ट्रेक टू ढाक बहिरी केव्ह्ज: १ जानेवारी २०१७

ट्रेक टू ढाक बहिरी केव्ह्ज: १ जानेवारी २०१७

एसजी ट्रेकर्सचा दुसरा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने आयोजित केलेला हा ट्रेक! वाव.....एसजी ट्रेकर्सना शुभेच्छा देणं आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट! ट्रेकिंगचं काय पण कोणत्याही व्यायामाचा अभाव असलेल्या ४७ वर्षाच्या माझ्यासारख्या मुलीला तेव्हा त्यांनी स्वीकारलं, ट्रेकिंगची संधी दिली, ट्रेकिंग माझ्याकडून करून घेतलं, ट्रेकिंगचे धडे दिले, माझा ट्रेक समीट होण्यासाठी वैयक्तिक लक्ष दिले, प्रसंगी विविध कार्यप्रणाली अमलात आणून, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि म्हणता म्हणता २० ट्रेक माझ्या ओंजळीत आले!

तुम्हीचं सांगा माझी हजेरी तर “मस्ट” होती ना!

आजच्या दिवशी आनंद घ्यायचा” बस्स एवढचं ठरवलं होतं! “ट्रेक समीट” चा विचार देखील दूर ठेवला होता. स्वत:ला एकदम रिलॅक्स केलं होतं. प्रसंगानुसार माझ्यातील क्षमतांना १००% वाव द्यायचा बस्स हेच मनाशी कुठेतरी पक्क केलं होतं!

“माझा ट्रेक समीट होणं” विशालसाठी काय भावना देऊन जाणार आहे हे मला माहित होतं!

जांभिवली गावात सहभागीची ओळख झाल्यानंतर विशालने सांगितलं, “सर्वांनी वर चढायचं आहे”! त्याच्या आवाजातील पराकोटीचा आत्मविश्वास पाहून मी म्हटलं, “ सविता, “नाही” म्हणण्याचा चान्स पण घेऊ नको, धाडस पण करू नको.....नाहीतर काही खरं नाही तुझं आज”!

त्याच्या आवाजाची सत्यता मी केटूएस डे ट्रेकला अनुभवली होती! त्याने ठामपणे सांगितलं होतं, “सात तासात ट्रेक समीट करायचायं आपल्याला” आणि ट्रेक सात तासात पूर्ण झाला होता! कितीतरी अशी उदाहरणे त्याक्षणी माझ्यासमोरून तरळून गेली!

दुसऱ्या वाढदिवसानिम्मित गडकिल्ल्यांची प्रतिमा असलेला केक कापला. दुसऱ्यांदा माझ्याचं’ हस्ते! केवढ मोठं भाग्य माझं!  माझ्या ट्रेकिंगचं कौतुक करताना विशाल म्हणे, “मॅडमचं कौतुक ह्यासाठी नाही कि त्या ह्या वयात ट्रेकिंग करताहेत, कौतुक ह्याचं कि त्यांनी खूप भारी भारी ट्रेक केले आहेत”. विशालकडून कौतुकाचे शब्द म्हणजे असं वाटलं जणू, “मा. एव्हरेस्ट सर झालाचं”! त्याच्याकडून झालेल्या कौतुकाला एव्हरेस्ट एवढी उंची आणि सन्मान माझ्यालेखी नक्कीचं आहे!

सकाळी ८.४५ च्या सुमारास आम्ही तीस जणांनी ट्रेक सुरु केला आणि ११.१५ ला आम्ही ट्रेकच्या पहिल्या रॉक पॅच जवळ आलो. इथपर्यंतचा टप्पा कोंडेश्वर मंदिराजवळून जातो आणि एक छोटी टेकडी सोडली तर पूर्ण मार्ग जंगलातून आहे. हा टप्पा पार करताना मला दम लागत होता पण तो कमी होता. दर बुधवार-शनिवार पर्वतीच्या पाच वेळा फेऱ्या मारण्याचा तो परिणाम असावा! मनाशी म्हटल, “सविता, पर्वतीला पर्याय नाही हं”!

विशाल, प्रशांत, स्मिता, यज्ञेश, ओंकार, भाग्येश, तौसीफ, विश्वंभर ह्या सर्वांच्या मार्गदर्शन आणि मदतीने हळू हळू एक-एक जणाने तो रॉक पॅच पार केला. 

मी ह्या रॉक पॅचचं यावेळी नीट निरीक्षण करत होते. हा रॉक पॅच म्हणजे निसर्गाची किमया तर आहेचं पण यावेळी वाटलं “ढाक गावच्या बहिरी नामक देवालयातील घंटाचं आहे ही जणू”! “देवळात जाण्याचे एक प्रवेशद्वार”!. ते  पार केलं तरचं देवालयातील आवारात प्रवेश!

हा रॉक पॅच म्हणजे अति प्रचंड दोन कातळखडकातील अत्यंत खतरनाक खोलवर घळई! घळई च्या कपारीतून खालची दुरपर्यत पसरलेली दरी दिसते. घळईचा सुरुवातीचा टप्पा थोडासा सपाट, लालसर मातीने आणि छोट्या छोट्या दगडांमुळे जरा “स्लीपरी” वाटला. नंतरचा टप्पा इतका खोल होता कि दोन्ही बाजूला खडकांचा आधार घेऊन, खाली पाय ठेवायला, माझी उंची पुरेशी पडत नसल्याने मला चक्क थोडी उडीचं मारावी मागली. तिसरा टप्पा तर भयानक खतरनाक! दोन खडकांमधे एक अतिशय अरुंद खाचं! त्या खाचेत व्यक्ती फिट होऊचं शकत नाही. त्यात दोन्ही बाजूला वरून खडकांचं आच्छादन! त्यामुळे डोक्याला लागण्याची शक्यता! इथे मदतीसाठी “रोप” फिट केला होता. त्या रोपला धरून उलट्या दिशेने ती घळई उतरायची होती. ऊलट्या दिशेने घळई उतरायला मी खूप अनकम्फर्टेबल होते. पण त्याशिवाय पर्याय नव्हता. मला ते जमणारचं नाही असं मला वाटतं होतं आणि गिव्ह अप पण करायचं नव्हतं. नुसत्या हातांच्या आधाराने तो पॅच पार करणं केवळ अशक्य होतं. उलटं फिरणंचं मला कठीण गेलं. आता रोप धरला तर खाली पाय कुठे ठेवायचा तेच दिसेना. खूप वेळ रोप हातात धरण्याची ताकद माझ्यात नव्हती. त्या रोपला मधे मधे गाठी दिल्या होत्या. त्या गाठींजवळ धरलं तर थोडा जास्त वेळ मी रोप पकडून ठेऊ शकत होते. पण दोन गाठीतलं अंतर माझ्यासाठी जरा जास्त वाटलं मला. पाय ठेवण्याची जागा मिळेपर्यंत रोप पकडूण ठेवणं एक आव्हान होतं. नशीब हाताला घाम येत नव्हता! (आणि भीतीने घामाघूम देखील झाले नव्हते) प्रशांत, स्मिता, यज्ञेश मला सूचना देऊन पाय ठेवण्याची जागा सांगत होते. “मॅडम, थोडं उजवीकडे, थोडं डावीकडे, थोडं खाली इ. इ.” त्या सूचना मी पाळत गेले आणि सुखरूपपणे ती घळई उतरले. रोप धरून उतरण्याचा हा माझा पहिलाचं अनुभव होता. भारी होता, धाडसी होता! सर्वजण म्हणे, “जमलं की मॅडम तुम्हाला”!. आता विचार करता वाटतयं की मला भीती तर वाटली नव्हती फक्त रोप धरून उतरण्याचं कौशल्य कमी पडलं!

घळई उतरल्यावर क्षणभर रीलॅक्स झाले. उजवीकडून थोडं चालून गेल्यावर ७० फुटाचा आडवा रॉक पॅच लागतो. विशाल तिथे होताचं. हा आडवा उताराचा रॉक पॅच पार करणं पण एक कौशल्य आहे. ह्याच्या वरच्या वाजूला लोखंडी सळई फिट केलेली आहे. विशाल मला सूचना देत होता. एका हाताने लोखंडी सळई पकडून दगडांच्या खाचांमध्ये पाय रोऊन तो पॅच पार करायचा होता. होतं असं होतं की मी लोखंडी सळईला धरलं तर जिथे खाचा आहेत तिथपर्यंत माझा पाय पोहोचतं नव्हता. सळई ते खाचामधलं अंतर माझ्यासाठी जास्त होतं. विशालने एका हाताचा आधार दिला आणि कुठे खाचा आहेत हे दाखवलं. त्याच्या सूचना पाळतं त्याने मला तो पॅच पार करून दिला. त्यावेळी माझ्या हे जाणवलं कि विशालला आता बरोबर समजलं आहे कि मला कुठे मदत लागते, कोणती गोष्ट मी सहजासहजी करू शकते आणि कोणती गोष्ट करू शकत नाही. मला मदत करताना त्याला भयानक कसरत करावी लागली. कारण आधी त्याला स्थिर व्हावं लागतं होतं आणि मगचं मला तो मदत करू शकत होता. लकीली यावेळी लोखंडी सळई आणि दगड उन्हाने तापलेले नव्हते नाहीतर हाताला चटकाचं बसतो.!

आता दगडात कोरलेली एक शिडी चढायची होती. दगडात खाचा आहेत आणि एका बाजूला रोप आधारासाठी फिट केलेला आहे. इथून पुढचा टप्पा असा आहे कि कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही. हाताचा आधार देऊ शकत नाही. तसा काही स्कोपचं नाही. विशालने ते मला समजून सांगितलं. “एका हाताने तुम्हाला रोप पकडायचा आहे आणि एका हाताने दगडात असलेल्या खाचेचा आधार घेऊन त्या पायऱ्या चढायच्या आहेत. सळई पकडू नका. ती हलली कि आपण हेलकावे खातो”. त्याच्या सूचनांनुसार मी त्या १०-१२ पायऱ्या चढले. डावीकडे थोडावेळ थांबले आणि रिलॅक्स झाले. आता साडे बारा वाजले होते. काहीजण चढण्यासाठी थांबले होते. विशाल त्यांना म्हणे, “आमच्या मॅडमना चढू द्या आधी”. पण ते ऐकायला तयार नव्हते. आम्हाला ते चढून जाईपर्यंत थांबव लागलं. (मागच्या ट्रेकला इथपर्यंतचा टप्पा मी पार केला होता. इथून पुढचा पॅच पार करण्याच धाडस मी केलं नव्हतं. आत्मविश्वासही कदाचित नव्हता.)

आता मी पुढे होते आणि माझ्या मागे राहून विशाल मला सूचना देत होता. इथे देखील लोखंडी सळई आणि रोप फिट केलेला होता. एका हाताने त्याचा आधार घेत दगडातील खाचात पाय घट्ट रोऊन तो पॅच पार करावा लागला.

आता लाकडी शिडी होती. एक जुनी, लाकूड थोडं कुजलेली आणि शेजारीच एक नवीन. ही शिडी २-३ रोप आणि लोखंडी सळईने वेढलेली होती. ही शिडी म्हणजे कलेचा एक नमुनाचं. एक मोठ्ठ सरळ लाकूड आणि थोड्या थोड्या अंतरावर अर्धवट कापलेलं लाकूड....एक एका बाजूला तर दुसरं त्याच्या विरुद्ध बाजूला. ह्यामुळे दोन लाकडांच्या मधे खाचं तयार झाली होती. ह्या खाचेत पाय रोऊन ती शिडी चढायची. खरंतर सुरक्षेच्या दृष्टीने शिडीची मांडणी एकदम परफेक्ट होती. विशाल ने मला ही शिडी चढायची कशी ते समजावून सांगितलं. दोघांनी तिथ थाबंण धोक्याचं होतं तरिही मी घट्ट पकडलेलं आहे, मी सुरक्षित आहे ह्याची खात्री करून त्याने शिडी चढण्याचं प्रात्यक्षिक मला दाखवलं. मी थोडं काही चुकीचं केलयं असं त्याला वाटलं कि तो लगेच म्हणायचा, “ मॅडम, तसं नाही असा पाय ठेवा”. १-२ वेळा असं झालं कि मी माझ्या पद्धतीने पाय ठेवला आणि तो म्हणे, “ बरं, ओके, गुड, वेल डन”. विशालचं सर्व लक्ष माझ्याकडे आणि माझं लक्ष सावधानतेने शिडी चढण्याकडे! शेवटी ही शिडी चढून गेले. रोपला धरून, खाचेत पाय परफेक्ट रोऊन ही शिडी चढण काय कसब आहे हे मला तेव्हा जाणवलं. तंत्र काय आहे आणि तुम्ही कम्फरटेबल कशात आहात ह्याची सांगड घालून ट्रेक करणं शेवटी महत्वाचं!

आता एक मोठा दगड चढायचा, रादर एक टांग टाकायची आणि आणि मी केव्ह्ज मधे जाणार! ट्रेक समीट! इथे समस्या अशी निमार्ण झाली कि त्या मोठ्या दगडाखाली जो दगड होता तो गुळगुळीत आणि घसरडा होता. तिथे पायाला ग्रीप बसत नव्हती. त्या मोठ्या दगडावर जिथे पाय मला रोवायचा होता ती जागा माझ्या उंचीच्या दृष्टीने जास्त होती. थोडक्यात काय तर त्या गुळगुळीत दगडावर पाय पक्का रोवल्या जात नव्हता आणि तिथे पाय घट्ट रोऊन दुसरा पाय त्या मोठ्या दगडाच्या खाचेत ठेवायला मला जमत नव्हता. माझा पाय त्या उंचीपर्यंत पोहोचत नव्हता. मी शरीर थोडं पुश करण/ शरीराला धक्का/जर्क देणं अपेक्षित होतं. पण मला ते काही केल्या जमत नव्हतं. विशालने ओंकारला मदतीला बोलवलं. त्याने हाताचा आधार पुढे केला होता पण मला ती उंची गाठण काही केल्या जमत नव्हतं. शरीर थोडं उचलण अपेक्षित होतं पण खालच्या पायाला ग्रीप मिळेना आणि रोपला धरून देखील मला त्या खाचेची उंची गाठता येईना. एक असंही होतं कि,  जरी मी चढले असते तरी काही क्षण मला रिलॅक्स व्हायला लागले असते आणि ओंकार जिथे उभा होता तिथे तो आणि मी दोघही उभं राहू एवढी जागा आहे कि नाही ह्याचा मला अंदाज देखील येत नव्हता. विचार हा पण होता की ओंकार, विशाल आणि मी तिघांनाही धोका होता. मला वाटतं १५-२० मी आणि विशालने प्रयत्न केला. शेवटी विशालला म्हटलं, “नाही जमतं. उतरायला पण कठीण जाईल”. कदाचित उतरण खरचं कठीण झालं असतं. कारण ते ठिकाण असं आहे जिथे कोणी काही मदत करूच शकत नाही. जे काही करायचं आहे ते तुमचं तुम्हाला. विशालच्या देखील ते लक्षात आलं आणि आम्ही तिथे थांबलो आणि अजून प्रयत्न न करण्याचा निर्णय घेतला!

त्याक्षणी “ट्रेक समीट” ह्या शब्दाचा अर्थ मला उमगला. तो अर्थ हा की स्वत:मधल्या सर्व क्षमता पणाला लावून आणि कुठलाही धोका न पत्करता जे साध्य होतं ते 
“ समीट”! आणि ही व्याख्या व्यक्तीनुसार लागू होते!

खूप जणानी हळहळ बोलून दाखवली. विशालही कदाचित थोडा नाराज झाला असेल. कारण त्याने जे प्रयत्न माझ्यासाठी केले, जो पूर्ण वेळ मला दिला त्याचं फलित त्याला हवं त्यात रुपांतरीत झालं नाही. विशालला म्हणावसं वाटतं, “सॉरी विशाल! पण ज्या पद्धतीने मी ते टप्पे पार केले, आय होप त्यावर तुम्ही समाधानी असाल”! मी मात्र स्वत:वर जाम खूष होते! अत्यंत समाधानी होते!. 😊😊😊😊😊मी एक आतापर्यंत न केलेलं धाडस केलं होतं आणि आतापर्यंत न वापरलेली कौशल्य वापरली होती!

आता माझा परतीचा ट्रेक सुरु झाला. चढलेली शिडी उतरायची होती. विशाल म्हणे, “मॅडम, आता उलटं उतरायचं आहे. दरी च्या दिशेने पाठ हवी.” त्याला म्हटलं, “ मी सरळ उतरते”.म्हणे, “ दरीपाहून भीती वाटते म्हणून उलटं उतरायचं”. म्हटलं, “ मला नाही भीती वाटणार”. तो तयार झाला. मी एक पायरी उतरले आणि दुसऱ्या पायरीला माझं जॅकेट आणि टी-शर्ट त्या लाकडी खाचेत अडकला. एका हाताने लाकूड घट्ट धरून दुसऱ्या हाताने शर्ट सोडवण त्याक्षणी कसब होतं. मी हळूहळू शिडी उतरले. (सो सॅड माझ्या धाडसाचा एकही फोटो नाही. 😢😢😢😢) 

पुढचा टप्पा उतरायला प्रशांतने मदत केली. मी खालच्या टप्प्यावर आले तेव्हा साधारण १.३० वाजले होते. आता सगळे केव्ह्ज मध्ये गेले होते. साधारण २-२.१५ च्या दरम्यान विशालने सर्वांना खाली उतरण्याची सूचना दिली. 

साधारण २.१५ ला ओंकार आला आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. ओंकार सूचना देत होता आणि मी उतरतं होते. एका ठिकाणी थोडा उताराचा दगड होता, पाय ठेवायला खाचं नव्हती. ओंकारला धरून एक छोटी उडी शेवटी मारावीचं लागली!

इथे खाली संगमरवरात पादुका कोरलेल्या आहेत. त्यांना नमस्कार केला आणि पुढचा पॅच पार करण्यासाठी तयार झाले.

७० फुटाचा पॅच पार करताना परत तीच समस्या जाणवली. लोखंडी सळईला पकडलं तर माझा पाय खाचेपर्यंत ताणला जात नव्हता. ओंकार ने हाताचा आधार दिला आणि तो पॅच पार करण सहज झालं!

आता ती घळई चढायची होती. ओंकार सूचना देत होता. त्याचा भर रोप धरण्यावर नव्हता तर दगडातील खाचांमध्ये ग्रीप घेण्यावर होता. माझी समस्या अशी होत होती कि तो जिथे ग्रीप घ्यायला सांगत होता तिथे माझा हात पोहोचला तर खाली पाय टेकणे आणि पायाला ग्रीप बसणे हे गणित बसत नव्हतं. खूप सुचना त्याने दिल्या, मी प्रयत्नही केला पण ते काही जुळून येईना. यावेळी ओंकारने विविध स्टॅटीजीज सुचवल्या, वेगवेगळे प्रकार आम्ही ट्राय केले. शेवटी ओंकार, अजून एक मुलगा आणि मृणालिनी ह्यांच्या हाताच्या आणि रोपच्या आधाराने मी व्यवस्थित ती घळई चढून गेले!

वरच्या पठारावर आले आणि “सुखरूपपणे येणं” म्हणजे असंतं काय ही भावना अनुभवली.

रिलॅक्स झाल्यावर मी विचार करत होते कि नक्की समस्या कुठे होती? उंची कमी पडतं होती की टेक्निक जमतं नव्हतं की शरीर तेवढ फ्लेक्झिब्ल होत नव्हतं कि रोपला पकड घट्ट बसतं नव्हती कि रोप धरून ठेवण्याइतकी ताकद नव्हती कि शरीर पुश करू शकेन एवढी स्ट्रोग ग्रीप पायाला मिळतं नव्हती की अजून काही???????????? मी घाबरले नक्कीचं नव्हते की हाताला घाम नव्हता कि भीतीने ह्दयाची धडधड वाढलेली नव्हती कि हात थरथरत नव्हते. मी कुल होते, मनातून शांत होते, जे करत होते ते एकाग्र चित्ताने, पूर्ण क्षमतेने आणि अथक प्रयत्नाने.....काहीवेळा तर विशालचे शब्द फक्त ऐकायला येत होते...विशालचं अस्तित्व देखील मला जाणवतं नव्हतं....

या सर्वातून धडा एकचं की “अजून खूप काही शिकायचं आहे, ट्रेकिंगची खूप सारी कौशल्य आत्मसात करायची आहेत आणि ती सरावात आणायची आहेत”!

विशालला म्हटलं, “देवाच्या मनात आहे की यावर्षी देखील ट्रेकिंग मी सुरु ठेवावं आणि पुढच्या वाढदिवसाला पुन्हा इथेचं यावं”!

यावेळी खुपजण पुरुष देवाच्या दर्शनासाठी आले होते. घळई पासून ते केव्ह्ज पर्यंत त्यांची एकचं बडबड सुरु होती, “महिलांना प्रवेश नाही. देवाला चालत नाही. देवाचा कोप होतो, अघटीत घटना घडतात. आमच्या घरात “अडचण” असेल तरी आम्ही येत नाही. गावच्या गुरवाने तुम्हाला येवूच कसं दिलं?””..आलेल्या जवळ जवळ प्रत्येकाने हे बोलून दाखवले. आम्ही सर्वांनी त्यांना सांगितलं कि, “आम्ही पुजारी काकांना समजून सांगितलं आहे. त्यांना माहित आहे” पण ते ऐकायला तयार नव्हते. ह्या मुले-पुरुषांच्या बोलण्यात स्त्रियांविषयी आदर जाणवतं नव्हता. बोलण्यात खूप तुच्छता जाणवतं होती. एक पुरुषी अहंकार जाणवतं होता. सर्वांनाच वाटतं होतं त्यांना सुनवावं पण ती वेळ आणि ठिकाण योग्य नव्हतं!

ट्रेक मधल्या इतर मुला-मुलींनी सांगीतलं कि वर केव्ह्ज मधे खूप अस्वच्छता होती. कोंबडी कापलेल्याचे अवशेष, प्लेट्स विखुरलेल्या इ. ते ऐकल्यावर मात्र वाटलं ह्या लोकांना देवाजवळ अशी अस्वच्छता चालते आणि स्त्रियांनी तिथे जाणे मात्र चालतं नाही. तिथले पावित्र्य राखता येत नाही आणि...... रस्त्यावर असणारी स्त्रियांना मनाईची पाटी काढून टाकण्यापासून ह्याची सुरुवात करावी लागणार! 
  
साधारण ३.१५ ला मी आणि काहीजण ओंकार सोबत परतीच्या ट्रेकला लागलो. ओंकार सारखा धीर देत म्हणत होता, “ आपल्याला घाई नाही, हळूहळू जाऊ”. गप्पा मारत आम्ही ४.३० च्या सुमारास कोंडेश्वर मंदिराजवळ आलो आणि ५.३० च्या सुमारास जांभिवली गावात आलो. छानपैकी गरमागरम जेवण करून ६.३०-७ च्या सुमारास पुण्याकडे निघालो.

माझ्यासाठी खूप धाडसी, साहसी, कसब पणाला लावणारा, परीक्षा घेणारा आणि तांत्रिकदृष्टीने विचार करायला लावणारा तर होताचं पण स्व-मूल्यमापन करायला लावणारा जास्त होता!

हा ट्रेक मला खूप काही क्लिक करून गेला. ट्रेक कौशल्यात मी अजूनही किती अबोध आहे आणि अजूनही किती करण्यास वाव आहे ह्याची जाणीव ह्या ट्रेकने करून दिली. मा. एव्हरेस्ट काय किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्प काय, ट्रेकची किती आणि काय प्रकारची तयारी करावी लागेल ह्याची झलकचं ह्या ट्रेकने मला दिली!

एसजी ट्रेकर्स च्या वाढदिवसाला विशाल हा ट्रेक का ठेवतो ह्याची कल्पना मला आली. ट्रेक लीडर्स ना आव्हान देणारा, कसब पणाला लावणारा, समीटचं समाधान देणारा आणि आत्मसंतूष्टी देणारा हा ट्रेक आहे!

मुख्यत: ओंकार आणि प्रशांत माझ्या मदतीला होते. कित्येक जागा अशा होत्या जिथे रिस्क होती, त्याची जाणीव असूनही ह्या मुलांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. मला जाणवतं होतं कि हे ह्या मुलांसाठीही ही सोपे नाही पण त्यांच्या चेहऱ्यावर मदत करण्यापलीकडे कोणतेही भाव मला जाणवले नाहीत!

मीच असं नाही हा ग्रुप कोणाही ट्रेक सहभागीला मदत करायला तेवढाचं तत्पर असतो. ह्याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे! (तशी मी त्यांच्यासाठी खासचं आहे...आव्हान आहे विशाल आणि टीमसाठी आणि टीमने माझं आव्हान २० ट्रेक समर्थपणे पेललयं.....आहे ना कौतुकास्पद!! जोपर्यंत विशाल आणि टीम  हे आव्हान पेलायला तयार आहे तोपर्यंत मी आहेचं.....)

तो आणि त्याचा प्रत्येक लीडर मला नेहमी म्हणतात, “मॅडम, तुम्ही प्रयत्न करता म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतो”!

पहिल्या वाढदिवसाच्या वेळी ३ जानेवारी २०१६ ला केलेल्या या ट्रेकच्या अनुभवात मी विशालबद्दल लिहिले होते, “यावेळी ट्रेक मधील विशालच रुप पाहून मी चकीत झाले होते. त्याच्यातला लीडर, त्याचा पराकोटीचा आत्मविश्‍वास, जिद्द, त्याची भक्कम, विश्‍वासू अशी बॉडी लॅग्वेज, त्याची अधिकार वाणी, सहभागींच्या सुरक्षेची जबाबदारी इतकी जबरदस्त होती की त्याच शब्दात वर्णन करणं कठीण आहे. मी ज्याम प्रभावित झाले हया मुलाकडे बघुन. तो रॉक पॅच मला पुर्ण करुन देण्याची सर्व जबाबदारी त्याने स्वत:वर घेतली होती. मी तो पॅच जोपर्यंत पार करत नव्हते हया मुलाचं लक्ष केवळ माझ्यावर केंद्रित होतं”....पुन:प्रत्ययाचा अनुभव मी घेत होते!

हो, हा ट्रेक होता, बेस्ट........

·        कोऑर्डीनेशन
·        मॅनेजमेंट
·        युनिटी
·        टेक्निकल कपॅसिटी
·        लीडरशिप
·        टीम वर्क
·        फूड (केक सहित हं)😋😋

ट्रेक लीडर्स ने त्यांची त्यांची भूमिका खूप समर्थपणे निभावली. प्रत्येक जण प्रसंगानुसार लीड घेत होता, निर्णय घेत होता, आपल्या सहकाऱ्याला साथ देत होता. हे सगळं इतकं सहजपणे होतं होतं की ते पाहणारा प्रभावित होईल!

एसजी ट्रेकर्सचं आठ पानी गुणगान जरा जास्त वाटतयं ना? काय करू काही मुद्देसूद शब्दात मला गुणगान करताचं येत नाही....रादर मला ते करायचचं नाहीये....२० ट्रेक मी त्यांच्यासोबत केले आहेत.. प्रत्येक ट्रेक, ट्रेकमधला प्रत्येक क्षण मी जगले आहे......आत्मभान आणि आत्मसंतुष्टीने! माझ्या जागी स्वत:ला ठेऊन बघा....पटेल तुम्हाला आणि निरुत्तरित व्हाल!

आता मात्र ही स्तुतीसुमने उधळणे थांबवते.......विशाललाचं ते आवडणार नाही! माझ्या ह्या अनुभवातली कौतुकास्पद वाक्यच्या वाक्य काढून टाकून माझा हा अनुभव ४-५ पानावर आणायलाही तो मागे पुढे पाहणार नाही! 


वाव.... ट्रेकसाठी समृद्ध बनवणाऱ्या ह्या सुंदर पुस्तक भेटीसाठी एसजी ट्रेकर्सचे खूप खूप आभार! 


दुसरा वाढदिवस आणि तिसऱ्या वर्षातील पदार्पणाबद्दल एसजी ट्रेकर्सला माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा! सह्याद्रीच्या साथीने हिमालयातील ट्रेक त्यांच्यासोबत करण्यास मी उत्सुक आहे.....वाट पाहत आहे! त्यांच्या उत्तरोतर प्रगतीचा हिस्सा होण्यासाठी ढाकच्या देवानेच मला आशीर्वाद दिलेले आहेत!  


फोटो आभार: ट्रेक टीम


















2 comments:

Unknown said...

Nicely captured.

UB said...

Awesome madam!