“एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते. ती बाबांसोबत ट्रेकला येते. कधी कधी मैत्रिणीलाही सोबत घेऊन येते. दर आठवड्याला ट्रेकला येणाऱ्या ह्या मुलीचा अनुभव सांगताना उराशी जोपासलेल एक ध्येय साध्य होत असल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळाळते.
ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंग ह्या साहसी खेळात मुलींचा सहभाग वाढवणे हे तिचे ध्येय. "स्वत:चीचं ओळख स्वत:ला पटवून घेण्यासाठी, आपल्या क्षमता काय आणि कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी, स्वत:कडे स्वत:च्या नजरेतून पाहण्यासाठी आणि दैनंदिन मानसिक ताण आपले आपल्याला हाताळता येण्यासाठी मुलींनी ट्रेक करावेत". असं ती आवर्जून सांगते.
वयाच्या सहा-सात वर्षांपासून ट्रेकिंग करणारी आणि स्वानुभवातून आपले मत ठामपणे मांडणारी ही जिद्दी तरुणी, श्रद्धा मेहता!
|
गुगुल फोटो |
शिडशिडीत बांधा, चपळ, गहूवर्णीय आणि प्रसन्न चेहरा हे तिचे बाह्यवर्णन. पुण्याच्या बाजीराव रोडवरील तिच्या ऑफिसमधे शिरल्यावर समोर हिमालयीन पर्वतरांगेतील ‘अमाडबलम’ या अनोख्या रमणीय शिखराचा फोटो पाहताक्षणी जे जाणवते ते श्रद्धा आंतरिक वेगळेपण. अमाडबलम ह्या नावाची फोड आहे, “अमा” म्हणजे आई आणि “डबलम” म्हणजे पारंपारिक देवतेची प्रतिमा असलेला शेर्पा स्त्रियांच्या गळ्यातील साज. हे शिखर चढायला तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक आणि कठीण मानले जात असले तरी “आईच्या बाहुपाशात सूरक्षित विसावलेलं मुल” असं कोमल आणि हृदयस्पर्शी वर्णन वाचायला मिळतं. श्रद्धाबरोबर संवाद फुलतं असताना या शिखराला साजेस तीच व्यक्तिमत्व उलगडत गेलं.
रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळील गोरेगाव इथला श्रद्धाचा जन्म. वडील स्टेट बँकेत नोकरीला आणि आई गृहिणी. वडीलांच्या नोकरीमुळे मुंबईत मुलुंडला राहणारे हे कुटुंब १९८६ साली पुण्यात स्थायिक झाले. दिवाळीच्या मोठ्या सुट्टीत वडिलांसोबत रायगड, प्रतापगड, सिंहगड फिरत श्रद्धाची सह्याद्री पर्वतरांगेतील गडभटकंती सुरु झाली. इयत्ता चौथीत शिकत असताना ‘श्रीमानयोगी’ कांदबरी तिने वाचली आणि कांदबरीत उल्लेख असलेले पुण्याच्या जवळपासचे असंख्य किल्ले भटकण्याची खुणगाठ त्या वयातच मनाशी बांधली. इयत्ता सातवीत असताना वीणा नावाच्या मैत्रिणीसोबत लोणावळ्या जवळील डयूक्सनोज कडा भटकल्यावर; गडभटकंतीचा हा छंद पुढे राजगड, रायगड, तोरणा, तुंग, तिकोना, पन्हाळगड, विसापूर अशा अनेक गडकिल्ल्यांनी समृद्ध होत गेला!
हिमालयात ट्रेकिंगला जाणाऱ्या शेजारच्या काकांमुळे संस्कारक्षम वय प्रभावित झाले. हिमालयीन पर्वतरांगा खुणावू लागल्या. दहावीची परीक्षा संपली आणि श्रद्धाची पावले वळाली ती थेट मनालीकडे!
“इतिहास आणि किल्ले” यांचा संबंध फक्त पुस्तकातच! वास्तविक जीवनाशी त्याचा काडीमात्र संबंध नाही अशी त्यावेळची श्रद्धाची धारणा. सह्याद्रीतील गडभ्रमंती असो किंवा हिमालयातील ट्रेक. ट्रेकिंग किंवा माउंटेनिअरिंग क्षेत्र, छंदापलीकडे जाऊन पुढे तिचा व्यवसाय बनेल असे तिला कधीही वाटले नव्हते.
कॉलेज वयातही ट्रेक चालू ठेवत श्रद्धाने बी. कॉम, एमसीएस पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आयुष्यात पुढे अचानक समोर आलेल्या काही कठीण प्रसंगाशी सामना करता करता २००० ते २००५ सालापर्यंत ट्रेक तिच्यापासून दूरावला. त्याकाळात श्रद्धा मनाने खचली. श्रद्धाच्या खचलेल्या मनाला एका मित्राने भरारीपंख दिले! तिची ट्रेकिंगची आवड जाणून, एका ट्रेकिंग ग्रुप सोबत २००५ मधे दोघं वासोटा ट्रेकला गेले. या ट्रेकने
श्रद्धाच्या मनाला नवउभारी दिली. वडिलांचा पाठींबा आणि मित्रांची साथ मिळाल्याने ट्रेक आणि हळूहळू ट्रेक लीड करणे सुरु झाले. तेव्हाचा एक अनुभव सांगताना ती म्हणते, “ सतरा सीटच्या गाडीत मी एकटीच मुलगी असायची. मुलींची सोबत नाही म्हणून इतर मुली ट्रेकिंगला येत नसत”. पुढे ती सांगते, “ट्रेक लीडर असल्याने, पिरिअड्स (मासिक पाळी) असतानाही कधी कधी ट्रेकला जावं लागायचं. आउटडोअर मधे वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यायला तेव्हा मी शिकले. शारीरिक आणि मानसिक रित्या तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम सुरु केले.”
ट्रेकिंग जोमाने सुरु असताना, २००६ साली एका ट्रेकला एकजणाचा फॉल झाला. श्रद्धा मानसिक त्रासाने ग्रासली. ट्रेक पुन्हा एकदा दुरावला. श्रद्धाची जीवन परीक्षा इथेच संपली नव्हती. २००७ मधे तिच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. खूप साऱ्या गोष्टी रिटायर्डमेंट नंतर करण्याचा विचार करणाऱ्या तिच्या वडिलांना त्या गोष्टी करण्यास वेळ मिळालाचं नाही! या घटनेने श्रद्धा अंतरबाह्य ढवळून निघाली. वडीलांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीत गुंतत न जाता ‘आपल्याला हवे ते मिळवण्याची हीच वेळ आहे’ ह्या विचाराने प्रेरित झाली! दुरावलेले ट्रेकिंग पुन्हा एकदा तिच्या आयुष्याचा घटक बनले! श्रद्धा म्हणते, “त्या परिस्थितीत ट्रेक ही फार सोशलाईझिंग अॅक्टीव्हीटी होती. रुटीन लाईफ मधून स्ट्रेस बस्टर होतं”.
नोकरी करता करता ट्रेकिंगची आवड जोपासताना २०१२ मधे “सागरमाथा” या नामांकित संस्थेशी श्रद्धाचा परिचय झाला. माउंटेनिअरिंगचे कोर्स असतात हे संस्थेतील लोकांकडून समजले. दार्जीलिंगच्या एका ट्रेक दरम्यान, हिंदुस्थान माउंटेनिअरिंग इंस्टीटयुट (एचएमआय)ला हेतुपूर्वक तिने भेट दिली. ‘बेसिक माउंटनिअरिंग कोर्स (बीएमसी)’ इथूनचं करायचा. एक महिना हिमालयात राहण्याचा अनुभव घ्यायचा असा दृढनिश्चय श्रद्धाने केला. नोकरीत एकही सुट्टी न घेता कोर्ससाठी रजा जमा केल्या. कोर्स करण्याची इच्छा व्यक्त करूनही कंपनीकडून रजा मंजूर झाली नाही. त्याच दरम्यान एका सहकाऱ्यालाही कंपनीकडून असंवेदनशील वागणुक मिळाली. नाराज झालेल्या श्रद्धाने परिणामस्वरूप नोकरी सोडली!
याही प्रसंगाला धैर्याने तोंड देत, ‘सागरमाथा’ संस्थेबरोबर ओपन ट्रेक्स चालू असताना, २०१४ साली श्रद्धाने स्वत:च्या घरातून ट्रेक्स, ट्रिप्स अरेंज करणं सुरु केलं!
नोकरी सुटल्यामुळे नातेवाईक-समाजाकडून अवहेलना वाट्याला आली. “तुला दिवाळखोरीचे डोहाळे लागलेत. महिन्याच्या महिन्याला पगार मिळायचा तो सोडून हे धंदे सुरु केलेत”. असा सूर सभोवताली सतत उमटत होता. घरातून काम करत असताना “तू काय घरीच असते” किंवा “मुलींना ट्रेकिंग मधे आणण्याचा मक्ता काय तूच घेतलाय? इतर ट्रेकिंग ग्रुप्स आहेतचं की. त्यासाठी तुला नोकरी सोडण्याची गरज काय होती?” हे ही सूर सुरात मिसळले.
या अवहेलना मनाला लावून न घेता, श्रद्धाने तिचे काम आणि ट्रेक्स चालू ठेवले. २०१४ सालच्या साल्हेर-सालोटा आणि वासोटा ट्रेक दरम्यान, ट्रेकला ती एकटीच मुलगी असल्याचे तिच्या लक्षात आले. प्रसंगाचे गांभीर्य जाणवले! २००५ सालातील परिस्थिती, २०१४ मधे देखील होती!
घरातून ट्रेक्स अरेंज करताना; मित्र परिवारांच्या सदिच्छा आणि पाठींब्या मुळे २०१४ साली ‘झेनिथ ओडिसी’ संस्थेचा जन्म झाला.
‘झेनिथ ओडिसी’ नावाची उकल श्रद्धाने समजावली. “अॅस्ट्रोनॉमिशी संबंध असलेले ‘झेनिथ’ म्हणजे पृथ्वीपासूनची टॉप मोस्ट (अढळ) जागा. ओडिशीअस नावाच्या ग्रीक योद्ध्याची साहसपूर्ण प्रदीर्घ प्रवास वर्णने ‘ओडिसी’ नावाने प्रसिद्ध आहेत म्हणून ‘ओडिसी’. ‘झेनिथ’ आणि ‘ओडिसी’ या दोन्हींचे समर्पक नामकरण केले ‘झेनिथ ओडिसी’! अर्थात ‘अढळपद लाभलेली साहसी प्रवास वर्णने’! श्रद्धामधील वेगळेपण, विचारांची सर्जनशीलता पुन:प्रत्ययास आली!
संस्थेच्या नावाखाली ट्रेक्स चालू होते. त्याचं व्यवस्थापन घरातूनच सुरु होतं. त्याचवेळी ‘बीएमसी कोर्स’ करण्याचा दृढनिश्चय प्रत्यक्षात आला. ‘एचएमआय’ संस्थेतून कोर्स पूर्ण झाला! ‘बी-ग्रेड’ मिळाली. सराव आणि कोर्ससाठी तयारी कशी आणि काय करायची हे माहित नसल्याने अपेक्षित चमक दाखवता आली नाही. कोर्सचा अनुभव सांगताना ती म्हणते, “ग्लेशिअरला जाताना वापरायच्या डबल लेअरच्या स्नोबूटसाठी सॉक्स पोटरी पर्यंत घालावे लागतात हे माहित नव्हतं. त्यामुळे शूजमधलं रिबीट दोन्ही पायाला घासून जखम झाली. अनुभव नसल्याने त्यावर साधं वॉशप्रुफ बॅन्डेड लावून सराव केला. १-२ किमी चालल्यावर घासून जखमेवरची बॅन्डेड पण निघून आली आणि चालणं अशक्य झालं. रेनॉक पीक समीट झाला नाही, १-२ वेळचं ट्रेनिंग मिस झालं, आईस क्लायबिंग आणि हाईट गेन सत्र होऊ शकलं नाही आणि परिणामाने ए-ग्रेड मिळाली नाही.”
‘ए-ग्रेड’ मिळवण्याच्या निश्चयाने पुन्हा तिथेच अॅडमिशन घेतली. कसून सराव केला. चवड्यावर चालणे, पूल अप्स-पुश अप्स, पाठीवर १०-१२ किलोचं ओझ घेऊन चालणे किंवा ट्रेक्स. परिणामस्वरूप ‘ए-ग्रेड’ मिळाली! या जिद्दीचं मर्म श्रद्धा सांगते, “सेल्फ–मोटीव्हेटेड असणं खूप गरजेचं आहे”.
हातात ‘बीएमसीचं’ प्रमाणपत्र आणि मनात जिद्द! कोर्स दरम्यान साधारण एक महिना दार्जीलिंगला असल्याने, काम ठप्प झालेलं ‘झेनिथ ओडिसी’ पुन्हा सक्रीय झालं! लोकांच्या मनात रुजू लागलं!
२०१५ मधे श्रद्धाच्या जिद्दीचा पुन्हा कस लागला. संस्थेने एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक आयोजित केला. ट्रेकच्या तीन दिवस आधी तिथल्या आयोजकाला पैशाचा उरलेला हप्ता पाठवला. ज्यादिवशी हे पैसे पाठवले त्याच दिवशी तिथे भूकंप झाला. भूकंपात आयोजकाचेच निधन झाले! लोकांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी रिफंडची मागणी केली. आकस्मिक आलेल्या संकटाने श्रद्धा गांगरली. प्रयत्नांची पराकाष्ठा करून रिफंडची रक्कम उभी केली. अनुभव सांगताना हळवी झाली. “माझा बँक बॅलन्स उडाला. वर्किंग कॅपिटल कमी झालं. पर्यायाने ‘झेनिथ’चं काम मंदावलं”.
पुन्हा एकदा श्रद्धा मानसिक त्रासाने वेढली. यातून बाहेर पडण्यासाठी तिने बेंगलोर गाठलं. एका मित्राकडे राहिली. त्याच्या कुटुंबाच्या आग्रहास्तव आणि तिथेच स्थिर स्थावर होण्याच्या उद्देशाने तिने नोकरीसाठी दोन इंटरव्ह्यू सुद्धा दिले.
पावसाळ्याचे दिवस! सह्याद्री पर्वतरांगेतील पावसाळ्यातील ट्रेकचे फोटो सोशल मिडियावर श्रद्धाच्या पाहण्यात आले. आंतरिक आवड स्वस्थ बसेना. ‘ट्रेक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याशिवाय आपण राहूच शकत नाही’ “The mountains are calling and I must go and I will work on while I can, studying incessantly”, जॉन मुईर या अमेरिकन प्रकृतीतज्ञाच्या उक्तीवत, सह्याद्री पर्वतरागांच्या हाकेने श्रद्धाची पावले पुण्याकडे वळली!
‘झेनिथ ओडिसी’ने पुन्हा एकदा नवा जोम पकडला. २०१७ ऑक्टोबर पासून ‘झेनिथ’ अंतर्गत ट्रेक सुरु असताना पुन्हा एकदा तेवढ्याच जिद्दीने अॅडव्हान्स माउंटनिअरिंग कोर्स (एएमसी)ला श्रद्धाने अॅडमिशन घेतली. तब्येतीने साथ केली नाही. रक्तदाब वाढला. जिद्द आणि दृढनिश्चय आरोग्यापुढे हरले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोर्स सोडावा लागला.
श्रद्धा तिच्या आयुष्याचा आलेख उलगडत असताना नकळतपणे ते ट्रेकिंगशी जोडलं. ‘चढ-उतार’ हे ट्रेकिंगचं सूत्र. श्रद्धाचं आयुष्यही जणू ह्याचं सूत्रात बांधलेलं. आयुष्याचा ध्येय समीट गाठण्याची तिची जिद्द पाहताना कविवर्य विंदा च्या “आयुष्याला द्यावे उत्तर....” कवितेतील काही ओळी तिच्याबाबत सार्थ ठरतात.
असे जगावे दुनियेमधे आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर....
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळती सत्तर...
नजर रोखुनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर....
संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमधे, आयुष्याला द्यावे उत्तर....
‘झेनिथ ओडिसी’, हे आता केंद्रबिंदू बनले. संस्थेच्या वेबसाईटसाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करून वेबसाईट श्रद्धाने स्वत: बनवली. ट्रेकसाठी प्रोटोकॉल्स तयार केले. १५
ते २० जणांची बुकिंग मर्यादा, १५ लोकांमागे दोन इनस्टरक्टर, ऑफिस मधे बॅकअपची उपलब्धता, कचरा व्यवस्थापन (https://lnt.org अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या) वन-डे ट्रेकसाठी स्टीलच्या प्लेट सोबत नेणे, ओव्हर नाईट ट्रेकसाठी सहभागींनी स्टीलच्या प्लेटस आणणे, सिगरेट- दारू- कोल्ड्रिंक यावर कडक बंदी, ट्रेकला साजेसा पेहराव (ट्रेकिंग शूज, बॅकपॅक, अंगभर कपडे इ.), किल्ल्यांचे मॅप्स लॅमिनेट करून नेणे, ट्रेकनुसार लोकल गाईड सोबत घेणे, ट्रेकसाठी संस्थेच्या पातळीवर पूर्व तयारी करणे जसे प्रथमोपचार, काही महत्वाचे फोन नंबर जवळ ठेवणे (पोलीस, रुग्णवाहिका, जवळचे रुग्णालय, स्थानिक व्यक्ती), ट्रेकची सर्वांगीण माहिती करून घेणे इ.
एका ट्रेकचा अनुभव तिने कथन केला. “मनमाड जवळील कात्रा किल्ला करताना एका काकांचा तोल गेला. डिहायड्रेशनमुळे असं झालं. ट्रेकपूर्वी सूचना देऊनही काकांनी पुरेसं पाणी आणि अन्न जवळ ठेवलं नव्हतं. माझं बॅकअप रेडी होतं. पोलिसांचा नंबर, दोन लोकल कॉन्टॅक्ट, बेस गावात ट्रेकची कल्पना दिली होती. माझी तयारी इतकी जबरदस्त होती की एका तासात अॅम्ब्यूलन्स आली असती. ट्रेकला सांगितलेल्या सूचना काहीवेळा सहभागी ऐकत नाहीत. वेळप्रसंगी कठोर व्हायला लागतं. बुकिंग साठी सुद्धा फोन करू नका असं नि:क्षुन सांगाव लागतं”.
काही ट्रेक सहभागींना लीडरबद्दल आदर नसतो, काहीजण ट्रेककडे पिकनिक म्हणून पाहतात, ट्रेक सूचना पाळत नाहीत, ट्रेकचे नियम माहित नसतात, फोटो काढून सोशल मिडिया वर अपलोड करायचे हा उद्देश असतो. यासारख्या गोष्टी श्रद्धाला अस्वस्थ करतात.
हिमालयीन एक्सपीडीशनचे काही रेकॉर्ड्स ज्यांच्या नावावर आहेत, ज्यांचे बीएमसी, एएमसी कोर्स झालेत अशा ट्रेकर्स /माउंटेनिअर्स बरोबर ट्रेक केले असल्याने ट्रेकिंग कडे कधी श्रद्धाने 'कॅज्यूअल अॅक्टीव्हीटी' म्हणून पहिले नाही. अशा प्रकारचा दृष्टीकोन आजच्या काही ट्रेक लीडर्समधे दिसत नसल्याची खंत तिला बोचते.
ट्रेक दरम्यानची निर्णयक्षमता हा ट्रेकचा गाभा असं श्रद्धा मानते. मनमाड मधील एका ट्रेकच्या वेळी त्याचा अनुभव तिला आला. ठरवलेल्या वेळेनुसार अंकाई-टंकाई-कात्रा ट्रेक झाला. तापलेल्या उन्हामुळे पुढील गोरखगड ट्रेकचा वेग मंदावला. गोरखगड ट्रेक केला तर पुण्यात परतायला रात्रीचे किमान अकरा वाजतील असा प्राथमिक अंदाज होता. निश्चित केलेल्या परतीच्या वेळेनुसार तो नक्कीच जास्त होता. सहभागींसोबत श्रद्धाने चर्चा केली आणि सर्वानुमते गोरखगड ट्रेक शेवटी रद्द झाला.
श्रद्धा सांगते, “विशेषकरून रविवारी ट्रेकला येताना सहभागी नियोजन करून आलेले असतात. ट्रेक वेळेत संपवून, वेळेत परतून, रात्री पुरेशी विश्रांती घेऊन, दुसऱ्या दिवशी ऑफिसची वेळ पाळायची हा विचार नियोजना मागे असतो. त्यांचं नियोजन आणि वेळेचं महत्व एक आयोजक म्हणून मला लक्षात घ्याव लागतं”. सहभागींच्या ठिकाणी स्वत:ला ठेऊन विचार करणारी श्रद्धा आगळी-वेगळीच!
ट्रेक लीड करताना आयोजक पातळीवर आव्हानांना सामोरे जावे लागते. ‘एक मुलगी ट्रेक अरेंज करतेय, तिला काय कळत?, काय माहिती आहे?’ अशा काही प्रतिक्रिया सुरुवातीच्या काळात श्रद्धा समोर आल्या. ‘मुलगी’ म्हणून आपण कुठेही कमी पडत नाही हा आत्मविश्वास श्रद्धाला आहे. तथापि, ट्रेकला येणारे सहभागी आपल्यातील गुणधर्म पडताळत असतात ह्याची जाणीवही तिला आहे. ती सांगते, “ट्रेक दरम्यानचं माझं वर्तन, हालचाली, संवाद आणि आत्मविश्वास ह्यामधून लोकांना माझ्यातील क्षमता कळतात”.
पुन्हा पुन्हा तेच सहभागी ट्रेकला येण ही श्रद्धाच्या दृष्टीने एकमेव धनसंपदा! "९०% वेळा असं होतं की बहुतेक वेळा सहभागी तेच असतात. त्यात मी समाधानी आहे. माझ्या यशाची आणि काम बरोबर करत असल्याची ती पावती आहे”. सातत्याने येणाऱ्या सहभागींचा तिने केलेला हा गौरवच!
६५ लिटरची बॅकपॅक पाठीवर ती नेऊ शकते. बॅकपॅकला अडकवलेली कचऱ्याची पिशवी ही तर तिची खास ओळख! “यासाठी लागणारी फिजिकल स्ट्रेन्थ कुठून येते?” या प्रश्नाच तीच उत्तर, ‘व्यायाम’! चालणे, जिना चढणे–उतरणे, कार्डीओ एक्सरसाईज, फुफुसांची क्षमता वाढवणे, पर्वती किंवा तत्सम टेकडी चढणे-उतरणे, पाठीवरील वजन आणि अंतर प्रमाणात वाढवत नेणे इ. हिमालयीन एक्सपिडीशन असेल तर प्रशिक्षका कडून पुश-अप्स, पूल-अप्स शिकणे केव्हाही फायद्याचे असे ती सांगते.
दररोजच्या आहारात दुध, शाकाहार आणि खासकरून ए आणि बी व्हीटॅमीन देणाऱ्या गोष्टींचा समावेश या गोष्टी सोडल्या तर आहार आवडी-निवडीबद्दल श्रद्धा काटेकोर नाही.
स्थानिक व्यक्तींशी असणाऱ्या नात्याबद्दल ती भरभरून बोलते. “लगीन केलस का न्हाय ?”, अशी आस्थेने विचारपूस करणाऱ्या सुधागडवरच्या आजी असोत किंवा “माझी लेक निघालीय तिला तांदूळ देते” असं म्हणणाऱ्या हरिश्चंद्रगडावरील भास्करची आई. बारी गावातील संतू खाडे असो किंवा रतनगडावरील नामदेव बांडे. “हा बोल बाय, बऱ्याच दिवसांनी फोन केलास?” असं म्हणणाऱ्या वेळासच्या नानी असो.
‘ट्रेकमधे मुलींचे प्रमाण’ तिला अस्वस्थ करते. सोबत मुली नाहीत म्हणून इतर मुली ट्रेकला येण्याच टाळतात. गेली कित्येक वर्ष हेच चित्र. आज मुलींचे प्रमाण वाढतय. परंतु ट्रेक गांभीर्याने घेणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी असल्याची खंत श्रद्धाला सतावते. येणाऱ्या काळात हे चित्र बदलेल ही आशा आणि आत्मविश्वास म्हणजे श्रद्धाची ध्येयपुर्तीकडे प्रेरणादायी वाटचालच!
‘विमेन इन आउटडोर अॅन्ड आउटडोअर एटीकेट्स’ या याविषयावर श्रद्धाने एक ब्लॉग लिहिला आहे.( https://www.adventuren.com/blog/tag/outdoor-hygiene/ )
ट्रेक किंवा प्रवासात असताना घाम, कपडे, मल-मुत्रविसर्जन आणि मासिक पाळी या चार गोष्टींबाबत टिप्स त्यात आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींना मुलभूत नैसर्गिक गरजांचा विचार जास्त करावा लागतो हा तिच्या ब्लॉगमधील उल्लेख यथार्थच!
“मला पिरिअड्स आहेत म्हणून मी ट्रेकला जाणे रद्द करू शकत नाही. ते व्यावसायिकतेला धरून नाही. शिवाय असे केले तर स्त्रियांचा आउटडोअर्स मधे सहभाग वाढण्यासाठी प्रेरणा मिळणार नाही”. मुलींचा आउटडोअर मधे सहभाग वाढण्यासाठी श्रद्धाने केलेले हे प्रयत्न कौतुकास्पदचं!
ट्रेकिंग मुळे स्वत:मधे काय बदल झाले? या प्रश्नावर खुदकन हसत ठासून उत्तर आलं “खूपच"!
आपण कोणीतरी असल्याची आणि काहीतरी अनन्यसाधारण करतोय ही जाणीव ट्रेकमुळे झाली. "व्यक्तींशी बोलण्याचं कौशल्य सुधारल, शिस्तीच महत्व उमगल, वेळप्रसंगी वैयक्तिक दु:ख बाजूला ठेऊन व्यावसायिक बांधीलकी महत्वाची मानायला शिकले, गोष्टींना प्राधान्य द्यायला शिकले, प्राधान्याने गोष्टी करायला शिकले, निसर्गाकडे आणि माणसाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला, राग बराच कमी झाला, पेशन्स वाढला, अग्रेसीव्हनेस कमी होऊन असरटीव्हनेस वाढला, माझ्यात दडलेल्या काही चांगल्या गोष्टी पुढे आल्या, योग्य काटकसर शिकले, पैशाचं नियोजन शिकले"!
रोल मॉडेल कोण? क्षणात उत्तर आलं, “प्रेमलता आगरवाल". एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात वयस्कर महिला! त्यापाठोपाठ अरूनीमा सिन्हा, युली स्टेक (Ueli Steck), जिमीचीन (Jimmychin) हे श्रद्धाचे आदर्श.
‘अमाडबलम’ आणि एव्हरेस्ट शिखर एक्सपीडीशन करण्याची तिची इच्छा आहे! कार ड्रायव्हिंग/रेसिंग, चित्र काढणे, गाणी ऐकणे, जेवण बनवणे हे श्रद्धाचे छंद. जेवणात आवडत ते इटालियन फूड. तिच्याकडे स्वत:चं हजार एक पुस्तकांच कलेक्शन आहे. जुन्या माउंटनिअर्सची पुस्तके वाचायला आवडतात. मुलींचा अनादर ती खपवून घेत नाही.
वेळ मिळेल तसे श्रद्धा ट्रेकचे ब्लॉग्स देखील लिहिते www.theGypsyPrincess.Com या वेबसाईट वर तिने लिहिलेले ब्लॉग्स अवश्य वाचा.
स्ट्रे-डॉग्सचं लसीकरण, पुनर्वसन, नसबंदी, फीडिंग इ. कामात वेळ मिळेल तशी ती सक्रीय आहे.
काही संस्थाशी जसे सिंहगड रोड अॅनिमल लव्हर्स; देखील जोडलेली आहे.
आज 'झेनिथ ओडिसी' संस्था ट्रेकिंग क्षेत्रात व्यापक होत वेगाने पुढे येत आहे. ढाक-भीमाशंकर, भोरगिरी-भीमाशंकर, अंधारबन, मनमाड विभागातील अंकाई-टंकाई-कात्रा ट्रेक, ब्रम्हगिरी-दुर्गभंडार, अलंग-मदन-कुलंग, कळसुबाई, हरिश्चंद्रगड ट्रेक, लडाख ट्रीप, वाईल्ड लाईफ टूर्स, सायक्लिंग ट्रीप इ. ट्रेक संस्थेअंतर्गत झाले आहेत.
सातत्याने प्रयत्न, नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि जिद्दीच्या जोरावर श्रद्धाने बाजीराव रोडला संस्थेचे ऑफिस थाटलय.
तिच्या कामाचा कौतुकास्पद लेख वर्तमानपत्रात झळकला.
आलेल्या कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देत उभे राहताना अवहेलनेला थाराच राहिला नाही.
तिच्यासोबत ट्रेक करत असताना तिच्यातली उत्तम आयोजक, सक्षम ट्रेकर आणि खंबीर ट्रेक लीडर मला जवळून पाहता आली. गाडीची व्यवस्था करण्यापासून ते खाणं-पिणं, पैशाचा हिशोब, ट्रेकचे व्यवस्थापन, प्रथमोपचार, ट्रेकिंग कौशल्य (रोप बांधणे इ.), वेळेचे सुनियोजन इ. ट्रेकिंग सारख्या जोखमीच्या क्षेत्रात एका मुलीची पाहिलेली चुणूक थक्क करणारी!
ट्रेकिंग क्षेत्रात स्वबळावर निर्माण झालेले श्रद्धाचे अस्तित्व वाखाणण्याजोगे आहे. 'श्रद्धा नावाचा आकाशातील ठिपका तेजाने झळकतोय' असेच म्हणावे लागेल. सतत प्रयत्नशील राहत, नाविन्यता आणि सर्जनशीलतेचे प्रयोग करत, जिद्दीने चाललेली तिची वाटचाल खरोखरचं स्तिमित करते!
जीमिचीन, एक अमेरिकन क्लायंबर, माउंटेनिअर, स्कायर, डिरेक्टर आणि फोटोग्राफर चे हे शब्द जणू तिच्या कार्याला समर्पक ठरतात!
“Creativity needs to extend beyond the lens. Find creative ways to showcase your work and get it seen. Straight up tenacity, hard work and determination will always be part of the equation, so get to it”
फोटो आभार: ब्लॉग मधील फोटो, श्रद्धा आणि झेनिथ ओडिसीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम वरून घेतले आहेत. फोटो काढलेल्यांचे आभार
ट्रेक प्रवास माझ्याशी शेअर केल्याबद्दल श्रद्धाचे खूप खूप आभार!
ब्लॉगचे ब्लॉगरवर प्रकाशन श्रद्धाच्या हस्ते, मंगळवार, ५ जून २०१८ या तिच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्यात आले. त्याचा हा फोटो कोलाज💗💗💗
|
ग्रुप फोटो मधे उजवीकडून, श्रद्धा मेहता, सविता कानडे, राजकुमार डोंगरे, विशाल काकडे आणि स्वप्नील खोत |