पिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......

आमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व! इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान!


आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक्ष आहेत. एक पिंपळ आणि दुसरा पांढरी सावर! २० मार्च २०२० ला नुकताच वंसत ऋतू आरंभ झाला. हलक्याशा  पवनलहरी  . पर्जन्यधारा बरसल्या. पिंपळपानावरील निसटती पर्जन्यबुंदे कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह झालाच!




पिंपळपानाची एक आठवण माझे वडील सांगत असतं. त्यांची आई म्हणजे माझी आजी कपाळावर कुंकूरूपाने पिंपळपान काढत असे. मी आजीसारखी दिसते असे वडील म्हणायचे. त्यांना कधी वाटलं कि ते माझ्या कपाळावर पिंपळपान काढायचे. कपाळ मोठं असल्यामुळे ते पिंपळपान खूप सुंदर आकारास येत असे. घराच्या खिडकीत पिंपळवृक्ष म्हणूनच मला आजीची ऐकलेल्या स्मृती  जागा करतो.

पांढरी सावर (Kapok Tree) ! खूप मोहक वृक्ष आहे. त्याच पान हे ह्स्ताकृती! पसरट. पाच- किंवा अधिक पर्णिका पानाला असतात. मला हा वृक्ष त्याच्या पर्णिका आणि फळामुळे अनन्यसाधारण वाटतो. त्याच फळ किंचित निमुळत -लांबटआणि भरीव. फळे हिरव्यागार रंगाची. वाळली की वाळलेल्या पानाच्या रंगासारखी दिसतात. खूप वाळली की ते उकलत आणि आतून पांढरे कापसासारखे तंतू बाहेर येतात. हे तंतू खूप लुसलुशीत आणि मऊ असतात. आत काळ्या रंगाच्या बिया असतात. बियापासून तेल काढतात. ह्या तंतू पासून उश्या, गाद्या बनवतात. अशी बहुगुणी पांढरी सावर आमच्या खिडकीत आहे. कापूस बाहेर आला कि वाऱ्याच्या झोतावर हे पांढरे तंतू हवेत हलकेच अलगद उडतात. ते पाहणं हा एक मोहमयी आनंद आहे. आपणही  पिसासारखी हलके आकाशात बागडतोय असं वाटू लागत. आमच्या खिडकीतली सावर फुलांनी भरलेली मी कधी पाहिलेली नाही. हिची फुलं खूप छोटी असतात असं मी ऐकलयं. बघू पुढच्या मोसमात फुले पाहूयात.





पिंपळवृक्षावर दोन घरटी आहेत. कावळ्याला हा कापूस चोचीत धरून घरटे बांधण्यासाठी आणताना मी पाहिलयं. कावळा घरटं बांधतो. कोकिळा आपली अंडी त्याच्या घरात घालते. घरट्यात अंडी असतील आणि कोणी इतर पक्षी जवळ आला तर कावळा किती कर्कश्श आणि जीव तोंडून ओरडतो ह्याचा अनुभवही मी घेतलाय.






कोकिळा , पिंपळवृक्षावर पहिल्यांदा पाहिलेला पक्षी. पक्षांबाबतच माझं ज्ञान म्हणजे कोरी पाटीच. कोकीळ आणि कोकिळा ह्यातील फरक आत्ता आत्तापर्यंत माहित नव्हता. निसर्गजग अनुभवण्याचा फारसा योग आलाच नाही. माझं जग होत शाळा, कॉलेज, नोकरी आणि घर! २०१५ साली म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी निसर्गजग अनुभवण्याचा योग आला. ट्रेकिंग सुरु केलं. पाने, फुले, पक्षी, वेली इ. ची ओळख आणि आवड तेव्हापासून सुरु झाली.

पहाटे चार वाजता कोकीळ कुहूकुहू करू लागतो. साधारण दोन वर्षापूर्वी पहिल्यांदा आमच्या पिंपळवृक्षावर कोकिळा आली. नंतर कोकीळ आला. त्यानंतर एक वर्ष फारसा किलबिलाट नव्हता. अर्थात मी पण नोकरीनिमित्ताने घराबाहेर. त्यामुळे ही नजरानजर झाली नसेल. मागील एक-दीड वर्षापासून आमचा पिंपळवृक्ष पक्षांच्या आवाजाने गजबजलेला असतो.  पिंपळ जिवंत आहे असं वाटतं. ह्या पक्षांनी आकाशात भरारी घेतली कि आकाश जिवंत आहे असं वाटतं.

सध्या पिंपळगुंजनाने आकाश मोहरलयं. पिंपळपान स्पर्शाने पुलकित झालयं. कोरोना विषाणूच्या च्या जगभरातील प्रकोपामुळे १८ तारखेपासून घरातून काम करण्याचे आदेश असल्यामुळे हे गुंजन मनात रुंजी घालतयं.

पिंपळगुंजन अर्थात विविध पक्षांच्या आरवाने पिंपळवृक्ष गुंजारव अर्थात गुंजन करतो असचं वाटतं. सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंतचा विचार केला तर तीन ते चार तास खिडकीपाशी पक्षी निरीक्षण करण्यात जातात. ह्या दिवसांनी एक नवीन बोलकं जग माझ्यासमोर आणलयं. त्या जगाने मी भारावून गेलेय. वेडच लावलयं म्हणा ना!



पिंपळवृक्षाला ठिकठिकाणी गुळवेल अर्थात गुडूची लगडलेली आहे. वेलीची वाटण्याच्या आकाराची काही फळे हिरवी आहेत तर काही लालचुटुक. ही फळे पाहत मन भरत नाही.  गुळवेल एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात तिचे उपयोग लिहिलेले आहेत. तिला अमृतकुंभ असेही म्हणतात. ताप, कावीळ सारख्या आजारावर हि वनस्पती गुणकारी आहे. मधुमेह आजारासाठी तर वरदानच!



माझ्या भाच्याने खिडकीतून खाली उतरून फळाचा जवळून फोटो घेतला..


गुळवेलीची लालचुटुक फळे झाडाच्या हिरव्यागार पानांमधे फारच मोहक दिसतात. लालचुटुक फळांचा झुबका एखाद्या सौदर्यवतीच्या कानातील कर्णफुलांनी तिच्या चेहरा अधिक खुलून यावा तसा झाडाच्या सौदर्यात भर घालतो. फळांवर सूर्याची किरण पडल्यावर ती इतकी सुरेख चमकतात ती दृष्टी दिपवतात. लालचुटुक फळे खाण्याच्या मोहाने पक्षी घिरट्या घालतात. कोकीळ-कोकिळा मनसोक्त आस्वाद घेतात. लगडलेली फळे तोडून तोंडात टाकताना पाहणं स्वर्गसुखच! भूकेल्याचा आत्मा तृप्त होतोय हि भावना स्वर्गसुखच नव्हे काय! ह्या दोघांचे फळे खाताना कितीही फोटो आणि व्हिडीओ काढले तरी मन भरत नाही. एकवेळ अशी येते कॅमेरा बंद करते. त्यांना ती लालचुटुक फळे खाताना पाहत स्वर्गसुखाचा दररोज आनंद घेते.





गुळवेलीला अमृतकुंभ म्हणतात हे फार भारी वाटत. अमृताने भरलेला कुंभ! १८ तारखेपासून रोज पाहते रोज पक्षी येतात. फळे खातात. एक नाही एकावेळी अनेक फळे खातात. परंतु ती फळे संपली आहेत असं मी अजून पाहिलं नाही. सकाळी उठून पाहिलं की त्यागी पुन्हा तेवढीच फळे दिसतात. फळांचा गुच्छ तसाच लगडलेला असतो. आहे ना ही फळे किमयागार! हां हिरवी म्हणजे कच्ची फळे खाताना मी एकाही पक्षाला आजपर्यंत बघितलेलं नाही! निसर्गाची रानभूल काही अजबच नाही का?

एक दिवस झाडाची पाने खूप जोराने हलली. खिडकीतून डोकावून पाहिलं. एक भला मोठा पक्षी. मी आधी कधीच पहिला नव्हता. कावळा, कबुतर, कोकीळ-कोकिळा हे नेहमीचे पाहुणे. हा अनोळखी पाहुणा कोण? फोटो काढेपर्यंत भुर्रकन उडालासुद्धा! ती घार (Black Kite) आहे हे नंतर समजल. बापरे..घार आकाशात घिरट्या घालतानाच बघितलेली. झाडावर बसलेली. ते हि इतक्या जवळून. पहिल्यांदाच ही जादू घडली होती. आकाशात स्वच्छंद विहार करणारी घार चक्क झाडाच्या फांदीवर विसावलेली मी पहिली. घारीबद्दल आता आकर्षण निर्माण झाल. जवळून कशी दिसते? रोज खिडकीतून डोकावत होते. घारी ला शोधत होते. कित्येक दिवस गेले. एक दिवस माझी भिरभिरती शोधक नजर तिने टिपली. त्या अनुभवावर लिहिले ते असे,

"ती" माझी सखी❣ खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज अखेर भेटलीच👍👌 ते ही चक्क 7 ते 8 मिनिट🤗😍 नुसती भेटलीच नाही तर फ़ोटो ऐवजी चक्क व्हिडिओ पोझ दिली.
आज सात वाजता उठले. काल Root Canal Filling केलेलं. त्यामुळे ब्रश करण्याऐवजी बोटाने हळुवार दात घासत होते. कुठास ठाऊक कसं पण पाय आपसूकच खिडकी कडे वळले. झाडाच्या फांदीवर पक्षी बसल्यासारखे वाटले. चष्मा नसल्यामुळे स्पष्ट दिसेना. चष्मा लगबगीने डोळ्यावर चढवला. 😳. फांदीवरचा पक्षी चक्क घार होती😃
चटकन टूथपेस्ट चा हात धुतला..कॅमेरा बाहेर काढला. घार छान पोझ देत, पांढरी सावर, गुळवेल, पिंपळ इ. कोणत्याच पानांच्या आड न लपता पूर्णांगाने मला दर्शनसुख देत होती😍
कॅमेरा ऑन केला. पण चुकून व्हिडिओ ऑन झाला. कॅमेरा ऑफ़ करून पुन्हा ऑन केला. पुन्हा व्हिडीओच ऑन झाला. 🤔
नजरेच्या टप्प्यात इतका वेळ देणारी माझी सखी उडून जाईल ह्या भीतीने व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू ठेवले📸
गम्मत बघा एरवी फोटो काढायचा असायचा तर लगेच उडून जायची. आज व्हिडीओ रेकॉर्डिंग होतं होत तर संयम ठेऊन होती.
माझ्या patience ची परीक्षा घेत होती.😁😆 रेकॉर्डिंगला सुरुवातीला श्वासाची गती इतकी वाढली की ती रेकॉर्ड झाली. काही क्षणांनी मला त्यावर थोडा ताबा मिळवता आला.
आता तोंडातील टूथपेस्ट बाहेर येऊ लागली😃😅
रेकॉर्डिंग चालू ठेवलं. घार सखी भेटीचा मनमुराद आनंद देत होती.
काही क्षण हात थरथरला. 5. 25 मिनिट फांदीवर बसून सखीने इतक्या दिवसांची इच्छा मनसोक्त पुरी केली😍
एक धडा देखील दिला. संयमाचा🦅
"घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी" हे लहानपणापासून ऐकत आलेली. घारीला आज न उडताना बघितलं.
ही माझी सखी वरील उक्तीतून मातृत्वाचं मूर्तिमंत दर्शन देणारी🙏🏻
वाटलं मी तिच्या दर्शनासाठी आतुर आहे हे ती जाणून होती. चित्त माझ्यावरही ठेऊन होती.😍
भेट देऊन इच्छापूर्ती सुख देऊनच आकाशी उडाली😌😍



पानांच्या झुपक्यात नसताना घार दिसावी हि इच्छा एक दिवस पूर्ण झाली..




एकदा कोकीळ-कोकिळा झाडावर स्थिरावल्या होत्या. त्यांच्या डोक्यावरून घार गेली. तेव्हा त्यांनी आवाजाचा जो भयभीत टाहो फोडला तो आजही माझ्या लक्षात आहे. घार एकदा खिडकीपाशी येऊन बसलेली. ती उडल्यावर तिच्या पंखांची व्याप्ती आणि तो फडफड आवाज भय देऊन गेला. असो.

घारीबद्दल वाटणारी उत्सुकता लेख रूपाने साकारली. फेसबुकवर अपलोड केली. तिची ही लिंक..

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157626055266523&id=663841522

घार आकाशात घारीची शोध मोहीम सुरु असताना रोज तिच्या वेळेला ती दिसली नाही तर थोडी निराशा पदरी पडत होती. अशातच एक दिवस ....त्या दिवसाचे पुढील शब्दांकन......

हे वेड मजला लागले...

खूप दिवस खिडकीतल्या झाडावर येणारी घार कॅमेऱ्यात टिपता येत नव्हती. आज पण तेच घडलं. अधून मधून खिडकीबाहेर पाहत होते पण हाती निराशाच येत होती. खिडकीबाहेर पाह्ण्याचं वेड स्वस्थ बसू देत नव्हतं. सहज बाहेर बघितलं. निराशेच रुपांतर आशेत झाल. घार तर नाही आली. चक्क भारद्वाज (Greater Coucal)  फांदीवर डोलत होता.


आजपर्यंत बरेच पक्षी खिडकीत आले. ते पाह्ण्याच वेड लागली. खिडकीत डोकावणे, पक्षाचा आवाज आला, फांदी खूप वेगाने हलली, एकाच वेळी अनेक पक्षांचे आवाज आले, कावळा जीवाच्या आकांताने ओरडला..सकाळी ७ ते ८ दरम्यान ..पक्षांची रेलचेल असते...खिडकीतून डोकावण्याचे हेच ते क्षण...

पक्षाचं निरीक्षण करण्यात वेळेच भान राहत नाही. गुळवेलीचे फळे खाताना पक्षाला न्याहाळणे, घरट्यापाशी घिरट्या घालताना, खारुताईशी मस्ती करताना, कोकीळ-कोकिळा एकत्र पाहताना...

कोकीळ-कोकिळा सतत येत असतात, परंतु त्यांचे वेगळ्या Angle ने फोटो मिळतोय का, उन्हाची भन्नाट रंगसंगती मिळते का इ. पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा फोटो काढण्यास मन पुढे सरसावत.



कधी पक्षांचे आवाज येतात, पक्षी दिसत नाही आणि लोकेट सुद्धा होते नाही...

काही वेळा पक्षी पानांमुळे स्पष्ट दिसत नाही. तिन्ही खिडकीतून डोकावलं तरीही पक्षाचं अस्तित्व दिसत परंतु त्याचे डोळे, चोच, पाय, शेपटी इ. अवयवांचे स्पष्ट फोटो काढता येत नाहीत. पक्षी खूप लवचिक असतात. अंग मुटकून बसतात. चोच अंगात व पंखात असे लपवतात कि पूर्ण पक्षी दिसेपर्यंत कॅमेरा आणि फोकस धरून ठेवावा लागतो. काहीवेळा कॅमेऱ्याच सेटिंग आणि फोकस होईपर्यंत फोटो क्लिक होतो.


(खरतर साळून्खी (Common Myna ) हा तसा कॉमन पक्षी. आमच्या पिंपळवृक्षावर यायला आणि मला तो दिसायला काही दिवस जावे लागले. भलतीच वाट पहावी लागली. त्याची रंगसंगती मोहुवून गेली.




पक्षीनिरीक्षणाच वेड असं लागलय की वाऱ्याने फांदी हलली कि कशी दिसते आणि फांदीवर पक्षी बसला कि फांदी कशी हलते हा फरक उमगू लागलाय, पक्षी फांदीवरून उडल्यावर फांदी आणि पाने कशी हलतात ते लक्षात येऊ लागली..पक्षांच्या बसण्याच्या जागा ही माहित झाल्यात...

पक्षी चोचीत काही पकडतो, खावून झाल्यावर फांदीला चोच घासतो, पक्षांची भिरभिरती नजर, कुठून आवाज आला कि मन उंच करून आवाजाचा वेध घेणे, वेगवेगळ्या दिशेला पाहताना त्यांच्या शरीराची लकब आणि पोझ, पक्षाचं एकमेकांच्या आवाजाला प्रतिसाद देण हे सर्वच खूप न्याहाळण्यासारख आहे.


मी ह्या गोष्टी जशी शिकले तसे पक्षी माझ्या काही गोष्टी शिकलेत. घराच्या तीन खिडकीतला माझा वावर ते लगेच टिपतात, कॅमेऱ्याची चाहूल त्यांना ताबडतोब लागते, कॅमेरा ऑन होईपर्यंत हे गायब, कधी पानांच्या झुपक्यात लपून मला हुलकावणी देतात, खिडकीचा पडदा बाजूला केला तर तुरंत सतर्क होतात, खिडकीची काच बाजूला  करणं हा विचारच करायला नको; पक्षी उडालाच, कधी माझी दया येऊन मस्त पोझ देतात,  चक्क खिडकीपाशी येतात,  काही पक्षांचा रंग हुबेहूब पानांसारखा, उडाल्यावरच लक्षात येत ...

ह्या वेडामुळे कधी दुध ओतू गेल तर कधी चहा, कधी तर गॅॅस बंदच करावा लागला, कधी घर झाडताना कुंचा बाजूला ठेऊन कॅमेरा चालू करावा लागतो...

पक्षी कॅमेऱ्यात टिपण्याच्या वेडात खिडकीपाशी उभं राहून तळपायाला रग लागली, कंबर  ताठली, कॅमेरा हातात खूप वेळ एका स्थितीत  पकडल्यामुळे हात आखडले, डोळ्यांना जो व्यायाम मिळाला तो तर विचारूच नका, उन्हाकडे पाहून घरात पाहिलं कि एकदम अंधार दिसला, खिडकीपाशी ताटकळत उभे राहत नजर भिरभिरी ठेवल्याने गरगरायला होतं...

वेळेच व्यवस्थापन पार कोलमडलं...आजच काम उद्यावर गेलं..

ह्या वेडाने तहान-भूक हरपली..स्वयंपाक घरात बनवायचा तर वेळ तिथे द्यावा न वाटता, काही मागवूयात का हा विचार येऊ लागला..

ठरलेल्या वेळी किंवा दिवसभरात एकही पक्षी पिंपळवृक्षावर आला नाही तर मन एकदम सैरभर होत, बेचैन होत, काही तरी चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. खिडकीकडे आपोआप पाय वळतात, बाहेर डोकावल्या जातं, नजर भिरभिरत राहते. एखादी सवय लागायला एक क्षणही पुरा होतो नाही काय?

काहीवेळा अनेक पक्षांचा सुरेल किलबिलाट आभाळाला भिडतो..

काहीवेळा हाच किलबिलाट एक आक्रंद निर्माण करतो. भय निर्माण करतो. काहीतरी विपरीत घडलयं हे त्यांच्या आवाजाच्या आक्रंदनावरूनच लक्षात येत. खिडकीतून डोकावल तर जातच परंतु खिडकीची काच बंद असेल तर ती चटदिशी उघडल्या जाते....

एकदा आमच्या घरात कबुतर आलेलं. बाहेर कुठून आणि कसं जायचं त्याला कळेना...

एकदा जिन्यात वटवाघुळ आलेलं. ...

पक्षीजगत जितक सुंदर तितकच भयप्रद पण आहे बर. का....

आनंद व भय, पक्षांची दुनिया चकित करणारी आहे हे नक्कीच. त्याचं Behaviour न्याहाळण यासारखी नितांत सुंदर गोष्ट दुसरी नाही...तासनतास कसे जातात उमगत नाही.....



एकवेळ अशी येते कि वाटतं "बस्स आता, काही वेळ त्यांचा त्यांनाही देवूयात"...

तर असं हे वेड लागलय..तुम्हाला ते न लागलेलंच बरं हो,,,,,,


पक्षांच्या आवाजातील वैविध्य उत्सुकताने परिपूर्ण आहे. घारीचा आवाज  वाद्यातून निघालेली लय आहे. त्याच स्वरात, त्याच लयीत आणि त्याच पीचमधे तो ऐकायला मिळतो.

"पक्षीनिरीक्षण "! एक नवीन अध्याय समोर आला. एक नवीन विश्व समोर आलं.  जिज्ञासूवृत्तीने बेचैन झालं. झानसमृद्ध जितकी झाले तितकीच ज्ञानपिपासू! 

पक्षांबद्दल माहितीची पाटी कोरी असल्यामुळे त्यांची ओळख करून देण्यासाठी बरीच मित्रमंडळी समोर आली. रोज वेगळा पक्षी कॅमेऱ्यात विसावतोय. त्याच नाव समजल, थोडी माहिती वाचली कि मी स्तिमित! "हा पण पक्षी पिंपळवृक्षावर आलाय?" कोरोना विषाणूच्या अटकावासाठी  माणसांच्या, वाहनांच्या चलनाला जी खीळ बसलीय त्याचा तर हा परिणाम नाही? पक्षांचा मुक्त संचार! कित्येक जणांनी ती किलबिल अनुभवली! whatsapp वर तसे मेसेजही आले. माणसांच्या, वाहनांच्या संचाराला भयभीत होत पक्षी मुक्त संचारास मुकले होते कि काय असा प्रश्न पडला. निसर्गातून सिमेंटच्या जंगलात आलेल्या पक्षांसाठी काही तास माणूस, वाहनाचा संचार आखडता घ्यायला हवा आहे का? विचार करूयात....जेव्हा शक्य आहे तेव्हा पायी चालूयात...वाहनांचे कर्कश्श हॉर्न बंद करून पाहूयात....ह्या सक्तीच्या विरामाच्या दिवसांतून काही शिकुयात..शिकलेलं आचरणात आणुयात....

पक्षीनिरीक्षणामधे पक्षांची माहिती अचूक असणं खूप महत्वाचं! माझी कोरी पाटी जसे जसे पक्षी पिंपळवृक्षावर येत आहेत तशी अक्षरांनी लिहिली जात आहे.



पक्षांचा आवाज रादर विविध पक्षांचे त्यांचे प्रत्येकाचे असे खास शैलीतील आवाज हि एक मंत्रमुग्ध जादुई दुनिया आहे. घरात बसलं तरी खूप विविध प्रकारचे आवाज येत असतात. आवाज आला खिडकीतून डोकावल कि आवाज तर येत असतो आणि पक्षी तर दिसत नाही. ही अवस्था अत्यंत Restless जीवाची घालमेल करणारी अवस्था. एकदा ठरवल कि पक्षांचे आवाज रेकार्ड करूयात. एका पक्षाचा आवाज non-stop/continuous येतच राहतो. उत्सुकतेपोटी रेकार्ड केलेला आवाज एका friend  पाठवला. त्याचा reply आला. आता त्याची शोधमोहीम सुरु झाली. इतुकसा पक्षी  पिंपळपानांच्या झुपक्यात डोळ्यांनी दिसणार कसा? काही दिवस गेले. वर्णन लिहिल्याप्रमाणे एक दिवस एक पक्षी दिसला. फार आनंदित झाले. आनंदात त्याचा अनुभव लिहून काढला.  तो लिखित अनुभूव पुढीलप्रमाणे,

कित्येक दिवस त्याच्या आवाजाने खूप उत्सुकता दिली. त्याच्या Non-Stop आवाजाने काही वेळा irritate सुद्धा झाले. झाडावर पक्षी दिसत नव्हता. ऐकू यायचा तो फक्त आवाज.

कोणता पक्षी आहे हा ? उत्सुकतेने आवाज शेवटी रेकॉर्ड केला. Friend ला पाठवला. त्याचा Reply आला.
 " ईटूकला पिटुकला पक्षी. चिमणीपेक्षा छोटा. पंख करड्या रंगाचे. शेपटीवर खालच्या बाजूने आडव्या रेषा. डोळ्यांचा रंग लालसर किंवा नारंगी. नाव आहे वटवट्या.

नाव ऐकल आणि "किती वटवट करतेस" हे वाक्य आठवल. ह्या पक्षाच्या आवाजावरूनच हे वाक्य आलं असावं.
पक्षाच्या वर्णनावरून त्याला झाडावर शोधण हे कार्य आता सुरु झाल.

झाडावर खूप वेळा वटवट्या दिसला. झाडाच्या फांदीच्या रंगात तो दिसून येत नसे. त्यात तो ईवूलसा. पानामध्ये शिरला तर दिसणं अश्यकच. दिसायची ती फक्त पानांची हालचाल.
निरीक्षण करत राहिले. वटवट्या उडी मारतो जसा "टूणुक टूणुक". पापणी लवेपर्यंत हा कुठे गायब होतो ते समजूनच येत नाही.

असा हा वटवट्या कॅमेऱ्यात येण केवळ असाध्य.

शेवटी त्याची माझ्यावर कृपादृष्टी झाली. चक्क काही सेकंद फांदीवर विसावला. कॅमेऱ्यात यायलाही एकदम रेडी!

आवाजाला शेवटी चेहरा मिळाला. त्याची वटवट आता मंजुळ वाटू लागली.

स्वत:वर खुश होऊन अनुभव पक्षाच्या फोटो आणि आवाजासहित शेअर केला. एका मित्राचा मेसेज आला, "तो वटवट्या नाही, शिंपी पक्षी आहे'"! पाटी कोरी असेल तर काय होतं बघितलं ना? पण त्यातूनही शिकलेच हो. एका नवीन पक्षाची ओळख झाली!


वटवट्या आणि  शिंपी पक्षाच्या दिसण्यात आणि आवाजात फार साम्य आहे. मित्रांनी दिलेल्या माहितीवरून हे समजल! आता वटवट्या पक्षांला टिपण अधिक आव्हानात्मक झालय. आवाजाला चेहरा मिळण्याच्या प्रतीक्षेत अजून आहेच.......

पक्षांची दुनिया भुलवणारी नक्कीच आहे! गुंतत नेणारी आहे! मंत्रमुग्ध, बेचैन करणारी आहे. भवतालचा विसर पडावा अशी आहे!

माझ्या घराच्या खिडकीतील दुनियेत इतकं सार पक्षीविश्व मी अनुभवतेय. विचार करा जगाच्या खिडकीत हे विश्व किती अफाट असेल....किती विस्मयकारक असेल....

या विश्वाने मंतरलेले शोधक उगाच नाही लाखोंचे कॅमेरे विकत घेत....

कमाल आहे ह्या अभ्यासू मंडळीची! किती पेशन्स, किती ठेहराव, किती स्थिरता, किती एकाग्रता त्यांच्या अंगी असेल, अंगात भिनवली असेल  किंवा आत्मसात केली असेल......

आमच्या पिंपळवृक्षावर अजूनही बरेच पक्षी आले. जसे ते येत गेले तसे माहित होत गेले...

कोतवाल (Drongo) दिसला परंतु कॅमेऱ्यात येण्याआधीच फरार!

रामगंगारा (Grey Tit)/ब्ल्गुली/टोपीवाला/राखी रामगंगारा/पांढऱ्या गालाची चिमणी! हा असाच एक पक्षी. कितीतरी वेळा दिसला. पण फोटोत पकडता येत नव्हता. एकदा छान स्थिरावला. पक्षी खूप दूर असल्याने फोटो स्पष्ट आला नाही. ओळख कळण्यापुरता पुरेसा.

  
पक्षांना कॅमेऱ्यात टिपण ही कमालीची अवघड आणि तांत्रिक गोष्ट आहे. मला तर कित्येक वेळा पक्षाचं झाडावरच ठिकाणच लोकेट होत नाही. कॅमेरा फिरवावा लागतो. झाडाची एक खूण लक्षात घावी लागते. हात स्थिर ठेवावा लागतो, कॅमेरा फटाफट adjust करावा लागतो. मी तर खिडकीपाशीच कॅमेरा ठेवलाय. काय करणार सांगा ना ?
Burst / continuous shots  हे फिचर वापरायच ठरवते आणि विसरते. 

माझे डोळे तसे कमकुवत आहेत. खिडकीतून सारख डोकावून बाहेरचा सूर्यप्रकाश डोळ्यांना सोसवत नाही. डोळ्यांवर आलेला ताण जाणवला की खिडकीतून बाहेर डोकावण जाणीवपूर्वक थांबवावं लागतं. खिडकीतून बाहेर डोकावण्याची सवय झाल्यांनतर हे अंगिकारण खूप कठीण गोष्ट आहे बरका. एखाद्या नवीन पक्षावर ला आचमन सोडाव लागत. 

काल-परवाच ब्राम्हणी मैना किंवा भांगपाडी मैना (Brahmani Sterling) दिसली. किती सुरेख दिसते ती! तिला न्याहाळताना मी स्वत:ला विसरले. मैनेलाही गुळवेलीच्या लालचुटुक फळांची आस! तिच्या चोचीत जेव्हा ते फळ आलं...अहाहा....फोटोतच बघा ना.......



पक्षांना ओळखण्याच्या काही खुणा आहेत असे मी वाचले. त्यांचा आकार, ठेवणं, आवाज, काही खास लकबी, काही खास प्रकारचे ठिबके, रेषा, नक्षी, रंग, चोचीचा आकार इ. इ. ....

शिपाई किंवा लाल मिशा बुलबुल ( Red Whiskered Bulbul) आणि लाल बुडाचा बुलबुल (Red Vented Bulbul) चं बघाना....पहिल्या बुलबुल वर डोक्यावरचा तुरा उंच आणि टोकदार असतो, त्याच्या गालावर मिशासारखे भासणारे गडद लाल ठिपका असतो.


लाल बुडाच्या बुलबुलच्या शेपटीच्या बुडाखाली लाल ठिपका किंवा डाग असतो. पक्षांमधील हे वैविध्य न्याहाळणे एक गंमतीदार अनुभव आहे. तो वर्णन करणं महाकठीण. अनुभूती म्हणजे आत्मानंद!


ह्या फोटोत लाल ठिपका किती उठून आणि सुरेख दिसतो बघा...



जांभळा सूर्यपक्षी आणि नर्तक/नाचण हे दोन पक्षी कॅमेऱ्यात घेताना काही गोष्टी जाणवल्या. हे दोघेही खिडकीच्या समोर दुसऱ्या टोकाला होते. सूर्यपक्षी उन्हात चमकला म्हणून लक्ष गेलं. नर्तक खूप अधीर हालचाल करताना दिसला.


आमच्या घराला तीन खिडक्या आहेत. पक्षीनिरीक्षण या तीनही खिडकीतून चालू असतं. माझ्याकडे दोन कॅमेरे आहेत. Canon 750D आणि Sony Cybershot! दोन्ही वापरते.. कोरोना प्रकोपाला अटकाव म्हणून बाहेर जाता येत नाही. खिडकीतून हे पक्षीनिरीक्षण सुरु आहे. त्यामुळे पक्षांचे फोटो स्पष्ट येतातच असे नाही. खरं तर मी हि त्याचा अट्टाहास धरत नाही. माझ्यासाठी ओळख करण्यापुरता स्पष्ट फोटो असेल तरी फार झाल. मी पक्षांची जाणकार नाही. फोटोग्राफर तर बिलकुलचं नाही. (कॅमेरा घेतलाय, शिकण्याच्या नावाने...) फोटोवरून पक्षाची ओळख करून घेणं, त्याबद्दल थोड वाचणं हा छंद फार भारी आहे. वेळ सत्कारणी लागतोय. शिवाय ज्ञानात भर!इतका आधुनिक कॅमेरा नसतानाही माझ्या साध्या सुध्या कॅमेऱ्यात जेव्हा उडणाऱ्या घारेची आकृती टिपली जाते तेव्हाचा आनंद काय वर्णावा..



आमच्या पिंपळवृक्षावर गमती पण घडतात. एकदा एक मनीमाऊ झाडावर जाऊन पहुडली. पानांमध्ये लपली. तिला झाडावर पाहून कावळा सुद्धा स्तिमित झाला.


खंडीभर कबुतरे फडफड करत थव्यांनी उडत असताना पांढरे कबुतर त्या थव्यात सामील झाल की पाहताना जो अध्यात्मिक जाणीव झाली ती आत्मसमाधान देणारी!


एक दिवस या महाशयांना देखील पिंपळवृक्षावर येण्याचा मोह आवरला नाही..


खारुताई अत्यंत चपळतेने झाडावर पळताना मी प्रथम पहिले.


कोकीळने आपल्या कातळ लालभडक निगाहे रोखत जेव्हा घायाळ केलं तेव्हा प्रेमानुभूती ने शहारा आलचं!


पक्षीनिरीक्षण करताना मला एक धडा जाणवला. पक्षी केव्हातरी किंचितसा विराम घेतात. तो विरामाचा क्षण टिपता यायला हवा. त्या विरामावस्थेत पक्षांच्या बरिकसारीक हालचाली, हावभाव टीपकागदावर टिपावे तसे टिपता येतात.

अजून सध्यातरी १४ तारखेपर्यंत किती नवीन पक्षी दिसतात याची उत्सुकता आहे. पक्षीजगत हे एक जीवनसंपन्न बनवते. भयानक कष्टप्रद गोष्ट असली तरीही सुखदायक आहे. सकारात्मक आहे. खूप साऱ्या स्वभाव गुणांचा कस येथे लागतो. सत्क-काळापासून देहभान हरपून टाकणारी दुनिया आहे!

श्रीकृष्णाच्या कथेत ऐकल्यानुसार त्याच्या पावा अर्थात बासुरी अर्थात मुरलीच्या सुरेल स्वरांनी जसे गोकुळवासी मंत्रमुग्ध होत असतं तद्वतच पक्षीजगत एक सुरेल मुरली आहे. ह्या मुरलीतून वैविध्यपूर्ण सूर निघतात. त्यांच्या मंजुळ वाणीने मंतरलेल्या जगात घेऊन जातात. मागील १५ दिवस माझे असेच मंतरलेले. पुढचे दिवस सुरेल असतील हे नक्कीच! कारण माझ्यासारखीच पक्षांना माझीही सवय झालीय. केवळ काही दिवसात! एखादी सवय अंगात भिनायला दिवस लागत नाहीत. सवयीच्या वेडाने पछाडले की सवय कधी आचरणात आली हे आठवावं लागत.! अनुभवाचे बोल आहे हा......



कोरोना प्रकोपाच्या अटकावामुळे मिळालेल्या सक्तीच्या विरामावस्थेत ही पक्षांची अनोखी दुनिया समोर आली शब्दरूपाने ती चिरकाल स्मरणात रहावी म्हणून हा अनुभव कथनाचा खटाटोप!

पिंपळवृक्षापलीकडच्या जगात सध्या काय चालू आहे ह्याची चाहूल पक्षांनाही लागलीय. हेच बघा ना एकाच झाडावर चार जण Social Distance ठेवत गुफ्तगू करताहेत. किती विहंगम दृश्य आहे नाही. फोटो पाहून तुमचही कंठ दाटून आला ना? उर भरून आला ना?



चला तर मग...ह्या विरामावस्थेत आपल्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडुयात, आपले छंद जोपासुयात...गुफ्तगू करूयात .....आपापल्या घरट्यात राहून......

#Stay home
#Stay safe
#Stay happy

#Stay healthy

लवकरच भेटूयात!

खास आभार: पक्षांची ओळख करून देण्यात ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मन:पूर्वक आभार!
खास आभार: श्री. राजकुमार डोंगरे