“सीवा सीवा, म्हणजे
बिशाद काय? चढे घोड्यानिशी जिवंत कैद करून घेऊन येतो” अशी गर्जना
विजापूरच्या दरबारात करून पैजेचा विडा उचलणाऱ्या अफझलखानाचा, शिवाजीमहाराजांनी जावळीच्या
दुर्गम प्रदेशात शिवनिर्मित उभ्या प्रतापगडाच्या माचीखाली (याला किल्ल्याचे मेट म्हणतात) खातमा केला!
शिवप्रतापाचा साक्षीदार
प्रतापगड
हा गिरिदुर्ग प्रकारातील दुर्ग
समुद्रसपाटीपासून ३५५६ फुट उंचीवर असून महाबळेश्वरनजीक जावळीच्या खोऱ्यात उभा
ठाकला आहे! श्री.निनाद बेडेकर त्यांच्या "दुर्गकथा" पुस्तकात लिहितात की, "पारघाटावर नजर
ठेवण्यासाठी तसेच कोयनेच्या खोऱ्यावर डोळा ठेवण्यासाठी शिवाजीराजांनी बहुधा हा
दुर्ग बांधला असावा!"
"पारसोंड अर्थात
पार गाव,
शिवपूर्व काळात व त्यापूर्वी देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी व पारघाटाच्या
माथ्यावर वसलेले पार गाव हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. या गावातून
प्रतापगडाचे सुंदर दर्शन दिसते. अफजलखान शिवाजीमहाराजांविरुद्ध चालून आला त्यावेळी
त्याचा तळ पार गावात होता". असा उल्लेख सतीश अक्कलकोट लिखित
"दुर्ग" खंड पहिला या पुस्तकात आढळतो.
रडतोंडी घाट, महाबळेश्वराच्या
पायथ्याशी असणाऱ्या हा घाटमार्गाने अफजलखान पार गावात आणि पर्यायाने प्रतापगडावर
आला असावा असे म्हटले जाते.
मुंबई पॉईन्ट अर्थात बॉम्बे पॉईन्ट,
महाबळेश्वर डोंगराच्या पश्चिम कड्यावर असल्यामुळे इथून सूर्यास्त विलक्षण विलोभनीय
दिसतो. म्हणून त्याला सनसेट पॉईन्ट असेही म्हणतात.
शिवकालीन इतिहासात "प्रतापगड
युध्द" म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सर्व पाऊलखुणांना उजाळा देणारा
"प्रतापगड ते महाबळेश्वर व्हाया रडतोंडी घाट" हा ट्रेक करण्यासाठी आम्ही
२० जण एस. जी. ट्रेकर्स सोबत निघालो होतो. रविवार १६ जुलै ला पहाटे पहाटे पाच वाजता आम्ही प्रतापगडाच्या
पायथ्याशी पोहोचलो. पावसाळयाचे दिवस! तूफान पाऊस! गर्द धुके! थंडगार बोचरा वारा!
निसर्गाने आमचे स्वागत असे केले!
गरमा गरम चहा आणि नाश्ता करून ७
वाजता प्रतापगड फेरी साठी निघालो. वेळेअभावी फक्त बालेकिल्ला बघायचा ठरले होते.
बालेकिल्ल्यापर्यंत पायऱ्याचं पायऱ्या! पायऱ्यावरून पावसाच्या पाण्याचे लोट वाहत
होते! गर्द धुक्यामुळे सभोवतालचा नजारा दिसत नसला तरी महादरवाज्यातून आत गेल्यावर
सुरेखशा बगीच्याच्या मधोमध छ. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा दिसला. तिथेच
शिवछत्रपतींनी जातीने लक्ष घालून स्थापन केलेल्या स्फूर्तीदेवता आई भवानीचे मंदिर
आहे. तिथून बालेकिल्ल्याच्या तटावर गेलो. ह्या तटबंदीवरून फेरफटका मारताना
जावळीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते पण गर्द धुक्यामुळे आम्हाला ते दिसले नाही.
पाठ्यपुस्तकातील प्रतापगड माचीचे चित्र, राजमाता जिजाऊंचा आवडता गड आणि अफझलखानचा वध प्रसंग यामुळे खरंतर शाळेपासून प्रतापगड मनात ठसलेला. आज तो पाहण्याचा योग देखील आला पण गर्द धुक्यामुळे आणि वेळेअभावी बालेकिल्ल्यावरचं समाधान मानावे लागले. परंतु जो भाग आणि शिवकालीन अवशेष नजरेखालून गेले ते पाहून हा गड एकदा निवांत येऊन बघायचा असे मात्र निश्चित केले!
पायथ्याशी आल्यावर ट्रेक सहभागींची
ओळख परेड झाली. विशालने प्रतापगडाची माहिती दिली आणि ट्रेक ची कल्पना दिली. पारगाव, घोघलवाडी आणि
रडतोंडी घाट असा ट्रेक होता. ८ वाजता ट्रेकला सुरुवात केली. सुरुवातचं झाली ती
घनदाट झाडीतून. जिथे अफझलखान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली आणि सध्या जिथे अफझलखानचे समाधीस्थळ इथे आहे त्या जागेला त्या काळी "जणीचं टेंब" म्हणत असतं. गर्द धुक्यामुळे आम्हाला ते दिसून
आले नाही!
एकावेळी एकच जण जाऊ शकेल अशी एक
छोटी पायवाट. झाड्यांच्या फांद्या बाजूला करत प्रसंगी तोडत वाट काढावी लागत होती.
काही काटक्या रस्त्यावर विखुरलेल्या. त्या पायात येणार नाहीत ह्याची काळजी घेत
जंगलातली ही वाट पार करावी लागत होती.
आभाळ आल्याने अंधारून आलेले,
पावसाची संततधार, धुके साफ होण्याची शक्यता नाही, घनदाट झाडी, चिखल मिश्रित गढूळ
पाण्याने वाहणारी पायवाट, संपूर्ण उतार...मनात आले सुरुवातीलाचं इतकी गर्द वनराई
तर रडतोंडी घाट कसा असेल?
तासा-दीड तासानंतर पावसाने किंचित
उघडीप दिली, धुके साफ झाले आणि जावळीच्या खोऱ्यात वसलेले पार गाव समोर दिसू लागले.
गावातील श्रीरामवरदायिनीचे शिवकालीन मंदिर प्रसिद्ध आहे. तुळजापूरची भवानीच येथे
येऊन राहिली असे श्री. रामदासस्वामी सांगून गेलेत. चांदीत केलेले सुबक कोरीवकाम
आणि दागिन्यांनी मढलेल्या वरदायिनी आणि श्रीरामवरदायिनीच्या सुरेख मूर्ती, प्रचंड
मोठा सभामंडप, मंदिर प्रवेशाची विस्तीर्ण कमान, दीपमाळा, सभामंडपात
शिवाजीमहाराजाचा तेजोमय पुतळा इ. मुळे मंदिर परिसर विलोभनीय आणि पवित्र वाटतो.
मी दर्शनासाठी गेले तेव्हा
पुजारीकाका पूजा करत होते. त्यांनी श्रीरामवरदायिनीच्या गळ्यातील शिवशिक्का दाखवला
आणि “मंदिर शिवकालीन आहे” हे सांगताना अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत
होता.
पावसाने परत जोर धरला होता. पुढे
घोघलवाडी पर्यंतचा साधारण ३-४ किमी रस्ता हा डांबरी रस्ता होता. ह्या रस्त्याने
थोडे पुढे गेल्यावर कोयना नदीवर शिवाजीमहाराजांनी बांधलेला पूल आहे. हा पूल
रडतोंडी घाट आणि पार गावाला जोडतो. नदीच्या काठालगत गणपतीचे मंदिर आहे!
थोडे पुढे गेल्यावर घोघलवाडीला
जायला डावीकडे रस्ता लागला. वाडीच्या अलीकडूनचं रडतोंडी घाटाला जायला वाट आहे.
क्षणभर विश्रांती घेऊन जंगलातील घाट मार्गाने जायला सुरुवात केली. असं म्हणतात
ह्या मार्गाने बैलावरून मालवाहतूक करायचे!
मुंबई पॉईन्ट पर्यंतचा जावळी
खोऱ्याचा हा रडतोंडी घाट दुर्गम डोंगरदऱ्यांनी आणि निबीड अरण्याने व्यापलेला आहे.
ही जंगलवाट पार करायला साधारण अडीच ते तीन तास लागले. संपूर्ण चढाई असलेला हा
मार्ग ऊंचच्या ऊंच झाडीच्या जंगलातून जातो. असंख्य जातीची झाडे, विविध आकाराची
पाने, एकमेकांना अगदी खेटून उभारलेली, जमिनीच्या कितीतरी एकरात पसरलेली, सर्वत्र
पानगळ पांघरलेली, पावसाच्या पाण्याने कुजलेली, शेवाळ साठलेलं, त्यात सरपटणारे
प्राणी, कीटक, कृमी, वनस्पती आणि मातीत
जगणारे सुक्ष्माणु..
जंगल इतकं घनदाट की पायवाट शोधावी लागते.
वाट चुकण्याची अतिशय दाट शक्यता. माणसाचा मागोवा घेणं अत्यंत कठीण. कोणी लपून बसलं,
हरवलं तर त्याचा मागमूसही लागणार नाही! हीचं ह्या जंगल मार्गाची खासियत आहे! अफझलखान
ह्या मार्गाने का आला असावा ह्याचा अंदाज ह्या जंगलातून जाताना येतो!
हे जंगल लीच (जळू) ने खचाखच भरलेले
होते. आमच्यापैकी काही जणांना त्याने आपले लक्ष बनवले. त्यातली मी एक. जळू कधी
पायात शिरला, कधी रक्तपिपासू झाला काही कळूनचं आलं नाही. तीन-चार ठिकाणी त्याने
दंश केला. मधे एक काळी खपली आणि बाजूला लालसर सूज. दंश केलेल्या एका जागेवरून तर
रक्तप्रवाह अखंड सुरु होता. कापूस लावला तर रक्तप्रवाह थांबला. कापूस निघाला तर रक्तप्रवाह
परत सुरु. रक्तप्रवाह थांबण्यासाठी शेवटी एक दिवस जखम घट्ट बांधून ठेवावी लागली.
रक्तप्रवाह थांबला पण त्याजागी खाज सुटतं होती. हा त्रास आठवडाभर चालू राहिला. घरात असलेले "कॅॅन्डीड-बी क्रीम लावल्यावर आराम मिळाला. आमच्यापैकी
काही जणचं त्याचे भक्ष्य बनले, ते का माहित नाही. लीच बद्दल गुगलवर वाचले आणि
"लीच थेरपी" बद्दल वाचून चक्रावले. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि रक्त
गोठण्यापासून प्रतिबंध होण्यासाठी लीच सलायव्हा वापरली जाते. दंश-दाह देणारा हा
कृमी इतका आणि असाही उपयोगी होऊ शकतो हे शास्त्र काही अजबचं! ह्या लीच ने माझा हा
ट्रेक मात्र ऐतिहासिक बनवला! अफझलखानाला शिवाजीमहाराज जसे सदोदित डोळ्यासमोर दिसत
असावेत तसचं मला काही दिवस डोळ्यासमोर लीचचं दिसत होती! असो.
एका बाजूने विचार केला तर आम्ही
फक्त जंगलातून जातोय असं वाटतं होतं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर हा ट्रेक
मला "प्रतापगड युद्धाच्या" ऐतिहासिक पाऊलखुणा जागृत करणारा ट्रेक वाटला!
तिसरी बाजू ही देखील होती की ऐसी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे ट्रेक्स फुरसतीने करायला
हवेत, समजून घ्यायला हवेत आणि त्यांचा आजच्या दुनियेशी संदर्भ लावायला हवा! असो.
अपेक्षेपेक्षा आम्ही लवकर ट्रेक
पूर्ण केला. १६-१८ किमी चा ट्रेक ५ तासात पूर्ण झाला.
वाई जवळच्या अभिरुची हॉटेल
मध्ये जेवण केलं. परतीच्या प्रवासात डम्श-राज हा खेळ रंगला. पुण्यात परतलो तेव्हा
संध्याकाळचे ६ वाजले होते!
घराकडे परतताना फेरफटका अपूर्ण राहिलेला
प्रतापगड आठवत होता, इतिहासातील पाऊलखुणा तपासून पाहिल्याचे समाधान आठवत होते, लीचदंशा
मुळे रक्तबंबाळ झालेला पाय आठवत होता, राहुलसोबत मारलेल्या रॅपलिंग टेक्निक, गुगल
मॅप वर ट्रेक ट्रेस करणे इ. विषयावरच्या गप्पा आठवत होत्या., “क्या बात है मॅम,
दुसरा रेंज ट्रेक” हे विशालचे शब्द आठवत होते आणि कित्येक ट्रेक नंतर आज
हस्तांदोलन करत “वेल डन” म्हणताना विशालच्या नजरेत पाहिलेली कौतुकाची चमक
डोळ्यासमोरून जात नव्हती!
ट्रेक मधली माझी सध्या “सेकंड
इंनिग” सुरु झालीय! “रेंज ट्रेक” ही ती “सेकंड इंनिग”! १८-२० किमीचा टप्पा आणि
स्वत:मधील क्षमतांची एक नवीन परीक्षा!
“सिंहगड-राजगड-तोरणा” हा असाच एक
ऐतिहासिक रेंज ट्रेक करण्याची इच्छा आहे.. तेव्हा परत भेटूचं...शिवकालीन
इतिहासातील अशाच काही पाऊलखुणा जागृत करण्यासाठी!
फोटो आभार: संदीप खुराना, प्रकाश यादव आणि ट्रेक टीम
विशेष आभार: एस. जी. ट्रेकर्स
विशेष आभार: एस. जी. ट्रेकर्स
No comments:
Post a Comment