वैराटगड ट्रेक, विथ Travorbis Outdoors, १२ ऑगस्ट २०१८वयाच्या ५१ व्या वर्षाची सुरुवात मनासारखी झाली. १ जुलै ला मृगगड - उंबरखिंड ट्रेक, २२ जुलैला २ किमीची blindfolded buddy run marathon आणि २९ जुलैला सुधागड ट्रेक!

१२ ऑगस्ट च्या "वैराटगड" या ऑफ बीट ट्रेकची" पोस्ट Travorbis Outdoors च्या ग्रुपवर पाहिली. Difficulty level आणि ट्रेकसंबंधी अन्य माहिती जाणून घेण्यासाठी स्वप्नीलला फोन लावला. त्याच्याकडून माहिती मिळताच ट्रेकला जाण्याचे निश्चित करून टाकले.

वैराटगड ट्रेकचा चढायचा मार्ग होता व्याजवाडी मार्गे (पाचवड, जि. सातारा) आणि उतरायचा मार्ग होता गणेशवाडी मार्गे.रविवारी, १२ ऑगस्ट ला साधारण पावणे अकराच्या सुमारास आम्ही सतरा जणांनी वैराटगड चढायला सुरु केला. गडाची उंची साधारण ३९३३ फुट. खडी चढाई! भुरभुरणारा पाऊस. साधारण अडीच तास प्रवास करून ट्रेक सुरु केला तो थेट चढाईनेच! बापरे! पायाला गोळे आले. धाप पण लागली. ही चढाई सुकर झाली ती स्वप्नीलच्या  strategy मुळे! स्वप्नीलने चार-चार जणांची ओळख ट्रेकच्या एका एका टप्प्यावर विभागून केली. ह्यामुळे चढाईमधे थोडा विसावा मिळत गेला. ओळखी शिवाय विसाव्यामधे पाणी पिता आले, फुललेल्या फुलांचा एकत्रितरीत्या आनंद घेता आला, गडाभोवतीचा निसर्ग, सातारचा परिसर आणि नजरेच्या टप्प्यातील गडकिल्ले न्याहाळता आले.ह्या गडाकडे तसे फारसे कोणी फिरकत नसल्याने चढायची वाट आखलेली नव्हती. रादर काही ठिकाणी वाट देखील नव्हती. पावसाच्या हलक्याश्या सरींनी ओल्या झालेल्या हिरव्यागार गवताचा पायाला गार गार स्पर्श करून घेत वाट निघत होती. १-२ ठिकाणी दिशादर्शक बाण दिसले. एकावेळी एकच जण जाऊ शकेल अशी पायवाट. आजूबाजूला एकतर दाट झाडी नाहीतर खोल दरी. पावसामुळे काही ठिकाणी निसरडे झालेले. त्यातल्या त्यात सुखाची गोष्ट ही की खडक भरपूर होते पण ते शेवाळाने माखलेले नव्हते. त्यामुळे हाताला आणि पायाला घट्ट पकड मिळाली. काही पॅचेस तर  दोन्ही हाताच्या आधाराने चढावे लागले.

आजूबाजूला फुलेलेल्या फुलांनी दृष्टीसुख दिले. असंख्य रंगांची, आकाराची फुले. हिरव्यागार गवतांच्या कुशीत गार वाऱ्यावर डोलणाऱ्या ह्या विविध रंगी फुलांनी नजर खिळवून ठेवली. ट्रेक मार्ग ह्या फुलांमुळे, गवतात चरणाऱ्या गुराढोरांमुळे आकर्षक भासला. दोन अनोखी फुले ट्रेकवर पहायला मिळाली जी आजपर्यंत कुठल्याही गडावर/ ट्रेकमार्गावर बघायला मिळाली नव्हती. उत्सुकतेपोटी त्याची माहिती मिळवली. ह्या फुलाचे नाव आहे झिनिया! 


   
जानेवरी २०१६ मधे झिनियाच्या फुलांना अंतराळात वाढविण्याचा प्रयोग होणार होता. हे झिनिया, आजूबाजूच्या वातारणाला संवेदनशील. त्यामुळे अंतराळात जगवण महाकठीण. स्कॉट केली, या शास्त्रज्ञाने नासाच्या वतीने झाडच जीवनचक्र पूर्ण करायचं निश्चित केल. बीज पेरल, रोप उगवल. पण हवी तशी वाढ नव्हती. विविध प्रयोग सुरु झाले. पाणी कधी द्यायचं, प्रकाशाची तीव्रता कमी-अधिक करणे इ. शेवटी जानेवारी २०१६ मधे यश आलं. दोन टपोरी फुले फुलली. या प्रयोगात झिनिया निवडी मागच कारण, ही फुलं वातावरण बदलाशी संवेदनशील आहेत. ही फुले अंतराळात जगली तर इतर जीवसृष्टी सुद्धा निर्माण करता येईल का या विषयाचे ताळेबंद बांधणे ह्या प्रयोगाने शक्य होणार होते. तर अशी ही झिनियाची गोष्ट. 

दुसरे आहे म्हाळुंगी.

असो.

ट्रेक मार्ग अधिक आकर्षक दिसण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे मानवनिर्मित कचऱ्याचा अभाव. संपूर्ण ट्रेकमार्गावर कुठेही प्लास्टिक, बाटल्या, कागद इ. आढळले नाही. होते ते परिपूर्ण नैसर्गिक सौदर्य!लांबूनच गडावरील बुरुज आणि पायऱ्या दिसल्या. चढून गेल्यावर दिसला तो गडाचा विस्तार. 


गरमागरम भोजन करून गडफेरी सुरु केली. 
सुरुवात केली ती वैराटेश्वर महादेवाचे मंदिरच्या दर्शनाने. 


गाभाऱ्यातील शिवलिंगावरील पितळी नाग देखण्याजोगा. मंदिरा बाहेर नंदी. 


 मंडपात वीरगळ.
दुसऱ्या दिवशी श्रावणातील पहिला सोमवार! पुजारी बाबांनी मनसोक्त आरत्या केल्या. पोवाडा देखील गायला.

गडफेरी करत करत स्वप्नील ने त्याच्या गडअभ्यासाचा ग्रंथ आमच्यासाठी खुला केला. किल्ल्याची तटबंदी....जुन्या तेव्हाचे शौचकूप...तट संरक्षणासाठी बांधलेल्या  जंग्या (गोळीबार करण्यासाठी भोके), पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी छिद्रे, गडावरील पहारेदेणाऱ्या सैनिकांसाठी फंजी आणि चोर दरवाजा. 

गडफेरी करताना चोर दरवाजाची खुण आणि स्थळ ध्यानासही येणार नाही. खोल खोल आणि चिंचोळी उतार.


तटप्रदक्षिणा घालताना स्वप्नील ने पाणतळे, गडसदर, सैनिकांची घरे, इमारतींच्या जोती, चौथरे, पाण्याची टाकी इ. गोष्टी सचित्र स्पष्ट केल्या.


गडावर गणपतीची मूर्ती आणि दोन हनुमानाच्या मूर्ती. गणपती आणि एक हनुमान मंदिरात. एक हनुमान उघड्यावर आहे.गडावरील भैरवनाथाच्या मंदिराजवळ सतीशिळा आहे. 

गडावरून केंजळगड, कमळगड, पांडवगड, मांढरदेवी चा डोंगर, जरंडेश्वर इ. दिसतात.
अज्ञातवासात पांडव ज्या विराट राजाकडे राहिले त्याची राजधानी ह्या गडावर होती. प्रजा गडपायथ्याशी असणाऱ्या "विराटनगरी" त राहत होती. गडाला" वैराटगड" नाव त्यावरून पडले असावे ही एक दंतकथा. दुसरी दंतकथा ही की महाभारत काळात विराट किंवा वैराट नावाची जमात ह्या किल्ल्यावर वास्तव्यास होती. या जमातीवरून गडास नाव पडले "वैराटगड"!

गडफेरी पूर्ण करून गड  उतरण्यास सुरुवात केली. गणेशवाडी मार्गे गडउतराई थोडी स्टीफ वाटली. कठीण वाटली. साधारण दीड तासात गडउतराई पूर्ण झाली.पायथ्याला "वडाचे म्हसवे" म्हणून ओळखले जाणाऱ्या गावातील महाकाय वडाचे दर्शन झाले.


ट्रेक खूप आवडला. ट्रेकर्सची गर्दी नसलेला, निसर्गाच्या कुशीत विसावलेला एक अफलातून ट्रेक! वैराटगडाने साताऱ्यातील किल्ल्याना साद घालण्याची संधी मिळाली! असो.

पुण्यात पोहोचलो तेव्हा रात्रीचे दहा वाजलेले.

स्वप्नील ने ट्रेकर्सचा राबता नसलेल्या किल्ल्याची ओळख करून देऊन त्याच्या ग्रंथ संपदेतील एक नवीन ट्रेक अध्याय आरंभ केला असे फिलिंग आले.


बघू सातारा पुन्हा केव्हा साद घालतोय.....

ट्रेकमध्ये मजा आली तो दोन छोट्या दोस्तांमुळे.आणि अर्थात ट्रेक टीम मुळे....फोटो आभार: अमित तागुंदे आणि ट्रेक टीम

साखरगड, वर्धनगड, महिमानगड, संतोषगड ट्रेक, ७ ऑक्टोबर २०१८


आज तू येणार म्हणून खुश आहोत आम्ही😃 😃😃😃 स्वप्नील भेटला. त्याच्याकडूनच समजल. तुला म्हणे डेंग्यू झालेला. थोड बरं वाटतय तोच  निघालीस आम्हाला भेटायला.  ऐकणार नाहीस.  अर्थात स्वप्नीलला तुझ्यातील क्षमतेची खात्री आहे म्हणूनच तुला आमच्या भेटीला घेऊन आलाय.

एक ध्यानात घे आम्हा तिघांना भेटण्याच टेन्शन घेऊ नको. एखाद्या गडाला भेटू नाही शकलीस तर पुन्हा भेटशीलच. आम्ही इथेच आहोत तुझ्या स्वागतासाठी. ठीक आहे? चल तर मग........

सातारा जिल्ह्यातील म्हसोबा उपरांगेत आम्ही तिघ वास्तव्यास आहोत. वर्धनगड, महिमानगड आणि संतोषगड.

साखरगड निवासिनी: देवी यमाई अर्थात अंबाबाई:

अंबाबाई देवीच दर्शन तू आत्ताच घेतलस. खूप प्राचीन मंदिर आहे. गाभाऱ्यात देवी अंबाबाई आहे तर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नंदी. हे या मंदिराच एक वैशिष्ट्य. मंदिराच्या प्रांगणात भव्यदिव्य दीपमाळा आहेत. एका दीपमाळेवर शिलालेख कोरला आहे. मंदिराच्या पायऱ्या चढून मजबूत अवाढव्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर पायरीवर पण एक शिलालेख आहे. पाहिलास ना?आणि मंदिराचा कळस? देवादिकांच्या किती सुंदर, रेखीव , रंगीत आणि सुबक प्रतिमा कोरल्या आहेत. नुकतेच त्यांचे नूतनीकरण झाले आहे.


मंदिरावर असंख्य दगडी कोरीव शिल्प आहेत.किन्हई गावातील साखरगडावर वसलेल्या ह्या  साखरगड निवासीनी चा नवरात्रात उत्सव भरतो.

वर्धनगड:

सातारा-पंढरपूर मार्गावर पुसेगाव सोडल की वर्धनगड नावाच गाव आहे. गावातून माझ्याकडे यायला पायवाट आहे. गडावर वर्धनीमातेचे मंदिर आहे. ही देवी माता नवसाला पावते. नवस पूर्ण झाला म्हणून काही भाविकांनी पायऱ्या बांधून दिलेल्या आहेत. तू सुरुवातीला ज्या पायऱ्या चढून आलीस त्या पायऱ्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली म्हणून बांधलेल्या आहेत.धाप लागतेय ना? हळू ये. आजारातून नुकतीच बरी झालीस आहेस. गड चढायला जास्त कठीण नाही. जास्तीत जास्त अर्ध्या तासात गडावर येशील.हनुमानाचे हे अनाच्छादित मंदिर. "उघडा मारुती" म्हणतात. असंख्य भाविकांनी श्रीराम भक्त  हनुमानाला मंदिर देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही.आलीस की गडाच्या मुख्य दरवाज्याजवळ. अत्यंत मजबूत आणि  भव्य दरवाजा. उंची फारशी नाही त्यामुळे वाकून यावे लागेल. किती थंडावा आहे इथे. इथूनच गड परिसर , गडाची तटबंदी सुरु होते.हनुमानाचे आणि शंकराचे छोटे खानी मंदिर आहे. मंदिराजवळ पाण्याचे मोठे टाके आहे.

ह्या समोरच्या टेकडीवर आहे वर्धनीमातेच मंदिर. जागृत देवी. सभामंडपातील कासव बघितलस का? सुरेख आहे ना? नवरात्र जवळ आलाय ना त्यामुळे लगबग सुरु आहे. साफसफाई, रंगरंगोटी आणि स्पीकर सुविधा.

मंदिराच्या सपाटीवर असणारे हे "आवळे-जावळे' पाण्याचे जोडटाके.गडावरून दिसणारी सातारा-पंढरपूर सुंदर मार्गवळणे. चौफेर गड तटबंदी आहे. तटबंदी सरळसोट नाही. नागमोडी आहे. तटबंदी फारशी उंच नाही. ह्याच कारण की ह्या मार्गावर लक्ष ठेवता याव. सैनिकांना पहारा करता यावा म्हणून फांजी बांधलेली आहे. तिची रचना आजही शाबूत आहे. 

कशी वाटली तटप्रदक्षिणा? गडाच्या सौदर्याचा रत्नजडीत अलंकारासारखी वाटली ना तटबंदी? तू छान मोसमात आली आहेस. सपाटीवर हिरवळ आहे. हिरवळीच्या पार्श्वभूमीवर तटबंदीची कातळ भिंत खुलून दिसते आहे.ध्वजस्तंभ! हे गडाच्या शौर्याचे प्रतिक.

गडाला खूप भारी चोर दरवाजा आहे बरं का. तिकडेच जातोय आपण. पायऱ्या हळू उतर. एकावेळी एकच जण अंगचोरून येऊ शकेल अशी ही चोरवाट."सादिकगड" असे गडाचे नामकरण औरंगजेबाने केले होते.

कसा वाटला किल्ला?आवडला म्हणतेस.😁😁😁😁😁😁

महिमानगड:

आलीस का? तुझीच वाट पाहतोय? भूक लागलीय का? स्वप्नीलने सांगितल आधी गडभेट, मग जेवण. चालतय ना?
गडाची चढण तीव्र आहे. हळू ये. तुझा वेळ घेत ये. दिसली का तटबंदी?


काही पायऱ्या चढून आलीस की पडझड झालेला कमानी दरवाजा आहे.दरवाज्यावर सुंदर हस्तीशिल्प कोरल आहे.हनुमानाचे शेंदूर अर्चित प्रतिमा आहे इथे.


पुढे जाऊ ..समोर बुरुज आणि ढासळलेली तटबंदी दिसतेय ना? इथून पुढे लांब पसरलेली सोंड आहे.


सोंडेवर, माचीवर जाण्यासाठी बुरुजवजा चोर दरवाजा आहे. कमी उंचीचा आणि चटकन ध्यानात येणार नाही अशी त्याची रचना आहे.सोंड किंवा माचीवरून दिसणारा नजारा अलौकिक आहे म्हणतेस? सोनकी फुलली आहे.

गडावर महिमान शाहवली या संताचे वास्तव्य होते. त्यांच्या वास्तव्यामुळे गडाला "महिमानगड" नाव पडले.दोन गड केलेस की तू? भारीच आहेस.

मंदिरात भोजन करा आणि पुढे संतोषगडा कडे जा.

संतोषगड:

उशीर झालाय पोहोचायला तुला ..काही हरकत नाही. थकली नाहीस ना? चढाई आहे जरा खडी. हळूहळू ये. तुषार आहे तुझ्या सोबतीला.

पायथ्याच गाव आहे ताथवडे. गावावरून गडाला "ताथवडे चा  किल्ला" म्हणूनही ओळखतात.

येताना पाटीवर "शिवकालीन मंदिर" वाचलेस ना?आता अंधार होत आहे त्यामुळे काही ठळक अवशेष आपण पाहू. पहिला आणि दुसरा दरवाजा पूर्णत: ढासळला आहे."शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन" ह्या संस्थेने गडाचा कायापालट केला आहे.एकदा दिवसा भेट दे. गडावरच्या वैभवाची तुला कल्पना येईल. आता टॉर्च च्या प्रकाशात आपण फारसे स्पष्ट  पाहू शकणार नाही. 

शिवकालीन विहिरी कडे जातोय आपण. गडावरची सर्वांग सुंदर कलाकृती. विहिरीच्या कोरीव पायऱ्या चक्क बसून उतर. खोल आहे विहीर. पाणी पण आहे. विहीरीच काम अति भव्यदिव्य आणि मजबूत आहे बघितलस ना? काठावरच्या वटवृक्षाच प्रतिबिंब पाण्यात पडत.अतिशय नयनरम्य


काठावर महादेवच मंदिर आहे.

आता जातोय राजसदरे कडे. गवत जरा वाढलय. जपून. इथे थोड हळू दगडी खाच उतरून जायचं आहे. राजसदर प्रशस्त आहे. राजा आणि प्रजा ऐसपैस बसू शकतील. बांधकाम अजून भरभक्कम आहे.

चिलखती बुरुज, गडावरचा अजून एक भारी अवशेष. नजर हटणार नाही अशी कलाकृती. धान्यकोठार खोली वजा आहे.

कसा वाटला गड? एकदा दिवसा नक्की भेट दे.

आपण आता खाली उतरू..अंधार पडलाय आणि साडेसात वाजत आलेत.

तुला मनात धाकधूक होती ना की तू आम्हा तिघांना भेटू शकशील की नाहीस? बघ आत्ता. तिन्ही जणांची भेट झाली तुझी. आम्ही पण खुश आहोत.

साताऱ्या जिल्ह्यात जवळ जवळ २५ गड आहेत. काही छोटे काही मोठे. जमेल तसे पाहून घे.

तुला कमळगड आणि दातेगड खासकरून पाहण्याची इच्छा आहे ना. नक्की पूर्ण होईल. जिद्द कायम अशीच ठेव.

बरं निघा तुम्ही आता. पुण्यात पोहोचायला उशीर व्हायला नको. जय शिवराय!

स्वगत:

गाडीतून पुण्याकडे निघाले. सकाळपासूनचा फेरफटका मारला. मनातल्या मनात . वर्धनगड, महिमानगड आणि संतोषगड! किती सुरेख गड आहेत . उंचीला कमी, चढायचा अवधी कमी. इतिहासाने मात्र परिपूर्ण. दुर्गावशेष संपन्न. मनात आलं ट्रेकिंगची सुरुवात ह्याच गडापासून हा करत नाहीत? ह्या गडांना इतिहास आहे, दूर्गअवशेष संपन्न आहे, किल्ला समजून घ्यायला आणि गड/किल्ल्यांच्या संज्ञा माहित करून घ्यायला ह्यासारखे दुसरे किल्ले नाहीत.

खूप समाधानी आहे. तीन गडांना भेटू शकले. त्यांच्या आपलेपणाने आणि वैभवशाली दुर्गावशेषांनी भारावून गेले. स्वप्नील आणि तुषारने ने माझ्यातला आत्मविश्वास दृढ केला म्हणूनच तीन गडांना भेटू शकले. 

अशाच  काही अनोख्या किल्ल्यांना भेटण्याची इच्छा आहे. स्वप्नील सोबत ही गडभेट अधिक समृध्द होते हे मात्र नक्की.

😪😪😪😪😪😪😪😪😪😪


(डावीकडून: स्वप्नील, अमित, आशिष, मी, मोनिशा, धनश्री आणि सुशील सर)

फोटो, खास आभार: अमित तागुंदे आणि सुशील दुधाने सर

इतके सुरेख गड आणि ट्रेक चे सुंदर नियोजन केल्याबद्दल खास आभार: Travorbis Outdoors👍👍👍👍 
कमळगड/कमालगड ट्रेक विथ झेनिथ ओडिसी, १४ ऑक्टोबर २०१८


कमळगड ट्रेक आणि गडावरील कावेची अर्थात गेरूची विहीर बघायची असीम इच्छा. काही ना काही कारणाने पूर्ण न झालेली. "झेनिथ ओडिसी" ट्रेक संस्थेची "कमळगड ट्रेक" ची पोस्ट पाहिली. ट्रेक ऑर्गनायझर,श्रद्धा मेहताला, लगेचच फोन करून मी येणार असल्याचे सांगितले. 

सातारा जिल्यातील वाई-जांभळी मार्गे वासोळेगावच्या तुपेवाडीला पोहोचलो. तुपेवाडी, गडाचे पायथ्याचे गाव. तिथपर्यंतचा प्रवास हाच एक आनंददायी आणि आल्हाददायक अनुभव. धोम धरणाचा असीम शांत आणि नयन मनोहर जलाशय....धरणाकाठीचा हलकासा गारवा, सूर्यकिरणांमुळे गारठ्याला मिळालेला दिलासा, वाऱ्यावर डुलणारी सोनकी, सोनसरी, कॉसमॉस इ. फुले...

पाणवठ्यावर विहंग करणारे पक्षी...
आजूबाजूला हिरवाईने सजलेले डोंगर, नजर रोखून ठेवणारे लॅन्डस्केप्स....
भुरळ पाडणारे पांडवगड केंजळगड आणि नवरा-नवरीचा डोंगर अर्थात म्हातारीचे दात....
प्रवास इतका सुंदर तर ट्रेक किती सुंदर असेल...मनात हीच उत्सुकता. ट्रेक सुरु केला. अफलातून मोसमात ट्रेकला आलो आहोत ह्या भावनेने मन हरखल. घनदाट जंगलातून गडाकडे जाणारी नागमोडी पायवाट, थोडसं उन, हलकासा गारवा....

आजूबाजूला फुललेली पिवळी-जांभळी सोनकी, मिकी माउस, निसुर्डी, लिचर्डी, नीलपुष्पी सारखी मनमोहक फुले...उडणारी असंख्य फुलपाखरे.....किती आणि कोणत्या शब्दात प्रशंसा करावी? डोळ्यांनी निसर्गदृश्य साठवावं आणि जमेल तितकं लेखणीतून रेखाटाव!

साधारण दोन तास चढून गेल्यावर गडावरील गोरक्षनाथाचे मंदिर आले. झाडाखाली दगडात कोरलेल्या देवादिकांच्या काही प्रतिमा दिसल्या. मंदिराच्या आवारात बसलेले स्थानिक भाविक म्हणे, "पुरुष मंडळी गोरक्षनाथाचे दर्शन घेऊ शकतात. वर्षातून एकदा, दसऱ्याच्या दिवशी स्त्रियांना दर्शन घेता येते".

थोड पुढे गेल्यावर थंडगार, स्वच्छ, गोड पाण्याचे एक टाके लागले. आजूबाजूला नजर फिरवली. दिसत होता निसर्गाचा अप्रतिम कलाविष्कार! घनदाट वृक्षांनी गजबजलेली खोल दरी, दरीच्या कड्यावर फुललेली सुवर्णरंगी सोनकी आणि हरित पर्वतरांगा.....

पुढील १५-२० मिनिट घनदाट जंगलात. भरपूर सावली, बारा-एकच्या तळपत्या उन्हात मिळालेला सुखद गारवा आणि सावली. पुढे विस्तीर्ण पठार. पठारावरून दिसला सुबक कमळगड माथा. 

पठारावर धनगरवाडी. घरासमोर कमळगडाचा फलक. फलकापासून जंगलातून जाणारी वाट गेली थेड गडावर.....गडाच्या शेवटच्या टप्प्यावर आता लोखंडी शिडी बसवलेली.....

शिडी चढून गेल्यावर गडपरिसर..तसा छोटासा. सोनकीच्या फुलांनी भरलेला.....गडटोकाला भगवा ध्वज..
कमळगड चे आकर्षण "गेरूची किंवा कावेची विहीर"! जमिनीच्या आत आत खोल खोल मजबूत पायऱ्या. विहिरीच्या तळाशी पाण्याचा साठा. वर बघितले तर चहूबाजुला पानांनी लगडलेल्या उंचच्या उंच दगडी कपारी. विहिरीत थोडा ओलसरपणा आणि दमटपणा. जाणवण्याइतका गारठा. बाहेर उन्हाचा तडाखा आणि विहिरीत गारवा. ही विहीर म्हणजे अत्यंत मोहक, अजब आणि सुंदर अविष्कार! 
विहिरीत उतरताना वाटतले जणू भुयारात उतरत आहोत. भिंतीचा आधार घेत हळूहळू उतरताना गेरूचा लालसर-तपकिरी रंग हाताला लागला. विहिरीच्या कातळ कपारींना वटवाघळे लटकलेली दिसली. या विहिरीतून बाहेर येऊच नये असे वाटले.

गडावरून उतरताना पायवाटेचा गोंधळ झाला. लगेचच तो गोंधळ दूर झाला. अचूक मार्गाने साधारण सव्वा तासात आम्ही तुपेवाडीत उतरलो आणि पुण्याकडे मार्गस्थ झालो.

कमळगड! खरतर गडाची, बुरुज, तटबंदी इ. सारखी लक्षणे नसलेला. तरीही अप्रतिम! आकर्षक गेरूची विहीर, गर्द वनराई, डोळे तृप्त करणारा आणि फुले-फुलपाखरांनी समृद्ध सभोवतालचा नजारा, धोम धरणाचा नितळ-नि:श्चल जलाशय लाभलेला हा गड.

कमळगड, सह्याद्रीतील एक अनासक्त सौदर्य!

कमळगड ट्रेक संस्मरणीय झाला तो टोबी मुळे! टोबी, श्रद्धाने दत्तक घेतलेला डॉगी! तो आणि आम्ही लगेचच समरूप झालो. अतिशय वेगाने पळत चढाई-उतराई करत होता. अगणीत वेळा वर-खाली केल. ट्रेक दरम्यान प्रत्येकाला साथ-सोबत केली. भुंकण नाही, अंगाशी येण नाही की जिभेचा स्पर्श शरीराला नाही. जे अन्यथा अनुभवास येतं. इतर कुत्र्यांसोबत मस्त हेल्दी खेळत होता. परतताना अचूक पायवाटेच्या गोंधळात त्याचे वर्तन न्याहाळता आले. आमच्याकडे धावत आला. काहीतरी गोंधळ झाला आहे हे त्याने जाणले. तो सगळ्या पायवाटा पालथ्या घालुन, त्यांचा वास घेऊन परत आमच्या कडे यायचा. तो देखील सैरभर झालेला. असुरक्षिततेची त्याची भावना आम्हाला जाणवली. योग्य पायवाटेने उतरताना त्याचा वेग आणि उत्साह वाढला तरीही आमच्यापासून लांब गेला नाही. ट्रेकिंगमधे पर्वतांमधे एकरूप झालेला असा हा टोबी!

कमळगड म्हटलं की गेरूची विहीर जशी आठवेल असाच आठवेल तो टोबी!कमळगड ट्रेक ची खास गोष्ट म्हणजे...रुचकर आणि चविष्ट नाश्ता आणि दुपारचे जेवण. श्रद्धा ने स्वत: बनवलेला. नाष्ट्यासाठी स्टीलच्या प्लेट्स ती स्वत: आणते. जेवणाचे पदार्थ व्यवस्थित पॅॅक करून आणलेले. सर्व गोष्टी एकदम स्वच्छ आणि हायजिनिक! 

श्रद्धा एक भन्नाट ट्रेक ऑर्गनायझर आहे. ट्रेकचे प्लॅॅनिंग, वेळेचे व्यवस्थापन, ट्रेक ठिकाणाची इतम्भूत माहिती...ही सर्व कौशल्य तिच्याकडे आहेच पण त्याही पलीकडे जाऊन सहभागीना निसर्गाशी समरूप करून घेण्याच कसब तिच्याकडे आहे. तिच्यासोबत ट्रेक करण म्हणजे एक अनंतकाळ मनात राहणारा अनुभव सोबत घेऊन येणंं. 

असा झाला कमळगड ट्रेक. जेव्हा झाला तेव्हा दुग्धशर्करा योगच! 

संत तुकाराम महाराज म्हणतात,
सुख पाहता जवापाडे|
दु:ख पर्वताएवढे||

आम्हा भटक्या ट्रेकर मंडळींसाठी ....दु:ख पर्वता एवढे असले तरी, दु:ख हर्ता आणि सुख हर्ता तो पर्वतच!

इति कमळगड कथा सफल संपूर्ण||

ट्रेक सहकारी: श्रद्धा, गिरीश सर, उषा, रोहिणी, वर्षा, मुकुल आणि टोबी.
फोटो आभार: उषा बालसुब्रमण्यम आणि रोहिणी कित्तुरे