सिंहगड ट्रेक: २९ जानेवारी २०१७


“सिंहगर्जना”.. जवळजवळ ३०-३२ वर्षानंतर आयुष्याला भिडली! ती देखील ईबीसी ट्रेकच्या सरावाच्या निमित्ताने! आतकरवाडी पायथा ते सिंहगड हा ट्रेक! पुण्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावर! हे अंतर पार करायला ३० वर्ष लागले!.... मनात घर करून राहिलेलं पण घराबाहेर पाऊल पडलचं नाही.......का?...ठोस कारणाचा विचार करायला लागल्यावर कारण सापडत नाही आणि मग एका उक्तीवर विश्वास ठेवावासा वाटतो, “योग” आल्याशिवाय काही नाही!

सकाळी ६.३० ची बस चुकली...सातच्या बसने निघाले. बसमधली तरुणाई आणि प्रसन्न करणारा गारठा....

साधारण ७.४५ च्या दरम्यान पायथ्याशी गाडी पोहोचली.

रस्ता माहित नव्हता....लोकांच्या मागेमागे निघाले. खूप सारे जण गड उतरत होते. उतरणाऱ्या खूप साऱ्या पुरुषांच्या हातात भाज्यांच्या जुड्या होत्या. निरिक्षण करत संथपणे चढायला सुरुवात केली.

सुरुवातीलाच टॉवर असलेला सिंहगड नजरेच्या टप्प्यात आला. दगडांनी खचाखचं भरलेला रस्ता.. कधी सखल तर कधी उंच... ...कधी फुफाट्याचा रस्ता....कधी पायऱ्या तर कधी अवघड पॅच...प्रत्येक अवघड पॅच असेल तिथे पर्यायी सोपा रस्ता ... खूप सारे शॉट कट्स...
रस्त्याच्या दुतर्फा, काकडी, कैरी, चिली-मिली, अननस, लिंबू सरबत, दही, बिसलरी, मसाला ताक, बिस्कीट इ. विकणारे छोटे छोटे स्टॉल......मेथी, चंदन बटवा, मुळा, तांबडा माठ, चुका, कांद्याची पात इ. विकणाऱ्या स्त्रिया...सिंहगडचा झालेला कायापालट दाखवणारा फलक पण चढताना दिसला. 

सुरुवातीला बऱ्यापैकी नागमोडी वळणे असणारा रस्ता..शेवटच्या टप्प्यात थोडा सरळ चढाईचा....आता पुणे दरवाजा, बुरुज/तटबंदी, कठडे स्पष्ट दिसू लागले.....

दरवाज्याच्या जवळच्याचं कठड्यावर अर्धातास विसावले आणि परतीचा प्रवास सुरु केला....परत त्याच संथ गतीने...

दोन गोष्टी करायच्या नाहीत असं मनाशी पक्कं केलं होतं.. नो ट्रेकिंग स्टीक (निदान चढताना तरी) नो घड्याळ (नो टायमर..नो स्टॉप वॉच)!

आजचा उद्देश एकचं होता “आनंद घ्यायचा”! कशाचा आनंद घेतला मी?.... मनाच्या अगतीशील रिलॅक्स अवस्थेचा. “ताई, भाजी घ्यायची का? गावरान भाजी आहे”...”ताई, मसाला ताक घ्यायचं का?” या आरोळीचा......चढणाऱ्या उतरणाऱ्या, अगदी चार वर्षाच्या बाळापासून ते ७०-८० वर्षाच्या क्राऊडचा...सुंदर छोट्या मुला-मुलींशी केलेल्या संवादाचा....त्यांच्या मधे होणाऱ्या गप्पांचा....एक मुलगी तिच्या काकाला गोष्ट सांगत होती...शब्द कानावर आले, “काका, बाबांना किती आश्चर्य वाटेल ना मी चढून गेले ह्याचं”.....एक छोटा मुलगा चक्क घसरगुंडी करत उतरत होता....एक मुलगी तिच्या आईला म्हणे, “ मी पुढे जाते, तुम्ही या”....एकीचा पाय झाडाच्या मुळात अडकला आणि ती पडली तेव्हा आई-बाबा आणि तिचा संवाद....आई मुलीला सांगत होती, “सरळ पाय ठेऊ नको, पाय तिरका ठेऊन उतर”....एक चार-पाच मुलाचा ग्रुप चढत होता, उतरणाऱ्याला विचारले, “किती आहे अजून? अर्धातास? आम्ही सर्वजण चाळीशीच्या पुढेचे आहोत..” मी चढत असताना एकजण म्हणे, “काकू, थोडचं राहिलं आता”......माझ्या पुढे-पाठी कोणी नाही, माझ्या सोबतही कोणी नाही...हवे तितके, हवे त्याचे फोटो.....हवी ती गती....हवा तो वेळ...

येताना खूप सारं समाधान सोबत घेऊन आले....सिंहगड ट्रेक केल्याचं, ट्रेकिंग स्टीक न वापरण्याचं, मनाप्रमाणे दिलेल्या वेळेचं, इतर ट्रेक केल्यानंतर हा ट्रेक अगदी फुसका वाटल्याचं......

सिंहगड ट्रेकची खासियत हीच की, काही विशिष्ट बंधने नाहीत!..........वयाचं बंधन नाही, सोबतीचं बंधन नाही, वारंवारीतेचं बंधन नाही, नियमांचं बंधन नाही, पायताणाचं बंधन नाही, ऋतूचं बंधन नाही, उद्देशाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, कौशल्याचं बंधन नाही......


इथे असता, तुम्हीचं तुमचे राजे....ह्या गडाच्या राजासाठी!

केटूएस (कात्रज टू सिंहगड) नाईट ट्रेक: २१-२२ जानेवारी २०१७


केटूएस ट्रेक....तिसऱ्यांदा?....का?.... कशासाठी?

जाहिरात तीच....रात्रीचा ट्रेक...१६-१७ टेकड्या...१५ किमी अंतर.....
आधीचे दोन्हीवेळचे अनुभव......
थोडे चांगले...थोडे “नको तो ट्रेक” असे वाटणारे.....तरीही.....

ह्या इतक्या टेकड्यांचे, अंतराचे दडपण आलेचं नाही.......
कोणतीचं गोष्ट जाण्याच्या इच्छेवर विपरीत परिणाम करू शकली नाही......
मनाने नकारघंटा वाजवलीच नाही.....
आतल्या आवाजाने “नाही” असं निक्षून सांगितलचं नाही....

एका संस्थेबरोबर एक ट्रीप केली होती.. त्याचं ठिकाणाची त्यांची जाहिरात मला पुन्हा आली...विचार आला, “ आता परत? त्यांना माहित आहे मी ते ठिकाण बघितलेलं आहे तरीही मला का जाहिरात पाठवली? त्याचं पैशात मी दुसरं ठिकाण पाहणं जास्त संयुक्तिक नाही का?” 

फरक आला लक्षात?

ट्रेकचं हेचं होतं की...त्याचं त्याचं ट्रेकची जाहिरात पुन्हा पुन्हा मिळते....एकाचं नाही तर अनेक ग्रुप कडून.....तरीही जावसं वाटतं ..का?.....  “त्याचं पैशात दुसरा, आधी न केलेला ट्रेक करू” असं मनात येतं नाही...का? काय आहे फरक?

आज निघाले होते ....का जात होते?....माहित नाही......

आम्ही ६ पार्टीसीपन्ट.....एस. जी. ट्रेकर्सचे प्रशांत आणि परेश.....आठ जणाचा छोटा ग्रुप....८ च्या कोंढणपूर गाडीने स्वारगेटवरून निघून कात्रज ओल्ड टनेलला उतरून चालायला सुरुवात केली...वाघजाई मंदिरापर्यंतचा हा रस्ता यावेळी खूप सपाट, विना चढाईचा वाटला, पायवाटेचा वाटला....आधीच्या दोन्ही वेळी तो खूप चढाईचा वाटला होता. दुसऱ्या ट्रेकच्या वेळी तर घोटे जड झाले होते आणि पुढचं पाऊल टाकवतं नव्हतं......यावेळी असं काहीचं झालं नाही.....रस्त्याने जाताना असं वाटलं, “प्रशांत ने वेगळ्या वाटेने आणलं की काय”....

वाघजाई मंदिराजवळ सर्वांची ओळख परेड झाली. सूचना दिल्या गेल्या. सर्वांकडे टॉर्च आहे, खायला आहे, पाणी आहे इ. ह्याची खात्री केली गेली....रात्री ९ वाजता ट्रेक सुरु झाला!

देवीचा आशीर्वाद घेऊन ट्रेक मी सुरु केला! दरवेळी मंदिराजवळून चढून जायचो...यावेळी प्रशांतने मंदिराला वळसा घालून नेलं....तो रस्ता पुन्हा मला आधीच्या तुलनेत अधिक सपाट वाटला....मला कळेचना....पुन्हा वाटलं, “प्रशांत ने वेगळ्या वाटेने आणलं की काय”.......

ट्रेक सुरु झाला...सुरुवातीला सगळे तसे शांत होते...२-३ जण ट्रेकसाठी तसे नवखे होते आणि मी सोडले तर सर्वजण केटूएस पहिल्यांदाचं करत होते....

हळूहळू एकमेकातील बोलण वाढलं....गप्पांचा आवाज येऊ लागला........

एक-एक टेकडी पार होतं होती...तसं तसं गप्पांचा आवाज वाढत होता....इंग्लिश अॅडव्हेन्चर मुव्हीज.....बुक्स...यावर गप्पा रंगात आल्या होत्या.....

मी आणि परेशमध्ये सुद्धा गप्पा रंगल्या....माझे ब्लॉग्ज....एस. जी ट्रेकर्स... विशाल...प्रशांत आणि माझी केटूएसला झालेली ओळख...इंग्लिश मुव्हीज...परेशची खासियत आहे ..तो बोलायला लागला कि मनातलं ओठावर येतं!

रात्री १२ वाजता जेवण्यासाठी विसावलो....

रात्री दोन वाजता चंद्र आकाशात चमकला....

सिंहगडावरची लालबत्ती स्पष्ट आणि जवळ दिसू लागली....म्हटलं, “कात्रज टू सिंहगड रोपवे नाही होऊ शकत का?”.... कोणीतरी म्हटलं, “मेट्रो आणायची का?”....म्हटलं, “ गुड आयडीया...सर्व गडांच्या पायथ्याशी मेट्रो यायला हवी”..... कल्पनेनं जो हशा पसरला त्याने वातावरण अधिकचं हलकं-फुलकं झालं.....

पहाटे ४.४५ ला आम्ही डांबरी रस्त्याला लागलो होतो!....

वाव....काय आत्मसंतुष्टी देणारं फिलिंग होतं....मध्ये मध्ये काही क्षणाचे ब्रेक घेऊन...जेवणासाठी ३०-४० मिनिट थांबूनही आम्ही ८ तासाच्या आत ट्रेक पूर्ण केला होता!

रादर मी पूर्ण केला होता!.... “लालबत्ती”.... “शेवटचे दहा मिनिट”...फक्त शब्द वाटले........टेकड्या सोड्ल्या तर ४-५ पॅचेस असे होते जे उतरायला अत्यंत स्टिफ आणि स्लीपरी होते... “अगदी खोल दरीत उतरल्यासारख वाटलं”!..प्रवाहशील माती आहे इथे.....छोट्या छोट्या दगडांनी बहरलेली “फ्री फ्लोइंग” माती!... आपल्यालाही वाहून नेतं होती ती....ग्रीप येतं नव्हती....चक्क बसून “घसरगुंडी” केली....म्हटलं, “लहानपणी न केलेल्या घसरगुंडीची कसर भरून काढतेय”.....वरून खाली दिसणाऱ्या टॉर्चकडे बघितलं तर खरोखरचं “खूप खोलवर दरी” असल्यासारखं वाटतं होतं...काही ठिकाणी ही माती वरून खाली वाहत होती आणि तो मागे खेचतं होत्ती....

कंबर थोडी दुखू लागली होती.....मधूनचं थोडा तोल जात होता....बस्स बाकी काही त्रास नाही..... “नको तो ट्रेक.. कशाला आले मी” .....हा विचार एकदाही स्पर्शून गेला नाही.........का?

एक आनंदाची गोष्ट सांगायची राहिलीचं...ओळखा?.......नाही ओळखता येतं?....माझे ब्लॉग्ज मनापासून वाचतं नाही वाटतं तुम्ही....काय म्हणता हिंन्ट देऊ?....ओके..... “असा एक शब्द आहे जो आतापर्यंत मी लिहिलेला नाही...ज्याने आतापर्यंतचे माझे सगळे ब्लॉग्ज व्यापून टाकले होते”...ओळखलतं?.....काय राव तुम्ही...हे पण मीच सांगायचं.....सांगते...माझ्यासाठी आनंदाची गोष्ट शेअर तर करायलाचं हवी.....मला “दम” तुलनेने खूप कमी लागला होता....जवळजवळ ७०% कमी! ७०% कमी वेळा मी थांबले......मी ते अनुभवतं होते....पहिल्याचं टेकडीला माझ्या ते लक्षात आलं......पहिलीचं टेकडी तशी विनासायास मी पार केली....मलाचं थोडं आश्चर्य होतं....म्हणून मी ट्रेकभर नोटीस करत राहिले....आणि तेव्हा खूष झाले जेव्हा प्रशांत म्हणाला, “मॅडम, यावेळी तुम्हाला दम कमी लागत होता...पहिली टेकडी तुम्ही पार केली तेव्हाचं माझ्या लक्षात आलं”....वाव दुसरं आश्चर्य होतं मला...प्रशांतनेही ते नोटीस केलं होतं! तो म्हणालाही, “गेल्यावेळी तुम्हाला बऱ्यापैकी दम लागत होता”....वाव......आहे ना आनंदाची गोष्ट! “दम, थकवा, दमछाक, अर्धमेली.इ” शब्दाविना असलेला ब्लॉग.....एव्हरेस्ट दर्शनाच्या स्वप्नाइतकाचं महत्वपूर्ण!
सिंहगडावर समीट.....लालबत्ती असणाऱ्या टॉवर खाली हजेरी....शेकोटी....गरमा गरम चहा....कांदाभजी....पिठलं, भाकरी, ठेचा...मटक्यातलं दही!


आणि हो, सिंहगड, राजगड आणि तोरणाच्या साथीने अनुभवलेला सूर्योदय! 

थकवा, कंबरदुखी कुठल्या कुठे गायब झाली होती....एकदम फ्रेश, झकास वाटतं होतं....केटूएस सारखा अति आव्हानात्मक ट्रेक करून आलोय ह्याच्या खाणाखुणा लोपल्या होत्या!

तर मी तिसऱ्यांदा परत त्याचं ट्रेकला आले होते.....का? 

----कदाचित ह्याचं परिवर्तनात्मक अनुभवासाठी!पहिला, केटूएस ट्रेक:हा नाईट ट्रेक एक अध्यात्मिक जाणीव आहे! "तिमिराकडून तेजाकडे नेणारा प्रवास " आहे. तिमिर म्हणजे मनातील संभ्रम, दबलेला आत्मविश्वास, अज्ञान, स्वत:तील क्षमतांचा अपरिचय, क्षमतांना संधीच न देणारी प्रवृत्ती! तेज म्हणजे दृढनिश्चय, जाणीव, उभारलेला आत्मविश्वास, क्षमतांची सिद्धता आणि आगेकूच!”


दुसरा, केटूएस ट्रेक: “ हा डे ट्रेकस्वत:ला स्वत:च्याच प्रेमात पडणारा, स्वत:च्या नजरेतून स्वत:ची प्रतिमा उंचावणारा” असा हा केटूएस ट्रेक आहे! सेल्फ एस्टीम जर वाढवायचं असेल तर एकदातरी केटूएस ट्रेक जरूर करावा!”

तिसरा, केटूएस ट्रेक:आध्यात्मिक जाणीवे पलीकडेही काही आहे? सेल्फ एस्टीम पलीकडेही काही आहे?....मनाची, शरीराची, भावनांची अनुभवलेली शब्दापलीकडली एक अवर्णनीय अवस्था ..........शरीर, मन, भावनांवर मिळवलेल्या विजयापलीकडेही काही आहे?.”....

केटूएस ट्रेक....तिसऱ्यांदा?....का?.... कशासाठी?

प्रश्नचिन्ह आहेचं..........शोध सुरूचं आहे...........


फोटो आभार: केटुएस नाईट ट्रेक टीम

“कॅपिंग” आणि “ट्रेकिंग” @ मढेघाट: १४-१५ जानेवारी २०१७

“कॅपिंग” आणि “ट्रेकिंग”......जबरदस्त संयोग! शिगेला पोहोचलेली उत्सुकता...

“कॅपिंग” ......तंबू (टेंट), स्लीपिंग बॅग, भडकलेली शेकोटी, शेकोटी भोवती धरलेला फेर, नृत्य, संगीत, दगडाच्या चुलीची धग, चुलीवर शिजत असलेला पदार्थ, कडाक्याच्या थंडीत दिसणाऱ्या गरम चहाच्या वाफा, झळकणारा टॉर्चचा प्रकाश, आकाशात विसावलेला चंद्रमा ……
आणि ह्या सगळ्यात स्वत:ला शोधत असणारे आपण! .....केवळ भन्नाट !

एस. जी. ट्रेकर्सचे “कॅपिंग” आणि “ट्रेकिंग” ... मढेघाट परिसरात! मढेघाट, वेल्हे गावापासून साधारण १० किमी आत! वेल्हेला नेणारा रस्ता, नेहमीचं भावणारा.... यावेळी तर सायंसौदर्य ....एक प्रसन्न शांतता.... सुंदरसा डांबरी रस्ता, आजूबाजूला हिरवीगार झाडी, बहरलेली शेती, घराकडे परतणारी गुरे-ढोरे, थापलेल्या शेणाच्या रचलेल्या गोवऱ्या, भाताच्या उभारलेल्या थप्प्या, अरुंद पायवाट, शेतात वसलेलं छोटसं-कौलारू घरं, मावळता सूर्य आणि दूरवर खडा राजगड आणि तोरणा!

केळद गावाजवळ “कॅप साईट” उभारली होती. मुला-मुलींची ओळख..... “कॅपिंग च्या सूचना..... बटाट्यांच्या पराठ्याचा नाश्ता......टेंट कसा उभारायचा ह्याचं प्रात्यक्षिक....पार्टनर सोबत स्वत:च्या टेंट ची उभारणी....काही जण चुलीवर चहा बनवण्यात व्यस्त...काही जण टेबलवर भाज्या कापण्यात मग्न....काहीजण फक्कड पुलाव शिजवण्यात गर्क......
काहीजण शेकोटी पेटवण्यात व्यग्न.....काहीजण सूचना देताहेत......

काहीजण चहा पिताहेत.....काहीजण हळूचं टोमॅटो-गाजर-मटार खाताहेत....काहींजण टॉर्चचा प्रकाश फिरवताहेत....काहीजण फोटोसाठी पोझ देताहेत......बोलण्याचा, हसण्याचा आवाज.......मधूनच विशालचा आवाज, “guys, guys..”......जाम मस्तीचं वातावरण.....

गंमत वाटतं होती......काही क्षणात खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालं होतं....अनोळखी, ओळखीचे झाले होते.....एकमेकांना मदत करत होते....काम वाटून घेत होते.....पुढाकार घेत होते....न केलेली कामे करत होते....अंतर मिटलं होतं....एक चैतन्य संचारलं होतं.....

अंधार दाटून येत होता......चंद्रमा ढगांच्या आड डोकावत होता..... गारठा वाढला होता......पुलाव फस्त झाला होता..... शेकोटी बहरली होती......गाण्यांचे बोल घुमू लागले होते......नृत्याची झलक थीरकत होती.... अंताक्षरी रंगात आली होती......

घड्याळाचे काटे पुढे सरकत होते.....हळूहळू एकेकाचा जोश मावळू लागला....निद्रादेवी प्रसन्न होऊ लागली....पावले टेंट कडे परतू लागली.....

घड्याळाचे काटे पुढे सरकत सरकत पहाटेला सोबत घेऊन आले...... झोप लागते ना लागते तोच, कोंबड्याची बांग.... सकाळचे साडेसहा वाजलेले.......शेकोटी पुन्हा एकदा तापली.....लगबग सुरु झाली....हळूहळू एकेकजण टेंट मधून बाहेर येऊ लागला.....ब्रश करा...फ्रेश व्हा....गरमा गरम मॅगी आणि चहा समोर आला.....सूर्यमा नभी अवतरला......ऊनोचा खेळ रंगला.....
टुमदार टेंट निद्रिस्त झाले.... “कॅपिंग” गोठले.....“ट्रेकिंग” ऊठले.......

घड्याळात दहा वाजले.....ट्रेकच्या सूचना समोर आल्या....परेश, फ्रंट लीडला....स्मिता, मिडल लीड......प्रशांत बॅक लीड.... उपांडे घाट डीसेंड करायचा ....मढेघाट असेंड करायचा......९०% मॉब फर्स्ट टाईम ट्रेकर...जास्त करून हिंदी स्पिकिंग......

ट्रेक सुरु....उपांडे घाट, फुल-टू-डीसेंड.....एक छोटीशी पायवाट...कडेला खोलवर दरी......परेश, स्मिता आणि प्रशांतच्या सूचनांचा आवाज..... “पाय तिरके ठेवत उतरा....खूप स्टिफ आहे तिथे चक्क बसून उतरा......इयर फोन काढा.....घोट-घोट पाणी पीत रहा....मदतीसाठी आवाज दया.....”

फर्स्ट टाईम ट्रेकर आहेत हे लक्षात घेऊन परेश आणि स्मिता लीड करत होते....काही घाई नाही.....भीतीची दखल....पण फुल-टू-जोश आणि परेश, स्मिता, प्रशांत कडून फुल-टू-मोटिव्हेशन आणि सपोर्ट.....एस.जी. ट्रेकर्सची खासियत हीच आहे.....

एक मुलगी फोनवर सांगत होती, “पहाडपर घुमने आई हूँ”......हास्याचे फवारे उडाले.... “ट्रेक” किती “जड” शब्द ना...त्यात साहस येतं, भीती येते, टेन्शन येतं....आणि “पहाड पर घुमना”..किती “हलका” शब्द ना....त्यात सहजता आहे, आनंद आहे, मुक्तता आहे.....एस. जी. सोबत ट्रेक म्हणजे हेच आहे.....ट्रेक हा “जड” शब्द अगदी “हलका” करून टाकण्याचं कसब त्यांच्याकडे आहे! साहस, भीती, टेन्शन यांची जागा सहजता, आनंद आणि मुक्तता कधी घेते कळूनचं येत नाही!

हलक्या-फुलक्या वातावरणाने उपांडे घाट कधी डीसेंड झाला कळलचं नाही....

 


परेश आणि प्रशांतची फोटोग्राफी फुल-टू-पीक वर होती.....  

दुपारचा एक वाजलेला...मढेघाट चढायचा होता! तीनचं टार्गेट होतं!...परेश पुढे, मध्ये स्मिता आणि मग प्रशांत....मला उन्हाचा असह्य त्रास होतं होता...त्यात झोप अर्धवट झालेली....झोप लागणार तो पहाट झालेली.....डोळे जड झाले होते.....झोप डोळ्यावर आलेली....डोकं गरगरत होतं...मुंग्या येत होत्या....पुढचं काहीचं दिसतं नव्हतं....महा-भयंकर अवस्था...नको तो ट्रेक असं झालं होतं.....पण प्रशांतने साथ सोडली नाही! थॅन्क यु प्रशांत!

स्मिता व परेश इतरांना घेऊन २.३० लाचं पोहोचले. स्मिता जाम खूष होती!

यावेळी परत एकदा जाणवलं की परेश, स्मिता आणि प्रशांतने काय भूमिका निभावली आहे आणि ती किती महत्वाची आहे!

फ्रंट लीडर वाला दिशादर्शक ...मिडल वाला गतीदर्शक......बॅक वाला स्थलदर्शक!

वेळेत टार्गेट पूर्ण झाल्याने सर्वजण खूष होते..... ३.३० वाजता परतीचा प्रवास सुरु झाला. वाटेत रुचकर जेवण जेवलो.....पहिल्याचं “कॅपिंग”चा फीडबॅक ही जबरदस्त आला!

कौतुकाचे शब्द पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आले.. “हॅटस ऑफ टू यु मॅडम”... “अॅपरिसिएबल..गिव्हअप करत नाही तुम्ही”.....

मला मात्र कौतुक, अभिमान, एस.जी. ट्रेकर्सचा वाटतं होता...त्यांनी घेतलेल्या एका निर्णयासाठी!.... नियमबाह्य वर्तन आणि ट्रेकवर बंदी........एक कठोर निर्णय...एक कठोर शिक्षा!..........

वेल डन, एस.जी. ट्रेकर्स......आय एम प्राऊड ऑफ यु!”

“कॅपिंग”... ट्रेकिंग संस्थेसाठी?.... अतिशय “टफ” गोष्ट.....व्यवस्थापन आणि यश!....मॅनेजमेंट अॅन्ड सक्सेस!

गाडीत चढवलेलं सामान पाहून मी इमॅजिन करू शकले की काय “एफर्टस” असतील..........त्यात पहिलचं “कॅपिंग”.....विचारू नका........ टेंट, स्लीपिंग बॅग..... मेनू ठरवण.... सामानाची जुळवाजुळव....अगदी टिशू पेपर पासून ते मसाले, मीठ, कात्री, सुरी, इथपर्यंत.....एक एक गोष्ट आली आहे की नाही ह्याचं मोजमाप....लोकांच्या हिशोबात सगळी ही तयारी....ऑन साईट कराव्या लागणाऱ्या गोष्टी.....व्यवस्थापन आणि वर्तन.....किती प्लॅनिंग......किती धावपळ....खूप सारी एक्ससाईटमेंट......खूप सारं टेन्शन.....फायनली सक्सेसफुल पॅक अप!

“कॅपिंग”......पार्टीसिपन्टसाठी?..... अतिशय “टफ” गोष्ट....सहभाग आणि नियमबद्ध जबाबदार वर्तन!....पार्टीसिपेशन अॅन्ड रिस्पॉन्सिबल बिहेविअर!

गाडीत चढलेला मॉब पाहून मी इमॅजिन करू शकले की काय “फ्रीडम” असेल.....

एक सक्सेसफुल “कॅपिंग”....आणि मुक्तता, आनंद, हसू, समाधान......स्वत:चा शोध..... आणि एक आत्मविश्वास....एक धडा......एक जिद्द...

एक सक्सेसफुल “कॅपिंग” आणि “ट्रेकिंग”......चला परत भेटूयात.....एका वेगळ्या लोकेशनवर!फोटो आभार: “कॅपिंग” आणि “ट्रेकिंग” टीम, मढेघाट


राजमाची नाईट ट्रेक: २०१० आणि २०१७ मधला!


वर्ष वेगळे आणि ऋतू वेगळा! २०१० मधील पावसाळा आणि २०१७ मधील हिवाळा! तो ही जवळजवळ सहा वर्षानंतरचा!

“राजमाची किल्ला” लोणावळ्याजवळील सुप्रसिध्द किल्ला! खूप नावाजलेला!

खूप उत्सुक होते किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि फरक अनुभवण्यासाठी, ट्रेक आणि स्वत:मधला!

ट्रेक मार्ग तोच....लोणावळ्यापासून पायी १५ किमी! बेस गाव उधेवाडी!

२०१० मधे लोणावळ्यापासून चालायला सुरुवात केली होती तो दुपारी साधारण ४-५ वाजता आणि यावेळी रात्री १२ वाजता!

२०१० साली हा मार्ग जास्तकरून मातीच्या पायवाटेचा होता. ऑगस्ट महिना....नुकताच मुसळधार पाऊस पडलेला! ठिकठिकाणी मातीमय गढूळ पाण्याचे लोट वाहताहेत! रस्ताभर चीकचीक! त्यात रात्रीची वेळ! काय हाल झाले विचारू नका! टॉर्च मुळे जास्तकरून पायाखालचचं दिसत होतंसमोरचं काहीचं दिसतं नव्हतं...खाली किती खोल पाय ठेवायचा आहे याचा अंदाज येत नव्हता....चिखलावरून पाय घसरत होता...जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाय चिखलाने माखलेले...बुटात पाणीच काय पण चिखल पण शिरलेला.. बुटातील त्या निसरड्या चिखलाने आणि रस्त्यावरील चिखलाने पाय घसरत होता...ग्रीप पूर्णपणे ढासळलेली....कपडे मातीने बरबटलेले.....त्यावेळी झाडी पण दाट होती बहुधा..कारण रस्ता चुकवता येत नव्हता आणि कडेने चालावं तर झाडाच्या फांद्या लागत होत्या! कधी एकदा गाव येतयं असं झालं होतं....पण चालतोय चालतोय तरी गाव काही येतं नव्हतं......


हो, पण दिवसा, आजूबाजूला दिसणारं निसर्ग सौदर्य अफलातून! सर्वत्र हिरवगार! पावसाच्या शिडकाव्याने सर्व धुऊन निघालेलं! वातावरण एकदम फ्रेश, स्वच्छ, चकचकीत, टवटवीत! इतकी शुदुध हवा कि श्वासावाटे घेतचं रहावी!

मधे मधे मातीचा रस्ता आजही असला तरि आज हा रस्त्यावर बऱ्यापैकी दगड आढळले! त्यामुळे वाहने जाणे-येणे सोयीस्कर झालेले आहे. यावेळी घरांच्या बाजूला खूप गाड्या दिसल्या. भाड्याने देतात. दहा-अकरा लोकांसाठी रु. १२००! दुकाने, कोल्ड ड्रिंक, कुरकुरे, लेज इ. ची उपलब्धता!

२०१० साली, मला आठवतं रात्री २-३ च्या दरम्यान गावात पोहोचलो. एका घरात झोपलो! पहाटेचा चहा-नाश्ता करून किल्ला बघायला निघालो.

पावसाळ्यातील ट्रेक असल्याने किल्ला खूप सुंदर दिसत होता! हिरव्यागार झाडीमध्ये काळा कभिन्न दगडात वसलेला किल्ला! गावातून किल्ल्याला जायला मातीची पायवाटचं! एकदम आखीव-रेखीव पायवाट! नागमोडी जाणारी! एकदम प्राकृतिक/नैसर्गिक!किल्ल्यावरची एक एक गोष्ट किती सुंदर दिसत होती. पावसाळ्यातील सुंदरता! खरचं प्रत्येक ऋतूतील सौदर्य काही अजबचं! यावेळी बघायला मिळालं कि गावापासून एका ठराविक अंतरापर्यंत सिमेंटच्या फरशांच्यांची वाट बनवलेली आहे. आता ३-४ वर्षात ही वाट बनवली असं गावातल्या एका बाबांनी सांगितलं. पायऱ्या संपल्या कि एक मोठा दगडी चौथरा बनवला आहे. २०१० मधे हा  चौथरा नव्हता. यावेळी पहाटे पाच वाजता पोहोचलो तेव्हा तिथेचं विश्रांती घेतली. किल्ल्याच्या रस्त्यावर मोठ-मोठे दगड विखुरलेले होते. दगडी गोळे पायवाटेभर पसरले होते. काही बांधकाम चालू असल्यासारखं! त्यामुळे किल्ल्याच्या प्राकृतिक/नैसर्गिक रूपाला कुठेतरी बाधा आली आहे असं वाटलं. उदयसागर तलाव आणि गोधनेश्वर मंदिराकडे जायला देखील सिमेंटच्या पायऱ्या!

कडाक्याच्या थंडीचे दिवस! दगडी चौथरा थंडगार पडलेला! नाही काही पांघरायला नेलेले आणि नाही काही अंथरायला! थंडीने झोप लागली नाही. १५ किमी चालून आल्यावर कंबर आणि पाठ टेकायला मिळाली एवढचं काय ते!

एकदम तोरणा आठवला. किल्ल्याच्या निम्म्यावाटेपर्यंत सिमेंटचा रस्ता बनवला आहे! वासोटया किल्ल्यावरही एका वर्षात काही ठिकाणी पायवाट जाऊन दगडांची वाट झाली आहे! “किल्ले/गावाचा विकास” या संकल्पनेवर विचार प्रकृतीच्या तुलनेत नकळत होऊ लागला/ करावासा वाटू लागला!

यावेळी किल्ल्याच्या मार्गावर ठिकठिकाणी दगडाच्या चुली, मॅगी बनवणे, शेकोट्या इ. दिसून आले! एका ठिकाणी टेंट टाकलेले! अस्वच्छता फारशी नव्हती हे मात्र उल्लेखनीय!

ऑफिसला कंटाळलेली काहीतरी “चेंज” हवा म्हणून २०१० साली राजमाचीला गेलेले. त्याला “ट्रेक” म्हणतात हे माहित नव्हतं! कोणते शूज घालायचे, ट्रेक दरम्यान कपडे कोणत्या प्रकारचे घालावेत, सामान किती आणि काय असावं, कोणतं कौशल्य असावं इ. इ. काहीचं माहित नव्हतं. आज थोडीफार सुधारणा आहे आणि खूप साऱ्या सुधारणेला वाव देखील आहे! वय पण वाढलंयं.... तेव्हा ट्रेक दरम्यान दम लागत नव्हता...झपाझप चालू शकत होते....वय “बोलतं” म्हणतात......त्यामुळेच यावेळी एक मुलगी मला म्हणे, “ तुम्हाला आन्टी म्हटलं तर चालेलं ना”....... 

परेश आणि प्रशांतच्या पेशन्सचा यावेळी तर कसं लागला!

तेव्हा मी बोलकी नव्हते. एकदम अबोल! त्यामुळे ट्रेक मधला माझा एकही फोटो नाही. फोटो घेण्यास कोणाला सांगितलचं नाही! ट्रेक करताना आणि ६ वर्षापूर्वी मी दिसत कशी होते ह्याचा अंदाज यायला काही मार्गचं नाही!

यावेळी...बापरे...प्रशांत आणि परेशला विचारा....पूर्ण रस्ताभर गप्पांची देवाण-घेवाण सुरु होती! 

श्रीवर्धन आणि मनोरंजन दोन्ही किल्ले चढले.
 उदयसागर तलाव आणि गोधनेश्वर मंदिर बघितलं. 

येताना मात्र लोणावळ्यापर्यंत गाडीने आले.यावेळी ट्रेकला पुणे सोडून इतर भागातील ट्रेकर्स आले होते. एक मनालीचा माउंटनियर तर एक सांगलीचा सर्पमित्र! 


मनालीचा माउंटनियर खूप कुशल ट्रेकर आणि लीडर वाटला. त्याच्या छोटया छोट्या हालचालीत त्यातील लीडर दिसून येत होता. हे मी का म्हणते ते सांगते. त्याला हिमालयातील ट्रेक बद्दल विचारत होते. तो म्हणे, “ आपके नी (घुटने) को कुछ् प्रोब्लेम है क्या?” मी ट्रेक करतानाचं त्याने केलेलं निरीक्षण! मी प्रोब्लेम सांगितला. म्हणे, “ हिमालयीन ट्रेक करने से पहले डॉक्टर कि सलाह लो. ५-६ दिन रोज ५-६ घंटे चलना पडता है. उतनी ताकद आपके नी मै है या नही उसकी जाचं करलो. वो फिटनेस है तो कोई दिक्कत नही"

राजमाची किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या आहेत, बरेच सारे अवशेष आहेत....बाले किल्ला, तटबंदी, गुहा , बुरुज, चोर दरवाजा......
श्रीवर्धनवरून दिसणारा सूर्योदय दर खासचं!२०१० आणि २०१७ मधील राजमाची, उधेवाडी गाव डोळ्यासमोर येतं होतं. राहून राहून वाटतं होतं कि नवीन ट्रेक /ट्रेकमार्ग शोधणे जितकं महत्वाचं.....तितकच महत्वाच हे ही कि दर काही वर्षांनी पुन्हा तोच ट्रेक करणे.......ऋतूनुसार ट्रेकचं सौदर्य अनुभवणे.....दर वर्षाला होणाऱ्या बदलांची दखल घेणे.......प्रकृती आणि विकास, हातात हात घालून जाणे....निसर्ग नियम आहे!

प्रकृती सोबत महत्वाचं हे कि आपल्यातील बदल अनुभवणे.......क्षमतां, कौशल्य, विचार, प्रगल्भता, जागरूकता, दृष्टी, रसिकता..........आणि बरचं काही!
फोटो आभार: एस.जी. ट्रेकर्स- ट्रेक टीम, २०१७ !

हॅॅपिनेस इंडेक्स प्रज्वलित ठेवणारा रजोनिवृत्तीचा काळ ट्रेकिंगचा!वयाच्या ४७ व्या वर्षी, २०१५ साली ट्रेकिंग सातत्याने सुरु करताना मनात दोन विचार प्रत्कर्षाने होते, एक विचार होता, व्यायामाचा अभाव असलेल्या या शरीराला ट्रेकिंग जमेल का? आणि दुसरा विचार होता ज्या वयाला मी ट्रेकिंग सुरु करतेय त्या वयात ट्रेकिंग केल्याचे परिणाम काय होतील?


कोथळीगड ट्रेक 

हे अनुभवकथन दुसऱ्या विचारावर केंद्रित आहे! ४७ वय हे स्त्रियांसाठी, रजोनिवृत्तीच्या  दृष्टीने अत्यंत महत्वाचे! रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रियांमध्ये मासिक पाळी कायमची बंद होणे! साधारणपणे, व्यक्तीपरत्वे ४९ ते ५२ वयात मासिक पाळी पूर्णत: बंद होत असली तरिही, काही स्त्रियांमध्ये पाळी बंद होण्याची लक्षणे वयाच्या ४० पासून (स्त्रीपरत्वे) दिसू लागतात. संप्रेरके निर्माण होण्याचे प्रमाण अंडाशय कमी करते त्यामुळे काही बदल होत असल्याने स्त्रियांमध्ये हा काळ विशेष महत्वाचा असतो. संप्रेरकांच्या (इस्ट्रोजेन) कमतरतेमुळे काही लक्षणे दिसू लागतात, मुख्य लक्षणामधे समावेश आहे, पाळी अनियमित होणे आणि रक्तस्त्रावाचे प्रमाण कमी- जास्त होणे! इतर लक्षणे आहेत, वजन वाढणे, झोप न लागणे, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, मूड बदलणे, चिडचिड, निरुत्साही वाटणे, मानसिक आणि भावनिक आंदोलने, कंबर आणि पाठदुखी, ओटीपोट दुखणे, चिंतातूर राहणे, एकाग्र राहण्यास त्रास, गोष्टी लक्षात न राहणे, हदयविकार इ.!


कळसुबाई शिखरावर

मासिक पाळी बंद होण्याच्या ह्या कालावधीमध्ये काही स्त्रियांना काहीच त्रास न होण्यापासून ते कित्येक वेळा दवाखान्यात भरती करावे लागेपर्यंत त्रास होतात. म्हणूनच रजोनिवृत्तीचा हा काळ शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्या सुलभ आणि अति त्रासरहित जाणे, स्त्रियांसाठी महत्वाचे असते!

पुरेसे कॅल्शियम घ्या, संतुलित आणि लो-फॅट आणि लो-कोलेस्टेरॉल असणारा आहार घ्या, व्यायाम करा, मूड आनंदी आणि प्रसन्न राहण्यासाठी एखादा आवडीचा छंद जोपासा, संगीताचा आस्वाद घ्या, आवडीची पुस्तके वाचा इ. सारखे काही उपाय रजोनिवृत्ती सुलभ होण्यासाठी स्त्रीरोगतज्ञ सांगतात.


ड्युक्स नोज येथे व्हॅॅली क्रोसिंग 

मी ट्रेकिंग सुरु केले तेव्हा माझी पाळी नियमित होती. हा विचारही मनात असायचा कि “मी वयाच्या अशा उंबरठ्यावर उभी आहे कि संप्रेरकातील बदलांमुळे/कमतरतेमुळे आणि कॅल्शियम पुरेसे नसेल तर हाडे ठिसूळ होऊन हाडांशी निगडीत समस्या निर्माण होऊ शकतात.” त्यात उजवा गुडघा स्प्रेन झाल्याने आधीच दुखावलेला.....

अशा अवस्थेत ट्रेकिंग जिथे संपूर्ण शरीर तर आहेच परंतु मुख्यत: गुडघ्यांचा वापर जास्त होतो असे ट्रेकिंग या आरोग्याच्या टप्प्यावर योग्य आहे का?


घनगड ट्रेक

जसे ४८ वर्ष सुरु झाले पाळी महिन्याच्या महिन्याला येईनाशी झाली. रक्तस्त्राव कमी होऊ लागला. उदास वाटणे, अपरात्री जाग येऊन पहाटे पर्येंत झोप न लागणे, दुसऱ्या दिवशी ट्रेक असेल तर चिंतातूर राहून झोप अपूर्ण होणे, उगाचचं थकल्यासारखे वाटणे, एखाद्या गोष्टीवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू न शकणे, शांत बसून रहावेसे वाटणे, उल्हासित उर्जा न जाणवणे इ. सारखी लक्षणे मी थोड्याप्रमाणात अनुभवत होते.सुधागड ट्रेक

कॅल्शियम आणि आरोग्यसंपन्न आहार सातत्याने आणि काटेकोरपणे घेणे चालूच असले तरी या वयात आवश्यक ते शारीरिक, मानसिक, भावनिक संतुलन राखून रजोनिवृत्तीचा हा काळ सुलभ आणि सुखकारक जाण्यासाठी ट्रेकिंग चालू ठेवण्याचा लाभ मला झाला असे वाटते. हे अनुभव कदाचित शास्त्राशी थेट संबंध दर्शवणारे नाहीत पण त्याचा अनुभव हा शास्त्राइतकाच तोडीचा आहे!

·    शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी ट्रेकिंग दरम्यान घोट घोट पाणी सातत्याने पिणे जरुरी असल्याची सवय लागल्याने दररोज किमान ३ लिटर पाणी पाणीची सवय लावून घेणे तितकेसे कठीण गेले नाही. अन्यथा आवश्यक तितके पाणी पिणे होतचं नव्हते.  येणारी सूज कमी होण्यास मदत झाली. मासिक पाळी बंद होण्याच्या ह्या काळापुरेशा पाण्याअभावी जर कदाचित पाय जास्तकरून तळपाय सुजत असतील तर ती सूज कमी होण्यास मदत झाली. डीहायड्रेशन मुळे सांध्याना येणारी सूज किंवा वेदना पाणी पिण्याची सवय लागल्याने कमी झाली. शरीर हायड्रेटेड ठेवल्यामुळे कमी थकवा, अधिक उर्जा आणि  चयापचय क्रिया सुधारण्यास मदत झाली. ह्या काळात अतिरक्त चरबी वाढल्याने वजन वाढते. पुरेसे पाणी पिल्याने (त्यातही कोमट पाणी) अतिरक्त चरबी कमी होण्यास मदत होते. कित्येक ट्रेक सहकार्यांनी प्रतिक्रिया दिली ती शरीर डौलदार आणि फिट असण्याची!

·        ट्रेकिंग दरम्यान घ्यायचा आहार ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. पाण्याला पूरक आणि उर्जा देणारा आहार जसे, सफरचंद, डाळिंब, पेरू, काकडी, बीट, गाजर, लिंबू सरबत, सुकामेवा इ. व्यायामाच्या तुलनेत आरोग्यसंपन्न असा हा आहार रजोनिवृत्तीच्या ह्या काळात मोलाचा ठरला असे वाटते. हिमोग्लोबिन १३-१४ च्या पुढे राहील असा आहार चालू ठेवण्यात मदत तर झालीच परंतु जितके उंचावर जाल तशी ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते. हिमोग्लोबिन जास्त असेल तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होऊन दम कमी लागण्यास मदत झाली. इतर दिवशी व्यायामाचा अभाव असल्याने हा पर्याय कामाला आला.
t
·        “बोन मिनरल डेन्सिटी” अर्थात स्नायू/हाडांचा कठीणपणा किंवा त्यातील कॅल्शियमचे प्रमाण! माझी ही चाचणी जेव्हा नॉर्मल रेंज मधे आली तेव्हा डॉक्टर म्हणाले, “ह्या वयात खूप कमी स्त्रियांची ही चाचणी नॉर्मल येते. बहुतांश स्त्रियांची चाचणी रेंजच्या आत येते”. मला आनंदच झाला. वाटलं कॅल्शियम सेवन मी तसही सुरूचं ठेवलं असतं पण ट्रेकिंग सारखा व्यायाम केल्याने स्नायू, विशेषत: गुडघ्यांची हालचाल तर झालीच पण त्याला आवश्यक सूर्यप्रकाशची जोड देखील मिळाली.

·        दीड वर्ष सातत्याने ट्रेकिंग केल्याने “सविता, तू खूप बारीक झालीस” हे बऱ्याचं मैत्रिणींकडून ऐकायला मिळाले. वजन आकडेवारीनुसार कमी झाले नसले तरी अतिरिक्त चरबी कमी झाल्याचा हा परिणाम होता.

·        ट्रेकिंग हा “अॅन्टी ग्रॅव्हीटी” स्वरूपातील व्यायाम असल्याने ह्दय आणि फुफुसांची कार्यक्षमता वाढण्यास आणि पायांचे स्नायू कणखर होण्यास मदत झाली. सातत्याने ट्रेकिंग केलं तर रक्ताभिसरण सुरळीत होऊन, चढाई चढताना तसा दम कमी लागतो ह्याचा अनुभव मला आला.

·        ट्रेकिंग हा असा एक व्यायाम आहे कि जो गटाचे फायदेपण देतो. एखादा व्यायाम एकट्याने करणे आणि गटाने करणे ह्यामध्ये कदाचित दुसरा व्यायाम जास्त प्रभावी आणि परिणामकारक असावा. शरीरासोबत मनाला सदृढ बनवण्याची ताकद त्यात आहे. तीच मनाची सदृढ सकारात्मक अवस्था रजोनिवृत्ती दरम्यान महत्वाची असते. ट्रेक सहकारी वाढत गेले. संवाद, आस्था, सहकार्य , प्रोत्साहन मिळत गेले. मी शब्दरुपाने आणि लेखन माध्यमातून व्यक्त होत गेले. मानसिक अवस्था सदृढ राहण्यास ह्याची खूप मदत झाली. 

·        मला अवघड वाटणारे ट्रेक मी करू शकले, पाठीवर पाण्याचं ओझ, एका हातात ट्रेकिंग पोल,रात्रीचा ट्रेक असेल तर दुसऱ्या हातात टॉर्च इ. मॅनेज करून शरीराचा तोल सांभाळण, एकदा स्प्रेन झालेल्या गुडघ्याला आणि कंबरेला हिसका बसेल अशी काही कृती होणार नाही याची दक्षता घेणं इ. गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या होत्या. थोडक्यात काय तर, स्वत:तील क्षमतांची जाणीव झाल्याने स्व-प्रतिमा (self-esteem) प्रबळ होण्यासही मदत झाली. ह्या स्व-प्रतिमेपुढे, संप्रेरकांची काय बिशाद होती माझ्यावर हावी/वरचढ होण्याची!

·        एक मुख्य गोष्ट ही पण झाली कि “पाळी आली तर ट्रेक कॅन्सल करावा लागेल किंवा ट्रेक दरम्यान पाळी आली तर काय? त्यासाठी करावी लागणारी तयारी इ.” सारख्या गोष्टींच टेन्शन कमी झालं. त्यादृष्टीने मनाचे स्वातंत्र अनुभवता आले आणि मनमुराद ट्रेकिंगचा आनंदही घेता आला.

·        निसर्ग, शुद्ध आणि मोकळी हवा, मनमोकळे वातावरण आणि ट्रेकर्स मधील उत्साह यामुळे मन प्रसन्न, फ्रेश राहून ताण (मुख्त: नोकरीतून येणारा) कमी होण्यास मदत झाली. उगाचच वाटणारा थकवा, निरुत्साह कमी झाला. काही प्रसंग आठवले तरिही मनाला उर्जा मिळत होती, मन प्रसन्न होत होतं. ट्रेकिंगचे फोटो पाहून देखील मूड बदलण्यास मदत होत होती. ट्रेक सहकाऱ्याशी गप्पा मारायचं काय ते ठरवलं आणि त्याची जादू अनुभवता आली! एखादे वेळी ट्रेक सहकाऱ्याच्या वाढदिवसाच्या किंवा अन्य कारणाने प्रत्यक्ष भेट झालीच तर दुधात साखरचं!

·        ट्रेक दरम्यान अतिशय थकवा जाणवत असला, नको तो ट्रेक असं वाटतं असलं तरिही दुसऱ्या दिवसाची सकाळ ही खूप आनंद देणारी, मन प्रसन्न करणारी, कालचा दिवस आठवून समाधान देणारी आणि स्वत:चा अभिमान वाटणारी वाटली. ह्या मनाच्या प्रसन्नवस्थाने मूड प्रफुल्लीत राहण्यास खुपचं मदत झाली.

·        माझ्याबाबतीत एक असंही झालं कि ट्रेक सहकाऱ्यामधे मी वयाने मोठी, जवळ जवळ दुप्पट वयाची! बरेचदा असं होत कि ट्रेक मधे ५० च्या पुढील वयाचे पुरुष असतात पण सातत्याने ट्रेक करणाऱ्या त्या वयाच्या स्त्रिया नसतात. त्यामुळे आदर, प्रेम तर मिळालचं पण प्रसंगी खास लक्ष (attention) मिळालं! कौतुक झालं! कित्येकांची प्रेरणास्थान मी बनू शकले. ह्यामुळे अनाहुतपणे ट्रेकमधे एक स्थान निर्माण झालं.ही भावना मनाला एक समाधान देणारी आणि समृद्ध करणारी ठरली. मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवण्यास ह्या गोष्टीं परम पूरक होत्या. 

·        एक गोष्ट ही देखील होती कि ट्रेकिंगचे लीडर्स ही मुलं होती. अर्थात ग्रुप मध्ये एकतरी मुलगी लीडर असावी असे कधी वाटलेही नाह. ती उणीव कधी भासलीही नाही. मला हे जाणवलं कि माझी चिंता, काळजी, विचार ह्या मुलांना सांगितले कि त्यांना ते समजतं होते. मला सहकार्य करत होते. कित्येक जण असेही होते कि मी काहीही न सांगता त्यांना काही गोष्टी समजत होत्या. बऱ्याचश्या ट्रेक मधे ट्रेक सहभागींनी देखील सहकार्य केले. कदाचित हे कारण होते कि ह्या मुलांची आई माझ्याच वयाची! आई कोणत्या प्रकारच्या भाव-भावना, शारीरिक व्याधी मधून जाते त्याची ह्या मुलांना कल्पना असावी. त्यामुळे मला समजून घेणे ह्या मुलांना अत्यंत सोपे गेले. खूप सारे ट्रेक करण्यात आणि ट्रेकिंग सुरु ठेवण्यात ही गोष्ट आणि असे पोषक वातावरण माझ्यासाठी खूप मोलाचे ठरले! 

·  मुले-मुली असेही मिळाले कि त्यांच्यासोबत मानसीक/भावनिक देवाणघेवाण झाल्याने नैराश्येची जागा भरून निघाली.

·        ट्रेकिंगचे अनुभव लिहायला सुरुवात केली. त्या प्रकारे व्यक्त होणं आवडतं गेलं, त्यात मन रमत गेलं. निरुत्साह, नैराश्य, खिन्नता इ. सारख्या नकारात्मक उर्जेसाठी जागाचं राहिली नाही. एकानंतर एक ट्रेकिंग संबंधीत सर्जनशील गोष्टी (उदा. पर्वती चढणे-उतरणे, ट्रेकिंग/गड-किल्ले आणि एव्हरेस्ट एक्सपीडीशन वरची पुस्तके वाचणे, यु-ट्युब वर व्हिडीओ पाहणे, ट्रेकिंग संबंधी ब्लोगज वाचणे, फुले, पक्षी, फुलपाखरांबद्दल वाचणे, ट्रेक सहका-यांचे अनुभव ऐकणे इ.) करण्यामधे मन गुंतत गेलं.

·        कदाचित “प्रोफेशनल” न वाटणारे हे अनुभवकथन, ह्या वयात ट्रेक करताना मी कोणत्या भावनेतून गेले त्या भावना समोर याव्यात म्हणून मी लिहिले. त्या भावनांनी मला आनंद दिला, समाधान दिले. मनाची ती अवस्था माझ्यासाठी नक्कीच ह्या काळात मानसिक आणि भावनिक स्तरावर आरोग्यसंपन्न ठेवणारी ठरली.

·        ह्या मधे एक ही पण भावना, विचार होता कि, सह्याद्रीतील बरीचसे ट्रेकवरचे ब्लोगज, पुस्तके हे पुरुषांनी लिहिलेले आहेत. गुगुलवर सर्च मारला तर मुलांनी लिहिलेले ब्लोगज समोर येतात. गड-किल्ले, ट्रेक, मा. एव्हरेस्ट एकस्पिडीशन इ. वरची पुस्तके देखील जास्त करून मुलांनी/पुरुषांनी लिहिलेली आहेत. एका मुलीने सातत्याने ट्रेकिंग अनुभव लिहिणे हा विचारही माझ्यासाठी, स्व:प्रतिमा उंचावणारा नक्कीच होता/आहे.

·        मानसिक समाधान देणारी एक गोष्ट ही पण आहे कि रविवारी ट्रेक करून सोमवारी ऑफिसला जाते तेव्हा मी ट्रेक केल्याची/दमल्याची/थकल्याची एकही निशाणी नसते. लोकांच्या लक्षातही येत नाही कि मी ट्रेक/नाईट ट्रेक करून आली आहे. गरम दुध पिऊन एका शांत झोपेची ही कमाल! विचार करता ही गोष्ट खरोखरचं मोलाची वाटते.

माझ्यासाठी ट्रेकिंग हा व्यायाम प्रकार म्हणून उपयुक्त ठरला. ट्रेकिंग हा सर्वांगीण फायदे देणारा व्यायाम प्रकार आहे असे मला वाटते. अगदी कॅलरिज बर्न होण्यापासून, स्टॅमीना, पेशन्स वाढणे ते मन आनंदी, प्रसन्न राहण्यापासून भावनिक शेअरिग/आधार मिळेपर्यंत!


एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक

विपरीत परिणाम काय झाले हा विचार करता एकही ठळक विपरीत परिणाम जाणवत नाही. एक मात्र गोष्ट नक्की की ट्रेकिंग मध्ये गुडघ्याचा वापर जास्त होत असल्याने त्यांचे स्वास्थ चांगले राहण्यासाठी आवश्यक ते गुडघ्याचे व्यायाम करणे महत्वाचे आहे. त्यांचा मजबूतता ट्रेकिंग चालू ठेवण्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण आहे. 

विपरीत परिणाम होण्याच्या शक्यतेचा विचार माझ्या मनात होता. ओटीपोट दुखेल, तारखेआधी पाळी येईल, रक्तस्त्राव जास्त होईल, स्पाॅटिंग होईल, थकवा जास्त जाणवेल, अंग दुखेल, चक्कर येईल, मळमळ होईल,  इ. इ. पण झाले पूर्णत: उलटेचं! अर्थात सकारात्मक परिणाम जाणवण्यासाठी ह्याच्या जोडीला सकस आणि संतुलित आहार, पुरेसा आराम आणि झोप आणि पूरक कॅल्शीयम आवश्यकचं आहे!

प्रत्येक ट्रेकला मी ह्यावर विचार करत होते, माझ्यात होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांची दखल घेत होते. हा अनुभव लिहीण थोडं धाडसाचं आहे असं ही वाटलं परंतु आज ट्रेकिंग मधे वाढणारी मुलींची संख्या लक्षात घेता माझा अनुभव लिहून मुला-मुलींपर्यंत पोहोचवावा असे वाटले.

मला जाणवलेले फायदे कदाचित कुठल्याही वयाच्या मुलीला जाणवू शकतील पण रजोनिवृत्तीच्या ह्या वयात हे फायदे अनुभवण्याचे सुख काही औरचं! मला झालेले फायदे लक्षात घेता एक जाणवते कि या वयातील स्त्रियांनी (साधारण ४५ च्या पुढे) चांगल्या ग्रुपच्या सहकार्याने ट्रेकिंग सुरु केले तर त्याचे फायदे नक्कीच आरोग्यसंपन्न असतील. 

मी मुलींना नेहमी म्हणते, “मला आता तुमच्यासारखं २४ वर्षाचं होता येत नाही आणि त्या वयाच्या दृष्टीकोनातून विचार/बदल करता येत नाही.” आजच्या २४ वर्षाच्या मुलींनी, त्यांच्या रजोनिवृत्तीसाठी स्वत:ला तयार करावे आणि ट्रेक सहकारी मुलांना ह्यादृष्टीने मुलींना अधिक चांगले समजून घेता आले तर ह्या लिखाणाचा हेतू नक्कीच साध्य झाला हि भावना अत्यंत आत्मदर्शी आहे!

हे अनुभव भावनांची सुरेख गुंफण आहे. शास्त्राच्या आधारापरे आहे. 

मला आनंदाने आणि अभिमानाने सांगावे वाटते कि, “ट्रेकिंग, रजोनिवृत्तीच्या ह्या वयात माझ्यासाठी “हॅपिनेस इंडेक्स” प्रज्वलित ठेवणारा मशाल ठरला/ठरत आहे"!

 
Happiness

दातेगड ट्रेक: १०० वा ट्रेक
Show is still going on ......

तैलबैला