त्याच्यासोबत करायचा! मंजिरी भेटल्यावर तर आनंदाने परिसीमाचं गाठली!

१३-१४ किमी चा हा ट्रेक निसर्गसौदर्यामुळे अदभूतरम्य आहे! घनदाट जंगलातील ऊंच ऊंच वृक्ष आठवून, ह्या ट्रेकची सांगता संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने करावीशी वाटते,

“वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती|
येणे सुखे रुचे एकांताचा वास
नाही गुण दोष अंगा येत|
आकाश मंडप पृथ्वी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी|.......
तुका म्हणे होय मनासी संवाद
आपुलाची वाद आपणासी||”






6 comments:

Unknown said...

Ohhh hoooo apratim. Mala pn blog lihayche aahet tumcha guidance bhetal hi apeksha

Prateek Khardekar said...

Mastach

Prateek Khardekar said...

Mastach

Amar Darekar said...

www.fb.com/amar.darekar

Amar Darekar said...

������

UB said...

Another awesome write-up madam...