"प्लस व्हॅली ट्रेक" बाबत हाच विचार केला आणि "झेनिथ ओडिसी" नामक ट्रेकिंग ग्रुपमधे माझं नाव नोंदवल. रविवारी १८ फेब्रुवारीला सकाळी ६.३० वाजता आमचा १७ जणांचा ग्रुप (दोन ट्रेक लीडर) ट्रेकसाठी पुण्यातून निघाला. ट्रेक लीडर होते श्रद्धा मेहता आणि अमित मालपाणी!
मुळशीत आल्यावर वाटेत चहा-नाश्ता
केला. नाश्त्याचा पदार्थ होता "सोजी"! अर्थात गव्हाचा दलिया/उपमा सारखा भरपूर
भाज्या घातलेला पौष्टिक चविष्ट पदार्थ!
थोड्याच वेळात आम्ही
डोंगरवाडी अर्थात ट्रेकच्या आरंभस्थळापाशी येऊन पोहोचलो. एकमेकांचा नाव आणि ट्रेक
परिचय झाल्यावर श्रद्धाने "प्लस व्हॅली" बाबत माहिती दिली.
गणितशास्त्रातील अधिक (+) चिन्हाचा आकार लाभलेली ही व्हॅली! पुण्याजवळील सुप्रसिद्ध
ताम्हिणी घाटजवळ वसलेली आणि सह्याद्री पर्वतरांगामधून वाहणाऱ्या कुंडलिका नदीमुळे बनलेल्या
कुंडलिका व्हॅलीचाच एक भाग आहे ही व्हॅली!
"प्लस व्हॅली"
तशी खासचं! शकुनाचे वाढीव नाणे मिळावे तसे हिला वाढीव निसर्ग सौदर्य मिळालय. कुंडलिका
नदी, देवकुंड वॉटर फॉल, "सावळ्या घाट" (हा ऐतिहासिक व्यापारी मार्ग जो
ताम्हिणी घाटातून कुंडलिका व्हॅलीत उतरतो), इंडिपेंडंन्स पॉईंट, हरितगर्द जंगल आणि
चौफेर उंच उभे- तीव्र उतरणीचे कातळ कडे!
डोंगरवाडी
आरंभस्थळापासून सकाळी साधारण ९.३० वाजता सुरु केलेला ट्रेक, देवकुंड धबधब्याच्या
तोंडाशी संपला तेव्हा दुपारचे बारा वाजलेले. तीव्र खोल दरी, एकावेळी एकच जण जाऊ
शकेल अशी दगड-गोट्यांची पायवाट, दुतर्फा काही हिरवीगार तर काही सुकलेली झाडी!
ट्रेकचा आरंभ आणि शेवट होतो तो मुळी वाळूच्या खडकांनी! खडकाच्या काठीण्य-आकाराची
रेंज आणि वर्गीकरण मला वाटत ह्याच ट्रेकमधे बघायला मिळत असावे!
१८० च्या कोनातून मान फिरवावी इतके उंच कातळकडे आणि त्या उंचीच्या प्रमाणात खोलदरी! दरीच्या खोलीची कल्पना परतीच्या वाटेवर व्हॅली चढून येताना प्रत्कर्षाने लक्षात आली.
१८० च्या कोनातून मान फिरवावी इतके उंच कातळकडे आणि त्या उंचीच्या प्रमाणात खोलदरी! दरीच्या खोलीची कल्पना परतीच्या वाटेवर व्हॅली चढून येताना प्रत्कर्षाने लक्षात आली.
पौष्टिक लाडू, ताक आणि पराठ्याचा आस्वाद घेऊन साधारण सव्वा वाजता परतीचा ट्रेक सुरु केला. आता उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. तापलेल्या खडकांचा आधार हाताला चटका देत होता. शरीराची पाण्याची डिमांड वाढत चालली होती आणि थकायला होत होतं. श्रद्धाच्या सूचना ऐकायला येत होत्या," घोटघोट पाणी प्या, वारंवार पाणी पिऊ नका, खूप जास्त पाणी पिऊ नका, चालत रहा, थांबू नका, डीहायड्रेट व्हाल, शरीराला कधी कधी फसवाव लागत, त्याची पाण्याची डिमांड पुढे ढकला..."!
साडेतीनच्या सुमारास ट्रेक संपला आणि हुश्श झालं. वडा-पाव आणि लिंबू सरबताचा नाश्ता हॉटेल "शिवसागर" मधे करून रात्री ७.३० च्या सुमारास आम्ही पुण्यात पोहोचलो.
हा ट्रेक माझ्यासाठी शारीरिक
कसरत झाला. ट्रेकच्या आरंभालाचं लहान-मोठे खडक पाहून लक्षात आलं "ट्रेकिंग स्टीक"
उपयोगाची नाही. "शरीराचा तोल सांभाळत ट्रेक होणार का" ही चिंता सतावत
असताना, आदल्याच दिवशी खरेदी केलेल्या अॅक्शनच्या काळ्या-कुळकुळीत ट्रेकिंग शूज ने
ट्रेक सावरून नेला!.
श्रीहिता आणि रागा ह्या
लहानग्या मुलींसोबत अन्य पार्टीसिपन्ट बरोबर झालेला संवाद ही माझ्यासाठी रम्य ट्रेकआठवण!
"झेनिथ
ओडिसी" सोबत मी प्रथमच ट्रेक करत होते! आखलेल्या वेळापत्रकानुसार ट्रेक होणं,
स्टीलच्या प्लेट्स आणि चमचे, वीस लिटरचा पाण्याचा कॅन, उष्टावलेल्या प्लेट-टेट्रा-पॅक-अन्य
कचऱ्यासाठी मोठी काळी डस्टबिन बॅग ह्या काही गोष्टी ज्या मला "झेनिथ
ओडिसी" विशेष वाटल्या!
पुन्हा भेटूच! तोपर्यंत
"झेनिथ ओडिसी" ला माझ्या खूप शुभेच्छा!
(फोटो आभार: ट्रेक टीम)
(फोटो आभार: ट्रेक टीम)
No comments:
Post a Comment