प्रतापगड-पारसोंड-रडतोंडी घाट मार्गे मुंबई पॉईन्ट, महाबळेश्वर, १५-१६ जुलै २०१७


“सीवा सीवा, म्हणजे बिशाद काय? चढे घोड्यानिशी जिवंत कैद करून घेऊन येतो” अशी गर्जना विजापूरच्या दरबारात करून पैजेचा विडा उचलणाऱ्या अफझलखानाचा, शिवाजीमहाराजांनी जावळीच्या दुर्गम प्रदेशात शिवनिर्मित उभ्या प्रतापगडाच्या माचीखाली (याला किल्ल्याचे मेट म्हणतात) खातमा केला!

शिवप्रतापाचा साक्षीदार प्रतापगड हा  गिरिदुर्ग प्रकारातील दुर्ग समुद्रसपाटीपासून ३५५६ फुट उंचीवर असून महाबळेश्वरनजीक जावळीच्या खोऱ्यात उभा ठाकला आहे! श्री.निनाद बेडेकर त्यांच्या "दुर्गकथा" पुस्तकात लिहितात की, "पारघाटावर नजर ठेवण्यासाठी तसेच कोयनेच्या खोऱ्यावर डोळा ठेवण्यासाठी शिवाजीराजांनी बहुधा हा दुर्ग बांधला असावा!"




"पारसोंड अर्थात पार गाव, शिवपूर्व काळात व त्यापूर्वी देखील प्रतापगडाच्या पायथ्याशी व पारघाटाच्या माथ्यावर वसलेले पार गाव हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. या गावातून प्रतापगडाचे सुंदर दर्शन दिसते. अफजलखान शिवाजीमहाराजांविरुद्ध चालून आला त्यावेळी त्याचा तळ पार गावात होता". असा उल्लेख सतीश अक्कलकोट लिखित "दुर्ग" खंड पहिला या पुस्तकात आढळतो.


रडतोंडी घाट, महाबळेश्वराच्या पायथ्याशी असणाऱ्या हा घाटमार्गाने अफजलखान पार गावात आणि पर्यायाने प्रतापगडावर आला असावा असे म्हटले जाते.




मुंबई पॉईन्ट अर्थात बॉम्बे पॉईन्ट, महाबळेश्वर डोंगराच्या पश्चिम कड्यावर असल्यामुळे इथून सूर्यास्त विलक्षण विलोभनीय दिसतो. म्हणून त्याला सनसेट पॉईन्ट असेही म्हणतात.

शिवकालीन इतिहासात "प्रतापगड युध्द" म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सर्व पाऊलखुणांना उजाळा देणारा "प्रतापगड ते महाबळेश्वर व्हाया रडतोंडी घाट" हा ट्रेक करण्यासाठी आम्ही २० जण एस. जी. ट्रेकर्स सोबत निघालो होतो. रविवार १६ जुलै ला पहाटे पहाटे पाच वाजता आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. पावसाळयाचे दिवस! तूफान पाऊस! गर्द धुके! थंडगार बोचरा वारा! निसर्गाने आमचे स्वागत असे केले!

गरमा गरम चहा आणि नाश्ता करून ७ वाजता प्रतापगड फेरी साठी निघालो. वेळेअभावी फक्त बालेकिल्ला बघायचा ठरले होते. बालेकिल्ल्यापर्यंत पायऱ्याचं पायऱ्या! पायऱ्यावरून पावसाच्या पाण्याचे लोट वाहत होते! गर्द धुक्यामुळे सभोवतालचा नजारा दिसत नसला तरी महादरवाज्यातून आत गेल्यावर सुरेखशा बगीच्याच्या मधोमध छ. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा दिसला. तिथेच शिवछत्रपतींनी जातीने लक्ष घालून स्थापन केलेल्या स्फूर्तीदेवता आई भवानीचे मंदिर आहे. तिथून बालेकिल्ल्याच्या तटावर गेलो. ह्या तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते पण गर्द धुक्यामुळे आम्हाला ते दिसले नाही.

पाठ्यपुस्तकातील प्रतापगड माचीचे चित्र, राजमाता जिजाऊंचा आवडता गड आणि अफझलखानचा वध प्रसंग यामुळे खरंतर शाळेपासून प्रतापगड मनात ठसलेला. आज तो पाहण्याचा योग देखील आला पण गर्द धुक्यामुळे आणि वेळेअभावी बालेकिल्ल्यावरचं समाधान मानावे लागले. परंतु जो भाग आणि शिवकालीन अवशेष नजरेखालून गेले ते पाहून हा गड एकदा निवांत येऊन बघायचा असे मात्र निश्चित केले!

पायथ्याशी आल्यावर ट्रेक सहभागींची ओळख परेड झाली. विशालने प्रतापगडाची माहिती दिली आणि ट्रेक ची कल्पना दिली. पारगाव, घोघलवाडी आणि रडतोंडी घाट असा ट्रेक होता. ८ वाजता ट्रेकला सुरुवात केली. सुरुवातचं झाली ती घनदाट झाडीतून. जिथे अफझलखान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली आणि सध्या जिथे अफझलखानचे समाधीस्थळ इथे आहे त्या जागेला त्या काळी "जणीचं टेंब" म्हणत असतं. गर्द धुक्यामुळे आम्हाला ते दिसून आले नाही!

एकावेळी एकच जण जाऊ शकेल अशी एक छोटी पायवाट. झाड्यांच्या फांद्या बाजूला करत प्रसंगी तोडत वाट काढावी लागत होती. काही काटक्या रस्त्यावर विखुरलेल्या. त्या पायात येणार नाहीत ह्याची काळजी घेत जंगलातली ही वाट पार करावी लागत होती.


आभाळ आल्याने अंधारून आलेले, पावसाची संततधार, धुके साफ होण्याची शक्यता नाही, घनदाट झाडी, चिखल मिश्रित गढूळ पाण्याने वाहणारी पायवाट, संपूर्ण उतार...मनात आले सुरुवातीलाचं इतकी गर्द वनराई तर रडतोंडी घाट कसा असेल?

तासा-दीड तासानंतर पावसाने किंचित उघडीप दिली, धुके साफ झाले आणि जावळीच्या खोऱ्यात वसलेले पार गाव समोर दिसू लागले. गावातील श्रीरामवरदायिनीचे शिवकालीन मंदिर प्रसिद्ध आहे. तुळजापूरची भवानीच येथे येऊन राहिली असे श्री. रामदासस्वामी सांगून गेलेत. चांदीत केलेले सुबक कोरीवकाम आणि दागिन्यांनी मढलेल्या वरदायिनी आणि श्रीरामवरदायिनीच्या सुरेख मूर्ती, प्रचंड मोठा सभामंडप, मंदिर प्रवेशाची विस्तीर्ण कमान, दीपमाळा, सभामंडपात शिवाजीमहाराजाचा तेजोमय पुतळा इ. मुळे मंदिर परिसर विलोभनीय आणि पवित्र वाटतो.


मी दर्शनासाठी गेले तेव्हा पुजारीकाका पूजा करत होते. त्यांनी श्रीरामवरदायिनीच्या गळ्यातील शिवशिक्का दाखवला आणि “मंदिर शिवकालीन आहे” हे सांगताना अभिमान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

पावसाने परत जोर धरला होता. पुढे घोघलवाडी पर्यंतचा साधारण ३-४ किमी रस्ता हा डांबरी रस्ता होता. ह्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर कोयना नदीवर शिवाजीमहाराजांनी बांधलेला पूल आहे. हा पूल रडतोंडी घाट आणि पार गावाला जोडतो. नदीच्या काठालगत गणपतीचे मंदिर आहे!
    
थोडे पुढे गेल्यावर घोघलवाडीला जायला डावीकडे रस्ता लागला. वाडीच्या अलीकडूनचं रडतोंडी घाटाला जायला वाट आहे. क्षणभर विश्रांती घेऊन जंगलातील घाट मार्गाने जायला सुरुवात केली. असं म्हणतात ह्या मार्गाने बैलावरून मालवाहतूक करायचे!

मुंबई पॉईन्ट पर्यंतचा जावळी खोऱ्याचा हा रडतोंडी घाट दुर्गम डोंगरदऱ्यांनी आणि निबीड अरण्याने व्यापलेला आहे. ही जंगलवाट पार करायला साधारण अडीच ते तीन तास लागले. संपूर्ण चढाई असलेला हा मार्ग ऊंचच्या ऊंच झाडीच्या जंगलातून जातो. असंख्य जातीची झाडे, विविध आकाराची पाने, एकमेकांना अगदी खेटून उभारलेली, जमिनीच्या कितीतरी एकरात पसरलेली, सर्वत्र पानगळ पांघरलेली, पावसाच्या पाण्याने कुजलेली, शेवाळ साठलेलं, त्यात सरपटणारे प्राणी, कीटक, कृमी, वनस्पती आणि  मातीत जगणारे सुक्ष्माणु..

जंगल इतकं घनदाट की पायवाट शोधावी लागते. वाट चुकण्याची अतिशय दाट शक्यता. माणसाचा मागोवा घेणं अत्यंत कठीण. कोणी लपून बसलं, हरवलं तर त्याचा मागमूसही लागणार नाही! हीचं ह्या जंगल मार्गाची खासियत आहे! अफझलखान ह्या मार्गाने का आला असावा ह्याचा अंदाज ह्या जंगलातून जाताना येतो!

हे जंगल लीच (जळू) ने खचाखच भरलेले होते. आमच्यापैकी काही जणांना त्याने आपले लक्ष बनवले. त्यातली मी एक. जळू कधी पायात शिरला, कधी रक्तपिपासू झाला काही कळूनचं आलं नाही. तीन-चार ठिकाणी त्याने दंश केला. मधे एक काळी खपली आणि बाजूला लालसर सूज. दंश केलेल्या एका जागेवरून तर रक्तप्रवाह अखंड सुरु होता. कापूस लावला तर रक्तप्रवाह थांबला. कापूस निघाला तर रक्तप्रवाह परत सुरु. रक्तप्रवाह थांबण्यासाठी शेवटी एक दिवस जखम घट्ट बांधून ठेवावी लागली. रक्तप्रवाह थांबला पण त्याजागी खाज सुटतं होती. हा त्रास आठवडाभर चालू राहिला. घरात असलेले "कॅॅन्डीड-बी क्रीम लावल्यावर आराम मिळाला. आमच्यापैकी काही जणचं त्याचे भक्ष्य बनले, ते का माहित नाही. लीच बद्दल गुगलवर वाचले आणि "लीच थेरपी" बद्दल वाचून चक्रावले. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि रक्त गोठण्यापासून प्रतिबंध होण्यासाठी लीच सलायव्हा वापरली जाते. दंश-दाह देणारा हा कृमी इतका आणि असाही उपयोगी होऊ शकतो हे शास्त्र काही अजबचं! ह्या लीच ने माझा हा ट्रेक मात्र ऐतिहासिक बनवला! अफझलखानाला शिवाजीमहाराज जसे सदोदित डोळ्यासमोर दिसत असावेत तसचं मला काही दिवस डोळ्यासमोर लीचचं दिसत होती! असो.

एका बाजूने विचार केला तर आम्ही फक्त जंगलातून जातोय असं वाटतं होतं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर हा ट्रेक मला "प्रतापगड युद्धाच्या" ऐतिहासिक पाऊलखुणा जागृत करणारा ट्रेक वाटला! तिसरी बाजू ही देखील होती की ऐसी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे ट्रेक्स फुरसतीने करायला हवेत, समजून घ्यायला हवेत आणि त्यांचा आजच्या दुनियेशी संदर्भ लावायला हवा! असो.

अपेक्षेपेक्षा आम्ही लवकर ट्रेक पूर्ण केला. १६-१८ किमी चा ट्रेक ५ तासात पूर्ण झाला. 

वाई जवळच्या अभिरुची हॉटेल मध्ये जेवण केलं. परतीच्या प्रवासात डम्श-राज हा खेळ रंगला. पुण्यात परतलो तेव्हा संध्याकाळचे ६ वाजले होते!

घराकडे परतताना फेरफटका अपूर्ण राहिलेला प्रतापगड आठवत होता, इतिहासातील पाऊलखुणा तपासून पाहिल्याचे समाधान आठवत होते, लीचदंशा मुळे रक्तबंबाळ झालेला पाय आठवत होता, राहुलसोबत मारलेल्या रॅपलिंग टेक्निक, गुगल मॅप वर ट्रेक ट्रेस करणे इ. विषयावरच्या गप्पा आठवत होत्या., “क्या बात है मॅम, दुसरा रेंज ट्रेक” हे विशालचे शब्द आठवत होते आणि कित्येक ट्रेक नंतर आज हस्तांदोलन करत “वेल डन” म्हणताना विशालच्या नजरेत पाहिलेली कौतुकाची चमक डोळ्यासमोरून जात नव्हती!

ट्रेक मधली माझी सध्या “सेकंड इंनिग” सुरु झालीय! “रेंज ट्रेक” ही ती “सेकंड इंनिग”! १८-२० किमीचा टप्पा आणि स्वत:मधील क्षमतांची एक नवीन परीक्षा!


“सिंहगड-राजगड-तोरणा” हा असाच एक ऐतिहासिक रेंज ट्रेक करण्याची इच्छा आहे.. तेव्हा परत भेटूचं...शिवकालीन इतिहासातील अशाच काही पाऊलखुणा जागृत करण्यासाठी!


फोटो आभार: संदीप खुराना, प्रकाश यादव आणि ट्रेक टीम
विशेष आभार: एस. जी. ट्रेकर्स

पहिला पायलट रेंज ट्रेक: सिंहगड ते पाबे खिंड, रविवार, ८ जुलै २०१७


कल्याण दरवाजा मार्गे सिंहगड आणि सिंहगड –विंझर-खानापूर रेंज मार्गे पाबे खिंड हा ट्रेक रूट आम्ही घेणार होतो. सकाळी ७ च्या कल्याण एसटीने आम्ही निघालो..विशाल काकडे, मी, सचिन दगडे सर, संदीप चव्हाण, रुपेश गऊल, रोहित गजमल आणि प्रकाश यादव!

साडे-सात पावणे आठच्या दरम्यान कल्याणला पोहोचलो आणि लगेचच ट्रेकला सुरुवात केली. मोरवाडी गावातून ट्रेकची सुरुवात चढाईनेचं झाली. कल्याण मार्गे सिंहगड हा ट्रेक आधी केल्याने रस्ता माहित होता! यावेळी पावसाने उघडीप दिल्याने धुक्यारहित आजूबाजूचा हिरवागार परिसर बारकाईने न्याहाळता येत होता. हळूहळू चढ पार करत होतो आणि कल्याण गाव डोंगरात पहुडलेले दिसू लागले.

हा ट्रेक २० किमी चा होता आणि ह्या मुलांच्या बरोबरीने आणि गतीने मी तो पार करू शकेल की नाही हा धाकधूक मनात होती! पण सांगणार कोणाला?

कल्याण ते सिंहगड हा ३ किमीचा ट्रेक आम्ही रमत गमत साधारण दीड तासात पार केला. आता गवत चांगलेच वाढले होते आणि कल्याण दरवाज्याचा भक्कम बुरुज ठळक दिसत होता.

९ वाजता सिंहगडावर नाश्ता केला आणि १०.१० वाजता पुढील ट्रेकला सुरुवात केली.


विंझर रेंज पर्यन्त हा ट्रेक मार्ग तोच होता तो सिंहगड-राजगड-तोरणा ह्या रेज ट्रेकचा मार्ग आहे! विंझर डावीकडे राहते आणि आम्ही उजवीकडून खानापूर-पाबे असा मार्ग घेतला!

सिंहगडाची ही बाजू मी प्रथमच पाहत होते. इथे रॉक क्लायबिंगचे पॅचेस होते. श्री. हनुमानाची शिळेत कोरलेली मूर्ती तर भन्नाट होती.

विंझर रेंज पर्यंत साधारण ८ किमी अंतर पार झाले होते. थोडा सपाट थोडा चढाईचा, डोंगरपायवाटेचा हा मार्ग आहे. एकामागून एक डोंगर पार करावे अशी ही डोंगरयात्रा! काही ठिकाणी पायवाट इतकी छोटी होती की एकावेळी एकचं जण जाऊ शकेल आणि एकचं पाय  मावू शकेल.

काही अंतरावर गुरे चरायला आलेले एक बाबा भेटले. त्यांनी सांगितलं विंझरपर्यंत जायला दोन तास लागतील आणि पुढे जायला रात होईल. डोंगराच्या रांगं रांगंन न जाता एक शोर्ट कट त्यांनी सुचवला. त्यांच्या बोलण्याने मला थोडं घाबरायलाचं झालं खरतरं!      

क्लायमेट एकदम भारी होत! एकदम आल्हाददायक! नाही पाऊस..नाही ऊन! हलकासा वारा,चहूकडे डोंगर, दरी, पानशेत धरणाचा जलाशय आणि दूरवर दिसणारी राजगड-तोरणा किल्ल्याची रेंज!

दोनचं रंगाची उधळण...आकाशाचा निळा आणि चौफेर हिरवा!

ह्या रस्त्यावर प्रचंड मोठे थोडेसे ओबडधोबड खडक लक्ष आकर्षित करून घेत होते. “विसाव्यासाठीच मी” असे सांगत होते!  फोटोग्राफीसाठी तर उत्तम लोकेशन!

आम्ही तसे बऱ्यापैकी निवांत जात होतो. विंझर रेंज दोन तासात पूर्ण केली असली तरी अंतर निम्मेच पार झाले होते.

विंझर रेंज सोडली आणि एका थोड्या धोकादायक वळणावर आम्ही आलो. विशालने मला आधीचं कल्पना दिली आणि पाय कसा घसरतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. छोटी पायवाट आणि ओली पण भुसभुशीत माती! शेत नांगरल्यावर जशी माती दिसते अगदी तशी! विशाल माझ्या मागे-पुढे होताचं! त्यात झाडाच्या फांद्या दोन्ही बाजूने कमान करून होत्या. त्या बाजूला करत करून ती बारीकशी पायवाट पार करणं एक कसरत होऊन बसली!

आता मागे वळून बघितलं तर दोन टॉवर ठळक दिसणारा सिंहगड आणि समोर बघितलं तर राजगड-तोरणा रेंज आणि आपण एकदम मधोमध! खूप भारी फिलिंग होतं! 


आता राहून राहून मला केटूएस ट्रेकची आठवण येत होती. एक टेकडी, मग दुसरी, मग तिसरी....अगदी सेम टू सेम ही रेंज होती! हे डोंगर केटूएस टेकड्याइतके ऊंच नव्हते पण प्रकार अगदी तोच!



काही ठिकाणी तर पायवाट देखील नव्हती! गवत तुडवत मार्ग काढायचा! 

राजगड आणि तोरण्याचा एकेक भाग आता अगदी सुस्पष्ट दिसत होता. राजगडावरील सुवेळा माची -संजीवनी माची-नेढे-बाले किल्ला तर तोरण्यावरील बुधेला माची- झुंजार माची!

थोड्या अंतरावर गारजाई मातेचे मंदिर लागले. इथून पुढे हिरव्या-पोपटी कुरणावर पांढऱ्या फुलांचा सडा पडला होता! अतिशय मोहक आणि आकर्षक!



सह्याद्री पर्वतरांगेच हे वैशिष्ट आहे, इथे वनश्री विविधतेने नटलेली आहे. वनस्पती, रानटी फुले, प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष इ.

आता लांबून पाबे घाट दिसू लागला होता पण जाण्यासाठी घ्यायची रेंज हा लांबचा पल्ला होता. पुन्हा एका मागून एक डोंगर!

सिंहगड आणि त्यावर उभारलेले दोन टॉवर आता दूर होत गेले होते आणि राजगड-तोरणा जवळ दिसू लागले होते! हा अलौकिक भावपूर्ण अनुभव होता! पर्वतरांग म्हणतात ती हीच ना!

ह्या मार्गावर एक वेगळ्या प्रकारचे मशरूम पाहण्यास मिळाले. दिसायला बटाट्यासारखे आणि मातीत रुजलेले!

काही ठिकाणी गुरांची वाट तर काही ठिकाणी डोंगरवासियांची पायवाट! डोंगरवाटा म्हणतात त्या ह्याचं बहुधा!

रॅम्बलर नावाचे एक गुगल अॅप विशालने वापरले ज्याद्वारे तो ट्रेक मार्ग ट्रेस आणि फिक्स करत होता! ट्रेक मार्गाच्या प्रत्येक वळणावर फोटो काढून ते मॅप वर फिक्स केले होते! त्या अॅपवरून ट्रेक मार्गाची पुरेपूर कल्पना येत होती!

पायलट ट्रेकमध्ये मार्ग शोधायचा कसा हे मला काही कळेना. विशाल म्हणे, “दिशा महत्वाची”!

पाबे खिंडीत पोहोचलो तेव्हा ५ वाजले होते. एकूण अंतर झाले होते १६.५ किमी! आनंदोत्सव मग असा साजरा झाला!


हा नाईट ट्रेक होऊ शकतो, टेकड्या मोजायला हव्या होत्या असा विचार आमच्या मनात येऊन गेला!

पाबे खिंडीत शंकराचे मंदिर होते आणि भले मोठे पिपर आणि वडाचे झाड!

खिंडीत चहा घेतला आणि वेल्ह्याला न जाता रांजणीपर्यंत पायी जायचे ठरवले. खिंडीत दुकान असणाऱ्या दुकानदाराच्या गाडीवरून मी पुढे गेले पण खानापूरवरून एकही वाहन येईना.

विशालला एक जीप मिळाली जिने खानापूरपर्यंत आलो आणि तिथून एसटीने पुण्यापर्यंत! पुण्यात आलो तेव्हा ९ वाजले होते!

“पायलट ट्रेक” ह्या ट्रेक संकल्पनेची कल्पना आली. दिशाहिन ट्रेक मार्गाला दिशाशोधन करून, निश्चित दिशा/मार्ग मिळवून देण्याचा हा सर्वांग सुंदर सफल प्रयत्न आहे! दिशा लोकेट करत जा, पायवाटा शोधत जा, रेंज पकडत आणि फॉलो करत जा, धोक्याच्या जागा नाहीत ना ह्याची शहानिशा करत जा,अचूक मार्ग शोधत, तो मार्क करत जा.....बापरे....

सर्वच अनियोजित आणि अनिश्चित! अगदी प्रवासी वाहन मिळण्यापासून ते ट्रेक मार्गापर्यत! 

पायलट ट्रेक करण्यासाठी त्या भूप्रदेशाची थोडीफार मुलभूत माहिती असायला हवी आणि असायला हवे, पर्यावरणावर प्रेम, डोंगरात भटकायची आवड, चिकाटी, दिशांचा थोडाफार अंदाज, जिद्द, प्रतिकूल परिस्थितीत गडबडून न जाता शांतपणे विचार करण्याची क्षमता, आवश्यक साधन, साहित्य, सामग्री, सदैव जागरूकता, नेतृत्वगुण, संयम, सहकाऱ्यांशी समायोजन, निर्णयक्षमता, समयसूचकता आणि वेळेचे व्यवस्थापन! 

पावसाळ्यातील हा एक सर्वांग सुंदर रेंज ट्रेक वाटला! चौफेर हरियाली, शुद्ध हवा आणि ताजा टवटवीत करणारा निसर्ग!

हा माझा पहिलाच पायलट रेंज ट्रेक होता! ह्या ट्रेकने मला रेंज ट्रेक करण्यासाठी आत्मविश्वास दिला! १६-१७ किमी अंतर, ट्रेक मार्गावरचे कित्येक डोंगर, अरुंद धोकादायक पायवाटा, पर्वतांना जोडणारा घाट इ. गोष्टी मी सहज पार करू शकले! तरीही रेंज ट्रेक करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची जरुरी आहे ह्याचा अनुभव ह्या ट्रेक ने मला दिला!

“रेंज ट्रेक” ह्या ट्रेक प्रकाराची कल्पना आली आणि सह्याद्री रांगेतील पर्वतरांगा एकमेकांना कशा जोडल्या गेल्या आहेत ह्याची जातीने पाहणी करता आली! ह्या जोडलेल्या  पर्वतरांगा पाहणे, सहकाऱ्यासोबत त्याची चर्चा करणे आणि त्यामागील भावार्थ समजून घेणे हा एक अदभूतरम्य अनुभव वाटला मला! 

ही डोंगरयात्रा करताना सतत एक प्रसिद्ध उक्ती आठवत होती आणि तिचे महत्व जाणवत होते,

“डोंगरात तुमच्या पावलांच्या ठ्शाशिवाय काही मागे ठेऊ नका आणि सुखद स्मृतिशिवाय डोंगरातून काही बरोबर आणू नका”!


फोटो आभार: ट्रेक टीम

जुळादुर्ग निमगिरी, २ जुलै २०१७

श्री. आनंद पाळंदे सर यांचे डोंगरयात्रा” पुस्तक हाती आलं आणि निमगिरी” या गिरीदुर्गाबद्द्ल लिखित माहिती शोधण्याचा माझा प्रयास सार्थ झाला म्हणून हा ब्लॉग लिहिताना अत्यानंद होत आहे! जुन्नर तालुक्यातील हा माझा पहिला ट्रेकपहिले गिरिभ्रमण! फारशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसणारा आणि तसा ऑफ-बिट” हा जुळादुर्ग निमगिरी!




सरांच्या “डोंगरयात्रा” सह्यपर्वतावरील पुस्तकात “हडसर-निमगिरी-सिंदोळा” ह्या हाटकेश्वर रांगेतील पर्वतांच्या हिलवॉकिंग विषयी त्यांनी लिहिले आहे की, आरंभस्थळ आहे जुन्नर, जिल्हा, पुणे आणि गन्तव्यस्थळ आहे खुबी, जिल्हा, पुणे. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावाशी जोडलेले जुन्नर तर खुबी हे आळेफाटा, ओतूर-माळशेज घाट मुरबाड (जि. ठाणे) या राज्यमार्गावरील स्थळ आहे.


“गड किल्ले महाराष्ट्राचे” या प्रमोद मारुती मांडे सर लिखित पुस्तकात निमगिरी दुर्गाविषयी माहिती आढळते. डावीकडे “हनुमंतगड” आणि उजवीकडे “निमगिरी”! 


हनुमंतगडाबद्दल या दोन्ही पुस्तकात माहिती नाही मग निमगिरीचाच उल्लेख का? हा प्रश्न मला पडलाचं! असो.

Find Your Own ways (FYOWs) हा ट्रेकिंग ग्रुप आणि साधारण २६ ट्रेक सहकाऱ्यांसोबत ह्या जुळादुर्गाला भेट देण्यासाठी निघाले होते. “डोंगरयात्रा” पुस्तकात ह्या पर्वताचा मार्ग लिहिताना लिहिले आहे की, “माणिकडोह मार्गाने पश्चिमेला चालू लागावे. शिवनेरी दुर्गाच्या उजवीकडून (उत्तर) आपटाळे मार्ग सोडून माणिकडोह धरणापाशी यावे (१/२ तास). उत्तरेला हडसर दुर्ग (१०२८ मी) ४०० मी. उंचावला आहे. हडसरची एक सोंड माणिकडोह धरणाला भिडली आहे. या सोंडेवरील गाडीमार्गाने चढावे. हा मार्ग हडसरच्या पायथ्यातून निमगिरीपर्यंत जातो!”.

जुन्नर-आळेफाटा-शिवनेरी मार्गाने आम्ही निमगिरी बेस व्हिलेजला येथून ठेपलो. ट्रेक सहकाऱ्यांची ओळख परेड झाली.



निमगिरी ट्रेकबद्दल माहिती देताना निखील बोधाले या FYOWs च्या कोआर्डीनेटरने काही सूचना दिल्या जसे, “घनदाट जंगल आहे, वाट चुकू शकते म्हणून गटात राहणे”. हनुमंतगड हा चढायला टेक्निकल आहे असं याच्या बोलण्यात आलं! असो.

आनंद पाळंदे सरांनी पुस्तकात लिहिले आहे की, “उत्तरेला निमगिरीचा जुळादुर्ग (११०८ मी) ३०० मीटर उठावला आहे. डावीकडचा हनुमंत आणि उजवीकडचा निमगिरी यांमध्ये खिंड आहे”!


खिंडयुक्त निमगिरी पाहण्याच्या उत्सुकतेने ट्रेकला सुरुवात केली. शेतात्तून काही अंतर चालून गेल्यावर एक छोटे पठार लागले. इथून आता घनदाट जंगल सुरु होणार होते.

पठारावरून हनुमंतगड आणि निमगिरी हो जोडगोळी पर्जन्य ऋतुमुळे मोहक दिसत होती. सर्वत्र “हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट” दिसत होती. पर्वत जोडगोळी कधी धुक्यात लुप्त होत होती तर धुक्याचे झाकोळे दूर होताच आपले लख्ख रांगडे सौदर्य परावर्तित करत होती!

“अंकुश लांडे” नावाचा सातवीत शिकणारा मुलगा आमचा ट्रेक गाईड होता. साधीशी चप्पल घालून तो झपाझप गड चढत होता आणि आम्ही कधी त्याला गाठण्याचा प्रयत्न करत होतो तर कधी त्याला थांबायला सांगत होतो!


शेतं पार केल्यानंतरची झाडी अतोनात घनदाट होती! हाताच्या अंतरावर पुढे चालणारी व्यक्ती दिसणार नाही इतकी घनदाट नागमोडी वळणाची ही जंगलवाट! कंबरेत पूर्ण वाकून पार करावी लागत होती हे सांगायला नकोचं! 

साधारण १०-१५ मिनिटाची जंगलवाट पार केली आणि ह्या झाडीत दडलेल्या काळूबाई मातेचं मंदिराचं दर्शन झालं! दगडात कोरलेल्या सुबक मूर्तिकामाने थबकायला झालं! देवीचे दर्शन घेऊन ट्रेक पुढे चालू ठेवला!




आता थोडा चढ होता आणि एकावेळी एकचं जण जाऊ शकेल इतकी छोटी पायवाट. काहीठिकाणी पायवाट गवताने झाकली गेल्याने अस्पष्ट झाली होती. हा भाग डोंगराचा दगडी भाग होता त्यामुळे पायवाटेवर सुटे, हलणारे छोटे छोटे दगड होते. त्यामुळे चालताना थोडी काळजी घ्यावी लागत होती. डोंगरावर गावकरी आपल्या शेळ्या-गायी चरायला घेऊन आले होते. डोक्यावर गोणपाटाचे इरले, हातात काठी घेऊन शेळ्या-गायांना हाकणारे गावकरी आमच्याकडे कुतुहलाने पाहत होते!

थोडा चढ चढून गेलो आणि काही गुहेपाशी येऊन ठेपलो. ही गुहा बरीच लांब पसरली होती. एका माणसाच्या उंचीच्या गुहेने काही काळ पावसापासून आम्हाला आसरा दिला!



आता वारा सोसाट्याचा सुटला होता. जोराची झुळूक आली की आहे त्या ठिकाणी थांबाव लागत होतं आणि वेग थोडा कमी झाला की पुन्हा ही पर्वतयात्रा चालू करावी लागत होती. इथे दुर्गाला जायला पायऱ्या आहेत पण त्या तुटल्याने धोक्याचा इशारा देत असल्याने आम्ही दुर्गाला वळसा घालून जाणारा मार्ग निवडला!




थोडा चढ चढून गेलो आणि पुन्हा एक छोटे पठार लागले. इथून दुर्गाला अंतिम टप्प्यात नेणारा दगडी पायऱ्यांचा चढ सुरु होतं होता! 



दगडात बनलेल्या ह्या पायऱ्या दुर्गाच्या कठीणतेची कल्पना देत होत्या. दोन पर्वतांमधे खिंड निर्माण झाली आहे आणि हवेचा दबाव निर्माण झाल्याने इथे १०० ते १४० च्या वेगाने वारे वाहतात. आज वाऱ्याचा वेग तसा कमी होता. नाहीतर आम्हाला सूचना दिल्या होत्या की “वाऱ्याचा वेग खूप असेल तर चालू नका. एकतर खाली बसा नाहीतर आहे त्या जागीचं उभे रहा”.

इथून खालचा नजरा अप्रतिम दिसत होता. माणिकडोह धरणाचा परिसर, कुकडीनदीचे खोरे, सर्वत्र पाण्याने बहरलेली भातखेचरे आणि भातखेचरांनी वेढलेले कौलारू घरांचे गाव! घनदाट जंगलात उभारलेला वॉच टॉवरही इथून ठळक दिसत होता. तो पाहून मात्र वाटले की निमगिरी किल्ला सिंदोळा, हडसर, हाटकेश्वर इ. पर्वतांवर नजर ठेवण्यासाठी तर बांधला नसेल?

१५-२० पायऱ्या चढून गेल्यावर निमगिरी दुर्गाचे पठार आले.. पठार काय पोपटी रंगाच्या लुसलुशीत गवताळ कुरणाचा गालिचाच जणू! आपल्याकडे खेचून घेणारे वॉटर सिस्टर्ण आणि काही भग्न अवशेष! म्हणजे  हा किल्ला निसर्गाचं मुक्तहस्त देणं आहे! दुरून दिसणारे सिंदोळा, हडसर किल्ले, माणिकडोह धरणाचा परिसर आणि कुकडी नदीचे खोरे!



निसर्गाचे हे सुंदर रूप फोटोतून दाखवणारे अभिजित काही खासचं!

डोंगरयात्रापुस्तकात लिहिले आहे, “पाण्याच्या प्राचीन कुंडाजवळून आणि झाडीतील देवळाजवळून पुढे घळीतून चढत निमगिरी माथा गाठावा (१ तास). माथ्यावर पाण्याची टाकी आणि पूर्व कड्यावर गुहा आहे”.

पठारावर दुपारचे भोजन करून, गडफेरी करून तास-दीड तासाने आम्ही परतीचा ट्रेक सुरु केला. 
FYOWS टीम, डावीकडून: निखील बोधाले, शांतनू आणि तृष्णा आगळे सोबत
उतरताना जरा जास्तचं काळजी घ्यावी लागत होती कारण सुटे दगड, पाण्याचे वाहणारे ओहोळ, चालताना मधे मधे आडवे येणाऱ्या झाडाच्या फांद्या आणि पावसामुळे झालेले निसरडे!

पावसाळ्यातील हा ट्रेक मला विशेष आवडला. एकतर चढायला म्ह्टलं तर सोपा म्हटलं तर थोडासा अवघड, कमी उंचीचा, चढायला आणि उतरायला वेळ कमी घेणारा, कमी थकवा देणारा, प्रचंड वाऱ्याच्या तावडीतून स्वत:ला सावरण्याच्या धडपडीतील आनंद देणारा आणि निसर्ग सौदर्याने भरभरून नटलेला! पावसाळ्यात भिजण्याचा आणि वर्षाविहाराचा आनंद ह्या ट्रेक ने दिला!

आनंदाचे दुसरे एक कारण होते ट्रेक सहकारी! जाताना सुंदरशी गाणी गाडीत वाजत होती. त्या गाण्यांवर ट्रेक सहकाऱ्यांचा डान्स सुरु झाला. स्वप्नील, बिपलव आणि तृष्णा यांनी एकसे एक अदाकारी करून आम्हाला मंत्रमुग्ध करून टाकले!

दुर्ग पठारावर या सहकाऱ्यांनी निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला!

ट्रेक परतीत गाडीत अंताक्षरी रंगली... नाही दोन गटात ती पेटली होती!

किती तो जोश, उत्साह, दंगा, कल्ला, मस्ती, मिस्कीलता, भन्नाट कमेंट्स, जोक्स, सॉलीड सेन्स ऑफ ह्यूमर....एकदम झिंगाट!

बिपलव प्रोफेशनल डान्सर...

स्वप्नील ने त्याला तोडीची साथ दिली! स्वप्नीलने अशी जबरी छाप सोडली की तो आठवला तरीही ट्रेकचा आनंद मिळेल!


प्रदीप ने मला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अंत:करणापासूनच्या त्याच्या भावना मला नेहमीच कृतार्थ करत राहतील!

मयुरेश जगताप हा असाचं एक कलंदर! माझ्या ब्लॉग मधे त्याचा फोटो त्याला हवा होता. मिस्कीलपणे म्हणाला,  “मॅडम, लिहा की हा माझ्याबरोबर ईबीसी ट्रेक ला येता येता राहिला”...हे आठवले की उषा आणि माझ्या चेहऱ्यावर आजही हास्य पसरेल!



स्मिता आणि फोटो सेशन्स हे समीकरण न तुटणारे आहे! स्वत:चे फोटो काढून घेण्यात आणि ते परत मिळवण्यात तिच्या इतका हातखंडा कोणाचा नाही!

तृष्णा सोबत निमगिरी पठारावर मारलेल्या गप्पा एक नितांत सुंदर अनुभव होता!



उषाची फोटोग्राफी यावेळी कमाल होती.

तर मित्रांनो, अशा रीतीने ट्रेक सहकाऱ्यांनी संपूर्णत: काबीज केलेला ट्रेक मी प्रथम अनुभवला!

निमगिरी एक “ऑफ बीट” ट्रेक आणि सोबतीला हे “हटके” ट्रेक मेट्स! निमगिरी “ऐतिहासिक” झाला असचं म्हणावं लागेल”!



पुणे जवळ येत होते आणि माझं मनं मात्र ह्या जोडगोळी वरचं खिळून होतं! राहून राहून निमगिरी शेजारचा “हनुमंतगड” लक्ष वेधून घेत होता आणि मनाला अस्वस्थ करत होता. ह्या जुळ्यादुर्गाची माहिती का उपलब्ध नाही? तो दुर्ग टेक्निकल आहे म्हणजे नक्की काय? कोणी त्या दुर्गाची पर्वतयात्रा केली आहे का? केली नाही तर का नाही? गावकरी पण त्या बाजूला दिसत नव्हते  असं का? ट्रेकर्स नी हनुमंतगडा पेंक्षा निमगिरीला महत्व का दिल आहे?....

चला, करूयात का एकदा हनुमंतगडाची पर्वतयात्रा? काय वाटतं तुम्हाला?


६ जुलै ला अगदी अनपेक्षितपणे श्री. आनंद पाळंदे सरांची भेट आणि ओळख झाली. त्यांना मी हा ब्लॉग दाखवला. मला म्हणाले," मी तुमचे आधीचे ब्लॉग वाचलेत. तुम्ही खूप प्रामाणिकपणाने लिहिता"! त्यांच्या कौतुकाच्या शब्दांनी मन भरून पावले!

डावीकडून: उष:प्रभा पागे मॅडम, आनंद पाळंदे सर, उमेश झिरपे सर
फोटो आभार: उषा बालसुब्रमण्यम, स्वप्नील शिंदे आणि ट्रेक टीम


एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक (ईबीसी ट्रेक): २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७

भाग १: प्री-ईबीसी ट्रेक

ट्रेकिंग पार्श्वभूमी: २ ऑगस्ट २०१५ हीच ती तारीख, मी नियमितपणे ट्रेकिंग सुरु केलं, २५ ऑक्टोबर २०१५ हाच तो दिवस, पहिल्यांदा “मा. एव्हरेस्ट दर्शन” ची आशा माझ्या मनात रुजली, १२ जानेवारी २०१७ हाच तो दिवस, एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक चा निर्णय पक्का झाला आणि २ मे २०१७ हाच तो दिवस, एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या धरतीवर “मा. एव्हरेस्ट दर्शन” मला लाभलं!

ईबीसी ट्रेकचा निर्णय पक्का झाला तेव्हा माझ्या पाठीशी होता सह्याद्री पर्वत रांगेतील साधारण ३० ट्रेकचा अनुभव आणि ह्या ट्रेक दरम्यान मला मिळालेले ट्रेकिंग चे तांत्रिक धडे!

ईबीसी ट्रेक निर्णय: अडीच वर्ष सह्याद्री मधे ट्रेक केल्यानंतर वाटलं ईबीसी ट्रेक करायचा तो “आज आणि आत्ताचं”!

गिरिप्रेमी ऑफिस भेट आणि ईबीसी ट्रेक निर्णय: गार्डियन गिरिप्रेमी इस्टीटयूट ऑफ माउंटनिअरिंग (जीजीआयएम) च्या इमेल वर १२ जानेवारीला सकाळी इमेल केलं आणि त्यांनी संध्याकाळी ६ वाजता गिरिप्रेमीच्या आपटे रोड वरील ऑफिसमधे भेटायला बोलवलं! भूषण हर्षे ह्या एव्हरेस्टरने माझ्याशी बातचीत केली. अर्ध्या-पाऊण तासाच्या बातचीत मध्ये भूषणचं बोलतं होता आणि मी ऐकत होते! त्याने ट्रेकची माहिती दिली, काय सराव करायचा हे सांगितलं, पत्रक दिलं! "हा ट्रेक टेक्निकल नाही. सरासरी ६ तास तुम्हाला दररोज चालावं लागतं. सहा तासाचे ७-८ तास लागले तरी चालतात. तुमच्या गतीने तुम्ही जाऊ शकता". त्याच्या सांगण्याचा सगळा कल ह्या गोष्टीकडे होता की “ट्रेक टफ नक्कीच आहे पण असाध्य नाही”! .हां एक गोष्ट होती जी खूप सारं टेन्शन घालवणारी होती ती म्हणजे, हा ट्रेक टेक्निकल नव्हता! मी मनात धरून गेले होते की मला माझं वय, ट्रेक अनुभव, व्यायाम इ. विचारलं जाईल. पण मला चांगलच आश्चर्य वाटलं, त्याने मला त्याबद्दल काहीचं विचारलं नाही! मनात आलं ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत का? एका एव्हरेस्टरने जेव्हा ह्या गोष्टी विचारल्या नाहीत तेव्हा का? का? का? हा प्रश्न सतावत राहिला. असं असतानाही मी जेव्हा तिथून निघाले तेव्हा माझा निर्णय पक्का झाला होता! गेलात ना चक्रावून?

दोन गोष्टी होत्या ज्यामुळे निर्णय पक्का झाला! पहिली गोष्ट होती खुद्द गिरिप्रेमीचं ऑफिस! इथे एव्हरेस्ट आणि अन्य हिमालयीन पीक एक्सपीडीशनचे पोस्टर्स होते, मेडल्स होते, फोटोज होते आणि वर्तमानपत्रातील कात्रणे होती. हे सर्व इतक शिस्तीत, नीटनेटकं आणि एकदम काटकोनात! एकही गोष्ट चुरगळलेली नाही की त्यावर कसले डाग नाहीत. सगळ्या गोष्टी अगदी जिथल्या तिथे! अफलातून प्रेझेंटेशन! हे सर्व पाहिलं आणि बोलतीचं जणू बंद झाली! उष:प्रभा पागे मॅडमच्या मुलाखतीचं एक कात्रण तिथे लावलं होतं, “पर्वत, स्त्री-पुरुष भेद मिटवतात”! मला वाटतं १९७० च्या काळातील त्यांच्या ट्रेकवर आधारित ती मुलाखत होती! श्री. उमेश झिरपे सरांची काही प्रकाशित लेखांची कात्रणे पण बोर्ड वर चिटकवलेली होती. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इतकी प्रचंड ताकद होती की काही क्षणात त्या मनावर ठसा उमटून गेल्या!.

दुसरी गोष्ट होती ती खुद्द भूषण हर्षे! त्याचं संवाद कौशल्य, मुद्देसूद बोलण आणि आत्मविश्वास! त्याला ऐकताना त्याच्यामधला आत्मविश्वास माझ्यात परावर्तीत कधी झाला कळूनचं आलं नाही!

ह्या दोन्ही गोष्टी अशा होत्या ज्यांनी निर्णय घ्यायला मला स्कोप दिलाचं नाही. ऑफिसच्या त्या वास्तूने आणि परावर्तीत आत्मविश्वासाने माझा ईबीसीचा निर्णय पक्का केलेला होता!

निर्णयानंतर: १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत गोष्टी पटापट घडत गेल्या. विमानाचं तिकीट बुक झालं, ट्रेकची कागदपत्रे तयार झाली, मेडिकल टेस्ट झाल्या आणि कागदपत्रे सुपूर्त झाली!

भूषणने मला २२ एप्रिल ट्रेकची तारीख सुचवली कारण त्या तारखेच्या बॅच मध्ये पुण्याच्याच दोन मुली होत्या, तन्मय माविनकुर्वे आणि प्रीती पाठक! तन्मयने मला काठमांडूचे फ्लाईट डीटेल्स पाठवले आणि मी तीच फ्लाईट आयटनरी फॉलो करायचं ठरवलं. पण झालं काय माझं फ्लाईट बुकिंग २१ एप्रिल ऐवजी चुकून २२ एप्रिलचं झालं! त्यामुळे मला ट्रेकच्या तयारीसाठी काठमांडूमध्ये वेळ कमी मिळणार होता! आव्हानांना इथूनचं सुरुवात झाली होती!

घरच्यांची, ऑफिसची आणि ट्रेकिंग फ्रेंडची प्रतिक्रिया: माझ्या भावाला आणि बहिणीला मी निर्णय सांगितला. समीर, माझा भाऊ लगेच म्हणे, “तुला काही शॉपिंग करायचं असेल तर आपण करू. पैशाची काही मदत हवी असेल तर तसे सांग”! सरिता माझी बहिण म्हणे, “तायडे, ट्रेक अवघड आहे. अल्टीट्युड आहे, थंडी खूप असते, खूप चालावं लागत, ब्रीदिंग महत्वाचं आहे, तुला खूप सराव करावा लागेल. ह्या सगळ्याचा विचार कर. दोन्ही –चारही बाजूने विचार कर. पण तुला जमेल आणि नाही जमलं तर डोंट वरी”...

बहिणीचे शब्द ऐकल्यावर “पाठींबा” ह्या शब्दाचा अर्थ लक्षात आला! पूर्णत: चारही अंगाने विचार करून निर्णय घेतला आहे ना ह्याची जाणीव करून देऊन धीर देण आणि प्रोत्साहन देण हा आहे “पाठींबा” शब्दाचा अर्थ!

२४ एप्रिल ते १० मे अशी १७ दिवसांची रजा मला लागणार होती आणि ती मिळण केवळ अशक्य आहे हे मला माहित होतं. मी त्यांना सांगितलं तुम्ही ठरवा अन्यथा मी नोकरी सोडणार आहे. रजा मंजूर झाली पण मी जाईपर्यंत खडूसपणे टोमणे मारले गेले. “लोकांना हिमालयात जायचयं, एव्हरेस्टवर जायचयं....” आणि हे भर मिटिंग मध्ये बरकां! असो.

आमच्या ट्रेकिंग ग्रुप मधून दोन रिअॅक्शन आल्या. एक रिअॅक्शन होती, “शॉकिंग न्यूज आहे ”..दुसरी होती, “तुम्ही डायरेक्ट बोर्डाची परीक्षा द्यायलाच निघालात की..लय भारी”!

मी गिरिप्रेमी सोबत ट्रेकला जातेय ही गोष्टीला माझ्या ट्रेक सहकाऱ्यांनी फुल सपोर्ट केला. "मग काही काळजी नाही. भारतातील नं १ संस्था आहे ती. त्यांनी केलेले मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच ध्येय साध्य करायला मदत करेल"

गिरिप्रेमी सोबत जातेय म्हणल्यावर माझ्या घरचे निश्चित झाले आणि ती माझ्यासाठी सर्वात महत्वपूर्ण आणि मानसिक स्थैय देणारी गोष्ट होती!

ईबीसी ट्रेक सराव: गिरिप्रेमी ने हिमालयातील हाय अल्टीटयूड ट्रेकच्या तयारीसाठी दोन महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम दिला होता. तो पाहूनचं दडपण आलं. ह्या प्रोग्राम मध्ये दोनचं गोष्टी अशा होत्या ज्या मी करत होते त्या होत्या, हायकिंग /ट्रेकिंग आणि स्टेप क्लायबिंग (पर्वती चढणे हे ह्या प्रकारात मोडत असेल तर)! त्यातल्या ९९% गोष्टी मी आधी कधीच केल्या नव्हत्या आणि काही शब्द तर मी प्रथमचं ऐकत होते. त्यात समावेश होता, जॉगिंग, सायकलिंग, पुश अप्स, पूल अप्स, क्रन्चेस, स्क्वाट्स, प्लांक पोझिशन, स्ट्रेचिंग, सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्झरसाईझ! हे सगळे करण्याचा कालावधी पण होता ३० मी ते ६० मी! बापरे.... ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या ज्यांना शास्त्रीय आधार आहे आणि त्या एका तज्ञ व्यक्तीकडून शिकण महत्वाचं होतं आणि त्याला तसा वेळ देणं देखील तितकचं जरुरीच होतं. रोजच्या नोकरीच्या धावपळीत हा मानसिक आणि शारीरिक वेळ काढायचा कुठून? आणि आयुष्यात आधी कधीच न केलेल्या गोष्टी आता ट्रेकच्या दोन महिने आधी करायच्या? दुसऱ्या बाजूला हा पण विचार की हा प्रोग्राम उगाचच तर तयार केला नसेल ना, त्याला नक्कीच काहीतरी महत्व आहे....बापरे! क्लास लावणं, जिम लावणं हे मला काही पटतं नव्हतं! ह्यासाठी की ह्याची माझ्या शरीराला सवयचं नव्हती! आणि ज्याची शरीराला सवय नाही तो प्रयोग करायला मन धजावत नव्हतं! घरच्या घरी काही गोष्टी मी माहितीच्या आधारावर करू शकले असते जसे, सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्झरसाईझ इ. त्यातल्या काही गोष्टी मी केल्या देखील, पण का कुणास ठाऊक त्या गोष्टी मला एक मानसिक-भावनिक स्थिरता ठेऊन करता येईनात! त्यामुळे त्याचे अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत ह्याची मला जाणीव झाली.

ज्या गोष्टी आयुष्यात आतापर्यंत मी कधी केल्या नाहीत त्या करण हा विचार तर मी केव्हाचं बाजूला केला होता. जॉगिंग, रनिंग सारख्या गोष्टी माझं मेनापॉजल वय लक्षात घेऊन मी केव्हाचं बाद केल्या होत्या!

हाय अल्टीट्युड ट्रेक मध्ये जिथे ऑक्सिजन कमी होत जातो तिथे प्राणायाम, मेडिटेशन सारख्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ह्याची जाणीव मला होती पण का कुणास ठाऊक त्या शास्त्रीय पद्धतीने शिकल्याशिवाय करायच्या नाहीत असं माझं मन मला सांगत होतं. शास्त्रीय पद्धतीने ह्या गोष्टी, शरीराने  शिकायला दोन महिने हा खूप कमी कालावधी आहे असं मला वाटतं होतं. माझा आतला आवाज मी ऐकला; पण ईबीसी ट्रेक करून आल्यावर विपश्यना-मेडिटेशनचा सात दिवसांचा कोर्स करून तो अनुभव घेण्याचा निश्चय मात्र मी नक्कीचं केला! 

ह्या सरावावर मी इतका विचार केला की बस्स! काहीजण कळकळीने मला काही गोष्टी करायला सांगत होते. त्यांच्या भावना, उद्देश मला समजतं होता. पण मला माहित होतं ते मी करू शकत नाही; निदान आता ह्याक्षणी तरी नाही! बापरे......एक आठवडा भयानक मानसिक त्रासातून गेले! शेवटी एक दिवस शांत बसले आणि स्वत:लाच प्रश्न केले, “सविता, हे काय चाललयं? ईबीसी ट्रेक तुला करायचायं पण त्यासाठीची तयारी तुला तुझ्या पद्धतीने करायची आहे...स्वत:ला ओळख, स्वत:च्या शरीराला ओळख, स्वत:च्या मनाला-भाव-भावनांना ओळख, स्वत:च्या जीवनशैलीला ओळख आणि त्यानुसार सरावाचा निर्णय घे. ह्या सर्वाच्या ओळखीची हद्द; पार करायची ही वेळ नाही. समजा तू ठरवलेल्या प्रोग्राम कमी पडला असा अनुभव तुला आला तर तो तुझ्यासाठी धडा असेल!”...मन शांत झालं आणि माझा सरावाचा प्रोग्राम मी ठरवला (सॉरी गिरिप्रेमी टीम)! रादर जे मी करत होते तेच सुरु ठेवायचा निर्णय मी घेतला! त्यात इतर कशाचीही भर मी घातली नाही! तो प्रोग्राम असा होता, बुधवार आणि शनिवार सकाळी, पर्वती च्या पायऱ्या ३ ते ५ वेळा चढणे-उतरणे, मंगळवार आणि गुरुवार संध्याकाळी हनुमान टेकडी ३-४ वेळा चढणे-उतरणे आणि शनिवार-रविवारी एखादा ट्रेक! बस्स हाच तो प्रोग्राम! हा प्रोग्राम असा होता ज्याची माझ्या शरीराला सवय होती! आणि हा प्रोग्राम निश्चित केल्यावर जी मानसिक-भावनिक शांतता/स्थिरता मला मिळाली ती कदाचित कुठेतरी पुढे कामी आली!

हा सराव करताना तब्येत सांभाळण हे देखील एक आव्हान समोर होतं. आजारी पडू नये, काही शारीरिक इजा होऊ नये, हिमोग्लोबिन वाढवणे इ. सारख्या गोष्टी महत्वाच्या होत्या आणि मी त्या काटेकोरपणे पाळल्या!

ईबीसी ट्रेक साठी सराव: आधी सांगितल्या प्रमाणे पर्वती चढणे-उतरणे हा आठवड्यातून दोन दिवस सराव होता. सकाळी ६ वाजता स्वारगेटला जाणारी ५ नं ची बस पकडायची आणि स्वारगेट ते पर्वती पायी. बुधवारी ३ फेऱ्या तर शनिवारी ५. कधी सुट्टी असेल तर जास्तीचा सराव व्हायचा. सकाळी ६ वाजताची ही बस प्रवाशांनी खचाखच भरलेली असायची. अगदी शेवटच्या पायरी वर ही लोक उभे! प्रवास करून आलेले, सामान सोबत असणारे, झोपेत पेंगत असणारे हे प्रवाशी! ह्या बसला प्रकाश खैरमोडे नावाचे कंडक्टर


असायचे( अजूनही आहेत) ते पायरीवर उभे असणाऱ्या लोकांना ओरडून सांगायचे, “मॅडम ला आत येऊ दया. वाट दया त्यांना जरा”..आवाज एकदम खणखणीत..त्याचवेळी एकदम विनम्र! सकाळी सकाळी छान हसून स्वागत करायचे. स्वारगेट आलं की जोरात आरोळी देणार, “झोपलेले जागे व्हा, स्वारगेट आलं, आपापलं समान घेऊन उतरा, दुसऱ्याचं सामान घेऊन उतरू नका”. प्रत्येक स्टॉप चं नाव घेऊन लोकांना जागे करायचे. त्यांच आणि माझ्यात दोन शब्दांचा संवाद असायचा, तिकीट काढताना मी “नमस्ते” म्हणणार आणि ते ही “नमस्ते” म्हणून प्रत्त्युत्तर देणार आणि स्वारगेट आलं की मी म्हणणार, “येते बाबा”..ते म्हणायचे “या”...बस्स. जवळ जवळ तीन –साडेतीन महिने हा सिलसिला चालू राहिला आणि आजही सुरु आहे! त्यामुळे माझ्या सरावा मध्ये त्यांच मोठ योगदान आहे असं मला वाटतं!

पर्वती व्यतिरिक्त हनुमान टेकडी आणि सिंहगड ह्या दोन ठिकाणीही सराव केला. ह्या सरावामध्ये विशाल काकडे आणि शिवप्रसाद पेंडाल यांनी खूप मोलाची साथ दिली. ह्या मुलांनी माझा चढण्या-उतरण्याचा वेळ नोट करण्यापासून ट्रेक दरम्यान मला ईबीसी ट्रेक लक्षात घेऊन मौलिक मार्गदर्शन केले!

राहुल जाधव ने पूर्व-ईबीसी आहार याबद्दल संवाद केला, आलेख प्रजापती ने प्राणायाम, मेडिटेशन आणि ब्रीदिंग बद्दल सांगितलं, श्री. शिवानंद गोखले आणि श्री. शिरीष माने सरांनी वेळोवेळी मौलिक टिप्स दिल्या, अमित डोंगरे, राजकुमार डोंगरे, परेश पेवेकर, स्मिता राजाध्यक्ष, प्रशांत शिंदे, ओंकार यादव आणि एस. जी. ट्रेकर्स चे असे अनेक मेम्बर्स ने नेहमीच माझं कौतुक करून मला प्रोत्साहित केलं!

ह्या काळातच मिलिंद राजदेव याने सह्याद्री मित्रांच्या ब्लॉग ची एक लिंक पाठवली. मी त्यांना इमेल केलं आणि त्या ब्लॉगलिस्ट मधे त्यांनी माझं नाव मिळवलं. ही गोष्ट मला स्वत:ला प्रेरणा देणारी होती!

माझे ट्रेक ब्लॉग वाचून नेहमीचं सर्वांच्या छान प्रतिक्रियांनी मला अधिकाधिक ट्रेक करण्यास आणि तयार ब्लॉग लिहिण्यास प्रोत्साहन दिल. त्यातलीच ही एक प्रतिक्रिया,



जानेवारी ते एप्रिल ह्या काळात एस. जी. ट्रेकर्स बरोबर मढेघाट, कलावंतीण दुर्ग, केटूएस, वासोटा आणि राजमाची ट्रेक केले. त्यांनी आम्हा एबीसी आणि ईबीसी ला जाणाऱ्यांसाठी दोन ट्रेक आयोजित केले, केटूएस आणि राजमाची! त्यातल्या केटूएस ट्रेक ब्लॉगची ही लिंक!

http://savitakanade.blogspot.com/2017/03/blog-post.html   

केटुएस चार वेळा केल्यावर परेश पेवेकर ची ही प्रतिकिया नक्कीच खास होती,



कलावंतीण ट्रेक ला अमित डोंगरे माझ्याबरोबर होता. ट्रेक नंतर त्याच्या ह्या प्रतिक्रियेने मी निश्चितचं प्रेरित झाले. 

शेवटी शेवटी तर असं झालं होत कि ब्लॉग लिहिण्यासाठी तरी ईबीसी ट्रेक समीट करायचा! असो. 

राजमाची ट्रेकच्या वेळी एस. जी ट्रेकर्स ने आम्हाला “शिवप्रतिमा” ही शुभेच्छा भेट दिली!




या काळातचं एव्हरेस्टर आनंद माळी ह्याच्या बरोबर ताम्हिणी जंगल ट्रेल हा एक अनएक्सप्लोअर्ड ट्रेक केला!   http://savitakanade.blogspot.com/2017/03/blog-post_28.html


ईबीसी ट्रेक चा सराव म्हणून जीजीआयएम ने दोन ट्रेक आयोजित केले होते, विसापूर फोर्ट ट्रेक आणि तिकोना ट्रेक! 

विसापूर ट्रेक दरम्यान श्री. उमेश झिरपे, गणेश मोरे, आशिष माने आणि दिनेश कोतकर यांचे मार्गदर्शन  लाभले.


विसापूर ब्लॉग वर उमेश सर, गणेश आणि आशिष च्या मिळालेल्या प्रतिक्रियांनी माझ्या ईबीसी ट्रेकच्या निर्णयाला उभारी मिळाली.

तिकोना ट्रेक च्या वेळी सरावाची झलक आणि ईबीसी ट्रेकची माहिती हे कायमचं प्रोत्साहित करत राहीलं! http://savitakanade.blogspot.com/2017/03/blog-post_14.html

२६ फेब्रुवारी २०१७ रोजी जीजीआयएम ने “Introduction to High Altitude Trekking” वर एक वर्कशॉप आयोजित केला. ह्यामध्ये Acclimatization, High Altitude Sickness, Acute Mountain Sickness, Training for High Altitude आणि High Altitude backpacking इ. वर मार्गदर्शन केले. ह्या वर्कशॉपचं एक वैशिष्ट मला जाणवलं ते हे की मार्गदर्शन करताना सर्वांचा एकच दृष्टीकोन होता, “हे ट्रेक साध्य आहेत”!. “तुम्ही खूप काहीतरी अवघड करायला निघाला आहात” असा आविर्भाव त्यात जाणवला नाही आणि त्यातच त्या वर्कशॉपच्या यश आणि आमचं प्रोत्साहन सामावलं होतं!

ईबीसी ट्रेकला जाण्या अगोदर उष:प्रभा पागे मॅडमशी संवाद व्हावा आणि त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद लाभावेत अशी खूप इच्छा होती. एक दिवस धाडस करून त्यांना फोन केला आणि त्या फोनवरील संवादातून मला जे प्रोत्साहन मिळाल, जो धीर मिळाला त्याने माझं आत्मसामर्थ्य वाढण्यास मदत झाली!

यामध्ये एक गोष्ट मी कटाक्षाने केली होती ती म्हणजे, ईबीसी ट्रेक बद्दल काहीही वाचन केलं नाही. गुगुलवर काही माहिती बघितली नाही, ट्रेक व्हिडीओ बघितले नाहीत....मी ठरवलं होतं ट्रेक करायचा तर एकदम ओपन माइंडने! ट्रेक बद्दल मला जे वाटलं ते विचार, भाव-भावना, निष्कर्ष, ठोकताळे, तर्क माझे असावेत!

ट्रेकला जाण्याच्या १५ दिवस आधी सराव बंद करून शरीराला विश्रांती द्यावी आणि आहाराकडे जास्त लक्ष द्यावं असं सुचवलं होतं. पण अशावेळी आव्हाने नाही आली तर नवलचं! मी सुट्टीवर जाणार म्हणून ऑफिसकडून काही कामे खडूसपणे लादली गेली तर काही आपसूकच डोक्यावर आली. एरवी कामे निघणार नाहीत ती कामे एकापाठोपाठ एक पुढे आली! आहे त्या वेळात ही कामे पूर्ण करण्याचं टेन्शन मागे लागलं. मग कसली आलीय शारीरिक विश्रांती आणि आहाराकडे विशेष लक्ष! शारीरिक, मानसिक आणि भावनिक शांततेचा असा धुव्वा उडाला! असं वाटलं निघण्याच्या दोन दिवस आधी देखील सुट्टी टाकायला हवी होती. असो.   

२२ एप्रिल, जायची तारीख जवळ यायला लागली, गरम कपड्यांची आणि सुचवलेल्या इतर गोष्टींची खरेदी झाली. यादीनुसार सर्व गोष्टी घेतल्या. कागदपत्रे घेतली.

“एव्हरेस्ट दर्शन” ही इच्छा माझी होती पण ट्रेकला निघताना माझी इच्छा माझी एकटीची राहिली नव्हती. माझ्या सर्व ट्रेक सहकाऱ्याची ती इच्छा झाली होती!

२२ तारीख उजाडली, सर्व गोष्टींची फेरतपासणी केली. आर. के. (राजकुमार डोंगरे)


आणि ललिता (त्यांची पत्नी) ने येऊन शुभेच्छा दिल्या. 
एक शुभेच्छा अशी देखील होती,




त्यानंतर ओंकार यादव, प्रतीक शहा, राहुल आवटे, कविता कुंभार आणि रोहिणी कित्तुरे यांनी मी पुणे एअरपोर्टला निघेपर्यंत सोबत केली. मी कॅब मध्ये बसणार तर राहुल जाधवचा फोन आला. मी सामोरे जात असलेली एन्झायटी त्याच्या फोनमुळे क्षणात कुठल्या कुठे गायब झाली. माझ्या सर्व ट्रेक सहकाऱ्यांची उणीव त्याच्या फोनने भरून निघाली!

ईबीसी ट्रेक सुरु करण्याआधीचा हा टप्पा सरावासाठी महत्वपूर्ण होता. सरावाने माझ्यात खूप काही बदल झाले. सरावाचा हा अनुभव ईबीसी ट्रेक साठी “बेस” आणि “बेस्ट” ठरला!

सरावाचे अनुभव:
पर्वती एन्ड्युरन्स सराव सुरु केला तेव्हा काही पायऱ्या चढून गेलं की घशाला इतकी कोरडं पडायची की बस्स! साधारणत: तोंड आणि घसा तसाही थोडा ओलसर असतो पण चढताना तो ओलसरपणाही जाणवायचा नाही. कधी एकदा पाणी पिते असं होऊन जायचं. पण सराव जसा जसा चालू ठेवला तसं तसा घसा कोरडा पडायचं कमी झालं. 

पर्वती चढताना सुरुवातीला खूप दम लागायचा. ३-४ वेळा थांबावं लागायचं. पण सरावाने  न थांबता पायऱ्या चढायला मदत झाली.


·      पायांना बळकटी येण्यास मदत झाली.     

एखाद्या ट्रेकला गेले तर दम लागायचा आणि काही अंतर चालून गेलं की थांबव लागायचं. सरावाने अंतरात वाढ झाली.

         गुडघे मजबूत होण्यास मदत झाली.

        सराव करून आल्यावर दिवसभर ताजेतवानं वाटायचं.

   
    दडपणखाली सराव न करता सरावातील आनंद आणि आनंदाने सराव करायला मी शिकले.

          स्वयंशिस्त आणि स्वयंआनंद ह्या गोष्टींच महत्व मला जाणवलं.
·   
     सरावामध्ये एकाग्रता आणि ध्येयाकडे लक्ष किती महत्वाचं आहे हे शिकले (दहा किलो वजनाची गोष्ट आठवतेय ना?)
·     
          सरावात सातत्याचे महत्व लक्षात आले.
·      
        आपल्या गतीनेआपल्या क्षमतेने हवे ते साध्य करता येऊ शकतं ह्याची जाणीव झाली
·     
  ह्या प्रवासात एक गोष्ट लक्षात आली....जगात एकच व्यक्ती आहे जी तुमचं ऐकून घेते आणि साथ देते! ती व्यक्ती आहे "तुमच मन"! तुमच्या भावनांनुसार तुम्हाला  साथ देण्याची ताकद फक्त ह्या मनात आहे! अदृश्य असं हे मन! साथीला घेऊन काय चालले सदृश्य साथीची गरजही पडली नाही!

·    सुरुवातीच्या काळात ट्रेकिंग कडे मी एक व्यायाम प्रकार म्हणून पाहत होते. पण नंतर लक्षात आले ट्रेकिंग करण्यासाठी एन्ड्युरन्स सराव किती महत्वाचा आहे!
·    
  तन्मय नेपर्वती सरावात भरघोस साथ केली. तिने केलेल्या अनेक हिमालयीन ट्रेक चे अनुभव शेअर करून तिने मला हिमालयीन ट्रेक साठीच्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या.
·  
  हनुमान टेकडीची चढाई-उतराई पर्वती पेक्षा अगदीच सोपी. पण इथला हरित निसर्गवृक्ष लागवडसूर्यास्त आणि शुद्ध हवा यामुळे खूप प्रसन्नता अनुभवली.

·   सिंहगड ट्रेक करताना ठरवलं होतं की ट्रेकिंग स्टिक वापरायची नाही. सिंहगड नंतर जेव्हा जेव्हा केला स्टिक न वापरता केला.

          http://savitakanade.blogspot.com/2017/01/blog-post_30.html

मला बरेचजण विचारायचे “मॅडम, तयारी कशी सुरु आहे?” माझं उत्तर असायचं “मी समाधानी आहे”....मला माहित नव्हत मी केलेला सराव पुरेसा आहे कि नाही पण मी समाधानी असल्याची भावना मला जास्त प्रोत्साहित करणारी होती.

शिवप्रसाद पेंडाल, राहुल जाधव, आलेख प्रजापती, मिलिंद राजदेव, प्रतीक खर्डेकर ज्ञानेश्वर गजमल, शंकर स्वामी, अनिकेत घाटे ही मुले आहेत ज्यांनी ट्रेकिंगच्या सुरुवातीच्या काळात मला ट्रेकिंगचे तांत्रिक धडे देऊन माझा ट्रेकिंगचा पाया मजबूत केला! ह्यांच्या योगदानाबद्दल तुम्ही ह्या ब्लॉगच्या भाग-३ मध्ये वाचालचं! 

तुमच्या लक्षात आले असेलच की ईबीसी ट्रेक साठी मी बहुविध व्यायाम प्रकार केले नाहीत. ईबीसी ट्रेक मी करणार होते, ते फक्त आणि फक्त ट्रेकिंगच्या जोरावर! ट्रेकिंग म्हणजे, स्टॅमीना, एन्ड्युरन्स आणि फिटनेस!

विशाल काकडे, हा एक असा मुलगा आहे ज्याच्या सोबत मी ईबीसी पूर्वी २५ ट्रेक पूर्ण केले होते. त्याने अडीच वर्षातील माझी प्रगती आणि आत्ताचा माझा सराव जवळून बघितला होता. माझ्या सरावात मला साथ केली आणि प्रत्येकवेळी, प्रत्येक ट्रेकला कौतुकाचे मेसेज सतत लिहून मोटिव्हेट केलं. 


ईबीसी पूर्वीच्या राजमाची ट्रेक नंतर त्याची पूर्णत: खात्री झाली आणि लगेचच मला मेसेज केला, “ईबीसी, ईझिली करताल मॅम तुम्ही”! 

तेव्हा १९-२० वय असणाऱ्या ह्या मुलाने, माझ्या आयुष्यातील  ट्रेकिंगचा टप्पा कसा समृद्ध केला ह्या विषयी ह्या ब्लॉगच्या भाग-३ मध्ये तुम्ही वाचालचं!




प्री-ईबीसी ट्रेकिंग काळ हा खरचं महत्वाचा होता. सातत्याने केलेल्या सरावाने मला आत्मविश्वास दिला. ट्रेक सहकाऱ्यांच्या विशेषत: विशालच्या प्रोत्साहनामुळे घेतलेला निर्णय तपासून पाहण्याचा प्रश्नचं आला नाही! 

तुम्हीच विचार करा ना ज्याचा प्री-ईबीसी काळ इतका समृद्ध, संपन्न आहे, त्याचा ईबीसी ट्रेक समीट का होणार नाही? आणि अर्थातच पर्वती शिवमंदिर, तळ्यातला गणपती, महालक्ष्मी माता, चतुश्रुंगी यांचा वरदहस्त!

ट्रेकला निघाले तेव्हा माझ्या सोबत होत्या, माझ्या घरच्यांच्या आणि ट्रेक सहकाऱ्यांच्या भरघोस शुभेच्छा, मी समाधानी असलेला सराव, राहुलच्या फोनने वाढलेले मनोबल आणि विशालचा माझ्यावरचा प्रचंड आत्मविश्वास!

भाग २: मा. एव्हरेस्ट दर्शन आणि ईबीसी ट्रेक समीट

ईबीसी ट्रेक! सह्याद्री पर्वतरांगेत जेवढं स्थान “छत्रपती शिवरायांना” आहे, महाराष्ट्रात जेवढं स्थान “पंढरपूर” ला आहे त्याच तोडीचं स्थान ट्रेकर्स मध्ये “मा. एव्हरेस्ट” ला आहे! 

मा. एव्हरेस्ट! दोन –अडीच वर्ष मनात सतत घोंघावणारा एक विचार, एक आशा, एक अभिलाषा, एक इच्छा....

हा विचार, ही आशा, ही अभिलाषा, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी निघाले होते खरी, पण जितकी उत्सुकता होती तितकीच हुरहूर!

प्रवास सुखरूप होईल ना
सगळं व्यवस्थित पार पडेल ना
अॅक्लमटाईझ होऊ ना
आरोग्याचा काही त्रास तर होणार नाही ना
रोज बारा दिवस, सरासरी ६-७ तास चालायला माझा गुडघा साथ देईल ना (एकदा गंभीर रित्या स्प्रेन झालेला गुडघा.. त्यात राजमाची ट्रेकला आलेल्या एका हिमालयात ट्रेक अरेंज करणाऱ्या मुलाचे शब्द सारखे आठवत होते, “बहुत चलना पडता है, आपके नी में उतनी ताकद है ना ये देखो, डॉक्टर को कन्सल्ट करो”..ह्यातलं मी काहीच केलं नव्हतं)
दररोज पुरेशी झोप येईल ना
अनुकूल हवामान मिळले ना


मनातील किती विसंगती ही! एकाच वेळी उत्सुकता आणि त्याच वेळी हुरहूर अशा विरुध्द गोष्टींचा सामना करणं खूप मानसिक ताकदीचं काम वाटलं मल!खरं तर मला दोन गोष्टींची खूप जास्त चिंता होती, गुडघा आणि झोप! अक्लमटायझेशन पेक्षाही ह्या दोन गोष्टी मला जास्त सतावत होत्या. अस्वस्थ करणारी अजून एक महत्वाची गोष्ट ही होती की एवढ्या सगळ्या चिंता, हुरहूर असताना सुद्धा एक आंतरिक शांतता मी अनुभवतं होते.त्यात खळबळ नव्हती, नकारात्मकता नव्हती. किती विरोधाभास ना हा! विचार आणि मन यांचा हा झगडा! पण हीच आंतरिक सकारात्मक शांतता कदाचित मोलाची होती! असो. 

दिल्ली ते काठमांडू: 

२२ एप्रिल २०१७ ला रात्री ११ च्या फ्लाईटने दिल्ली, दिल्लीत एअरपोर्टवर प्लाझा प्रीमिअम लॉन्ज मध्ये रात्र काढली, दुसऱ्या दिवशी २३ तारखेला, दुपारी साधारण १२ च्या फ्लाईटने काठमांडू! काठमांडू, त्रिभुवन अन्तर्राष्ट्रीय एअरस्थल” ला पोहोचले आणि जीवात जीव आला! 

ती हुरहूर/ एन्झायटी कुठल्या कुठे नाहीशी झाली जेव्हा स्वागत करणाऱ्या गौतम बुद्धाच्या एका सुबक-सुंदर प्रतिमेच दर्शन एअरपोर्टवर झालं!
जीजीआयएम ची नेपाळमधील कोऑर्डीनेटिंग एजन्सी, “पीक प्रमोशन” चे केसबजी आणि पासंगजी, काठमांडू एअरपोर्टवर मला रिसीव्ह करायला आले. झेंडूच्या फुलांची (स्थानिक भाषेत शेपत्री) माळ घालून त्यांनी स्वागत केले! 
डावीकडून: केसबजी आणि पासंगजी सोबत


काठमांडू मध्ये पाऊस पडला होता, आकाश झाकाळलेलं होतं, हवेत गारठा होता, बोचरी थंडी होती! इथे हेल्मेट सक्ती आहे आणि गाडीचे हॉर्न्न वाजवण्यावर बंदी आहे! त्यामुळे रस्त्यावर गर्दी होती पण शांतता होती. रस्ताच्या बाजूची दुकाने रंगीबेरंगी आणि विविध प्रकारच्या गरम कपड्यांनी गजबजलेली होती! हॉटेलच्या मार्गावर केसबजी नेपाळ, लुक्ला फ्लाईट, ईबीसी ट्रेकबद्दल बोलत होते, “कल ईबीसी पर बहोत स्नो-फॉल हुआ है, लुक्ला में वेदर बहोत खराब था, फॉगी था, फ्लाईट्स नहीं जा पाये. कल देखते है क्या होता है.ईबीसी ट्रेक बहोत टफ है लेकीन हो जायेगा|”. इथल्या बदलत्या हवामानाबद्दल मी ऐकुन होते पण अशाश्वततेची गंभीरता मला त्याक्षणी जाणवली. हॉटेल मार्गावरचा हा प्रवास दोन गोष्टींमुळे माझ्या कायम स्मरणात राहिल, एक केसबजीं बरोबरच्या गाडीतल्या गप्पा आणि दुसरं गाडीत हळू आवाजात प्ले होणारी ब्लॅक-व्हाईट गोल्डन काळातील शमशाद बेगम, नूरजहाँ, सुरैया, लता मंगेशकर आणि आशा भोसले ह्यांनी गायलेली गाणी! एकसे बढकर एक कलेक्शन! ती गाणी ऐकताना दिल खूष हो गया! मला कमाल वाटली केसबजींची! इतकी जुनी आणि सुंदर गाणी हल्ली रेडिओवरसुद्धा कमीच ऐकायला मिळतात! ही सुरेल गाणी ऐकता ऐकता, हॉटेल, “होली हिमालया” कधी आलं कळूनचं आलं नाही! फ्रेश होऊन समोरच्या हॉटेलमध्ये घेतलेल्या “मसाला चाय” ची चव आजही माझ्या ओठांवर आहे! 



थोडक्यात काय, सुरुवात तर दिल खूष करणारी झाली होती, झेंडूच्या फुलांनी झालेले स्वागत, शमशाद बेगम, सुरैया इ. ची सुरेल गाणी आणि मसाला चाय! ह्यापुढे हवामानातील अशाश्वततेची गंभीरता तात्पुरती तरी कुठल्या कुठे विस्मरणातून गायब झाली झाली होती!

दुपारी तीन वाजता आम्हा ईबीसी ट्रेक पार्टीसिपन्टसोबत केसबजींनी मिटिंग घेतली. ट्रेकचा प्रोगाम सांगितला, डूज-डोंट्स सांगितले आणि आमच्या शंकांचे निरसन केले. त्यांनतर आमच्या प्रत्येकाचे, एक एक  ट्रेकिंग गिअर्स तपासून पहिले गेले (हे करणं किती महत्वाचं होतं ह्याची जाणीव समीट नंतर झाली). पुण्यातल्या डेकॅथलॉन शॉपमधून खरेदी केलेल्या खर्चिक काही वस्तू त्यांनी बाद केल्या. त्यात तीन वस्तू मुख्यत: होत्या, ग्लोव्हज-सॉक्स, डाऊन जॅकेट आणि स्लीपिंग बॅग! बापरे हादरलेच मी! तिथल्या हाय अल्टीट्युड आणि ऊणे-तापमानाला त्या पुरेशा सुरक्षित नव्हत्या (ह्याची खात्री पटतेही)! डाऊन जॅकेट आणि स्लीपिंग बॅग रेंट केली आणि ग्लोव्हज-सॉक्स खरेदी केले! एक धडा मिळाला, “हिमालयीन ट्रेक, खासकरून ईबीसी ट्रेकची गरम कपड्यांची खरेदी काठमांडूमध्येचं करावी”! अन्यथा पैशाचे आणि आपलेही तीन तेरा वाजतात!

रात्री माझ्या ग्रुपमधल्या पार्टीसिपन्टसोबत डिनर झालं माझ्या ग्रुप मध्ये होते, तन्मोय माविनकुर्वे, मी (पुणे), प्रीती पवार, दीपा सोमय्या आणि गीतांजली देशमुख (कोल्हापूर), रोहिणी जोशी, विनोद जैन आणि चित्रांश श्रीवास्तव (मुंबई).
गिरिप्रेमी व्हॉलिंटीअर: वर्षा बिरादर
पीक प्रमोशन ट्रेक गाईड: फुला शेर्पा (गाईड), कामी शेर्पा, श्रींग शेर्पा, सोनम चिंग्र शेर्पा आणि राय दाय (सर्व असि. गाईड). सोनम हा पाठीवर गॅस सिलिंडर कॅरी करत होता, राय दाय, सामनासोबत येत होता आणि बाकीचे तिघे आमच्या सोबत ट्रेक करत होते.

काठमांडू ते लुक्ला:

२४ तारखेला सकाळीचं लुक्ला साठी निघालो. आदल्या दिवशी फ्लाईट्स खराब हवामानामुळे टेक ऑफ झाल्या नव्हत्या त्यामुळे आज पण त्या टेक ऑफ होतील की नाही ह्याची धाकधुक होतीच! ८ वाजता एअरपोर्ट वर बोर्डिंग पास मिळाला आणि पावणे नऊच्या सुमारास फ्लाईट अनाऊन्स झाली! 

फ्लाईट मिळाल्यावर आम्हीच काय सर्वांनीच काय जल्लोष केला तिथे! हा आनंदोत्सव आपसूकचं होतो हा! उत्साह संचारतो! स्वर्गाचं दार जणू खुलं व्हावं! एकतर हवामान बरं असण्याची ही खात्री आणि वेळ, दिवस वाचला ना! काठमांडू डोमेस्टिक विमानतळ ट्रेकर्सने असं खचाखच भरलं होतं. छोटसं विमानतळ, वातावरण एकदम अनौपचारिक! सिक्युरिटी, सुरक्षा जाँच ह्याची भिस्त जास्तकरून ट्रेकर्सना नेणाऱ्या तिथल्या संस्था किंवा शेर्पाज वर आहे असं वाटलं. लुक्लाला दिवसातून ८ फ्लाईट्स जातात. आमचं गोमा एअर होतं ज्याची कपॅसिटी १८ व्यक्तींची होती. 


काठमांडू-लुक्ला फ्लाईट साधारणत: २७ मिनिटांची आहे. सुंदरशी हवाईसुंदरी आणि चॉकलेट्स देऊन स्वागत! 


काठमांडू वरून लुक्लाला जाताना विमानात डाव्या बाजूला बसले की हिमालयीन रेंज दिसते! 

हवामान बऱ्यापैकी क्लीअर असल्याने ही रेंज खुपचं विलोभनीय दिसतं होती! खोल हिरवीगार व्हॅली, आकर्षून घेणारे आणि उठावदार लालसर-गुलाबी रोडोडेंन्द्रॉन, निळीशार-दुधी नदी, मध्येमध्ये दिसणारी गावे! काठमांडूचं सौंदर्य अफलातूनचं! २७ मिनिट खिडकीबाहेर तुमची नजर खिळवून ठेवण्याची ताकद ह्या नेपाळच्या निसर्ग सौदर्यात आहे! ९.३० च्या सुमारास लुक्लाला फ्लाईट लॅन्ड झाली. लुक्ला, “तेनसिंग-हिलरी एअरपोर्ट” हे एक अत्यंत छोट विमानतळ आहे. तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी या एव्हरेस्ट प्रथम सर करणाऱ्या एव्हरेस्टर जोडीचं नाव ह्या एअरपोर्ट ला दिलं आहे. दोघा व्यक्तींचं नाव असणारं एअरपोर्ट मी प्रथमचं ऐकत होते आणि बघतं होते! जगातील हे एक भीतीदायक एअरपोर्ट मानलं जातं कारण चहूबाजूंनी असलेले डोंगर, बदलते हवामान आणि अतिशय अरुंद फ्लाईट लॅन्डींग स्पेस!

लुक्ला ते गोरकक्षेप ट्रेक:

ट्रेक मार्ग: एका हॉटेल मध्ये फ्रेश होऊन साधारणपणे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आम्ही ट्रेकला सुरुवात केली! 

डावीकडून: रोहिणी, तन्मोय, गीता, मी, फुलाजी, विनोद्जी, वर्षा, प्रिती, दीपा, चित्रांश

जातानाचा आमचा मार्ग होता लुक्ला-फाकडिंग-नामचे बझार-तेन्गबोचे-दिंगबोचे-लोबुचे-गोरकक्षेप-ईबीसी. ९ दिवसांचे ट्रेक अंतर साधारण ९० किमी, दिवसाचा ट्रेक सरासरी ६-७ तासांचा आणि अल्टीट्युड २६५२ मीटर पासून ५१८० मीटर! 

सौजन्य: विनोद जैन

दिनक्रम: दिवसाचा आमचा दिनक्रम असायचा हा की, साधारण सकाळी ५-५.३० वा. वेक-अप कॉल, ६.३० नाश्ता, ७-७.१५ ला ट्रेकला सुरुवात, ११ -१२ अर्ध्या तासाचा दरम्यान लंच ब्रेक, संध्याकाळी ५-७ दरम्यान मुक्कामी पोहोचणार, संध्याकाळी ६.३०-७ वा. डिनर आणि ८-९ च्या दरम्यान झोपायला जाणे.

ट्रेक दरम्यानची पथ्य: ट्रेक मार्गावर प्रॉपर हॉटेल्स आहेत. नाश्ता आणि डिनर (डिनर आधी सूप) आम्हाला हवे ते पण लंच मध्ये भात, उकडलेली भाजी, डाळ आणि पापड. अल्टीट्युड, हवामान लक्षात घेऊन आम्हाला काही गोष्टी काटेकोरपणे पाळायला सांगितल्या होत्या (आणि आम्ही त्या पाळल्या) त्या अशा,

·        डाळ-भात खाणे (“दाल-भात पावर, २४ अवर” ही म्हण ह्या ट्रेक मार्गाचं       स्लोगन आहे)


·        मांसाहार टाळणे
·        गरम पाणी पिणे (ट्रेक दरम्यान दररोज किमान ४-५ लिटर)
·        गरम कपडे घालणे
·        ट्रेकच्या दिवसात आंघोळ करणे टाळणे
·       काही त्रास होत असेल तर स्थानिक ट्रेक लीडरला ताबडतोब सूचित करणे
·        स्थानिक ट्रेक लीडरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध न घेणे
·   अक्लमटाईझेशन साठी हळूहळू चालणे आणि ट्रेक दरम्यान अधूनमधून कान गरम कपड्यांने न झाकता उघडे ठेवणे ( कान हे इंद्रिय तापमानाला खूप संवेदनशील आणि अॅडापटेबल असते).
ट्रेक दरम्यानचे निसर्ग सौंदर्य आणि प्रेरणादायी प्रेक्षणीय स्थळे: लुक्ला (२८०० मी) ते फाकडिंग (२६५२ मी) इथे कमी अल्टीट्युडला यावं लागतं, मात्र फाकडिंग नंतर अल्टीट्युड कमालीचा वाढत जातो. लुक्ला ते गोरकक्षेप हा ट्रेक निसर्ग सौंदर्याने अवाक करणारा आहे. लुक्ला वरून फाकडिंगला प्रवेश करताना ट्रेकच्या सुरुवातीलाचं “पासंग ल्हामू शेर्पा” ह्या नेपाळी स्त्रीच्या नावाने  मेमोरिअल प्रवेशद्वार आहे. 


पासंग ल्हामू शेर्पा ही पहिली नेपाळी माउंटनीअर/शेर्पा स्त्री होती जिने १९९३ मध्ये मा. एव्हरेस्ट समीट केलं! तिची कहाणी ऐकली आणि मनोमन हात जोडून नतमस्तक झाले! तिच्यासारखे असंख्य एव्हरेस्टर ज्या ट्रेकमार्गावरून गेले त्या मार्गावरून आपण जाणार आहोत ही गोष्ट भावनांनी हेलावून टाकणारी होती. प्रेरणास्त्रोत तर इथेच मिळालं होतं!

लुक्ला पासून ट्रेक सुरु केला तेव्हा, उत्साह होता, उत्सुकता होती, थोडीशी धाकधूक होती, निसर्ग आणि ईबीसी ट्रेक मार्गाशी पहिली ओळख होती!

ट्रेकसाठी माझी तयारी: माझी बॅकपॅक तयारी भन्नाट होती. ३ लिटरचे वॉटर ब्लॅडर आणि १ लिटरची नेल्जीन बॉटल मध्ये गरम पाणी, पांचो, ड्रायफ्रुट्स, नॅपकीन, हेडटॉर्च आणि “शिवप्रतिमा” यांची शेवटपर्यंत साथ होती. इतर गोष्टी होत्या, वेट आणि ड्राय टिशू, कानटोपी, वुलनचे हॅन्ड ग्लोव्हज आणि सॉक्स.

मी आतून थर्मल, वर डेकॅथलॉन मधलं डाऊन जॅकेट, त्यावर थंडीच रंगीबेरंगी वुलन जॅकेट, टी-शर्ट, क्विक ड्राय पॅन्ट, डोक्याला कानटोपी, नी-कॅप घातली. हे गरम कपडे पूर्ण ट्रेकभर घातले होते. पुढे त्यात वाढचं झाली पण काही ठिकाणी गरम होतं होतं तरीही मी हे कपडे काढले नाहीत. शरीराचं तापमान पूर्णवेळ एकचं ठेवण्याचा माझा प्रयत्न होता!  

ट्रेकची सुरुवात सूर्यदेवाला वंदन करून केली. सूर्यदेवाने पूर्ण ट्रेकभर साथ केली आणि एक गोष्ट उमगली की सूर्यप्रकाश असेल, आभाळ क्लीअर असेल तर अक्लमटायझेशन सहज होतं! 

लुक्ला ते गोरकक्षेप ट्रेक मधलं निसर्ग सौंदर्य अचंबित करणारं आहे. निळाशार अवाढव्य उंचीच्या पर्वतांची रांगच रांग, कधी त्यावर ढग उतरलेले तर कधी बर्फाने माखलेले, ऊंचच्याऊंच झाडे, खोल दरी, हिरवट-निळ्या-पांढऱ्या रंगाचे “दुधकोशी” नदीचे पात्र, नदीवरचे लोखंडी सस्पेन्शन ब्रिज, मातीची-दगड-फरश्यांच्या तुकड्यांची पायवाट, कधी तीव्र उतार तर कधी तीव्र चढ, एकाचं धाटणीची घरे आणि हॉटेल्स. दुधकोशी नदी संपूर्ण ट्रेकभर साथीला असते. वाहताना जणू आपल्यालाही "अथक आणि अखंड चालण्याचा संदेश देते"! 

ह्या संपूर्ण ट्रेक दरम्यान, विशेषत: फाकडिंग पर्यंत स्तूप, मानी स्टोन आणि रोटेटिंग व्हील्स ने ट्रेक व्यापून टाकला आहे. इथे तिबेटीयन भाषेत प्रार्थना पेंट केल्या आहेत. ही दगडी प्रार्थनास्थळापुढे जाताना डावीकडून जायचं आणि उजवीकडून यायचं आणि तसं करणं “गुड लक” आहे,  रोटेटिंग व्हील्स मात्र उजव्या हाताने डावीकडे गोलाकार फिरवणे अशी बुद्धीस्ट प्रथा आहे.


फाकडिंग पर्यंत उतार होता. शरीर थकलेलं नव्हतं पण पाठीवर ४-५ किलोचं ओझं होतं ज्याची खरंतर कधी सवय नव्हती! त्या वातावरणात ह्या पाठीवरच्या ओझ्याने थकवा येत नाही. आपल्याकडे उन्हाचा कडक तडाखा असतो, पाणी-पाणी होतं आणि त्यात ओझं असेल तर प्रचंड थकवा येतो.

मी स्वत:ला काही नियम घालून दिले होते ते होते,
·        चालण्याची एकचं गती ठेवणार, एकदम हळूहळू चालणार
·        शरीराचं तापमान एकचं ठेवणार
·        पाणी भरपूर पिणार
·        श्वासाची एकचं गती ठेवणार

हे नियम मी मोडले नाहीत. ट्रेकपूर्वी, मला तशीही कमी खाण्याची सवय आहे. भरपेट खाल्लं की चालायला त्रास होतो, खूप दम लागतो असा माझा अनुभव होता. हे लक्षात घेऊन कमी खाण्याची सवय कायम पाळली! ट्रेकमध्ये भूकेची जाणीव झाली तर ड्रायफ्रुट्स होतेचं!

फाकडिंगला मुक्काम होता. इथे मुख्य धंदा हॉटेलिंग आणि लॉजिंग! स्त्री-पुरुष तेच काम करतात. ह़ॉटेलमध्ये लवकर आलो तर दुपारी झोपू नये. हालचाल करावी म्हणजे अक्लमटायझेशन सहज होतं असं म्हणतात.

दुसऱ्या दिवशी नामचे बझारला निघायचे होते. हे अंतर होते २६५२ मी. पासून ३४४० मी. पर्यंत! हा ट्रेकमधला सर्वात मोठा आणि अति चढाईचा टप्पा होता.

सकाळी तन्मोयने मला प्राणायाम, मेडिटेशन शिकवले आणि आम्ही थोडे स्ट्रेचिंग व्यायाम केले. सकाळी ५-७ मिनिट हे सुरु ठेवण्याचे आम्ही ठरवले! 

फाकडिंगवरून निघालो. आजही सूर्य साथीला होता. मजल दरमजल करतं  मान्जो या गावी आलो. इथे ट्रेकिंग परमिट साठी चेकपोस्ट आहे. ट्रेक चालू ठेवण्यासाठी तिथे सागरमाथा नॅशनल पार्क फी भरावी लागते.

निसर्ग आणि हवामान कालच्यासारखचं! सभोवताली बर्फाने ओढलेल्या पर्वतराशी, अति प्रचंड वेगाने वाहणारी दुधकोशी नदी, सस्पेन्शन ब्रिज, माने स्टोन, रोटेटिंग व्हील्स, कधी दगडी पायऱ्यांचा रस्ता तर कधी चढाई असणारी पायवाट! ह्या मार्गावर एकावर एक असे दोन सस्पेन्शन ब्रिज आहेत. हे ब्रिज खूप आकर्षक आणि मनमोहून टाकणारे आणि निसर्ग सौदर्यात भर घालणारे आहेत. 


ब्रिजला प्रेइंग फ्लाग्स जोडलेले आहेत. त्यावरून चालायला लागलो की आपण हेलकावे खातो, खाली प्रचंड खोल दरी आणि वाहणारी दुधकोशी नदी, ब्रिजच्या दुसऱ्या टोकाला पोहचताना चढाईमुळे जाम धाप लागते, म्हणूनचं की काय प्रत्येक ब्रिजचा इथे बसायला कट्टे केले आहेत. ब्रिजवरून सामान वाहून नेणारे घोडे, याक आले की ते जाईपर्यंत घडीभर थांबण्यातली आणि दम घेण्याची जी मोकळीक मिळते तो आनंद अनुभवण्यासारखे सौख्य नाही! अशा ह्या ब्रिजच्या पार्श्वभूमीवर सेल्फीचा मोह झाला नाही तरचं नवलं!


नामचे बझार गावात प्रवेश करण्यापूर्वी चेकपोस्ट आहे. ह्या चेकपोस्टला येईपर्यंत माझाचं प्रत्येकाचा स्टॅमीना संपलेला होता. अत्यंत चढाई आणि जवळ जवळ १५-१६ किमी अंतर! शेर्पा म्हणे, “नामचे इथून २० मी” आणि काय हायसं वाटलं म्हणून सांगू! पण चालायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की हा टप्पा कमालीचा चढाई असणारा आहे. दगडी वक्राकार पायऱ्या संपता संपत नाहीत. २० मिनिटाचे अंतर कापायला जवळ जवळ दीड तास लागला. ही चढाई करताना मला आपल्या “कात्रज टू सिंहगड केटूएस) ट्रेकमधील शेवटची टेकडी आठवली!

“ट्रेक हा माइंड गेम आहे” असं म्हणतात! स्टॅमीना संपलेला, शरीर पूर्णत: थकलेले आणि नामचेतल्या हॉटेलपर्यंत तर पोहोचायचे आहे. कसे? शरीराचं बटन स्वीच ऑफ होऊन मनाचं स्वीच ऑन होतं? कोणती अशी गोष्ट आहे जी हे अंतर सार्थ आणि समर्थपणे कापायला मदत करते? “माइंड गेम” ह्या शब्दाइतकं सोपं आहे का ते? काय नक्की “गेम” होते? आत्ता विचार केला तर उत्तर  सापडत नाही. आत्ता वाटतयं “गेम” हा शब्द का वापरतात? “गेम” ह्या शब्दात हारू की जिंकू याबद्दल अनिश्चितता आहे, त्यात एक झगडा आहे, एक प्रोसेस आहे, कृती आहे. तार्कीकदृष्ट्या विचार केला तर शरीर तर अकार्यक्षम झालेलं असं मग मनाचा “गेम” कोणाशी? “गेम जिंकण्यासाठीचं असते” हा सिद्धांत पटला तरी तो सिद्ध होतोचं असं नाही! इथे तर जिंकायचचं आहे. मला वाटतं हा “माइंड गेम” पेक्षा “पॉझीटीव्ह सेल्फ टॉक” हा शब्द जास्त संयुक्तिक वाटतो. किमान त्यात अनिश्चितता नाही, सिद्धांत नाही.. आहे ती सकारात्मकता! सकारात्मक संवाद आणि सकारात्मक कृती! जास्त होतयं ना थोडं? विचार करूयात का?

ह्या ट्रेक दरम्यान खुपदा माझा तोंडाने श्वास घेतला जात होता. खरंतर “नाकाने श्वास घ्या” असं सांगितलं जातं! मी तसा प्रयत्न केला पण ते होतं नव्हतं. शेवटी मी एक गोष्ट केली की “नाकाने श्वास घ्यायचा की तोंडाने हे शरीरक्रियेवर सोडून दिलं”... शिव पेंडाल ने सांगितलं होतं की “चढाईवर दम लागला तर क्षणभर थांबायचं आणि एक दीर्घश्वास घ्यायचा”. ही शिकवण मी संपूर्ण ईबीसी ट्रेकभर अमलात आणली. नंतर नंतर तर मी दीर्घश्वास नाकाने घ्यायची आणि तोंडाने सोडायची. असे केल्याने मला थकव्यापासून आराम मिळत होता. पायऱ्या चढायच्या आहेत हे दिसले की पायऱ्या चढण्याआधी मी प्रथम डोळे मिटून एक दीर्घश्वास घेत होते! दम लागला की थांबून पुन्हा दीर्घश्वसन आणि ट्रेक सुरु! हे टेक्निक मी संपूर्ण ट्रेकभर सुरु ठेवलं!

मी हळूहळू चालायची, चालण्याच्या गतीत सातत्य ठेवल्याने मला कुठे १५-२० मिनिट थांबावं लागलं नाही. मी न थांबता ट्रेक करू शकत होते. गुडघा दुखत नव्हता, कंबर ताठतनव्हती की कळ येत नव्हती, पाय दुखत नव्हते त्यामुळे “बसायचं आहेचं” ही भावना कधी उत्पन्न झाली नाही!      

नामचेला मी इतरांच्या तुलनेत उशीरा पोहोचले. जवळ जवळ २० मिनिट डोळे मिटून शांत बसून राहिले.मग एकदम फ्रेश! (ही माझी नेहमीची सवय आहे. शारीरिक आणि मानसिक खूप थकवा आला की मी अशी डोळे मिटून शांत बसते, तोपर्यंत जोपर्यंत डोळे आपोआप उघडत नाहीत). माझ्यासाठी हे नेहमीचचं होतं पण माझ्या ग्रुपमधल्यासाठी हे नवीन होतं त्यामुळे माझी ही कृती एकदम फेमस झाली!

नामचेतील दुकाने भेट देण्यासारखी होती. हिमालय (एव्हरेस्ट/अन्नपूर्णा) चे नजर खिळवून ठेवणारे फोटो, त्याबद्दलची पुस्तके, स्टिकर्स, बुकमार्क, हिमालयीन पिक्स चे पोस्टर्स, हिमालयीन ट्रेकचे छाप असणारे टी-शर्टस, टॉप्स, प्लेईंग कार्ड्स, नेपाळी ज्वेलरी, नेपाळचा इतिहास आणि प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारी पुस्तके, अगरबत्त्या, सिंगिंग बाऊल, प्रेइंग फ्लाग्स.... जिकडे तिकडे हिमालयीन ट्रेक आणि ट्रेक!

नामचे मधला दुसरा दिवस हा अक्लमटायझेशनसाठी रेस्ट-डे होता. पण आम्ही एका व्ह्यू पॉइंटला गेलो जिथून मा. एव्हरेस्टचे प्रथम दर्शन होते! साधारण अर्धा तास चालल्यावर हा पॉइंट आला. “मा. एव्हरेस्टचे प्रथम दर्शन” हा विचारही आशापूर्ती करणारा होता. ज्यांच्या साठी मा. एव्हरेस्ट दर्शन हे स्वप्न आहे, एक ध्यास आहे, एक ध्येय आहे त्या सर्वांसाठी ह्या  पॉइंटला पोहोचेपर्यंतचे अंतर काय असेल ह्याची कल्पना मी करत होते.  हा पॉइंटला पोहोचले. आमच्या गाईडने एव्हरेस्ट पीक दाखवला (हो इथून बरेच पीक दिसतात जसे लोत्से, अमाडबलम, आयलॅन्ड पीक, कोंगडे पीक) आज देखील सूर्याची कृपादृष्टी आमच्यावर होती आणि ढग विरहीत, लख्ख सूर्य प्रकाशाने तळपत असलेल्या मा. एव्हरेस्टचे दर्शन मला झाले! 


आपसूकचं हात जोडले गेले आणि मस्तक नत झालं! उर भरून आला होता, छाती फुलली होती, शब्द फुटतं नव्हते, डोळे पाणावत होते, आजुबाजूचं भान राहील नव्हतं! खूप साऱ्या पिक्स मधे दडलेला, तुलनेत आकाराने छोटा एव्हरेस्ट पण किती महानता त्याची! त्याच्या पार्श्वभूमीवर उभारलेला शेर्पा आणि एव्हरेस्टवीर तेनसिंग नोर्गे यांचा स्तूप! हा फक्त एव्हरेस्ट व्ह्यू पॉइंट नाही, एक इतिहास आहे, एक सत्य आहे, एक साहस आहे, एक विक्रम आहे, एक प्रेरणास्त्रोत आहे, देशसमभाव आहे! 
डावीकडून: श्रींग, फुलाजी, मी, कामाजी आणि सोनम
माझा ऊर अधिक अभिमानाने भरून आला जेव्हा ह्या सगळ्यांच्या सोबतीला “शिवप्रतिमा” माझ्या साथीला होती! “सह्याद्री आणि हिमालय” यांचा अनोखा हा संगम! सोबत “शिवप्रतिज्ञा” घूमघुमली आणि वातावरण “शिवमय” झालं! या वेळी तीन अभिमान मी एकत्र पाहत होते, मा. एव्हरेस्ट, शेर्पा तेनसिंग नोर्गे स्तूप आणि शिवप्रतिमा!


दिवसाच्या सुरुवातीला होणाऱ्या “गणपती बप्पा मोरया, हर हर महादेव,” ह्या प्रार्थनेत “जय जय महाराष्ट्र माझा...जय जय नेपाळ राष्ट्र माझा” हा  राष्ट्र्मान अॅड झाला!

डावीकडून: विनोद्जी, रोहिणी, वर्षा, दीपा, मी, चित्रांश, प्रिती, तन्मोय 

सांगबोचे हा नामचे मधील, ३७५३ मी. उंचीवरील एक पीक. नामचे पासून साधारण ३००-३५० उंचीवरील अक्लमटायझेशनचे एक ठिकाण! लांबून हे ठिकाण आणि जाणारे ट्रेकर्स हे दृश्य खूप मोहक दिसत होते पण  “इतक्या ऊंच जायचयं” हा विचार येऊन धास्ती वाटली. माझ्या चालण्याच्या गतीने वर पोहोचले! इथून नामचे गाव तर छान दिसतचं पण आजूबाजूच्या नामांकित पिक्सने वेढलेलं हे ठिकाण आणि तिथ उभं राहणं हा एक अलौकिक अनुभव वाटला मला! अतिशय गार वारा, त्यामुळे भासणारी प्रचंड थंडी आणि थंडीने कापणारे संपूर्ण शरीर ह्याचा पहिला प्रत्यय इथे आला!  


अक्लमटाईझ होण्यासाठी अधून मधून कान उघडे ठेवायला आम्हाला सांगितलं होतं. पण इथली थंडी अनुभवल्यावर लक्षात आलं की कान कधी उघडे ठेवायचे आणि गार वाऱ्यापासून स्वत:चं रक्षण कधी करायचं हे कळायला हवं! नाहीतर हा गार वारा कधी बाधेल सांगता येत नाही! मी तर काय केलं कान, नाक, तोंड झाकून घेतलं आणि हॉटेल वर गेल्यावर व्हिक्स/ वेखंड पावडर चोळली.  

त्यांनंतर पायथ्याशी असणाऱ्या “शेर्पा कल्चर म्युझीयम” ला भेट दिली. शेर्पा संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या वस्तू इथे आहेत. शेर्पाच्या जीवनावर आधारित एक छोटी फिल्म इथे बघायला मिळाली. शेर्पा लोकांनी जे जे हिमालयीन पीक एक्सपीडीशन केले त्यांचे प्रेरक फोटो संग्रहालय इथे आहे. गिरिप्रेमी ने इतिहास घडवलेल्या एव्हरेस्ट एक्सपीडीशनचे फोटो देखील इथे बघायला मिळतात!


दुपारी हॉटेलवर पोहोचलो. जेवण केलं. थोडा आराम करून ४ वाजता भेटायचं ठरलं. ह्या आरामाच्या वेळात मी ट्रेक अनुभवाचे मुद्दे लिहून काढले. ही पण एक गोष्ट मी पाळण्याचा प्रयत्न केला!

आमचा रात्रीच्या जेवणाच्या आधीचा प्रोग्राम असा ठरला होता, पत्ते (प्लेईंग कार्ड्स) खेळणं आणि गाणी म्हणणं. सुरुवातीचे काही दिवस मी हे करत नव्हते. मला शांत बसून राहणं जास्त छान वाटायचं/वाटत. नंतर मात्र मी सामील झाले. लहानपणी (तेव्हा पत्ते खेळणं हे चांगल समजलं जात नसे) कधीतरी उन्हाळयाच्या सुट्टीत पत्ते खेळलेले त्यानंतर आता. चॅलेंज, गड्डा झब्बू, रमी इ. मी प्रथम खेळले. ह्या ट्रेकमध्ये ह्या खेळांनी आणि गाण्यांनी नेहमीचं ताजेतवान ठेवलं!


इथे ट्रेक गाईड किंवा शेर्पा आणि स्टे/हॉल्ट जरुरीचे आहेत. गाईड कोणते गरम कपडे घालावे, काय खावे यापासून तुमच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन असतो आणि आजाराची लक्षणे चटकन ओळखतो. अक्लमटायझेशन साठी स्टे करणं जरुरीचं आहे. 

नामचे गावातून ह्या दोन  गावातून दोन रस्ते जातात एक तिबेटला आणि दुसरा मा. एव्हरेस्ट ला! दुसऱ्या दिवशी आम्ही तेन्गबोचे साठी निघालो. हे ठिकाण ३८६७ मी. उंचीवर आहे. नामचे पासून १२-१३ किमी असणारे हे अंतर कापायला साधारण ८-९ तास लागले. हा पट्टा सुरुवातीला बऱ्यापैकी सपाट आहे पण नंतर जी चढाई आहे त्याने जीव अगदी मेटाकुटीस आला. अत्यंत लेंदी ट्रेक आहे! शेवटचा अर्धा तास तर माझ्या पायात त्राण उरलेले नव्हते! जो सपाट भाग होता म्हणून आमच्या ग्रुपमधील मुलांनी डान्स केला, गाणी म्हटली. 
फुलाजी, विनोद्जी, चित्रांश, श्रींग
ह्या मार्गावरून एव्हरेस्ट पीक अतिशय सुंदर दिसतो. आजपण सूर्यप्रकाश होता. आकाश निळेशार होते त्यामुळे एव्हरेस्ट पीक वरून नजर हटवावी वाटतं नव्हती! ह्या मार्गावरच तीन रस्ते जातात एक नामचेला, एक गोकियो लेक आणि तिसरा तेन्गबोचेला!


बरेचदा असं व्हायचं की दुपारच्या जेवणानंतरचा ट्रेक हा अत्यंत चढाईचा असायचा. माझी चालण्याची गती मग अजून कमी व्हायची. काहीवेळा तर असंही झालं की आमचे सामान वाहून नेणारे याक वेगाने जायचे!

सपाट भाग होता तिथे खुपदा वाटलं “चला, चालण्याची गती वाढवू” पण कटाक्षाने टाळलं. एक छोटीशी गोष्ट प्रतिकूल होऊ शकते हा विचार सतत मनात ठेऊन ट्रेक केला.

दुसरी गोष्ट ही पण होती की वेगाने चालतं जाऊन करणार काय होते मी? इतरांपेक्षा कमी विश्रांती मिळायची पण माझं एक आहे की मी थोडावेळ डोळे मिटून शांत बसले की माझा थकवा कुठल्या कुठे गायब होतो! हे पण होतं की मार्गावर शेकडोने ट्रेकर्स आणि शेर्पा होते. त्यामुळे सुरक्षा आणि वाट चुकण्याचा प्रश्नचं नव्हता!

जेवणाच्या ठिकाणी इतकी प्रचंड थंडी होती की बस्सं. शरीर अक्षरश: थरथर कापत होतं. ह्या नंतरचा जो पॅच होता तो इतका कमालीचा चढाईचा होता की सारखं सारखं थांबाव लागत होतं. हा पॅच मात्र निसर्ग सौदर्याने ओतप्रोत भरला होता. एका बाजूला वाहणारी दुधकोशी, गर्द झाडी आणि ह्या  झाडीच्या मधे मधे फुललेले लालसर-गुलाबी रंगाचे ऱ्होडोडेनद्रॉन!

संध्याकाळी ४.३० च्या दरम्यान हॉटेलवर पोहोचले. शेवटचे दहा मिनिट तर चालायला अजिबात त्राण राहिले नव्हते. पोहोचल्यावर शांत बसले, चहा घेतला आणि एकदम फ्रेश झाले. मग काय पत्त्यांचा डाव रंगला! मग सूप, मग डिनर. रात्री भयानक थंडी पडली होती. तापमान मायनस १-२ होतं. इथे जेवण खूप महाग आहे. चहा साधारणत: रु २५० पासून पुढे, एक डीश मग रु १००० च्या पुढेही जाते!

आतापर्यंत चित्रांश आणि माझी एक पोझ खूप फेमस झाली होती. मी खूप थकायची, उशिरा पोहोचायची आणि शांत बसून झाल्यावर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चित्रांश फोटोतली ही अॅक्शन करायचा (ह्या अर्थाने की सर्व ठीक आहे ना) आणि म्हणायचा, “सविताजी”...मग मी ती पोझ करायचे (ह्या अर्थाने की मी एकदम ओके आहे). चित्रांशच्या अॅक्शन आणि हावभावात एक खट्याळपणा असायचा, मी प्रयत्न केला पण तो खट्याळपणा माझ्यात आला नाही! हां आमची ही अॅक्शन सर्वजण एन्जॉय करायचे आणि दिवसातून १-२ वेळा ही अॅक्शन झाली की उर्जा मिळायची!
चित्रांश सोबत
तेन्गबोचे मधील सकाळ सुंदर होती. इथे एक प्रसिद्ध, सर्वात मोठी गोम्पा बुद्धीस्ट मोनेस्ट्री आहे. इथे काम सुरु होतं त्यामुळे ती बंद असल्याने आम्हाला तो आतून पाहता आली नाही. 



आज ट्रेकच्या पाचव्या दिवशी आम्ही देंगबोचेला जाणार होते. हे गाव ४५३० मी. उंचीवर होते. आज थंडी खुपचं वाढली होती, गार वारा होता पण सूर्य देवता आज पण आमच्यावर प्रसन्न होती! साधारणपणे सकाळी नाश्ता झाल्यावर फुलाजी आम्हाला गरम कपड्यांबद्दल सूचना द्यायचे. आज त्यांनी विंड चीटर सोबत ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळे पाठीवरच्या ओझ्यात वाढ झाली! चालताना लक्षात आले की ट्रेकिंग स्टिक उजव्या हातात पकडून पकडून माझा उजवा हात दुखायला लागला होता.

तेन्गबोचे ते देन्गबोचे हे अंतर जवळ जवळ १२-१३ किमी होतं. पर्वतांवर आता भरपूर बर्फ दिसायला लागला होता. काहीभाग लॅन्ड स्लाईड झाल्याने ट्रेक मार्ग त्यातून जात होता. हा पण अतिशय लेंदी ट्रेक होता.

तेन्गबोचे सोडल्यानंतर एक्सपीडीशन मध्ये शहीद झालेल्या शेर्पा आणि ट्रेकर्स चं इथे एक मेमोरिअल आहे. काही मेमोरिअल त्यांच्या नावासहित आहेत. बरीचशी मेमोरिअल इन्शुरन्सच्या निधीतून तयार केली गेलेली आहेत. ही असंख्य मेमोरिअल बघताना हृदयात कालवाकालव होते आणि त्यांच्या साहसाला सलाम करावासा वाटतो!

आता थंडी इतकी कडक होती की लोक कानासोबत तोंड आणि नाक पण झाकून घेत होते. मला ते कधीच जमलं नाही. मला गुदमरल्या सारखं व्हायचं त्यामुळे मी फक्त कान झाकून घ्यायचे. संपूर्ण ट्रेक मी नाक आणि तोंड सुरक्षित ठेवलं नाही.

माझ्या सोबत श्रींग होता. मला नेहमी तो म्हणायचा, “फास्ट चलो”...मी म्हणायची, “नहीं, स्लोली स्लोली”.
श्रींग सोबत
यावेळी तो शेवटी शेवटी कंटाळला होता. त्याला मी पुढं जाऊन गावाच्या एन्ट्रसला थांबायला सांगितलं. मी गावात प्रवेश करताना स्नो-फॉलला सुरुवात झाली होती. थंड थंड हलके हलके तुषार अंगावर झेलायला मजा येत होती. मी इतकी थकले होते की कधी एकदाचं हॉटेल येतयं असं झालं होतं. हॉटेल गावाच्या एकदम शेवटी असायची (दुसऱ्या दिवशीचा ट्रेक जिथे सुरु होतो तिथे हे हॉटेल). गाव जरी आलं तरी हॉटेलवर पोहोचायला अर्धा तास आरामात जायचा!

देन्गबोचे गावात मी पोहोचले तेव्हा गाव एकदम चिडीचूप होतं बाहेर एकही माणूस दिसतं नव्हता. थंडीचं इतकी कडाक्याची होती की बाहेर निघणार कोण. असो. एकदाची पोहोचले आणि सर्वांनी नेहमीप्रमाणे टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं.

अक्लमटायझेन मधे एक सांगितलं होतं की जेवणावर इच्छा राहत नाही, पण बळचं खायचं आहे. ह्याचा प्रत्यय येत होता. ट्रेक दरम्यान भूक लागायची आणि विशेषत: रात्री जेवणाची इच्छा व्हायची नाही. “नको ते जेवण” असं व्हायचं (हा हाय अल्टीटयूडचा परिणाम होता की अति थकल्याचा हा प्रश्न मला आहेचं) ह्यावर उपाय हाच की ट्रेक दरम्यान भूक लागते तेव्हाचं पोट भरेल असं काहीतरी खावून घेणे!

आता रात्री डबल सॉक्स, डाऊन जॅकेट, हॅन्ड ग्लोव्हज घालावेच लागत होते.

ह्या थंडीत चित्रांश ने सर्वांना बाहेर बोलवलं  आणि आकाश दाखवलं. आम्ही सर्वजण बघतचं राहिलो. आकाशात भला मोठा चंद्र आणि एक चांदणी चमकत होते! आकाश एकदम क्लीअर! थोड्यावेळा पूर्वी पाउस झाला, स्नो फॉल झाला ह्याचा लवलेश कुठेही नव्हता. चंद्र-चांदणीचा हा अनोखा मिलाप पाहताना भयानक थंडीचा परिणाम जाणवलाही नाही! पाचव्या दिवसाच्या ट्रेकची सांगता अशी सुंदर झाली!

दुसरा दिवस रेस्ट-डे होता सकाळी उशीरा उठलो. प्रचंड गार पाण्याने ब्रश करायला, तोंड धुवायला नको वाटतं होतं. गरम पाणी फक्त पिण्यासाठी मिळतं होतं आणि रात्री जरी गरम पाणी भरून ठेवलं तरी सकाळी ते थंडगार पडायचं. वेट टिशूने तोंड पुसायचं तरी ते एकदम गार गार! कित्येक दिवस आंघोळ नाही, मनासारखं तोंड धुतलेलं नाही. मनात हे येतं रहायचं पण आता तो जीवनाचा एक भाग होऊन गेला होता. आंघोळी साठी एका बादलीचा गरम पाण्याचा/१० मी शावरचा दर आहे ४००-५०० रुपये. 

पाणी गरम राहण्यासाठी मोठा थर्मास नेणं जास्त संयुक्तिक आहे. मग १-२ साध्या बाटल्या गार पाणी मिक्स करण्यासाठी जवळ ठेवल्या तरी चालू शकतात, असं माझ्या लक्षात आलं.

ह्या दिनक्रमात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या.
·    दररोज सॉक्स बदलणे. पायाची बोटे वेट टिशूने स्वच्छ करणे, कोरड्या नॅपकीन ने पुसणे, नंतर कोल्ड क्रीम लावणे आणि नंतर अॅन्टी फंगल पावडर चोळणे.
·  घामाने ओले झालेले कपडे बदलणे. शरीर कोरडं करून अॅन्टी फंगल पावडर लावणे.
·  स्त्रियांच्या बाबतीत योनीमार्गाची स्वच्छता ही खूप महत्वाची असते अन्यथा जंतूसंसर्ग चटकन होऊ शकतो. इथे तर आंघोळ नाही, सगळा टिशूचा वापर. काही पावडर पण घातक ठरू शकतात. हे सर्व लक्षात घेऊन काळजी घेतली. पॅन्टी लायनरचा वापर फायद्याचा वाटला.
·   सनस्क्रीन लोशन (एसपीएफ ३०-५०)ट्रेकच्या सुरुवातीला लावणे. विशेषत: चेहरा आणि खास करून नाकाच्या शेंन्डयाला. नाकाचा शेंडा तापमानाला अति संवेदनशील असतो (ट्रेक दरम्यान माझा चेहरा, मान-गळा, नाकाचा शेंडा अतिशय टॅन झाले होते). सनस्क्रीन लोशनमुळे त्वचेचं टॅन होण्यापासून, रॅश येण्यापासून रक्षण होतं).  
·     ओठ कोरडे पडले की लीप बाम लावणे. नाहीतर घसा पण शुष्क पडतो.
·     जिथे खूप थंडी जाणवली तिथे झोपायच्या आधी व्हिक्स लावणे.
·    मला सायनसचा त्रास होतो हे लक्षात घेऊन मी वेखंड पूड नेली होती. कपाळ, नाक,गळा, तळहात आणि तळपायाला चोळली की थंडीमुळे येणारा सर्दी, खोकल्यापासून संरक्षण मिळायला मला त्याची मदत झाली.
·    मी ओवा (पोट नरम असेल किंवा मळमळ होत असेल) सुद्धा बरोबर ठेवला होता, पण तो खाण्याची वेळ आली नाही. (माझं खाण्यामुळे पोट दुखण्यापेक्षा मेनापॉझ मुळे ओटीपोट दुखलं की मी ओवा खायची आणि त्याने आराम मिळायचा. त्यामुळे दैनंदिन ज्या शारीरिक सवयी आहेत आणि ज्या त्या हवामानालाही बाधक ठरणार नाहीत त्या मी पाळल्या)
·   कोका २०० (हाय अल्टीट्युड साठी होमिओपॅथीक टॅबलेट, दिवसातून दोनवेळा तीन गोळ्या घेणे)भीमसैनी कापूर इ. गोष्टी आम्ही जवळ ठेवल्या होत्या (गिरिप्रेमी ने ह्या सुचवलेल्या नव्हत्या) आणि त्याचा वापरही केला.
·     यावेळी “चितळे” प्रोडक्ट (बाकरवडी, चकली इ) टोटली साईड केले होते. शेंगदाण्याचे चिक्की, तिळाची वडी, ड्रायफ्रुट्स, खजूर, नाचणीची बिस्किटे इ. गोष्टी ज्याने उर्जा मिळेल अशाचं गोष्टी नेल्या होत्या. एकही तिखट वस्तू मी नेली नव्हती!

इथे जेवणात मीठाचा वापर कमी करतात. जेवण बऱ्यापैकी अळणी असतं. मीठ जास्त असेल तर पल्स रेट वाढतो जो हाय अल्टीट्युड हवामानाला उचित नाही हे त्यामागचं कारण आहे. हे मला कळाल्यावर खारे शेंगदाणे आणि फुटाणे ट्रेक ट्रेक दरम्यान खाण्याचं मी टाळलं!

असो. अक्लमटायझेशन साठी आज आम्ही नागार्जुन पीकला जाणार होतो. हा पीक देन्गबोचे पासून जवळ जवळ ४०० मी उंचावर होता. रात्री खंडीत झोप लागायची तरीही सकाळ फ्रेश असायची आणि स्टॅमीना अजूनही शाबूत होता. उत्साह तोच होता, एनर्जी तीच होती!

नागार्जुन पीक एक खास पीक आहे कारण तो २० पिक्सच्या मध्ये उभारला आहे. किती खास वाटतं असेल ना त्याला! त्याच्या आजूबाजूला २० महान पिक्स आहेत!


लोबुचे हे ४९३० मी. उंचावरचे ठिकाण. देन्गबोचे ते लोबोचे हे पण अंतर जवळ जवळ १२-१३ किमी आहे आणि हा पण एक खतरनाक चढाईचा टप्पा आहे. लोबुचे गावात पोहोचता पोहोचता माझा स्टॅमीना गळून पडला होता. आतापर्यंत असंच होत आलं होतं शेवटचा अर्धा तास मला महा कठीण जात होता. असो. इथे आले आणि खऱ्या अर्थाने हिमालयात आल्याची जाणीव झाली. आजूबाजूला बर्फात पहुडलेले डोंगरचं डोंगर! इथल्या आमच्या हॉटेलमध्ये ट्रेकर्सची इतकी प्रचंड गर्दी होती की बस्स! हॉटेल ट्रेकर्स ने खचाखच भरलं होतं. लोकांच्या बोलण्याचा फक्त आवाज आणि आवाज! काहीजण ईबीसी करून आलेले तर काहीजण ईबीसी ला जाणारे! काहीचं सेलिब्रेशन तर काहींचं प्रीपरेशन!

आतापर्यंत ट्रेकर्सचं निरीक्षण करायला मला मजा येत होती. जपानी ट्रेकर्स, एकदम शिस्तीत चालत होते, पुढे एक गाईड, मागे एक गाईड आणि मध्ये हे ट्रेकर्स! मुंग्यांची रांग आठवते ना? अगदी तसे...दोघा ट्रेकर्स मधलं अंतर मोजलं असतं तर ते समान मिळालं असतं! त्यांच्याकडे बघतचं रहाव वाटायचं! थांबले तरी एकत्र सर्वजण थांबणार, समान गतीने चालणार, गटात राहणार, आपल्याला बघितलं की “नमस्ते” म्हणत विश करणार...चेहऱ्यावर एक स्माईल यायचं !

अमेरिका किंवा तत्सम देशातील ट्रेकर्स भराभर चालायचे. दोन ट्रेकिंग स्टीकच्या आधाराने इतके झरझर चालायचे की त्यांच्या श्वासाचा आवाज यायचा. श्वास इतका फुललेला असायचा!

ह्या लोकांसाठी फायद्याची बाजू ही होती की त्यांच्या देशात हवामान साधारणपणे सारखं असतं. मायनस मध्ये. त्यामुळे त्यांना ती समस्या नव्हती. काही मुली तर चक्क गरम पाण्याने आंघोळ करताना सुद्धा दिसल्या. ट्रेकर्स कुठल्याही देशाचा असो खूप उत्साह होता. प्रत्येक जण शेवटीशेवटी थकलेला दिसायचा. त्राण संपत आलेले कळून यायचे. महा मुश्किलीने पाय पुढे पडले जात असले तरी दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश!

ट्रेकर्स चं वयाचं बंधन नव्हतं. तुलनेत तरुण गट कमी दिसत होता आणि स्त्री-पुरुष संख्या साधारणपणे समानचं असावी! ट्रेकर्समधला उत्साह, त्यांची तयारी, त्यांच बॅकपॅकिंग, त्यांच्या ट्रेकिंग स्टिक्स, त्यांचे डाऊन जॅकेटस इ. सगळ बघायला मला खूप आवडायचं. दुर्दैवाने संवाद करता आला नाही कारण इतकं दमून जायला व्हायचं की दुसऱ्या दिवसासाठी आज “आराम” करणं गरजेचं होऊन बसलं होतं. तसंही ट्रेक दरम्यान कमी बोलावं असं म्हणतात! असो.

लोबुचे ते गोरकक्षेप हे अंतर साधारण १० किमी असावं आणि ५२६४ मी. हे अंतर कापताना असं वाटतं होतं की आपण आपल्या ध्येयाच्या जवळ आलो आहोत. थंडी अधिकचं वाढलेली, गार वारा सुटलेला! गोरकक्षेप तसं पहाता ईबीसी चं बेस व्हिलेज! लोबुचे वरून निघून साधारण दुपारी एकच्या दरम्यान आम्ही गोरकक्षेपला पोहोचलो! हलकासा स्नो-फॉल होत होता आणि नंतर तो वाढला! सर्वत्र बर्फ आणि बर्फ! इतका स्नो-फॉल आणि इतकी थंडी मी प्रथमचं अनुभवतं होते! पण हॉटेलस आतून लाकडी बांधकामाची असल्याने आत थंडी कमी वाजते.

इथे गिरिप्रेमी ने छत्रपती शिवाजी महारांजांचा पुतळा उभारला आहे! “प्रोजेक्ट शिवाजी २०१२” ह्या प्रोजेक्ट अंतर्गत शेर्पा कम्युनिटीला मदत केली जाते!


हा मोन्यूमेंट बघितल्यावर “दोन हात आणि तिसरं मस्तक” त्यांच्यापुढे नतं होतं! माझ्याजवळची “शिवप्रतिमा” आणि हा मोन्यूमेंट एकत्र भेट हा काय सुंदर योग होता! मी इथपर्यंत पोहोचले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन झालं ह्यांचं मला धन्य धन्य वाटतं होतं! मनात एक विचार सारखा येत होता की कुठे मी दोन-अडीच वर्षापूर्वी ट्रेकिंग सुरु केलं, “एव्हरेस्ट दर्शन” करण्याची काय ती आस निर्माण झाली आणि आज मी इथे आहे! कृतार्थ झाले मी!

गोरकक्षेपच्या हॉटेल बाहेरचं `हेलिकॉप्टर लॅन्डींग होतं. सामानाची ने आण व्यतिरिक्त ट्रेकर्सना काही त्रास झाला, काही नैसर्गिक आपत्ती आली तर  लोकांना रेस्क्यू करण्याचा हेलिकॉप्टर हा एकचं मार्ग आहे! संपूर्ण ट्रेक भर असंख्य हेलिकॉप्टर आकाशातून जाताना, लॅन्ड होताना दिसत असतात. तो  एक संकेत हा देखील देतो की, “काहीतरी विपरीत घडलयं”! थोडसं टेन्शन येतं, धडकी भरते....समीटच्या इतकं जवळ आलोय आता काही विपरीत घडायला नको हा विचार सतत मनात असतो! असो.

वर्षाला थोडा त्रास होत होता म्हणून मी, ती आणि रोहिणी मॅडमने दुसऱ्या दिवशी ईबीसी करायचं ठरवलं! बाकी सर्वजण जेवण करून ईबीसी साठी निघाले.

आमच्या ग्रुपमध्ये फारसा कोणाला काही त्रास झाला नाही. थोडयाप्रमाणात डोके दुखणं, उलटी, मळमळ, अपसेट पोट इतकचं.  

संध्याकाळी हे लोक ईबीसी समीट करून आले. भयानक स्नो-फॉल, कडाक्याची थंडी, बर्फामुळे चालणं मुश्कील झालं होतं, हात-पाय बधीर झाले होते. प्रचंड गार वारा आणि थंडीमुळे फारकाळ तिथे थांबता आलं  नाही.

अखेर दुसरा दिवस उजाडला, २ मे २०१७. आम्ही तिघी, कामी आणि श्रींग शेर्पा सोबत सकाळी ५ वाजता ईबीसी साठी निघालो. वाटेवर सर्वत्र बर्फाचा सडा पडला होता. सकाळी सकाळी दोनचं रंग दिसत होते, निळे आकाश आणि पांढरी धरती! थोडी खबरदारी घेत, बर्फावरून घसरणार नाही याची काळजी घेत मी चालत होते. चालताना स्वत:च्या मनाचा ठाव घेत होते. गोरकक्षेप वरून निघालंचं की ईबीसी कडे जाण्याचा फलक आहे, तो बघूनचं गलबलून आलं होतं. फक्त काही तास आणि “मा. एव्हरेस्ट” मला दर्शन देणार होता! हो, आतापर्यंत मी त्याच्या दर्शनासाठी निघालो होते आता त्याची जबाबदारी होती मला दर्शन द्यायची! भावनांवर नियंत्रण ठेऊन ध्येय गाठणं हे किती आव्हानात्मक काम आहे हे तेव्हा मला उमगलं! गोरकक्षेप वरूनचा हा ट्रेक प्रवास एक नितांत सुंदर अनुभव होता. जिकडे बघावं तिकडे बर्फचं बर्फ! आज देखील सूर्यदेवता आमच्यावर प्रसन्न होती. तिला नमन करून ट्रेक सुरु केला! म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर अवघड असा हा टप्पा आहे. काही पॅचेस खतरनाक आहेत. काही ठिकाणी बर्फ वितळल्याने पाणी पाणी झालं होतं. काही ठिकाणी पाणी आणि बर्फाचे अंश मिक्स होते. इथे मला Quechua FORCLAZ 500 शूज खूप उपयुक्त वाटले. त्यांना बर्फातही छान ग्रीप आहे!

ह्या ट्रेक मार्गावर पहिल्या टप्प्यावर दिसते, एकीकडे खुंबू ग्लेशिअर, एकीकडे रंगीबेरंगी टेंट ठोकलेले, खाली बर्फच बर्फ आणि वाऱ्यावर फडकत असणारे असंख्य प्रेइंग प्लाग्स! सभोवताली दिसणारे असंख्य पिक्स आणि त्यात दिमाखात खडे मा. एव्हरेस्ट शिखर!


कामी शेर्पाने एव्हरेस्ट शिखर दाखवले आणि आनंदाला पारावार राहिलाचं नाही. ढग विरहीत सुस्पष्ट मा. एव्हरेस्ट! पहिली रिअॅक्शन त्याला वंदन करणं हिचं होती! 


वंदन करताना घसा कंठ दाटून आला होता, डोळ्यात आनंदाश्रु जमा झाले, आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द फुटेना, आजूबाजूला इतके सारे ट्रेकर्स आहेत ह्याच भान देखील राहिलं नाही. काही मिनिट निस्तब्ध होते! त्या काही क्षणात “एव्हरेस्ट दर्शनाची मनीषा” हा साहसपट डोळ्यासमोरून तरळून गेला! खरंतर ही इच्छा किती तीव्र होती ह्याची उमग त्याचं दर्शन झाल्यावर झाली!

काही क्षण गेल्यावर सूर्य शिखरावर तळपला आणि मग शिखर सुस्पष्ट दिसेना. त्यानंतर भानावर आल्यासारखं झालं. अचानक कल्पना सुचली व्हिडीओ काढण्याची. मोबाईल काढला पण प्रचंड थंडीने तो हातातही धरवेना. हात थरथर कापत होते. श्रींग तर थोडावेळ थांबू पण देईना “चलो, बहोत थंडी” म्हणत चक्क पुढे चालायलाही लागला होता! मी मोबाईल कामीजीं कडे दिला. त्यांना व्हिडीओ मध्ये मला काय हवयं ते समजावून सांगितलं. पहिला जो शॉट घेतला त्यात मी इतकी भारावून गेले होते आणि इतकी भावनाप्रधान झाले होते की शब्द क्लीअर आलेच नाहीत. भावना कंट्रोल केल्या आणि मग व्हिडीओ शूट केला. ह्या भावना समर्पित होत्या माझ्या त्या ट्रेकिंग सहकाऱ्यांसाठी ज्यांच्यामुळे मी हे  साहस करण्याचं धाडस केलं, ज्यांनी मला पावलोपावली सोबत दिली, प्रोत्साहन दिलं, ट्रेकिंगचे धडे दिले आणि सरावातही मोलाची साथ केली! मा. एव्हरेस्ट ने दर्शन कदाचित म्हणूनचं दिलं की माझ्या येण्यात माझे हे सगळे सहकारी सामावले होते!

असं वाटलं, मा. एव्हरेस्टने दर्शन देऊन “शिवप्रतिमेचाही” मान राखला आणि सह्याद्री ट्रेकिंगच्या ह्या “छत्रपतीला” वंदना केली!



थोडा वेळचं इथ आम्ही होतो पण तो एक अलौकिक अनुभव होता! अभिलाषापूर्तीचा अनमोल क्षण होता! जवळ जवळ अडीच वर्ष मनात बाळगलेली आशा आज पूर्ण झाली होती! आनंद व्यक्त करण्यासाठी मा. एव्हरेस्ट साठी आम्ही एक गाणं देखील निवडलं होतं, “बडे अच्छे लगते है, ये धरती, ये नदियाँ, ये रैना और तुम!” या गाण्यातून ह्या शिखरावर अभिवादन करून आम्ही पुढे निघालो!

ईबीसी समीटवर आमच्या गाईडने फार काळ थांबू दिल नाही. कारण कडाक्याची थंडी आणि काही त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. लुप्त झालेला मा. एव्हरेस्ट, ट्रेकर्स मधील उत्साह आणि समीटचा जोश बघण्यासारखा होता! 

समीट वरून आल्यावर पहिल्यांदा वाय-फाय घेतलं साधारण ४०० रु तासाला. आपल्या एक रुपायची किंमत तिथे १.६. दरवेळी तो भागाकार करायचा आणि पैसे द्यायचे. दर नेट आल्यावर घरच्या आणि एस.जी. ट्रेकर्सच्या ग्रुपवर समीटचे फोटो आणि व्हिडीओ टाकला! लगेचच अभिनंदनाचा वर्षाव सुरु!

निघताना मनात विचार होता, मा. एव्हरेस्ट उंचीच्या दृष्टीने (८८४८ मी) भव्यदिव्य आहेच पण त्याची भव्यता ही की त्याने आज मला दर्शन दिलं! त्याच्या सोबत मलाही भव्यदिव्य बनवलं! मा. एव्हरेस्ट दर्शनाने तृप्त होऊन मी निघाले होते खरी पण ती भव्यदिव्यता जपणं, प्रसंगी वृधिंगत करून त्या उत्तुंग शिखराची शान कायम राखण्याची मोठी जबाबदारीही सोबत घेऊन निघाले होते!

आमचा आता ट्रेक असा होता की ईबीसी-गोरकक्षेप-फेरीचे (५३६४ मी ते ४२८० मी)! हा जवळजवळ २५ किमी चा ट्रेक होता (जवळ जवळ ११-१२ तास चालणे). जाताना बऱ्यापैकी उतार होता पण हा ट्रेकने खूप थकवलं! त्यात काय झालं उतार असल्याने बूट घासत होते आणि पायाची बोटे आणि तळपाय हुळंहुळे झाले होते. बघितलं तर तळपायाला फोड आलेला. सुदैवाने त्याचा त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी मी एकावर एक असे दोन सॉक्स पायात चढवले जेणेकरून बूट त्वचेला घासू नये!

फेरीचेला पोहोचायला संध्याकाळचे सात वाजले. शेवटी शेवटी अजिबात त्राण उरले नव्हते. सगळ्यांना वाटलं की त्या दिवशी गोरकक्षेपला स्टे हवा होता. असो. फेरीचेला गावात प्रवेश केला आणि ह्या गावचं वेगळेपण जाणवलं. प्रत्येक घर/हॉटेलला छताला चिमणी होती आणि त्यातून गरम वाफा/धूर बाहेर येत होता. यामुळे गावात शिरल्या शिरल्या एकदम उबदार फिल झालं. इथेही हॉटेल गावाच्या डेड एन्डला. बापरे, तोपर्यंत तग धरणं कमालीचं त्रासाचं झालं! सगळेचं इतके थकले होते की झोपी जाणं सर्वांनी पसंद केलं!

फेरीचे ते नामचे (३४४० मी) हा ट्रेक केला. खतरनाक चढ आणि तेवढाच खतरनाक उतार. त्यात पाऊस पडायला लागला. नामचे च्या दोन तास आधी पूर्ण अंधार पडला आणि मुसळधार पाऊसात भिजलो. आम्हा सर्वांनाच कळेना की काल आणि आज आम्हाला एवढा ट्रेक का करायला लावला? सर्वांचीच थोडी चिडचिड झाली. आमच्या शेर्पा-गाईड लोकांना त्यांच्या घरी जायची घाई आहे का अशी शंका सर्वांनाच आली!

आम्ही आता लो-अल्टीट्युडला येत होतो. सर्वांनाच खूप इच्छा होत होती की आता वेगळं आणि चटपटीत काहीतरी खावं. कोणालाही भात-वरण खायचं नव्हतं. आमच्या गाईडने अजूनही फार मोठ्या प्रमाणात ते खाण्याची परवानगी दिली नव्हती म्हणून फक्त चटण्या बाहेर आल्या!

दुसऱ्या दिवशी मान्जो (२८५० मी) पर्यंतचं अंतर ३-४ तासात पार केलं. लवकर पोहोचल्याने आराम मिळाला आणि इथे मात्र आणलेला सगळा खाऊ बाहेर काढला. कोल्हापूरचं भडंग, खारातली हिरवी मिरची, शेंगदाणे-कारळाची चटणी, गुजराथी फरसाण, फुटाणे, खारे शेंगदाणे इ. सर्वांनी ताव मारला मनसोक्त!

आता परतीच्या टप्प्यावर पोहोचत होतो. आज मान्जो ते लुक्ला (२८०४ मी) अंतर कापणार होतो. हा प्रवास मान्जो (२८५०मी) पासून फाकडिंग (२६२३ मी)आणि लुक्ला (२८०४ मी) असा होता. तीव्र उतार आणि तीव्र चढ असा हा प्रवास होता. मधे मधे दगडी पायऱ्या होत्या आणि अंतर जवळ जवळ १० किमी होतं. ट्रेकचा आजचा १२ वा दिवस होता. १२ दिवस सरासरी ८-१० किमी आणि ६-७ तास आम्ही रोज चालत होतो. शरीर थोडं थकल्यासारखं वाटतं होतं. पाठीवर ओझं  घेऊन खांदे आणि मान किंचित दुखायला लागली होती.

चालतं राहिलं तरी ट्रेक काही संपत नव्हता. एक वळण गेलं की दुसरं वळण आहेच, एक चढ गेला की दुसरा आहेचं....बापरे...एक होतं चढ भयानक होता, पायऱ्या खूप होत्या पण त्या चढाई आणि पायऱ्यात एक समान अंतर होतं त्यामुळे शरीराची (विशेषत पायांची) हालचाल एका अंशात (फार तर फार शून्य ते ५० अंशापर्यंत) होती. सह्याद्रीमधले ट्रेक हे ओबडधोबड आहेत आणि आडवे-तिडवे पसरलेले खडक, पायवाट, दगडी पायऱ्या, कडे-कपारी, डोंगर, दऱ्या, घळई, शिड्या, रॉक पॅचेस, जंगल, नद्या-झरे, धरण अशा कित्येक गोष्टींनी व्यापलेले आहेत. इथे शरीराची विशेषत: पायाची हालचाल एका ठराविक कोनातून होतं नाही. माझ्याबाबतीत तर ती शून्य अंशापासून १३० अंशापर्यंत होत असते आणि ते करण्यासाठी शरीर जे स्ट्रेचं करावं लागतं ते जास्त आव्हानात्मक होतं! सह्याद्रीच्या हवामानाशी समायोजन झाले असल्याने ते हवामान हे आव्हान वाटतं नाही! असो.  

मान्जो-लुक्ला ट्रेक करताना सर्वांनाच हे फिलिंग होतं की आपण हे असले खतरनाक चढ चढून कसं गेलो? काही चढ तर आठवतही नव्हते. “आपण इतका चढ चढून गेलो” हा आश्चर्यकारक विचार, ही भावना खूप सुखावणारी आणि अभिमानास्पद होती!

फाकडिंग ते लुक्ला ९०% चढ आहे आणि तो ही पायऱ्यांचा! बापरे..नको नको झालं होतं अगदी! लुक्लाला पोहोचले आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या! वर्षाने गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं!



तो क्षण असीम आनंदाचा होता. १२ दिवसापूर्वी सुरु केलेल्या ट्रेक ने आज अंतिम टप्पा गाठला होता! एक एक पाऊल टाकत एकदम संथ गतीने ट्रेक पूर्ण केला असला तरी तो आरोग्यत्रासरहित झाला हे महत्वाचं होतं! हा ट्रेक पूर्ण होणं हा “सह्याद्री ट्रेकिंग” चा विजय होता! (त्याशिवाय दुसरं मी काही केलंच नव्हतं ना)

लुक्ला वरून काठमांडूला दुसऱ्या दिवशी (६ मे २०१७) फ्लाईट होती पण हवामान बदललं आणि संपूर्ण ट्रेक मधे साथ देणाऱ्या सूर्यदेवतेने यावेळी पर्जन्यदेवतेला पुढे केलं! फ्लाईटस रद्द झाल्या. एक पर्याय समोर आला की प्रायव्हेट हेलिकॉप्टरने एका ठिकाणा पर्यन्त जाऊन पुढे काठमांडूपर्यन्त जीपने आठ तासांचा प्रवास! हेलिकॉप्टरवाले १००-१५० डॉलर मागू लागले. हो-नाही निर्णय घेता आणि फ्लाईटस टेक ऑफ वाट पाहीपर्यंत वेळ निघून गेली आणि लुक्लाला मुक्काम करावा लागला!

दुसऱ्या दिवशी सकाळी ८ च्या दरम्यान फ्लाईट मिळाली आणि सर्वांनीच निश्वास सोडला. आजही फ्लाईट नसती मिळाली तर आधीचा पर्याय वापरावा लागला असता कारण पुण्याची फ्लाईट ८ तारखेला होती! इकडे यायचं म्हणजे हा बफर टाईम हातात हवाचं!

काठमांडू मधे सोमवारी सकाळी पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं.

पुण्यातल्या पर्वती, महालक्ष्मी, तळ्यातला गणपती आणि चतुश्रुंगी दर्शनापासून सुरु झालेला हा ट्रेक प्रवास पशुपतीनाथाच्या दर्शनाने सफळ संपूर्ण झाला असे वाटले!


दुपारी एका सरदारजींच्या हॉटेलमधे जेवलो. सर्व पंजाबी डिशेश! मज्जा..मनसोक्त पेटपूजा! जीभ धन्यधन्य झाली!

७ तारखेला ट्रेकपूर्तीच्या आनंदाप्रित्यर्थ “पीक प्रमोशन” संस्थेने आमच्यासाठी डिनर अरेंज केलं होतं. एका हॉटेलमधे डोसा, उतप्पा, पाणी-पुरी, इडली-सांबर, पाव-भाजी, पराठा, गुलाबजाम असे सर्व पदार्थ आम्हाला मिळाले आणि आम्ही सर्वजण तृप्त झालो!

आम्हाला अशा प्रकारचं ट्रेक रजिस्ट्रेशन कार्ड देखील मिळालं.


८ तारखेला काठमांडू –दिल्ली- पुणे अशी फ्लाईट होती. मी तन्मोय आणि चित्रांश दिल्ली पर्यंत एकाच फ्लाईट मध्ये होतो. नंतर मी आणि तन्मोय पुण्यासाठी निघालो, रात्री ११ च्या दरम्यान पुण्यात पोहोचलो आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प समीटची सांगता झाली!

ईबीसी ट्रेक: एक अनुभवात्मक विश्लेषण: २४ एप्रिल ते ५ मे असा हा १२ दिवसांचा आणि एकूण १४० ते १५० किमी. ट्रेक समीट प्रवास! राहून राहून मनात येतयं “मी कसा काय ट्रेक समीट करू शकले?”....

काही मुख्य गोष्टी मी केल्या नव्हत्या,
·        ट्रेनिंग प्रोग्राम पहिला तर त्यातल्या ९०% गोष्टी मी केल्या नव्हत्या.
·        मला हिमालयीन ट्रेकिंगचा अनुभव नव्हता.
·        ट्रेकिंगच्या आधी १०-१५ दिवस विश्रांती इ. सारखे नियम मी पाळू शकले नव्हते.

काही मुख्य गोष्टी मी केल्या होत्या,
·        दर शनिवार/रविवार सहयाद्री ट्रेकिंग
·        आठवड्यातून दोन दिवस पर्वती चढणे-उतरणे
·        ट्रेकिंग नसेल तेव्हा सिंहगड चढणे-उतरणे
एव्हरेस्टर भूषण हर्षे ने मला सरावामधे सिंहगड, पर्वती, ट्रेकिंग ह्या गोष्टी सांगितल्या होत्या पण त्याचा कल ह्याकडे होता की ईबीसी ट्रेक आधी २-३ महिने हा सराव केला तरी पुरेसा होतो! तो ते तसं का म्हणतं होता हे मी आता समजू शकते. (अर्थात ट्रेनिंग प्रोगाम मधे लिहिलेल्या गोष्टी तुम्ही करू शकला तर फायदाच होईल. त्या सर्व गोष्टींचा एव्हरेस्ट एकस्पिडीशन ला अधिकाधिक फायदा होत असावा असा विचार माझ्या मनात आला).

तरीही प्रश्न राहतो की मी जो सराव केला त्या सरावावर आधारित मी ट्रेक का पूर्ण करू शकले.

पण माझ्या अनुभवावरून मला जे वाटते ते असे आहे की,
·   स्टॅमीना बिल्डींग आणि एन्ड्युरन्स प्रक्टिस साठीचे व्यायाम/सराव मस्ट आहेत.
·    ट्रेक दरम्यान चालण्याची आणि श्वासाची गती एक असावी.
·   सर्वात महत्वाचं मला हे वाटतं की स्वत:ला ओळखणं महत्वाचं आहे, स्वत:च्या शरीरप्रकृतीला ओळखणं महत्वाचं आहे. त्यानुसार तुम्ही जर उपाय योजले किंवा काळजी घेतली तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकेल.

मला स्वत:ला काहीही त्रास झाला नाही. माझा गुडघा देखील दुखला नाही! का? ह्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी भरपूर केला पण उत्तर सापडले नाही. कदाचित एकाच अंशात होणारी शरीराची (विशेषत) पायांची हालचाल, पायऱ्या चढण्याचा व्यायाम हे त्यामागे कारण असावं. त्याकाळात माझ्याकडून कॅल्शीयमच्या गोळ्या खाल्ल्या गेल्या नाहीत त्याचा तर काही संबंध नसावा हा विचार देखील आहे. चिकनगुनिया झालेला, इतकी थंडी असे असूनही काही त्रास झाला नाही ही गोष्ट जितकी आनंददायी आहे तितकीच विचार करायला लावणारी! 

आमच्या ग्रुपमध्ये एका मुलीला त्रास झाला आणि तिचा ट्रेक पूर्ण होऊ शकला नाही. तिला त्रास का झाला आणि आम्हाला त्रास का झाला नाही ह्याच ठोक, ठाम उत्तर नाही, कदाचित ते कोणीही सांगू शकत नाही.

तिला लुक्लाला पाठवण्यासाठी जी हालचाल झाली ती वाखाणण्याजोगी आहे. आमचा ट्रेक गाईड फुलाजी, वर्षा यांनी फोनाफोनी करून काही मिनिटात हेलिकॉप्टर अरेंज केलं. पुण्यात भूषण ह्या गोष्टी अरेंज करण्यासाठी किती तत्पर होता हे यावेळी लक्षात आले! असो.

हाय अल्टीट्युड, डायमॉक्स आणि त्याचे दुष्परिणाम, हिमालयीन ट्रेक चा अभाव सारख्या गोष्टींचा बाऊ करून ह्या ट्रेकचा विचार न करणं मला वाटतं योग्य नाही.

अडीच वर्ष ट्रेक केल्यानंतर आता फक्त एकच विचार केला होता, “मला ईबीसी ट्रेक करायचा आहे आणि तो आत्ताचं”! त्यासाठी माझ्या हातात असणाऱ्या गोष्टी मी केल्याजसेपैशाची बचत (ट्रेकिंग सुरु केल्यापासून मी पैशाच्या बचतीकडे काटेकोरपणे लक्ष दिलं)सुट्ट्यांचा योग्य वापरएन्ड्युरन्स सरावआरोग्याकडे विशेष लक्ष (मेनापॉझल वय लक्षात घेऊन तर खूप काळजी घ्यावी लागतेजसे सकस आणि संतुलित आहारपुरेशी झोपआनंददायी गोष्टी करणंभावनांवर नियंत्रण इ.)इ.

ईबीसी ट्रेक, एका दृष्टीने पाहता, मला तसा मोनोटोनस वाटला, मधूनचं तो बोअरिंग पण वाटला. दुसऱ्या दृष्टीने विचार केला आणि मा. एव्हरेस्ट डोळ्यासमोर आणला तेव्हा तो एक आव्हान वाटला! मा. एव्हरेस्ट ने तुम्हाला आणि तुमच्या शरीराला दिलेलं आव्हान! स्वत:कडे खेचून घेण्याची काय प्रचंड ताकद ह्या पर्वतामध्ये आहे! निसर्ग आणि माणूस यांची केवढी मोठी ही चढाओढ!

खरं पाहता हा ट्रेक नॉन-टेक्निकल असला तरी टफ आहे पण निश्चितचं अचीव्हेबल आहे! म्हणूनचं मला वाटतं “स्वत:ला एक संधी देणं” (उचित नियोजन करून योग्य वेळेची वाट पाहणं) हाच “सह्याद्री ट्रेकर्स” च्या मनातील या “पंढरीला” जाण्याचा मूलमंत्र आहे!


दिनांक ६ जुलै २०१७ रोजी ह्या ब्लॉगचे ब्लॉगरवर प्रकाशन श्री. उमेश झिरपे सरांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मा. उष:प्रभा पागे मॅडम आणि श्री. आनंद पाळंदे सर यांचे आशीर्वाद मला लाभले!



ईबीसी ट्रेक संदर्भात काही महत्वपूर्ण बाबी:

ईबीसी ट्रेकला यायचं तर तो ठरलेल्या शेडूयुलप्रमाणे होईल असं नाही ह्याची मानसिक तयारी करून यायला हवी आणि काहीई दिवसांची मार्जिन ठेऊन प्लॅनिंग करून यायला हवं हे मनात पक्क करा.
ट्रेकसाठी आवश्यक गोष्टी: आम्हाला पूर्तता करण्यामध्ये आवश्यक गोष्टी होत्या,

·        वैयक्तिक माहिती
·        मेडिकल सर्टिफिकेट
·        इण्डेमनीटी बॉन्ड
·        फोटो आयडी प्रुफ: पासपोर्ट किंवा इलेक्शन कार्ड
·        पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स

इतर गोष्टी:       

·        रु ५०,००० पर्यन्त रक्कम तुम्ही काठमांडूला नेऊ शकता.
·     तिथे वेगळे मोबाईल रीचार्ज सिम कार्ड घ्यावे लागते.(ह्याला रेंज नाही असं लक्षात आलं. त्यामुळे सिम कार्ड न घेता ज्या त्या ठिकाणी वाय-फाय चार्जिंग कार्ड घेणं उत्तम)
·   मोबाईल /कॅमेरा चार्जिंग (२०० नेपाळी रु), वायफाय चे वेगळे चार्जेस (३००-४०० नेपाळी रु) आहेत.
·        काठमांडू ते लुक्ला फ्लाईट: चेक इन १० किग्र आणि केबिन लगेज ५ किग्र
·        डाऊन जॅकेट, स्लीपिंग बॅग भाड्याने मिळते,चार्जेस रु १५०-२०० /दिवस

ट्रेकिंग चेकलिस्ट:

·        उत्तम दर्जाची बॅकपॅक
·        डफल बॅग
·        कानटोपी, स्कार्फ
·        वुलन हातमोजे आणि सॉक्स
·        साधे सॉक्स
·        फ्लीज जॅकेट
·        डाऊन जॅकेट
·        विंड चीटर
·        स्वेट शर्ट
·        बफ/फेस मास्क
·        पोन्चो
·        रेन कव्हर
·        पूर्ण बाहीचे ड्राय फिट टी शर्ट आणि पॅन्ट
·        चांगली ग्रीप असणारे, वॉटर प्रुफ शूज
·        फ्लोटर
·        ट्रेकिंग पोल (१ किंवा २)
·        स्लीपिंग बॅग
·        नी-कॅप
·        पाणी गरम राहण्यासाठी मोठा थर्मास
·        पाण्याच्या बाटल्या, वॉटर ब्लॅडर
·        ड्राय आणि वेट टिशू
·        टॉयलेट रोल
·        हॅन्ड सॅनीटायझर/ हॅन्ड वॉश (हॅन्डी)
·        बॅन्ड एड
·        अॅन्टी फंगल पावडर हॅन्डी
·        हेड टॉर्च विथ सेल्स
·        सनस्क्रीन लोशन (एसपीएफ ३०-५०)
·        लीप बाम
·        माऊथ वॉश (कोलगेट प्लाक्स/लिस्टरिन इ.)
·        कॅमेरा, चार्जर, सेल्स
·     पॉवर बॅन्क (फ्लाईट मधे ही केबिन बॅग मधे ठेवावी लागते. चेक-इन बॅग मधे अलाऊड नाही)
·        नित्याची औषधे
·        सॅनीटरी पॅड्स, पॅन्टी पायनर (स्त्रियांसाठी)

ट्रेकिंग बाबत: 

सर्व सामान डफल बॅगेत राहिल, जी बॅग पोर्टर कॅरी करतील.
रोजच्या ट्रेकसाठी पाठीवर एक बॅकपॅक असेल, ज्यात ३-४ ली. पाणी, पोन्चो, फ्लीस जॅकेट, विंड चीटर, स्नॅक्स, कॅप, कॅमेरा असेल. (अन्य वस्तू, प्रत्येकाच्या आवश्यकतेनुसार)
गरम कपडे घालणे आणि भरपूर पाणी पिणे. शक्यतो गरम पाणी पिणे.
मांसाहार, मसाले दार पदार्थ खाणे टाळणे.
स्वत:च्या मनाने औषधे न घेणे. 
ट्रेक गाईड कडे फर्स्ट-एड कीट, ऑक्सिजन सिलेंडर असेल. 

हाच ट्रेक पुन्हा एकदा माझ्या ट्रेकिंग सहकाऱ्यांसोबत करण्याची इच्छा बाळगून आहे...माझी ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल ह्याची मला खात्री आहे! 

भाग ३: पोस्ट ईबीसी ट्रेक परिणाम आणि यशाचे शिल्पकार

८ मे २०१७ तारखेला रात्री १२ च्या दरम्यान पुंण्यात पोहोचले. ९ आणि १० सुट्टी घेतली होती. ९ ला तर झोप आणि आरामचं केला. तीन दिवस सामान अनपॅक देखील केलं नाही. काठमांडू वरून निघताना वाटलं होतं थकवा गेलाय पण तो गेला नव्हता. १० तारखेला बुद्ध पौर्णिमेची सुट्टी होती. बहीण भेटायला आली आणि येत्नाना बाजरीची भाकरी, पिठलं, आमटी आणि मेथीची भाजी घेऊन आली! घरच्या जेवणाने तोंडाला चव आली आणि भातापासून सुटका मिळाली! 

११ तारखेला ऑफिसला रुजू झालेपोस्ट –ईबीसी ट्रेकचे परिणाम आता 
जाणवायला सुरुवात झाली. हे परिणाम तीन स्तरावर होते, आरोग्य, एन्ड्युरन्स व्यायाम आणि दृष्टीकोन! 

शारीरिक/आरोग्य: 

सुरुवात खरंतर दिल्ली-पुणे विमानापासून. विमानात कानाला दडे बसल्यासारख झालं. कान जड झाल्यासारखे, कानावर खूप ताण आल्यासारखं वाटतं होतं. शेजारी बसलेली मुलगी मला बघून अचंबित झाली होती. मी अशी चेहऱ्यावर थकलेली, कानाला त्रास होतोय. मला तर वाटलं ती नक्की विचारणार. विमानातून उतरलो थोडावेळ ऐकायला हलकसं कमी येत होतं पण घरी येता येता कान बऱ्यापैकी नॉर्मल झाले होते.

-२० ते -१८ डिग्री सेल्सिअस मधून थेट आले ते +३८-४२ डिग्री सेल्सिअस मध्ये. दोन दिवस घरी होते तर बरी होते, पण ऑफिसला म्हणून घराबाहेर पडले आणि हवामानातील आणि तापमानातील बदल बाधला. सर्दी आणि खोकला झाला, घसा बसला, एक-दोन दिवस तर आवाज फुटतं नव्हता, नंतर आवाज घोगरा झाला. नाकात सर्दी अडकली, कान बंद आणि मधून मधून खोकल्याची ढास. बरं घसा दुखत नव्हता, ताप नाही..पण गळयावरील सर्व भाग बधीर. जास्त त्रास झाला तो कानांचा. कान ब्लॉक झाले होते, ऐकायला कमी येत होतं. खुपचं अस्वस्थ करणार फिलिंग. मला सायनसचा त्रास होत होता. विचार केला ह्या गोष्टी पूर्ववत व्हायला त्याचा वेळ त्याला घेऊ दे. मनात आलं अॅक्लमटायझेशन इथही जरुरी आहे की काय? इथून ईबीसी ला जाताना हवामान, तापमान आणि उंची ह्याचा विचार करून अॅक्लमटायझेशन वर इतका भर दिला जात होता की त्याचं टेन्शन यावं. पण ईबीसी वरून येतानाही हवामान, तापमान आणि उंची बदलतेच की मग तेव्हा अॅक्लमटायझेशन वर भर का दिला जात नाही? मला वाटलं दोन दिवस मी घरातच राहिले आणि अचानक घराबाहेर पडले ही चूकचं केली. उच्च तापमानाला हळूहळू सामोरे जायला हवं होतं! अल्टीटयूट आणि कानावर येणारं प्रेशर ह्याचा घनिष्ठ शास्त्रीय संबंध आहेचं की. हा त्रास जायला साधारण १५ दिवस लागले. हे लिहायचं ह्यासाठी की हिमालयीन ट्रेक करून आल्यावर ह्यापुढे ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून खबरदारी घ्यायला हवी हा बोध मला झाला. 

ईबीसी ट्रेक मुळे शरीराचं वजन ५६ वरून ५२ वर आलं होतं! मुख्यत: कंबर ते गुडघे या भागातील चरबी घटली होती! ऑफिस मधील मुली म्हणायच्या, “मॅडम तुम्ही खूप बारीक झाला आहात, छान दिसताय”. माझी बहीण, जी नेहमी वजन कमी कर म्हणून मागे लागायची ती म्हणे, “तायडे, तुझं वजन चांगलच कमी झालयं, अजून कमी कर.”खरंतर हालचाल करताना मला तसा काही फरक जाणवत नव्हता, पण कुठेतरी स्वत:ला सुनावलं, “सविता, हेच वजन तुला मेंटेन करायचयं”! वजन कमी झालं ते १२ दिवस सतत चालण्याने, रोज गरम पाणी पिल्याने की रोज काही दिवस भात-भाजी खाल्ल्याने?? विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं वाटलं. हीच जीवनशैली पुढे चालू ठेवली तर कमी झालेलं वजन मेंटेन होईल का? कंबर ते गुडघे याभागातील चरबी कमी होणं खासकरून स्त्रियांमध्ये जिकिरीचं असतं जे माझं झालं होतं. भेटेल तो मुलगी विचारत होती, “काय केलंस?” 

चेहरा, बापरे...नाकाचा शेंडा काळा-काळा झालेला (सन स्कीन लोशन म्हणून नाकाच्या शेंडयावर थापायच असतं हं). चेहरा एकंदरीतच टॅन झालेला, थकव्याने मलूल झालेला. त्याला तरतरी यायला, ताजेतवान व्हायला, टवटवीत व्हायला साधारण १५ दिवस लागले!

ट्रेक नंतर हिमोग्लोबिन मुद्दाम केलं. १२.८ वरून ते ११ वर आलं होतं. खूप मोठ्या प्रमाणात ते कमी न झाल्याचं पाहून हायसं वाटलं. 

एन्ड्युरन्स व्यायाम:

२१ में पासून पर्वती एन्ड्युरन्स सुरु केला आणि जो बदल अनुभवला तो असा

ईबीसी ट्रेक करून आल्यानंतर जवळ जवळ १५ दिवसांचा गॅप पडूनही पर्वतीच्या पायऱ्या मी न थांबताएका दमात चढून जाऊ शकले. यावेळी प्रत्कर्षाने जाणवलेला बदल हा कीपर्वतीच्या काही उंचीच्या पायऱ्या चढताना मी खूप सहजतेने पाय वर उचलून टाकू शकले. एरवी थोडा जोर कंबर आणि पायाला द्यावा लागायचा. ट्रेक करून कदाचित एक सहजता आणि लवचिकता शरीराला प्राप्त झाली आहे असं वाटलं.

दुसरा प्रत्कर्षाने जाणवलेला बदल हा  कीपायऱ्यांचा जो चढता स्लोप आहे तो यावेळी असा  अंगावर येत नव्हता.

पायऱ्या उतरताना उजवा पाय खूप सहजतेने टाकू शकले आणि उजवा गुडघा दुखत नसल्यानेसंपूर्ण पायऱ्या उतरल्यावर उजव्या पायाचा हलकासा व्यायामजो मला आधी करावा लागायचातो करावासाही वाटला नाही!

उतरताना इतक्या सहजतेने मी पायऱ्या उतरले की त्या उतरल्यावर लक्षात आले की माझा तोल किती चांगल्या तऱ्हेने सांभाळला गेला आहे! आधीच्या तुलनेत अतिशय वेगाने मी पायऱ्या उतरू शकले!

माझ्या ऑफिसला मला ४८ पायऱ्या चढून जावं लागतं. ट्रेक आधी शेवटच्या दोन पायऱ्या बाकी असतांना पायात गोळे आलेले असायचेतीव्र दम लागलेला असायचा  आणि दोन पायऱ्या पार केल्यानंतर क्षणभर थांबावे लागायचेआता ट्रेक नंतर, पायऱ्या चढताना ह्यातलं काहीच झालं नाही. मी एका दमात आलेपाय भरून आले नाहीत कि थांबव लागलं नाही!

परिणाम अनुभवण्यासाठी दोन ट्रेक खास करून करायचे असं मी ठरवलं होतं. एक केटूएस आणि दुसरा कळसूबाई! केटूएस च्या १५ टेकड्या मी सहज पार करू शकले. टेकडी चढताना थांबव लागत नव्हतं, दम लागत नव्हता. उतरताना तोल सावरून, आधारा विना उतरता येत होतं. वाव...हे फिलिंग जबरदस्त होतं /आहे हं! हाच अनुभव कळसुबाई ट्रेक दरम्यान मी अनुभवला. अगदी सहज, पावसाळ्यात घसरडे सांभाळून, आधाराविना ट्रेक केला आणि शिड्या चढताना देखील अतिशय आत्मविश्वासाने, एकाग्रतेने शिड्या चढून-उतरून पार केल्या!

दृष्टीकोन: 

२७ तारखेला नेहमीप्रमाणे पर्वतीला गेले. साधारण २५ जणांच्या मुला-मुलींच्या एका ग्रुप कडून एक व्यक्ती व्यायाम करून घेत होती. पळत पर्वती चढणे, पायऱ्या उलट्या चढणे, एकाला पाटकुळी घेऊन पायऱ्या चढणे इ.. ती व्यक्तीच्या हातात वेताची काठी होती आणि मुलांना तो सपासप बसत होती. खरंतर हे दृश्य मी ट्रेक आधीपण बघितलं होतं. तेव्हा वाटलं, “चला कोणीतरी ह्या मुला-मुलींकडून व्यायाम करून घेतयं हे महत्वाचं. त्यांना शारीरिक रित्या फिट करताय हे महत्वाचं. मग काठीने मारून का असेना. पण ह्यावेळी ते पाहताना मी खूप रेस्टलेस झाले. वाटलं मारून ह्या मुलांकडून व्यायाम करून घेण्यापेक्षा ह्यांना स्वयंशिस्त का लावत नाहीत? मी केलेल्या सरावातून मला हे कळाल होतं की व्यायाम सरावात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, स्वयंशिस्त आणि स्व-प्रोत्साहन! ते असेल तर सातत्य राहतं आणि दीर्घकालीन ध्येयासाठी माणूस तयार होतो. ह्याचचं शिक्षण ह्या मुलांना द्यायला हवं.

त्याच दिवशी बसमधून येताना सहज काढलेल्या तिकीटाकडे लक्ष गेलं आणि आधी कधीही न आलेला विचार मनात आला. काय कमाल केली ह्या तिकिटाने! खरंतर तीन तिकिटांनी! के.ई. हॉस्पीटल ते स्वारगेट (१), पर्वती पायथा ते स्वारगेट (२) आणि स्वारगेट ते के.ई. एम हॉस्पीटल (३)! सातत्य राखून, न कंटाळता ही तिकीट काढायला काय सुरुवात केली त्यांनी मला आयुष्यात लॉटरीच मिळवून दिली! ईबीसी ट्रेक समीटची लॉटरी! ईबीसी ट्रेक आधी ही तिकिटं मी कचऱ्याच्या ढिगात नाहीतर डब्यात टाकून द्यायची. पण आज..ती अगदी जपून ठेवली, त्याचा फोटो काढला आणि ब्लॉगचा तो एक भाग झाला. खरंतर दिवसाची १५ रुपयांची ही तिकिटं पण आज मला ती अनमोल वाटतं होती! 



ह्या समीट ने एन्ड्युरन्स सराव (ट्रेक करत नसाल तरी एक व्यायाम म्हणून) किंवा सातत्याने केलेल्या व्यायामाचं महत्व, आयुष्यासाठी ठासून मनावर कोरलं.

ऑफिस मध्ये सहकाऱ्यांच्या दृष्टीकोनाची गंमत वाटली. स्वत:च्या मुलासोबत खेळताना एकाचा अॅक्सिडेंट झाला. त्याने १५ पेंक्षा जास्त दिवस रजा घेतली. ती गोष्ट जस्टीफाईड होती. मी ट्रेकिंग साठी घेतलेली रजा...टोटली नॉट जस्टीफाईड! 

ईबीसी ट्रेक नंतर मिळालेल्या प्रतिक्रिया:

माझ्या ऑफिस मधे माझ्या ह्या साहसाबद्दल एका अमेरिकन सहकाऱ्याला जेव्हा हे कळलं तेव्हा तो म्हणे, “Savita, I am jealous”!  

माझ्या फ्रेंडसर्कल मधे खूप जणांची प्रतिक्रिया ही होती की, “ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे”!

ब्लॉगची वाट पाहतोय” ही प्रतिक्रिया तर ट्रेकिंग सहकाऱ्यामधे प्रत्येकाचीच होती. 

मॅडम एव्हरेस्ट ला जाऊन आल्यात” असं ऐकायला मिळालं की स्पष्ट कराव लागायचं “एव्हरेस्ट बेस कॅम्प, एव्हरेस्ट शिखराचा पायथा”.

खूप जणाचे मेसेज आले, फोन आले. “यु फायनली डीड इट” ही सर्वांचीच प्रतिक्रिया होती. 

विशाल म्हणे, “तुमचं पाहून मुलं आता ट्रेक (सह्याद्री/हिमालयीन) करण्यासाठी पुढे येतील”.

ट्रेकिंग सहकारी म्हणे, “मॅम, तुम्ही फेमस झालात आता. प्रत्येक ट्रेकिंग ग्रुपला वाटेल तुम्ही त्यांना ट्रेकला ज़ॉइन करावं”.

तुम्ही ईबीसी करून आलात आता तुमच्यासाठी काय अवघड आहे?” अशी एक धारणा झाली आहे.

ट्रेक कोऑर्डीनेटर व्हाल का? आजचा ट्रेक तुम्हाला लीड करायचाय”..अशी पण प्रतिक्रिया समोर आली. 

"शॉकिंग” न्यूज अजूनही “शॉकिंग” न्यूजचं आहे. “मॅम,  (इतक्या कमी ट्रेकिंगच्या बळावर) ईबीसी ला चालल्यात?” हा आश्चर्याचा धक्का होता! आता “मॅमचं ईबीसी समीट झालं?”( त्याचं कमी ट्रेकिंगच्या बळावर)खरंच शॉकिंग आहे!

अभिनंदनाचा वर्षाव झाला. ट्रेक सहकारी भेटायला घरी आले. माझे अनुभव ऐकले. ट्रेक क्षेत्रातील सहकाऱ्यांना त्याची महती जास्त जाणवली. तेव्हा सारखी एका उक्तीची आठवण होतं होती, “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे”...

ईबीसी ट्रेक समीट हे यश आणि परिश्रम माझे असले तरी त्याचे शिल्पकार माझे ट्रेक सहकारी आहेत. त्यांच्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय हा ट्रेक समीट पूर्ण होऊ शकत नाही.

ह्यामधे सर्वात महत्वाचं योगदान आहे ते शिव पेंडाल ह्या ट्रेक सहकाऱ्याचं! “ट्रेक कसा करायचा” ह्याचे धडे याने मला दिले. ट्रेकिंग स्टिक कशी वापरायची, कशी धरायची, स्प्रिंग असलेल्या स्टिकचे फायदे काय आहेत, नी-कॅप वापरण्याचे फायदे, चढाई-उतराई वर पाय कसा ठेवायचा चढाई दरम्यान दम/धाप लागत असेल तर काय करायचं, वॉटर ब्लॅडर आणि हेड टॉर्च वापरण्याचे फायदे काय आहेत इ. इ. त्याच्याकडून मिळालेल्या ह्या धड्यांनी माझं ट्रेकिंग समृद्ध होण्यास आणि मी सक्षम होण्यास मदत झाली!


राहुल जाधव, हा असाच एक ट्रेक सहकारी. माझ्या ट्रेक करण्यामागील प्रयत्नांना समजून-उमगून, माझे वय, व्यायामाचा अभाव आणि ट्रेक क्षमता यांना गौण मानता त्याने जपलेला पेशन्स, संवेदनशीलता आणि सह-संवेदनामुळे मला एकामागोमाग एक ट्रेक करत राहण्याचं सामर्थ्य लाभत गेलं! 


आलेख प्रजापती, त्याच्या बरोबरच्या पहिल्याचं ट्रेकमध्ये त्याने मा. एव्हरेस्टविषयी सांगितलं आणि त्याने सांगितलेल्या माहितीवर प्रभावित होऊन मी मा. एव्हरेस्ट दर्शनाची आशा बाळगली! 


मिलिंद राजदेव, इतिहासप्रेमी, खासकरून शिवकालीन इतिहासात रुची बाळगणारा अभ्यासू मुलगा. ट्रेकर्स ने गड-किल्ल्यावर ट्रेक करताना कशा प्रकारची दृष्टी आणि अभिमान बाळगावा हे मी त्याच्याकडून शिकले! 


ज्ञानेश्वर गजमल, शंकर स्वामी, अनिकेत घाटे हे ट्रेक सहकारी असे आहेत ज्यांनी नेहमीच माझ्यावर आणि माझ्यातील क्षमतांवर विश्वास ठेवला! ज्ञानेश्वर (डॅनी) सोबत केलेला पहिला केटूएस ट्रेक, शंकर आणि अनिकेत सोबत केलेला विसापूर आणि ढाक बहिरी ट्रेक जणू सुवर्ण अक्षरात लिहिले गेलेले शिलालेख आहेत! 
डावीकडून: ज्ञानेश्वर गजमल, राहुल जाधव, विशाल काकडे, शंकर स्वामी, आलेख प्रजापती, अनिकेत घाटे

प्रतीक खर्डेकर, अत्यंत अनुभवी, उत्साही, एक वेगळ्या प्रकारची ट्रेक दृष्टी बाळगणारा हा सहकारी. ट्रेक आनंदाने आणि ताणरहित कसा करायचा हे ह्या मुलाकडून मी शिकले! 



ह्या सर्वांनी माझा ट्रेकिंगचा पाया मजबूत केला आणि प्रशांत शिंदे, ओंकार यादव, परेश पेवेकर, स्मिता राजाध्यक्ष, तौसीफ सैय्यद, यज्ञेश गंद्रे यांनी तो पाया तसाच मजबूत राहण्यासाठी मला साथ केली! तितक्याच ताकदीने, तितक्याच समर्थपणे, तितक्याच संवेदनशीलतेने, तितक्याच आक्रमकतेने त्यांनी माझ्यावरचे ट्रेकिंग संस्कार चालू ठेवले! 


डावीकडून: तौसीफ सैय्यद, ओंकार यादव, विशाल काकडे, प्रशांत शिंदे, स्मिता राजाध्यक्ष



मिहीर मुळे सोबत केलेला हरीश्चंद्रगड ट्रेक जणू एक परीस स्पर्श आहे! 



तेजस मधाळे सोबत ढाक बेस ते भिवगड ट्रेक करत असताना तेजस मधील ट्रेकरची ओळख झाली. ट्रेकिंग हे एक "डीटरमीनेशन" आहे आणि त्यामुळे सर्व परिसीमा आणि आव्हाने कुचकामी होऊ शकतात ह्याची जाणीव तेजसला भेटून झाली! 


विशाल काकडे, एक असा मुलगा ज्याने प्रत्येक ट्रेकला मोटीव्हेट करून, सपोर्ट, वेळप्रसंगी माझ्यासाठी वेगळी कार्यपद्धती अमलात आणून माझे ट्रेक चालू ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली! माझ्या ट्रेकिंग मधील प्रगतीचा, ईबीसी साठी केलेल्या सरावाचा, सुरुवातीपासूनचा तो एकमेवाद्वितीय साक्षीदार आहे! हस्तांदोलन करून “वेल डन मॅम” म्हणताना त्याच्या डोळ्यात दिसलेली कौतुकाची झलक मला नेहमी त्याच्यासोबत ट्रेक करायची प्रेरणा देत राहिली! म्हणूनच, की काय माझे जवळ जवळ ३० ट्रेक्स त्याच्यासोबत झाले आणि आमचे तीन वर्षापासूनचे हे असोसिएशन ट्रेकिंग क्षेत्रात अद्वितिय असा मानाचा तुरा आहे! 


राजकुमार डोंगरे, उषा बालसुब्रमण्यम आणि प्रसाद देशपांडे हे असे ट्रेक सहकारी ज्यांनी ट्रेक म्हणजे फक्त गड-किल्ले, त्यांचा इतिहास, पुराणकथा नाहीतर ट्रेक मार्गावर दिसणारी विविध पाने, फुले, पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरे आणि फोटोग्राफी इ. देखील ट्रेकचा अविभाज्य घटक आहेत ह्याची ओळख करून दिली! 

रवी इनामदार, भगवान भोई, गुरुदास चौहान, अमित डोंगरे इ. सारखे अनेक सहकारी आहेत ज्यांची ट्रेकमध्ये मोलाची साथ मिळाली! 

ह्या सर्वांच माझ्या ट्रेकमधील योगदान अग्रगण्य आहे. कदाचित म्हणूनच केवळ ट्रेकिंगच्या जोरावर मी ईबीसी समीट करू शकले!

जीजीआयएम ची निवड आणि श्री. उमेश झिरपे सर, भूषण हर्षे, आनंद माळी, गणेश मोरे, आशिष माने यांची प्रत्यक्ष भेट आणि  त्यांनी सांगितलेले एव्हरेस्ट एक्सपीडीशनचे अनुभव यामुळे ईबीसी ट्रेकच्या निर्णयावर फेरविचार करण्याची आवश्यकता भासलीचं नाही! 
वरील फोटोत डावीकडून: आशिष माने, श्री. उमेश झिरपे सर, गणेश मोरे
खालील फोटोत डावीकडून: भूषण हर्षे, आनंद माळी आणि डॉ. सुमित

पीक प्रमोशन चे केसबजी, पासंगजी, आमचे ट्रेक गाईड फुलाजी आणि कामाजी आणि शेर्पा, श्रींग, सोनम आणि राय दाय ह्यांच्या मार्गदर्शनामुळे ट्रेक सहज, सुलभ होण्यास मदत झाली! 

डावीकडून: कामीजी, श्रींग, फुलाजी, सोनम, राय दाय

माझे ईबीसी ट्रेक सहकारी तन्मोय माविनकुर्वेप्रीती पवारदीपा सोमय्या गीतांजली देशमुख, रोहिणी जोशीविनोद जैन,चित्रांश श्रीवास्तव आणि वर्षा बिरादर यांच्या आभार उल्लेखाशिवाय हा ब्लॉग पूर्ण होऊ शकणार नाही! 

मी ईबीसी ट्रेक समीट केल्याच समजल्यावर माझ्या बहिणीने मेसेज मधे लिहिलं होतं, “अ फिदर इन ताई्ज कॅप”! 

माझ्या आईच्या आवडीच्या गाण्यात तळ्यातल्या पिलाचे भय वाऱ्यासवे पळून जाते आणि एकदा पाण्यात पाहताना त्याला कळून येते की तो एक “राजहंस” आहे! 

मीच काय पण प्रत्येक ट्रेकर "राजहंस" बनू शकतो ह्याची जाणीव ईबीसी ट्रेक ने मला करून दिली! 

मला कल्पना आहे की तुम्हा सर्वांनाच ईबीसीचं काय अन्य बरेच हिमालयीन ट्रेक करण्याची इच्छा आहे. मी आशा आणि प्रार्थना करते की लवकरचं तुमची इच्छा पूर्ण व्हावी, तुमच्याही टोपीत स्व-मानाचा तुरा यावा आणि तो “राजहंस” तुम्हालाही दिसावा!


फोटो आभार: ट्रेक टीम