राजधानी रायगडाच्या डोळ्यास डोळा भिडवत उभा कोकणदिवा! ट्रेक, २३ फेब्रुवारी २०२०


२८ जानेवारी २०१८ रोजी Guardian Giripremi Institute of Mountaineering (जीजीआयएम) तर्फे रायलिंग पठार ट्रेकला मी गेले होते. उषा ताई आणि अभिजित सरांच्या संगतीत हा ट्रेक म्हणजे माझ्यासाठी  सुखद आठवण! रायलिंग पठारावरून समोर दिसणाऱ्या बलाढ्य लिंगाणा किल्ल्याची आणि पठारावरून दिसणाऱ्या गडांचा राजा -राजगड, कोकणदिवा इ. किल्ल्यांची माहिती सरांनी दिली. तेव्हाच कोकणदिवा ट्रेक करण्याच्या इच्छ्ने मनात रुंजी घातली!

२३ फेब्रुवारी २०२० रोजी होणाऱ्या कोकणदिवा ट्रेकचा मेसेज ग्रुपवर वाचला आणि लगोलग ट्रेकला येण्याची सूचना विवेक शिवदे ला केली.

२३ फेब्रुवारी उजाडला. ६ वाजता फर्ग्युसन कॉलेजच्या गेटपाशी उषा ताईंंना बघितलं. किती आनंद झाला असेल ह्याची कल्पना तुम्ही करू शकता.

तसं पाहता पुण्यापासून साधारण ८० किमी दूर असा हा किल्ला! पानशेत वरून घोळ गाव आणि किल्ल्याचे पायथ्याची वाडी, गारजाईवाडी! हा भाग तसा दुर्गम! घोळ गावापर्यंतचा रस्ता तसा रिकामा. एखाद-दुसरं वाहन जात-येत होतं.

किती सुरेख आजूबाजूचा परिसर! पानशेत धरणाचा शांत, नितळ जलाशय. कोवळ्या रविकिरणांनी चकाकणारा सोनेरी जलसाठा. परिसरात फुललेली विविधरंगी बागफुले आणि रानफुले! वळणावळणाच्या रस्त्याच्या दुतर्फा निबिड जंगल! ह्या सर्वांचा आनंद घेत घोळ गाव कधी आलं समजून आलं नाही.

गावाची छोटी झलक! टुमदार गाव. बसकी कौलारू घरे. लक्ष्य वेधून घेतलं ते लालसर मातीने! घोळ ते गारजाईवाडी हा कच्चा रस्ता. लालसर मातीचा. अंतर साधारण ४ किमी. विवेक ने आधीच सूचित केल्यानुसार गाडीच्या काचा बंद केल्या. नाका-तोंडात धूळ जाऊ नये म्हणून सर्वांनी ते आच्छादित केलं. प्रथमच आपली चार चाकी मोठी गाडी ह्या रस्त्यावरून धावली. आधीचे ट्रेक ४ किमी अंतर चालत पार केलेले. आम्ही लकी!

गारजाईवाडी आली. १०-१५ घरांची वाडी. पुणे जिल्यातील , वेल्हे तालुक्यातील कोकण सीमेवरची हि वाडी! इथून रायगड जिल्हा सुरु होतो. ट्रेक संपल्यावर ज्या पोळेकर कुटुंबाकडे आम्ही जेवलो त्यांनी सांगितल की पूर्वी पायी जायचे ते कोकणात. पहाटे सूर्योदयापूर्वी निघून ४-५ तासात कोकणात पोहोचायचे. परतायला रात्रच! आता घोळ गावातून "लालपरी" कोकणात धावते!

ट्रेकच्या सुरुवातील विवेक ने किल्ल्याची माहिती दिली. ट्रेकच्या सूचना दिल्या. उषा ताईंनी "भवताल" निरीक्षण - पक्षी, पान, फुले समजून घेणे किती महत्वाचे आहे ह्याबद्दल सांगितले.ट्रेकला सुरुवात केली. जंगलातून जाणारा ट्रेक रस्ता. किंचित पानझडीचा. दूरवरचा कोकणदिवा दिमाखात उभा.कोकणदिवा पायथ्याशी यायला साधारण अर्धा-पाउण तास लागला. पठारावर आलो. वाळलेल्या गवताने पठार भरलेलं. उन्हाच्या तप्त किरणात गवत चंदेरी -सोनेरी लकाकत होत.

गारजाईवाडीतून ट्रेक सुरु झाला तो १०.१५ वाजता. वाटेत कालिकामाता मंदिर आहे.साधारण ११ वाजता पठारावर आलो.  इथून कोकणदिवा चढाई सुरु! ट्रेकवाटेवरच्या रानझाडांची आणि फुलांची माहिती उषाताई देत होत्या.

शिकेकाई
करवंदखरतर मध्यान्हीच्या उन्हाची वेळ! तप्त किरणे इतकी त्रासदायक झाली नाहीत ती इथल्या जंगलामुळे! संपूर्ण ट्रेक हा जंगलातून. पानझडीमुळे झाडांचा पालापाचोळा ट्रेकवाटेवर विखुरलेला. त्यात मुरबाड लालसर माती! एकदम खडी चढाई! अंगावर येणारी!

कोकणदिवाच्या पहिल्या कातळपाषाणाजवळ आलो ते ११. ४५ वाजता. दिनेश कोतकर आधीच पोहोचलेला. खडी चढाई. पाला-पाचोळा आणि मातीचा घसारा! त्यामुळे त्याने आधी जाऊन रोप फिक्स केला. चढणे सोयीस्कर झाले.

कोकणदिवाच्या गुहेत आलो . मध्यान्हीच ऊन चांगलच चटका देणारं. गुहेत मात्र थंडावा! बाजूला पाण्याचे टाके. आम्ही थोडा थंडावा अनुभवत होतो तेव्हा दिनेश, सुयश, विवेक हे वरच्या रॉक पॅॅच ला रोप फिक्स करत होते. गुहेपासून वरचा हा टप्पा साधारण २०-३० फुटाचा असेल. एकदम नव्वद अंशात चढाई! खाली खोल दरी आणि कातळ डोंगररांगा!

दिनेश ने आमच्या कमरेला रोप फिक्स केला. आम्ही काही जण आधी चढण्यासाठी शिरसावलो. रोप चा आधार घेत होतो. रोपमध्ये अडकवलेल्या कडीचा सपोर्ट सुद्धा होता! जीजीआयएम ची तत्परता, कौशल्य पाहून स्तिमित व्हायला झाल. रॉक क्लायबिंग साठी पटापट रोप फिक्स केले. आम्हा सर्वांना कमरेला रोप लावून दिले. आवश्यक वळणावर कमरेच्या रोपमध्ये कडी फिक्स केली. ३५-४० जणांच्या सुरक्षिततेसाठी  हे करण आणि ते ही कमी वेळात . केवळ सलाम करू शकतो.!

रॉक पॅॅच चढायला फारसा वेळ लागला नाही. नाही भीती वाटली की नाही माघार घेतली. अर्थात दिनेश, विवेक रोप फिक्स लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेताना पाहून मलाच काय कोणालाच भीती वाटली नसती आणि कोणीच माघार घेतली नसती!

कोकणदिवा माथ्यावर आम्ही काहीजण पोहोचलो.रॉक पॅॅच क्लायबिंग करायला पुढे होत्या उषाताई. माथ्यावर पहिल्या त्याच पोहोचल्या. आम्ही काही जण माथ्यावर आल्यावर त्यांनी दिनेशला इतर लोकांकडे बघायला सांगितलं. स्वत: आम्हा सर्वांना माथ्यावरच्या टोकावर फडकणाऱ्या झेंड्याकडे घेऊन जायला सज्ज होत्या. ह्या माथ्यावर साधारण ७-८ जण सुरक्षित काहीवेळ राहू शकत असल्याने तसे नियोजन दिनेश, विवेक आणि सुयश करत होते.

उषाताई आणि मीराताई यांनी पुढाकार घेऊन आम्ही माथ्यावर आलेले सर्वजण झेंड्याकडे आलो.दुपारची भर बाराची वेळ. रणरणतं ऊन. पण माथ्यावर आलेल्याच्या आनंदात ऊन जाणवलच नाही. माझ्यासाठी तर फार भारी फिलिंग होतं. रायलिंग पठारावर उषाताईच्या संगतीत रुंजी घातलेला कोकणदिवा आज बाराच्या ऊन्हात मनात तळपत होता. तेही उषाताईच्या संगतीत! आहे ना भारी फिलिंग!
आज व्हीजीबिलीटी जबरदस्त होती. दूरवरच्या सह्याद्री पर्वत रांगा अगदी थेट दिसत होत्या. झेंड्याकडे तोंड केलं तर उजवीकडे राजधानी रायगड दिमाखात नजरेच्या टप्प्यात होता. जगदीश्वर मंदिर, नगारखाना आणि टकमक टोक उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत होत. झेंड्याच्या मागे दूरवर लिंगाणा खुणावत होता. सह्याद्रीच हे रुपडं मन बहरून टाकणारं. डोळ्यात किती आणि कसं साठवावं. वाईट एकच झाल. डोळ्यावर आलेल्या तळपत्या उन्हात फोटो काढता आले नाहीत. माझ्या मोबाईलमध्ये मीच मला दिसत होते. शेवटी फोन बाजूला ठेवला आणि एक एक डोंगर आणि डोंगररांग मनात साठवून घेतली!

कोकणदिवा, टेहळणी गड! कोकण आणि देश यांना जोडणारा कावळ्या-बावळ्या घाटाची टेहळणी करण्यासाठी अगदी मोक्याच्या ठिकाणी उभा असा हा कोकणदिवा! राजधानी रायगडाच्या डोळ्यास डोळा भिडवत उभा खडा  कोकणदिवा! रायगडाच्याच तोलामोलाचा! क्षणभर डोळ्यासमोर त्याकाळचा इतिहास समोर आणला तर कोकणदिव्यावर उभा असलेला कोणीही स्वत:ला किती धन्य मानत असेल. किती महत्वाची जबाबदारी आपण पार पाडतोय ह्या विचाराने छाती नक्कीच फुलून येत असेल.कोकणदिवा माथ्यावरच्या उल्हासित आठवणी तेवत ठेवत माथा उतरायला सुरुवात केली. आम्ही ७-८ जण एक एक करत उतरलो आणि पुढचे लोकांनी चढायला सुरुवात केली.

आम्ही काहीजण गुहेत परतलो. उषाताई, मीराताई, मंजू आणि इंद्रजीत सर आम्ही गड उतरायचं ठरवल. गड उतरताना घसारा आणि खोल उतराई यांनी चांगलीच माझी परीक्षा घेतली. एकाग्रतेने उतरताना चांगलाच ताण आला. किंचित थकवा जाणवायला लागला. इंद्रजीत सरांनी अत्यंत सहकार्य करत खोल उतराई आणि घसारा यांना पार करण्यात यश आलं.

मला कमाल वाटली ती उषाताईची! पालापाचोळा आणि लाल मातीचा घसारा आणि खोल उतराई त्यांनी ज्या कौशल्याने पार केली ते पाहून मी थक्क झाले. उलट्या अर्थात पाठमोऱ्या बाजूने तोल सावरत ज्या धर्याने आणि कौशल्याने त्या उतरल्या ते पाहून असं वाटलं अरे प्रत्येक आव्हानाचा सामना आपण करूच शकतो!

उतराईच्या वेळी उन्ह सोसण्याची ताकद थोडी कमी पडू लागली. थकवा खूप जाणवू लागला. स्टॅॅमिना संपत आला. चालतेय चालतेय तरी गारजाईवाडी येईना. पायातले त्राण संपत आले.

१ वाजता उतराई सुरु केली . ३ वाजता वाडी आली. कोकणदिव्याला मनोभावे प्रमाण करून पोळेकर कुटुंबाच्या घरी आलो. मी काही मिनिट बसले. चक्क ताजीतवानी झाले. थकवा कुठल्याकुठे गेला. उन्हामुळे बहुतेक जरा जास्त त्रास झाला.

पोळेकरांकडे मस्तपैकी तांदळाची भाकरी, खिचडी, बटाटा-मटकी ची पातळ भाजी असा बेत होता. सोबत उषाताईंनी आणलेला दही-भात, ताक, चटपटीत मसालेदार कोरडी मटकी..वा बहार आली....

आमची गाडी ५ च्या सुमारास परतीच्या प्रवासाला लागली. परतताना प्रीतीश सोबत ट्रेकिंगच्या मस्त गप्पा रंगल्या.

सकाळी नाश्ता केलेल्या पानशेत येथील Bamoo and Bricks येथे फक्कड चहा आणि वडापावावर ताव मारला.
पुण्याकडे लगेचच निघून ८.३० वाजता घरी आले.

अंथरुणावर पाठ टेकली.  ट्रेकची रिळे सकाळच्या दिशेने फिरली. एक एक ट्रेक फिल्म आठवत झोप लागली......