एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक, भाग ३: पोस्ट-ईबीसी ट्रेक परिणाम आणि यशाचे शिल्पकार

भाग १: एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक,  २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७: भाग २: मा. एव्हरेस्ट दर्शन आणि ईबीसी ट्रेक समीट

भाग२ ब्लॉग लिंक:
https://savitakanade.blogspot.com/2017/07/blog-post.html

भाग ३: पोस्ट-ईबीसी ट्रेक परिणाम आणि यशाचे शिल्पकार:

८ मे २०१७ तारखेला रात्री १२ च्या दरम्यान पुंण्यात पोहोचले. ९ आणि १० सुट्टी घेतली होती. ९ ला तर झोप आणि आरामचं केला. तीन दिवस सामान अनपॅक देखील केलं नाही. काठमांडू वरून निघताना वाटलं होतं थकवा गेलाय पण तो गेला नव्हता. १० तारखेला बुद्ध पौर्णिमेची सुट्टी होती. बहीण भेटायला आली आणि येत्नाना बाजरीची भाकरी, पिठलं, आमटी आणि मेथीची भाजी घेऊन आली! घरच्या जेवणाने तोंडाला चव आली आणि भातापासून सुटका मिळाली!

११ तारखेला ऑफिसला रुजू झाले. पोस्ट –ईबीसी ट्रेकचे परिणाम आता  जाणवायला सुरुवात झाली. हे परिणाम तीन स्तरावर होते, आरोग्य, एन्ड्युरन्स व्यायाम आणि दृष्टीकोन!

शारीरिक/आरोग्य:

·        सुरुवात खरंतर दिल्ली-पुणे विमानापासून. विमानात कानाला दडे बसल्यासारख झालं. कान जड झाल्यासारखे, कानावर खूप ताण आल्यासारखं वाटतं होतं. शेजारी बसलेली मुलगी मला बघून अचंबित झाली होती. मी अशी चेहऱ्यावर थकलेली, कानाला त्रास होतोय. मला तर वाटलं ती नक्की विचारणार. विमानातून उतरलो थोडावेळ ऐकायला हलकसं कमी येत होतं पण घरी येता येता कान बऱ्यापैकी नॉर्मल झाले होते.
·   -२० ते -१८ डिग्री सेल्सिअस मधून थेट आले ते +३८-४२ डिग्री सेल्सिअस मध्ये. दोन दिवस घरी होते तर बरी होते, पण ऑफिसला म्हणून घराबाहेर पडले आणि हवामानातील आणि तापमानातील बदल बाधला. सर्दी आणि खोकला झाला, घसा बसला, एक-दोन दिवस तर आवाज फुटतं नव्हता, नंतर आवाज घोगरा झाला. नाकात सर्दी अडकली, कान बंद आणि मधून मधून खोकल्याची ढास. बरं घसा दुखत नव्हता, ताप नाही..पण गळयावरील सर्व भाग बधीर. जास्त त्रास झाला तो कानांचा. कान ब्लॉक झाले होते, ऐकायला कमी येत होतं. खुपचं अस्वस्थ करणार फिलिंग. मला सायनसचा त्रास होत होता. विचार केला ह्या गोष्टी पूर्ववत व्हायला त्याचा वेळ त्याला घेऊ दे. मनात आलं अॅक्लमटायझेशन इथही जरुरी आहे की काय? इथून ईबीसी ला जाताना हवामान, तापमान आणि उंची ह्याचा विचार करून अॅक्लमटायझेशन वर इतका भर दिला जात होता की त्याचं टेन्शन यावं. पण ईबीसी वरून येतानाही हवामान, तापमान आणि उंची बदलतेच की मग तेव्हा अॅक्लमटायझेशन वर भर का दिला जात नाही? मला वाटलं दोन दिवस मी घरातच राहिले आणि अचानक घराबाहेर पडले ही चूकचं केली. उच्च तापमानाला हळूहळू सामोरे जायला हवं होतं! अल्टीटयूट आणि कानावर येणारं प्रेशर ह्याचा घनिष्ठ शास्त्रीय संबंध आहेचं की. हा त्रास जायला साधारण १५ दिवस लागले. हे लिहायचं ह्यासाठी की हिमालयीन ट्रेक करून आल्यावर ह्यापुढे ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून खबरदारी घ्यायला हवी हा बोध मला झाला.
·        ईबीसी ट्रेक मुळे शरीराचं वजन ५६ वरून ५२ वर आलं होतं! मुख्यत: कंबर ते गुडघे या भागातील चरबी घटली होती! ऑफिस मधील मुली म्हणायच्या, “मॅडम तुम्ही खूप बारीक झाला आहात, छान दिसताय”. माझी बहीण, जी नेहमी वजन कमी कर म्हणून मागे लागायची ती म्हणे, “तायडे, तुझं वजन चांगलच कमी झालयं, अजून कमी कर.”खरंतर हालचाल करताना मला तसा काही फरक जाणवत नव्हता, पण कुठेतरी स्वत:ला सुनावलं, “सविता, हेच वजन तुला मेंटेन करायचयं”! वजन कमी झालं ते १२ दिवस सतत चालण्याने, रोज गरम पाणी पिल्याने की रोज काही दिवस भात-भाजी खाल्ल्याने?? विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं वाटलं. हीच जीवनशैली पुढे चालू ठेवली तर कमी झालेलं वजन मेंटेन होईल का? कंबर ते गुडघे याभागातील चरबी कमी होणं खासकरून स्त्रियांमध्ये जिकिरीचं असतं जे माझं झालं होतं. भेटेल तो मुलगी विचारत होती, “काय केलंस?”
·        चेहरा, बापरे...नाकाचा शेंडा काळा-काळा झालेला (सन स्कीन लोशन म्हणून नाकाच्या शेंडयावर थापायच असतं हं). चेहरा एकंदरीतच टॅन झालेला, थकव्याने मलूल झालेला. त्याला तरतरी यायला, ताजेतवान व्हायला, टवटवीत व्हायला साधारण १५ दिवस लागले!
·    ट्रेक नंतर हिमोग्लोबिन मुद्दाम केलं. १२.८ वरून ते ११ वर आलं होतं. खूप मोठ्या प्रमाणात ते कमी न झाल्याचं पाहून हायसं वाटलं.

एन्ड्युरन्स व्यायाम:

·        २१ में पासून पर्वती एन्ड्युरन्स सुरु केला आणि जो बदल अनुभवला तो असा,
o   ईबीसी ट्रेक करून आल्यानंतर जवळ जवळ १५ दिवसांचा गॅप पडूनही पर्वतीच्या पायऱ्या मी न थांबता, एका दमात चढून जाऊ शकले.

o यावेळी प्रत्कर्षाने जाणवलेला बदल हा की, पर्वतीच्या काही उंचीच्या पायऱ्या चढताना मी खूप सहजतेने पाय वर उचलून टाकू शकले. एरवी थोडा जोर कंबर आणि पायाला द्यावा लागायचा. ट्रेक करून कदाचित एक सहजता आणि लवचिकता शरीराला प्राप्त झाली आहे असं वाटलं.
o   दुसरा प्रत्कर्षाने जाणवलेला बदल हा की, पायऱ्यांचा जो चढता स्लोप आहे तो यावेळी असा  अंगावर येत नव्हता.
o   पायऱ्या उतरताना उजवा पाय खूप सहजतेने टाकू शकले आणि उजवा गुडघा दुखत नसल्याने; संपूर्ण पायऱ्या उतरल्यावर उजव्या पायाचा हलकासा व्यायाम, जो मला आधी करावा लागायचा, तो करावासाही वाटला नाही!
o   उतरताना इतक्या सहजतेने मी पायऱ्या उतरले की त्या उतरल्यावर लक्षात आले की माझा तोल किती चांगल्या तऱ्हेने सांभाळला गेला आहे! आधीच्या तुलनेत अतिशय वेगाने मी पायऱ्या उतरू शकले!
o  माझ्या ऑफिसला मला ४८ पायऱ्या चढून जावं लागतं. ट्रेक आधी शेवटच्या दोन पायऱ्या बाकी असतांना पायात गोळे आलेले असायचे, तीव्र दम लागलेला असायचा  आणि दोन पायऱ्या पार केल्यानंतर क्षणभर थांबावे लागायचे, आता ट्रेक नंतर, पायऱ्या चढताना ह्यातलं काहीच झालं नाही. मी एका दमात आले, पाय भरून आले नाहीत कि थांबव लागलं नाही!
o   परिणाम अनुभवण्यासाठी दोन ट्रेक खास करून करायचे असं मी ठरवलं होतं. एक केटूएस आणि दुसरा कळसूबाई! केटूएस च्या १५ टेकड्या मी सहज पार करू शकले. टेकडी चढताना थांबव लागत नव्हतं, दम लागत नव्हता. उतरताना तोल सावरून, आधारा विना उतरता येत होतं. वाव...हे फिलिंग जबरदस्त होतं /आहे हं! हाच अनुभव कळसुबाई ट्रेक दरम्यान मी अनुभवला. अगदी सहज, पावसाळ्यात घसरडे सांभाळून, आधाराविना ट्रेक केला आणि शिड्या चढताना देखील अतिशय आत्मविश्वासाने, एकाग्रतेने शिड्या चढून-उतरून पार केल्या!.
दृष्टीकोन:
·        २७ तारखेला नेहमीप्रमाणे पर्वतीला गेले. साधारण २५ जणांच्या मुला-मुलींच्या एका ग्रुप कडून एक व्यक्ती व्यायाम करून घेत होती. पळत पर्वती चढणे, पायऱ्या उलट्या चढणे, एकाला पाटकुळी घेऊन पायऱ्या चढणे इ.. ती व्यक्तीच्या हातात वेताची काठी होती आणि मुलांना तो सपासप बसत होती. खरंतर हे दृश्य मी ट्रेक आधीपण बघितलं होतं. तेव्हा वाटलं, “चला कोणीतरी ह्या मुला-मुलींकडून व्यायाम करून घेतयं हे महत्वाचं. त्यांना शारीरिक रित्या फिट करताय हे महत्वाचं. मग काठीने मारून का असेना. पण ह्यावेळी ते पाहताना मी खूप रेस्टलेस झाले. वाटलं मारून ह्या मुलांकडून व्यायाम करून घेण्यापेक्षा ह्यांना स्वयंशिस्त का लावत नाहीत? मी केलेल्या सरावातून मला हे कळाल होतं की व्यायाम सरावात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, स्वयंशिस्त आणि स्व-प्रोत्साहन! ते असेल तर सातत्य राहतं आणि दीर्घकालीन ध्येयासाठी माणूस तयार होतो. ह्याचचं शिक्षण ह्या मुलांना द्यायला हवं.
·    त्याच दिवशी बसमधून येताना सहज काढलेल्या तिकीटाकडे लक्ष गेलं आणि आधी कधीही न आलेला विचार मनात आला. काय कमाल केली ह्या तिकिटाने! खरंतर तीन तिकिटांनी! के.ई. हॉस्पीटल ते स्वारगेट (१), पर्वती पायथा ते स्वारगेट (२) आणि स्वारगेट ते के.ई. एम हॉस्पीटल (३)! सातत्य राखून, न कंटाळता ही तिकीट काढायला काय सुरुवात केली त्यांनी मला आयुष्यात लॉटरीच मिळवून दिली! ईबीसी ट्रेक समीटची लॉटरी! ईबीसी ट्रेक आधी ही तिकिटं मी कचऱ्याच्या ढिगात नाहीतर डब्यात टाकून द्यायची. पण आज..ती अगदी जपून ठेवली, त्याचा फोटो काढला आणि ब्लॉगचा तो एक भाग झाला. खरंतर दिवसाची १५ रुपयांची ही तिकिटं पण आज मला ती अनमोल वाटतं होती!

·        ह्या समीट ने एन्ड्युरन्स सराव (ट्रेक करत नसाल तरी एक व्यायाम म्हणून) किंवा सातत्याने केलेल्या व्यायामाचं महत्व, आयुष्यासाठी ठासून मनावर कोरलं.
·     ऑफिस मध्ये सहकाऱ्यांच्या दृष्टीकोनाची गंमत वाटली. स्वत:च्या मुलासोबत खेळताना एकाचा अॅक्सिडेंट झाला. त्याने १५ पेंक्षा जास्त दिवस रजा घेतली. ती गोष्ट जस्टीफाईड होती. मी ट्रेकिंग साठी घेतलेली रजा...टोटली नॉट जस्टीफाईड!

ईबीसी ट्रेक नंतर मिळालेल्या प्रतिक्रिया:

·      माझ्या ऑफिस मधे माझ्या ह्या साहसाबद्दल एका अमेरिकन सहकाऱ्याला जेव्हा हे कळलं तेव्हा तो म्हणे, “Savita, I am jealous”!  
·        माझ्या फ्रेंडसर्कल मधे खूप जणांची प्रतिक्रिया ही होती की, “ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे”!
·        ब्लॉगची वाट पाहतोय” ही प्रतिक्रिया तर ट्रेकिंग सहकाऱ्यामधे प्रत्येकाचीच होती.
·        मॅडम एव्हरेस्ट ला जाऊन आल्यात” असं ऐकायला मिळालं की स्पष्ट कराव लागायचं “एव्हरेस्ट बेस कॅम्प, एव्हरेस्ट शिखराचा पायथा”.
·        खूप जणाचे मेसेज आले, फोन आले. “यु फायनली डीड इट” ही सर्वांचीच प्रतिक्रिया होती.
·       विशाल म्हणे, “तुमचं पाहून मुलं आता ट्रेक (सह्याद्री/हिमालयीन) करण्यासाठी पुढे येतील”.
·        ट्रेकिंग सहकारी म्हणे, “मॅम, तुम्ही फेमस झालात आता. प्रत्येक ट्रेकिंग ग्रुपला वाटेल तुम्ही त्यांना ट्रेकला ज़ॉइन करावं”.
·        तुम्ही ईबीसी करून आलात आता तुमच्यासाठी काय अवघड आहे?” अशी एक धारणा झाली आहे.
·        “ट्रेक कोऑर्डीनेटर व्हाल का? आजचा ट्रेक तुम्हाला लीड करायचाय”..अशी पण प्रतिक्रिया समोर आली.
·        “शॉकिंग” न्यूज अजूनही “शॉकिंग” न्यूजचं आहे. “मॅम,  (इतक्या कमी ट्रेकिंगच्या बळावर) ईबीसी ला चालल्यात?” हा आश्चर्याचा धक्का होता! आता “मॅमचं ईबीसी समीट झालं?”( त्याचं कमी ट्रेकिंगच्या बळावर)खरंच शॉकिंग आहे!
·        अभिनंदनाचा वर्षाव झाला. ट्रेक सहकारी भेटायला घरी आले. माझे अनुभव ऐकले. ट्रेक क्षेत्रातील सहकाऱ्यांना त्याची महती जास्त जाणवली. तेव्हा सारखी एका उक्तीची आठवण होतं होती, “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे”...


ईबीसी ट्रेक समीट हे यश आणि परिश्रम माझे असले तरी त्याचे शिल्पकार माझे ट्रेक सहकारी आहेत. त्यांच्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय हा ट्रेक समीट पूर्ण होऊ शकत नाही.

ह्यामधे सर्वात महत्वाचं योगदान आहे ते शिव पेंडाल ह्या ट्रेक सहकाऱ्याचं! “ट्रेक कसा करायचा” ह्याचे धडे याने मला दिले. ट्रेकिंग स्टिक कशी वापरायची, कशी धरायची, स्प्रिंग असलेल्या स्टिकचे फायदे काय आहेत, नी-कॅप वापरण्याचे फायदे, चढाई-उतराई वर पाय कसा ठेवायचा चढाई दरम्यान दम/धाप लागत असेल तर काय करायचं, वॉटर ब्लॅडर आणि हेड टॉर्च वापरण्याचे फायदे काय आहेत इ. इ. त्याच्याकडून मिळालेल्या ह्या धड्यांनी माझं ट्रेकिंग समृद्ध होण्यास आणि मी सक्षम होण्यास मदत झाली!

राहुल जाधव, हा असाच एक ट्रेक सहकारी. माझ्या ट्रेक करण्यामागील प्रयत्नांना समजून-उमगून, माझे वय, व्यायामाचा अभाव आणि ट्रेक क्षमता यांना गौण मानता त्याने जपलेला पेशन्स, संवेदनशीलता आणि सह-संवेदनामुळे मला एकामागोमाग एक ट्रेक करत राहण्याचं सामर्थ्य लाभत गेलं!



आलेख प्रजापती, त्याच्या बरोबरच्या पहिल्याचं ट्रेकमध्ये त्याने मा. एव्हरेस्टविषयी सांगितलं आणि त्याने सांगितलेल्या माहितीवर प्रभावित होऊन मी मा. एव्हरेस्ट दर्शनाची आशा बाळगली!


मिलिंद राजदेव, इतिहासप्रेमी, खासकरून शिवकालीन इतिहासात रुची बाळगणारा अभ्यासू मुलगा. ट्रेकर्स ने गड-किल्ल्यावर ट्रेक करताना कशा प्रकारची दृष्टी आणि अभिमान बाळगावा हे मी त्याच्याकडून शिकले!

ज्ञानेश्वर गजमल, शंकर स्वामी, अनिकेत घाटे हे ट्रेक सहकारी असे आहेत ज्यांनी नेहमीच माझ्यावर आणि माझ्यातील क्षमतांवर विश्वास ठेवला! ज्ञानेश्वर (डॅनी) सोबत केलेला पहिला केटूएस ट्रेक, शंकर आणि अनिकेत सोबत केलेला विसापूर आणि ढाक बहिरी ट्रेक जणू सुवर्ण अक्षरात लिहिले गेलेले शिलालेख आहेत!
डावीकडून: ज्ञानेश्वर गजमल, राहुल जाधव, विशाल काकडे, शंकर स्वामी, आलेख प्रजापती, अनिकेत घाटे

प्रतीक खर्डेकर, अत्यंत अनुभवी, उत्साही, एक वेगळ्या प्रकारची ट्रेक दृष्टी बाळगणारा हा सहकारी. ट्रेक आनंदाने आणि ताणरहित कसा करायचा हे ह्या मुलाकडून मी शिकले!

ह्या सर्वांनी माझा ट्रेकिंगचा पाया मजबूत केला आणि प्रशांत शिंदे, ओंकार यादव, परेश पेवेकर, स्मिता राजाध्यक्ष, तौसीफ सैय्यद, यज्ञेश गंद्रे यांनी तो पाया तसाच मजबूत राहण्यासाठी मला साथ केली! तितक्याच ताकदीने, तितक्याच समर्थपणे, तितक्याच संवेदनशीलतेने, तितक्याच आक्रमकतेने त्यांनी माझ्यावरचे ट्रेकिंग संस्कार चालू ठेवले!
डावीकडून: तौसीफ सैय्यद, ओंकार यादव, विशाल काकडे, प्रशांत शिंदे, स्मिता राजाध्यक्ष

मिहीर मुळे सोबत केलेला हरीश्चंद्रगड ट्रेक जणू एक परीस स्पर्श आहे!

तेजस मधाळे सोबत ढाक बेस ते भिवगड ट्रेक करत असताना तेजस मधील ट्रेकरची ओळख झाली. ट्रेकिंग हे एक "डीटरमीनेशन" आहे आणि त्यामुळे सर्व परिसीमा आणि आव्हाने कुचकामी होऊ शकतात ह्याची जाणीव तेजसला भेटून झाली!



विशाल काकडे, एक असा मुलगा ज्याने प्रत्येक ट्रेकला मोटीव्हेट करून, सपोर्ट, वेळप्रसंगी माझ्यासाठी वेगळी कार्यपद्धती अमलात आणून माझे ट्रेक चालू ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली! माझ्या ट्रेकिंग मधील प्रगतीचा, ईबीसी साठी केलेल्या सरावाचा, सुरुवातीपासूनचा तो एकमेवाद्वितीय साक्षीदार आहे! हस्तांदोलन करून “वेल डन मॅम” म्हणताना त्याच्या डोळ्यात दिसलेली कौतुकाची झलक मला नेहमी त्याच्यासोबत ट्रेक करायची प्रेरणा देत राहिली! म्हणूनच, की काय माझे जवळ जवळ ३० ट्रेक्स त्याच्यासोबत झाले आणि आमचे तीन वर्षापासूनचे हे असोसिएशन ट्रेकिंग क्षेत्रात अद्वितिय असा मानाचा तुरा आहे!
  

राजकुमार डोंगरे, उषा बालसुब्रमण्यम आणि प्रसाद देशपांडे हे असे ट्रेक सहकारी ज्यांनी ट्रेक म्हणजे फक्त गड-किल्ले, त्यांचा इतिहास, पुराणकथा नाहीतर ट्रेक मार्गावर दिसणारी विविध पाने, फुले, पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरे आणि फोटोग्राफी इ. देखील ट्रेकचा अविभाज्य घटक आहेत ह्याची ओळख करून दिली!


रवी इनामदार, भगवान भोई, गुरुदास चौहान, अमित डोंगरे इ. सारखे अनेक सहकारी आहेत ज्यांची ट्रेकमध्ये मोलाची साथ मिळाली!

ह्या सर्वांच माझ्या ट्रेकमधील योगदान अग्रगण्य आहे. कदाचित म्हणूनच केवळ ट्रेकिंगच्या जोरावर मी ईबीसी समीट करू शकले!

जीजीआयएम ची निवड आणि श्री. उमेश झिरपे सर, भूषण हर्षे, आनंद माळी, गणेश मोरे, आशिष माने यांची प्रत्यक्ष भेट आणि  त्यांनी सांगितलेले एव्हरेस्ट एक्सपीडीशनचे अनुभव यामुळे ईबीसी ट्रेकच्या निर्णयावर फेरविचार करण्याची आवश्यकता भासलीचं नाही!


वरील फोटोत डावीकडून: आशिष माने, श्री. उमेश झिरपे सर, गणेश मोरे
खालील फोटोत डावीकडून: भूषण हर्षे, आनंद माळी आणि डॉ. सुमित
पीक प्रमोशन चे केसबजी, पासंगजी, आमचे ट्रेक गाईड फुलाजी आणि कामाजी आणि शेर्पा, श्रींग, सोनम आणि राय दाय ह्यांच्या मार्गदर्शनामुळे ट्रेक सहज, सुलभ होण्यास मदत झाली!
डावीकडून: कामीजी, श्रींग, फुलाजी, सोनम, राय दाय
माझे ईबीसी ट्रेक सहकारी तन्मोय माविनकुर्वे, प्रीती पवार, दीपा सोमय्या गीतांजली देशमुख, रोहिणी जोशी, विनोद जैन,चित्रांश श्रीवास्तव आणि वर्षा बिरादर यांच्या आभार उल्लेखाशिवाय हा ब्लॉग पूर्ण होऊ शकणार नाही!



मी ईबीसी ट्रेक समीट केल्याच समजल्यावर माझ्या बहिणीने मेसेज मधे लिहिलं होतं, “अ फिदर इन ताई्ज कॅप”!

माझ्या आईच्या आवडीच्या गाण्यात तळ्यातल्या पिलाचे भय वाऱ्यासवे पळून जाते आणि एकदा पाण्यात पाहताना त्याला कळून येते की तो एक “राजहंस” आहे!

मीच काय पण प्रत्येक ट्रेकर "राजहंस" बनू शकतो ह्याची जाणीव ईबीसी ट्रेक ने मला करून दिली! 

मला कल्पना आहे की तुम्हा सर्वांनाच ईबीसीचं काय अन्य बरेच हिमालयीन ट्रेक करण्याची इच्छा आहे. मी आशा आणि प्रार्थना करते की लवकरचं तुमची इच्छा पूर्ण व्हावी, तुमच्याही टोपीत स्व-मानाचा तुरा यावा आणि तो “राजहंस” तुम्हालाही दिसावा!



एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक,  २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७: भाग १: ईबीसी ट्रेक पूर्व सराव

भाग १ ब्लॉग लिंक: http://savitakanade.blogspot.com/2017/06/blog-post_5.html

एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक,  २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७: भाग २: ईबीसी ट्रेक समीट

भाग २ ब्लॉग लिंक: https://savitakanade.blogspot.com/2017/07/blog-post.html

No comments: