जेजूरगड, कडेपठार आणि मल्हारगड, १५ एप्रिल २०१८


जेजुरगड अर्थात नवा मल्हारगड, कडेपठार अर्थात जुनागड आणि जुना मल्हारगड अर्थात सोनोरीचा किल्ला या तीन ठिकाणी भेट देण्याचा योग रविवार १५ एप्रिल २०१८ रोजी आला. रविवार आणि दुसऱ्या दिवशी सोमवती आमावस्या असल्याने भक्तगणांचा ओघ जेजूरगडावर ओसंडून वाहिला. मल्हारीमार्तंड मंदिर परिसर तळी-भंडाऱ्याने सुवर्णरंगी झाला!   


कडेपठार, शिवलिंगरुपी श्रीखंडोबाचे स्थान. शब्दश: अर्थाने पठार कमी. जुनागड हे यथार्थ नाव. 


दोन महिन्याच्या विश्रांतीनंतरची चढाई. "स्टीकसखी" सोबतीला नव्हती. सोबतीला होते ओंकार, विकी आणि ललाटीला विराजमान भंडारा लेपित भक्तगण. सकाळचा शीतल गारवा, सुर्व्यादेवाचे प्रखर किरणही आज जरासे विसावलेलेच. सुंदरशी चढण, पाठीला जेजुरीगडाचे सोनेरी सौदर्य आणि भवताली असंख्य डोंगररांगा.   

९.३० ला सासवडकडे आगेकूच. वाटेत नाश्ता करून सोनोरीचा रस्ता धरला. साडे अकराच्या सुमारास मल्हारगड चढाई. गडाला जाणारी पायवाट दिसेना. डोंगर चढून गेलो. गडावर सांगली गावचे शिवकार्यकर्ते भेटले. गडस्वच्छता करत होते. त्यांनी उतरणीचा रस्ता दाखवला.    

मल्हारगड, तसा छोटासा. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यात सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वात शेवटी बांधलेला किल्ला. भक्कम तटबंदी असलेला, महादरवाजा, चोर दरवाजा, बालेकिल्ला......


महादेव आणि खंडोबा मंदिर आणि असंख्य प्रतिमांनी व्यापलेला......सोनोरी गावात एक आजीबाई भेटल्या. त्या तरूण असताना लाकडे गोळा करायला गडावर स्थानिक जात असतं. आता शालेय मुले सोडली तर स्थानिकांचे गडावर जाणे दुर्मिळच.

इथे राहणारे सरदार पानसे, पुण्यातल्या वाडिया कॉलेजला प्राध्यापक होते. ते कॉलेजमधील मुलांना किल्ला पाहण्यासाठी  गावी बोलवायचे.महाशिवरात्र, खंडोबाचे नवरात्र या दिवशी स्थानिक लोकांची गर्दी गडावर होते असे स्थानिक म्हणतात.

मल्हारगड ट्रेकच्या निमित्ताने सोनोरी गावातील कुटुंबाची झालेली भेट आणि प्रेमरुपी भोजन ही सुवर्णभेटच!


ट्रेक प्रवासातील काही सुंदर क्षण....."विशेष आणि स्वमग्न" मुलांसाठी पर्वती चढणे स्पर्धा, स्वयंसेवक भूमिकेतील माझा अनुभव!

बुधवार ७ फेब्रुवारी २०१८

पर्वती पायथ्याचे शनिमंदिर भाविकांऐवजी आज "विशेष आणि स्वमग्न" मुलां-मुलींनी गजबजून गेलयं! सहा ते तीस वर्षा वरील वयोगटातील ही मुले-मुली! प्रत्येक चेहऱ्याची वेगळी ठेवण! पालक-शिक्षकांनी बसवलेल्या जागी निमूट बसलेत, पिवळा; हिरवा; लाल; निळा; पांढरा असा विविध रंगी पोशाख परिधान केलाय, उजव्या मनगटावर बांधलेली रिबन दुसऱ्या हाताने गोल गोल फिरवण्यात काहींजण मग्न आहेत, “नवक्षितिज” अक्षरे कोरलेल्या टोपीशी काहीजण खेळतायेत, काहींचा चेहरा टोपीखाली लपून गेलाय पण त्याच भान आहे कुणाला?, काही मुला-मुलींच्या मुखातून स्पष्ट-अस्पष्ट शब्द बाहेर पडतायेत तर काही जणांच्या मुखातून फक्त अस्फुट आवाज येतोय,काहींजण भिरभिरणाऱ्या; भेदरलेल्या नजरेने चहुबाजूला पाहतायेत, काहीजणांच्या चेहऱ्यावरची हास्याची सुरेख लकेर नजर वेधून घेतेय, काही मुला-मुलींच्या चेहऱ्यावर सूचना समजल्याचे हावभाव, काहीजण मान खाली घालून हाताच्या बोटांशी, खेळताहेत....... मुले-मुली स्वत:च्याच विश्वात मस्त आहेत!  

मंदिराबाहेर पावसाची रिमझिम सुरु आहे, वातावरण ढगाळ आहे, मंदिरात दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरु आहे, पालक; शिक्षक; आयोजक; ह्यांची स्पर्धेची गडबड सुरु आहे..

एरवी शाळेत दिसणारी ही मुले-मुली! आज सुसज्ज आहेत “पर्वती चढणे” स्पर्धेसाठी! डोक्यावर निळी टोपी, गळ्यात ओळखपत्र, वयोगटानुसार हातात रंगीत रिबन घालून.....

६ ते १२ वर्ष वयोगटातील ४-५ मुली आणि मी त्यांची स्वयंसेवक! मुली एका ओळीत उभ्या राहिल्यात, मान्यवरांच्या हस्ते “फ्लॅग ऑफ” होण्याची वाट पाहत! एकेकीच नाव पुकारल गेलं आणि आपलं नाव ऐकुन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहिला! “मी..मी” म्हणत एकजणीने आनंदाने जागीचं गिरकी घेतली, एकीने उड्या मारत टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला, एकीच नाव पुकारलं आणि दुसरीने “ही ही” म्हणतं तिच्याकडे निर्देश केला!


मुलींच्या देहबोलीत टोटल परिवर्तन बघत होते मी! चेहरा आणि शरीर अभिव्यक्त झालेलं, अंगात उत्साह संचारलेला, स्पर्धेचं स्फुरण भिनलेलं आणि भेदक-भिरभिरलेल्या नजरेत एक चंदेरी आशा पल्लवित झालेली!

सर्वजण पळण्याच्या आवेशात उभ्या! कमरेपासून वरील शरीर पुढे झुकलेले, एक हात मागे-एक पुढे, एक पाय पुढच्या पायरीवर तर एक मागच्या पायरीवर स्थिरावलेला.....मान्यवरांच्या हातातील पांढरा झेंडा आकाशाकडे झेपावला आणि “पळा” आवाज ऐकुन मुली सुसाट धावल्या!

एक मुलगी जोशात इतकी सुसाट धावली की काही पायऱ्यातच दमली. हात आणि मानेने “नाही, नाही” म्हणत चक्क मागे फिरली! परतण्यापासून तिला थांबवलं, शांत उभे राहण्यास सांगितलं, तिचा श्वास स्थिर होण्याची वाट पाहिली, पाणी विचारलं, माझ्या हाताला धरून हळूहळू पायऱ्या चढण्यास प्रोत्साहित केलं! हळूचं मग विचारलं “आता पळणार?” दुसऱ्याच क्षणी माझा हात सोडून ती धावली!

एकामागून एक मुले-मुली पायऱ्या चढून येतं होते. काहीजण कठड्याचा आधार घेऊन तर काही स्वतंत्रपणे! काहीजण थांबत तर काहीजण न थांबता एका स्थिर गतीने! काही मुले-मुली तर अक्षरक्ष: धावताहेत....बाजूला उभे आम्ही स्वयंसेवक टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहन देतोय....

मी विचार करतेय....ह्यांना तहान लागली असेल का, घसा कोरडा पडला असेल का? पायात गोळे आले असतील का? पाणी विचारावं का?.....

अशातच एक मुलगी चढून येताना दिसली. तिची आई थोडीशी दमलेली वाटली. आईला म्हटलं, “थोडा वेळ थांबा तुम्ही. मी जाते तिच्या सोबत”. त्यांनी  मुलीला विचारलं, “जातेस मावशीबरोबर?”. धाप लागलेल्या अवस्थेतही मुलगी हसली आणि लगेचचं आईचा हात सोडून तिने माझा हात पकडला! “स्पर्श, सोबत आणि सूरक्षितता” ह्या त्रिगुणी भावनेने मी सुखद शहारले!


टाळ्या वाजवून सुहास्य वदनाने प्रोत्साहन, वेळप्रसंगी हाताचा आधार, तोल सावरण्यास मदत,  पाठीवर प्रेमाची एक हलकीशी थाप, धाप लागलीय तर पाठ चोळून देणं, प्रोत्साहन पर टाळी हातावर देणं, “गुड, व्हेरी नाईस, गुड गोइंग, कम ऑन बेटा, थोडचं राहिलं आता, संऽऽऽपल” ह्यासारखे शब्दोच्चार! एक स्वयंसेवक म्हणून मी हे केलं.....  

प्रोत्साहन त्यांना मिळत गेलं आणि आत्मपरीक्षण माझं होत गेलं-----

जवळपास शंभर मुला-मुलींनी स्पर्धेत भाग घेतलेला! मुला-मुलींसोबत त्यांचे पालक आणि शिक्षक ओघाने स्पर्धेत उतरलेले!

वर्तन समस्या आणि स्वमग्नतेच्या विविध श्रेणीतील ही मुले-मुली! पर्वती चढताना मात्र एकाचं श्रेणीत गुंफली गेलेली, "प्रगती आणि परिवर्तनाची श्रेणी!"

बक्षिस वाटप विजेत्यांसाठी !  सुखद क्षण आणि आनंदी जल्लोष होता प्रत्येकासाठी!


मुला-मुलींच्या वर्तनाचा थक्क करणारा आलेख! त्यांचा उत्साह, उर्जा, आत्मविश्वास, धैर्य आणि क्षमते पलीकडे स्वत:ला झोकून देण्याची लीलया अचंबित करणारी!


नवक्षितीज संस्था (डॉ.नीलिमा देसाई), निटॉर इन्फोटेक, सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन (श्री. सुरेंद्र दुगड), झेप (श्री. राजाभाऊ पाटणकर), रोटरी इंटरनॅशनल नवक्षितीज प्रकल्प (सुबोध मालपाणी) आणि रोटरी क्लब ऑफ गांधीभवन (गणेश जाधव) इ. संस्थाच्या सामुदायिक सहकार्यातून आजची ही स्पर्धा आयोजित झालेली. "विशेष" मुला-मुलींनी शाळाबाहय जगाला आणि निसर्गातील आव्हानांना  सामोरं जावं, त्यांच्यातील लपलेल्या क्षमता बाहेर याव्यात ह्या उद्देशाने ही स्पर्धा ठेवलेली आणि अशा प्रकारच्या स्पर्धेचं (ट्रेकिंग इ.) हे दहावं वर्ष!

सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशनने दिलेल्या आर्थिक सहकार्यातून स्वमग्न मुले ह्या वर्षीच्या स्पर्धेत सहभागी झाली, झेप संस्थेचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी ऑन फिल्ड खूप मोलाचं योगदान दिलं, रोटरी क्लब संस्थेचा सहा वर्ष सातत्याने सहभाग........   

नवक्षितिज संस्थेच्या टीमचे मुला-मुलींसाठीच्या ह्या स्पर्धेसाठी अथक परिश्रम.....


पर्वती “उतरत” घराकडे परतत होते ....अंतरंगात ओसंडून वाहणारा “अति” विशेषपणा “खाली येत होता” ......“विशेष” पणा स्वच्छंदपणे आकाशाकडे भरारी घेत होता!

धन्यवाद!

स्वयंसेवक म्हणून भूमिका निभावण्याची संधी मला दिल्याबद्दल "झेप" संस्थेचे खास आभार!

फोटो आभार: गणेश आगाशे सर

Lingana Darshan with Ushaprabha Page and Abhijeet Belhekar on 28th January 2018

लिंगाणा किल्ल्यासंबंधित क्लायंबिंग, रॅपलिंग, शिवलिंग, केव्ह्ज, रायलिंग पठार इ. अगणित बातम्या मी दोन वर्षापासून ऐकत होते, वाचत होते आणि फोटो देखील पाहत होते. कमीत कमी “लिंगाणा दर्शन” तरी व्हावं ही इच्छा तेव्हापासून मनात रुंजी घालत असली तरी ती काही केल्या पूर्ण होत नव्हती. “लिंगाणा दर्शन” होणार तरी कसं हा प्रश्न सतत मनात घर करून होता!
एक दिवस “गार्डियन गिरिप्रेमी इंस्टीटयूट ऑफ माउंटेनिअरिंग (जीजीआयएम)” संस्थेची “निसर्गानंद” इव्हेंट अंतर्गत “ट्रेक टू रायलिंग पठार” हो पोस्ट वाचली आणि “लिंगाणा दर्शन” ही इच्छा पूर्ण होणार ह्या आनंदाने ट्रेकसाठी कन्फर्मेशन लगेचच करून टाकलं!

दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ६.१५ ला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेटपाशी ग्रुप भेटला आणि समोर “उष:प्रभा पागे” मॅडम ना बघून चकित झाले. मॅडम ट्रेकला आहेत हे कळाल्यावर तर आकाश ठेंगणे झाले! एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) समीट केलेल्याचं सर्टिफिकेट मॅडमच्या हस्ते प्रदान झालं होतं तरी त्याच्या सोबत ट्रेक करायला मिळावा ही इच्छा आज पूर्ण होत होती!

साधारण पावणेसातच्या सुमारास आम्ही पुण्यातून निघालो, ८.३० ला वेल्हे गावातील हॉटेल मधे नाश्ता करून मोहरीचा रस्ता धरला. मढेघाटला जाणारी वाट, गुंजवणी धरणाचा जलाशय, वाटेवरचा तोरणा, रायगड, लिंगाणा सुळका मागे टाकत जाताना कच्चा फुफाट्याचा रस्ता लागला. लालसर मातीची धूळ उडू लागली आणि गाडी मोहरी गावात येऊन पोहोचली. गावातील एका घराच्या अंगणात सहभागींची ओळख परेड झाली. जीजीआय तर्फे चालणाऱ्या “आव्हान” “निर्माण” प्रकल्पातील मुले, ईबीसी ट्रेकसाठी नाव नोंदवलेले आणि रायलिंग पठार ट्रेकसाठी आलेले असे एकूण आम्ही ४६ सहभागी होतो. ह्या ओळख परेड दरम्यान “अभिजित बेल्हेकर” सर पण  ट्रेकला आहेत हे कळालं आणि “सोने पे सुहागा” अशी स्थिती झाली! लोकसत्ता वर्तमानपत्रात सरांचे येणारे लेख वाचून, प्रसंगी त्याची कात्रणे जपून ठेवून माझ्या ज्ञानाचा आलेख वाढवत ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला/रादर करत आहे. असो.

ओळख परेड नंतर अभिजित सर “ट्रेक आणि ट्रेकर” याबद्दल बोलले. पाने, फुले, पक्षी, प्राणी, तिथे राहणारे लोक, घरे, घराची रचना, त्या ट्रेकचा इतिहास, त्याचे महत्व, भूभाग, पाण्याचा स्त्रोत इ. गोष्टींचा अभ्यास ट्रेकर ने करावा हे सांगताना त्यांनी सांगितलेल्या खासकरून दोन गोष्टी खुपच महत्वाच्या वाटल्या. एकतर ट्रेकच्या “नोंदी” ठेवाव्यात आणि दुसरे ह्या गोष्टी एका ट्रेकर कडून नाही झाल्या तर तो “ट्रेकर नाही तर पोर्टर” आहे! ह्या दोन गोष्टींचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या उद्देशाने हे संस्कार रुजवणाऱ्या सरांसारख्या व्यक्ती किती मोलाचं कार्य करत आहेत ह्याची जाणीव झाली!

रायलिंग पठारच्या दिशेने ट्रेक सुरु झाला. वाटेत जंगलातून जाताना (आणि परतताना सुद्धा) उषा मॅडम फुले, पाने, वनस्पती यांची माहिती देत होत्या. त्याच्या बोटॅनिकल नावापासून, त्याच मराठी नाव, त्याचा उपयोग अगदी सर्व! खाजकुयरी, निळी अबोली, एकपाकळी (...बापरे सर्व नावे माझ्याही लक्षात नाहीत) अशा कित्येक पानाफुलांची माहिती त्यांनी दिली. वयाच्या पंचाहत्तरीला ट्रेकचा हा उत्साह, पाना-फुलांचे सर्वांगीण ज्ञान हे पाहून क्षणभर मी “लिंगाणा दर्शन” हा हेतू विसरून गेले होते.
साधारण पंचेचाळीस मिनिटात रायलिंग पठारावर पाऊल पडलं आणि अजस्त्र, अभेद्य, विराट आणि अफाट अशा लिंगाणा किल्ल्याचे दर्शन झाले! समोर लिंगाणा आणि पार्श्वभूमीवर रायगड! रायगड मधला “राय” आणि लिंगाणा मधील “लिंग” अशी फोड होऊन “रायलिंग” हे नाव पडलं! रायलिंग पठारावरून समोर दिसतो लिंगाणा आणि मागे रायगड.पण गंमत वाटली “रायलिंग च्या नावात पहिला “रायगड” आहे आणि मग “लिंगाणा”! असो.अभिजित सरांनी यावेळी उल्लेख केला की ट्रेकला येण्याआधी ते श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना भेटले. त्यांनी सागितले, “लिंगाणा किल्ल्यावर शिवलिंग आहे म्हणून ह्या किल्ल्यावर फक्त हिंदू धर्माचे कैदी ठेवले जायचे. अन्य कैदी वासोट्या किल्ल्यावर ठेवले जायचे”. कोकण, घाटमाथा आणि देश यांची माहिती देताना अभिजित सरांनी घाटवाटा जसे लिंगाण्याच्या सभोवताली असणाऱ्या बोराट्याची नाळ, बोचेघळ, सिंगापूर नाळ, आग्या नाळ, गोप्या घाट, शेवत्या घाट, कावळ्या घाट या पूर्वीच्या दळणवळणाच्या मार्गांची आणि कोकणदिवा किल्ल्यांची ओळख करून दिली.


उषा मॅडने सांगितले की हिरा पंडित आणि त्यांच्या १३ जणांच्या टीमने लिंगाण्यावर १९७५ मधे पहिली चढाई केली. १९७८ मधे लिंगाण्यावर चढाई करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या! आठवण सांगताना त्या म्हणे, “लिंगाणामाची मधून बबन नावाच्या मुलाला आम्ही विचारल. तो लिंगाणा चढायला तयार झाला. माकडासारखा भराभर तो लिंगाणा चढला. आम्ही विनारोप चढलो फक्त शेवटच्या २५ फुटावर आम्ही रोपचा आधार घेतला. तेव्हा ११ वर्षाचा असणारा बबन आता ५० वर्षाचा आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आम्ही त्याला आवर्जून बोलवलं होतं”!

पहिली महिला, जिने लिंगाणा सर केला त्या आमच्यासोबत होत्या! वाव काय फिलिंग होतं!

रायलिंग पठाराबरोबर “बोराट्याची नाळ” चढणे आणि उतरणे, खासकरून ईबीसी ट्रेकला जाणाऱ्यांसाठी हा प्रक्टिस ट्रेक यावेळी ठेवला होता. वेळेअभावी २५ मिनिट उतरण्याची मर्यादा होती. “जाऊ की नको” हा विचार गुडघेदुखी मुळे सुरु होता. एकाक्षणी ठरवलं “हीच ती वेळ आणि हाच तो क्षण”! रायलिंग पठारावरून ही नाळ उतरण्याचा पहिलाचं पॅच जबरदस्त स्लीपरी होता. नाळ उतरत असताना लक्षात आलं की इथले दगड चांगलेच घट्ट रोवले गेलेले होते. त्यामुळे उतरणं आणि चढणं सोपं गेलं. “भोरांद्याचे दार” उतरण्याच्या तुलनेत ही नाळ उतरणं सोपं वाटलं. तिथली दगडे म्हणजे पसरलेले छोटे तुकडे जे हलत होते! असो. बोराट्याची नाळ चढणं आणि उतरणं हा अनुभव ही पदरात आला!


ह्या संपूर्ण ट्रेकमधे आमच्या छोट्या वरदची सोबत खूप आनंद देऊन गेली. वरद हातोळकर हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा. अचानक ट्रेकला भेटला. त्याचे “आव्हान” प्रकल्पातील अनुभव तो सांगत होता. त्याच्यावर आणि ट्रेकला आलेल्या अन्य मुलांवर आउटडोअरचे जे संस्कार होत आहेत ते पाहून पालकांचं कौतुक करावसं वाटलं!“रायलिंग पठार” खरं तर साधा सोपा ट्रेक! (ट्रेकिंग ग्रुप्स, ट्रेकर्स त्याला कदाचित ट्रेक मानतही नसतील) पण त्याने माझी “लिंगाणा दर्शन” ही दोन वर्ष मनात साठलेली इच्छा पूर्ण केली. इच्छापूर्तीची मानवंदना लिंगाणा किल्ल्याला देताना बद्ल्यात इच्छापूर्तीचे दान ही त्याने माझ्या पदरात टाकले. उषा मॅडम आणि अभिजित सर ह्यांची साथ देऊन “आजि सोनियाचा दिनु| वर्षे अमृताचा घनु|” (सगळा दिवसचं सोन्याने उजळून निघाला आणि आकाशातून अमृताचा वर्षाव झाला) तद्वत अलौकिक अनुभव मला दिला!

लिंगाणा जितका विराट, विशाल, महाकाय त्याच तोडीच ह्या दोघांच कार्य! वाटलं रायलिंग पठार पण आज त्यांच्या स्पर्शाने पुनीत झाले!

“लिंगाणा किल्ला” आणि "रायलिंग पठार" त्यांच्याविषयी भरभरून लिहिण्याची एक संधी मला नक्कीच देतील पण आजचा हा ट्रेक अनुभव उषाताई आणि अभिजित सर खास तुमच्यासाठी!

जीजीआयएम (खासकरून अंकित, विशाल आणि सिद्धार्थ), श्री. जयंत तुळपुळे सर, भूषण आणि दिनेश यांचे धन्यवाद, ज्यांच्यामुळे हा “सोनियाचा” दिवस माझ्या आयुष्यात आला!

एकापाठोपाठ एक सुखद दान वाट्यात टाकून माझी ओंजळ मंगलमय केल्याबद्दल “लिंगाणा” तुला त्रिवार अभिवादन! 

फोटो आभार: ट्रेक टीम

Panaromic Pandavgad via Menavali trek,14th January 2018


पांडवगड, एक ऑफबीट ट्रेक, महाभारतातील पांडवांचा गडाशी असलेला संबंध आणि “ट्रॅव्होरबिस आउटडोअर्स” ह्या ग्रुपने उल्लेख केलेले “पॅनारोमिक पांडवगड” हे नाव, ह्या गोष्टींनी हा ट्रेक करण्यास मला उद्युक्त केले.

सकाळी ६.३० वाजता पुण्यातून निघून वाईमार्गे मेणवली गावातून गडाच्या पायथ्याशी पोहोचून साधारण ९.३० वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली.

गिरिदुर्ग प्रकार, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगा, समुद्र सपाटीपासून साधारण ४००० फुट उंची, वाईपासून अवघ्या ५-६ किमी अंतर हे ह्या गडाचे बाह्यवर्णन! श्री. प्रमोद मांडे सरांनी त्यांच्या पुस्तकात या गडाचे केलेले वर्णन खालीलप्रमाणे,


गडावर तीन मार्गांनी जाता येते, मेणवली मार्गे, शेलारवाडीतून आणि धावडी मार्गे!खरंतर, प्रत्येक मार्गाचे आपले असे एक विशिष्ट असते. शेलारवाडी पर्यंत गाडी जाते, धावडी मार्ग अलीकडेच बांधलेल्या पायऱ्यांचा मार्ग आणि मेणवली मार्ग तसा ऑफबीट आणि जरा लांबलचक! आम्ही मेणवली मार्ग निवडला कारण, गडाच्या विस्तार आणि व्याप्तीचे आकलन व्हायचे असेल तर अशा लेन्दी आणि ऑफबीट मार्गाने प्रथम जावेअसे आमचा मित्र “स्वप्नील खोत” म्हणतो! (स्वप्नील बद्दल काही लिहिणे म्हणजे सह्याद्रीत चमकणाऱ्या ह्या “काजव्याला दिवा दाखवण्यासारखे” आहे! त्यापेक्षा त्याच्यासोबत ट्रेक करून तुम्हीच तो अनुभव घ्यावा असे मी सुचवेन). असो.
 
९.३० वाजता गड चढायला सुरुवात केल्यावर साधारण तासाभराने आम्ही पहिल्या माचीवर येऊन ठेपलो. माचीवरून महाबळेश्वर आणि धोम धरणाचा जलाशय नेत्रसुखद दिसत होता. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ आणि ब्रिटीश काळापासून प्रसिध्द असलेल्या जवळजवळ ३३ पॉइंट्समुळे जास्त प्रसिद्ध असले तरी “क्षेत्र महाबळेश्वर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री आणि वेण्णा या पाच नद्या उगम पावतात आणि इथे ह्याला "पंचगंगा मंदिर" असे म्हणतात. धोम धरण म्हणजे मेणवलीपासून साधारण ६ किमी अंतरावर “धोम” नावाचे गाव आहे. धौम्य ऋषींच्या नावावरून ह्या गावाचे नाव धोम पडले असे सांगतात. धोम गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून नदीवर बांधलेल्या धरणाला धोम धरण म्हणून ओळखले जाते.धोमचे नृसिंह मंदिर प्रख्यात आहे (संदर्भ:आदित्य फडके लिखित :"साताऱ्याच्या मुलखात" हे पुस्तक, पान नं. १६४ आणि ९१) असो.


नेत्रसुखद ह्या परिसराशिवाय माचीवर भैरवनाथाचे मंदिर आणि मंदिराबाहेर काही प्राचीन अवशेष बघायला मिळाले.


भैरवनाथाच्या मंदिराला वळसा घालून दुसऱ्या माचीकडे कूच करताना उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता. वाळलेल्या गवताची  पायवाट कापीत, खाली खड्ड्यांचा अंदाज घेत, कूसळांपासून स्वत:चा बचाव करत आम्ही चाललो होतो. आता एका घराजवळ येऊन ठेपलो. घरातील मावशी म्हणे, पावसाळ्यात आजूबाजूला सगळीकडे आधी पाऊस पडतो त्यानंतर पांडवगडावर पाऊस येतो. आजूबाजूचा सर्व परिसर ओला असतो पण पांडवगड कोरडाच दिसतो. त्याची कहाणी अशी सांगितली जाते की पर्जन्यराजाच्या आगमनाच्या वेळी पांडव जेवायला बसले होते. पांडवांनी पर्जन्यराजाला विनंती केली की “आमचे भोजन होईपर्यंत इथे पडू नकोस” म्हणून हा पाऊस आधी आजूबाजूला बरसतो आणि मग पांडवगडावर”!

घराजवळील झाडाखाली क्षणभराची विश्रांती उरकून जवळचं असणाऱ्या विहिरीचे थंडगार पाणी पिऊन आम्ही दुसऱ्या माचीच्या दिशेने ट्रेक सुरु केला. गडावर जायला अनेक पायवाटा आहेत. माचीकडे जाणाऱ्या खड्या चढाची वाट न पकडता आम्ही जंगलाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. जंगलाची ही वाट थोडी नागमोडी, घनदाट झाडांची सावली देणारी होती. ही वाट मळलेली नव्हती त्यामुळे वाटेचा शोध घेत आम्ही चाललो होतो. वाटेवर सागाच्या झाडांची वाळलेली पाने विखुरलेली होती. चालताना त्या पानांचा "सरसर" असा आवाज येत होता! आम्ही थोडे पुढे गेलो आणि लक्षात आले की जंगलातील ही वाट गावकऱ्यांनी काट्या-कुट्यांनी बंद करून टाकली आहे. अजूनही २-३ वाटा अशाच रीतींने बंद केलेल्या आढळल्या. माघारी येऊन खड्या चढाईच्या मळलेल्या मार्गाने गडावर जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. साधारण पाऊण तासाने आम्ही गडाच्या दुसऱ्या माचीवरील बुरुजावर येऊन पोहोचलो. इथून धोम धरण जलाशयाचा विस्तार दिसून येत होता!

आता आमची वाटचाल बालेकिल्ल्याच्या दिशेने सुरु झाली. गडाचे प्रवेशद्वार, कातळात कोरलेल्या पायऱ्या, गडमाथ्याच्या कपारीतून जाणारी पायवाट, पाण्याच्या टाक्या पाहत पाहत हनुमानाच्या मंदिराजवळ आम्ही आलो. बालेकिल्ल्याच्या वाटेवर पत्र्याची शेड उभारलेल्या मंदिरात दगडात कोरलेली शेंदूर रचित ही मूर्ती आहे. 

जवळच सुस्थितीतील चुण्याचा घाणा आहे. इथून काहीच पावलांच्या अंतरावर गडाच्या दुसऱ्या भक्कम दरवाज्यातून प्रवेश केल्यावर “पांडजाई” (पांडवजाई) देवीचे मंदिर आहे. मंदिरासमोर "विष्णुपद”, शिवलिंग, नंदी आणि इतर प्राचीन वाड्याचे आणि तटबंदीचे अवशेष बघायला मिळाले. 

बालेकिल्ला छोटा असला तरी गडमाथ्यावर असणाऱ्या विस्तीर्ण पठारामुळे ह्या किल्ल्याचे सौदर्य वाढते. आजूबाजूच्या महाबळेश्वर डोंगररांगामध्ये हा तसा एक तुटक किल्ला! ६ मी. उंचीचा नैसर्गिक कातळसुळका हे गडाचे एक खास वैशिष्ट्य!गडमाथ्यावर उभे राहिले की ३६० डिग्री अंशातून आजूबाजूचा परिसर आणि डोंगर रांगा दिसणारा हा एक अद्वितीय किल्ला! म्हणूनच उल्लेख करतात “पॅनारोमिक पांडवगड”! कोळेश्वर, रायरेश्वर, कमळगड, रोहिडा, महाबळेश्वर आणि मांढरदेवी इ. गडांच्या रांगा पठारावरून दिसतात. 

१९९१-९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला. किल्ल्यावरून राज्यावर देखरेख ठेवण्याचं महत्व ध्यानी ठेऊन जे अनेक किल्ले बांधले गेले त्याच हेतूने बांधलेला हा किल्ला! पुढे. इ.स. १६७३ मध्ये पांडवगड शिवरायांनी ताब्यात घेतला. इस. १७०१ मधे किल्ला मोगलांच्या त्याब्यात गेला. नंतर लगेचच मराठ्यांनी परत त्याचा कब्जा घेतला. नंतरच्या काळात १८१७ मधे त्रिंबकजी डेंगळयांनी ब्रिटीशांशी दिलेल्या एका झुंजीत त्यांना या गडाचा उपयोग झाला. अखेर १८१८ मधे मराठेशाही बुडाली तेव्हा इतर किल्ल्याबरोबर हा किल्ला इंग्रजांनी जिंकला. (संदर्भ: पांडुरंग पाटणकर लिखित "चला ट्रेकिंगला", पान नं १३२-१३३). आता गडावरील जमीन मॅपको कंपनीच्या नावावर आहे. गडाच्या धावडीमार्गाच्या वाटेवर पांडवलेणी आहेत. पहिल्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये आठ विहार आहेत तर दुसऱ्या लेण्यामध्ये स्तूप आहे. (संदर्भ: आदित्य फडके लिखित :"साताऱ्याच्या मुलखात" हे पुस्तक, पान नं. २०)

दुसऱ्या माचीपासून बालेकिल्ल्यापर्यंत गड बघायला आम्हाला साधारण दीड तास लागला. गड उतरलो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. उतरतीच्या मार्गावर नजर मागे पांडवगडाच्या दिशेने वळत होती. ह्या गडाचा विस्तार खरोखरचं अचंबित करत होता! 

भगवान चिले सरांनी त्यांच्या “गडकोट” ह्या पुस्तकात पांडवगडाचे वर्णन “वाईचा मुकूटमणी” असे केले आहे. आहे ना किती यथार्थ, समर्पक नामकरण! 


आता उत्सुकता होती ती नाना फडणवीस वाडा आणि मेणवली घाट बघण्याची! वाई पासून ३ किमी असणारे मेणवली गाव, नाना फडणवीस यांनी कृष्णा नदीच्या काठावर बांधलेल्या वाड्यामुळे आणि काठावर बांधलेल्या अमृतेश्वरच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे!

बाहेरून वाड्याची रचना गढीवजा वाटली. बाहेर गणेशाची मूर्ती आहे आणि वाड्याची माहिती दर्शवणारा फलकही आहे.मेणवली घाट, अत्यंत शांत, रम्य आणि पवित्र स्थळ !कृष्णाकाठी बांधलेल्या अमृतेश्वरच्या मंदिरात ६ ते ७ फुट खाली शिवलिंग आहे असे म्हणतात परंतु अंधार झाल्याने आम्हाला ते दिसू शकले नाही. मंदिरासमोरील एका मंडपात एक अजस्त्र घंटा बांधलेली दिसली. घंटेवर पोर्तुगीजांचे चिन्ह असून इ.स. १७०६ ही अक्षरे कोरली आहेत. ही घंटा म्हणजे, इ.स. १७३८ सालामध्ये पोर्तुगीजांबरोबर झालेल्या युद्धामधील विजयाचे प्रतीक आहे!


मावळतीच्या सूर्यप्रकाशात कृष्णामाई नदीच्या घाटावर ध्यानमग्न अवस्थेत बसण्याच्या अनुभूतीने ह्या ट्रेकचा शेवट ही सर्वांग सुंदर गोष्ट मला वाटली!

तिळगूळ सेवन करून गडावर मकरसंक्रात सणसाजरा, सणाच्या स्मृतीरूपाने भेट मिळालेला पतंग, आणि नवीन ट्रेक सहकाऱ्यांची ओळख आणि त्यांच्या सोबत ट्रेकदरम्यान झालेल्या गप्पा ह्यामुळे ट्रेकचा आनंद द्विगुणीत झाला!


ह्या ट्रेकचा मेन लीडर "रोहित काबदूले" होता. रोहितला भेटून मी त्याला प्रथमचं भेटत आहे असं वाटलं नाही. त्याच्या सोबत खूप चटकन आणि छान झालेले असोसियेशन माझ्या नेहमीचं स्मरणात राहिल.  असो. 


  

वरुणराजानेही ज्यांच्या विनंतीचा मान राखला त्या पांडवांचा लाभलेला अधिवास, धोम धरणाचा सुंदर जलाशय, कृष्णामाई नदीच्या तीरावरील मेणवली घाटाची पवित्रताघनदाट विलोभनीय वनश्री, प्रचंड विस्तारलेल्या दोन माची, बुरुज, बालेकिल्ला, पांडजाई देवीचे मंदिर आणि नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या कमळगड, मांढरदेवी, रायरेश्वर डोंगरांच्या सुरम्य रांगांनी नटलेला असा हा पांडवगड!  


धावडीमार्गे ट्रेक करून “पांडवलेणी” बघण्याची उत्सुकता आता प्रबळ झाली आहे! त्यावेळी भेटूचं!

मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा!


ट्रेक सहकारी (उजवीकडून): स्वप्नील खोत, रोहित काबदूले, दीप्ती सावंत आणि सचिन सावंत.

फोटो आभार: ट्रेक टीम