कमळगड/कमालगड ट्रेक विथ झेनिथ ओडिसी, १४ ऑक्टोबर २०१८


कमळगड ट्रेक आणि गडावरील कावेची अर्थात गेरूची विहीर बघायची असीम इच्छा. काही ना काही कारणाने पूर्ण न झालेली. "झेनिथ ओडिसी" ट्रेक संस्थेची "कमळगड ट्रेक" ची पोस्ट पाहिली. ट्रेक ऑर्गनायझर,श्रद्धा मेहताला, लगेचच फोन करून मी येणार असल्याचे सांगितले. 

सातारा जिल्यातील वाई-जांभळी मार्गे वासोळेगावच्या तुपेवाडीला पोहोचलो. तुपेवाडी, गडाचे पायथ्याचे गाव. तिथपर्यंतचा प्रवास हाच एक आनंददायी आणि आल्हाददायक अनुभव. धोम धरणाचा असीम शांत आणि नयन मनोहर जलाशय....



धरणाकाठीचा हलकासा गारवा, सूर्यकिरणांमुळे गारठ्याला मिळालेला दिलासा, वाऱ्यावर डुलणारी सोनकी, सोनसरी, कॉसमॉस इ. फुले...

पाणवठ्यावर विहंग करणारे पक्षी...




आजूबाजूला हिरवाईने सजलेले डोंगर, नजर रोखून ठेवणारे लॅन्डस्केप्स....




भुरळ पाडणारे पांडवगड केंजळगड आणि नवरा-नवरीचा डोंगर अर्थात म्हातारीचे दात....




प्रवास इतका सुंदर तर ट्रेक किती सुंदर असेल...मनात हीच उत्सुकता. ट्रेक सुरु केला. अफलातून मोसमात ट्रेकला आलो आहोत ह्या भावनेने मन हरखल. घनदाट जंगलातून गडाकडे जाणारी नागमोडी पायवाट, थोडसं उन, हलकासा गारवा....

आजूबाजूला फुललेली पिवळी-जांभळी सोनकी, मिकी माउस, निसुर्डी, लिचर्डी, नीलपुष्पी सारखी मनमोहक फुले...



उडणारी असंख्य फुलपाखरे.....



किती आणि कोणत्या शब्दात प्रशंसा करावी? डोळ्यांनी निसर्गदृश्य साठवावं आणि जमेल तितकं लेखणीतून रेखाटाव!

साधारण दोन तास चढून गेल्यावर गडावरील गोरक्षनाथाचे मंदिर आले. झाडाखाली दगडात कोरलेल्या देवादिकांच्या काही प्रतिमा दिसल्या. मंदिराच्या आवारात बसलेले स्थानिक भाविक म्हणे, "पुरुष मंडळी गोरक्षनाथाचे दर्शन घेऊ शकतात. वर्षातून एकदा, दसऱ्याच्या दिवशी स्त्रियांना दर्शन घेता येते".

थोड पुढे गेल्यावर थंडगार, स्वच्छ, गोड पाण्याचे एक टाके लागले. आजूबाजूला नजर फिरवली. दिसत होता निसर्गाचा अप्रतिम कलाविष्कार! घनदाट वृक्षांनी गजबजलेली खोल दरी, दरीच्या कड्यावर फुललेली सुवर्णरंगी सोनकी आणि हरित पर्वतरांगा.....

पुढील १५-२० मिनिट घनदाट जंगलात. भरपूर सावली, बारा-एकच्या तळपत्या उन्हात मिळालेला सुखद गारवा आणि सावली. पुढे विस्तीर्ण पठार. पठारावरून दिसला सुबक कमळगड माथा. 

पठारावर धनगरवाडी. घरासमोर कमळगडाचा फलक. फलकापासून जंगलातून जाणारी वाट गेली थेड गडावर.....



गडाच्या शेवटच्या टप्प्यावर आता लोखंडी शिडी बसवलेली.....

शिडी चढून गेल्यावर गडपरिसर..तसा छोटासा. सोनकीच्या फुलांनी भरलेला.....



गडटोकाला भगवा ध्वज..




कमळगड चे आकर्षण "गेरूची किंवा कावेची विहीर"! जमिनीच्या आत आत खोल खोल मजबूत पायऱ्या. विहिरीच्या तळाशी पाण्याचा साठा. वर बघितले तर चहूबाजुला पानांनी लगडलेल्या उंचच्या उंच दगडी कपारी. विहिरीत थोडा ओलसरपणा आणि दमटपणा. जाणवण्याइतका गारठा. बाहेर उन्हाचा तडाखा आणि विहिरीत गारवा. ही विहीर म्हणजे अत्यंत मोहक, अजब आणि सुंदर अविष्कार! 




विहिरीत उतरताना वाटतले जणू भुयारात उतरत आहोत. भिंतीचा आधार घेत हळूहळू उतरताना गेरूचा लालसर-तपकिरी रंग हाताला लागला. विहिरीच्या कातळ कपारींना वटवाघळे लटकलेली दिसली. या विहिरीतून बाहेर येऊच नये असे वाटले.

गडावरून उतरताना पायवाटेचा गोंधळ झाला. लगेचच तो गोंधळ दूर झाला. अचूक मार्गाने साधारण सव्वा तासात आम्ही तुपेवाडीत उतरलो आणि पुण्याकडे मार्गस्थ झालो.

कमळगड! खरतर गडाची, बुरुज, तटबंदी इ. सारखी लक्षणे नसलेला. तरीही अप्रतिम! आकर्षक गेरूची विहीर, गर्द वनराई, डोळे तृप्त करणारा आणि फुले-फुलपाखरांनी समृद्ध सभोवतालचा नजारा, धोम धरणाचा नितळ-नि:श्चल जलाशय लाभलेला हा गड.

कमळगड, सह्याद्रीतील एक अनासक्त सौदर्य!

कमळगड ट्रेक संस्मरणीय झाला तो टोबी मुळे! टोबी, श्रद्धाने दत्तक घेतलेला डॉगी! 



तो आणि आम्ही लगेचच समरूप झालो. अतिशय वेगाने पळत चढाई-उतराई करत होता. अगणीत वेळा वर-खाली केल. ट्रेक दरम्यान प्रत्येकाला साथ-सोबत केली. भुंकण नाही, अंगाशी येण नाही की जिभेचा स्पर्श शरीराला नाही. जे अन्यथा अनुभवास येतं. इतर कुत्र्यांसोबत मस्त हेल्दी खेळत होता. परतताना अचूक पायवाटेच्या गोंधळात त्याचे वर्तन न्याहाळता आले. आमच्याकडे धावत आला. काहीतरी गोंधळ झाला आहे हे त्याने जाणले. तो सगळ्या पायवाटा पालथ्या घालुन, त्यांचा वास घेऊन परत आमच्या कडे यायचा. तो देखील सैरभर झालेला. असुरक्षिततेची त्याची भावना आम्हाला जाणवली. योग्य पायवाटेने उतरताना त्याचा वेग आणि उत्साह वाढला तरीही आमच्यापासून लांब गेला नाही. ट्रेकिंगमधे पर्वतांमधे एकरूप झालेला असा हा टोबी!

कमळगड म्हटलं की गेरूची विहीर जशी आठवेल असाच आठवेल तो टोबी!



कमळगड ट्रेक ची खास गोष्ट म्हणजे...रुचकर आणि चविष्ट नाश्ता आणि दुपारचे जेवण. श्रद्धा ने स्वत: बनवलेला. नाष्ट्यासाठी स्टीलच्या प्लेट्स ती स्वत: आणते. जेवणाचे पदार्थ व्यवस्थित पॅॅक करून आणलेले. सर्व गोष्टी एकदम स्वच्छ आणि हायजिनिक! 

श्रद्धा एक भन्नाट ट्रेक ऑर्गनायझर आहे. ट्रेकचे प्लॅॅनिंग, वेळेचे व्यवस्थापन, ट्रेक ठिकाणाची इतम्भूत माहिती...ही सर्व कौशल्य तिच्याकडे आहेच पण त्याही पलीकडे जाऊन सहभागीना निसर्गाशी समरूप करून घेण्याच कसब तिच्याकडे आहे. तिच्यासोबत ट्रेक करण म्हणजे एक अनंतकाळ मनात राहणारा अनुभव सोबत घेऊन येणंं. 

असा झाला कमळगड ट्रेक. जेव्हा झाला तेव्हा दुग्धशर्करा योगच! 

संत तुकाराम महाराज म्हणतात,
सुख पाहता जवापाडे|
दु:ख पर्वताएवढे||

आम्हा भटक्या ट्रेकर मंडळींसाठी ....दु:ख पर्वता एवढे असले तरी, दु:ख हर्ता आणि सुख हर्ता तो पर्वतच!

इति कमळगड कथा सफल संपूर्ण||

ट्रेक सहकारी: श्रद्धा, गिरीश सर, उषा, रोहिणी, वर्षा, मुकुल आणि टोबी.




फोटो आभार: उषा बालसुब्रमण्यम आणि रोहिणी कित्तुरे   

No comments: